खुबसुरत सूरतमधील भन्नाट अनुभव
गुजरातमध्ये मुस्लिम नागरिकांची म्हणजेच मुस्लिम मतदारांचीही
संख्या लक्षणीय आहे. अगदी गुजरातच्या दिशेने जाणा-या गाड्यांमध्ये बसल्यापासून हा
अनुभव येऊ लागतो. बुरखा घातलेल्या महिला किंवा पांढरी जाळीची टोपी घातलेले पुरुष किंवा
टिपिकल बोहरी मंडळींची संख्या वाढलेली सहजपणे लक्षात येते. अगदी द्वारकेपर्यंत
मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय आहे. मग सुरतही त्याला कसा अपवाद असणार. सुरतमध्ये
दोन दिवस फिरलो. त्यावेळचे हे काही अनुभव...
पहिला अनुभव एका चहावाल्याचा. सुरत टेक्सटाईल मार्केटमध्येच
एका ठिकाणी चहा खूप चांगला मिळतो, असं समजलं. म्हणून मग तिथं चहा प्यायला गेलो. चहावाला
मुस्लिम होता. ते आधी मा्हिती असतं तरी गेलोच असतो. चाळीशी-पंचेचाळिशी पार केलेला.
डोक्यावर नेहमीची टोपी, पांढ-या रंगाची दाढी आणि नेहमीचा पेहराव. चहा एकदम फक्कड
बनविला होता. खरोखरच मस्त.
काय यंदा काय माहोल आहे, असं अगदी नेहमीचं वाक्य
फेकल्यानंतर तो सुरू झाला. साहब, इस बार रंग बदलेगा... हे एकच मोजकं वाक्य बोलून
स्वतःच्या चातुर्याचं दर्शन त्यानं घडविलं. मग आम्हीही सुरु झालो. म्हटलं भाई,
क्यो बदलेगा रंग... तेव्हा त्याचं उत्तर खूप भारी होतं. म्हटला, अब बहुत हो गया.
(वाजपेयी यांच्यापेक्षा छोटा पॉझ) महंगाई कितनी बढ गई है... अब बस हो गया. (मला
वाटलं, की मोदींची राजवट खूप झाली असं त्याला म्हणायचं आहे. त्यासाठीच तो बस हो
गया असं म्हणत असावा. खरंतर त्याला तेच म्हणायचं होतं. पण त्यानं ते चतुराईनं
टाळलं.) त्याच्या मनात मोदींबद्दल कदाचित राग असावा, पण त्यानं तो व्यक्त करणं
कौशल्यानं टाळलं. अगदी हसतहसत.
नंतर एक कडवट मोदी विरोधक पाहिला तो भाजपच्या एका रॅलीत. भाजपच्या
लिंबायत मतदारसंघातील मराठी उमेदवार संगीता पाटील यांच्या रॅलीत आम्हीही सहभागी झालो
होतो. माहोल अनुभवण्यासाठी. हा मतदारसंघ सुरत स्टेशनपासून चार-पाच किलोमीचटवर. या
मतदारसंघात झोपडपट्ट्यांची संख्या जाणवण्याइतपत आहे. यामध्ये फिरत असताना मुस्लिम
नागरिकांची वस्ती असलेल्या मोहल्ल्यातून भाजपची रॅली जात होती. रॅली पुढे पुढे
सरकत होती आणि वस्ती अधिकाधिक दाट होत होती.
एका ठिकाणी एका गल्लीतून एक एम ८० वाला समोर येऊन थांबला.
बेकरी वगैरेचा व्यवसाय असावा. एम ८० वर दोन पिशव्या लटकविल्या होत्या. त्यावरून मी
अंदाज बांधला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी भगवे टी-शर्ट घातले होते आणि उपरणी परिधान
केली होती. आम्हीच फक्त भगव्या रंगाशिवाय होतो. आम्ही त्यांच्यापैकीच एक आहोत, असं
समजून आमच्याकडे पाहून अत्यंत त्वेषानं तो म्हणाला, मोदीने कुछ बॉटल बिटल भेजा है
क्या... एकच वाक्य बोलला पण काय बोलला. एकच बोला लेकिन क्या बोला... मोदींबद्दलचा
राग, द्वेष, चीड, संताप, खुन्नस त्याच्या शब्दात आणि प्रश्न विचारण्याच्या शैलीत
अगदी स्पष्टपणे दिसत होती. त्याकडे दुर्लक्ष करून पुढे निघालो. पण त्याचे डोळे
अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहेत.
नंतर रॅली फक्त मुस्लिमांच्या वस्तीतून फिरत होती. तेव्हा
भाजपच्या घोषणांना त्या वस्तीतील छोटी छोटी शेंबडी पोरं जोरदार प्रत्युत्तर देत
होती. कमल जिताओ... या घोषणेला पंजा जिताओ... किंवा वच्चा रे वच्चा कमल वच्चा (आलं
रे आलं कमळ आलं) या घोषणेला वच्चा रे वच्चा पंजा वच्चा अशी प्रत्युत्तर मिळत होती.
पंजाचे झेंडे फडकाविणं किंवा पंजाच्या नावानं घोषणा देणं, हे काम होतं शेंबडी पोरं
करत होती. शाळेत किंवा मदरशात जसं शिक्षण मिळतं तसंच मोदी किंवा भाजपविरोधाचं अथवा
काँग्रेस प्रेमाचं शिक्षण या मुलांना घरात किंवा परिसरात मिळत असावं.
तिसरी व्यक्ती
भेटली नरेंद्र मोदी समर्थक. भाजपचे नवसारीचे खासदार सी. आर. पाटील (हे देखील
मराठीच आहेत.) यांच्या संपर्क कार्यालयात दक्षिण गुजरातसाठी मिडीया सेल स्थापन
केला आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रवक्ते माधव भंडारी हे त्याचे प्रमुख आहेत. मराठीमध्ये
अत्यंत प्रभावीपणे बोलणारे भंडारी हे गुजरातीतूनही तितकाच अस्खलित आणि सहज संवाद
साधू शकतात, हे तिथं कळलं.
तर त्याच कार्यालयात दक्षिण गुजरात विद्यापीठात मास
कम्युनिकेशन आणि जर्नालिझम करणारी सेरा शेख ही विद्यार्थिनी भेटली. ती या मिडीया
सेलमध्ये भंडारी यांची असिस्टंट म्हणून काम करीत होती. मकरंद जोशी नावाचा मराठी
युवकही तिथं असिस्टंट म्हणून कार्यरत होता. ही सेरा शेख दिसायला एकदम मॉडर्न. टकाटक.
जीन्सची पॅन्ट आणि हिरव्या रंगाचा लूज टॉप. मनातील स्टिरिओटाईप प्रतिमांमुळंहिचं
नाव शेख असेल असं मनातही आलं नसतं.
तिचं नाव सेरा शेख असल्याचं समजल्यानंतर माझी उत्सुकता
चाळविली. मग नंतर थोड्या वेळानं तिला विचारलं, तुला किंवा तुझ्या घरातील व्यक्तींना
मोदींबद्दल काय वाटतं किंवा मुस्लिम समाजाचे ते विरोधक आहेत, असं वाटत का...
त्यावर तिचं उत्तर मार्मिक होतं. मोदी यांना विकासाचे ध्येय आहे. मुस्लिमविरोधक
म्हणून त्यांचे चित्र रंगविले जात असले तरी मला किंवा आमच्या नातेवाईकांमध्ये
कोणालाच तसे वाटत नाही. जी मंडळी कमी शिकलेली आहेत किंवा जे विचार न करता बोलतात
त्यांना कदाचित ते मुस्लिमविरोधक वाटत असतील. पण आम्हाला त्यांचे काहीच वावडे
नाही. तिला आणि तिच्या घरच्यांना मोदींचा राग नाही, हे आम्हालाही माहिती होतंच.
अन्यथा ती भाजपच्या कार्यालयात मिडीया असिस्टंट म्हणून रुजू झालीच नसती.
सुरतमध्ये आलेले हे तीनही अनुभव खूपच बोलके होते आणि लक्षात
राहण्यासारखे. नरेंद्र मोदींनी कितीही सदभावना यात्रा आणि दौरे केले तरी हा द्वेष
आणि संताप कमी होईल का, याबद्दल अजिबात साशंकता नाही. ती कमी होणारच नाही.