बेलापूरला साम मराठीमध्ये असताना मुंबईत येणं फारसं व्हायचं नाही. पण सामना जॉईन केल्यानंतर रोजच्या रोज मुंबईत येण आलंच. दादर-परळमधील ब-याच नामांकित हॉटेल्स आणि रेस्तराँमध्ये पूर्वी अनेकदा गेलेलो आहे. पण गेल्या वर्षभरात खादाडीचे अनेक नवे अड्डे सापडले. त्यातील बरेच अड्डे हे रस्त्यावरचे आहेत. पण अशा अड्ड्यांवरच चांगलं आणि चविष्ट खायला मिळतं, असा माझा अनुभव आहे. त्यामुळे मी ते खात गेलो आणि एन्जॉय करत गेलो.
परळ स्टेशनकडून सामना कार्यालयाकडे जात असताना परळ एसटी डेपोच्या चौकात कोप-यावर (मुंबईच्या भाषेत नाक्यावर) एक शिरा-पोह्याचा स्टॉल असतो. अर्थात, पहाटे पावणे चार ते सकाळी आठ-नऊ या कालावधीत. सक्काळी सक्काळी स्वादिष्ट पोहे आणि मस्त शिरा इथं मिळतो. अवघ्या सात रुपयांत. शिरा-पोहे असं कॉम्बिनेशनही मिळतं. तेवढ्याच किंमतीत. पोहे जास्त तेलकट नसतात आणि शिरा चवीला जरा जास्त गोड असतो, त्यामुळं मला ते आवडतात. (शिवाय सामनातून सकाळी पुण्याला निघताना पोटाला आधार मिळतो, हा भाग दुसरा.)
सोबतीला शेजारीच गरमागरम कडक चहाही आहे. तो पण स्पेशल चहाच्या तोडीस तोड.
जिथे सकाळी शिरा-पोहे मिळतात त्याच्याच डायगोनली ऑपोझिट प्रकाश नावाचं एक छोटेखानी दुकान आहे. दादरमध्ये प्रकाश नावाचं एक खूप प्रसिद्ध हॉटेल आहे. ते निराळं. हे वेगळं. हे हॉटेल मुंबईत आहे, असं आत गेल्यावर जराही वाटत नाही. आत शिरतानाच ठेवलेली दुधाची कढई. आत विविध प्रकारच्या पाट्या. इथे सर्व प्रकारच्या नागरिकांना मुक्त प्रवेश आहे वगैरे वगैरे. या पाट्या आता फारशा दिसत नाहीत. कारण सर्व ठिकाणी सर्वांना प्रवेश हे सर्वमान्य आहे. शिवाय बुंदीचा लाडू, दाण्याचा लाडू, शेव-चिवडा, पापडी, अगदी बाबा आदमच्या काळातलं सोसयो हे शीतपेयं असा अगदी गावाकडच्या टपरीवरचा फिल इथं येतो. पदार्थांचे भावही हातानं लिहून चिटकविलेले. एक जुन्या जमान्यातलं हॉटेल वाटावं, असं वातावरण. मस्तच...
मला इथला सर्वाधिक आवडणारा पदार्थ म्हणजे राजगि-याच्या पु-या आणि उपवासाची बटाट्याची भाजी. पाच की सहा पु-या आणि गरमागरम झणझणीत भाजी. उपवासाला दिलखुश. मिसळ, वडा-उसळ पण मिळते, पण मला तशी मिसळ विशेष आवडत नाही. वेळेला केळं... म्हणून ठीक आहे. पण आवडीनं नाही. इथला साधा चहाही स्पेशल चहा इतकाच मस्त आणि कडक.
टिपिकल मालवणी (किंवा कोकणी) चवीचं आणि अगदी सामान्यांच्या खिशालाही परवडेल, असं हॉटेल म्हणजे गिरीश. परळमधल्या जयहिंद हॉटेलच्या समोरच हे गिरीश आहे. जयहिंदमध्ये प्रचंड गर्दी असल्यामुळे मी एकदा गिरीशमध्ये गेलो आणि नंतर प्रेमातच पडलो. पापलेट, सुरमई, हलवा, बोंबील, मांदेली अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मच्छीपासून ते खिमा, मटण-चिकन हंडी, मसाला अशा सर्व प्रकारच्या वैविध्यानं गिरीश भरलेलं आहे. अस्सल मालवणी म्हटल्यावर सोलकढीही आलीच. काही ठिकाणी सोलकढी ही आपली अशीच असते. पण इथली सोलकढी कायम लक्षात राहिल, अशीच म्हटली पाहिजे.
महत्त्वाचं म्हणजे इथले दरही अगदी माफक आहेत. दोन जण अगदी पोट फाटेपर्यंत जेवलो तर बिल १६० रुपयांच्या वर जात नाही.
वरळीकडून प्रभादेवीकडे जाऊ लागलो की रवींद्र नाट्य मंदिराकडे वळण्याआधीचा जो चौक आहे (नाव काही लक्षात नाही बुवा...) त्या चौकात एक गाडी लागते. आई-वडील आणि दोन मुलं अशी त्या गाडीवर असतात. त्या गाडीवर वडापाव खाल्ला की, बाकीचं सारं विसरुन जायला होतं. इथल्या वडापावची चव खरोखरच वेगळी आहे. तसंच दोन-तीन प्रकारच्या चटण्यांमुळं त्याची लज्जत आणखीनच वाढते. वडापाव प्रमाणेच पॅटिस आणि सामोसे ही तितकेच चटकदार असतात. पॅटिस आणि वड्यासाठी वापरलं जाणारं सारण वेगवेगळं असतं. नाहीतर काही ठिकाणी एकच सारण दोन्हीत वापरुन फसवणूक केली जाते. शिवाय इथला खप आणि ग्राहकांचा राबता इतका आहे की, विचारु नका. कधीही जा तुम्हाला अगदी गरमागरम वडा मिळणारच. आणखी काय हवंय.
सामनामध्ये आम्ही कधी-कधी (आठवड्यातून जवळपास पाचवेळा) वडापाव, भजी, दालवडा किंवा इतर खाद्यपदार्थ मागवायचो, त्यातून मला या माणसाचा शोध लागला. संधी मिळेल तसं त्याला भेट देणं व्हायचं.
मधुराची मिसळ...
संकष्टी चतुर्थीला एकदा प्रकाशमध्ये जाण्याऐवजी मधुरामध्ये गेलो. (थँक्स टू माय बॉस मि. विद्याधर चिंदरकर) मधुरात उपवासाची मिसळ खूप छान मिळते, असं त्यांनी सांगितलं. मग मी काय थांबणार होतो. मिशन मधुरा. त्यांनीच मला मधुरात सोडलं. एक प्लेट उपवासाची मिसळ मागितली आणि तृप्त झालो. उपवासाचा बटाट्याचा गोड चिवडा, उपवासाची बटाट्याची भाजी, साबुदाण्याची खिचडी, किसलेली (किंवा चोचलेली) काकडी, दाण्याचं कूट आणि वरुन मस्त दाण्याची आमची. व्वा क्या बात है... हे सारं कालवून राडा करायचा आणि मग ओरपायचं. स्वर्गीय सुख. तोड नाही हो. इतकं चांगलं खायला मिळणार असेल तर कोणी रोजही उपवास करेल. उपवासाची मिसळ खाऊन झाली की, मग पियूष, ताक, लस्सी किंवा कडक चहा काही पण घ्या.
इतर मराठी रेस्तराँमध्ये मिळतात तसे आळूची वडी, थालिपीठ, भाजणीचे वडे, खर्वस इइ अस्सल मराठमोळे पदार्थही इथं मिळतात. दादरमध्ये प्लाझाच्या लाईनमध्ये शिवाजी मंदिर समोर असल्यामुळं दर थोडे अधिक वाटतात. पण तृप्त होऊन बाहेर पडल्यानंतर सगळं वर्थ वाटतं.
इडली-डोसा...
परळ स्टेशनवरुन उतरलं बाहेर आलं की, समोर एक बोगद्यासारखं आहे. त्या बोगद्याखाली एक इडली-डोशाची गाडी लागते. मला वाटतं सकाळी पावणे सात ते दुपारी दोन-अडीच. दहा रुपयांत तीन इडल्या किंवा तीन मेदू वडे (काहींच्या भाषेत मेंदू वडा) किंवा दोन साधे डोसे (घावन). दोन (क्वचित प्रसंगी एक) प्लेट मारल्या की, पोट भरलं. इथं सांबार फारसं चांगलं मिळत नाही. म्हणजे जी टिपिकल दक्षिण भारतीय चव असते ना, ती इथं नाही. त्यामुळं सांबार नाही घेतलं तरी चालेल. पण इथली खोब-याची चटणी तसंच टॉमेटो आणि लाल मिरचीपासून तयार केलेली लाल चटणी एकदम टॉप्प. इडली किंवा घावन काहीही घ्या पण चटणीबरोबर खाल्लं तर अधिक चांगलं लागतं. माझा अनुभव. तुम्हाला सांबार आवडलं तर खाऊ शकताच की...
मुंबई सेंट्रल आणि वांद्रे स्टेशन इथं आमचे परममित्र मंगेश वरवडेकर उर्फ राजा यांच्या सहकार्याने मी खास फालुदा खाण्यासाठी गेलो होतो. सब्जा, शेवया, घट्ट गुलाबपाणी, मावा, घट्ट दूध आणि वरुन आईस्क्रीम घालून तयार केलेला फालुदा लय भारी. मुंबई सेंट्रल स्टेशनच्या बाहेर अंडा-भुर्जीच्या गाड्यांच्या बाजूला ही गाडी उभी असते. अस्लम की रशीद की सुलेमान असं काहीसं नाव आहे त्याचं. हाफ फालुदा १५ आणि फुल्ल २०. आम्ही आईस्क्रीम खाऊन गेलो होतो म्हणून हाफ घेतला. पण इतक्या लांब गेल्याचं सार्थक झालं.
वांद्रयाच्या स्टेशनबाहेरील फालुदाही चांगला आहे. तो पण मुबारक की तत्समच. इथलाही फालुदा चांगला. पण इथं मावा वरुन घालण्याची पद्धती बहुधा नसावी. त्यामुळे दूधाला किंवा त्या फालुद्याला घट्टपणा येत नाही. हा ड्रॉबॅक सोडला तर चव तशीच. दर मात्र, दहा रुपयांनी जास्त. फुल्ल फालुदा ३० रुपये. तीस रुपयांमध्ये फालुदा आणखी गोष्ट मोफत मिळते. फार खूष होऊ नका हात पुसायला टिश्शू पेपर मिळतो.. हा हा हा...
प्रत्यक्ष स्टेशनवर जाऊन किंवा तिथं बाहेर कुठं मिळतो तिथं जाऊन मी हा सामोसा खाल्लेला नाही. पण वरवडेकर राजे यांनी दोन-तीन वेळा हा सामोसा सामनामध्ये आणला होता. तेव्हापासून मला त्याची चटकच लागलीय, असं म्हणा ना. सुकी किंवा ओली चटणी नसली तरी चालेल असा हा वेगळाच सामोसा आहे. सामोशाचीच चव इतकी खल्लास आहे की, त्याला इतर गोष्टींची जोड लागतच नाही. फक्त पाच रुपयांत मिळणारा हा गरमागरम सामोसा इतका भारी आहे की, तुम्ही त्याच्या प्रेमात नक्की पडाल.
सयानी रोडवर भूपेश गुप्ता भवनच्या अलिकडे थोडंसं हे पूजा चणे भांडार लागेल. असंच फिरत असताना मला त्याचा शोध लागला. सामना समोरही एक भैय्या भेल आणि तत्सम पदार्थ विकतो. पण हा भैय्या त्यापेक्षा शेकडो पटीनं भारी आहे. इथं मिळणारी गिली (म्हणजेच ओली) भेळ पुण्यातल्या भेळच्या गाडीवरच्या भेळेची आठवण करुन देणारी. हा भैय्या पण भेळमध्ये बटाटा टाकतोच. असो. पण गूळ आणि चिंचेचं पाणी मी मुंबईतच त्याच्याकडेच पाहिलं. बाकीचे भैय्ये खजूर आणि चिंचेचं पाणी वापरतात. त्यामुळं ही भेळ इतरांपेक्षा वेगळी लागते. जे भेळचं तेच पाणीपुरीचं. पाणी एकदम झकास. चाट मसाला आणि पुदीना यांचं अत्यंत योग्य मिश्रण इथं असतं. त्यामुळं पाणी उग्र किंवा जास्त जळजळीत नसतं.
भेळ आणि पाणीपुरी हेच पदार्थ चाखले आहेत. अजून शेवपुरी, रगडापुरी, रगडापॅटिस आणि जे काही मिळतं ते खायचं आहे. कोरडी भेळही चांगली असावी, असा माझा अंदाज आहे. ती करण्याची पद्धत पाहून उगीच तसं वाटलं.
किर्तीमहलचा चहा...
मुंबई सकाळला असताना परळ टीटीच्या किर्तीमहल इथं चहा प्यायला जाणं व्हायचं. महापालिकेच्या कुठल्याशा ऑफिसच्या खालीच हे रेस्तराँ आहे. इथला चहा एकदम फक्कड. चव थोडीशी इराण्याच्या अंगानं जाणारी. पण हा इराणी नाही. हा बहुतेक उडुपी आहे. पण इथं इतर काही खाण्यापेक्षा चहा पिण्यासाठीच लोक मोठ्या संख्येने आलेले असतात. आम्ही त्यात असायचो. इथला चहा प्याच.
सामनात असताना केलेली खादाडी आत्ता सांगितली. बेलापूरला साम मराठीमध्ये असताना त्या परिसरात केलेली खादाडी लवकरच...