भारताचा राष्ट्रध्वज ः तिरंगा, राष्ट्रगीत ः जन गण मन, राष्ट्रीय पक्षी ः मोर, राष्ट्रीय प्राणी ः वाघ, राष्ट्रीय खेळ ः हॉकी, राष्ट्रीय फूल ः कमळ आणि राष्ट्रीय खाद्यपदार्थ ः ? नाही ना माहिती. खरं सांगायाचं झालं तर मलाही माहिती नाही आणि असा कुठलाच खाद्यपदार्थ राष्ट्रीय खाद्यपदार्थ म्हणून निश्चित झालेला नाही. पण माझं मत विचाराल तर पुरीभाजी, पाणीपुरी किंवा सामोसा हे तीन पदार्थ राष्ट्रीय खाद्यपदार्थ म्हणून मान्यताप्राप्त होण्यास अडचण नाही.

भारताच्या कोणत्याही भागात गेल्यानंतर पंजाबी खाद्यपदार्थ, दाक्षिणात्य पदार्थ, चाट, भेळ आणि पाणीपुरी तसेच चायनीज खाद्यपदार्थ मिळतात. पण तरीही त्यांची ओळख विशिष्ट राज्यापुरती किंवा विशिष्ट राज्यांपुरतीच आहे. भेळ हा आणखी एक पदार्थ या स्पर्धेत उतरु शकला असता. पण भारतातील सर्वच ठिकाणी भेळ मिळते की नाही, याबाबत साशंकता आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर हैद्राबादमध्ये सहजासहजी भेळ मिळत नाही. अगदी एखाद-दोन ठिकाणी मिळते. त्यामुळे भेळ हा पदार्थ यादीत घेऊ नये, असं मला वाटतं.
पुरीभाजी, पाणीपुरी व सामोसा या पदार्थांची ओळख एखाद्याच राज्यापुरती मर्यादित नाही. ते काही महाराष्ट्रीयन नाहीत, दाक्षिणात्य नाहीत वा पंजाबीही नाहीत. पण तरीही भारतभर हे पदार्थ अगदी सहजपणे मिळतात, म्हणूनच त्या पदार्थांना "राष्ट्रीय' म्हणावेसे वाटते. अभिजीत कांबळे नावाच्या माझ्या मित्राचं लग्न नगर जिल्ह्यातील बाभळेश्वर जवळच्या एका गावात होतं. त्या निमित्तानं बाभळेश्वरला मुक्कामाची संधी मिळाली. त्यावेळी सकाळी टपरीवर चहा पिण्याच्या हेतूनं गेलो. पाहतो तर काय चहावाला मस्त पुरीचा घाणा काढत होता. त्याला म्हटलं भाजी कोणती आहे. तेव्हा नवाच प्रकार पहायला मिळाला. कांदा-बटाट्याची परतून केलेली भाजी (डोसा) त्यानं डिशमध्ये घेतली आणि त्यावर झणझणीत तर्री असलेली मटकीची उसळ अक्षरशः ओतली. वेगळ्या डिशमध्ये पुरी देऊन माझ्यासमोर ठेवत म्हटलं "घ्या साहेब'.
नाही म्हटलं तरी पुण्या-मुंबईतल्या हॉटेलांमध्येही पुरीभाजी मिळतेच की. "पुरीभाजी'ची "ऑर्डर' दिली की पुरीसोबत येते बटाट्याची परतून केलेली भाजी आणि पातळ भाजी हवी असेल तर "ऑर्डर' द्या "कुर्मापुरी'ची. नाशिकपासून ते नागपूरपर्यंत आणि औरंगाबादपासून ते सोलापूरपर्यंत पुरीभाजी किंवा कुर्मापुरी मिळत नसलेलं हॉटेल शोधून सापडणं अवघड!
हैद्राबादमध्ये असताना तशी सगळीकडेच पुरीभाजी मिळायची. पण आमचा एक ठरलेला चाचा होता. त्याच्याकडे कांदा, बटाटा, टॉमेटो व इतर काही अगम्य भाज्या घालून "कुर्मा'सारखी भाजी केलेली असायची. थोडीशी आंबट चव (चिंचेमुळे) असलेली भाजी चवीला काही निराळीच! अगदी उडुपी दुकांनांमधून वा रस्त्यांवरील गाड्यांवरही पुरीभाजीची विक्री व्हायची. पाच रुपयांमध्ये चार पुऱ्या आणि "अनलिमिटेड' भाजी. तिकडं बटाट्याच्या परतून भाजीची बात नश्शे. एक-दोन दुकांनांमध्ये "डोसाभाजी'ची रस्साभाजी मिळायची. पण खरं सांगांयचं तर एकदा खाल्ल्यानंतर पुन्हा ती रस्सा "डोसाभाजी' खायची इच्छाच झाली नाही.
मध्य आणि उत्तर भारतात भोपाळ, ग्वाल्हेर, झॉंशी, मथुरा, आग्रा आणि खुद्द दिल्लीतही अगदी सक्काळी सक्काळी भरपेट नाश्ता करण्याची पद्धत आहे. गरमा-गरम दूध, जिलेबी आणि पकोडे या नाश्त्याच्या सोबतीला स्टॉलवर किंवा हॉटेलांमध्ये मिळते ते पुरीभाजी! तिथली भाजीही रस्सा भाजीकडे झुकलेली आणि पुऱ्या आकाराला अंमळ मोठ्या व भटुऱ्याच्या जवळ जाणाऱ्या. चना-भटुरा हा देखील पुरीभाजीच्याच जवळ जाणारा आणखी एक खाद्यपदार्थ. गुजरातेतही सुरत, भरुच, बडोदा, अहमदाबाद आणि राजकोटवासियांनाही हा पदार्थ नवीन नाही. सुरतची पुरीभाजी तर अगदी सुप्रसिद्ध होती. आता इतरही पदार्थ आल्यानं तिची लोकप्रियता घटली असावी.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी गुवाहाटीला जाणं झालं व पश्चिम बंगाल तसंच आसाममध्येही हा पदार्थ अगदी सहजपणे मिळत असल्याचं स्पष्ट झालं. हावडा स्टेशनसमोर असलेल्या छोट्या टपरीवजा हॉटेलवर सकाळी पुऱ्यांचा घाणा निघत असतो. गुवाहाटीमध्ये सकाळी चहाबरोबर नाश्त्याला पुरीभाजी तसंच सामोसा हे दोन पदार्थ हमखासपणे मिळतात. इतकंच काय तर एका अण्णाच्या हॉटेलवरही पुरीभाजीचा "मेन्यू'मध्ये समावेश असल्याचं दिसतं. चव मात्र, अगदी आपल्या महाराष्ट्रात मिळते तशीच!
तमिळनाडू आणि केरळमध्ये जाणं झालं नाही, पण आमचा दाक्षिणात्य मित्र देविदास देशपांडे यानं सांगतिलेल्या माहितीनुसार केरळ आणि तमिळनाडूतही पुरीभाजी अगदी सर्रास उपलब्ध असते. फक्त तिकडं पुऱ्या मैद्याच्या असतात. पण त्यात काही विशेष नाही आसाम, बंगाल आणि अगदी हैद्राबादेतही पुऱ्या मैद्याच्याच असतात. तसंच केरळ आणि तमिळनाडूत भाजीमध्ये धने पावडर मोठ्या प्रमाणावर वापरलेली असते. त्यामुळं तिथल्या भाजील जराशी निराळी चव असते. मेघालयाची राजधानी शिलॉंगमध्येही पुरीभाजी मिळते. (अधिका माहिती म्हणजे तिकडं तिथं वडापाव देखील मिळतो.)
पाणीपुरी पण स्पर्धेत...
पाणीपुरी न आवडणारी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. सापडलीच तर ती व्यक्ती संशोधानाचा विषय होऊ शकते. पाणीपुरीला काही ठिकाणी (विशेषतः उत्तर भारतात) गोलगप्पे म्हणून संबोधलं जातं. पण नाव बदललं म्हणून चव बदलत नाही. शिजवलेल्या वाटाण्याचा किंवा हरभऱ्याचा रगडा, पुदीना आणि मिरचीच्या ठेच्यापासून बनविलेलं तिखट पाणी तसंच चिंच आणि गूळ यांच्यापासून बनविलेलं आंबटगोड पाणी यांचं अफलातून मिश्रण म्हणजे पाणीपुरी. आता भारतातल्या काही भागात फक्त तिखट पाणीच पाणीपुरीमध्ये टाकलं जातं. तर काही ठिकाणी पाणीपुरी खाताना बरोबर बारीक चिरलेला कांदा दिला जातो. पाणीपुरी मिळाल्यानंतर काही शौकिन कांदा टाकून आस्वाद घेतात.

... आणि सामोसाही!
सामोश्याबद्दल तर काहीच बोलायला नको. हा पदार्थ भारताच्या कानाकोपऱ्यात मिळतो. त्यातही इराण्यांच्या दुकानात मिळणारा सामोसा थोडासा निराळा. त्याच्या सारणात कोबीचा भरणा अधिक. इतर ठिकाणच्या सामोश्यात बटाटा आणि मटार (किंवा वाटाणा) यांची मक्तेदारी. आता काही ठिकाणी पट्टीचे सामोसेही मिळू लागले आहेत. पण त्यात फारसा दम नाही. सारण कमी आणि चावण्याचेच श्रम जास्त.
तुम्हाला काय वाटतं कोणता पदार्थ भाराताच राष्ट्रीय खाद्यपदार्थ बनण्यास अधिक पात्र आहे. या तीनपैकी एखादा पदार्थ असावा की आपल्या मतानुसार आणखी एखादा पदार्थ राष्ट्रीय खाद्यपदार्थ बनण्यास लायक आहे. तुमची प्रतिक्रिया "कॉमेंट्स'मध्ये नक्की लिहा.