Sunday, September 07, 2014

‘मी-तू’पणाची व्हावी बोळवण…

ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना-भारतीय जनता पार्टीमधील तणातणी ही ठरलेलीच. म्हणजे पाच वर्ष सुखाने संसार करायचा आणि निवडणुकीच्या तोंडावर परस्परांना खिंडीत गाठून आम्हीच कसे मोठे भाऊ, हे सिद्ध करण्यासाठी बाह्या सरसावायच्या. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या एकदम विरुद्ध. ते दोघे पाच वर्ष भांडतात. सत्तेसाठी एकत्र येतात आणि सत्तेवर आल्यावर पुन्हा भांडतात. सध्या निमित्त शहा यांच्या मातोश्री भेटीचे, मुख्यमंत्री कोणाचा? किंवा कोण किती जागा लढविणार, हे असले तरीही मूळ मुद्दे वेगळेच आहेत. त्यांचे समाधान होत नाही तोपर्यंत युतीमधील कुरबुरी सुरूच राहणार. 



सत्ता डोळ्यासमोर दिसू लागल्यामुळे शिवसेना-भाजपामधील वादाने उग्र स्वरुप धारण केले आहे. नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्यामुळे भाजपा नेत्यांच्या मनगटातील बळ शतपटीने वाढले आहे. मोदी यांच्या नावावर विधानसभा निवडणूकही जिंकता येईल आणि भाजपाचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात विराजमान होईल, असे स्वप्न भाजपाच्या अनेक नेत्यांना पडू लागले आहे. ‘केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र’ ही मोहीम त्यामुळेच राबविली जात आहे. भाजपाला सत्तेवर आणण्यासाठी जागा वाढविण्याची ‘संघर्ष यात्रा’ सुरू आहे. कारण आता जितक्या जागा भाजपा लढविते, तितक्याच जागा यंदाही लढविल्यास भाजपाचा मुख्यमंत्री होण्याची शक्यता थोडी कमी आहे.

दुसरीकडे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेनेची शकले होतील, असे भविष्य वर्तविणारी मंडळी तोंडावर आपटली आहेत. उद्धव ठाकरे यांची कार्यशैली नि जबरदस्त संघटनकौशल्य यामुळे शिवसेना अभेद्य राहिली आहे. राज ठाकरे यांना कोंडीत सापडले असून मनसेचा प्रभाव गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भलताच ओसरला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतरही ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. त्यामुळे विधानसभेवर भगवा फडकाविण्याचे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवसैनिक झटून तयारीला लागले आहेत. शिवसैनिकांसाठी ही निवडणूक भावनिक स्वरुपाची आहे. त्यामुळे ‘आमचीच ताकद वाढली किंवा आमच्यामुळे शिवसेनेची ताकद वाढली,’ हा भाजपचा दावा मान्य करायला शिवसेना सहजासहजी तयार नाही. 

शिवसेना-भाजपा युतीमधील संबंध बिघडविण्यास भूतकाळातील इतर अनेक छोटे-मोठे मुद्देही कारणीभूत आहेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने दोनवेळा राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवाराला मतदान न करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचप्रमाणे ‘सामना’च्या अग्रलेखातून नितीन गडकरी आणि भाजपाला अनेकदा डिवचण्यात आले. ‘शहा’णा हो’’ अशी पोस्टरबाजी झाली. अशा सर्व गोष्टींमुळे भाजपाच्या नेत्यांमध्ये शिवसेनेबद्दल प्रचंड खदखद आहे. तेव्हा मोदींची लोकप्रियता नि अमित शहांची आक्रमकता यांचा पुरेपूर उपयोग करून शिवसेनेला कमीत कमी जागांमध्ये रोखण्याचे भाजपाचे डावपेच आहेत.

 

दुसरीकडे भाजपबद्दल शिवसेनेच्या मनात अनेक गोष्टींचा सल आहे. एकीकडे ‘हिंदुत्वावर आधारित युती आणि सर्वाधिक जुना मित्रपक्ष’ अशा शब्दात शिवसेनेचे कौतुक करायचे नि दुसरीकडे मनसेशी सलगी करायची, याचा शिवसेनेला सर्वाधिक राग आहे. ‘बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेना संपली’, अशी हाकाटी अनेकांनी पिटली. अनेक राजकीय विश्लेषकांचा तोच अंदाज होता. त्याच काळात भाजपच्या काही नेत्यांना मनसेला हवा देऊन ‘शिवसेनामुक्त महाराष्ट्र’ करण्याची घाई झाली होती, त्याचे सल उद्धव यांच्या मनात आहे. तेलुगू देसमला हवाई वाहतूक आणि शिवसेनेला अवजड उद्योग हे तुलनेने कमी महत्त्वाचे खाते देऊन बाजूला ठेवण्याचा प्रयत्न झाला, त्याचा राग शिवसैनिकांना आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे नाव पुढे करून शिवसेनेला चेपण्याचा जो प्रयत्न होतो आहे, त्याचा सैनिकांच्या मनात संताप आहे. 

लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांना युतीमध्ये असलेले स्थान उद्धव यांना देण्यास भाजपाचे नेते तयार नाहीत. ‘उद्धव हे आमच्यापेक्षा वयाने नि अनुभवाने ज्युनिअर आहेत. त्यांना निवडणुकीचा कोणताही अनुभव नाही,’ असे सांगत भाजपा नेते आणि कार्यकर्ते उद्धव यांना काही प्रमाणात कमी लेखण्याचा प्रयत्न करीत आहेत. शिवाय प्रमोद महाजन यांचे राजकीय वारसदार असलेले गोपीनाथ मुंडेही हयात नाहीत. नितीन गडकरी आणि उद्धव यांचे संबंध फारसे मधुर नाहीत. त्यामुळे शिवसेनेची बाजू घेणारा एकही नेता भाजपामध्ये नाही. ही गोष्टही शिवसेनेसाठी क्लेशदायक आणि त्रासदायक आहे.

शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांमधील सर्वच प्रमुख नेते, म्हणजे देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार आणि उद्धव ठाकरे हे साधारणपणे एकाच वयाचे आहेत. त्यामुळे कोणी कोणाचे ऐकायचे, याबद्दल प्रत्येकाची भूमिका स्वतंत्र आहे. दोन्ही पक्षांचे नेते परस्परांचे ऐकायला तयार नाहीत. उद्धव म्हणतात, मी भाजपाच्या केंद्रीय नेत्यांशीच बोलणार. तर भाजपाचे केंद्रीय नेतृत्व म्हणते सर्व अधिकार प्रदेश स्तरावरील नेत्यांनाच. अशा सर्व गोष्टींमुळे दोन्ही पक्षांमधील संबंध अनेकदा ताणले जाऊन विकोपाला जातात.


वास्तविक पाहता, कोणी कितीही दावे केले तरीही शिवसेना आणि भाजपा यांना परस्परांशिवाय पर्याय नाही, अशीच तूर्त परिस्थिती आहे. नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्यामुळे लोकसभेत भाजपाची ताकद वाढलेली असली तरीही शिवसेनेला अव्हेरून विधानसभा स्वबळावर जिंकण्याइतपत ती आहे का, हे आजमावून पाहण्याची ही वेळ नाही. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सेना-भाजप युतीला सुवर्णसंधी आहे. आता जर भांडत बसले आणि स्वतंत्रपणे निवडणूक लढली तर पुन्हा आघाडीच सत्तेवर येणार, हा निष्कर्ष शेंबडं पोरही काढू शकेल. मात्र, युतीचे नेते ही गोष्ट मनापासून मान्य करण्याच्या स्थितीत नाही. 

भाजपा आणि शिवसेना नेत्यांनी यासह आणखी काही गोष्टींचे भान बाळगले, तर भविष्यात अशा कुरबुरी होणार नाहीत. पहिली म्हणजे नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता नि अमित शहा यांच्या आक्रमक रणनिती यांच्यामुळे भाजपाला लाभ होणार आहेच. मात्र, ही दोन्ही नावे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे या नावापेक्षा मोठी नाहीत. किमान महाराष्ट्रात तरी नाहीत. आजही बाळासाहेबांबद्दल जनतेच्या मनात आदर, आपुलकी आणि जिव्हाळा आहे. बाळासाहेबांची प्रचंड पुण्याई आहे. त्यामुळे उद्या जर महाराष्ट्रातून बाळासाहेबांच्या शिवसेनेला संपविण्याचा प्रयत्न भाजपने केला, तर मग त्यांच्यासाठी परिस्थिती बिकट बनेल, हे संबंधितांनी लक्षात ठेवले पाहिजे. त्यांना बरोबर घेऊन त्यांचा योग्य तो सन्मान राखण्यातच भाजपाचे हित आहे. 

दुसरीकडे शिवसेनेनेही काही गोष्टी मान्य केल्या पाहिजेत. प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे आज हयात नाहीत. भाजपाची ताकद पूर्वीच्या तुलनेत वाढली आहे. आणखी वाढते आहे. त्यामुळे अनेकदा गरज नसताना भाजपाच्या नेत्यांवर (विशेषतः गडकरी) टीका करणे, ‘सामना’तून बोचकारणे टाळायला हवे. माध्यमांमधून उपस्थित होणाऱ्या किरकोळ मुद्द्यांमुळे अस्वस्थ न होता त्याकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण स्वीकारायला हवे. तरच शब्दाला शब्द वाढणार नाही आणि विचारांवर आधारित युती टिकून राहील.
शेवटचा मुद्दा असा, की ‘आम्हीच मोठा भाऊ आहोत’, हे स्वतःहून सांगत बसण्याची आवश्यकता नाही. जनता हुशार आहे. कोण मोठा आणि कोण छोटा. कोण स्वच्छ आणि कार्यक्षम, हे सर्व जनतेला ठाऊक आहे. तेव्हा शिवसेना-भाजपा नेत्यांनी ‘मी-तू’पणाची बोळवण करून एकदिलाने निवडणुकीला सामोरे जायला हवे. तरच सत्तापरिवर्तन शक्य आहे. अन्यथा ‘दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ’ हा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही.