Showing posts with label Kashi. Show all posts
Showing posts with label Kashi. Show all posts

Thursday, May 08, 2014

आशीर्वाद दे गंगा मय्या...

काशी चलाए देश की नय्या... 

हिंदूंसाठी धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या काशीला सध्या अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. शिक्षण, साहित्य, कला, संस्कृती आणि परंपरा यासह अनेक गोष्टींचा संगम असलेलं काशी. गीता नि गाय यांच्या इतकीच पवित्र असलेल्या गंगेच्या तीरावर वसलेलं काशी. प्रत्येक हिंदूनं आयुष्यात एकदा तरी जाऊन गंगेत डुबकी मारावं, असं म्हटलं जातं ती काशीच. काशीस जावे, नित्य वदावे... सुरतनु जिमण अने काशीनु मरण... असं बरंच काही.



काशीचा विश्वेश्वर आणि गंगा माता यांना काशीच्या जीवनात अनन्यसाधारण स्थान आहे. हर हर महादेव ही घोषणा आणि कोणत्याही सांस्कृतिक-धार्मिक कार्यक्रमाच्या सुरुवातीला होणारं गंगास्तोत्राचं पठण हे त्याचंंच द्योतक. दररोज संध्याकाळी सात ते पावणेआठच्या दरम्यान गंगातिरी होणारी गंगा आरती ही इथं आल्यानंतर आवर्जून पाहण्यासारखी अनुभवण्यासारखी. वाराणसी नि गंगेबद्दल लिहायचं तर असं आणखी बरंच लिहिता येईल. पण नंतर कधीतरी...

सध्या मात्र, ही काशी वेगळ्याच कारणांसाठी चर्चेत आहे. अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या वाराणसी मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी निवडणूक लढवित आहेत. त्यामुळे सर्वांचे डोळे वाराणसीकडे लागले आहेत. उत्तर प्रदेश दौऱ्याची सुरूवात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या लखनऊ मतदारसंघापासून केल्यानंतर सांगता भारताच्या भावी पंतप्रधानांच्या मतदारसंघापासून करावी, असं डोक्यात होतं. शिवाय वाराणसीचं मतदानही शेवटच्या टप्प्यात असल्यामुळं इथं सर्वात शेवटी आलो.



जुन्या खुण्या जपणारं वाराणसी खूपच गजबजलेलं आहे. रस्ते अरुंद असल्या कारणानं जागोजागी होणारी वाहनांची कोंडी, त्यातून मार्ग काढत पुढे जाणाऱ्या सायकल रिक्षा, खचाखच भरलेल्या ऑटो रिक्षा, रस्त्याच्या कडेला पथारी टाकून बसलेले व्यावसायिक, चौकाचौकांत असलेले चहाचे ठेले, पानाच्या टपऱ्या नि कचौडी-सामोसे नि खाद्य पदार्थांचे स्टॉल्स, इडली नि डोशाचेही ठेले, लस्सीची दुकानं, दुमजली किंवा फारतर तीन मजली इमारती अशी काहीशी वाराणसी. अर्थात, काशी विश्वनाथाच्या मंदिराच्या जवळ खूपच अस्वच्छता, दाटीवाटी, कोंडी आणि गर्दी. हिंदूंच्या कोणत्याही मंदिराजवळ जसं गलिच्छ वातावरण असतं तसंच काहीसं इथंही आढळतं. मुस्लिम मोहल्ल्यांतही इतर शहरांमध्ये असतो तसाच अंधःकार...

हे जसं वाराणसी शहराचं एक चित्र आहे, तसंच आणखी एक चित्रही आहे. भव्य मॉल्स, बारा-पंधरा मजली इमारती, बंगल्यांची वसाहत, सहा पदरी चकाचक रस्ते, भरधाव वेगानं धावणाऱ्या महागड्या एसयूव्ही, तारांकित हॉटेल्स आणि इतर शहरांमध्ये मिळणाऱ्या सर्व सोयी-सुविधा. विकसित होत असलेल्या वाराणसीचं हे दुसरं रुप.

एकाच शहराला तीन-तीन नावं कशी, याची उत्सुकता मला पहिल्यापासून होती. त्या उत्सुकतेचं शमन काशी हिंदू विश्वविद्यालयात इतिहासाचे प्राध्यापक असलेल्या डॉ. राजीव श्रीवास्तव यांनी केलं. श्रीवास्तव हे मुस्लिम महिला फौंडेशनचे संस्थापक आहेत. काशी हे शहराचं प्राचीन-अर्वाचीन नाव. अगदी वेद आणि पुराणांमध्येही काशी नगरीचा उल्लेख आढळतो. वाराणसी हे नाव नद्यांवरून पडलेलं. वारूणा आणि अस्सी या दोन नद्यांच्या मध्ये वसलेलं गाव म्हणजे वाराणसी. तर उद्ध्वस्त झालेले काशी शहर बनार नावाच्या राजाने पुन्हा वसविली म्हणून बनारस. धर्म-संस्कृती-परंपरा मानणारे लोक या शहराचा उल्लेख काशी असा करतात, स्वतःला बुद्धिजीवी समजणारे आणि धीरगंभीर असणारे लोक या नगरीला वाराणसी म्हणतात. तर जे लोक खुशमिसाज, रंगीन आणि शौकीन आहेत, ते या शहराला बनारस म्हणून संबोधतात, अशी गमतीशीर माहिती श्रीवास्तव यांनी दिली. देश स्वतंत्र झाल्यानंतर सरकारी अध्यादेशानुसार या शहराचे नामकरण वाराणसी असे झाले.



आल्यानंतर पहिल्यांदा गंगेमध्ये डुबकी मारून स्नान केलं आणि मग आवरून बाहेर पडलो. शहरात जागोजागी नरेंद्र मोदींचे स्टीकर्स, पोस्टर्स नि मोठे फ्लेक्स लावलेले दिसतात. काशी आणि गंगा से मेरा रिश्ता पुराना है... किंवा आशीर्वाद दे गंगा मय्या, काशी चलाए देश की नय्या... अशा घोषणा लिहिलेले भव्यदिव्य होर्डिंग्ज दिसतात. भाजपच्या भगव्या टोप्या घालून हिंडणारे सायकल रिक्षावाले, मोदींचा प्रचार करणारे चहावाले आणि मोदींचे बिल्ले लावून बसलेले दुकानदार दिसतात. मोदींची टोपी, उपरणं किंवा बिल्ला लावून हिंडणं हा रोजच्या पेहरावातील अविभाज्य भाग आहे, असं वाटावं इतकी नागरिकांची संख्या जाणवते. वाराणसी येथे पोहोचल्यानंतर तेथील वातावरण अनुभवले आणि मोदी लहर म्हणजे नेमकी काय याचा अनुभव आला. सगळीकडे मोदी, मोदी आणि मोदी. प्रत्येकाच्या तोंडी एकच नाव नरेंद्र मोदी... 



अरविंद केजरीवाल यांचे बाहेरून आलेले समर्थक हे चौकाचौकांत झाडू हलवित उभे राहून नागरिकांकडे मतांचा जोगवा मागतात. आम आदमीच्या टोप्यांचे जागोजागी वाटप करतात. मोदी हे कसे नालायक, हरामखोर आणि भ्रष्ट आहेत, बनारसची वाट लावणार आहेत, अशा आशयाची पत्रक वाटतात. अब की बार मोदी सरकार, यानी आ बैल मुझे मार... अशा घोषणांचे स्टीकर्स चिकटवितात. केजरीवाल से जो डरता है, वो दो जगह से लढता है... ही केजरीवाल समर्थकांची आवडती घोषणा. बाकी मग काँग्रेसचे अजय राय, समाजवादी पक्ष नि बहुजन समाज पक्षाचं अस्तित्त्व अगदीच किरकोळ.

आल्यानंतर सर्वप्रथम भाजपच्या कार्यालयात गेलो. तिथं कार्यकर्ते नि पदाधिकाऱ्यांची फौजच्या फौज होती. भारताच्या कानाकोपऱ्यातून पदाधिकारी आले होते. तमिळनाडू, केरळ, कर्नाटकपासून ते महाराष्ट्र, बिहार, झारखंड, राजस्थान, दिल्ली नि छत्तीसगड वगैरे. वाराणसीतील संबंधित राज्यांच्या नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे त्यांना दिले आहे. शिवाय प्रचाराच्या इतर कामांमध्ये कसा उपयोग करून घेता येईल, याची यंत्रणाही आहे. भाजपचे विविध राज्यांतील मंत्री आणि प्रदेश पदाधिकारी असे शंभर ते सव्वाशे लोक वाराणसीत आहेत.



दुसरीकडे कोणत्या भागात आपल्या किती फेऱ्या झाल्या, याचा आढावा घेणारी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे. स्वतःहून उत्साहाने येणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यांच्या त्यांच्या भागांमध्ये संपर्क करण्याची जबाबदारी सोपविण्यात येते आहे. डॉक्टर, इंजीनिअर, वकील, प्राध्यापक, व्यावसायिक, प्रशासकीय परीक्षा देणारे विद्यार्थी, इतर विद्यार्थी, साहित्यिक-लेखक आणि अशा विविध ग्रुपपर्यंत पोहोचून त्यांना मोदी कसे आवश्यक आहेत, या संदर्भात माहिती दिली जात आहे. चर्चा घडवून आणल्या जात आहेत.

माध्यमे आणि कार्यलयात बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाच्या समस्यांचा नि कामांचा निपटारा करण्याची, माहिती देण्याची जबाबदारी झारखंडचे संघटनमंत्री राजिंदरसिंगजी यांच्यावर आहे. त्यांनी संबंधित व्यक्तीला मला जोडून दिले. त्यामुळं मी माझ्या पुढच्या कामांना मोकळा झालो.

आम आदमी पार्टीच्या कार्यालयात गेल्यानंतर बरोबर वेगळे चित्र अनुभवायला मिळाले. माध्यमांशी बोलण्यासाठी तिथं कोणीही नव्हतं. पाच मिनिटांत कोणतरी येईल, असं सांगितल्यानंतर जवळपास तासभर वाट पाहूनही कोणीच आलं नाही. विविध राज्यांतून कार्यकर्ते हे केजरीवाल यांच्या प्रचारासाठी येत आहेत. कर्नाटक, आंध्र प्रदेश, दिल्ली, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश इत्यादी. आल्यानंतर त्यांनी वहीत नाव नोंदवायचं आणि मग त्यांची राहण्याची व्यवस्था लावली जाते, अशी पद्धत. मात्र, रस्त्यात उभे राहून झाडू हलवायचे, पत्रक वाटायची, टोप्या वाटायच्या या पलिकडे आपचा प्रचार नाही.

 

आम आदमीच्याच कार्यालयात एकानं किस्सा सांगितला. सगळेच बाहेरून आलेले असल्यामुळं कोणालाच शहराची आणि मतदारयादीची बारीक माहिती नाही. बाहेरून आलेल्या लोकांना एखाद्या भागात पत्रक वाटण्यासाठी पाठविले जाते. मात्र, तो भाग कुठून कसा आहे, हे माहिती नसल्यानं ते मिळेल त्या ठिकाणी पत्रक नि प्रचार साहित्य वाटत सुटतात. अनेकदा असं झालं, की एकाच वस्तीत एकाच दिवशी तीनवेळा आपचे कार्यकर्ते प्रचारासाठी गेले. शेवटी लोक वैतागले. असं अनेकदा अनेक ठिकाणी घडतंय. त्यामुळं कार्यकर्ते असले तरीही आपकडे मजबूत यंत्रणा नाही, हे त्यांच्या कार्यालयातील व्यक्तीनंच कबूल केलं. शिवाय आपचे कार्यकर्ते शहरात प्रचार करीत असले तरीही ग्रामीण भागात त्यांचे अजिबात नेटवर्क नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आपचा प्रचार निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह प्रचार केला, की नरेंद्र मोदींनाच फायदा होतो, हे २००२ पासून सर्वज्ञात आहे. तरीही तीच चूक केजरीवाल करीत आहेत.



केजरीवाल हे मोदीना जोरदार टक्कर देणार, अशी परिस्थिती माध्यमांमधून निर्माण केली जात असली तरीही इथलं वास्तव वेगळं आहे. केजरीवाल यांना वाराणसीतून किंमत कळेल, अशीच परिस्थिती आहे. मोदी बाहेरचे असले तरीही भाजपची यंत्रणा मजबूत आहे. ती सोय केजरीवाल यांच्याकडे नाही. त्यामुळं केजरीवालांनी मोदींवर आरोप करण्याचा सपाटा लावला आहे. स्वतः काय करणार याऐवजी समोरचा कसा नालायक आहे, हे दाखविण्यातच त्यांचा वेळ जात आहे. केजरीवाल समर्थकांनी व्हिस्परिंग कॅम्पेन सुरू केले आहे. कशाला उगाच मोदींना मत देताय. ते वाराणसीचा राजीनामा देऊन वडोदऱ्याची सीट कायम ठेवणार आहेत. पुन्हा निवडणूक, पुन्हा मतदान. त्यापेक्षा केजरीवाल यांना मत द्या... असा प्रचार सुरू आहे. तरीही वाराणसीच्या जनतेने मोदी यांना दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद स्मरणात ठेवून मोदी इथला राजीनामा देणार नाहीत, असं ठाम प्रतिपादन अनेक मंडळी हिरीरीनं करतात.

माध्यमांनी उभा केलेला आणखी एक बागुलबुवा म्हणजे अजय राय आणि मुख्तार अन्सारी हे एक झाल्यामुळे मोदींच्या समस्येत भर पडली आहे. मुळात अजय राय यांना वाराणसीकर वैतागले आहे. आधी भाजप, मग समाजवादी पार्टी आणि आता काँग्रेसच्या वळचणीला गेलेल्या राय यांना वाराणसी नगरीत विशेष सन्मान नाही. राजकीय कारकिर्द संपुष्टात येण्याच्या दिशेने राय त्यांचा प्रवास सुरू आहे, असं इथं अनेकांनी सांगितलं. भरीस भर म्हणजे अन्सारी यांचा पाठिंबा घेतल्यामुळे राय यांच्या काही नातेवाईकांनीही मोदी यांना पाठिंबा दिला आहे. शिवाय गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या अन्सारी यांचा पाठिंबा घेतल्यामुळे काँग्रेसचे अनेक कार्यकर्तेही निराश झाले आहेत.

शिवाय मुख्तार अन्सारी हे पठाणी मुस्लिम आहेत. त्यांच्या जातीची वाराणसीतील मते अवघी तीन ते पाच हजार आहेत. वाराणसीत सर्वाधिक मुस्लिम समाज बुनकर म्हणजेच जुलाहा आहे. जुलाहा समाजाची जवळपास सव्वा लाख मते आहेत. जुलाहा आणि पठाणी मुस्लिम यांचे फारसे पटत नाही. त्यामुळे विणकर समाजाची मते काँग्रेसला मिळण्याची शक्यता फार थोडी आहे. विणकर समाजात मुस्लिम महिला फौंडेशनचे उत्तम काम आहे. या महिला दरवर्षी नरेंद्र मोदी यांना राखीपौर्णिमेला राखी वगैरे पाठवितात. त्यामुळे जवळपास पन्नास ते साठ हजार मुस्लिम मते मोदींना मिळविण्याचे टार्गेट श्रीवास्तव यांनी डोळ्यासमोर ठेवले आहे. उत्तर प्रदेशात मुस्लिम मतदारांनी काँग्रेसला साथ देण्याचे ठरविले आहे. तेवढाच काय तो अजय राय यांना दिलासा आहे. 




तेव्हा नरेंद्र मोदी वाराणसीतून जिंकणार आणि घसघशीत मताधिक्याने जिंकणार. किमान दोन ते तीन लाखांच्या मताधिक्यानं मोदी वाराणसीतून विजयी होणार, हे नक्की. वडोदरा आणि वाराणसी अशा दोन्हीकडून जिंकल्यानंतर ते वडोदरा सोडतील आणि इथली जागा कायम ठेवणार, हे निर्विवाद आहे. निवडणूक अर्ज भरताना ज्या पद्धतीने तीन-साडेतीन लाख लोक रस्त्यावर आले होते. ते पाहता मोदी हे वाराणसी सोडणार नाहीत, हे सांगण्यासाठी कोणत्याही राजकीय विश्लेषकाची गरज नाही. वाराणसीवासियांनी मोदींना भरभरून प्रेम आणि पाठिंबा दिला आहे. त्यामुळेच वाराणसीला पंतप्रधान निवडून देण्याची संधी प्रथमच उपलब्ध झाली आहे, अशाच धर्तीवर प्रचार भाजपकडून सुरू आहे आणि नागरिकांनीही ते मनोमन स्वीकारले आहे.


वाराणसी दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी नरेंद्र मोदी यांचा रोड शो होता. बेनियाबाग परिसरात त्यांना सभेसाठी परवानगी नाकारल्यानंतर त्यांनी रोड शो करण्याचे ठरविले. त्या रोड शोला नागरिकांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेता नरेंद्र मोदी यांच्यावर लोकांचे किती प्रेम आहे ते दिसून येते. प्रचंड गर्दीमुळे मोदी यांच्या वाहनांचा ताफा पुढे सरकण्यास उशीर होत होता... साधारण तीन ते चार तास विलंबाने त्यांचा रोड शो सुरू होता. तरीही तरुणांपासून ते ७५ ते ८० वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेक उत्साही नागरिक नरेंद्र मोदी कसे आहेत, ते प्रत्यक्ष पाहण्यासाठी थांबले होते. गुजरातचा विकास करणारा मोदी हा माणूस नेमका कोण आहे, हे पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. भाडोत्री कार्यकर्ते नव्हे तर उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले नागरिक पाहिल्यानंतर मोदी यांचा विजय निर्विवाद असल्याची खात्रीच पटली.