Showing posts with label Smita Thackrey. Show all posts
Showing posts with label Smita Thackrey. Show all posts

Monday, October 28, 2013

शब्दप्रभू ठाकरे त्रयी…

बाळासाहेब, उद्धव आणि राज...



शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भाषणं ऐकताना जाम मजा येते. त्यांची भाषणं ऐकणं हा एक मस्त अनुभव असतो. हशा, टाळ्या, कोपरखळ्या, किस्से आणि शब्दांचे खेळ हे सारं एकदम सहजपणे आणि जाता जाता. ‘फोटोजर्नालिझम’ कोर्सच्या उद्घाटनासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुण्यात आले होते. नेहमीसारखीच सुरेख भाषणाची मेजवानी यावेळी अनुभवता आली. अगदी साधं भाषण. पण शब्दांचे खेळ करीत श्रोत्यांना अधूनमधून हसवत आणि कोणतेही राजकीय भाष्य न करतानाही योग्य तो संदेश पोहोचेल याची घेतलेली खबरदारी यामुळं उद्धव यांनी उपस्थित श्रोत्यांना मनमुराद आनंद दिला.

मुळात हे अशा कोपरखळ्या शब्दांचे खेळ करणं किंवा एखाद्या विरोधकाची खेचणं, त्याची चेष्टा करणं हे या मंडळींना सुचतं कसं, याची उत्सुकता मला कायम वाटते. कदाचित ठाकरे कुटुंबीयांच्या रक्तातच तो हजरजबाबीपणा, विनोदबुद्धी, तिरसकपणा किंवा योग्य टायमिंग साधून कोटी करण्याचं कसब असलं पाहिजे, असं राहून राहून वाटतं. कारण कोर्स करून, क्लास लावून, दुसऱ्याचं पाहूनपाहून अशा गोष्टी जमणं बाप जन्मात शक्य नाही. त्यामुळेच फक्त भाषण करणं, हातवारे करणं, शिव्यांची लाखोली वाहणं, शेलक्या शब्दात टीका करून कार्यकर्त्यांच्या टाळ्या मिळवणं, इतक्यापुरतंच तीन ठाकरेंना मर्यादित ठेवणं हा त्यांच्यावर अन्याय ठरेल. रंगतदार भाषण करण्याची हातोटी आणि मराठी भाषेचा योग्यवेळी योग्य वापर करण्याचं त्यांचं कौशल्य वाखाणण्याजोगं आहे. महाराष्ट्रातील अगदी मोजक्या राजकीय नेत्यांकडे हे कौशल्य आहे. त्यात या तीनही ठाकरेंचं स्थान अगदी पक्कं आहे.

हिंदूहृद्यसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल काय बोलायचं. अगदी बिनधास्त आणि बेधडक व्यक्तिमत्त्व. बाबरी मशीद पाडल्यानंतर संघ आणि परिवाराने झुरळ झटकावं तशी जबाबदारी झटकली. त्यावेळी शिवसेनाप्रमुखांनी कोणत्याही परिणामांची तमा न बाळगता ’माझ्या शिवसैनिकांनी मशीद पाडली, असेल तर मला त्याचा अभिमान आहे,’ असं वक्तव्य करून अनेकांची मने जिंकली होती. विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल यांनी बाळासाहेबांसंदर्भात बाबरी मशिदीच्या मुद्द्यावरून टीका केली होती. त्यावेळी बाळासाहेबांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती, ‘सिंघल कसले, ते तर सिंगल आहेत.’ ‘तुम्ही सर्व जबाबदारी झटकून पळत असताना, मी एकटा ठामपणे उभा होतो आणि हिंदू समाजानेही नंतर ते स्वीकारले,’ असा त्या प्रतिक्रियेचा संदर्भ असावा.

नंतर लोकमत आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यात चांगलाच वाद रंगला होता. शिर्डीच्या साईबाबांना सोन्याचे सिंहासन करण्यावरून बाळासाहेबांनी सामनातून खरमरीत टीका केली होती. ‘शिवसेनाप्रमुख स्वतः चांदीच्या सिंहासनावर बसतात. त्यांना टीका करण्याचा काय अधिकार,’ अशी टीका लोकमतने केली. जराही विलंब न करता बाळासाहेबांनी सकाळी अकरा वाजायच्या आतच ते चांदीचे सिंहासन लोकमतच्या कार्यालयात पाठवून दिले होते. सोबत संदेशही पाठविला होता. ‘चांदीचे सिंहासन तुम्हालाच लखलाभ!’ नंतर लोकमतकारांची भंबेरी उडाली आणि त्यांनी ते सिंहासन सन्मानपूर्वक नाकारले, हा इतिहास सर्वज्ञात आहे. पण हे असं काहीतरी पटकन सुचणं ही बाळासाहेबांची खासियत.

पुढे आणखी कोणत्या तरी कारणावरून शिवसेनाप्रमुख आणि लोकमत यांच्यामध्ये बेबनाव निर्माण झाला. त्यावेळी कोणाचीही पर्वा न करता बाळासाहेबांनी लोकमतकारांना खरमरीत पत्र लिहिले होते. त्यामध्ये लोकमतचा उल्लेख ‘लोकमूत’ असा करण्यात आला होता. बदल फक्त एका उकाराचा. पण अर्थाचा फरक महाभयंकर. मराठीला असं फिरविणं हे ठाकरे घराण्याचे वैशिष्ट्य…

रामजन्मभूमीच्या वादासंदर्भात कोर्टाने सर्वप्रथम निकाल दिला तेव्हाची बाळासाहेबांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया अशीच लक्षात राहणारी. ‘शेवटी वादानेही ‘राम’ म्हटले.’ व्वा… इतक्या कमी शब्दांमध्ये राम या शब्दाचा अचूक वापर करून स्वतःला हवा तो संदेश देणारी प्रतिक्रिया देणं… क्या बात है…

उद्धव ठाकरे यांचंही तसंच. ‘फोटोजर्नालिझम’च्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात सूत्रसंचालकाने त्यांचा परिचय शिवसेनेचे धाडसी नेते असा करून दिला. तोच धागा पकडून उद्धव ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात केली. ते म्हणाले, ‘मला धाडसी म्हटल्याबद्दल धन्यवाद. सध्या माझं मलाच कळंत नाही, की मी कसा आहे ते…’ अर्थातच, प्रि. मनोहर जोशी यांनी केलेल्या टीकेचा संदर्भ त्याला होता, हे सांगायला नकोच. ‘ब्लॅक अॅण्ड व्हाईट’ फोटोंमध्ये रंग नसले, तरी रंगत होती… भरदिवसाही मी माझ्या छंदांचं प्रदर्शन भरवू शकतो. तुम्ही भरवू शकता का… वगैरे वगैरे.

गेल्या विधानसभेत समाजवादी पक्षाचे अबू आझमी शिवाजीनगर (गोवंडी) आणि भिवंडी अशा दोन मतदारसंघांमधून निवडून आले. त्यापैकी त्यांनी भिवंडीचा राजीनामा दिला. तिथं पोटनिवडणूक लागली. त्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे रुपेश म्हात्रे विजयी झाले. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया होती, ‘काल तू, आज मी…’ आझमी या शब्दाची किती अचूक आणि योग्य फोड. बाळासाहेबांसारख शैलीदार भाषण करण्याचं कसब उद्धव यांच्याकडे नसलं तरी त्यांच्यासारख्या कोट्या आणि कोपरखळ्या मारण्याचं कसब उद्धव यांच्याकडे निश्चितच आहे, असं म्हटलं पाहिजे.

राज यांचेही असेच. हा माणूस तर शब्दांचेच खेळ करण्यात अगदी माहीर. मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारात शिवसेनेचा भर होता ‘करुन दाखविले’ या स्लोगनवर. तेव्हा राज यांनी भरसभेत या स्लोगची पार वाट लावली होती. ‘आधी करून दाखविले, मग वरून दाखविले,’ असे म्हणून राज यांनी शिवसेनेच्या स्लोगनची पार धूळधाण उडविली. अर्थातच, संदर्भ उद्‍धव यांच्या एरियल फोटोग्राफीचा. नंतर अजित पवारांनाही त्यांनी असाच टोला लगाविला होता. ‘पुढच्या निवडणुकीत मतदार तुम्हाला मत नाही, मूत देतील,’

ज्यांची हयात शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका करण्यात गेली, ते राजदीप सरदेसाई नावाचे वरिष्ठ पत्रकार एकदा राज ठाकरे यांची मुलाखत घेत होते. त्या मुलाखतीदरम्यान त्यांनी राज यांना प्रश्न विचारला. तुमची सगळी राजकीय कारकीर्द शिवसेनेत घडली. तेव्हा शिवसेनेतून पुन्हा बोलाविणे आले तर परत जाणार का?’ राज यांनी क्षणार्धात राजदीप यांना प्रतिप्रश्न केला. ’तुमची पत्रकारितेची बहुतांश कारकिर्द ‘एनडीटीव्ही’मध्ये गेली. तुम्हाला ‘एनडीटीव्ही’तून बोलाविणे आले, तर परत जाणार का?’ राजदीप यांचे उत्तर होते… ‘डिपेंड्स’ तेच उत्तर राज यांनी राजदीप यांना दिले. ‘डिपेंड्स’. राजदीप सरदेसाई यांना गप्प करणारा दुसरा राजकारणी राज ठाकरे. पहिले नरेंद्र मोदी.

उद्धव यांचे चिरंजीव आदित्य हे नव्यानं राजकारणात उतरले आहेत. तरीही त्यांच्यातही हा ठाकरेपणा असल्याचा एक प्रत्यय मध्यंतरी आला. औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी आदित्य गेले होते. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना विचारलं, ‘औरंगाबादमध्ये शिवसेना जिंकणार का? वातावरण आणि परिस्थिती काही वेगळंच सांगतीये.’ त्यावेळी आदित्यचं उत्तर होतं. ‘औरंगाबादमध्ये काय होईल मला माहिती नाही. पण संभाजीनगरमध्ये शिवसेनाच जिंकणार, याचा मला ठाम विश्वास आहे.’ हे असं काही सेकंदांमध्ये सुचणं हे रक्तातच असायला हवं.

आठवून आठवून सांगायचे झाले, तर या तिघांचे असे असंख्य किस्से आणि आठवणी सांगता येतील. बाळासाहेबांनी नेत्यांना किंवा इतर क्षेत्रातील मंडळींचं नव्यानं केलेलं बारसं वगैरे अशा गोष्टी आहेतच. कदाचित ठाकरेंवर प्रेम करणारी मंडळी आणि राजकीय पत्रकारांकडे अशा असे अनेक किस्से असतील. पण अगदी पटकन सुचल्या म्हणून लक्षात राहिलेल्या हे काही मोजके किस्से त्यांची खासियत सांगणारे...