Showing posts with label Paral. Show all posts
Showing posts with label Paral. Show all posts

Wednesday, October 27, 2010

खा खा खादाडी भाग २

दादर-परळमदली काही राहिलेली ठिकाणं आणि पूर्वी साम मराठीमध्ये काम करत असताना बेलापूरमध्ये काही ठिकाणी चाखलेली वेगवेगळ्या पदार्थांची तोंडओळख इथं करुन देत आहे. प्रत्येक ठिकाणची प्रत्येक गोष्ट चांगली चविष्ट असतेच असं नाही आणि प्रत्येक पदार्थ आपण खातोच असंही नाही. पण जेजे उत्तम चविष्ट सुंदर तेते देण्याचा हा प्रयत्न...



मराठमोळी मिसळ...

मराठमोळ्या वरळीमध्ये अस्सल मराठमोळी मिसळ खाण्याचा योग साम मराठीचा जुना सहकारी पराग खरात याच्यामुळे आला. बोलता बोलता विषय निघाला तेव्हा तो म्हणाला तुम्ही वैशालीची मिसळ खाल्ली की नाही. एक नंबर मिसळ आणि झणझणीत रस्सा. मग निवांत वेळ काढून वैशालीत पोचलो. नुसती मिसळच नाही तर दही मिसळ, वडा, भजी या मराठी पदार्थांप्रमाणेच विविध गुजराती आयटम्स (खाण्याचे), फरसाण आणि सरते शेवटी फक्कड चहा असं सर्व काही मिळणारं हे मस्त रेस्तराँ म्हणजे वैशाली.

मिसळ खाण्यासाठीच आलो होतो, त्यामुळे आम्ही मिसळच घेतली. फक्त फरसाण आणि त्यावर वाटाण्याची उसळ ही मुंबईतली मिसळची व्याख्या असल्यामुळे इथं फारसं वेगळं दृष्य नव्हतं. तरीही फरसाणच्या जाड-बारीक शेव, नायलॉनच्या पोह्यांचा चिवडा असं वैविध्य होतं. पण रस्सा मात्र, इतरांच्या तुलनेत जरा हटके होता. थोडासा मालवणी स्टाईलचा किंवा नाशिकच्या काळ्या तिखटाच्या मिसळीच्या जवळ जाईल असा. जाळ निघेल असा झणझणीत नसला तरी घाम आला. त्यामुळं येणं फुकट गेलं, असं वाटलं नाही. शिवाय जांबोरी मैदानावरुन जाताना मंचेकर वडापाव आणि त्याच्या डायगोनली ऑपोझिट असलेल्या (साई की तत्सम काहीतरी) वडापावच्या आठवणी ताज्या झाल्या.



म्हैसूर मसाला...

दादरला परळ एसटी डेपोकडून पोर्तुगीज चौकाकडे जायला लागलं की दुस-या चौकात संध्याकाळी डोशाची एक गाडी लागते. सैतान चौकीच्या इथला चौक हे मला माहिती असलेलं नाव. इथं डोसा-उत्तप्पाचे काही प्रकार मिळतात. त्यापैकी म्हैसूर मसाला डोसा अप्रतिम. साध्या डोशावर बटाट्याची भाजी, कापलेला कांदा-टोमॅटो, किसलेले बिट, थोडी खोब-याची चटणी असा स्मॅश केलेला रगडा. एकदम स्वादिष्ट म्हैसूर डोसा तयार. सोबत सांबार आणि चटणी. त्यातही सांबार नसले तरी चालू शकेल, असा पद्धतीचे. पण ती उणिव चटणी भरुन काढते. त्यामुळे दिलखुश्श. इतर ठिकाणी साधा किंवा मसाला डोसा बारा रुपयांना असला तरी इथं मात्र, म्हैसूर मसाला डोसा अवघ्या बारा रुपयांना मिळतो.

शिवाय फुकटचा टाईमपास म्हणजे शिवसेना की मनसे की नारायण राणे यावर चौकातल्या तज्ज्ञांची चर्चा कानावर पडतेच. सातनंतर गेलात तर नक्कीच.



टीटीचा शिववडा...
दादर टीटीच्या (पूर्व) जवळ अशोक नावाचं हॉटेल आहे. तिथून पुढे स्वामीनारायण मंदिराकडे जायला लागलं की, कॉर्नरलाच शिववड्याची एक गाडी दिसेल. थोडी आतल्या बाजूला आहे. आतापर्यंत मी जे काही पाच-सहा ठिकाणचे शिववडा पाव आवर्जून खाल्ले त्यापैकी द बेस्ट शिववडा इथलाच. बाकीच्या ठिकाणांबद्दल न लिहिलेलंच बरं. पण इथला वडा मस्त गरमागरम असतो. पावही मऊ आणि चटणीही झणझणीत. त्यामुळे वडापावची दुसरा घेतल्याशिवाय स्वस्थ बसविणारच नाही.



बेलापूर गावातली मिसळ...

बेलापूर गावात मी जिथं राहतो (किंवा रहायचो) तिथं तळ्याशेजारी (राम मंदिराजवळ) मिळणारी मिसळ नवी मुंबई आणि मुंबईतील मला सर्वाधिक आवडलेली मिसळ आहे. एकदम छोटं झोपडीवजा टपरी. तीन बाकडी. त्यावर जेमतेम सात-आठ लोकं बसतील इतकीच जागा. पण चवीला बाप. रस्सा आणि तर्री पाहूनच पोट भरतं. फक्त फरसाण असलं तरी रस्सा बाकीची जबाबदारी पार पाडतो. कधीकधी गरमागरम रस्सा-वडाही भाव खाऊन जातो. दुपारी शाकाहारी मांसाहारी जेवणही तिथं मिळतं. पण मी काही जेवलेलो नाही. पण मिसळ मात्र, एक नंबर.



स्टेशनजवळची पाणीपुरी...

साम मराठीमध्ये असताना या पाणीपुरीवाल्याची दोस्ती झाली होती. स्टेशनकडून आल्यानंतर बाहेर पडताना उजवीकडे हा पाणीपुरीवाला असतो. संध्याकाळी साधारण सहानंतर. पाणीपुरीचं पाणी म्हणाल तर पित रहावं असं वाटतं. (दुस-या दिवशीचा विचार करुन जास्त पिणं होत नाही, हा भाग अलहिदा) गरमागरम रगडा आणि फक्त तिखट पाणी असं कॉम्बिनेशन खूप मस्त. खजूराचं गोड पाणी नाही घेतलं तरी चालेलसं. साममध्ये असताना आठवड्यातून सहावेळा तरी जाणं व्हायचं. त्या परिसरता किमान पाच ते सहा ठिकाणी पाणीपुरी मिळते. महागड्या हॉटेलांमधूनही मिळते. पण इथली चव त्याला नाही.



स्टेशनवरचा सामोसा...

बेलापूर स्टेशनवर जर तुम्ही बेलापूरहून सुटणारी गाडी पकडली तर ए गरम सामोसे... असं ओरडत एक मनुष्य चढतो. क्वचित कधीतरी हा योग जुळून आला तर त्याच्या कडचे सामोसे नक्की खा. दहा रुपयांत दोन सामोसे मिळतात. चवीला एकदम उत्तम असतात. शिवाय एकदम गरम. चटणी नसली तरी ते कोरडे वाटत नाहीत, हे विशेष. पाहता पाहता सामोसे कधी संपतात ते कळतही नाही.

बसस्टँडचा वडा...
बेलापूर बस डेपोच्या आवारातच एक छोटं दुकान आहे. तिथं स्नॅक्स आणि ज्यूस वगैरे मिळतात. तिथं सक्काळी सक्काळी गरमागरम बटाटे वडा मिळतो. पुण्यात जसा रौनक जवळ वडे, सामोसे, पॅटिससाठी गर्दी असते. तशीच गर्दी सक्काळी सक्काळी इथं वडा खाण्यासाठी असते. मुख्य म्हणजे फक्त वडा (पाव नाही) खाणा-यांचं प्रमाण अधिक. चटणी आणि वडा हे समीकरण इतकं फिट्ट आहे की बस्स. पण वड्यानंतर चहा मात्र, पिऊ नका. नाहीतर सगळी गंमत निघून जाईल.



सरतेशेवटी पान...
बेलापूरला पाम बीच रोडला अश्विथ नावाचं एक मध्यमवर्गीयांना परवडेल, असं चांगलं हॉटेल आहे. त्याच्या बाहेर एक पानाची टपरी आहे. लकलकीत पितळी भांड्यांच्या साक्षीनं तो पानं लावत असतो. त्याच्याकडे मसाला पानापासून ते १२०-३०० पर्यंत कोणतेही पान खा दिलखूष झालंच म्हणून समजा. तुम्ही त्याच्याकडे वारंवार येताय म्हटल्यावर साधा फुलचंद, रिमझिमवाला फुलचंद, डबल किवाम, हरीपत्ती सल्ली सुपारी, कात-चुना-किवाम लवंग जला के... असं काहीही भन्नाट कॉम्बिनेशन असलं तरी ते त्याच्या लक्षात असायचं. आपण गेल्यानंतर आपण काहीही न सांगता आपल्याला हवं असलेलं पान आपल्यासमोर ठेवेल तो खरा पानवाला, या पुलंच्या व्याख्येत हा पानवाला १०० टक्के बसणारा. कधी जर गेलात तर नक्की रसास्वाद घ्या.

Saturday, September 18, 2010

लालबाग-परळ...



पुण्यातील गणेशोत्सवाचा टिप्पिकल फिल...

वास्तविक पाहता गणपतीच्या काळात दहा दिवस राहणं, हे माझ्यासारख्याला खूप अवघड आहे. अगदी लहानपणीच्या उत्साहापासून ते अगदी अलिकडे रिपोर्टिंगच्या निमित्ताने प्रत्येक वर्षी पुण्यातील जवळपास सर्व प्रमुख मंडळ पायी हिंडून पाहणं, हा माझ्यासह आमच्या काही मंडळींचा आवडता छंद. मग रोज एखाद्या भागामधील गणपती पहायचे. रोज नव्या मित्रांबरोबर गणपती बघायला जायचं (मैत्रिणींबरोबर गणपती पहायला जाण्याचं भाग्य माझ्या नशीबात नव्हतं) हे अगदी ठरलेलं. कधी कॉलेजमधील मित्र, कधी घराजवळ राहणारे, कधी जुने शाळेतले मित्र, कधी घरच्यांबरोबर अथवा बाहेरगावाहून आलेल्या नातेवाईकांबरोबर. पण नित्यनियमानं आणि नव्या उत्साहानं रात्री लवकर बाहेर पडणं हे ठरलेलं.

ई टीव्ही साठी हैदराबादला बदली झाल्यानंतर मग त्यामध्ये खंड पडत गेला. तरीही एक वर्षाआड सुटी घेऊन पुण्याचा गणपती एन्जॉय केलाय. अगदी दहा दिवस नाही मिळाले तर किमान विसर्जन मिरवणुकीला तरी रात्र जागवायची हे ठरलेलं. गणेशोत्सवात पदोपदी जाणवणारी उर्जा, उत्साह आणि उदंड भक्ती यांच्या जोरावर पुढचं वर्ष आपोआप निघून जातं. साम मराठी आणि आता सामनासाठी मुंबईत आल्यानंतर गणेशोत्सवाचा हा जल्लोष मी खूप मिस करत होतो. रोजच्या दबडघ्यातून श्वास घ्यायला उसंत मिळत नाही, तिथं इतका प्रवास करुन मुंबईचा गणेशोत्सव एन्जॉय करायला जायचं कसं आणि कधी हा प्रश्न अनुत्तरीत होता. सामनामुळं आज ही संधी मिळाली. धन्यवाद सामना आणि माझा सहकारी मंगेश वरवडेकर. तसं पहायला गेलं तर लाईनीत वीस-वीस पंचवीस-पंचवीस तास उभा राहून एखाद्या देवाचं दर्शन घेण्याइतका मी देवभक्त नाही. त्याचप्रमाणे वीस-पंचवीस तास रांगेमध्ये उभं राहणा-या लोकांच्या भक्तीचा अपमान करुन मध्येच घुसत नेहमी नेहमी दर्शन घेणंही मला पटत नाही. त्यामुळं लोकप्रिय आणि गर्दी खेचणा-या देवांना जाणं टाळतो. पुण्यात सुद्धा मी विसर्जनाच्या दिवशी पहाटे जाऊन मानाचे पाच गणपती, भाऊ रंगारी, श्रीमंत दगडूशेठ हलवाई, मंडई आणि जिलब्या मारुती या मंडळांच्या गणपतीचं दर्शन घेतो. रांगेमध्ये न थांबता. (कारण तेव्हा रांग नसतेच)




ह्याच कारणामुळे मी इतकी वर्षे लालबागचा राजा आणि प्रभादेवीचा सिद्धीविनायकाच्या दर्शनाला गेलेलो नाही. यंदा मात्र, राजाचा योग जुळून आला. अमर पटवर्धन नावाच्या पनवेलमधल्या एका मित्राच्या आग्रहाखातर आणि मंगेश वरवडेकर या कामगार नगरच्या राजाच्या कृपेमुळे मी लालबागच्या राजाच्या चरणी माथा टेकू शकलो. लोक नवस बोलतात, ते फेडण्यासाठी वीस वीस तास रांगेत थांबतात, हे सारंच माझ्या बुद्धीच्या पलिकडचं होतं. इतके दिवस वाटायचं मूर्ख आहेत साले फुकटचा वेळ वाया घालवतात. पण लालबागच्या राजाच्या चरणी माथा टेकल्यानंतर ही मंडळी इतका वेळ रांगेमध्ये का थांबतात आणि कशामुळे थांबू शकतात हे कोडं उलगडलं. कोणत्याही गणपतीच्या पुढ्यात उभं राहिलं की जी प्रसन्नता मिळते ती इथंही मिळते. राजा जणू काही आपल्यालाकडेच पाहतो आहे आणि आशीर्वाद देतो आहे, असं वाटतं. एखाद-दोन मिनिटांचा खेळ असतो. (रांगेतून गेलात तर काही सेकंदांचाच) पण हा एखाद दोन मिनिटांचा कालावधी वर्षभराचा क्षीण क्षणार्धात घालवून टाकतो. ऐसे तुम मोह को अती भावे... असं का म्हणतात ते तेव्हाच आपल्याला कळतं. अगदी सहजपणे राजाचं दर्शन झालं आणि कृतकृत्य झालो. दरवर्षी जाणं होईल की नाही माहिती नाही. दरवर्षी असं ओळखीतून दर्शन घेणं आवडेल असंही नाही. पण एका वर्षाची प्रत्यक्ष भेट आणखी काही वर्षांसाठी तरी पुरेशी असावी, हे मात्र नक्की.

लालबागच्या राजानंतर आम्ही दर्शन घेतलं गणेश गल्ली मित्र मंडळाचं. गणेश गल्ली म्हणजे उंच मूर्ती तयार करणारं मुंबईतील सर्वात पहिलं मंडळ. आजही या मंडळाची मूर्ती २५ की २७ फुटी असते. दरवर्षी कशावर तरी विराजमान झालेली गणरायांची मूर्ती हे मंडळ साकारतं. यंदाचं मंडळाचं ८३ वं वर्ष असून त्यांनी मूषकराज गणेश साकारला आहे. खरं तर पूर्वी गणेश गल्लीचा गणपती हाच सर्वांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू होता. त्यालाच जास्त गर्दी व्हायची. पण नंतर हळूहळू राजाचं प्रस्थ वाढत गेलं आणि सगळी गर्दी राजानं खेचली. गणेश गल्लीच्या गणपतीचं नाव खरं तर लालबाग सार्वजनिक मित्र मंडळ आणि लालबागच्या राजाचं पूर्वीचं नाव सार्वजनिक गणेशोत्सव, लालबाग. पण कालांतरानं मंडळानं नावाचं रजिस्ट्रेशनचं लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असं करुन घेतलं आहे. (आता पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मंडळाचं खरं नाव सुवर्णयुग तरुण मंडळ. पण हे फारसं कोणाला माहिती नाही. त्यातलाच हा प्रकार) त्यामुळं आवर्जून गणेश गल्लीच्या गणपतीचंही दर्शन घेतलं. सॉल्लिड मूर्ती एकदम. वादच नाही.



परळ आणि लालबाग हा मुंबईच्या गणेशोत्सवाचा केंद्रबिंदू. पूर्वी लोकप्रियतेच्या शिखरावर असलेला गणेश गल्लीचा गणपती आणि आता लालबागचा राजा हे दोन्ही एकाच परिसरात असल्यामुळे इथल्या उत्सवाचं वातावरण पुण्यातील दगडूशेठ गणपती आणि सभोवतालच्या परिसराची आठवण करुन देणारं. आपण पुण्याचे गणपतीच पाहतो आहोत की काय, असं वाटावं इतकं वातावरण सारखं. पहावं तिकडं गणपती, बाहेर लांबच्या लांब रांगा, प्रचंड गर्दी आणि गणपतीपेक्षा खाण्याच्या गाड्यांवर तुफान गर्दी... टिप्पिकल पुण्यासारखंच. लालबागच्या राजाच्या निमित्तानं हे सारं अनुभवता आलं ही राजाच्या दर्शनाबरोबर मिळालेली फ्री गिफ्ट. खरं तर राजाचं दर्शन मिळालं ही गिफ्टच मोठी आहे. त्यामुळं त्यावर काही फ्री मिळतंय की नाही, याचा विचार करण्याची इतरांना गरज वाटणार नाही. पण मला मात्र, राजाच्या दर्शनाबरोबरच परिसरात अनुभवलेला गणेशोत्सवाचा तो टिप्पिकल फिलही तितकाच नसला तरी खूप महत्त्वाचा आहे.