Thursday, August 26, 2010

जरा सांभाळून बोला...



अमितची बदनामी करणा-यांचा तीव्र निषेध...

गेल्या दोन आठवड्यात दोन बातम्या ऐकून मन खूप व्यथित झालं. (व्यथित हा शब्द खूप जड वाटत असेल तर खूप वाईट वाटलं, असे वाचावे) एक म्हणजे विश्ननाथन आनंद हा हिंदुस्थानी नाही, असा जावईशोध केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने लावला. आणि दुसरे म्हणजे झी २४ तासचा प्रतिनिधी आणि आमचा जिवलग मित्र (GD) अमित जोशी याने मुलींची छेड काढली म्हणून त्याला लोकांनी मारला - इति आरं आरं आबा.

द ग्रेट आणि ट्रू जिनिअस असणारा विश्वनाथन आनंद हिंदुस्थानी नाही. मग हिंदुस्थानी कोण... अहो ज्या माणसामुळं आज हिंदुस्थान बुद्धिबळामध्ये सुपर पॉवर बनू पाहतोय, ज्याच्यामुळे पुण्यापासून ते चेन्नईपर्यंत शेकडो नव्हे हजारो जण बुद्धिबळामध्ये करियर करण्याचा विचार करु लागले, ज्याने असंख्य वेळा हिंदुस्थानचा तिरंगा जगभरात फडकावला, तो आनंद हिंदुस्थानी नाही. अहो मग हिंदुस्थानी कोण. एसी ऑफिसमध्ये बसून निर्णय घेणारे आयएएस अधिकारी, मनुष्य बळाच्या नावाखाली मनुष्य छळ करणारे एचआर वाले की आनंदच्या नागरिकत्वाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतरही त्याबद्दल अनभिज्ञ असणारे केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल. असो त्यावर बरंच चर्वित चर्वण झालंय आणि त्यावर उमटलेली रिऍक्शन इतकी स्ट्राँग होती की, तत्काळ केंद्रीय मंत्र्यांना स्वतः फोन करुन माफी मागावी लागली. त्यामुळे त्यावर अधिक बोलण्यात-लिहिण्यात काय उपयोग नाही.

दुसरा मुद्द अमित जोशीचा. गृहमंत्र्यांनी अमितबद्दल जे बिनबुडाचं वक्तव्य केलंय त्याचा करावा तितका निषेध थोडा आहे. (मी असं म्हटलोच नाही, अशी टिप्पिकल पॉलिटिकल भूमिका घेत दुस-याच दिवशी आरं आरं आबांनी कोलांटउडी मारली) म्हणजे अमित जोशीनं पोरीची छेडछाड काढली. अहो एकवेळ एखादी पोरगी अमित जोशीची छेडछाड काढेल. पण अमित जोशी त्याच्या स्वप्नातही तसं करु शकणार नाही. त्याची इतकी ठाम खात्री मी देऊ शकतो कारण हैदराबादमध्ये ई टीव्हीत असताना मी आणि अमित जवळपास एक ते दीड वर्षे रुममेट (घरभाऊ) होतो. त्याच्याइतका सज्जन आणि सालस मुलगा आख्ख्या ई टीव्हीत नव्हता. किमान आम्ही तरी पाहिली नव्हता.

पत्रकारितेची परीक्षा उत्तीर्ण होऊन ताज्या दमाचा अमित ई टीव्हीत दाखल झाला होता. त्याची ती पहिलीच नोकरी. मी १२ जुलैला (२००३) ई टीव्हीमध्ये जॉईन झालो आणि तो १४ जूनला. त्यामुळे मी, अमित, सचिन फुलपगारे, सचिन देशपांडे आम्ही चौघांनी दिलसुखनगरला एकाच घरात रहायचो. (नंतर राजेंद्र हुंजे आणि श्रीरंग खरे यांनी दोघांना रिप्लेस केलं.) गडकिल्ले, ट्रेकिंग, पुस्तक आणि पेपर वाचन, कॉपी सुधारणं, बातमी अधिकाधिक चांगली कशा पद्धतीनं देता येईल आणि जास्तीत जास्त माहिती कशी मिळेल, यामध्येच त्याचा सारा वेळ जायचा. ऑफिसमध्ये आणि घरी एकत्रच असल्यामुळे मला त्याची खडा न् खडा माहिती होती. आम्ही गंमती गंमतीमध्ये जरी कधी एखाद्या मुलीचा विषय काढला किंवा एखाद्या मुलीवरुन त्याला चिडवलं तरी त्याला त्यामध्ये फारसं स्वारस्य नसायचं.



ई टीव्हीमध्ये त्यावेळी असलेल्या एका मुलीवरुन आम्ही त्याला कायम चिडवायचो. (ई टीव्हीमध्ये असलेल्यांना ते नाव माहिती आहे. सो ते इथे उघड करत नाही.) ते दोघं खूप चांगले मित्र होते. आम्ही त्याला नेहमी म्हणायचो की, बघ ती तुझ्यावर फिदा आहे, बघ, प्रपोज मारुन टाक इ.इ. पण अमित त्यामुळं कधीच हुरळून गेला नाही किंवा आमच्या बोलण्याला बळीही पडला नाही. आमची पवित्र मैत्री आहे... या पलिकडे त्यानं कधी उडी मारली नाही. सांगण्याचा उद्देश्य असा की, पोरींची छेडछाड, लफडी, अफेअर्स हा त्याचा प्रांतच नाही. गड किल्ल्यांवर हिंडायचं, कोणते तरी भोकातले कोणालाही माहिती नसलेले किल्ले सर करायचे आणि त्याबद्दल मित्रांना सांगायचे, हा त्याचा आवडता छंद. वेगवेगळ्या पदार्थांवर दाबून ताव मारायचा, मनसोक्त हादडायचं ही त्याची आवड. बसमधून किंवा काही वेळा आठ-आठ किलोमीटर चालत हैदराबाद पालथं घालायचं, ही त्याची सवय. (हा पठ्ठ्या मुंबईहून हैदराबाद सायकलवरुन येणार होता. पण त्याला आम्ही वेळीच रोखलं होतं.)

पत्रकारितेतही त्याला उथळपणा पसंत नव्हता. एखाद्या विशिष्ट बीटवर अधिक खोलवर जाऊन बातम्या कशा करता येतील, असा त्याचा प्रयत्न असायचा, असतो. तसं तो बोलूनही दाखवतो. संरक्षण, विज्ञान-तंत्रज्ञान, रेल्वे आणि ऑफकोर्स गडकिल्ले हे त्याचे आवडीचे विषय होते. अन् या विषयातील बातम्या कव्हर करण्यासाठी, अधिक जाणून घेण्यासाठी तो सदैव तयार असतो, उत्सुक असतो. लफडी करुन पोरी पटवायच्या आणि मजा मारायची, असल्या गोष्टींसाठी त्याच्याकडे कधीच वेळ नव्हता. वेळ असला तरी त्याला इच्छा नव्हती. कधी कधी त्याच्या या आरबट चरबटपणाची आम्ही खिल्ली उडवायचो, त्याची खेचायचो, त्याची चारचौघांत टिंगलटवाळी करायचो, पण अमितच्या साधेपणाबद्दल आमच्या मनात कोणतीही शंका नव्हती आणि नाहीही. अंडी देखील धुवून घेणारा, चार जणांसाठी पातेलंभर चहा करणारा, साजूक तुपामध्ये आमटी करणा-या आमच्या या मित्राची आम्ही भरपूर चेष्टा केली. त्याच्या पुढे केली. त्याच्या पाठीवर कधी नाही केली. त्याच्या या अतरंगीपणाबद्दल आम्ही अक्षरशः लोळायचो. हसून हसून पोट दुखायचं.

पण आबांसारख्या जबाबदार माणसानं कोणतीही खातरजमा न करता अशोभनीय विधान करुन आम्हा सर्वांनाच धक्का दिला. असल्या फालतू गोष्टींचा विचार आमच्या मनातही कधी आला नाही, तो आबांनी जगजाहीरपणे बोलून दाखविला. दु्र्दैव दुसरे ते काय. त्यामुळे आबा तुम्ही स्वतःची प्रतिमा जपण्यासाठी प्रयत्नशील असताना. मग मिळालेल्या माहितीची खातरजमा न करता केलेल्या वक्तव्यामुळे दुस-याची प्रतिमा काळवंडणार नाही, याची खबरदारी बाळगा. (त्या परिसरातल्या एका पोलिस अधिका-यांच्या वसुली एजंटांनीच अमितवर हल्ला केला. त्यामुळे पोलिसही त्यांना अडविण्यासाठी पुढे सरसावले नाहीत, अशी चर्चा कानावर आली. तथ्य ते काय माहिती नाही. पण त्या अधिका-यानेच तर ही माहिती आबांना पुरविली नसेल ना, अशी शंका राहून राहून येते.)कालच केईममध्ये जाऊन त्याला भेटून आलो. अमितनंही आबांच्या वक्तव्याचा मुद्दा फारसा गांभीर्यानं घेतला नव्हता. पण मला रहावलं नाही. अगदी आपल्या जिवलग मित्राबद्दल कोणीतरी काहीतरी फालतू बडबड करतंय, असं समजल्यानंतर मन अस्वस्थ झालं, म्हणून हा लेखप्रपंच.

(एक महिन्याच्या विश्रांतीनंतर अमित पुन्हा ताज्या दमानं फिल्डवर रुजू होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.)

Sunday, August 15, 2010

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...



तांत्रिक अडचणींपासून मिळाले स्वातंत्र्य...

तांत्रिक अडचणी किती त्रासदायक असून शकतात आणि त्यामुळं किती पारतंत्र्य येऊ शकतं, हे मी गेले काही महिने अनुभवत होतो. गेल्या कित्येक दिवसांपासून काही तांत्रिक कारणांमुळे मला ब्लॉग लिहिणं शक्य झालं नव्हतं. पण आता ती तांत्रिक अडचण दूर झाली आहे आणि तांत्रिक अडचणींपासून मला स्वातंत्र्य मिळालं आहे. तेव्हा मी पुन्हा नव्या जोमानं ब्लॉग लिहीन असं म्हणतोय. मध्यंतरी अनेक ठिकाणी जाऊन आलो, अनेक वेगवेगळे पदार्थ खाल्ले, अनेक चित्र-विचित्र अनुभव आले, त्यावर लिहायची खूप इच्छा होती. पण मला ते शक्य झालं नाही. उल्लेखच करायचा झाला तर आमची कोकणची ट्रीप, आमचं कोकणातलं देवरुख जवळचं घर, ऐन पावसात भिजून घरी गेल्यानंतर ओरपलेलं गरमागरम कुळथाचं पिठलं-भात आणि मुंबईहून पुण्याला येताना कर्जतच्या घाटातली निसर्गाची नवलाई हे दोन प्रसंग लिहिण्याची अतीव इच्छा होती. पण ती उत्स्फूर्तता आता नाही. माझ्या लेखनाचा मेगाब्लॉक सुरु असताना अनेकांनी मी ब्लॉग बंद केला आहे का, असा थेट सवालही केला. पण माझा नाईलाज होता. इच्छा असूनही मी काहीच करु शकत नव्हतो. पण आता मार्ग सापडला आहे आणि मी पुन्हा लिहिता झालो आहे.

ठिकठिकाणच्या वडापावपासून ते रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर मिळणा-या रगडा पावापर्यंत आणि सचिवालय जिमखान्यापासून ते पुण्यातील अभिषेकपर्यंत अनेक ठिकाणचा आस्वाद घेतला आहे. परळमधल्या प्रकाश सारख्या गावाची आठवण आणणा-या हॉटेलवर लिहायचं आहे. अनेक विषय आहेत. तेव्हा आता वारंवार भेटतच राहू.

हिंदुस्थानच्या ६४ व्या स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
हिंदुस्थानचा स्वातंत्र्यदिन चिरायू होवो, अशी प्रार्थना...


जयहिंद आणि जय महाराष्ट्र...