Showing posts with label AAP. Show all posts
Showing posts with label AAP. Show all posts

Thursday, May 08, 2014

आशीर्वाद दे गंगा मय्या...

काशी चलाए देश की नय्या... 

हिंदूंसाठी धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या काशीला सध्या अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. शिक्षण, साहित्य, कला, संस्कृती आणि परंपरा यासह अनेक गोष्टींचा संगम असलेलं काशी. गीता नि गाय यांच्या इतकीच पवित्र असलेल्या गंगेच्या तीरावर वसलेलं काशी. प्रत्येक हिंदूनं आयुष्यात एकदा तरी जाऊन गंगेत डुबकी मारावं, असं म्हटलं जातं ती काशीच. काशीस जावे, नित्य वदावे... सुरतनु जिमण अने काशीनु मरण... असं बरंच काही.



काशीचा विश्वेश्वर आणि गंगा माता यांना काशीच्या जीवनात अनन्यसाधारण स्थान आहे. हर हर महादेव ही घोषणा आणि कोणत्याही सांस्कृतिक-धार्मिक कार्यक्रमाच्या सुरुवातीला होणारं गंगास्तोत्राचं पठण हे त्याचंंच द्योतक. दररोज संध्याकाळी सात ते पावणेआठच्या दरम्यान गंगातिरी होणारी गंगा आरती ही इथं आल्यानंतर आवर्जून पाहण्यासारखी अनुभवण्यासारखी. वाराणसी नि गंगेबद्दल लिहायचं तर असं आणखी बरंच लिहिता येईल. पण नंतर कधीतरी...

सध्या मात्र, ही काशी वेगळ्याच कारणांसाठी चर्चेत आहे. अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या वाराणसी मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी निवडणूक लढवित आहेत. त्यामुळे सर्वांचे डोळे वाराणसीकडे लागले आहेत. उत्तर प्रदेश दौऱ्याची सुरूवात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या लखनऊ मतदारसंघापासून केल्यानंतर सांगता भारताच्या भावी पंतप्रधानांच्या मतदारसंघापासून करावी, असं डोक्यात होतं. शिवाय वाराणसीचं मतदानही शेवटच्या टप्प्यात असल्यामुळं इथं सर्वात शेवटी आलो.



जुन्या खुण्या जपणारं वाराणसी खूपच गजबजलेलं आहे. रस्ते अरुंद असल्या कारणानं जागोजागी होणारी वाहनांची कोंडी, त्यातून मार्ग काढत पुढे जाणाऱ्या सायकल रिक्षा, खचाखच भरलेल्या ऑटो रिक्षा, रस्त्याच्या कडेला पथारी टाकून बसलेले व्यावसायिक, चौकाचौकांत असलेले चहाचे ठेले, पानाच्या टपऱ्या नि कचौडी-सामोसे नि खाद्य पदार्थांचे स्टॉल्स, इडली नि डोशाचेही ठेले, लस्सीची दुकानं, दुमजली किंवा फारतर तीन मजली इमारती अशी काहीशी वाराणसी. अर्थात, काशी विश्वनाथाच्या मंदिराच्या जवळ खूपच अस्वच्छता, दाटीवाटी, कोंडी आणि गर्दी. हिंदूंच्या कोणत्याही मंदिराजवळ जसं गलिच्छ वातावरण असतं तसंच काहीसं इथंही आढळतं. मुस्लिम मोहल्ल्यांतही इतर शहरांमध्ये असतो तसाच अंधःकार...

हे जसं वाराणसी शहराचं एक चित्र आहे, तसंच आणखी एक चित्रही आहे. भव्य मॉल्स, बारा-पंधरा मजली इमारती, बंगल्यांची वसाहत, सहा पदरी चकाचक रस्ते, भरधाव वेगानं धावणाऱ्या महागड्या एसयूव्ही, तारांकित हॉटेल्स आणि इतर शहरांमध्ये मिळणाऱ्या सर्व सोयी-सुविधा. विकसित होत असलेल्या वाराणसीचं हे दुसरं रुप.

एकाच शहराला तीन-तीन नावं कशी, याची उत्सुकता मला पहिल्यापासून होती. त्या उत्सुकतेचं शमन काशी हिंदू विश्वविद्यालयात इतिहासाचे प्राध्यापक असलेल्या डॉ. राजीव श्रीवास्तव यांनी केलं. श्रीवास्तव हे मुस्लिम महिला फौंडेशनचे संस्थापक आहेत. काशी हे शहराचं प्राचीन-अर्वाचीन नाव. अगदी वेद आणि पुराणांमध्येही काशी नगरीचा उल्लेख आढळतो. वाराणसी हे नाव नद्यांवरून पडलेलं. वारूणा आणि अस्सी या दोन नद्यांच्या मध्ये वसलेलं गाव म्हणजे वाराणसी. तर उद्ध्वस्त झालेले काशी शहर बनार नावाच्या राजाने पुन्हा वसविली म्हणून बनारस. धर्म-संस्कृती-परंपरा मानणारे लोक या शहराचा उल्लेख काशी असा करतात, स्वतःला बुद्धिजीवी समजणारे आणि धीरगंभीर असणारे लोक या नगरीला वाराणसी म्हणतात. तर जे लोक खुशमिसाज, रंगीन आणि शौकीन आहेत, ते या शहराला बनारस म्हणून संबोधतात, अशी गमतीशीर माहिती श्रीवास्तव यांनी दिली. देश स्वतंत्र झाल्यानंतर सरकारी अध्यादेशानुसार या शहराचे नामकरण वाराणसी असे झाले.



आल्यानंतर पहिल्यांदा गंगेमध्ये डुबकी मारून स्नान केलं आणि मग आवरून बाहेर पडलो. शहरात जागोजागी नरेंद्र मोदींचे स्टीकर्स, पोस्टर्स नि मोठे फ्लेक्स लावलेले दिसतात. काशी आणि गंगा से मेरा रिश्ता पुराना है... किंवा आशीर्वाद दे गंगा मय्या, काशी चलाए देश की नय्या... अशा घोषणा लिहिलेले भव्यदिव्य होर्डिंग्ज दिसतात. भाजपच्या भगव्या टोप्या घालून हिंडणारे सायकल रिक्षावाले, मोदींचा प्रचार करणारे चहावाले आणि मोदींचे बिल्ले लावून बसलेले दुकानदार दिसतात. मोदींची टोपी, उपरणं किंवा बिल्ला लावून हिंडणं हा रोजच्या पेहरावातील अविभाज्य भाग आहे, असं वाटावं इतकी नागरिकांची संख्या जाणवते. वाराणसी येथे पोहोचल्यानंतर तेथील वातावरण अनुभवले आणि मोदी लहर म्हणजे नेमकी काय याचा अनुभव आला. सगळीकडे मोदी, मोदी आणि मोदी. प्रत्येकाच्या तोंडी एकच नाव नरेंद्र मोदी... 



अरविंद केजरीवाल यांचे बाहेरून आलेले समर्थक हे चौकाचौकांत झाडू हलवित उभे राहून नागरिकांकडे मतांचा जोगवा मागतात. आम आदमीच्या टोप्यांचे जागोजागी वाटप करतात. मोदी हे कसे नालायक, हरामखोर आणि भ्रष्ट आहेत, बनारसची वाट लावणार आहेत, अशा आशयाची पत्रक वाटतात. अब की बार मोदी सरकार, यानी आ बैल मुझे मार... अशा घोषणांचे स्टीकर्स चिकटवितात. केजरीवाल से जो डरता है, वो दो जगह से लढता है... ही केजरीवाल समर्थकांची आवडती घोषणा. बाकी मग काँग्रेसचे अजय राय, समाजवादी पक्ष नि बहुजन समाज पक्षाचं अस्तित्त्व अगदीच किरकोळ.

आल्यानंतर सर्वप्रथम भाजपच्या कार्यालयात गेलो. तिथं कार्यकर्ते नि पदाधिकाऱ्यांची फौजच्या फौज होती. भारताच्या कानाकोपऱ्यातून पदाधिकारी आले होते. तमिळनाडू, केरळ, कर्नाटकपासून ते महाराष्ट्र, बिहार, झारखंड, राजस्थान, दिल्ली नि छत्तीसगड वगैरे. वाराणसीतील संबंधित राज्यांच्या नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे त्यांना दिले आहे. शिवाय प्रचाराच्या इतर कामांमध्ये कसा उपयोग करून घेता येईल, याची यंत्रणाही आहे. भाजपचे विविध राज्यांतील मंत्री आणि प्रदेश पदाधिकारी असे शंभर ते सव्वाशे लोक वाराणसीत आहेत.



दुसरीकडे कोणत्या भागात आपल्या किती फेऱ्या झाल्या, याचा आढावा घेणारी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे. स्वतःहून उत्साहाने येणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यांच्या त्यांच्या भागांमध्ये संपर्क करण्याची जबाबदारी सोपविण्यात येते आहे. डॉक्टर, इंजीनिअर, वकील, प्राध्यापक, व्यावसायिक, प्रशासकीय परीक्षा देणारे विद्यार्थी, इतर विद्यार्थी, साहित्यिक-लेखक आणि अशा विविध ग्रुपपर्यंत पोहोचून त्यांना मोदी कसे आवश्यक आहेत, या संदर्भात माहिती दिली जात आहे. चर्चा घडवून आणल्या जात आहेत.

माध्यमे आणि कार्यलयात बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाच्या समस्यांचा नि कामांचा निपटारा करण्याची, माहिती देण्याची जबाबदारी झारखंडचे संघटनमंत्री राजिंदरसिंगजी यांच्यावर आहे. त्यांनी संबंधित व्यक्तीला मला जोडून दिले. त्यामुळं मी माझ्या पुढच्या कामांना मोकळा झालो.

आम आदमी पार्टीच्या कार्यालयात गेल्यानंतर बरोबर वेगळे चित्र अनुभवायला मिळाले. माध्यमांशी बोलण्यासाठी तिथं कोणीही नव्हतं. पाच मिनिटांत कोणतरी येईल, असं सांगितल्यानंतर जवळपास तासभर वाट पाहूनही कोणीच आलं नाही. विविध राज्यांतून कार्यकर्ते हे केजरीवाल यांच्या प्रचारासाठी येत आहेत. कर्नाटक, आंध्र प्रदेश, दिल्ली, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश इत्यादी. आल्यानंतर त्यांनी वहीत नाव नोंदवायचं आणि मग त्यांची राहण्याची व्यवस्था लावली जाते, अशी पद्धत. मात्र, रस्त्यात उभे राहून झाडू हलवायचे, पत्रक वाटायची, टोप्या वाटायच्या या पलिकडे आपचा प्रचार नाही.

 

आम आदमीच्याच कार्यालयात एकानं किस्सा सांगितला. सगळेच बाहेरून आलेले असल्यामुळं कोणालाच शहराची आणि मतदारयादीची बारीक माहिती नाही. बाहेरून आलेल्या लोकांना एखाद्या भागात पत्रक वाटण्यासाठी पाठविले जाते. मात्र, तो भाग कुठून कसा आहे, हे माहिती नसल्यानं ते मिळेल त्या ठिकाणी पत्रक नि प्रचार साहित्य वाटत सुटतात. अनेकदा असं झालं, की एकाच वस्तीत एकाच दिवशी तीनवेळा आपचे कार्यकर्ते प्रचारासाठी गेले. शेवटी लोक वैतागले. असं अनेकदा अनेक ठिकाणी घडतंय. त्यामुळं कार्यकर्ते असले तरीही आपकडे मजबूत यंत्रणा नाही, हे त्यांच्या कार्यालयातील व्यक्तीनंच कबूल केलं. शिवाय आपचे कार्यकर्ते शहरात प्रचार करीत असले तरीही ग्रामीण भागात त्यांचे अजिबात नेटवर्क नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आपचा प्रचार निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह प्रचार केला, की नरेंद्र मोदींनाच फायदा होतो, हे २००२ पासून सर्वज्ञात आहे. तरीही तीच चूक केजरीवाल करीत आहेत.



केजरीवाल हे मोदीना जोरदार टक्कर देणार, अशी परिस्थिती माध्यमांमधून निर्माण केली जात असली तरीही इथलं वास्तव वेगळं आहे. केजरीवाल यांना वाराणसीतून किंमत कळेल, अशीच परिस्थिती आहे. मोदी बाहेरचे असले तरीही भाजपची यंत्रणा मजबूत आहे. ती सोय केजरीवाल यांच्याकडे नाही. त्यामुळं केजरीवालांनी मोदींवर आरोप करण्याचा सपाटा लावला आहे. स्वतः काय करणार याऐवजी समोरचा कसा नालायक आहे, हे दाखविण्यातच त्यांचा वेळ जात आहे. केजरीवाल समर्थकांनी व्हिस्परिंग कॅम्पेन सुरू केले आहे. कशाला उगाच मोदींना मत देताय. ते वाराणसीचा राजीनामा देऊन वडोदऱ्याची सीट कायम ठेवणार आहेत. पुन्हा निवडणूक, पुन्हा मतदान. त्यापेक्षा केजरीवाल यांना मत द्या... असा प्रचार सुरू आहे. तरीही वाराणसीच्या जनतेने मोदी यांना दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद स्मरणात ठेवून मोदी इथला राजीनामा देणार नाहीत, असं ठाम प्रतिपादन अनेक मंडळी हिरीरीनं करतात.

माध्यमांनी उभा केलेला आणखी एक बागुलबुवा म्हणजे अजय राय आणि मुख्तार अन्सारी हे एक झाल्यामुळे मोदींच्या समस्येत भर पडली आहे. मुळात अजय राय यांना वाराणसीकर वैतागले आहे. आधी भाजप, मग समाजवादी पार्टी आणि आता काँग्रेसच्या वळचणीला गेलेल्या राय यांना वाराणसी नगरीत विशेष सन्मान नाही. राजकीय कारकिर्द संपुष्टात येण्याच्या दिशेने राय त्यांचा प्रवास सुरू आहे, असं इथं अनेकांनी सांगितलं. भरीस भर म्हणजे अन्सारी यांचा पाठिंबा घेतल्यामुळे राय यांच्या काही नातेवाईकांनीही मोदी यांना पाठिंबा दिला आहे. शिवाय गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या अन्सारी यांचा पाठिंबा घेतल्यामुळे काँग्रेसचे अनेक कार्यकर्तेही निराश झाले आहेत.

शिवाय मुख्तार अन्सारी हे पठाणी मुस्लिम आहेत. त्यांच्या जातीची वाराणसीतील मते अवघी तीन ते पाच हजार आहेत. वाराणसीत सर्वाधिक मुस्लिम समाज बुनकर म्हणजेच जुलाहा आहे. जुलाहा समाजाची जवळपास सव्वा लाख मते आहेत. जुलाहा आणि पठाणी मुस्लिम यांचे फारसे पटत नाही. त्यामुळे विणकर समाजाची मते काँग्रेसला मिळण्याची शक्यता फार थोडी आहे. विणकर समाजात मुस्लिम महिला फौंडेशनचे उत्तम काम आहे. या महिला दरवर्षी नरेंद्र मोदी यांना राखीपौर्णिमेला राखी वगैरे पाठवितात. त्यामुळे जवळपास पन्नास ते साठ हजार मुस्लिम मते मोदींना मिळविण्याचे टार्गेट श्रीवास्तव यांनी डोळ्यासमोर ठेवले आहे. उत्तर प्रदेशात मुस्लिम मतदारांनी काँग्रेसला साथ देण्याचे ठरविले आहे. तेवढाच काय तो अजय राय यांना दिलासा आहे. 




तेव्हा नरेंद्र मोदी वाराणसीतून जिंकणार आणि घसघशीत मताधिक्याने जिंकणार. किमान दोन ते तीन लाखांच्या मताधिक्यानं मोदी वाराणसीतून विजयी होणार, हे नक्की. वडोदरा आणि वाराणसी अशा दोन्हीकडून जिंकल्यानंतर ते वडोदरा सोडतील आणि इथली जागा कायम ठेवणार, हे निर्विवाद आहे. निवडणूक अर्ज भरताना ज्या पद्धतीने तीन-साडेतीन लाख लोक रस्त्यावर आले होते. ते पाहता मोदी हे वाराणसी सोडणार नाहीत, हे सांगण्यासाठी कोणत्याही राजकीय विश्लेषकाची गरज नाही. वाराणसीवासियांनी मोदींना भरभरून प्रेम आणि पाठिंबा दिला आहे. त्यामुळेच वाराणसीला पंतप्रधान निवडून देण्याची संधी प्रथमच उपलब्ध झाली आहे, अशाच धर्तीवर प्रचार भाजपकडून सुरू आहे आणि नागरिकांनीही ते मनोमन स्वीकारले आहे.


वाराणसी दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी नरेंद्र मोदी यांचा रोड शो होता. बेनियाबाग परिसरात त्यांना सभेसाठी परवानगी नाकारल्यानंतर त्यांनी रोड शो करण्याचे ठरविले. त्या रोड शोला नागरिकांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेता नरेंद्र मोदी यांच्यावर लोकांचे किती प्रेम आहे ते दिसून येते. प्रचंड गर्दीमुळे मोदी यांच्या वाहनांचा ताफा पुढे सरकण्यास उशीर होत होता... साधारण तीन ते चार तास विलंबाने त्यांचा रोड शो सुरू होता. तरीही तरुणांपासून ते ७५ ते ८० वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेक उत्साही नागरिक नरेंद्र मोदी कसे आहेत, ते प्रत्यक्ष पाहण्यासाठी थांबले होते. गुजरातचा विकास करणारा मोदी हा माणूस नेमका कोण आहे, हे पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. भाडोत्री कार्यकर्ते नव्हे तर उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले नागरिक पाहिल्यानंतर मोदी यांचा विजय निर्विवाद असल्याची खात्रीच पटली.



Friday, May 02, 2014

मुक्काम पोस्ट अमेठी...

नाव मोठ्ठं... लक्षण खोट्टं... 

रायबरेली परवडलं, इतकं अमेठी भकास आणि बकवास आहे. साठ-साठ वर्ष मतदारसंघावर राज्य करणाऱ्या गांधी घराण्याने नरेंद्र मोदींच्या विकासाच्या गुजरात मॉडेलची चर्चा करण्याआधी अमेठी नि रायबरेली विकास मॉडेलची चर्चा केली पाहिजे. अमेठीमध्ये रस्ते नाहीत. अरुंद बोळ म्हणजेच रस्ते. उघड्या गटारांमधून वाहणारे सांडपाणी, सांडपाण्यामुळे प्रचंड संख्येने निर्माण झालेले डास, अरुंद रस्त्यांमुळे सदैव होणारे ट्रॅफिक जाम. अमेठी मतदारसंघातील शेकडो गावांमध्ये आजही वीज नाही. मुख्य रस्त्यापासून गावाकडे जाणारे सर्व रस्ते आजही मातीचेच.



अमेठीमध्ये राहण्यालायक एक लॉज नाही की एक चांगल्या दर्जाचे हॉटेल नाही. चांगलंचुंगलं खायला साधं रेस्तराँही नाही. खायचं तर हातगाडीवरचं किंवा एखाद्या टपरीवरचं. गावात छोटं-मोठं हॉस्पिटलही नाही. त्यामुळं साध्या-सुध्या उपचारांसाठीही दूरदूर जावं लागतं. इथं एकही महाविद्यालय नाही. म्हणजे मॅनेजमेंट, इंजीनिअरिंग, मेडिकल आणि उच्च शिक्षण देणारी एकही संस्था नाही. गावाच्या इतर तालुक्यांपासून अमेठीसाठी बससेवा नाही. सकाळी आणि संध्याकाळी एकच बस अशी दुर्दशा. छोट्या-मोठ्या खासगी गाड्या आणि टमटम वगैरे सुविधांसह प्रवास करवा लागतो. मुळात अमेठी म्हणजे मोठ्ठं खेडं आहे. नाव मोठ्ठं आणि लक्षण खोट्टं. साठ वर्षे राज्य करणाऱ्यांनी मग केले काय, हा प्रश्न उपस्थित होतो.



पूर्वीच्या गौरीगंज जिल्ह्याचे नाव बदलून मायावतींनी त्याचे नाव राजर्षि शाहूमहाराज नगर असं केलं. फक्त नावं बदलून काहीही होत नाही, हे या राजकारण्यांना कोण समजावणार. मुलायमसिंह यांनी शाहूमहाराज नगरऐवजी जिल्ह्याचं नामकरण अमेठी असं केलं. मात्र, जिल्ह्याचं मुख्यालय आजही गौरीगंजलाच आहे. अमेठीपासून साधारण तेरा किलोमीटर अंतरावर. जिल्ह्याला अमेठीचे नाव फक्त नावाला. सर्व व्यवहार गौरीगंज येथेच होतात. 

विकासाच्या गप्पा मारणाऱ्या गांधी घराण्यानं स्वतःच्या मतदारसंघात काय विकास केलाय, खरं तर काय दिवे लावलेत तेच पाहण्यासाठी मला अमेठीमध्ये जायचं होतं. लखनऊहून सकाळी निघालो. कानपूर रोडवर थोडं अंतर कापल्यानंतर मग डावीकडे सुल्तानपूर रोडला वळलो. साधारण 85 किलोमीटर अंतरावर जगदीशपूर नावाचा तालुका आहे. त्याचा समावेश अमेठी मतदारसंघात होतो. अमेठीतील पाच मतदारसंघापैकी तीन ठिकाणी समाजवादी पक्षाचे आमदार असून दोन ठिकाणी काँग्रेस आहे.



जगदीशपूर तालुक्यात भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार स्मृती इराणींचा दौरा होता. त्यांनी मतदारसंघात  जोर लावला आहे. रोज 35 ते 40 गावांमध्ये जाऊन त्या मतदारांशी संवाद साधतात. जगदीशपूरपासून पाचच किलोमीटर अंतरावर इराणी यांच्या गाड्यांचा ताफा होता. मात्र, हे पाच किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी मला अर्धा तास टमटमची वाट पहावी लागली. शेवटी एका बाईकवाल्याला विनंती करून त्याच्या मागे बसलो आणि संबंधित गावांमध्ये पोहोचलो. 

मुख्य रस्त्यापासून आत गेल्यानंतर लगेचच मातीचा रस्ता. त्यामुळे काही मिनिटांतच काळ्या जीन्सचा रंग मातकट झाला आणि आणखी काही तासांनी तर मला बदामी रंगाची जीन्स घातली आहे, की काय असा भास होऊ लागला. गावांमध्ये ना धड रस्ते, ना विद्यार्थ्यांसाठी शाळा ना वीज. काहीच नसलेल्या गावांमध्ये स्मृती इराणी यांच्या प्रचाराचा ताफा पोहोचतो. शंभर सव्वाशे गावकरी त्यांची वाट पाहत थांबलेले असतात. गावातील बूथप्रमुखांना स्मृती इराणी स्वतः गंध लावतात. त्यांना भाजपचे उपरणे देऊन सात तारखेसाठी शुभेच्छा देतात. गावकरीही त्यांचे हार घालून स्वागत करतात. त्यांच्यावर पुष्पवर्षाव करतात. 



हे सोपस्कार पार पडल्यानंतर स्मृती इराणी गावकऱ्यांच्या शैलीतच त्यांच्याशी संवाद साधतात. भाईसाहब, एक बार गौरीगंज के एक गाव में गई थी... बहनजी अभी अभी आते हुए... वगैरे वगैरे अशी अगदी सहजपणे भाषणाची सुरवात करतात. तुमचा खासदार तुम्हाला दहा वर्षांत एकदा भेटायला येत नाही, मी गेल्या महिनाभरात दुसऱ्यांदा आले. यापुढेही कायम येत राहणार. गौरीगंजमध्येच आता मी घर घेतले आहे. अमेठीची रहिवासी झाले आहे. त्यामुळे मी कायम येत राहीन वगैरे सांगून आश्वस्त करीत राहतात. राहुल संसदेत गॅस सिलिंडरवर बोलतात, मात्र, इथे अमेठीत लोकांना चार-चार महिने रॉकेलवर भागवावं लागतं. महिलांना गावाची नजर चुकवून रात्री-अपरात्रीच विधींसाठी जावं लागतं, गावात माध्यमिक शिक्षणाची सोय नाही, अशा विषयांना हात घालतात.



सिल्कचा कारखाना लागणार म्हणून लोकांनी स्वतःच्या जमिनी कवडीमोल भावाने सरकारला दिल्या. मात्र, ना कारखाना लागला ना जमिनी परत मिळाल्या. जमिनीचा मालक असलेला शेतकरी कंगाल झाला आणि दिल्ली-मुंबईत मोलमजुरी करण्यासाठी त्याला जावे लागले. पुन्हा जर तुम्हाला मालक बनायचे असेल आणि सुखाचे जीवन जगायचे असेल तर गांधी घराण्याला हद्दपार करा. इतकी वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसने काही केले नाही. आता काँग्रेस विरोधात बसणार आहे. विरोधात बसणारे गावाचा काय विकास करणार. सत्तेत येणाऱ्या भाजपला मतदान करा, असे आवाहन केल्यानंतर टाळ्यांचा कडकडाट.



अमेठीतील रस्त्यांची लांबी नाही, तर खड्ड्यांची खोली मोजली जाते, असं वाक्य येताच गावकरी टाळ्यांचा कडकडाट करतात. जणू त्यांना हे वाक्य मनाला भिडलेलंच असतं. गावात वीज नाही. भविष्यात जर वीज हवी असेल तर सात मे रोजी घराबाहेर पडून कमळाचे बटण दाबा आणि काँग्रेसच्या उमेदवाराला जोरदार करंट द्या, असे आवाहन करून पुढच्या गावाकडे रवाना होतात. साध्या-सोप्या पण प्रभावी शैलीत नागरिकांशी संवाद साधतात. तितक्याच हजरजबाबीपणे माध्यमांशी बोलतात. राज्यसभा टीव्हीच्या प्रतिनिधीने त्यांना सवाल केला, अमेठी ही क्यो... स्मृती इराणींचा प्रतिसवाल... क्यो नही. अमेठीमध्ये इतक्या वर्षांत काहीच झाले नाही, म्हणून मी येथे आले आहे इत्यादी इत्यादी. 

 जगदीशपूरमध्ये रामलखन पासी हे भाजपचे माजी आमदार भेटले. ते कल्याणसिंह यांच्या काळात राज्यमंत्री होते. त्यांनी मतदारसंघामध्ये 85 रस्ते बांधले. मात्र, नंतरच्या काळात एकही नवा रस्ता बांधण्यात आला नाही किंवा जुन्या रस्त्यांची डागडुजी करण्यता आली नाही, ही त्यांची खंत ते बोलून दाखवितात. पासी यांचा पुतण्या असलेल्या राजन पासी यांच्या बोलेरो गाडीतून मग पुन्हा जगदीशपूरमध्ये आलो. प्रमोद महाजन यांना मी माझ्या याच गाडीतून एकदा सभास्थळी सोडलं होतं.... वगैरे आठवणी तो जाताजाता सांगतो. 



मखदूमपूर, देवकली, पुरेगोसाई, लखनीपूर वगैरे गावातून प्रवास झाल्यानंतर स्मृती इराणी यांच्या प्रचार दौऱ्यातून बाहेर पडून पुन्हा गौरीगंजच्या दिशेने निघालो. अर्थातच, राजन पासीच्या गाडीतून. त्यानं जगदीशपूरला सोडलं. मात्र, तिथून अमेठीसाठी थेट गाडी नव्हती. चार-पाच टमटम बदलून जावं लागणार होतं. भर दुपारच्या उन्हात चार-पाच टमटम बदलून अमेठीला जाणं अगदी जिवावर आलं होतं. पण देव धावून येतो, असं म्हणतात तसा एक स्कॉर्पिओवाला माझ्या मदतीला धावून आला. हात दाखविल्यानंतर थांबला आणि त्यानं मला गौरीगंज येथे सोडण्याचं कबूल केलं. 

काय योग असतो बघा, तो स्कॉर्पिओवाला निघाला शिवसैनिक. उत्तर प्रदेश शिवसेनेचा माजी अध्यक्ष. रविदत्त शर्मा. नोएडा येथे राहणारा. पंडित म्हणजे ब्राह्मण असलेल्या शर्माजींनी सध्या शिवसेनेपासून दूर होऊन परशुराम सेना स्थापन केली आहे. अर्थात, त्यांच्या व्हिजिटिंग कार्डवर जय  हिंदुराष्ट्रचा नारा आहे. शिवाय शिवसेनेची जबाबदारी नसली तरी अजूनही ते स्वतःला सैनिकच मानतात. मनोहर जोशी, मधुकर सरपोतदार यांच्यापासून ते मोहन रावले - अनंत गीतेंपर्यंत अनेक जण माझ्या घरी येऊन गेले आहेत, असं ते सांगत असतात. मातोश्रीवर वर्षातून एकदा तरी जातोच, असंही आवर्जून सांगतात.



इथं मात्र, ते आले होते ते प्राध्यापक कुमार विश्वास यांच्या प्रचारासाठी. विश्वास हे त्यांचे साडू लागतात. जिंकण्याची आशा नसली तरी कुमार विश्वास यांनी चांगली हवा तयार केली आहे, असं ते सांगत असतात. गेल्या चार महिन्यांपासून त्यांनी ठिय्या मांडला आहे. गावागावात जात आहेत. राहुल यांच्या कामाचा पर्दाफाश करीत आहेत. तिकडे स्मृती इराणी आणि इकडे कुमार विश्वास. विश्वास यांच्या प्रचारासाठी तीन दिवस अरविंद केजरीवालही अमेठीतच आहेत. मात्र, 49 दिवसांत राजीनामा दिल्याचा निर्णय अमेठीतील अनेकांना मान्य नसल्याचे लोकांशी बोलताना जाणवले. त्याचा फटका विश्वास यांना बसणार हे नक्की. बोलता बोलता गौरीगंज येतं आणि मी उतरतो.

खचाखच भरलेल्या प्रायव्हेट बसमधून घामाघून होत मग अमेठीच्या दिशेनं निघतो. रस्ता दुपदरी आणि एकदम गुळगुळीत. गौरीगंजपासून तेरा किलोमीटर जाण्यासाठी अर्धा तास लागतो. जागोजागी लोक चढत-उतरत असतात. अखेरीस अमेठीत पोहोचतो. प्रचंड ट्रॅफिक जाममुळं गावाच्या आधीच थोडं उतरून चालत जाणं परवडतं. आधीच वर्णन केल्याप्रमाणं एकदम नियोजन नसलेलं आणि अस्वच्छ गाव. गावातून फिरताना लोकांशी बोलणं होत असतं. राहुल गांधी जिंकणार, असाच प्रत्येकाचा सूर असतो. अमेठीत काही रिक्षाचालक, पथारीवाले, हातगाड्यांवर कुमार विश्वास यांचे स्टीकर्स लावलेले दिसतात. उत्सुकतेने त्यांना विचारल्यानंतर ते देखील आम आदमी पार्टी अच्छी है... असं मोजकंच सांगतात. 



चहाच्या टपरीवर काही तरुण भेटतात. अमेठी कसंय, विचारल्यानंतर भलतेच भडकतात. म्हणतात, काय आहे इथं. काहीही नाहीये. सांडपाण्यामुळे फक्त मोठ्ठे मच्छर आहेत. रात्री उघड्यावर राहून पहा दुसऱ्या दिवशी काय हालत होते. राहुल गांधींनी काहीही केलेलं नाही. आमच्यासाठी शिक्षणाची व्यवस्था नाही. नोकऱ्या नाही. बेरोजगार आहोत. लष्करात सहभागी होण्यासाठी प्रयत्नशील आहोत. तिथं नाही झालं तर काय कराचयं प्रश्नचिन्हच आहे इइ. जनता भावनिक आवाहनांना भुलते, गांधी घराण्याला भुलते नि मतदान करते, असं त्यांचं म्हणणं. परिवर्तन व्हायला पाहिजे, पण ते होण्याची शक्यता कमीच आहे. कारण गांधी घराण्याची जादू अजूनही आहे. भले त्यांनी काहीही केलेलं नसलं तरीही. या वाक्यावर मी त्यांचा निरोप घेतो. 



काँग्रेसचे नेते अशोक श्रीवास्तव भेटतात. ते सोनिया गांधी आणि दहा जनपथच्या बरेच जवळचे आहेत, अशी माहिती मिळते. ते काँग्रेसचे राजकारण आणि विकास यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न करतात. हे पहा, राहुल यांनी बराच पैसा आणला. त्यांनी मतदारसंघावर लक्ष  ठेवण्यासाठी नेमलेल्या लोकांना त्यांच्या कल्पना सांगितल्या. त्या कशा राबविता येतील, तेही सांगितले. मात्र, स्थानिक पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्ते राहुल यांच्या विश्वासाला पात्र ठरले नाहीत. त्यांनी गावात, मतदारसंघात काहीही विकास केला नाही. राहुल त्यांच्यावर विसंबून राहिले आणि लोकांच्या रोषाला आता सामोरे जावे लागत आहे. अर्थात, लोकांचा रोष स्थानिक नेत्यांवर आहे. राहुल गांधी यांच्यावर नाही... असं सांगून ते राहुल यांचे समर्थन करण्याचा प्रयत्न करीत असतात. आता राहुल यांना त्यांची चूक समजली आहे. ते पुढील काळात चांगल्या पद्धतीने मतदारसंघाकडे लक्ष देतील आणि काही चुका सुधारतील, असं श्रीवास्तव सांगत असतात.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे काँग्रेसच्या काही नेत्यांनुसार, राहुल यांनी विकासाच्या अनेक योजना आणल्या. मात्र, स्थानिक सरकार समाजवादी पक्षाचे असल्यामुळे त्यांनी विकासाला खोडा घातला. म्हणजे काँग्रेसने विजेचे खांब रोवले. मात्र, वीज देणं हे राज्य सरकारचं काम आहे. ते त्यांनी केलं नाही, असले हास्यास्पद दावे अमेठीच्या अशिक्षित मतदारांना सांगण्यासाठी योग्य असू शकतात. मात्र, देशभरात तुम्ही असे दावे केले तर तोंडावरच आपटणार ना... कन्नोज आणि मैनपुरीतून काँग्रेस लढत नाही. अमेठी नि रायबरेलीतून समाजवादी पक्ष उमेदवार देत नाही, अशी सेटिंग करण्यासाठी तुम्ही एकत्र येता आणि गावकऱ्यांना वीज पुरविण्यात मात्र, परस्परांना खोडा घालता, हे कोणाला तरी पटू शकेल काय...



 अमेठीचा आढावा घेतल्यानंतर मग तिथून निघतो. अमेठीचं रेल्वे स्टेशन मात्र, खूपच छान आणि चकचकीत आहे. अमेठीही जर स्टेशनसारखं झालं तर खूपच बरं होईल. शेवटी जाता जाता एकच गोष्ट सांगायची राहून गेली. स्मृती इराणी यांचा निरोप घेताना त्यांनी माझ्याशी मराठीतून संवाद साधला. म्हणाल्या, पाहिलंत ना काय हालत आहे ती. थोडं लिहा याबद्दल. लोक कोणत्या परिस्थितीत राहताहेत हे देशभरात कळलं पाहिजे. मनोहर पर्रीकर आले होते. ते  मला, म्हणजे स्मृती इराणी यांना म्हणाले, की आमच्याकडे जर लोेकप्रतिनिधींनी असा कारभार केला असता, तर गोवेकर जनतेने त्यांना जोड्यानं मारलं असतं. 

व्वा... क्या कहा है... अमेठीमध्येही लवकरात लवकर विकास होवो... किंवा गोवेकर जनतेप्रमाणे त्यांच्यातही अकार्यक्षम लोकप्रतिनिधींना जोड्यानं मारण्याची हिंमत निर्माण होवो, अशी इच्छा व्यक्त करून अमेठी सोडलं...

असो... खूपच लिहिलंय असं वाटतंय... तेव्हा थांबतो. लवकरच बाराबंकीचा फेरफटका...

Friday, February 14, 2014

‘नौटंकी साला’ चित्रपटाचा हिरो

पळपुटा राजकारणी अरविंद केजरीवाल



‘रडतराव घोड्यावर बसले, ते काय तलवार चालविणार’ अशी मराठीमध्ये एक म्हण आहे. थोडक्यात म्हणजे एखाद्याची इच्छा नसताना बळजबरीने एखादी गोष्ट करण्यास सांगितली, तर त्याचा फज्जाज उडतो. दिल्लीचे औट घटकेचे मुख्यमंत्री, पळपुट्यांचे सरदार, राजकारणातील ‘नौटंकी साला’ चित्रपटाचे हिरो अरविंद केजरीवाल यांच्याबाबतीत ही म्हण अगदी तंतोतंत लागू आहे. ४८ दिवसांचा ड्रामा अखेरीस संपुष्टात आला आहे.

दिल्लीमध्ये ‘आप’चा झाडू सत्तेवर आल्यानंतर अनेक जणांनी विचारणा केली, की तुझा केजरीवालवर ब्लॉग नाही आला. तुला काय वाटतं, काय होईल वगैरे वगैरे. मी ह्याच दिवसाची वाट पाहत होतो. म्हणूनच लिहिलं नव्हतं. अखेरीस तो दिवस उगविला. आंदोलन, उपोषण आणि धरणे यापेक्षा इतर कोणतीही गोष्ट ‘आप’ल्याला जमत नाही, हे कळल्यानंतर केजरीवाल यांनी अखेरीस जनलोकपालाचा मुद्दा पुढे काढून राजीनाम्याचे अस्त्र उपसले. अर्थात, ही ‘आप’मतलबी मंडळी फार काळ सत्तेत राहूच शकत नाही, याचा अंदाज निवडणुकीनंतरच्या थोड्याच दिवसांमध्ये आला होता. 

स्टंटबाज, ढोंगी, हडेलहप्पी, हटवादी आणि अडेलतट्टू अशा अनेक शब्दांना केजरीवाल हा समानार्थी शब्द मिळाला आहे. ‘मी म्हणेन तसेच व्हायला पाहिजे. जे लोक आणि राजकीय पक्ष माझे ऐकणार नाहीत. मला आणि माझ्या ठरावांना पाठिंबा देणार नाहीत, ते सर्व भ्रष्ट, चुकीचे, नालायक आणि देशद्रोही,’ अशीच धारणा या केजरीवाल यांनी केली आहे. दिल्लीत निवडणुकांचे निकाल लक्षात घेतले तर त्यांनी काँग्रेसविरोधात कौल दिला होता. खरं तर  भाजप आणि केजरीवाल या दोघांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन करावी, असा कौल खरं तर मतदारांचा होता. पण ‘आम्ही कोणाला पाठिंबा देणार नाही आणि कोणाचा पाठिंबा घेणार नाही,’ अशी हटवादी भूमिका घेऊन केजरीवाल यांनी सुरुवातीला भाजपला दुखावले.
सत्तेच्या जवळ पोहोचून आणि सत्ता स्थापन करण्याची संधी असूनही आपण सरकार बनविले नाही, तर जनतेत चुकीचा संदेश जाईल, याची जाणीव केजरीवाल आणि सरदारांना झाली. पण भ्रष्टाचारात बरबटलेल्या काँग्रेसचा पाठिंबा घेतला, तर लोक तोंडात शेण घालतील, याची जाणीव झाली. मग त्यांनी काँग्रेस आणि भाजपला पत्र पाठवून अटी घातल्या. त्या अटी मान्य केल्या तर पाठिंबा घेऊ असले नाटक केले. भाजपला या नौटंकीच्या फंदात पडायचेच नव्हते, त्यामुळे त्यांनी पत्राला उत्तरही दिले नाही आणि ‘आप’मध्ये स्वारस्यही दाखविले नाही. काँग्रेसने मात्र, अचूक राजकीय खेळी खेळून केजरीवाल यांना कात्रीत पकडले.

काँग्रेस पाठिंबा देतेय, म्हटल्यानंतर ‘आप’चे नवे नाटक सुरू झाले. मतदारांपर्यंत जाऊन त्यांचा कौल आजमाविण्याचे. ई-मेल, एसएमएस, दूरध्वनी आणि जनसभांमधून केजरीवालांनी जनमत आजमावले. त्यांनी सरकार बनविण्यास संमती दर्शविली, म्हणून आम्ही सरकार बनवित आहोत, असा पवित्रा घेतला. अन्यथा आम्हाला सरकार बनविण्यात आणि सत्तेत येण्यात काहीही रस नाही, वगैरे पुरवण्याही जोडल्या. मुळाच काँग्रेसने तुमचा मामा बनविण्यासाठीच तुम्हाला पाठिंबा दिला होता, हे न समजण्याइतपत तुम्ही मूर्ख असाल, तर मग तुमचा असाच पोपट होणार. त्याला आणखी कोण काय करणार. शिवाय तुमच्याकडे योगेंद्र यादव यांच्यासारखा राजकीय विश्लेषक असूनही तुम्ही स्वतःचा पोपट करून घेण्याची स्वतःच तयारी करता, या बावळटपणाला काय म्हणावे. मग सुशीलकुमार शिंदे यांनी तुम्हाला ‘वेडा मुख्यमंत्री’ म्हटले तर त्यांची चुकले कुठे. तुम्ही आहातच मूर्ख. नुसते मूर्ख नाही तर अट्टल मूर्ख.

दुसरीकडे केजरीवाल यांचीही नाटके सुरूच होती. सरकारची गाडी घेणार नाही. वॅगन आर मधूनच जाणार. मेट्रोने शपथविधीला जाणार. सरकारी बंगला घेणार नाही. सुरक्षारक्षकांचा ताफा मला नको वगैरे वगैरे केजरी यांनी स्वतःचीच वॅगन आर वापरली. शेवटच्या दिवसापर्यंत. मेट्रोने शपथविधीला गेले. पण एकच दिवस. ही स्टंटबाजी संपते ना संपते तोच सरकारी घराचे नाटक जनतेसमोर आले. मी सरकारी घर घेणार नाही, अशी बोलबच्चन देणाऱ्या ‘नौटंकी’ने मस्त सहा सहा बेडरुमच्या ड्युप्लेक्स घरामध्ये रहायला जाण्याचा विचार चालविला होता. मात्र, माध्यमांमध्ये ही गोष्ट उघड झाल्यानंतर त्याने विचार बदलला. मात्र, स्वतःच्याच घरात न राहता शेवटी सरकारी घर घेतलेच. कारण पुढे केले, ते सुरक्षेच्या अडचणीचे. सुरक्षारक्षकांचेही तेच. मला सुरक्षा नको. मी ‘आम आदमी’ आहे, वगैरे भाषणबाजी केली. पण शेवटी सुरक्षारक्षकांचा ताफा केजरीवालांच्या घराबाहेर दिसायला लागला. बरं, केजरीवाल यांच्या तोंडी एकच टेप लावलेली असायची. ‘हमे सत्ता का मोह नही है.. मैं आम आदमी हूँ. जनलोकपाल लाना है,’ वगैरे वगैरे. त्या पलिकडे त्यांना काही दिसतच नव्हते. सरकार चालविण्यात त्यांचा अजिबात रस नसल्याचे पदोपदी जाणवत होते.

दुसरीकडे एकदा केजरीवाल सत्तेवर आल्यानंतर मग माध्यमांना तर ऊतच आला. मुळात माध्यमे ही एखाद्याला इतके झाडावर चढवितात, की आता त्या मंडळींशिवाय देशच चालणारच नाही, अशी परिस्थिती निर्माण करून टाकतात. केजरीवाल यांचेही असेच झाले. बास्स, आता एकच केजरीवाल. काँग्रेस, भाजप आणि इतर सगळे डब्ब्यात जाणार. देशभर केजरीवाल यांची हवा वगैरे वातावरण निर्मिती केली गेली. माध्यमांना असे च्युईंगम अधूनमधून लागतच असते. कधीकधी ते लवकर संपते. कधीकधी महिनोंमहिने चालू असते. केजरीवालांचे च्युईंगम पहिल्या पंधरा दिवसातच संपुष्टात आले. लवकरच माध्यमांचाही भ्रमनिरास झाला आणि त्यांनीही केजरीवाल यांची खेचण्यास प्रारंभ केला. केजरीवाल कसे उघडे पडत आहे, हे दाखविण्यास प्रारंभ केला. क्वचित प्रसंगी त्यांना स्वतःहून उघडे पाडले देखील. मग केजरीवाल यांनी माध्यमांवर भाजप-काँग्रेसचे हस्तक असल्याचा ठेवणीतला आरोप बाहेर काढला.

केजरीवाल सत्तेवर आल्यानंतर मग ते आणि त्यांचे सहकारी उघडे पडायला लागले. सोमनाथ भारती यांनी ‘नायक’मधील अनिल कपूर स्टाईलमध्ये मध्यरात्री रस्त्यावर उतरून पोलिसांना बरोबर घेऊन छापे टाकले. महिलांशी गैरवर्तन केले. त्यांच्याविषयी वंशभेदी टिपण्णी केली. त्यावरून रान उठले. महिला आणि महिला संघटना पेटल्या. कायदामंत्र्यांनी न्यायाधीशांची बैठक बोलविण्याचा प्रयत्न केला. तिथेही ते तोंडावर आपटले. महिलेला रात्री अटक करता येत नाही, इतकीही साधी माहिती कायदामंत्र्यांना नाही का, अशी विचारणा करीत सामान्य माणसाने सोमनाथ भारतींच्या अकलेचे वाभाडे काढले. शेवटी भारती यांचे छापे प्रकरण प्रचंड तापले आणि सोमनाथ भारतींचे हे भूत केजरीवालांच्या मानगुटीवर बसले ते उतरलेच नाही. मग सोमनाथ भारती प्रकरणावरून लक्ष हटविण्यासाठी केजरीवाल त्यांचे आवडते काम पुन्हा सुरू केले. दिल्ली पोलिसांना अधिकार मिळावे, म्हणून हा ढोंगीबाबा जंतरमंतरवर उपोषणाला बसला. आंदोलन आणि धरणे वगैरे हा त्यांचा छंदच आहे. महात्मा गांधी यांनी त्यांच्या आयुष्यात केली नसतील एवढे सत्याग्रह, उपोषणे आणि धरणे आंदोलने केजरीवाल त्यांच्या कारकिर्दीत करणार, याबाबत तिळमात्र शंका नाही. 


‘नौटंकी’ असलेल्या केजरीवालांनी आपण सरकारमध्ये आहोत, सत्तेवर आहोत, याचे गांभीर्य कधी बाळगलेच नाही. उठसूठ पोरकटपणा सुरूच असायचा. मध्यंतरी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मुलाखतीमध्ये सांगितले होते, की मुख्यमंत्र्यांनी साधेपणानेच रहावे. पण मुख्यमंत्री आहोत, हे लक्षात ठेवून वागावे. पर्रीकर हे सर्वाधिक साधे आणि खूप वर्षांपासून तसेच आहेत. त्यांनी साधेपणाची जाहिरातबाजी कधी केली नाही. पुदुच्चेरीचे मुख्यमंत्री एन. रंगास्वामीही खूप साधे आहेत. कुठेही स्कूटरवर वगैरे फिरतात. त्यामुळे केजरीवाल यांच्या साधेपणाचे काही फार कौतुक करण्याची गरज नाही. पण माध्यमांनी एखाद्याला डोक्यावर चढवायचे ठरविले, की ते चढवितातच. तसेच केजरीवालांचे झाले. मात्र, अपेक्षांचे ओझे सहन न झाल्यामुळे त्यांनी जबाबदारीपासून पळून जाण्याचा निर्णय घेतला.

केजरीवालांची नाटके सुरू असतानाच आप आणि आपचे कार्यकर्ते यांनाही उधाण आले होते. लोक उगाच कारण नसताना डोक्यावर गांधी टोपी घालून हिंडू लागले. ‘आम आदमी पार्टी’ कशी सगळीकडे पसरतेय, अशा बातम्या येऊ लागल्या. कोण कोण आपमध्ये जॉइन झाले याचे वृत्त थडकू लागले. इन्फोसिसचा कुठल्या तरी खात्याचा प्रमुख, महात्मा गांधींचे वारसदार, कुठल्याशा मल्टिनॅशनल बँकेच्या प्रमुख बाई, मोदींविरोधात दणकून आपटलेल्या मल्लिका साराभाई आणि डी. एस. कुलकर्णी यांच्यासारखे सगळीकडचे पडेल उमेदवार ‘आप’मध्ये येणार अशा बातम्या ठळकपणे झळकू लागल्या. लोकांना ‘आप’ म्हणजे उद्याची आशा वाटू लागली. मुळात दिल्लीची पुनरावृत्ती देशभर होण्याची सूतराम शक्यता नाही. समाजमनात स्थान नसलेल्या आणि नवी आशा म्हणून ‘आप’मध्ये सहभागी झालेल्या असल्या हायप्रोफाईल मंडळींमुळे तर अजिबात नाही. राजकारणात येण्याचे निर्णय घेतल्याबद्दल त्यांचे स्वागतच करायला हवे. मात्र, त्यांच्यामुळे ‘आप’ला यश मिळणे हे मृगजळ आहे. मात्र, माध्यमांनी तशी हवा तर निर्माण केली. तो बारही फुसका असल्याचे लवकरच स्पष्ट होईल.

नाटकी केजरीवालांनी केले, काय तर दिल्लीवासियांना फक्त काही महिन्यांसाठी सातशे लिटर पाणी मोफत दिले. नंतर पुन्हा एकदा परिस्थितीचा आढावा घेऊन फुकट पाणी देण्याबाबत विचार केला जाईल, असे जाहीर करून टाकले. विजेचे बिल भरणाऱ्या फुकट्यांचे बिल पन्नास टक्के माफ केले. मात्र, ज्यांनी बिल भरले त्यांना राज ठाकरे यांच्या भाषेत बोलायचे झाले तर ‘घंटा’ दिली. म्हणजे फुकट्या नि बिलबुडव्यांना केजरीवालांनी हात दिला. जे प्रामाणिकपणे बिल भरत होते, त्यांना काहीच दिले नाही. झोपडपट्टीत राहणाऱ्यांना मोफत घर देण्याचे आश्वासन पूर्ण करेपर्यंत ते सत्तेवरच राहिले नाहीत. जनलोकपाल या विधेयकाचा मुद्दा प्रतिष्ठेचा करून त्यांनी स्वतःची सुटका करून घेतली. 

आता पुन्हा एकदा जंतरमंतर आणि रामलीलावर पोरकटपणे आंदोलन करण्यास आणि उपोषणे-धरणे हा शिवाशिवीचा खेळ खेळण्यास ते सज्ज झाले आहेत. मतदारांनी भरघोस मतांनी निवडून दिल्यानंतरही केजरीवाल ‘भरवशाच्या म्हशीला टोणगा’ ठरले आहेत. साधेपणाचे ढोंग, जनलोकपाल आणि चमकोगिरी त्यांची त्यांनाच लखलाभ. ‘आप’ला मतदान करून काहीही फायदा नाही. त्यांची सरकार चालविण्याची लायकीच नाही (औकात हा शब्द अधिक योग्य वाटतो का?) यावर केजरीवाल आणि त्यांच्या नौंटकी सरदारांनी शिक्कामोर्तब केले आहे. तेव्हा असल्या आपमतलबी लोकांच्या नादी न लागता मतदारांनी सूज्ञपणे निर्णय घेऊन मतदान करावे, हीच अपेक्षा. पुन्हा दिल्लीत हे आपमतलबी आणि पळपुटे लोक सत्तेवर येऊ नये, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

केजरीवाल यांना भविष्यातील आंदोलने, उपोषण, धरणे, सत्याग्रह, मोर्चे, ठिय्या आंदोलन आणि इतर गांधीवादी मार्गांनी आंदोलनांसाठी शुभेच्छा... कारण तुम्ही फक्त तेवढेच करू शकता. तेवढेच करा.