
कडकडून भूक लागली आहे आणि आपल्यासमोर कोणीतरी विविध पदार्थांनी भरलेली गुजराती थाळी आपल्यासमोर आली की काय खावं आणि काय नको, अशी आपली अवस्था होऊन जाते. अनेकदा सुरवात कशानं करावी, हे देखील समजत नाही. फक्त गुजराती जेवताना अशी परिस्थिती होत असेल असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकताय. कारण तुम्ही गुजराती खाद्यपदार्थांच्या एखाद्या दुकानात गेला तर विविध खाद्यपदार्थांच रेलचेल व एकाच पदार्थाचे विविध प्रकार पाहिल्यानंतर गुज्जू भाईंच्या आस्वादक वृत्तीचा प्रत्यय येईल.
काही कारणानिमित्तानं बडोदा (वडोदरा) इथं जाणं झालं. तशी धावतीच भेट झाली. पण तरीही आवर्जून वेळ काढून टिपिकल गुजराती पदार्थ मिळणाऱ्या बडोद्यातील एखाद्या दुकानात भेट देणं ओघानं आलंच. प्रतिष्ठित अलकापुरी भागातील "पायल' नावाचं दुकान विशेष लोकप्रिय असल्याचं समजलं आणि थेट दुकान गाठलं. एका दुकानाचे तीन भाग करुन एका भागात गरमागरम ताजे पदार्थ, दुसऱ्या भागात खारा माल आणि तिसऱ्या बाजूला गोड पदार्थ असं विभागणी करुन येणाऱ्या प्रत्येक गिऱ्हाईकाच्या आवडी-निवडीची काळजी घेण्यात आली होती.
लज्जतदार खाकरे...
पाच पंचवीस प्रकारचे खाकरे, पन्नास प्रकारच्या आणि जाडीच्या शेव, स्पेशल गुजराती मठिये, विविध प्रकारचे वेफर्स आणि चिवडे अशी जवळपास शे-सव्वाशे रकाने नुसत्या खाद्यपदार्थांच्या "व्हरायटी'ने भरलेले होते. खाकरा म्हणजे पापडाच्या जाडीची कडक पुरी. लसण शेव, पालक शेव, मेथी शेव, लसण-पालक, पालक-मेथी आणि मेथी-लसण अशा विविध चवींमध्ये शेव उपलब्ध होते. हेच प्रकार जाड शेव, बारीस शेव, गाठी शेव अशा स्वरुपातही उपलब्ध होते. खाकऱ्याचीही गोष्ट काही वेगळी नव्हती. लसूण घातलेला, न घातलेला, पालक, मेथी व इतर अनेक चवींमधील खाकरे ग्राहकांची आशेनं वाटत पाहत होते. यांच्या जोडीला बटाट्याचा आणि मक्याचा चिवडा, केळ्याचे नि बटाट्याचे तिखट-बिनतिखट वेफर्स अगदी तय्यारीत होते.
चविष्ट मठिये...
मठिये हा खास गुजराती पदार्थ गुजराती तसंच बिगर गुजराती ग्राहकांचंही आकर्षण होता. गुजरातीत मटकीला मठ असं म्हणतात. त्यामुळं मटकीच्या पिठापासून केलेल्या पाणीपुरीच्या आकाराइतक्या तिखट-मिठाच्या पुऱ्या म्हणजे मठिये. तिखट-मीठ असूनही थोडे गोडाकडं झुकणारे मठिये तोंडाला वेगळीच चव देणारे आहेत.
सुरळीची वडीही...
ताज्या पदार्थांमध्येही सुरळीची वडी, साधा आणि तिखट ढोकळा, सॅंडविच ढोकळा, तिखट कचोरी, उपवासाची कचोरी, बटाट्याचे पॅटिस, पंजाबी सामोसा, इटुकला-पिटुकला सामोसा, आलू वडा (म्हणजे आपल्या बटाटा वड्याच्या जवळपासही न फिरकणारा पदार्थ) आणि पालक, मेथी, कांदा तसंच बटाटा भजी... इतकं वैविध्य पाहिल्यानंतर पटकन सांगता येईल काय खायचं आणि काय नाही ते! या सर्व पदार्थांबरोबर मिळणारी ढोकळ्याच्या चुऱ्यापासून बनविलेली हिरवी चटणी खासच. नुसती चटणीही तितकीच चांगली. आणि हो एक राहिलंच की, गुजरातची खासियत म्हणजे गरमागरम फाफडा. डाळीच्या पिठापासून तयार केलेला आकाराने लांबडा पदार्थ. गरमागरम चटणीसह खायला एकदम उत्तम.
फुल्ल खादाडी...
अर्थात गुजराती माणसाला किंमतीकडं पाहून खरेदी करण्याची सवय नसल्यानं पदार्थांच्या किंमतीही थोड्याशा चढ्याच. पण पदार्थ खाल्ल्यानंतर पैसा वसूल. त्यामुळं जादा पैसा गेल्याचं दुःख नाही. शेवची भाजी, गाठीची भाजी, शेव टॉमेटो भाजी हे पदार्थ अस्सल गुजराती. आपल्याकडं जशा वडापावच्या गाड्या असतात, तशा तिथं शेवऊसळच्या गाड्या सकाळपासून रात्रीपर्यंत असतात. वाटाण्याची उसळ, वरुन शेव आणि सोबतीला पुरी किंवा पाव ही गुजराती लोकांची आवडती डिश!
मसाला डोसा आणि इतर दाक्षिणात्य पदार्थ, भेळ, रगडा पॅटिस आणि पाणीपुरीसह चाटचे विविध प्रकार, पंजाबी डिशेस, चायनीज खाद्यपदार्थ यांच्या गाड्यांचीही रेलचेलही आपल्याला रस्त्यारस्त्यांवर दिसते. त्या गाड्यांभोवती असलेली तुडुंब गर्दी पाहिली की गुज्जू लोकांच्या "तबियत का राज' समजतं. पण हे सारं आपल्याकडंही अगदी मुबलक प्रमाणात मिळत असल्यानं तिकडं फिरकण्याचा प्रश्नच नव्हता.
भरुचनी सेंग...
रेल्वेनं येताना भरुच नावाचं स्टेशन लागतं. हे ठिकाण खारे शेंगदाणे आणि फुटाणे यांच्यासाठी प्रसिद्ध! मुंबईहून जाताना नर्मदा नदीवरील जवळपास दीड किलोमीटर लांबीचा पूल ओलांडला की गाडी थेट भरुच स्थानकात घुसते. तिथं स्टेशनवर किंवा आपण मोटारीनं जात असलो की "हायवे'वर असंख्य विक्रेते आपल्यापुढं खारे शेंगादाण्याचे पुडे घेऊन उभे असतात. त्यातही दोन-तीन प्रकार आहेत. लहान, मध्यम आणि मोठ्या आकारावरुन शेंगादाण्याच्या किंमती ठरतात. मध्यम आकाराचा शेंगादाणाही भलताच मोठा असतो. किलोला साधारण 80 ते 100 रुपये पडतात.
भरुचमध्ये शेंगादाणे पिकत नाहीत. ते येतात सौराष्ट्राहून. पण भरुचचे कारागिर उत्तम असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळं इथले खारे शेंगादाणे अधिक प्रसिद्ध आहेत. मोठाल्या कढईतील रेतीमध्ये भाजण्याच्या आदल्या रात्री हे शेंगदाणे रात्रभर खाऱ्या पाण्यात भिजवून ठेवले जातात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते चांगले भाजले जातात आणि त्यावेळी पुन्हा त्यावर खाऱ्या पाण्याचा शिडकावा केला जातो. त्यामुळं भरुचच्या शेंगादाण्यांची चव अगदीच न्यारी वाटते. रोज भरुचमध्ये जवळपास 20 टन शेंगादाणे सौराष्ट्र आणि दक्षिण भारतातून भरुचमध्ये येतात. थोडा माल "एक्सपोर्ट' होतो आणि काही माल भारताच्या इतर भागांमध्ये पाठविला जातो. पण बाकी सारा माल भरुच आणि गुजरातमध्येच खपतो.