
केहवा, नन्द्रू याखनी आणि गुश्ताबा!
सूपऐवजी "केहवा', "स्टार्टर' म्हणून "तबकमाझ' किंवा "नन्द्रू चिप्स', "मेन कोर्स'मध्ये "गुश्ताबा' किंवा "नन्द्रू याखनी'... ही नावे अगदीच अपरिचित वाटत आहेत ना ? वाटणारच ! कारण हे पदार्थ काही सर्रास कुठेही मिळत नाहीत. "भारताच्या नंदनवना'तील हे पदार्थ मिळतात फक्त आर. एल. भट्ट यांच्या "वाज्वान' या काश्मिरी हॉटेलमध्ये!
बाणेर रस्त्यावर "पॅनकार्ड' क्लबकडे जाणारा फाटा सोडला, की थोडेसे पुढे गेलात की आलेच हे "वाझवान'."वाझवान'मध्ये पाऊल ठेवताच काश्मीरमधील "हाऊसबोट'मध्ये प्रवेश केल्यासारखे वाटते. काश्मीरचे पारंपरिक दिवे, "हाऊसबोट'च्या छताला वापरले जाणारे लाकूड (खुतुम्बन) व नक्षीकाम केलेल्या पडद्यांपासून (क्रिवेल) केलेली सजावट, कपाटात ठेवलेल्या तांब्याच्या सुरया ही "वाझवान'ची काही वैशिष्ट्ये! हॉटेलचे आणखी एक वेगळेपण म्हणजे आपण येथे चक्क मांडी घालून पुढ्यातील खाद्यपदार्थांवर आडवा हात मारू शकतो.
"वाझवान'चे दोन-तीन अर्थ आहेत. एक म्हणजे "बल्लवाचार्यांचे हॉटेल', दुसरा ः चांगले रुचकर भोजन व तिसरा अर्थ आहे अत्यंत प्रेमाने होणारा पाहुणचार. या तिन्ही गोष्टींचा प्रत्यय "वाझवान'मध्ये येईल. इथले पदार्थ अगदी वेगळ्या पद्धतीने तयार केलेले. वेगळ्या चवीचे. मसाले अगदीच निराळे. आले, लसणाप्रमाणेच बडीशेप व हिंग यांचा वापर भरपूर. नारळ मात्र नावालाही नाही. शिवाय प्रत्येक पदार्थासाठी वेगळी "ग्रेव्ही' आणि "ऑर्डर' दिल्यानंतरच पदार्थ तयार करण्याची पद्धत. त्यामुळे अगदी ताजा व गरमागरम पदार्थ आपल्याला "सर्व्ह' केला जातो. त्यामुळेच इथे जायचे तर सोबत थोडा निवांतपणा घेऊनच जायला हवे.
इथले "हट के' पदार्थ म्हणजे केशर, बदाम व इतर गोष्टी वापरून तयार केलेला "केहवा' अर्थात काश्मिरी चहा. जेवणापूर्वी अथवा जेवणानंतरही त्याचा स्वाद घेता येतो. कमळाच्या खोडापासून बनविलेली भाजी "नन्द्रू याखनी', कमळाच्या खोडापासून बनविलेले मसालेदार "नन्द्रू चिप्स' आणि खास काश्मिरी "दम आलू.' इथल्या "दम आलू'चे वैशिष्ट्य म्हणजे मसाले व "ग्रेव्ही' फक्त वरवर न राहता थेट आतपर्यंत झिरपलेले असतात.
शाकाहारी खवय्यांप्रमाणेच मांसाहारी खवय्यांसाठीही "वाझवान' ही पर्वणी आहे. काश्मिरी मसाल्यामध्ये मटणाचे तुकडे दोन ते तीन तास घोळवून नंतर "डीप फ्राय' केलेले "तबकमाझ', मटण तब्बल दोन तास "स्मॅश' करून त्यापासून बनविलेले गोळे व दह्यापासून बनविलेली "करी' यांचा सुरेख संगम म्हणजे "गुश्ताबा' आणि दह्याच्या "करी'मध्ये तयार केलेले "मुर्ग याखनी' हे पदार्थ दिलखूष करून टाकणारे आहेत.
आता राहिला "काश्मिरी पुलाव.' सगळीकडे मिळणारी ही "डिश' इथे "स्वीट' आणि "सॉल्टी' अशा दोन प्रकारांमध्ये मिळते. काजू, पिस्ता, अक्रोड, बदाम आणि खजूर यांचा भरपूर वापर करून बनविलेला पुलाव थोडा का होईना खाऊन बघाच...! सर्वात शेवटी रवा, दूध, केशर आणि सुकामेव्यापासून बनविलेला "फिरनी' ही खास काश्मिरी खीर खायला विसरु नका.
"वाज्वान' खुले असण्याची वेळ ः सायंकाळी सात ते रात्री साडेअकरा.
020-27292422