Showing posts with label Gujrath Parivartan Party. Show all posts
Showing posts with label Gujrath Parivartan Party. Show all posts

Tuesday, December 11, 2012

भाई, ये केशुभाई किधर है...

सुरतमध्ये 'परिवर्तन'ची हवा नाही
२००२, २००७, २०१२... सलग तिस-यांदा गुजरातच्या विधानसभा निवडणुकीसाठी गुजरातमध्ये सोमवारी सकाळीच दाखल झालो. वातावरण खूप तापलं असेल किंवा प्रचार शिगेला पोहोचला असेल, अशाच समजुतीनं सुरतमध्ये पोहोचलो. पण वातावरण काहीच तापलेलं नव्हतं. कुठेही पदयात्रा दिसत नव्हत्या, घरोघरी संपर्क साधण्यासाठी कार्यकर्त्यांची लगबग दिसत नव्हती. पक्षांच्या झेंड्यांची संख्या चांगलीच रोडावली होती, प्रमुख पक्षांची कार्यालयांमध्येही चहलपहल नव्हती. प्रचाराचा शेवटून दुसरा दिवस असला तरीही त्याचं प्रतिबिंब शहरात कुठेही उमटलेलं दिसत नव्हतं.





मला सर्वाधिक उत्सुकता होती, ती केशुभाई पटेल यांच्या पक्षाला किती जनसमर्थन आहे, हे जाणून घेण्याची. यंदाच्या निवडणुकीत तर गुजरात परिवर्तन पार्टीसारखा काँग्रेसला मोठ्या आशा असलेला पक्षही उतरला आहे. सुरत आणि दक्षिण गुजरातमध्येही अनेक भागात पटेल समाजाचे वर्चस्व आहे. सुरतमध्ये तर पटेल समाज मोठ्या संख्येने आहे. हिरे व्यापारी आणि टेक्सटाईल मार्केटमध्ये काम करणारे अनेक कामगार हे सौराष्ट्र भागातील आहेत. त्यामुळेच केशुभाई यांना इथे चांगला पाठिंबा मिळत असेल, अशी समजूत होती. केशुभाई यांचे दिवंगत सहकारी आणि सुरतचे माजी खासदार कांशीराम राणा हे सुरतचेच. त्यामुळे नाही म्हणायला सुरतमध्ये केशुभाईंच्या पक्षाचा विशेष जोर असेल, अशी माझी धारण होती. मात्र, परिस्थिती निराळीच निघाली. प्रचाराचे फक्त दोनच दिवस बाकी असताना, गुजरात परिवर्तन पार्टीचे ना कुठे बोर्ड दिसत होते ना कुठं प्रचाराच्या रिक्षा फिरताना दिसत होत्या. नना कुठल्या मोठ्या नेत्याची जाहीर सभा किंवा प्रचार फेरी लावण्यात आली होती.

जीपीपीचे (गुजरात परिवर्तन पार्टी... गुपप हा शॉर्ट फॉर्म वाचायला कसा तरी वाटतो) दक्षिण सुरत प्रभारी, सुरतचे माजी महापौर आणि महानगरपालिका फायनान्स बोर्डाचे माजी अध्यक्ष फकीरभाई चौहान यांच्याकडे गेलो. हे केशुभाईंचे कट्टर समर्थक आणि संघ-जनसंघाचे जुने कार्यकर्ते. साधारण ६५ किंवा ७० वर्षांची वामनमूर्ती. घरात गेल्यानंतर भिंतीवर जनसंघाचे संस्थापक शामाप्रसाद मुखर्जी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे दोन मोठे फोटो लावलेले दिसले. समोरच सोफ्यावर फकीरभाई आरामात बसलेले. सुरत जिल्ह्यातील कोणत्या तरी गावाहून आलेल्या पक्ष कार्यकर्त्याशी संवाद साधत होते. निवडणुकीच्या धामधुमीत फक्त एकच कार्यकर्ता पाहून धक्काच बसला. किमान पाच-पंचवीस कार्यकर्ते तरी त्यांच्या आजूबाजूला असतील आणि रणनिती ठरविली जात असेल, असे चित्र माझ्या डोळ्यासमोर होते. पण तसे काहीच दिसले नाही.



आम्ही गेलो आणि त्या कार्यकर्त्याची जागा आम्ही घेतली. फकीरभाई संवाद साधताना नरेंद्र मोदी आणि त्यांच्या कार्यशैलीवर सडकून टीका केली. अर्थातच, सौम्य प्रकृतीचे असल्याने सौम्य शब्दांतच. नरेंद्र मोदींच्या राज्यात कार्यकर्ते, भाजपचे नेते आणि भाजपचे चाहते यांना अत्यंत अपमानास्पद वागणूक मिळते. मी म्हणतो, तीच पूर्वदिशा, माझे म्हणणे ऐका किंवा माझ्याबरोबर येऊ नका, अशी त्यांची वृत्ती आहे. एकतर तुम्ही माझे चाहते व्हा नाहीतर मी तुमचा शत्रू होतो, अशीच मोदींची कार्यशैली आहे आणि तीच पक्षाला घातक आहे. त्यामुळेच केशुभाई आणि आम्ही त्यांच्यापासून दूर झालो, असे सांगून फकीरभाईंनी भडास काढली. सौम्य शब्दांत.

केशुभाईंच्या वयाचा मुद्दा भाजपकडून उपस्थित कसा करण्यात आला नाही. कारण मोदी एकदम तरुण तुर्क आणि केशुभाई वयस्कर. हा मुद्दा भाजपने प्रचारात आणला नाही का, असे आम्ही विचारले. तेव्हा त्यांनी सांगितले, की सुरुवातीला हा मुद्दा भाजपने प्रचारात आणला होता. केशुभाईंचे वय देवाचे नामस्मरण करण्याचे आहे, निवडणुकीत उतरण्याचे नाही, असा त्या प्रचाराचा सूर होता. मात्र, नंतर केशुभाईंची लोकप्रियता खूप असल्याने त्या प्रचाराला कोणीच धूप न घातल्याने भाजपला तो मुद्दा थांबवावा लागला, असे फकीरभाई यांनी सांगितले. मात्र, कदाचित हाच मुद्दा केशुभाई यांच्याविरोधात जाईल, हे सांगायला नकोच.

नरेश पटेल हे पटेल समाजाचे फार मोठे नेते. राजकीय पक्षाच्या कोणत्याही नेत्याच्या जाहीर  द्र मोदी आणि त्यांचे संबंध फार मधुर नाहीत, अशी परिस्थिती. मध्यंतरी नवज्योतसिंग सिद्धूने गुजरातेत येऊन टोलेबाजी केली. क्रिकेट कॉमेंट्री आणि जाहीर सभेतील भाषण एकाच शैलीत करता येत नाही, हे त्याला कोण सांगणार. बोलता बोलता, तो केशुभाई हे देशद्रोही आहेत, म्हणाला. त्यावर जोरदार प्रतिक्रिया उमटल्या. त्यावेळी केशुभाई हे देशद्रोही नाहीत, अशी जाहीर  प्रतिक्रिया नरेश पटेल यांनी दिली होती. पटेल समाजाचे १०० टक्के मतदान व्हायला पाहिजे, म्हणून  ते प्रयत्नशील आहेत. फक्त कोणासाठी मतदान करायचे, हे जाहीरपणे सांगायला ते तयार नाहीत.

अशा सर्व परिस्थितीत सुरत किंवा दक्षिण गुजरातमध्ये गुजरात परिवर्तन पार्टीचा म्हणावा, तितका जोर जाणवला नाही. कदाचित तो सौराष्ट्रापुरताच मर्यादित असू शकतो. त्यामुळेच केशुभाईंच्या पक्षाने सुरत किंवा दक्षिण गुजरातमधील ३६ जागांसाठी विशेष रणनिती अवलंबिली नसावी. त्याचमुळे दक्षिण गुजरातमध्ये भाजप आणि काँग्रेस यांच्यातच सामना असल्याचे स्पष्टपणे जाणवत होते. आमच्याशिवाय कोणाचेही सरकार स्थापन होऊ शकणार नाही, असा दावा जीपीपीचे नेते करीत असले तरीही त्या दाव्यावर माझा तरी विश्वास बसला नाही. कारण प्रत्यक्ष परिस्थिती काही वेगळेच सांगत होती.