Wednesday, January 08, 2014

आगळं वेगळं केरळ


डाव्यांचा बालेकिल्ला
पश्चिम बंगाल आणि केरळ हे डाव्यांचे बालेकिल्ले हे पेपरांमध्ये अनेकदा वाचलं आणि लिहिलं होतं. पण त्यांच्या ताकदीचा अनुभव केरळमध्ये पाऊल ठेवल्यानंतर अगदी पहिल्या काही तासांतच आला. माधव गाडगीळ आणि कस्तुरीरंगन यांनी पश्चिम घाटासंदर्भात तयार केलेल्या अहवालांना डाव्यांचा विरोध आहे. राज्य सरकारने हा अहवाल नाकारावा, ही त्यांची जोरदार मागणी आहे. राज्य सरकार अहवाल स्वीकारणार हे निश्चित आहे. गाडगीळ आणि कस्तुरीरंगन अहवालाचा सर्वाधिक फटका इडुक्की जिल्ह्यात बसेल, असा डाव्यांचा दावा आहे. त्यामुळे त्यांनी इडुक्की जिल्ह्यामध्ये बंदची (मल्याळमध्ये हरताळ) हाक दिली होती. आम्हाला वाटलं सक्काळी सक्काळी आपण निघून जाऊ. डाव्या पक्षांचे कार्यकर्ते भलतेच कट्टर आणि तत्पर निघाले.


पेरियार नदीवरील पूल ओलांडून इडुक्की जिल्ह्यामध्ये पाऊल ठेवले आणि दोनच मिनिटांमध्ये डाव्यांच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला अडविले. तिथं दहा मिनिटं काढल्यानंतर मग आम्हाला वाटलं, की झालं सुटलो. पण पुढेच दहा मैलांवर पत्तामैल (पत्ता म्हणजे दहा) नावाचं एक गाव आहे. तिथं डाव्यांनी आमचे चांगले चार-पाच तास वाया घालविले. बरं ही मंडळी इतकी कर्मठ, की कोणालाही सोडण्यास ते तयार नव्हते. पत्रकार असो, परदेशी मंडळी असो, कोणत्या तरी आजाराचे पेशंट असो, कच्चेबच्चे आणि अंगावरची मुलं असो, कोणाला म्हणजे कोणालाही ते सोडायला तयार नव्हते. तुमची भूमिका आम्हाला मान्य आहे. आम्हाला सोडा वगैरे म्हणून त्यांना काहीच फरक पडत नव्हता.

मुळात मुन्नारला फिरायला येणाऱ्या लोकांवर त्यांचा भलताच राग. इथे आमच्या घराचे, राहण्याचे आणि व्यवसायाचे वांदे आहेत. तुम्ही फिरायला आणि एन्जॉय करायला कसले येता, अशी भावना त्यांच्या शब्दात, डोळ्यांत दिसत होती. वास्तविक पाहता, आम्हाला अडवून त्यांचा काहीच फायदा होणार नव्हता. उलट केरळचे नागरिक किती मूर्ख आणि अडेलतट्टू आहेत, अशीच प्रतिमा जगभर जाणार होती. पण मुळातच कर्मठ आणि झापडबंद असलेल्या डाव्यांना ते काय समजणार. ‘अतिथी देवो भव’च्या जाहिराती वगैरे करून आतिथ्याला ही डावी मंडळी हरताळ फासत होती.  

पत्तामैल गावातील सर्व डावे कार्यकर्ते ते अल्पशिक्षीत. रेल्वेचं किंवा विमानाचं ई-तिकिट असतं किंवा मोबाईल एसएमएसवरचा मेसेजही ग्राह्य धरला जाऊ शकतो, हे त्यांना मान्य नव्हतं. त्यामुळं फ्लाइट किंवा रेल्वे असणाऱ्या प्रवाशांनाही डाव्यांनी नाहक अडवून ठेवलं होतं. त्या लोकांना त्यांची फ्लाइट्स किंवा रेल्वे मिळाल्या, की नाहीत देव जाणे. आम्हाला काहीच फरक पडत नव्हता. म्हणजे वेळ वाया गेला. पण आमचं काही मिस झालं नाही. थोडा कंटाळा आला इतकंच. इतरांचे मात्र, हाल झाले. लहान मुलांना प्यायला दूध नाही. अनेक म्हाताऱ्या कोताऱ्या लोकांना ठरलेल्या वेळी औषधं घ्यायची असतात. त्यापूर्वी जेवावं किंवा काहीतरी खावं लागतं. त्या सगळ्यांचेच प्रचंड हाल झाले. त्यामुळं प्रकाश कारत आणि समस्त डाव्या नेत्यांनी सर्वप्रथम स्वतःच्या कार्यकर्त्यांना नव्या जगाची ओळख करून देण्याची गरज आहे. आंदोलनाचा फटका पर्यटकांना किंवा बाहेरच्यांना बसणार नाही, विशेषतः परदेशी पर्यटकांना याची खबरदारी बाळगली पाहिजे. शिवाय त्या इडुक्कीमध्ये पर्यटनाशिवाय दुसरा उत्पन्नाचा मोठा स्रोत नाही. तिथं पर्यटकांनाच त्रास देऊन हे निबुर्द्ध डावी मंडळी काय साध्य करणार, हे अच्युतानंदन आणि पिनरई विजयन यांनाच माहिती. साराच मूर्खांचा बाजार.


अर्थात, असं असलं तरी डाव्या पक्षाच्या आणि कार्यकर्त्यांच्या काही गोष्टी चांगल्या आहेच. त्यामुळं इतका वेळ वाया गेल्यानंतरही त्यांच्याबद्दल राग होता. पण द्वेष नव्हता. तिथून निघाल्यानंतर पुढे काही दिवस तोच विषय डोक्यात अधूनमधून घोळत होता. डाव्यांचा झापडबंदपणा अयोग्य की त्यांची कट्टरता अनुकरणीय. लोकांना होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष करण्याची वृत्ती मूर्खपणाची की नेत्यांची आज्ञा शिरसावंद्य मानणं महत्त्वाचं, मटण आणि दारूला चटावलेल्या इतर पक्षांच्या (भारतीय जनता पक्षासह सर्वच पक्षांच्या) कार्यकर्त्यांना लाजवेल असा साधेपणा महत्त्वाचा की माहिती-तंत्रज्ञानाची आणि जगाची भाषा न समजण्याची अज्ञानी वृत्ती धोक्याची हेच मला कळत नव्हतं. राजकारणात प्रत्येकालाच कुठे ना कुठे पुढारीपणा मिरवण्याची हौस असते. मात्र, इथं पत्तामैलमधला डाव्या पक्षाचा नेता आम्हाला समजावून सांगत होता. पिनरई विजयन आणि प्रकाश कारत आमचे नेते आहेत. मी कोणीही नेता वगैरे नाही. तेव्हा ते सांगतील तसंच होईल, असं सांगणारे डावे कार्यकर्ते शिस्तबद्ध वाटत होते. पण सद्सद्विवेकबुद्धी नसेल तर अशा शिस्तीचा काय उपयोग असंही वाटत होतं.

पुढे इरिंजालकुडा इथं असताना बाबांचे मित्र, श्री. एम. के. चंद्रन यांनी डाव्यांच्या कामगिरीबद्दल एकदम टोकाची प्रतिक्रिया सांगितली. ते म्हणाले, केरळमध्ये रोज घराबाहेर पडण्यापूर्वी चार लोकांना विचारावं लागतं, की आज कोणाचा बंद नाही ना. म्हणजे बस कंडक्टरने वाईट शब्द वापरल्यानंतर त्याला लोकांनी बदडलं तर बसचा बंद, कधी घरकामगारांना योग्य वेतन मिळत नसल्याबद्दल बंद, कधी विद्यार्थ्यांचा बंद, तर कधी राजकारण्यांचा बंद. डाव्यांच्या या रोजच्या बंदमुळं डोक्याला ताप झालाय. शिवाय छोट्या छोट्या गोष्टींसाठी म्हणजे वायरमन, फिटर, सुतार, बांधकाम मजूर वगैरे हवे असतील तर संघटनेमध्ये नोंद झालेल्या कामगारालाच आणावं लागतं. अन्यथा डावे लोक तुमच्या घरासमोर आंदोलन करण्यासाठी उभे ठाकतील आणि काम बंद पाडतील. ते डाव्यांच्या युनियनशाहीला भलतेच वैतागलेले. त्यामुळे डावे चांगले किंवा डाव्यांचे काही गुण चांगले, असं कोणीही म्हणत असलं तरी दुरून डोंगर साजरे असंच त्यांच्या अनुभवावरून वाटत होतं.

केरळमधील सिरीयन ख्रिश्चन
केरळमध्ये ख्रिश्चन आणि मुस्लिम मंडळींची संख्या चाळीस टक्क्यांपर्यंत आहे. येशू ख्रिस्ताच्या मृत्यूनंतर फक्त ५२ वर्षांनी ख्रिश्चन धर्म केरळमध्ये आला. सेंट थॉमस यांनी केरळमध्ये ख्रिश्चन धर्माची मुहूर्तमेढ रोवली. नंतर पॅलेस्टाइनमधील एका व्यापाऱ्याने शंभरएक कुटुंबांसह केरळमध्ये प्रवेश केला. तो काळ होता ख्रिस्ताच्या मृत्यूनंतर ३५० वर्षांनी. त्यानंतर युरोपियन आणि लॅटिन अमेरिकी मिशनरी भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर येऊ लागले, असे इतिहास सांगतो. इतर राज्यांमध्ये ख्रिश्चन समुदाय कॅथलिक आणि प्रोटेस्टंट या दोन प्रमुख पंथांमध्ये विभागला गेला आहे. मात्र, केरळमध्ये लोकप्रिय असलेला आणखी एक पंथ म्हणजे सिरीयन ख्रिश्चन.


सिरीयन ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन ही मंडळी हिंदू प्रथा परंपरांच्या जवळ जाणारी. म्हणजे या पंथातील बायका कुंकू वगैरे लावतात. बांगड्या भरणं गैर मानत नाहीत. सिरीयन ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन किंवा सिरीयन याकूबाईट चर्चमध्ये देवळांमध्ये असतो तसा ध्वजस्तंभ असतो. या चर्चमध्ये सदैव समई तेवत असते. चर्चमध्ये प्रवेश करताना चप्पल, बूट बाहेर काढून ठेवावे लागतात. चर्चच्या बाजूला असलेल्या भिंतीत रोषणाईसाठी दगडी पणत्यांची किंवा दिव्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. ख्रिश्चन मंडळींचे उत्सव आणि ख्रिसमसच्या काळात चर्च तेलदिव्यांच्या रोषणाईने उजळून निघते.

इतिहास असे सांगतो, की सिरीयन ख्रिश्चन पंथाचे धर्मगुरू जेव्हा केरळमध्ये आले तेव्हा त्यांनी त्यावेळच्या राजांना चर्चा बांधण्यासाठी कायमस्वरुपी जागा मागितली. उदार आणि सहिष्णू हिंदू राजांनी त्यांनी जमीन दान दिली. राजा आपल्यावर नाखूष होऊ नये आणि त्याची मेहेरबानी कायम रहावी, म्हणून या ख्रिश्चन मंडळींनी हिंदू धर्माप्रमाणे ध्वजस्तंभ, रोषणाईसाठी पणत्यांची व्यवस्था आणि तेवती समई वगैरे गोष्टी चर्चमध्ये आणल्या, अशी माहिती कोट्टायममध्ये १५७९ साली स्थापन करण्यात आलेल्या चेरियापल्ली चर्चच्या व्यवस्थापने दिली. चेरियापल्ली आणि वेरियापल्ली ही दोन चर्च कोट्टायम जिल्ह्यातील सर्वात जुनी चर्च आहेत. दुसरे चर्च हे पहिल्यापेक्षा आणखी पन्नास वर्षे जुने आहे. अर्थात, ही मंडळी आपल्या आपल्यातच लग्न करू शकतात. दुसऱ्या पंथातील मुलाशी किंवा मुलीशी लग्न केले तर समाज त्यांच्यावर बहिष्कार टाकतो.


याशिवाय सिरीयन मलबार कॅथलिक, सिरीयन मालांकारा कॅथलिक, मालांकारा ऑर्थोडॉक्स, मार्थोमा, चर्च ऑफ साउथ इंडिया आणि लॅटिन राइट ख्रिश्चन असे आणखी काही उपप्रकार आहेत. त्यापैकी सर्वाधिक लोकसंख्या सिरीयन ख्रिश्चन मंडळींचीच आहेत. वेरियापल्ली चर्चमध्ये गेलो होतो, तेव्हा तिथल्या व्यवस्थापकाला विचारलं, की बाबा ख्रिश्चन लोकांमध्ये इतके वेगवेगळे पंथ कसे निर्माण झाले. तेव्हा त्याचं साधं सोपं सरळ उत्तर होतं. ‘अनेकदा पैशांसाठी, वर्चस्वासाठी किंवा आमचं तेच खरं याच भावनेतून वेगवेगळे पंथ स्थापन झाले,’ अशी स्पष्ट कबुली त्यानं दिली. संपूर्ण केरळमध्ये जवळपास पंधराशे सिरीयन चर्च आहेत. कॅथलिक आणि प्रॉटेस्टंट तसंच इतर पंथांची चर्चेस वेगळी.

शुद्ध मल्याळमवर प्रेम
मल्याळम ही भाषा बोलायला प्रचंड अवघड आहे आणि अनेकदा शिकल्यानंतरही नीट लक्ष देऊन न ऐकल्यास मग काहीच समजत नाही, असं आमचा मित्र सानीलनं सांगितलं. मुळात मल्याळममध्ये पंधरा स्वर आणि ४१ व्यंजनं आहेत. त्यामध्ये ळ, झ, ञ, ङ, ष आणि ण ही व्यंजनं असलेल्या शब्दांची संख्या इतर भाषांच्या तुलनेने अधिक आहे. मल्याळमप्रमाणेच तमिळ भाषेतही ही व्यंजनं असलेले शब्द जास्त आहेत. दोन्ही भाषा अधिक राकट, उग्र, भरभर आणि तोंडातल्या तोंडात बोलल्यामुळे न समजणाऱ्या आणि अंगावर येणाऱ्या वाटतात, त्या या मुळेच. अन्बळगन किंवा षङ्मुगम ही नावं पटापट बोलून पहा कसं वाटतं ते.


ही माहिती समजल्यानंतर सानीलला माझा पहिला प्रतिप्रश्न होता, की या सर्व अक्षरांचे उच्चार हे सारखेच असतात की जातीप्रमाणे बदलत जातात. म्हणजे मराठीत कसं अनेकदा पानी, लोनी आणि कोनी असे शब्द येतात. अभिमाण वगैरेही म्हटलं जातं. कोण म्हणतं किंवा त्यांचं तसं म्हणण्या मागचं समर्थन काय हा भाग अलहिदा. पण मल्याळममध्ये मात्र, शहरातला, गावातला, कोणत्याही जातीतला माणूस वरील सर्व व्यंजनांचे उच्चार अगदी स्पष्ट आणि शुद्ध असतील यासाठी प्रयत्नशील असतो.

केरळमध्ये असताना मल्याळममधील काही शब्द जाणून घेतले. आर म्हणजे नदी. तीन नद्या जिथं एकत्र येतात, (मून म्हणजे तीन) ती जागा म्हणजे मुन्नार. अनेकदा नद्यांच्या नावाला जोडूनच आर म्हणण्याची पद्धत आहे. म्हणजे मिनान्चार, पेरियार, कवणार, पेन्नार वगैरे वगैरे. मल्याळम शब्दांचे मराठीत भाषांतर करताना आवर्जून होणारी चूक म्हणजे. कोझीकोड आणि अल्लपुझ्झा. मल्याळम भाषेत त्याचा उच्चार कोळीकोड आणि अल्लपुळा असा केला जातो. Z हे अक्षर नावात आल्यामुळे त्याचा उच्चार ‘झ’ असा करण्याची आवश्यकता नाही. जसे तमिळमध्ये द्रविड मुन्नेत्र कळघम असे होते. कझगम असे नाही. कन्निमोळी असे होते. कन्निमोझी असे नाही. तोच नियम मल्याळम भाषेतही लागू होतो. त्यामुळेच कोळीकोड आणि अल्लपुळा.

पुळा या शब्दाचा अर्थ पाणथळ प्रदेश. उदारणार्थ अल्लपुळा, थोड्डुपुळा, अंबळपुळा, अरट्टुपुळा, कुट्टमपुळा आणि असे अनेक पुळा. ण हे व्यंजनही अगदी अनेक शब्दांमध्ये वापरले जाते. आपण एर्नाकुलम असं म्हणत असलो तरीही तिथं त्याचा उच्चार एर्णाकुलम असाच होतो. मल्याळमची अशी वेगळीच गंमत त्या दहा-बारा दिवसांमध्ये समजली.

भाषेचा प्रचंड अभिमान…
दक्षिणेतल्या चारही राज्यांना त्यांच्या त्यांच्या प्रादेशिक भाषेबद्दल अभिमान असतोच. केरळही त्याला अपवाद नाही. पण या अभिमानाचा काहीसा विचित्र अनुभव मला एका रेल्वे प्रवासादरम्यान आला. इरिंजालकुडा ते तिरुवनंतपुरम हा प्रवास अचानक ठरलेला असल्यामुळे रिझर्व्हेशन मिळणं अशक्यच होतं. त्यामुळं गुरुवायूर-तिरुवनंतपुरम एक्स्प्रेसनं निघालो. विनाआरक्षित डब्यातून. साधारण पाच तासांचा प्रवास. विनाआरक्षित डब्यांमध्ये असणारी प्रचंड गर्दी या गाडीतही होतीच. गाडीत चढणारे, उतरणारे, हवेसाठी दारात उभे राहणारे आणि आतमध्ये असलेले अशा प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर एक वैताग होता. त्यातूनच एकाशी खटका उडाला. अठरा ते वीस वर्षांचा असावा. हवेसाठी मी दारात उभा होतो आणि मला मागे रेटून त्याला दारात उभं रहायचं होतं.

मल्याळी भाषेतच काहीतरी म्हणाला. बहुतेक मागे सरकार, मला उभं रहायचंय वगैरे काहीतरी असावं. पहिल्यांदा मी दुर्लक्षच केलं. पुन्हा एकदा मल्याळममध्ये काहीतरी म्हटला. तरीही मी दुर्लक्षच केलं. तिसऱ्यांदा चिडून काहीतरी म्हटल्यानंतर मी त्याला म्हटलं, जे काही बोलायचंय ते हिंदीत बोल. मला मल्याळम कळत नाही. तरीही हा पठ्ठ्या मल्याळममध्येच बोलतोय. मग मी पण त्याला मराठीतूनच सांगितलं. एकदा सांगितलेलं कळत नाही का, हिंदीमध्ये बोल नाही. मी मराठीतून बोलल्यावर त्याला कळेचना काय बोलतोय… आणखी दोन तीन वाक्य मराठीतून बोलल्यानंतर तो आपोआप हिंदीवर आला. मग त्यालाही कळलं. समोरच्याला समजणार नाही, अशा भाषेत बोलल्यानंतर काय होतं ते… 


तिरुवनंतपुरममध्ये शिवसेनेचे काम


केरळमध्ये गेल्यानंतर दोन-चार ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली वाहणारे पोस्टर्स आणि बॅनर पहायला मिळाले. पण ते अगदी क्वचित. पण तिरुवनंतपुरममध्ये (तिरुअनंतपुरम नव्हे) गेल्यानंतर समजलं, की त्या ठिकाणी शिवसेनेचं जोरदार सामाजिक कार्य आहे. राजकीय ताकद फार नाही, पण सामाजिक काम बरेच आहे. एम. एस. भुवनचंद्रन हे केरळ शिवसेनेचे प्रमुख आहेत. हायस्पीड आणि हायटेक अॅम्ब्युलन्सची फौज त्यांनी तिरुवनंतपुरममध्ये रस्त्यावर उतरविली आहे. तत्पर नि विश्वासार्ह अॅम्ब्युलन्स सेवा ही केरळ शिवसेनेची ओळख आहे. शिवाय पद्मनाभ मंदिरासह विविध देवळांमध्ये अन्नछत्र सुरू करून भक्तांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी पुढे असलेली संघटना म्हणून शिवसेना ओळखली जाते.


महाराष्ट्रात मोठ्या भावाची भूमिका निभावणारी शिवसेना केरळमध्ये हिंदू मुनान्नीच्या सहकार्याने पुढे जात आहे. हिंदू मुनान्नी ही हिंदुत्वाचा विचार कट्टरपणे पुढे नेणारी आक्रमक संघटना आहे. शिवसेना तिला धरून असते. तिरुवनंतपुरमसह केरळमधील विविध गावांमध्ये गणेशोत्सव साजरा करण्याची प्रथा शिवसेनेने सुरू केली आहे. म्हणजे तिरुवनंतपुरममधील दीड-दोन हजार घरांमध्ये गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करण्याची परंपरा शिवसेनेने सुरू केली. शहरात विविध पाचशे ते सहाशे गणेश मंडळांची स्थापना करून सार्वजनिक गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यास प्रारंभ केला. हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर आग्रही भूमिका घेणारी धार्मिक आणि सामाजिक संघटना ही त्यांची आणखी तिरुवनंतपुरममध्ये अधिक लोकप्रिय आहे. केरळमध्ये इतरत्र मात्र, संघटनेचा म्हणावा तसा प्रभाव नाही. पण राजधानीत त्यांची दखल घेतलीच जाते. 

शेवटचा पण महत्त्वाचा किस्सा...

चेरियापल्ली चर्च पाहण्यासाठी आम्ही गेलो होतो, त्याचवेळी तिथं अमेरिकेतील चार पर्यटक आले होते. म्हणजे दोन जोडपी होती. त्यांनी तिथल्या व्यवस्थापकाला विचारलं, की चर्चमध्ये प्रार्थना वगैरे कधी होतात. चर्च कधी बांधलं. इथलं व्यवस्थापन कसं चालतं. सिरीयन ऑर्थोडॉक्स चर्चचा मुख्य धर्मगुरू कोण वगैरे वगैरे माहिती त्यानं घेतली. चर्चची सर्व माहिती घेतल्यानंतर जाताना त्यानं हळूच एक प्रश्न पुढं केला. त्यानं विचारलं, की या चर्चमध्ये फक्त ख्रिश्चन मंडळींनाच प्रवेश आहे की इतर धर्मिय सुद्धा येऊ शकतात. 

तिथला व्यवस्थापक तितकाच बिलंदर आणि खोचक. तो म्हणाला, आमच्या चर्चमध्ये फक्त ख्रिश्चनच नाही, तर सर्व धर्मियांना प्रवेश आहे. केरळमधील अनेक मंदिरांमध्ये ख्रिश्चन आणि मुस्लिम किंवा गैरहिंदू लोकांना प्रवेश दिला जात नाही. मात्र, आमचे चर्च सर्वांसाठी खुले आहे. आता आमचे चर्च सर्वांसाठी खुले आहे, हे सांगताना देवळांचा उल्लेख करण्याची त्याला काही आवश्यकता नव्हती. पण त्यानं तसा उल्लेख केला. 

हे ऐकल्यानंतर मग त्या अमेरिकन पर्यटकाला आश्चर्य वाटलं. मग त्याला मी थोडं समजावून सांगितलं. म्हटलं, सगळीकडे भारतात अशी परिस्थिती नाही. केरळमध्ये जरी मंदिरांमध्ये गैरहिंदू लोकांना प्रवेश दिला जात नसला, तरी भारतातील इतर मंदिरांमध्ये सर्व धर्मियांना प्रवेश दिला जातो. अगदी काही अपवाद वगळून. त्यामुळे इथली परिस्थिती सगळीकडे आहे, असे मुळीच नाही. शिवाय म्हटलं ख्रिश्चन धर्माचे चर्च असले तरीही इथं मी हिंदू असूनही आलो आहे. आमचा ड्रायव्हर रहीम मुस्लिम आहे. तो पण चर्च पहायला आला आहे. आम्हाला चर्च हे फार वेगळे किंवा इतर धर्मियांचे म्हणून त्याज्य वगैरे मुळीच नाही. अनेक धर्मिय लोक चर्चला भेटी द्यायला येतात. त्याची वास्तूकला, पुरातन म्हणून असलेलं महत्त्व जाणायला येत असतात. 

हे ऐकल्यानंतर त्या अमेरिकन माणसानं व्यक्त केलेली भावना मला सर्वाधिक आवडली. तो म्हणाला, अरे व्वा. अमेरिकेमध्ये किंवा पाश्चात्यांमध्ये धर्मावरून जोरदार भांडणं सुरू आहेत. अनेकदा बातम्यांमधून आम्हाला वाटतं, की भारतामध्ये धार्मिक तेढ आणि हिंसाचार जोरदार आहे. पण इथलं प्रत्यक्ष चित्र तर बरंच वेगळं आहे. चर्चमध्ये मला तीन धर्मांचे तीन लोक भेटतात, ही आनंदाची गोष्ट आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये असलेल्या चित्रापेक्षा भारत खरेखुरेच वेगळा आहे.

बास्स... आणखी काय पाहिजे. 

Saturday, December 14, 2013

केरळ ट्रीपमधील संस्मरणीय

मला भेटलेली माणसं…

कोणत्याही ट्रीपवर, दौऱ्यावर किंवा फिरायला गेल्यानंतर तिथं भेटणारी माणसं हा माझ्यासाठी नेहमीच जिव्हाळ्याचा विषय असतो. प्रवासात आपले सहप्रवासी कोणकोण असतील किंवा एखाद्या ठिकाणी पोहोचल्यानंतर तिथं अनपेक्षितपणे कोण भेटेल, ड्रायव्हर वगैरे कसा असेल याबाबत काहीच सांगता येऊ शकत नाही. त्यामुळंच वेगवेगळ्या शहरांमध्ये गेल्यानंतर तिथं भेटणारी दिसायला अगदी साधी किंवा सामान्य माणसंही कायम आपल्या लक्षात राहतात. केरळमध्ये असतानाही अशीच काही माणसं भेटली… स्वतंत्र ठसा निर्माण करणारी...

पी. सदशिवन… आंध्रातील जज्ज

जयंती जनता एक्स्प्रेस रायचूर स्टेशनात पहाटे पाच पन्नासला पोहोचली. तेव्हा आमच्या समोरच्या सीटवर एक दाम्प्त्य समोरच्या सीटवर येऊन स्थानापन्न झालं. साधारण पन्नास ते पंचावन्न या वयोगटातले असावेत. कोणत्याही दाक्षिणात्या चित्रपटांत हिरो किंवा हिरोईनचे वडील म्हणून शोभलेले असते, असं त्यांचं व्यक्तिमत्त्व. आल्या आल्या त्यांनी पहिलं काम केलं म्हणजे ताबडतोब झोपले. चार तास झोपल्यानंतर नऊसाडेनऊच्या सुमारास दोघेही उठले. दोघांपैकी नवरोबा पहिल्यांदा उठले, फ्रेश होऊन त्यांनी नाश्त्याचा मोठ्ठा डब्बा उघडला. त्यामध्ये हात घालून मूठभर ‘टॅमरिंड राइस’ बाहेर काढून प्लेटमध्ये ठेवला. नंतर थोडे तळलेले दाणे घेतले आणि भाताच्या बाजूला ठेवले. आता हे महाशय स्वतः हा भात खाणार, असं मला वाटलं. पण त्यांनी बायकोला अगदी प्रेमानं हाक मारून उठविलं. मॅडम फ्रेश होऊन आल्यानंतर त्यांनी आधी त्यांना डिश दिली आणि मग पुन्हा एकदा डब्ब्यात हात घालून ‘टॅमरिंड राइस’ प्लेटमध्ये ठेवण्याचा प्रयोग आम्हाला पहायला मिळाला. मॅडमनी सुरुवात केल्यानंतर या महाशयांनी नाश्त्याला सुरुवात केली. 
प्रवासात शेवटपर्यंत ते आमच्याबरोबरच होते आणि प्रत्येकवेळी त्यांच्या या स्त्रीसौजन्याचं दर्शन आम्हाला घडत होतं. नाश्त्यानंतर जेवण, दुपारचा चहा वगैरे अशा अनेक प्रसंगांमधून हेच दिसलं. नवरा बायकोच्या नात्यामध्ये नव्वद टक्के वेळा बरोब्बर उलटं दृष्य पहायला मिळतं. इथं मात्र, परिस्थिती वेगळी होती. तिरुपतीला सदाशिवन यांचा सख्खा छोटा भाऊ रात्रीचं जेवण घेऊन आला होता. आमच्याकडचे पदार्थ आणि सदाशिवन यांच्या भावाच्या घरचं जेवण झाल्यानंतर संध्याकाळी हळूहळू गप्पांमध्ये रंगत आली. ते कोट्टायमला उतरणार होते. नंतर शबरीमला मंदिरात जाणार होते. 

गप्पांमध्ये त्यांच्याबद्दल एकेक गोष्ट समजत गेली. सदाशिवन हे आंध्र प्रदेशाताली मेहबूबनगरच्या ‘डिस्ट्रीक्ट अॅण्ड सेशन्स’ कोर्टातील जज्ज म्हणजेच न्यायाधीश होते. ते ऐकून मला खरं तर धक्काच बसला. वास्तविक पाहता, न्यायाधीश असल्याचा उगाचच रुबाब दाखविणं किंवा वागणुकीत फरक असणं, असं काहीच जाणवत नव्हतं. मुळातून लाख ते सव्वालाख रुपये महिना पगार (त्यांनी स्वतःच सांगितलेल्या माहितीनुसार) असलेला न्यायाधीश स्लीपर क्लासने प्रवास करतो, हेच आश्चर्यकारक होते. त्यातून त्यांची अत्यंत साधी राहणी, विनम्र आणि सौजन्यशील वर्तणूक ते न्यायाधीश असल्याचं कुठही जाणवू देत नव्हती. 
सुरुवातीला स्वतःची ही आयडेंटिटी लपवून ठेवणारे सदाशिवन अंकल नंतर मात्र भलतेच खुलले. ‘खरं तर मला लेमन राईस आवडतो. पण आमच्या हिला टॅमरिंड राइस आवडतो. पण मी न्यायाधीश असलो तरी घरी माझं काही चालत नाही,’ असे हलकेफुलके विनोद करून वातावरणात रंग भरत होते. न्याय व्यवस्थेतील भ्रष्टाचार, न्यायदानाचे कार्य आणि राजकारणी, भ्रष्ट राजकारणी, न्यायाधीशांना असलेले अधिकार आणि त्यांच्यावर असलेली बंधने अशा विषयांवर भरभरून बोलत होते. अर्थात, मी पत्रकार आहे, हे समजल्यानंतरच ते अधिक खुलले. ‘मी आतापर्यंत चार जणांना फाशीची शिक्षा सुनाविली आहे…’ असं ते अगदी अभिमानानं सांगत होते. याच पदावरून मी निवृत्त होणार. आता मला प्रमोशन मिळणार नाही, असंही सांगत होते.
सदाशिवन यांची दोन्ही मुलं पुण्यामध्ये आयटी कंपन्यांमध्ये नोकरीला होती. त्यामुळं ते पुण्यामध्ये चार-पाच वेळा येऊन गेले होते. आता त्यांची दोन्ही मुलं पुण्यात नाहीत. त्यामुळं खास आमच्याकडे पुण्याला या, हे आमचं निमंत्रण त्यांनी मान्य केलं. पहाटे चार वाजता आम्ही त्यांना अलविदा करून एर्नाकुलम टाऊन स्टेशनला उतरलो. रेल्वेप्रवासात अचानकपणे एका न्यायाधीशाची झालेली भेट चांगलीच पर्वणी ठरली.

रहीमचाचा… आमचा ड्रायव्हर

केरळमध्ये उतरल्यापासून ते जवळपास निम्म्या ट्रीपपर्यंत ड्रायव्हर कम गाईड असलेले रहीमचाचा आमचे मित्रच बनले. संपूर्ण केरळसह मुंबई आणि दुबईमध्ये ड्रायव्हर म्हणून काम केलेल्या रहीम यांनी आमची केरळ ट्रीप अधिक संस्मरणीय बनविली. मुंबईत जवळपास चार ते पाच वर्षे आणि दुबईमध्ये दहा वर्षे त्यांनी ड्रायव्हिंग केले होते. त्यामुळे मल्याळी, तमिळ, अरबी, बऱ्यापैकी चांगलं हिंदी आणि अगदी तोडकं मोडकं इंग्रजी अशा भाषा त्यांना अवगत होत्या. त्याचा आम्हाला पुरेपूर उपयोग झाला. दुबईत काम करून वैतागल्यानंतर ते केरळमध्ये परतले आणि जोबी नावाच्या माणसाच्या टूरिस्ट कंपनीत ड्रायव्हर म्हणून लागले. त्याच्याकडील साठ गाड्यांवर असलेल्या एका ड्रायव्हरपैकी एक रहीमचाचा. मात्र, अनेक भाषा ज्ञात असल्यामुळे उत्तरेतून येणाऱ्या पर्यटकांसाठी जोबी यांची पसंती रहीम यांना असते.

त्रिशूर जिल्ह्यातील कोडुन्गल्लूर हे त्यांचं गाव. रहीम यांचा इतिहासही एकदम रंजक. त्यांनी पत्नी हिंदू. खूप वर्षांपूर्वी त्यांनी घरच्यांच्या विरोधात जाऊन जवळच राहणाऱ्या हिंदू मुलीशी लग्न केलं होतं. लग्नानंतर रहीम यांच्या भावाबहिणींसह इतर नातेवाईकांनी त्यांच्याबरोबरचे संबंध तोडले. त्यामुळे आता मी, माझी बायको आणि मुलं इतकंच माझं कुटुंब आहे, असं ते सांगतात. त्यांचा एक मुलगा उम्मन चंडी यांच्या भावाकडील हत्ती संग्रहालयात माहूत म्हणून काम करतो. त्याचा त्यांना प्रचंड अभिमान. दुसरा मुलगा एका बँकेत रिकव्हरी एजंटचं काम करतो. कोच्चीहून इरिंजालकुडाला जाताना त्यांनी आवर्जून आम्हाला त्यांच्या घरी नेलं. बायकोचं ओळख करून दिली. कोणत्याही हिंदू माणसाचं घर वाटावं, अशीच परिस्थिती. मुरुगन, श्रीकृष्ण आणि अनेक हिंदू देवदेवतांची छायाचित्र घरामध्ये लावलेली. 

रहीम हा एकदम दिलखुलास माणूस. केरळमध्ये अनेक वर्षांपासून ड्रायव्हिंग करीत असल्यामुळे रस्ता न रस्त्याची त्यांना. मुन्नारहून कुमारकमला जाताना एका भन्नाट रस्त्यानं त्यांनी गाडी काढली. वरंध घाटातील हेअरपिन टर्न्सला लाजवतील, अशा वळणावळणाचा रस्ता त्यांनी शोधून काढला. कारण तो शॉर्टकट होता. वास्तविक पाहता, केरळमधील टूरिस्ट कंपन्यांचे ड्रायव्हर संध्याकाळी सात-आठनंतर ड्रायव्हिंग करीत नाही. मात्र, डाव्यांच्या बंदचा आम्हाला फटका बसू नये, म्हणून रात्री नऊ वाजता आम्ही मुन्नार सोडलं आणि मध्यरात्री दोन वाजता मजल दरमजल करीत कुमारकमच्या रिसॉर्टला पोहोचलो. 

कुठं काय मिळतं, कुठं काय घ्या, कुठं काय घेऊ नका, याचीही त्यांनी बऱ्यापैकी माहिती होती. कोणत्या हॉटेलमध्ये पंजाबी चांगलं मिळतं, त्यांना माहिती होतं. पण आम्हाला त्याची आवश्यकता नव्हती. ऑथेंटिक केरळी फूड कुठं चांगलं मिळतं, इडली डोसा किंवा उकड्या तांदळाचा भात आणि सांबार कुठं मिळेल, अशी आमची फर्माईश असायची. त्याचीही त्यांना माहिती होती. अनेकदा त्यांनी आमच्यासाठी ऑथेंटिक केरळी पद्धतीच्या खाणावळी आणि फूड स्पॉट्स शोधून काढले. रस्त्याने जाताना तिथल्या परिसराची त्यांना माहित असलेली सर्व माहिती ते आमच्याशी शेअर करायचे. शाहरूखच्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’मधील कोणत्या प्रसंगाचं शूटिंग मुन्नारमध्ये झालंय, मोहनलालच्या कोणत्या चित्रपटाचं शूटिंग इथं झालंय, कोच्चीमधील मामुट्टीचं हॉटेल कोणतं वगैरे वगैरे माहिती ते आम्हाला देत असायचे. अनेकदा नको असलेली माहितीही आम्हाला द्यायचे. 
कुमारकममध्ये असताना शेवटच्या दिवशी त्यांनी गळ खरेदी केला आणि सकाळी सकाळी आठ ते दहा मासेच पकडले. त्यांच्या मुलानं शबरीमलाचं व्रत घेतल्यामुळं त्यांच्या घरात मासे तयार होणार नव्हते. त्यामुळं शेजारच्यांना मासे देऊन, त्यांच्याकडेच ते मासे खाणार, असं सांगत होते. मासे बनविण्याची आवड असणारे, क्वचित कधीतरी कोंबडीचं किंवा बदकाचं रक्त पिणारे, निरोप घेतल्यानंतरही केरळ सोडेपर्यंत दोन-तीनवेळा स्वतःहून आम्हाला फोन करून विचारपूस करणारे, पुण्याला तुमच्याकडे जरूर येणार, असं आवर्जून सांगणारे रहीमचाचा उर्फ अन्नन यांनी आमची केरळ ट्रीप अधिक संस्मरणीय केली. त्यामुळं ‍भविष्यात जर केरळला फिरण्यासाठी जाण्याचं तुमचं तुम्ही प्लॅनिंग करणार असाल, तर जरुर संपर्क साधा…

फिलिप जोसेफ… केरळचा शेतकरी

मुन्नारला आम्ही ज्या रिसॉर्टमध्ये रहात होतो, त्या रिसॉर्टमध्ये आम्हाला एक मस्त सिक्युरिटी गार्ड भेटला. आम्ही ‘चेकइन’ करायला जात असताना सवयीप्रमाणे छान हसला आणि आम्हाला सलाम ठोकला. आता वयानं मोठ्या असलेल्या माणसानं असा सलाम वगैरे ठोकला की कसंतरीच वाटतं. त्यामुळं जेवण करून आल्यानंतर त्याच्याशी गप्पा माराव्यात असा विचार करून आम्ही जेवायला गेलो. केरळी जेवण मिळणारी सर्व हॉटेल्स बंद झाल्यामुळं मग राजस्थानी भोजनालयात जेवण केलं आणि आम्ही रिसॉर्टमध्ये परतलो. परतताना आम्ही त्या सिक्युरिटी गार्डला गाठलं आणि त्याच्याशी सहजपणे बोलायला सुरुवात केली.

नाव फिलिप जोसेफ. अर्थात, आम्हाला ते खूप उशीरा कळलं. वय साधारण पन्नास असावं. मूळ गाव इडुक्की जिल्ह्यातलं कोणतं तरी छोटं गाव. म्हणजे आम्ही रहात होतो, तिथपासून साधारण चाळीस-पन्नास किलोमीटरवर त्यांचं गाव. गेल्या सात-आठ वर्षांपासून ते तिथं सिक्युरिटी गार्डमधून काम करत होते. गप्पा रंगत गेल्या तसे ते हळूहळू खुलत गेले. बायको आणि दोन मुलं असं त्यांचं चौकोनी कुटुंब होतं. सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करताना त्यांना साडेबारा हजारच्या आसपास पगार मिळत होता. मुळात, दरमहिना ठराविक उत्पन्न मिळावं, म्हणून ते नोकरी करीत होता. त्यांचा मूळ व्यवसाय होता शेती. 
एका इंग्रजी शब्दाला दहा-पंधरा मल्याळी शब्दांची जोड आणि हातवारे अशा पद्धतीनं आमचा संवाद सुरू होता. त्यांची मिरी, वेलची आणि भाताची शेती होती. तीन ते चार एकर असावी. त्यातून त्यांना वर्षाला साधारण आठ लाख रुपयांचं उत्पन्न मिळायचं. अर्थात, हवामान, थंडी आणि इतर गोष्टी अनुकूल असतील तरच. अन्यथा काहीही पदरात पडत नाही. त्यामुळंच मी हक्काच्या पगारासाठी नोकरी करतो, असं ते सांगत होतं. तिथल्या जमिनीचा भाव होता. एक एकरला एक कोटी रुपयांच्या आसपास. म्हणजे कोट्याधीश माणूस सिक्युरिटी गार्डचं काम करीत होता. 

बारावीनंतर दोन वर्षे कॉलेज करून ‘प्री डिग्री’ मिळविल्यानंतर त्याचं शिक्षण सुटलं. अर्थात, स्वतःचं शिक्षण सुटलं असलं तरी त्याची मुलं चांगली शिकत होती. एक मुलगा चांगल्या मार्कांनी ‘सीए’च्या इंटरमध्ये उत्तीर्ण झाला होता. पुढील दोन वर्षांत तो हमखास सीए होईल आणि त्यानंतर मग मी ही नोकरी करणार नाही, असं तो अगदी आनंदानं सांगत होता. खरं तर आताच तुम्ही नोकरी सोडा आणि आराम करा, ही त्याच्या मुलाची आग्रहाची मागणी होती. हे सांगताना त्याच्या चेहऱ्यावर आनंदाच्या जोडीला अभिमानही तरळत होता. मात्र, त्याला नोकरी लागल्याशिवाय मी नोकरी सोडून काय करू, असं याचं म्हणणं.

कस्तुरीरंगन अहवाल मंजूर व्हायला नको, या डाव्यांच्या मागणीला त्यांचा पाठिंबा होता. मात्र, त्यांच्या हरताळला (बंद) फिलिपचा विरोध होता. डाव्यांच्या बंदचा आता आम्हाला वैताग आलाय. रोज उठतं आणि कोणतरी बंद पुकारतं. खरं तर काँग्रेस आणि डावे या दोघांनाही मी वैतागलोय… यावेळी ओन्ली बीजेपी. ओन्ली मोदी. त्याचं हे वाक्य ऐकल्यानंतर मी पडायचाच बाकी राहिलो होतो. केरळमधल्या कोणत्या तरी खेड्यात राहणाऱ्या एका व्यक्तीला मोदी हा पर्याय वाटत होता, हे ऐकून मी चक्रावूनच गेलो. ‘मी ख्रिश्चन आहे. दररोज प्रार्थना करतो. आम्ही चौघंही दर रविवारी नियमितपणे चर्चला जातो. गॉडवर आमचा विश्वास आहे. आम्ही टीव्ही पाहत नाही, सिनेमा बघत नाही. फक्त देवाधर्माचं करतो, आमची नेहमीची काम करतो आणि पेपर वाचतो…’ असं ते सांगत होतं. मात्र, मी ख्रिश्चन आणि मोदी कडवा हिंदू असूनही मी मोदींनाच मत देणार, असं फिलिप जोसेफ ठासून सांगत होते. तीनतीनदा सांगत होते. केरळमध्ये भाजपची एकही जागा येणार नाही, हे सांगायला राजकीय विश्लेषकाची गरज नाही. पण तरीही वृत्तपत्रातून जे काही येत होतं, त्यामुळं त्याचं मत बनत चाललं होतं. मोदींचा नावाचा करिष्मा त्याच्यापर्यंत पोहोचल्याचं पाहून मला धक्काच बसला होता.

मग मी काय करतो, माझं काय काम असतं, कुठं राहतो, मुंबई-पुणं कसं आहे वगैरे माहिती त्यानं जाणून घेतली. पत्रकार आहे, म्हटल्यानंतर त्याची कळी आणखीन खुलली आणि तो अधिक भरभरून बोलू लागला. शेवटी ‘गॉस ब्लेस यू…’ असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आणि मग आम्ही निरोप घेतला. पुढच्या वेळी याल तेव्हा माझ्या घरी नक्की या… असं आमंत्रण त्यानं दिलं. नुसतं कोरडं आश्वासन नाही, तर स्वतःचा नंबर आणि पत्ताही लिहून दिला. जरुर या, जरुर या असं तीन चारदा सांगितल्यानंतर मग आम्ही तिथून गेलो. पुढचे दोन दिवस त्याची ड्युटी दुसरीकडे कुठंतरी असावी. कारण नंतर तो आम्हाला भेटला नाही.

पत्रकार मित्र… सानील शा

गुवाहाटीमध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत केरळच्या अनेक पत्रकारांची ओळख झाली होती. त्यापैकी एकाशी चांगली ओळख झाली आणि नंतर त्याचं रुपांतर आमच्या मैत्रीमध्ये झालं. अधूनमधून ईमेल किंवा फोन, एसएमएस अशा स्वरुपात आमचा संपर्क सुरू होता. केरळमध्ये जाताना त्याच्याशी चर्चा करूनच मी प्लॅनिंग केलं होतं. त्यामुळं तिरुवनंतपुरम आमच्या प्लॅनिंगमध्ये नसतानाही खास त्याला भेटण्यासाठी सहा तास विनाआरक्षण प्रवास करून तिथं गेलो. ज्याच्यासाठी त्याचं नाव मित्र सानील शा.
सानील हा एकदम मनमौजी. हाडाचा पत्रकार. हाडाचा स्पोर्ट्स रिपोर्टर. केरळा कौमुदी आणि रिपोर्टर टीव्ही अशा केरळमधील दोन प्रथितयश माध्यमांमध्ये काम केल्यानंतर सध्या त्यानं पार्टनरशिपमध्ये न्यूज वेबसाईट सुरू केलीय. वायगान्यूज त्याचं नाव. तमिळनाडूतील एका नदीचं नाव वायगा आहे. वेबसाईटचा आर्थिक दाता हा तमिळनाडूतील असल्यामुळं वेबसाईटचं नाव वायगा न्यूज असं ठेवण्यात आलंय. 
सानीलचं वय तीस ते बत्तीस. मूळचा तो कोच्चीचा. पण नोकरी आणि शिक्षणासाठी तिरुवनंतपुरममध्ये राहतो. नोकरी तर आहेच. पण सध्यात तो विद्यापीठात एम. ए. फिलॉसॉफी (तत्वज्ञान) करतोय. त्यामुळं तिरुवनंतपुरम स्टेशनवरून आम्ही थेट त्याच्या हॉस्टेलवर गेलो. चार तास हॉस्टेल लाइफचा अनुभव घेतल्यानंतर मग आम्ही शहर फिरण्यासाठी बाहेर पडलो. क्रीडा, राजकारण, धर्म, संस्कृती आणि अशा अनेक गोष्टींचा सानीलचा चांगला अभ्यास आहे. अनेक बारीकसारीक गोष्टी त्याला माहिती आहेत. म्हणजे केरळमधील ख्रिश्चन मंडळींचे वेगवेगळे प्रकार, त्यांच्या चालीरिती, मुस्लिम मंडळींमधील भेदाभेद, हिंदू धर्मातील प्रथापरंपरा, केरळमधील राजकारण अशा गोष्टींची अचूक माहिती त्याला आहे. खाद्यपदार्थ कसे तयार करतात किंवा केरळमध्ये कशा पद्धतीनं पदार्थांमध्ये थोडे थोडे बदल होतात, हे देखील त्यानं मस्त समजावून सांगितलं. अनेक प्रश्नांची नि कोड्यांची उत्तरं मला त्याच्याकडून मिळाली. 


पत्रकार हा तटस्थपणे काम करणारा असला पाहिजे, हे जरी खरं असलं तरीही पत्रकाराला स्वतःचा एक विचार असतो. तसाच सानीललाही त्याचा विचार आहे. तो पूर्णपणे कट्टर डाव्या विचारांचा नसला तरीही डाव्या विचारांना अनुकूल आहे. त्यामुळं त्याच्याशी चर्चा करून डाव्या मंडळींच्या गोष्टी जाणून घेणं हा माझ्यासाठी वेगळा अनुभव ठरला. तुमच्याकडे संघाच्या शाखांवर शस्त्रास्त्रांचं प्रशिक्षण देत नसतील, पण इथं प्रत्येक शाखेवर शस्त्र चालविण्याचं प्रशिक्षण मिळतं. त्यामुळंच मग ते डाव्या कार्यकर्त्यांवर हल्ले वगैरे करतात, असं तो मला सांगत होता. काँग्रेसनं भरविलेल्या पुस्तक प्रदर्शनातील भाषणाला अवघे सहा लोक होते. त्याचा दाखला देत तो म्हणाला, हेच भाषण जर डाव्यांच्या पुस्तक प्रदर्शनात असतं तर आपल्याला पाय ठेवायला जागा मिळाली नसती. त्याची डावी बाजू मला हळूहळू समजू लागली होती. मधूनच त्यानं मला विचारून घेतलं, की तू संघ विचारांचा आहेस ना. मी संघवाला आहे, हे त्यानं ठरवूनच टाकलं होतं. त्यामुळं माझ्याकडून हो किंवा नाही, या उत्तराची त्याला अपेक्षाच नव्हती.

वायगान्यूज मधून त्याला तूर्त तरी विशेष आर्थिक उत्पन्न मिळत नसलं तरी त्याचे ८० हजार ते एक लाख हिट्स त्याला दिवसाला मिळत आहेत. केरळप्रमाणेच आखाती देशांमधूनही त्याला चांगल्या हिट्स मिळताहेत. त्यामुळे आज ना उद्या ही वेबसाईट हिट होणार, अशा विश्वासावर त्याची वाटचाल सुरू आहे. केरळमध्ये रिपोर्टर, काही नवशिके पत्रकार आणि काही कॉलम रायटर्स यांच्या जोरावर तो गाडा ओढतोय. त्याच्या या धाडसाचं खरं तर मला कौतुक वाटलं. नेहमीची रुळलेली वाट सोडून वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय, याचा आनंद वाटला. आता त्यांनी तिरुवनंतपुरममध्ये छोटेखानी ऑफिसही घेतलंय आणि जोरदार मार्केटिंगही सुरू केलंय.

मलबारी बिर्याणी, पुट्टं आणि सुलेमानी चहा या पदार्थांचा स्वाद त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं कळला. भरपूर गप्पा झाल्या. महाराष्ट्राच्या राजकारणापासून ते केरळमधील संघाच्या कामापर्यंत अनेक गोष्टींवर. सकाळच्या नाश्त्यापासून दुसऱ्या दिवशी पहाटेच्या चहापर्यंतचा वेळ कसा गेला कळलंही नाही. शेवटी त्याला अलविदा केला आणि पहाटे साडेपाचला तिरुवनंतपुरम सोडलं. 

केरळमध्ये खूप फिरलो, खूप काही पाहिलं, खूप काही खाल्लं, खूप काही कॅमेरात साठवलं. तसंच खूप काही मनातही साठवलं. कायम लक्षात राहतील, असे हे चार चेहरे त्यापैकीच.

भोपाळ पार्ट टू... लक्षात राहिलेली माणसं...

तमिळनाडूचे चार प्रतिनिधी
http://ashishchandorkar.blogspot.in/2011/04/blog-post_21.html

पाच वर्षांनंतर... पुन्हा एकदा हैदराबाद 

http://ashishchandorkar.blogspot.in/2012/09/normal-0-false-false-false-en-in-x-none.html

Tuesday, December 03, 2013

देवभूमीतील खाद्ययात्रा...

कप्प ते पुट्ट व्हाया अप्प... 
पुण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या ओणम् फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाल्यापासूनच केरळबद्दल आणि केरळी खाद्यपदार्थांबद्दलचं आकर्षण वाढलं होतं. कदाचित त्यातूनच केरळची सफर करण्याचा आणि तिथल्या ऑथेंटिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याचा विचार माझ्या मनात पक्का होत गेला. केरळमध्ये पोहोचलो आणि अगदी दहा-बारा दिवस मस्त एन्जॉय केलं. ‘when in Rome, do as the Romans do’ या आंग्ल भाषेतील म्हणीनुसार केरळचाच होऊन एन्जॉय केलं. नारळाच्या तेलात तयार केलेले पदार्थही खाल्ले. त्या तेलाचा अजिबात वेगळा स्वाद किंवा चव लागली नाही. अनेकदा तर ते पदार्थ नारळाच्या तेलात तयार केले आहेत, हे आम्हाला माहितीही नव्हतं.


केरळच्या सफरीवर असतानाच तीन-चार ब्लॉग लिहिण्याचं निश्चित केलं होतं. अर्थातच, त्याची सुरुवात ऑथेंटिक केरळी खाद्यसफरीने…

कप्प अर्थात साबुकंद... 
केरळमध्ये पोहोचताच आमच्या उदरात गेलेला पहिला अस्सल केरळी पदार्थ म्हणजे ‘कप्प.’ माधव गाडगीळ आणि कस्तुरीरंगन यांनी पश्चिम घाटासंदर्भातील अहवालांना विरोध करण्यासाठी डाव्यांनी पुकारलेल्या बंदमुळे आम्हाला हा पदार्थ खाण्याची संधी मिळाली. अर्थात, त्यासाठी आमचे चार-पाच तास नाहक वाया गेले, हा भाग वेगळा. (त्यासंदर्भातील ब्लॉग लवकरच येत आहे.) ‘कप्प’ म्हणजे साबुदाण्याच्या झाडाचे कंदमूळ. दिसायला आणि चवीलाही रताळ्यासारखेच. मराठीत त्याला साबुकंद, हिंदीमध्ये कदाचित शक्करकंद म्हणतात. केरळच्या उत्तर भागात पुला, तेलुगूमध्ये कारपेंडलम किंवा कंद, तमिळमध्ये किलांगू, ईशान्य भारतात त्याला कुरी आलू किंवा वूड पोटॅटो आणि इंग्रजीमध्ये टॅपिओका असं म्हटलं जातं.
 
केरळमध्ये कप्पपासून वेफर्स, केक, पुडिंग, बिर्याणी, मटण आणि फिश करी वगैरे केलं जातं. आम्हाला मात्र, उकडलेल्या कप्पवरच भूक भागवावी लागली. लांबच लांब कप्प पाण्यात घालून उकडून घेतलं जातं. नंतर त्याची सालं काढली जातात. काहीवेळा चवीसाठी हळद आणि मीठ घालून ते उकडलं जातं. आमच्यासमोरही पातेल्यामध्ये अशीच नुसती उकडलेली गर्रमागर्रम कप्प आली आणि सोबत एका डिशमध्ये तेलामध्ये कालवलेलं तिखट. कप्पचे तुकडे या तेलात घोळविलेल्या तिखट चटणीबरोबर खाल्ले जातात. कडकडीत भूक लागल्यामुळं कप्पवर आमच्या आणि डाव्या कार्यकर्त्यांच्या धपाधप उड्या पडल्या आणि पाहता पाहता पातेलं रिकामं झालं.

केरळची ट्रीप अंतिम टप्प्यात असताना तिरुवनंतपुरममधील शंखमुगम बीचवर गेलो होतो. तिथं या कप्पपासून बनविलेले वेफर्स खाल्ले. कप्पच्या उभ्या स्लाइस करून त्या तळून घेतल्या जातात. नंतर मग त्यावर तिखट-मीठ आणि मसाला लावून पेश केलं जातं. 

डोशाचा भाऊ अप्पम... 
अप्पम (अप्प) म्हणजे डोशाचा छोटा भाऊ. त्याचं ऑथेंटिक नाव म्हणजे वेळीअप्पम. तांदळाचं पीठ आंबवून अप्पम तयार करतात. खोलगट तव्यामध्ये किंवा कढईमध्ये हे अप्पम तयार केलं जातं. त्यामुळं ते गोल असलं तरी त्याचा मध्यभाग जाडसर असतो. डोंबिवलीमध्ये रस्त्यारस्त्यांवर अप्पम मिळतं. पुण्यातही मोजक्या रेस्तराँमध्ये अप्पम सर्व्ह केलं जातं.
 
अप्पम हे डोशासारखं ते खोबऱ्याची किंवा टोमॅटोची चटणी नि सांबार यांच्यासोबत ते खाल्लं जात नाही. ते खाल्लं जातं ते वाटाण्याची उसळ किंवा नारळाच्या साखर घातलेल्या दुधासोबत. म्हणजे चटणी-सांबार समवेत खाल्लं तरी बिघडत काहीच नाही. मात्र, त्याची खरी चव कळते ती उसळ किंवा नारळाच्या दुधासमवेत. आम्ही हे अप्पम खाल्लं ते मुन्नारच्या मार्केटमधील ‘सर्वना भवन’ इथं. ऑथेंटिक मल्याळी फूड मिळणारं रेस्तराँ. इडली डोशापासून वेळीअप्पम आणि इडिअप्पमपर्यंत सर्व काही केळीच्या पानावर. बोले तो एकदम ऑथेंटिक. ‘सर्वना’मध्ये गर्रमागर्रम अप्पम आणि चटणी-सांबारचा मनमुराद आनंद लुटल्यानंतर मग आमची स्वारी पुढील कार्यक्रमासाठी रवाना झालो. अनेकदा अप्पम गरम मिळेलच असं नाही. कारण हे अप्पम तयार करून ठेवतात आणि लागेल तेव्हा सब्जी, उसळ किंवा चिकनबरोबर देतात. मात्र, ‘सर्वना’मध्ये आम्हाला सक्काळी सक्काळी मस्त अप्पम खाण्याची संधी मिळाली.

दुर्दैवाने आम्ही गेलो तेव्हा इडिअप्पम नव्हतं. इडिअप्पम म्हणजे तांदळाच्या पिठापासून तयार केलेल्या शेवया. मीठ, तूप घालून तांदळाचं पीठ भिजवलं जातं. मग त्यापासून केळीच्या पानावर किंवा थेट इडलीपात्रात वर्तुळाकारात शेवया घातल्या जातात. मग त्या शिजवून सर्व्ह केल्या जातात. शक्यतो झणझणीत करी किंवा वाटाण्याच्या उसळीबरोबर इडिअप्पम खाल्लं जातं. अगदी लवकर रेस्तराँमध्ये गेलं तरच हे इडिअप्पम मिळतं. त्यामुळंच ते आम्हाला मिळालं नाही, असा आमचा अनुभव. काही जण इडिअप्पम गव्हाच्या पिठापासूनही तयार करतात.

पळमपुरी किंवा केळ्याची भजी…
केरळमध्ये जागोजागी गाड्यांवर मिळणारे पदार्थ म्हणजे केळ्याची भज्जी आणि मिरची भज्जी. पैकी मिरची भज्जी ही महाराष्ट्रासह, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूमध्येही मिळते. कदाचित भारताच्या इतर भागातही. पण पळमपुरी म्हणजे केळ्याची भज्जी ही फक्त केरळची खासियत. मुळात केरळमध्ये आठ ते दहा प्रकारची केळी मिळतात. त्यांची नावही वैविध्यपूर्ण. पूव्वन, रेड पूव्वन, नेई पूव्वन, कण्णन, रोबस्ट, कर्पूरवल्ली, वेलची आणि अशी बरीच. त्यापैकी साध्या पिकलेल्या पूव्वनपासून तयार केलेली पळमपुरी आम्ही खाल्ली. मैदा कालवून त्यामध्ये पिकलेल्या केळ्याचे उभे काप सोडले जातात आणि त्यापासून पळमपुरी तयार केली जाते. गोड भज्जीची टेस्ट एकदम हटके लागते. क्वचित कधीतरी खाण्यासाठी एकदम भारी पर्याय. 
मुन्नारपासून जवळच असलेल्या मेटुपट्टी डॅमच्या परिसरात खाद्यपदार्थांच्या अनेक स्टॉलपैकी एकावर आम्ही कच्च्या केळ्यापासून तयार केलेली भज्जी खाल्ली. कच्ची केळी गोड नसली तरी कालविलेल्या मैद्यामध्ये भरपूर साखर घालून ते पीठ चवीला गोड करण्यात आलं होतं. शिवाय त्यामध्ये हळद किंवा रंग यापैकी एक काहीतरी टाकलं होतं. ही भज्जी दिली ती तेलामध्ये कालविलेल्या तिखटासोबत. 

कांद्याचा वडा
त्रिशूर जिल्ह्यातील इरिंजालकुडा इथं खाल्लेला आणखी एक वेगळाच पदार्थ म्हणजे कांद्याचा वडा. खेकडा भजीसाठी कापतात तसा उभा कांदा कापून घेतात. बेसन आणि मैद्याच्या पिठामध्ये कांदा मिक्स करतात. मेदूवड्याच्या आकारात हे वडे तेलात सोडून तळले जातात. कांदा आणि टोमॅटोच्या चटणीसोबत हा वडा खाल्ला जातो. तळल्यामुळे कांदा खुसखुशीत लागत असला तरीही डाळीच्या पिठाचा वापर अंमळ अधिकच असल्यामुळे ओनियन वड्याला म्हणावी तशी गंमत येत नाही.

सुलेमानी चहा
डाव्यांच्या बंदच्या हाकेमुळे मुन्नार ते कुमारकम हा प्रवास भररात्री करावा लागला. आमचा ड्रायव्हर रहीमनं नेहमीच्या हमरस्त्यापेक्षा वेगळाच कोणता तरी मार्ग शोधून काढला. जेणेकरून आम्ही लवकर पोहोचू. या प्रवासादरम्यान, आम्ही टेस्ट केला सुलेमानी चहा. नेहमीचीच चहा पत्ती असलेला मात्र, दूध नसलेला चहा म्हणजे सुलेमानी चहा. चहापत्ती नेहमी उकळतो त्यापेक्षा थोडी कमी उकळायची. साखर मात्र, नेहमीपेक्षा अंमळ अधिकच. त्यात लवंग आणि दालचिनी किंवा त्यांची पावडर टाकायची. लिंबू असल्यास उत्तम. नसले तरी फरक पडत नाही. असा हा उकळता सुलेमानी चहा नेहमीच्या चहाच्या तोंडात मारेल, या दर्जाचा झाल्यास आश्चर्य वाटायला नको. पुढे तिरुवनंतपुरममध्ये सानिल शा या आमच्या मित्राच्या ऑफिसमध्येही तीन-चार वेळा सुलेमानी चहाचे प्राशन झाले. सानिलच्या ‘वायगा न्यूज’च्या कार्यालयातील सहकारी असगर याने केलेला चहा मुन्नारहून निघालेल्या चहापेक्षा अधिक भारी.

मासे आणि फक्त मासे…
तुम्ही मासे खाता आणि केरळमध्ये जाऊन मासे न खाता परत आलात तर मग तुमच्या करंटेपणाला तोड नाही. आम्हाला हा करंटेपणा करायचा नसल्यामुळे मत्स्याहाराला आम्ही आपलंसं केलं. पॉम्र्फेट, सुरमई, हलवा आणि बांगडा हे आपल्या इथंही मिळणारे मासे खाणं आम्ही मुद्दाम टाळलं. केरळमध्ये लोकप्रिय असलेल्या माशांचा फडशा पाडला. त्यात सर्वाधिक भर होता तो ब्लॅक फिश (ब्लॅक पॉम्फ्रेट), मत्थी (किंवा च्छाळा) आणि वेळुरी या माशांचा. कोकणात किंवा गोव्यामध्ये मिळणाऱ्या फिशपेक्षा केरळात फिश तयार करताना मसाल्यांचा वापर थोडासा अधिक सढळपणे केला जातो. केरळमध्ये नारळ बक्कळ असूनही आम्ही खाल्लेल्या फिशकरीमध्ये नारळ नव्हताच. 


मसाले, तिखट आणि चिंचेचा कोळ यांच्या मिश्रणाचं मॅरिनेशन केलेले फिश आणि तर्रीदार आंबट-तिखट करी. एरवी मिळते त्या तुलनेत फिशकरी बरीचशी पातळ. कारण त्यामध्ये खोवलेलं खोबरं किंवा नारळाचं दूध वगैरे काहीच घातलेलं नाही. अर्थात, नारळाचं उत्पादन बरंच असूनही फिशकरीत नारळ न घालण्याची पद्धत उत्तर आणि मध्य केरळमध्ये बऱ्याच ठिकाणी आढळते. अर्थात, कोल्लम आणि तिरुवनंतपुरम जिल्ह्यामध्ये मात्र, फिशकरीमध्ये नारळाचा वापर पुरेपूर होताना दिसतो. त्यामुळं तिथली फिशकरी पिवळसर किंवा पांढरट रंगाची. बाकी केरळमध्ये मात्र, लालभडक फिशकरी. अर्थात, रंगानं लालभडक असली तरी चवीला मात्र, तेवढी तिखट नाही. कारण चिंचेचा कोळ तिखटपणा कमी करण्याचं काम करतो.

आम्ही खाल्लेला मत्थी (च्छाळा) किंवा वेळुरी मासा म्हणजे मोठ्य़ा आकारातील मांदेलीच. त्यामुळं काटे वगैरे असले तरी ते काढायला अगदी सोप्पे. वेळप्रसंगी एखादा बारीक काटा पोटात गेला तरी काही बिघडत नाही, अशी परिस्थिती. मत्थी थोडा मोठा आणि वेळुरी त्यापेक्षा थोडा मोठा. दोन्ही म्हणजे अगदी खोबरं. समुद्रातून ताजे काढलेल्या माशांचा ताजेपणा खाताना जाणवण्यासारखा.

व्हिट्टेल वूण… घरचं जेवण
केरळमध्ये आम्हाला सर्वाधिक वेध लागले होते ते केळीच्या पानावर साग्रसंगीत अस्सल केरळी जेवण जेवण्याचे. आम्हाला ती संधी मिळाली कोट्टायममध्ये. कोट्टायममधली दोन जुनी चर्च, एक मशीद आणि बाजार वगैरे हिंडल्यानंतर आम्ही ठरवलं इथं कोणत्या तरी रेस्तराँमध्ये इडली-डोसा खाण्यापेक्षा वाटेत लागणाऱ्या गावांमध्ये कुठंतरी केळीच्या पानावर फक्त भात जेवता आला तर पहावं. आमचा ड्रायव्हर रहीमनं यात आम्हाला मोलाची मदत केली. त्यानंतर इकडून तिकडून गाडी फिरवत शेवटी व्हिट्टे वूण म्हणजेच घरचे जेवण हा बोर्ड शोधून काढलाच.

 
अत्यंत साधी खाणावळ. फक्त तीन टेबलं आणि बारा खुर्च्या. कोकणातलं वाटावं असं उतरत्या छपरांचं घरं. आजूबाजूला केळीची झाडं. घराच्या बाजूला आणखी कसली कसली झाडं. त्याच्या पलिकडे कायल (क्खायल) पाणी. आणि संथपणे वाहणाऱ्या पाण्यात बांधून ठेवलेली छोटीशी होडी. फक्त राईस मिळेल, रोटी किंवा चपाती नाही, असं त्यानं सांगितलं. आम्हाला रोटी-चपाती नकोच आहे, फक्त भात खायचा आहे, असं त्याला सांगितल्यानंतर त्याचा चेहरा खुलला. 

आम्हाला त्यानं हात धुवून घेण्यास सांगितलं. तेवढ्या वेळेत त्यानं केळीची पानं छान टेबलवर ठेवली होती. आणि सर्व पदार्थ वाढण्यासाठी तो सज्ज झाला होता. उकड्या तांदळाचा भात. जाडसर सांबार. आंबटगोड कढी. मिरच्यांची फोडणी दिलेलं ताक. सोबतीला केळफुलाची भाजी आणि खोबरं तसंच लाल मिरच्यांची चटणी. हे कमी म्हणून की काय त्यानं ‘मत्थी’ची फिश करी आणि फ्राय मत्थी फिश आम्हाला सर्व्ह केला. केरळबाहेरून कोणतरी प्रथमच त्याच्याकडे जेवायला आलेलं असावं. म्हणून तो प्रचंड आदरानं आमची सरबराई करत होता. 
केरळी माणसांच्या तुलनेत आमचं भात खाण्याचं प्रमाण अगदीच कमी होतं. त्यामुळं सुरुवातीला तो काहीसा हिरमुसला. जेवण चांगलं नाही किंवा आवडलं नाही, असं त्याला वाटत होतं. मात्र, जेवण एकदम फर्स्ट क्लास आहे, अशी दाद आम्ही ड्रायव्हरच्या माध्यमातून त्याच्यापर्यंत पोहोचवली आणि मग त्याची कळी खुलली. सुरुवातील सांबार भात, मधूनच थोडी कढी. एखादा फिश असं करत करत आमची खाद्ययात्रा सुरू होती. भातही अधून मधून वाढला जात होता. सांबार आणि ताक-कढीची भांडी आमच्या हाताशी असतील, अशा पद्धतीनंच ठेवली होती. 

केळफुलाची पुरेपूर खोबरं घातलेली भाजी आणि खोबरं-मिरचीची सुकी चटणी यांनी आमच्या जेवणाची लज्जत प्रचंड म्हणजे प्रचंड वाढविली. मत्थी फिशकरी आणि फ्राय फिश इतकाच केळफुलाच्या भाजीचा आस्वाद आम्ही घेतला. साधारण तीन ते चारवेळा थोडा थोडा भात घेतल्यानंतर आता थांबण्याचा विचार पक्का झाला. केळीचं पान अगदी स्वच्छ झाल्यानंतर मग आम्ही उठणार एवढ्यात त्यानं आम्हाला ग्लासमधून फ्रेश ताक आणून दिलं. ते घेतलं आणि मग आम्ही उठलो. मोठ्या हॉटेलांमध्ये जेवण्यापेक्षा छान ‘व्हिट्टेल वूण’मध्येच जेवायचं, अशी खूणगाठ मनाशी बांधून आम्ही तिथल्या अंकलचा निरोप घेतला.

केळी आणि पायनापलचं सरबत
तिरुवनंतपुरमच्या पद्मनाभ मंदिराबाहेर आम्ही केळं आणि अननसाच्या सरबताचा आस्वाद घेतला. केळ्याची भाजी, केळ्याची भजी, केळ्याचे वेफर्स असे केळ्याचे विविध पदार्थ खाल्ल्यानंतर आता केळ्याचं सरबतच तेवढं राहिलं होतं. ते देखील आम्ही टेस्ट केलं. तिरुवनंतपुरममधील पत्रकार मित्र सानील शाहनं हे सरबत घेणार का विचारलं. टेस्ट करुन पहायला काय हरकत आहे, असा विचार करून आम्ही ते मागविलं. अगदीच वेगळं आणि अफलातून. कुस्करलेलं केळं पाण्यामध्ये टाकून हे सरबत केल्यासारखं वाटत होतं. म्हणजे केळ-साखरमध्ये पाणी घालून ते सरसरीत केलं तर कसं होईल, साधारण तसंच. पण त्यामध्ये केळ्याचे काप आणि अननसाचे कापही घालण्यात आले होते. शिवाय थोडासा अननसाचा ज्यूसही होता. त्यामुळे त्याला फक्त केळ्याची चव नव्हती, ना फक्त अननसाची. शिवाय चवीला जरा जास्तच गोड. असं हे केळं आणि अननसाचं सरबत एक वेगळीच आठवण देऊन गेलं.

मलबारी चिकन बिर्याणी
तिरुवनंतपुरममध्ये टेस्ट केलेला आणखी एक ऑथेंटिक केरळी पदार्थ म्हणजे मलबारी चिकन बिर्याणी. ही बिर्याणी उकड्या नव्हे तर साध्या तांदळापासूनच तयार होते. हैदराबादमध्ये मिळणाऱ्या बिर्याणीपेक्षा थोडीशी कमी मसालेदार आणि क्वांटिट सुद्धा थोडी कमीच. शिवाय बिर्याणीमधलं चिकन तयार करताना वापरले जाणारे मसाले वेगळे असल्यामुळं त्याचा स्वादही वेगळा लागतो. एका जणामध्ये एक मलबारी चिकन बिर्याण सहज संपते. बाउलमधील बिर्याणीवर पाप्पड्म ठेवून त्यात चमचा खोवून देण्याची पद्धत हे मलबारी बिर्याण सर्व्ह करतानाचं आणखी एक वेगळेपण. चवीला अगदी साधी. जास्त मसाले नाही की जास्त तिखट नाही. त्यामुळं मलबार बिर्याणी इतर बिर्याणींपेक्षा थोडी वेगळीच. 

पुट्ट विथं चिली चिकन (पुट्टू)
केरळच्या सफरीवर असताना खाल्लेला शेवटचा ऑथेंटिक केरळी पदार्थ म्हणेज पुट्ट. स्पेलिंगनुसार उच्चार पुट्टू. पण रुढ उच्चार पुट्ट. तिरुवनंतपुरममधील एका छोटेखानी फूड स्टॉलवर आम्ही पुट्टचा आस्वाद घेतला. बहुतेक वेळा तांदळाचं किंवा क्वचित कधीतरी गव्हाच्या पिठापासून हे पुट्ट तयार करतात. तांदूळ किंवा गव्हाच्या पिठामध्ये अगदी थोडं पाणी टाकून त्या पिठाचे बारीक बारीक गोळे तयार करतात. पोळी किंवा भाकरीसाठी जशी कणीक भिजवितात तसं नाही. भरपूर पिठात अगदी थोडं पाणी टाकून त्यापासून हे छोटे छोटे पिठाचे गोळे तयार होतात. छोट्या बॉल बेअरिंगच्या आकाराइतके. मग पिठाचे छोटे छोटे गोळे एका सिलेंड्रिकल भांड्यात भरतात. थोडे गोळे, मग थोडा खोवलेला नारळ. मग पुन्हा थोडं पीठ मग पुन्हा खोवलेला नारळ असं करून ते भांडं गच्च भरतात. मग हे भाडं वाफेवर ठेवतात. म्हणजे वाफेमुळे आतलं पीठ आणि खोबरं शिजावं आणि थोडंसं एकजीव व्हावं. उकळत्या पाण्यावर साधारण पंधरा-वीस मिनिटं ठेवल्यानंतर आतलं मटेरियल शिजतं आणि पुट्ट खाण्यासाठी तयार होतं. 
मग हे पुट्ट वाटाण्याची किंवा हरभऱ्याची उसळ, चिकन मसाला आणि अंडा मसाला यांच्यासमवेत खाल्लं जातं. पुट्ट घेतल्यानंतर ते लंबवर्तुळाकार असलं तरी हातानं दाबल्यानंतर अगदी सहज फुटतं. मग ग्रेव्ही आणि हे पुट्ट एकत्र करून त्याचा आस्वाद घेतला जातो. आम्ही चिली चिकनबरोबर हे पुट्ट खालं. आमचा मित्र सानील याला वाटाण्याच्या उसळीपेक्षा चिकन खाण्यात अधिक रस होता. त्यामुळं मग मी पण चिली चिकनबरोबरच पुट्ट खाल्लं. 
तिरुवनंतपुरमच्या प्रवासानंतरही इडली, वडा आणि डोसा अशी खाद्ययात्रा सुरू होती. मात्र, ऑथेंटिक केरळी फूडमध्ये खाल्लेला शेवटचा पदार्थ होता पुट्ट. कप्पपासून सुरू झालेल्या केरळमधील खाद्ययात्रेत आमचा भर अप्पम उर्फ अप्पवरच होता. ही अस्सल केरळी खाद्ययात्रा पुट्टपाशी येऊन विसावली.

(केरळच्या प्रवासातील काही अविस्मरणीय प्रसंग आणि संस्मरणीय व्यक्ती यांच्या संदर्भातील ब्लॉग लवकरच…)