Thursday, April 21, 2011

तमिळनाडूचे चार प्रतिनिधी

दीपक, अशोक आणि च्यो रामास्वामी...

आपण प्रवासाला गेलो किंवा नव्या शहरात गेलो, की तिथे आपल्याला चांगले-वाईट अनुभव येतात. अनुभव चांगले-वाईट असतात कारण परिस्थिती किंवा आपल्याला भेटलेली माणसं चांगली किंवा वाईट असतात. तमिळनाडूमध्ये गेलो होतो तेव्हा मलाही असेच काही चांगले-वाईट (वाईट फक्त एखाद दुसराच) अनुभव आले. त्यावर गेल्या बऱ्याच दिवसांपासून लिहीन म्हणत होतो. पण अखेर आज मुहूर्त मिळाला.

मदुराईचा दीपक


तमिळनाडू दौऱ्यात मला भेटलेला मस्त मित्र म्हणजे एन. बी. दीपक. हा स्वतः एका जाहिरात कंपनीमध्ये काम करतो. तंजावूर ते मदुराई एसटीमध्ये तो मला प्रथम भेटला. नंतर तो माझा मदुराईतील गाईडच बनला. एसटी स्टँडपासून ते मदुराई शहरात कोणत्या बसने जायचं, हे त्यानं मला सांगितलं. त्यालाही त्याच बसनं जायचं होतं, म्हणून तोही माझ्या बरोबरच निघाला. इतकंच नाही तर त्यानं माझं तिकिटही काढून टाकलं. (हा त्याला चांगलं म्हणण्याचा निकष नक्कीच नाही.) रात्री बारा वाजता मदुराईत चांगलं हॉटेल शोधण्यात त्यानं मला मदत केली. रात्री साडेबारा वाजता खायला कुठं मिळेल, काय मिळेल, यासाठी तो माझ्याबरोबर हिंडला. एका हॉटेलमध्ये घुसून त्यानं आमच्या दोघांच्या जेवणाची व्यवस्था केली.

दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्याबरोबर मदुराई मंदिरात आला. एम. के. अळगिरी यांच्या भेटीसाठी डीएमकेचे ऑफिस आणि त्यांच्या घरापर्यंत माझ्याबरोबर फिरला. संध्याकाळीही मदुराई मंदिरातील देवांची यात्रा निघते, तिथं मला घेऊन गेला. रात्री मला एस. टी. स्टँडवर सोडायला आला आणि कन्याकुमारीला पोहोचला का? असा फोनही दुसऱ्या दिवशी केला. ओळख फक्त एस.टी. मधली. तो तमिळ, मी मराठी. आमच्या दोघांचा दुरान्वयेही संबंध नाही. पण तरीही त्यानं माझ्यासाठी खूपखूप केलं. आपण महाराष्ट्रातच बसून म्हणतो, की ते तमिळ लोकांना मदत करत नाहीत. हिडीसफिडीस करतात. पण असेही काही तमिळ आहेत, की जे कायमचे तुमचे मित्र होतात. जसा दीपक माझा कायमचा मित्र झाला.

मदुराईबद्दल बोलताना दीपक म्हणला होता. मदुराई पीपल आर पासक्कारे पीपल. म्हणजे मदुराईचे लोक हे प्रेमळ लोक असतात. मला त्याचं बोलणं अगदी पटलं. कारण दीपक हाच माझ्यासाठी मदुराई पीपल होता. खरंच मदुराई पीपल आर पासक्कारे पीपल.

रेल्वे अधिकारी व्ही. अशोक

पु. ल. देशपांडे यांच्या चौकोनी कुटुंबात शोभून दिसेल असा रेल्वे अधिकारी चेन्नई-पुणे प्रवासादरम्यान माझा सहप्रवासी होता. एकदम पापभीरू म्हणजे तो कुर्डुवाडीपर्यंतच होता. पण तो माझ्या कायम लक्शात राहील असाच होता. व्ही. अशोक असं त्याचं नाव. अकदम टापटीप, वक्तशीर आणि नीटनेटका. पंढरपूर आणि तुळजापूरला देवदर्शनासाठी निघाला होता. एकटाच. पण दोन भल्या मोठ्या बॅगा, एक हँडबॅग आणि एक पाऊच बरोबर घेऊन आला होता. दोन्ही बॅगा साखळीबंद करून त्याची चावी एका छोट्या पाकिटात ठेवली. ते पाकिट पाऊचमध्ये ठेवलं आणि ते पाऊच कुठेतरी लपवून ठेवलं. बरं, डबा सेकंड एसीचा आणि हा एकटाच. इतकं मौल्यवान काय घेऊन जात असणार हा ते पांडुरंगालाच माहिती.

बरं, त्याच्याकडे कोरे कागद होते. पट्टी होती. रेल्वेचे दक्शिण, मध्य आणि पूर्व विभागाचे सविस्तर वेळापत्रक होते. त्यामुळे कुर्डुवाडी कधी येणार, पुणे कधी येणार, गुंटकल आणि वाडी कधी येणार, कशानंतर काय याची त्याला सविस्तर माहिती होती. रेल्वेचा माहितीकोष म्हणूनच तो वावरत होता आणि प्रत्येक सहप्रवाश्याला मदत करत होता. सक्काळी उठल्या उठल्या चहा घेतला आणि अर्ध्या तासानं दही खायला घेतलं. सकाळी साडेआठ वाजता दही खाल्लं, तेव्हा मला चक्करच यायची बाकी होती. बरं, दही खाल्लं ते खाल्लं आणि म्हटला नो क्वालिटी. रेल्वेच्या पॅण्ट्री कारचे खासगीकरण झाल्यानंतर कशी मजा गेली, यावर मला दर तासाभरानं सांगत होता. म्हटलं, कुठून यानं दही खाल्लं आणि हे सर्व ऐकण्याची वेळ माझ्यावर आली.

वाडीला एका चहावाल्यानं जेवण आणून देऊ का विचारल्यानंतर त्यानं दर विचारले. तेव्हा चहावाला म्हणाला, बाजरीका एक रोटी बीस रुपया. त्यावर हा पठ्ठा म्हणाला, बाबा क्या एक किलो का रोटी लाओगे क्या? नंतर दही मिलेगा क्या, असं त्यानं विचारलं. तेव्हा म्हणाला मिलेगा. आधा किलो लाऊ क्या? त्यावर तो म्हणाला, मेरे को अकेले को चाहिए. पुरे डिब्बे को खिलाओगे क्या? त्यानंतर पुढचा अर्धा तास मी एकटाच वेड्यासारखा हसत होतो. माझ्या हसण्याची मलाचा लाज वाटत होती. पण काय करणार. असा हा व्ही. अशोक कुर्डुवाडी येण्यापूर्वीच दारात जाऊन उभा होता आणि पाहता पाहता नजरेआड झाला.

च्यो रामास्वामी

तुघलक या साप्ताहिकाचे संपादक आणि जयललिता यांचे कट्टर समर्थक च्यो रामास्वामी यांना भेटण्याचा योग आला. तमिळमधील लेखक, कवी, कथाकार, पटकथाकार, पत्रकार आणि बरेच काही. सध्या तुघलकचे संपादक. टाइम्सचे गेस्ट हाऊस असलेल्या अल्वर पेठ भागाच्या जवळच ग्रीनवेस रेल्वे स्टेशनजवळ त्यांचं ऑफिस. दुपारी तीननंतर फोन करा, असं म्हणून त्यांनी मला भेटण्यास होकार दिला. तीन वाजता फोन केला तर फोन बंद. म्हटलं वामकुक्शी सुरु असणार. मग साडेचारला फोन केला. फोन उचलला आणि पाचची अपॉईण्टमेंट दिली.

ऑफिसात गेलो. सुरुवातीला समोरच महात्मा गांधीजींचा फोटो. स्वतः रामास्वामी दे दुसऱ्या मजल्यावर बसतात. मग त्यांच्या पीएनं फोन करुन बोलणं करून घेतलं आणि मला वर जाण्यास सांगितलं. वर गेलो तर मंगल पांडेंचा फोटो. खाली गांधी वर पांडे. एक अहिंसक दुसरा १८५७ च्या स्वातंत्र्यसमराची ठिणगी पडण्यास कारणीभूत ठरलेला. केबिनमध्ये गेलो. म्हणाले, टेक युअर सीट आणि माझ्यावरच प्रश्नांचा भडिमार सुरु केला. कुठून आला, कुठे कुठे गेला, काय काय पाहिलं, तुमचा अंदाज काय, काय होईल इइ. जयललिता येणार पण घासून येणार हा माझा अंदाज चुकीचा आहे, असं सांगून त्या निर्विवाद बहुमत मिळविणार हे त्यांनी निक्शून सांगितलं. वर, करुणानिधी सरकारच्या चार वाईट गोष्टीही सांगितल्या.

सिंहासन वाटावं, अशा खुर्चीवर मस्त मांडी घालून बसलेली वामनमूर्ती. डोक्याला केस नाही. भुवयाही नाहीत. त्यामुळे भुवया काजळानं किंवा काळ्या रंगानं कोरलेल्या. कमरेला लुंगी. वरती सिल्कचा सदरा आणि संपूर्ण केबिनमध्ये विविध स्वामींचे आणि शंकराचार्यांचे फोटो. काही फोटो च्यो रामास्वामी यांच्याबरोबर तर काही आशीर्वाद देताना. मला तर एखाद्या शंकराचार्यांच्या पीठात वगैरे तर आलो नाही ना, असंच वाटत होतं. बोलायला मस्त रोखठोक आणि फोटोसाठी पोझ द्यायला एक नंबर. अवघ्या पंधरा मिनिटांमध्ये आमची भेट आटोपली आणि चेन्नई दौरा सार्थक झाल्याचं वाटलं. लहानपणापासून तमिळनाडूतील एक्सपर्ट म्हणून ज्यांना एनडीटीव्ही आणि स्टार न्यूजवर पाहत आलो त्यांना प्रत्यक्श भेटलो.

गेस्ट हाऊसचा वॉचमन

टाइम्सच्या गेस्ट हाऊसचा वॉचमन हा माझा लोकल गाईड होता. वॉचमनचं नाव विचारलं होतं. पण आता लक्शात नाही. गेस्ट हाऊसपासून कुठे कोणती बस जाते. बसस्टॉप कुठे आहे. तिथून पुढे जाण्यासाठी कोणती बस उपयुक्त ठरेल, तिकिट किती असेल. किती मिनिटांनी बस येईल, याचा तो विकिपिडीयाच होता. त्याच्यामुळेच मला चेन्नईच्या बससेवेची जवळून ओळख झाली. कोणत्या पेपरमध्ये काय आलंय, कोणता पेपर कोणाचा आहे, चॅनलवर नेमक्या काय बातम्या सांगितल्या, हे त्याला अगदी इत्थंभूत माहिती असायचं. असा हा वॉचमन माझा चेन्नईतील गाईडच होता.

तंजावूरचा खडूस म्हातारा

तंजावूरला होतो तेव्हा आर्यभुवन नावाच्या एका हॉटेलमध्ये संध्याकाळी नाश्ता करण्यासाठी गेलो होतो. तिथं माझ्यासमोरच एक म्हातारा येऊन बसला. बरं, इतर अनेक टेबलं मोकळी होती तरी समोर येऊन बसला. बरं, विषय काढायचा म्हणून त्याला विचारलं तमिळनाडूत यंदा काय होणार? तेव्हा मला म्हटला, ओन्ली तमिळ. नो इंग्लिश. दिसायला तर एकदम टापटीप आणि सोज्वळ होता. पुण्यातील काही खवट म्हातारे असतात तसा तो होता. त्याला इंग्लिश येत असणार पण भडवा बोलला नाही. इडलीबरोबर झालेला अपमान गिळून आणि मनातल्या मनात त्याच्या आई-बहिणीचा उद्धार करून बाहेर पडलो.

आणखी बरेच जण भेटले पण लक्शात राहणारे हे इतकेच.

Tuesday, April 12, 2011

मराठी माणसाकडे

तंजावूरमध्ये द्रमुकची धुरा

पांढरा शर्ट, कमरेला पांढरी स्वच्छ लुंगी, कपाळाला कुंकवाचा टिळा आणि वणक्कम सर म्हणून समोरच्याचे स्वागत करण्याची सवय... कोणत्याही तमिळ नागरिकाला लागू पडेल, असे हे वर्णन आहे तंजावूरच्या बी. मोहन या मराठी माणसाचे. बी. मोहन आणि मराठी? अशा विचारात पडू नका. बी मोहन हे त्यांचे तमिळ नाव. खरं नाव मोहन जाधव.

तंजावूरचे द्रमुकचे उमेदवार आणि विद्यमान मंत्री ओबेयदुल्ला यांच्या प्रचाराची धुरा मोहन जाधव हा मराठमोळा गडी अत्यंत यशस्वीपणे सांभाळतो आहे.
जवळपास तीनशे-साडेतीनशे वर्षांपासून जाधव यांचे कुटुंब तंजावूरमध्ये आहे. मोहन जाधव यांची ही तंजावूरमधली साधारण आठवी-दहावी पिढी. सध्या मोहन आणि त्यांचे बंधू आपल्या कुटुंबासह तंजावूरमध्ये रहात आहेत. लहानपणापासून तंजावूरमध्येच राहिल्यामुळे मराठीची ओळख जवळपास नाहीच.

अगदी तोडकं मोडकं मराठी मोहन जाधव बोलू शकतात. त्यांचे बंधू मात्र, अधिक चांगल्या पद्धतीने मराठी बोलतात. अर्थात, आपल्याला लक्श देऊन ऐकल्याशिवाय ते काय बोलत आहेत, ते समजत नाही. शिवाय आपण खूप वेगाने बोललो तरी त्यांना आपले मराठी समजत नाही.
आपण हिंदी किंवा इंग्लिशमधून बोलण्यास सुरुवात केली तर मोहन यांची पत्नी म्हणते, की तुम्ही मराठीत बोला मला थोडं थोडं समजतं. घरात जास्त प्रभाव तमिळचाच. पण ही मंडळी मराठी एकदम विसरलेली नाहीत.

पॅलेस भागात मराठी माणसांची घरे जास्त आहेत. त्याठिकाणी मराठी माणसांची घरे कुठे आहेत, तर कोणतीही व्यक्ती मोहन जाधव यांच्या घराचा पत्ता पहिल्यांदा देतो. मोहन हे मराठी चांगल्या पद्धतीने बोलू शकत नसतीलही. पण तंजावूरमधील त्यांची एक ओळख ते मराठी आहेत, अशीही आहे.
मोहन जाधव हे गेल्या तीस वर्षांपासून द्रमुक पक्शाही एकनिष्ठ आहेत. सुरुवातीपासूनच कलैंग्नार यांचे आकर्षण असल्यामुळे तरुण वयातच द्रमुकच्या युथ विंगमध्ये दाखल झालो, असं मोहन अभिमानानं सांगतात.

सुरुवातीच्या काळात मोहन हे द्रमुकच्या युथ विंगचे तंजावूर शहर सरचिटणीस होते. सध्या द्रमुक पक्शाचे तंजावूर शहर उपसरचिटणीस म्हणून ते काम पाहत आहेत. तंजावूर महानगरपालिकेत नगरसेवक म्हणूनही ते काम करीत आहेत. सध्या तंजावूरचे द्रमुकचे उमेदवार ओबेयदुल्ला यांच्या प्रचाराची सर्व जबाबदारी मोहन यांच्यावर आहे.
शहरातील विविध वॉर्डांमध्ये जाऊन प्रचार करणे, ओबेयदुल्ला यांच्या बरोबर संपूर्ण मतदारसंघात फिरून नागरिकांना मतदानाचे आवाहन करणे, तंजावूर परिसरातील गावांमध्ये जाऊन तिथल्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन निवडणुकीसाठी योग्य फिल्डिंग लावणे, अशा कामांमध्ये मोहन सध्या व्यग्र आहेत.

वेळात वेळा काढून त्यांनी महाराष्ट्र टाइम्सच्या प्रस्तुत प्रतिनिधीशी संवाद साधला. टू जी घोटाळ्याचा मुद्दा ग्रामीण भागामध्ये अजिबात महत्वाचा नसून कलैंग्नार यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारने केलेल्या कामांची माहिती आम्ही घरोघरी जाऊन देतो आहोत आणि आम्हाला खूप चांगला रिसपॉन्स मिळत आहे, अशी प्रतिक्रिया मोहन यांनी व्यक्त केली.


जिसमे मिलाओ उसके जैसा...

पानी रे पानी तेरा रंग कैसा, जिसमे मिलाओ उसके जैसा... एखाद्या गोष्टीमध्ये अगदी सहजपणे मिसळलं जाणारं आणि स्वतःचं स्वतंत्र अस्तित्त्व न ठेवता त्याच्याशी खूप चांगल्या पद्धतीनं एकरुप होण्याचा पाण्याचा गुण मराठी माणसानं अगदी चांगल्या पद्धतीनं अवगत केला आहे. जिथं मराठी माणसानं आपला डेरा टाकला तो तिथलाच होऊन गेला. तिथली संस्कृती, भाषा आणि परिसरातील सगळ्या गोष्टी त्यानं इतक्या उत्तम पद्धतीनं आत्मसात केल्या की आतला कोण आणि बाहेरचा कोण, हे ओळखणं मुश्किल व्हावं. पानिपत, बडोदा, इंदूर, जिंजी, ग्वाल्हेर किंवा हैदराबाद... जिथं मराठी माणूस गेला तो तिथलाच होऊन गेला. त्यानं स्वतःचं मराठीपण जपलं पण स्वतंत्र चूल कधीच मांडली नाही. अशा परिस्थितीत तंजावूरचा मराठी माणूस कसा वेगळा असणार. तो देखील तमिळच होऊन गेलाय.


छत्रपती शिवाजी महाराजांचे बंधू व्यंकोजीराजे हे १६७५ मध्ये तंजावूरचे महाराज बनले. तत्पूर्वी शहाजीराजांनीही तंजावूर जिंकले होते. पण नंतर त्यांनी विजयराघवन नायक याला राज्य बहाल केले. पण नंतरच्या काळात व्यंकोजीराजे हे तंजावूरचे महाराज झाले. व्यंकोजीराजांनंतर तंजावूरच्या इतिहासात संस्मरणीय ठरलेले नाव म्हणजे सरफोजी महाराज यांचे. सरफोजी महाराज हे १८३२ ते १८५५ या काळात तंजावूरचे राजे होते. त्यांनी अनेक लोकोपयोगी गोष्टींची अंमलबजावणी केल्यामुळे ते लोकप्रिय ठरले होते. सरफोजी महाराजांची सहावी पिढी सध्या राजे पदावर आहे. बाबाजी भोसले हे सध्या तंजावूरचे राजे आहेत.

व्यंकोजी राजांच्या काळात जी कुटुंब तंजावूरला आली ती तंजावूरचीच होऊन गेली.
तंजावूर शहर आणि परिसरात जवळपास पाच हजार मराठी कुटुंबे आहेत. मराठी मंडळींची एकूण लोकसंख्या पंधरा ते अठरा हजारांच्या आसपास असावी. अर्थात, गेल्या काही वर्षांत तंजावूरची मराठी मंडळी इथला जमीन जुमला विकून सातारा, कोल्हापूर आणि सांगली भागात रहावायास गेली आहे. त्यामुळे मराठी टक्का काही प्रमाणात घटलाही आहे, अशी माहिती तंजावूरचे प्रिन्स शिवाजीराजे टी. भोसले यांनी महाराष्ट्र टाइम्सला दिली.

सध्या पन्नाशी किंवा साठीत असलेली पिढी अगदी तोडकं मोडकं मराठी बोलते. त्यांची पुढची पिढी मराठीचा वापर त्यापेक्शा कमी करते आणि तिसरी पिढीला मराठीची फक्त तोंडओळख आहे. आपण मराठी आहोत, इतकंच कदाचित त्यांना माहिती असेल. म्हणूनच मराठीत बोलायला लागल्यानंतर ही मंडळी थोडी बिचकतात. कदाचित आपलं मराठी ह्यांच्याइतकं स्वच्छ आणि शुद्ध नाही म्हणूनही त्यांना असं वाटत असावं. पण तुम्ही बोला, मला समजेल, अशा विश्वास आपण व्यक्त केला तर ही मंडळी अगदी मोकळेपणानं मराठीत बोलतात. तमिळ भाषेतील अनेक शब्द आणि लहेजा असलेलं मराठी समजून घेणं अवघड जातं. पण आपल्याला त्यांचं मराठी समजतं इतकंच.


इतर मंडळींच्या मानानं तंजावूरचे प्रिन्स शिवाजीराजे टी. भोसले यांचे मराठी उत्तम आहे. कोल्हापूर, सातारा आणि महाराष्ट्राच्या इतर भागात त्यांच्या वारंवार भेटी असतात. म्हणूनही असेल कदाचित. पण ते अत्यंत सहजपणे मराठीतून संवाद साधतात.

मराठी माणसाची संख्या अठरा-वीस हजार असली तरी मराठी माणूस मराठी म्हणून ही मंडळी फारशी एकत्र येत नाहीत. गटातटाच्या राजकारणाचा मराठी माणसाला लागलेला शाप तंजावूरमध्येही कायम आहे. तंजावूरमध्ये राहणा-या बहुतांश मराठी नागरिकांचे महाराष्ट्रात फारसे नातेवाईक नाहीत. ही मंडळी कर्नाटक आणि हैदराबाद इथल्या मराठी लोकांशी किंवा तंजावूरमध्येच सोयरिक करतात. त्यामुळे महाराष्ट्रातील मराठी लोकांशी त्यांचा फारसा संबंध येत नाही. ही मंडळी साऊथ इंडियन महाराष्ट्र मंडळ ही संस्था चालवितात. ही संस्था बृहन्महाराष्ट्र मंडळाशी संलग्न आहे.
बाबाजी भोसले सध्या राहतात तो पॅलेस, सरस्वती महाल संग्रहालय आणि सरफोजी महाराज तसेच मराठ्यांचा इतिहास दर्शविणारे संग्रहालय पॅलेस परिसरातच आहे. तिथं फिरून थोड़ी माहिती घेतली आणि मग पुरातत्व खात्याचे अधिकारी एस. सेल्वराज यांच्याशी गप्पा झाल्या. सेल्वराज यांनी मराठी माणसाबद्दल व्यक्त केलेली प्रतिक्रिया खूप मस्त होती. मराठी माणसाचा उल्लेख ते मराठा असाच करतात. मराठे हे कधीच भांडखोर आणि विध्वसंक नव्हते. ते इथे राजे म्हणून आले तेव्हा त्यांनी चौल राजांच्या स्मृतींचे निष्ठेने जतन केले. वास्तविक पाहता, त्यांना ते उद्ध्वस्त करणे सहज शक्य होते. पण त्यांचा तो मूळ स्वभाव नाही. आजही मराठे इतक्या शांततेने आणि मिळून मिसळून रहात आहेत, की त्यांना मराठी का म्हणावे ते तर तमिळच आहेत, असे वाटते. आपल्या समाजाबद्दल एका त्रयस्थ माणसाने अशी प्रतिक्रिया व्यक्त केली तर कोणाला आवडणार नाही.

तमिळनाडूत कमळ फुलण्याची शक्यता

नागरकोईलमध्ये भाजपला संधी



प्रदेशाध्यक्श राधाकृष्णन यांचे पारडे जड
तमिळनाडूच्या रणसंग्रामात द्रमुक आणि अण्णा द्रमुक यांच्यात घमासान युद्ध सुरु असताना राष्ट्रीय पक्श असलेल्या काँग्रेस आणि भारतीय जनता पक्शाला मात्र या निवडणुकीतून फारशा आशा नाहीत. काँग्रेसने तरी द्रमुकबरोबर युती करून पंधरा-वीस जागांची बेगमी करुन ठेवली असली तरी भाजपला मात्र, या निवडणुकीत नेहमीप्रमाणेच अपयशाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कन्याकुमारी जिल्ह्यातील नागरकोईल मतदारसंघ भाजपसाठी लक्की ठरण्याची शक्यता असून इथून विजय निश्चित आहे, अशी आशा भाजपचे कार्यकर्ते बाळगून आहेत.

भारतीय जनता पक्शाने नागरकोईल मतदारसंघातून पक्शाचे प्रदेशाध्यक्श पाँडी राधाकृष्णन यांना रिंगणात उतरविले आहे. राधाकृष्णन हे अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात केंद्रीय वाहतूक राज्यमंत्री होते. गेल्या अनेक दशकांपासून राजकारणात असूनही अत्यंत साध्या पद्धतीने जीवन जगणारे राधाकृष्णन हे अविवाहित आहेत. साध्या राहणीमुळे ते कन्याकुमारीचे कामराज म्हणूनही ओळखले जातात. राधाकृष्णन हे व्यवसायाने वकील आहेत. राधाकृष्णन हे हिंदू मुनान्नी या लढवय्या संघटनेचे ‍१९८० मध्ये पूर्णवेळ कार्यकर्ते होते. तेव्हापासून ते सार्वजनिक जीवनात आहेत.
राधाकृष्णन यांनी यापूर्वी दोनवेळा लोकसभेची निवडणूक लढविली होती. मात्र, दोन्हीवेळा त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. दुस-या वेळी त्यांना कम्युनिस्ट पक्शाच्या उमेदवाराकडून ६५ हजारांनी पराभव पत्करावा लागला होता. त्यावेळी त्यांना अडीच लाख मते मिळाली होती. वाहतूक राज्यमंत्री असताना कोलाचेल-तिरुवत्तर आणि थ्युकालय-थडीक्कारमकोलम या गावांदरम्यान केलेल्या पक्क्या डांबरी सडकांमुळे नागरिकांची खूप मोठ्या प्रमाणावर सोय झाली, अशी आठवण इथले मतदार अजूनही काढतात.

गेल्या अनेक वर्षांपासून मी लोकांची कामे करतो आहे. त्याचा विचार करून लोक मला यंदा नक्की संधी देतील. सामान्य कार्यकर्ता ही माझी ओळख आहे आणि मी अगदी सहजपणे उपलब्ध होऊ शकतो, हे लोकांना माहिती आहे. त्यामुळे यंदा भाजपला नक्की संधी आहे. शिवाय आमच्या मतदारसंघात ख्रिश्चन मतदारांची संख्या लक्शणीय आहे. आतापर्यंत ख्रिश्चन समाज आम्हाला कधीच मतदान करीत नव्हता. पण आता आमची ख्रिश्चन संघटनांबरोबर बैठक झाली असून चर्च लवकरच तसा आदेशही जारी करण्याची शक्यता आहे. तेव्हा भाजप यंदा नक्की खाते उघडणार, असा विश्वास राधाकृष्णन यांनी महारष्ट्र टाइम्सशी बोलताना व्यक्त केला.


अर्थात, दक्शिण तमिळनाडूचे राजकीय विश्लेषक अण्णामलाई यांनी मात्र, भाजपच्या विजयाची शक्यता खूपच कमी असल्याचे सांगितले. राधाकृष्णन हे खूप चांगले उमेदवार आहेत. मात्र, तमिळनाडूमध्ये द्रमुक किंवा अण्णा द्रमुकची मदत घेतल्याशिवाय दुस-या कोणत्याही पक्शाचा उमेदवार निवडून येत नाही, हा इतिहास आहे. भाजपला हा इतिहास पुसायचा असेल तर खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. पण तशी शक्यता कमीच दिसते आहे.

Thursday, April 07, 2011

प्रचाराच्या जुन्या आठवणींना उजाळा

पुद्दुचेरीत बाळासाहेबांचे फॅन्स

तमिळनाडू डायरी

तमिळनाडूमध्ये गेल्या 44 वर्षांपासून काँग्रेस स्वबळावर सत्तेवर आलेली नसली तरी तमिळनाडूच्या पोटातच असलेल्या पुदुच्चेरीमधली परिस्थिती मात्र, खूपच वेगळी आहे. काँग्रेसशिवाय सरकार स्थापन करणे हे द्रमुक किंवा अण्णा द्रमुक यापैकी कोणत्याही पक्षाला पुदुच्चेरीमध्ये शक्य होत नाही. काँग्रेसकडून दोनदा मुख्यमंत्रीपद भूषविलेले एन. रंगास्वामी यांनी दिल्लीतील दरबारींच्या राजकारणाला कंटाळून एन आर काँग्रेस नावाचा स्वतंत्र पक्ष स्थापन केला असून ते जयललिता यांच्याशी युती करुन निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. पुद्दुचेरीमध्ये विधानसभेच्या अवघ्या तीस जागा असून प्रत्येक मतदारसंघात अवघे पाच ते दहा हजार मतदान आहे.




पुद्दुचेरीमध्ये प्रवेश करताच निवडणुकीच्या लहानपणीच्या आठवणी जागा झाल्या. म्हणजे लहानपणीचं वातावरण डोळ्यासमोर उभं राहिलं. ताई माई आक्का विचार करा पक्का आणि अमुक तमुकवर मारा शिक्का... अशा घोषणा देत फिरणाऱ्या रिक्षा, भडक रंगांनी रंगविलेल्या भिंती आणि जागोजागी लागलेली पोस्टर्स तसेच स्टिकर्स. कालांतराने निवडणूक आयोगाच्या कडक निर्बंधांमुळे हे चित्र नष्ट झाले आणि निवडणुकीतील गंमतच हरविली. पण पुद्दुचेरीमध्ये मात्र, कर्कश्श तमिळ गाण्यांच्या सहाय्याने प्रचार करणाऱ्या रिक्षा जागोजागी दिसतात. पुद्दुचेरीमध्ये येताना आणि पुद्दुचेरीहून तंजावूरकडे जाताना छोट्या छोट्या गावांमध्ये रंगवलेल्या भिंतीही नजरेस पडतात. कुठे करुणानिधींचा उगवता सूर्य दिसतो. तर कुठे अम्मांच्या पक्षाची दोन पाने दिसतात. मध्ये कधीतरी विजयकांत यांच्या चित्रपटांतील पोस्टर्सही लागलेली दिसतात. त्यामुळे म्हटलं चेन्नईमध्ये न दिसलेली गोष्ट पुद्दुचेरीमध्ये दिसल्यामुळे पूर्वीच्या आठवणी जाग्या झाल्या.

पुद्दुचेरीचं महत्वाचं आकर्षण म्हणजे इथला अरविंदाश्रम. योगी अरविंद यांची समाधी. तिथं जाऊन त्यांच्या समाधीचं दर्शन तर घेतलंच पण मला ओढ लागली होती ती पुद्दुचेरीचे माजी मुख्यमंत्री एन. रंगास्वामी यांना भेटण्याची. भलताच लोकप्रिय माणूस. चौकापासून ते चौकीपर्यंत आणि बारशापासून ते मयतापर्यंत प्रत्येक ठिकाणी हजर राहणारे तसेच लोकांच्या अडल्या नडल्याला धावून जाणारे पुद्दुचेरीचे माजी मुख्यमंत्री. मुख्यमंत्री असूनही मोटरसायकल किंवा स्कूटरवरून फिरणारे, सहजपणे चौकात गप्पा झोडणारे किंवा टपरीवर कोणतीही लाज न बाळगता चहा पिणारे एन. रंगास्वामी. वेटरपासून ते रिक्षा ड्रायव्हरपर्यंत कोणालाही विचारा त्याच्याकडे रंगास्वामी यांचा मोबाईल नंबर असणारच. अशा रंगास्वामींना भेटण्याची खूप इच्छा होती. फोनवरुन त्यांच्याशी बराच वेळ बोलणंही झालं. पण ते प्रचारात व्यस्त असल्यामुळे प्रत्यक्ष भेट मात्र झाली नाही. पण निवडणुका झाल्यानंतर पुद्दुचेरीला पुन्हा एकदा निवांत या, असं निमंत्रण द्यायला मात्र, ते विसरले नाहीत.

बाळासाहेबांचे फॅन्स



मी महाराष्ट्रातून आलोय, म्हटल्यानंतर अनेकांनी म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या राज्यातून का, अशीच विचारणा केली. चेन्नईमध्ये वकिली करणारे एल. गणपती हे त्यापैकीच एक. गणपती हे बाळासाहेबांचे भलतेच फॅन. काँग्रेसच्या नेत्यांनी एन. रंगास्वामी यांना कसा त्रास दिला आणि त्यामुळे त्यांना काँग्रेस कशी सोडावी लागली याबद्दल गणपती हे भरभरून बोलत होते. थोड्या वेळाने गाडी पुन्हा बाळासाहेबांकडे वळली. मला त्या माणसाचे सडेतोड विचार पटतात. ते आणि त्यांचा पक्ष आमच्या पुद्दुचेरीमध्ये हवा होता, अशी गणपती यांची इच्छा. पण ते शक्य नाही, हे गणपती यांनाही माहिती. बाळासाहेबांसारखा एखादा खमक्या माणूसच आमच्याकडे हवा, या नोटवर त्यांनी माझा निरोप घेतला.

Tuesday, April 05, 2011

तमिळनाडू खाद्ययात्रा

भातोबा, इडलोबा आणि डोसोबा...
तमिळनाडूमध्ये विधानसभेच्या कव्हरेजसाठी येण्याचं निश्चित झालं तेव्हा अनेकांनी अभिनंदन करताना म्हटलं, की आता काय मजा आहे. इडली, डोसा आणि भात खाऊन दिवस काढायचे आहेत तुला. तसं पहायला गेलं तर मला हे सगळ्ळं खूप आवडतं. त्यातून इडली तर माझी एकदम लाडकी. त्यामुळं मी पण मनातल्या मनात खूप खूष होतो. चेन्नईत पोहोचलो तेव्हा सुरुवातीचे तीन दिवस टाइम्सच्या गेस्ट हाऊसमध्ये व्यवस्था होती. तिथला आचारी हा उत्तर प्रदेशचा होता. रमेश यादव. दोन दिवसांनंतर त्याच्याजागी उत्तर प्रदेशचाच दुसरा कोणतरी आला. त्यामुळं सुरुवातीचे तीन दिवस मला दाक्षिणात्य पदार्थांचा पुरेपूर आस्वाद घेता आला नव्हता. जेवणात रोज पोळ्या असायच्याच. सकाळी नाश्त्याला मसाला डोसा (घावन स्टाईलचा) किंवा इडल्या ठरलेल्या. एका दिवशी छोटे उत्तप्पेही होते. पदार्थ मस्त असायचे पण ती चव रेग्युलर चव नव्हती. म्हणजे खास दाक्षिणात्य हॉटेलात असते तशी नव्हती.

नाही म्हणायला पहिल्या दिवशी टेन्यामपेट भागातील एका छोट्या हॉटेलात पुरी भाजी आणि कर्ड राईस खाल्ला होता. दुसऱ्या दिवशी अड्यार गेट परिसरातच एका ठिकाणी मसाला डोसा आणि पुन्हा एका कर्ड राईस खाल्ला. मसाला डोसा पुण्यात मिळतो तसाच होता. फारसा फरक नव्हता. पण दोन्हीकडील कर्ड राईस अमुलाग्र वेगळा. रसरशीत आणि मी आंबट. सोबत किसलेले गाजर किंवा गाजराचे तुकडे त्यामध्ये टाकलेले. लेमन राईस, कर्ड राईस, सांबार राईस, पोंगल, स्वीट राईस असे राईसचे किमान पाच-सात प्रकार प्रत्येक टिफीनमध्ये मिळतात.

चेन्नईसोडून पुद्दुचेरीला पोहोचलो आणि तिथं खऱ्या अर्थानं स्पेशल तमिळ राईस प्लेट मिळाली. पुद्दुचेरी बसस्टँडसमोरच स्री सब्थगिरी (मराठीत श्री सप्तगिरी) नावाचे हॉटेल आहे. एक नंबर प्रकार. पन्नास रुपयांमध्ये भरपूर जेवण. म्हणजे एक पोळी आणि हवा तेवढा राईस. सुरुवातीला ताटात आठ-दहा वाट्या, एक पोळी आणि एक पापड असा मेन्यू येतो. एक वाटी भेंडीच्या भाजीची, एक वांग्याच्या भाजीची, एकामध्ये सांबार, एकात सारम्, एकात दही, एकात मिरचीचा खर्डा लावलेलं ताक, आणखी एकात खीर (ती देखील भाताचीच), आणखी एका वाटीत आणखी कसलीशी भाजी. (किती लक्षात ठेवायचं)


एक पोळी संपल्यावर त्याला म्हटलं आणखी एक पोळी दे बाबा. तो म्हटला, वन्ली वन सर. तुम्हाला हवा तेवढा भात घ्या, पण पोळी एकच. बाबा पैसे देईन एक्स्ट्रॉ, असं म्हटल्यावर तो तयार झाला. दोन पोळ्या घेतल्यानंतर त्यानं जो भात वाढला तो पाहून चक्करच यायची बाकी होती. परत इतकं वाढून आणखी वाढू का, असं विचारत होता. म्हटलं, बाबा काय मारतोस की काय भात खायला घालून. हैदराबादची आठवण झाली. तिथंही राईस प्लेटही खरोखरच राईस प्लेट होती. फक्त राईस राईस आणि राईस. पहिला भात, मधला भात आणि शेवटचा भात. आंबट आणि आपल्यापेक्षा थोडं जास्त तिखट असं जेवून तृप्त मनानं उठलो.

तिथंच दुसऱ्या दिवशी सकाळी मसाला डोसा खाल्ला. मसाला डोसा हा कुठेही खा तो कुरकुरीत अजिबात नसतो. घावनसारखाच जाडसर असतो. (मला तर वाटतं, पुण्यातल्या तमाम उडुपी हॉटेल्स कुरकुरीत डोसाच्या नावाखाली लोकांना जास्त पैसे घेऊन फसवितात. अन्यथा हैदराबाद, चेन्नई, पुद्दुचेरी कुठेही जा, कुरकुरीत डोसा कुठेही मिळत नाही. मग ही मंडळीच कुठून ही शक्कल लढवितात. बरं, आपण पण कुरकुरीत डोसा, कुरकुरीत डोसा करून त्यांच्या घशात बक्कळ पैसे ओतत असतो.) सोबतीला दोन-तीन चटण्या आणि घट्ट सांबार. पुद्दुचेरीहून कुडलूर, चिदंबरम, कुंभकोणममार्गे तंजावूरला पोहोचलो. (आपल्याला फक्त पुलंच्या असामी असामी मधला प्रोफेसर कुंभकोणम माहिती होता. कुंभकोणम नावाचं गाव आहे, ते आजच कळलं. अर्थात, चिदंबरम नावाचं गाव आहे, हे माहिती होतं.)

तंजावूर इथं बसस्टँडच्या जवळच आर्य भुवन नावाचं एक सॉल्लिड टिफीन सेंटर आहे. तिथं इडली खाल्ली. खाल्ली नाही खाल्ल्या नाही. मस्त केळीचं पान. त्यावर दोन गरमागर इडल्या. समोर दोन वाट्या सांबार. नंतर तीन प्रकारच्या चटण्या. एक नारळाची पांढरी चटणी. एक हिरवी तिखट चटणी. आपण तयार करतो तशी. आणि एक लाल चटणी. टोमॅटो आणि लाल मिरची घालून तयार केलेली आंबट चटणी. गरमागरम मऊ लुसलुशीत चटणी कशाबरोबर खायची ते तुम्ही ठरवा आणि तुटून पडा. दोनवर थोडंच भागणार आहे. मग आणखी दोन मागविल्या. तेव्हा कुठं समाधान झालं. नंतर मस्त कडक कॉफी घेतली आणि बाहेर पडलो.


आर्य भुवनच्या जवळच एक छोटंस स्नॅक्स सेंटर आहे. तिथं गरीब लोकांची गर्दी जास्त. दोन रुपयांना ओनियन वडा, उडीद वडा, तीन रुपयांना पॅटिस किंवा सामोसा, चार रुपयांना चहा किंवा सहा रुपयांना ऑरेंज सरबत, असा अगदी सामान्य गरीबांना परवडेल असा मेन्यू. सोबतील चिवडा आणि चकण्याचे अनेक आयटम्स. लाडू, जिलेबी आणि इतर पदार्थही. तिथं खाणारी आणि घरी नेणारी मंडळी मोठ्य़ा संख्येनं इथं दिसतात. इडली, डोसा आणि भाताचे अजूनही काही दिवस बाकी आहेत. तेव्हा पुन्हा एकदा लवकरच भेटू नव्या शहरांसह, नव्या पदार्थांसह आणि नव्या चवीसह.

नन्ड्री.

तमिळ शिका तरच पैसे मिळतील

चेन्नईहून पाँडिचेरीसाठी निघालो आणि तमिळनाडूमध्ये तमिळ भाषेचे महत्त्व का टिकून आहे, याचा साक्शात्कार मला प्रवासादरम्यान झाला. तमिळनाडूमध्ये कोठेही काम करा, तमिळ आल्याशिवाय तुम्हाला नोकरी मिळत नाही किंवा जादा पैसेही मिळत नाही. तेव्हा जास्त पैसे मिळवायचे असतील तर तमिळ शिकण्यावाचून तुम्हाला गत्यंतरच नाही, ही गोष्ट उत्तर प्रदेशहून आलेल्या एका भैय्या मुलाकडून मला समजली. तेव्हा मला धक्का वगैरे काही बसला नाही. पण जे काही ऐकले होते ते प्रत्यक्श अनुभवल्याचा साक्शात्कार झाला.
सोनू असं त्या मुलाचं नाव. वय साधारण पंचवीस सव्वीस असेल. सोनू हा मूळचा उत्तरप्रदेशचा. रामपूर किंवा तत्सम कुठल्या तरी खेड्यातला. दोन वर्षांपूर्वी तो मुंबईमध्ये फर्निचर बनविण्याच्या धंद्यात कारागिर म्हणून लागला होता. तिथं त्याला सकाळी दहा ते संध्याकाळी सहा या कालावधीचे दोनशे रुपये मिळायचे. पण चेन्नईमध्ये तितक्याच कामाचे त्याला साडेतीनशे रुपये रोज मिळतात. त्यामुळे त्यानं मुंबई सोडून चेन्नईत येण्याचा निर्णय घेतला. मुंबईमध्ये भैय्या लोकांची खूप गर्दी असल्यामुळे तिथं जास्त पैसे मिळत नाही. पण चेन्नईमध्ये कारागिर लोकांची कमतरता असल्याने इथं आम्हाला जास्त भाव मिळतो, असं सोनू सांगतो.
चेन्नईतही कारागिरांचे दोन प्रकार आहेत. ज्यांना तमिळ येते, अशा कारागिरांनाच तमिळ ठेकेदार कामावर ठेवतात. तमिळ ठेकेदारांकडे काम केले तर आम्हाला दिवसाला साडेतीनशे रुपये मिळतात. जर गैरतमिळ (म्हणजे हिंदीभाषक) ठेकेदाराकडे काम केले तर मुंबईप्रमाणेच दोनशे रुपये रोजाने काम मिळते. त्यामुळे आम्हाला जास्त पैसे मिळवायचे असतील तर तमिळ भाषा शिकावीच लागते. तमिळनाडूत येऊन जर मुंबईचाच भाव मिळणार असेल तर इथे येण्याचा काय उपयोग, असा सवाल सोनू उपस्थित करतो.
तमिळनाडूमध्ये आल्यावर तमिळ शिकला. मग मुंबईमध्ये असताना मराठी शिकला होता का? हा माझा प्रश्न ऐकून तो चक्रावूनच गेला. मी मूर्ख म्हणून असा प्रश्न विचारतो आहे, की काय असाच त्याचा चेहरा झाला होता. सोनू म्हणाला, साहेब, मुंबईमध्ये मराठी लोकच हिंदीमध्ये बोलतात. त्यामुळे आम्हाला तिथे भाषेचा प्रॉब्लेम कधीच आला नाही. आम्ही आमच्याच प्रांतामध्ये आहोत, असे आम्हाला वाटायचे. त्यामुळे महाराष्ट्रात असताना किंवा मुंबईमध्ये असताना मराठी शिकण्याचा प्रश्नच आला नाही. तिथे मराठी न शिकताही आम्हाला नोकरी आणि पैसे मिळत होते. मात्र, इथे तसे नाही. त्यामुळे तमिळ आम्हाला शिकावीच लागली.
काही महिन्यांपूर्वी तमिळनाडूमध्ये राजस्थानी लोकांचे एक संमेलन झाले होते. त्यावेळी त्यांनी राजस्थानी भाषेतील गाणी आणि संगीत जोरजोरात लावले होते. त्यावेळी काही जणांनी त्यांच्याबद्दल तक्रार केली आणि हा मुद्दा करुणानिधी यांच्यापर्यंत गेला. त्यावेळी करुणानिधी यांनी त्यांना सज्जड भाषेत इशारा दिला होता, तुम्हाला गाणी ऐकायची ऐका, काम करायचे आहे करा. तुम्हाला कोणी अडविणार नाही. पण जेव्हा भाषेचा मुद्दा येईल, तेव्हा तुम्हाला तमिळ आलीच पाहिजे. बोलायचे मात्र, तमिळमध्येच. ब-याच दिवसांपूर्वी वाचलेला हा किस्सा नुसता डोक्यात होता. सोनूच्या निमित्ताने त्याचा थेट अनुभव आला.
तमिळनाडू डायरी
जयललिता आणि विजयकांत यांच्यासह इतर विरोधकांनी ए. राजा यांच्यावरील आरोपांचा मुद्दा लावून धरला नसला तरी सर्वसामान्य रिक्शावाल्यांपर्यंत हा मुद्दा नीट पोहोचलेला आहे, याचा प्रत्यय चेन्नईमध्ये आला. चेन्नईहून पुद्दुचेरी येथे येण्यासाठी बस स्टँडला जायला निघालो. तेव्हा मी रिक्शामध्ये बसलो त्याचा ड्रायव्हर रघू नावाचा माणूस होता. तो मूळचा कर्नाटकचा. तो मोठा झाला आंध्र प्रदेशात आणि रिक्शा चालवितो चेन्नईमध्ये, म्हणजे तमिळनाडूत.
कुंचूम कुंचूम हिंदी, कुंचूम कुंचूम इंग्लिश, असं तो म्हणला. म्हणजे मला थोडं थोडं हिंदी आणि इंग्लिश समजतं असं. त्याला मी विचारलं, काय यंदा कोणाला संधी आहे? त्यावर त्यानं क्शणाचाही विलंब न करता सांगितलं, की यंदा अम्माच. मी म्हटलं, का? तेव्हा तो म्हणाला, की त्या राजानं संपूर्ण देशाला लुटलं. पावणे दोन करोडचा गफला केला. सगळ्या तमिळनाडूचं नाव खराब केलं, असं म्हणत रिक्शावाल्यानं एक पंचाक्शरी शिवी हासडली. पुन्हा तमिळमध्ये दोन-चार अपशब्द वापरून नवी पंचाक्शरी हिंदी शिवी हासडून यंदा अम्माच, असं ठासून सांगितलं. त्यामुळं विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला नसला तरी काही चलाख लोकांना त्याची पुरेपूर माहिती आहे, असंच म्हणावं लागेल.
आजचा तमिळ शब्द वेईप्पाळः शब्दाचा अर्थ उमेदवार

Monday, April 04, 2011

करुणानिधी यांच्या घराणेशाहीवरच हल्ला

तमिळनाडूच्या प्रचारातून टू जी गायब


संपूर्ण देशाला हादरवून टाकणा-या टू जी घोटाळ्यामुळे मंत्रिपद गमवावे लागलेल्या ए. राजा यांच्या तमिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात या महाघोटाळ्याचा साधा उल्लेखही होताना दिसत नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अण्णा द्रमुकच्या नेत्या जे. जयललिता यांनीही या मुद्द्दायाला हात न घालता थेट करुणानिधी यांच्या घराणेशाहीवरच हल्ला चढविला आहे. पावणे दोन लाख कोटींच्या टू जी घोटाळ्यामुळे आम्हाला कुठे काय फरक पडतो, असा उलट सवाल विचारून तमिळ मतदारही हा मु्द्दा निकालात काढत आहेत.

केंद्र सरकारला अडचणीत आणणा-या टू जी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी ए. राजा हे सत्ताधारी द्रविड मुन्नेत्र कळघम पक्शाचे. त्यामुळे द्रमुकला अडचणीत आणण्यासाठी विरोधी पक्शनेत्या जे. जयललिता हा मुद्दा हिरीरीने मांडतील, असा विचार पुण्याहून चेन्नईला येताना मनात आला होता. मात्र, जयललिता नव्हे तर डीएमडीके पक्शाचे नेते विजयकांत यांनी देखील टू जी घोटाळ्याबद्दल ब्र देखील काढला नसून वाढती महागाई, राज्यातील विजेचे संकट आणि करुणानिधी यांच्या कुटुंबीयांची दादागिरी आणि राज्यभरात वाढलेल्या गुन्हेगारीच्या घटना या नेहमीच्याच मुद्द्यांभोवती विरोधकांचा प्रचार फिरत आहे.

करुणानिधी आता थकले असून वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांना विश्रांतीची गरज आहे. दुसरीकडे करुणानिधी यांचे पुत्र स्टॅलिन आणि अळगिरी तसेच कन्या कनिमोळी यांच्यामध्ये नेतृत्त्वावरून प्रचंड मतभेद आहेत. हाच मुद्दा जयललिता त्यांच्या भाषणांमधून हायलाईट करीत आहेत. शिवाय जगातील श्रीमंतांच्या यादीमध्ये समावेश होईल, इतकी संपत्ती करुणानिधी कुटुंबाने ओरबाडली आहे, असा आरोप जयललिता करीत आहेत. दुसरीकडे कोईमतूर, सेलम आणि इरोड यासारख्या पश्चिमी जिल्ह्यांमध्ये रंगाचे कारखाने आणि यंत्रमाग यांची संख्या प्रचंड आहे. त्यांना भारनियमनाचा फटका बसत असून हाच मुद्दा जयललिता यांनी लावून धरला आहे. तमिळनाडूच्या दक्शिण भागात द्रमुकच्या अळगिरी यांचे वर्चस्व असून त्यांची दादागिरी आणि तेथील वाढती गुन्हेगारी हे मुद्दे जयललिता यांच्या भाषणांमध्ये प्रामुख्याने येतात.

टू जी स्पेक्ट्रमसारखा महाप्रचंड घोटाळ्याचा मुद्दा हातात असतानाही जयललिता त्याला महत्त्व का देत नाहीत, यावर तमिळनाडूतील वरिष्ठ राजकीय विश्लेषक श्री. मणी म्हणाले, की मुळात टू जी हा घोटाळा तमिळनाडूतील लोकांपर्यंत पोहोचलेला नाही. तो घोटाळा म्हणजे नक्की काय झाले आणि त्याचा आपल्याला थेट काय फटका बसणार हे त्यांना समजलेले नाही. अशा परिस्थितीत महागाई, भारनियमन आणि करुणानिधी यांच्या कुटुंबियांचे पटकन नजरेत भरणारे वैभव हे मुद्दे सामान्य नागरिकांच्ा अत्यंत जिव्हाळ्याचे आहेत. ते मुद्दे पटले तरच लोक मते देतील. टू जीमुळे फारशी मते मिळणार नाहीत, हे जयललिता यांना ठाऊक आहे. त्यामुळेच त्यांनी आणि विजयकांत यांनी हा मुद्दा भाषणांमध्ये काढला नाही.

बॉक्स

द्रमुकचे अध्यक्श एम. करुणानिधी हे त्यांच्या समर्थकांप्रमाणेच तमिळ लोकांमध्ये कलैंग्नार या नावाने ओळखले जातात. कलैंग्नार म्हणजे कलेचे मर्म जाणणारा निष्णात कलावंत. करुणानिधी हे कलैंग्नार नावाने ओळखले जातात तर जयललिता यांचे सुप्रसिद्ध नाव म्हणजे अम्मा. पण अण्णा द्रमुकच्या कार्यकर्त्यांमध्ये त्या पुरच्ची तलैवी या नावाने लोकप्रिय आहेत. पुरच्ची तलैवी म्हणजे क्रांतिकारी महिला नेत्या. जयललिता यांचे राजकीय गुरु एम. जी. रामचंद्रन हे पुरुच्ची तलैवर म्हणून ओळखले जायचे. पुरुच्ची तलैवरचे स्त्रीलिंगी रुप म्हणजे पुरुच्ची तलैवी. त्यामुळे हा सामना कलैंग्नार आणि पुरुच्ची तलैवी यांच्यातच आहे.

आजचा शब्दः अदिरेडी. त्याचा अर्थ खूप मोठा आणि महत्वाचा. विजय या शब्दाशी सुसंगत असलेला आणि वापरला जाणारा तमिळ शब्द. भारताच्या विश्वविजयाचे वर्णन करण्यासाठी दिनकरन आणि दिनमणि वृत्तपत्रांमध्ये हा शब्द वापरलेला आहे.

हटविलेला पुतळा कण्णगी यांचा

चेन्नईतही पुतळ्याचे राजकारण

पुतळ्यावरून झालेले रणकंदन आणि त्यानंतर मध्यरात्रीच्या काळोखात अचानकपणे हलविला गेलेला पुतळा... पुण्यात घडलेल्या या घटनेसारखीच घटना चेन्नईमध्येही घडली होती, जवळपास दहा वर्षांपूर्वी. रातोरात हटविल्या
गेलेल्या पुतळ्यामुळे संपूर्ण तमिळनाडूत त्याचे तीव्र पडसाद उमटले होते आणि साहित्यिक, कलावंत सामान्य नागरिकांनही त्याचा तीव्र शब्दात निषेध केला होता. हटविण्यात आलेला पुतळा होता महिलांच्या न्यायासाठी झगडणा-या आणि तमिळ महिलांचा आदर्श असलेल्या कण्णगी यांचा.

आठव्या शतकातील एका तमिळ महाकाव्यामध्ये कण्णगी या नायिका असून त्यांनी न्यायाच्या रक्शणासाठी आणि महिलांच्या हक्कांसाठी लढा दिला, असे त्या महाकाव्याचा आशय आहे. त्यामुळे गेल्या अनेक शतकांपासून कण्णगी या तमिळ अस्मितेच्या मानबिंदू बनलेल्या आहेत. कण्णगी हे पात्र काल्पनिक असले तरी
तमिळनाडूच्या काही भागात त्यांची आजही पूजा केली जाते. १९६८ साली झालेल्या वर्ल्ड तमिळ क़ॉन्फरन्समध्ये ठराव केल्यानंतर कण्णगी यांचा पुतळा मरीना बीच येथे बसविण्यात आला होता. पण २००१ मध्ये अण्णा द्रमुकचे
सरकार सत्तेवर असताना तो पुतळा एकाएकी रात्री अचानक हलविण्यात आला. त्यावेळी अण्णा द्रमुकचे . पनीरसेल्वम हे मुख्यमंत्री होते. जयललिता यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे राजीनामा दिला होता. त्यांच्या जागी
पनीरसेल्वम आले होते.



पुतळा हटविण्याची तीन वेगवेगळी कारणे सांगितली जातात. पहिले कारण म्हणजे जयललिता यांच्यावर ओढविलेले संकट हे कण्णगी यांच्या पुतळ्यामुळे आलेले आहे. तो पुतळा त्याठिकाणी असल्यामुळेच जयललिता यांचा कठीण काळ सुरु झाला आहे, असे कोणीतरी जयललिता यांच्या मनात भरविल्यामुळेच तो पुतळा हटविण्यात आला, अशी एक थिअरी आहे. दुसरे म्हणजे कण्णगी यांच्या पुतळ्याची पाठ समुद्राकडे आहे, त्यामुळे पावसाने तमिळनाडूकडे पाठ फिरविली आहे, अशा कंड्या कोणीतरी पिकविल्या आणि त्यामुळे पुतळा हटविण्यात आला, असे काही जण सांगतात. अर्थात, सरकारने दिलेले कारण म्हणजे वाहतुकीला होत असलेला अडथळा. एका वाहनाने कण्णगी यांच्या पुतळ्याला धडक दिली होती, त्यामुळे तो दुरुस्तीसाठी हटविण्यात आला, अशी माहिती मुथ्थू रामचंद्रन यांनी दिली.

पुतळा हटविण्यात आल्यानंतर राज्यभरात सर्वत्र हलकल्लोळ माजला होता. लोकांनी निषेध मोर्चे काढले. विरोधकांनी एकत्र येऊन सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. पण जयललिता या कोणालाही बधल्या नाहीत. पुतळ्याला हानी पोहोचू नये, म्हणून तो वस्तूसंग्रहालयात ठेवण्यात आलेला आहे. पुतळा सुस्थितीत आहे, इतकेच जयललिता आणि पनीरसेल्वम माध्यमांना सांगत होते.

पुतळा हटविण्याचा विषय २००६ साली झालेल्या निवडणुकीचा मुद्दा झाला होता. पुन्हा सत्तेवर आलो तर पूर्वीच्याच ठिकाणी पुतळा पुन्हा सन्मानाने बसवू, असे आश्वासन करुणानिधी यांनी दिले होते. ते त्यांनी पाळले देखील. आज
कण्णगी यांचा पुतळा मरीना बीचवर मोठ्या दिमाखात उभा आहे. त्या पुतळा हटविण्याचा आणि पुन्हा बसविल्याचा उल्लेख करण्यास करुणानिधी अजिबात विसरलेले नाहीत.

बसमधून प्रवास करताना एका सहप्रवाशाला विचारले, की यंदा जयललिता सत्तेवर आल्यातर पुन्हा पुतळा हटवतील का? त्यावर त्याने उत्तर दिले, सरकार कोणाचे येणार याचा अंदाज अजून राजकीय पक्शांनाही आलेला नाही. त्यामुळे आपण येणार की नाही, याच चिंतेत ते आहेत. त्यामुळे त्यांना पुतळ्या बितळ्याची चिंता
सध्या नाही. तो नंतरचा प्रश्न आहे.

एसएसएम क़ॉलेजमध्ये इंजिनिअरिंगचे शिक्शण घेणा-या महेशकुमारला पुतळ्याबद्दल विचारले तर तो म्हणाला, नो आयडिया सरजी. आता बोला.

एमजीआर यांच्या घड्याळाची टिकटिक...
मरीना बीचवरच तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि तमिळनाडूतील सर्वाधिक लोकप्रिय सुपरस्टार एम जी रामचंद्रन यांची समाधी आहे. २४ डिसेंबर १९८७ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाचे दुःख सहन झाल्यामुळे तमिळनाडूत त्यावेळी ३० जणांनी आत्महत्या करून आपल्या लाडक्या अभिनेत्याच्या बरोबरच जीवन संपविले होते. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी मरीना बीच येथे एमजीआर यांची समाधी बांधण्यात आली आहे. द्रविडीयन चळवळीचे प्रमुख नेते अण्णादुराई आणि एमजीआर यांची समाधी शेजारीशेजारीच आहेत.

एमजीआर यांना महागडी घड्याळे जमविण्याचा आणि घालण्याचा मोठा शौक होता. त्यामुळे एमजीआर यांच्या काही अस्थि आणि त्यांच्या आवडीचे घड्याळ समाधीखाली ठेवण्यात आलेले आहे संपूर्ण काळ्या कुळकुळीत कडप्प्याने ही समाधी साकारलेली आहे. मध्यंतरीच्या काळात कोणीतरी अशी आवई उठविली की, समाधीच्या पृष्ठभागाला कान लावले, की अजूनही एमजीआर यांच्या घड्याळाची टिकटिक ऐकू येते. (पुण्यातही शनिवारवाड्यावर अजूनही काका, मला वाचवा, असे आवाज येत असल्याची अफवा गमतीनं का होईना कानावर येतेच) समाधीचे दर्शन घेण्यासाठी आलेले लोक दर्शन घेण्यापूर्वीच समाधीला कान लावून खरंच टीकटीक
ऐकू येते का? ते पाहतात.



वास्तविक पाहता २४ वर्षांनंतर घड्याळाची टीकटीक कशी ऐकू येईल? पण आजही अनेक जण नित्यनियमाने कान लावून आवाज येतो का? ते ऐकतात. अगदी जीन्सची पँट आणि टी-शर्ट घातलेले तरुण-तरुणी यांनाही मोह आवरता येत नाही. मग काय, मी देखील उत्सुकतेपोटी समाधीला कान लावून काही ऐकू येतंय का, ते पाहिलं.
पण अपेक्शेप्रमाणे काहीच ऐकू येत नव्हतं. माझ्यानंतर एका क़ॉलेजमधल्या तरुणानं कान लावला. त्यालाही काही ऐकू आलं नाहीच. त्याला विचारलं, काही ऐकून आलं का? हे सगळे मूर्ख आहेत, हे वाक्य उच्चारण्यापूर्वी त्यानं जो
एक शब्द (खरं तर अपशब्द) उच्चारला तो ऐकून पुण्यातच असल्याचा भास झाला आणि धन्य झालो.

आजचे वाक्यः बसमधून प्रवास करताना शेजारी बसलेल्या एका मुलाला विचारलं,
मला तमिळ शिकायचंय, हे तमिळमध्ये कसं बोलणार?
तो म्हणाला, नानकू तमिळ कोत्तुकोनम्...

तमिळनाडू डायरी...

खरा प्रचार चॅनल्सवरूनच

तमिळनाडू म्हटलं, की आपल्या डोळ्यासमोर चित्र येतं मोठमोठाले फ्लेक्स, भव्य कटआऊट्स आणि फ्लोरसंट रंगांनी रंगविलेल्या भिंती. चित्रपटातील नटनट्यांचे मोठमोठाले फ्लेक्स पाहून राजकीय नेत्यांचेही तसेच भव्य फ्लेक्स वगैरे असतील, अशी धारणा होती. पण निवडणूक आयोगाच्या निर्बंधांमुळं इथं ते काहीही नाही. भव्य फ्लेक्स आहेत. पण ते द्रमुक आणि अण्णा द्रमुकच्या कार्यालयांमध्ये. प्रचाराचा विचार करता रस्त्यांवर शुकशुकाट आहे. मधूनच एखाद दोन रिक्शा द्रमुक किंवा अण्णा द्रमुकचे झेंडे लावून चाललेल्या दिसतात. पण बाकी सारे शांतशांतच.



नुसते रस्तेच नाही तर द्रमुक आणि अण्णा द्रमुक या राज्यातील दोन प्रमुख कार्यालयांमध्येही शुकशुकाट. नेते नाहीतच आणि त्यामुळे कार्यकर्तेही नाहीत. आहेत फक्त सिक्युरिटी गार्डस आणि पोलीस. हाताच्या बोटावर मोजण्याइतके जे कार्यकर्ते दिसतात ते आपापल्या भागात प्रचार करताना येणा-या अडचणी सांगायला आलेले. द्रमुक अध्यक्श एम. करुणानिधी, त्यांचे पुत्र स्टॅलिन आणि अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस जे. जयललिता यांनी सध्या चेन्नई आणि परिसरावर लक्श केंद्रीत केले आहे. जयललिता यांनी शुक्रवारी संध्याकाळी चेन्नई शहरात रोड शो घेऊन मतदारांशी संवाद साधला. तर स्टॅलिन हे शनिवारी कोळथ्थूर (चेन्नई ग्रामीण) या त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात प्रचार करणार आहेत. रविवारी कलैंग्नार करुणानिधी यांची चेन्नईमध्ये जाहीर सभा आहे.

प्रचाराची खरी रंगत येते आहे, ती कलैंग्नार आणि जया टीव्ही या दोन चॅनल्सवर. कलैंग्नार हा करुणानिधी यांच्या मालकीचा चॅनल. तर जयललिता या जया टीव्हीच्या मालकीणबाई. अण्णा अरिवालयम इथं कलैंग्नार टीव्हीचं मुख्य कार्यालय आणि तिथंच द्रमुकचं हेडऑफिस. तर पोएज गार्डनमध्ये जे. जयललिता यांचा बंगला आणि शेजारीच जया टीव्हीचं हेडक्वार्टर. करुणानिधी यांच्या जाहीर सभा कलैंग्नारवरून लाईव्ह टेलिकास्ट केल्या जात आहेत. तर जयललिता यांचे रोड शोमधील भाषण जया टीव्हीवरून दिवसभर ऐकायला मिळतं. भाषा कळत नसली तरी जयललिता सगळीकडे एकच भाषण करतात, हे कळतं. ते देखील समोर लिहिलेल्या कागदावर वाचून. उलट करुणानिधी हे भाषणामधून मनमोकळा संवाद साधतात.

डीएमडीके पक्शाचे अध्यक्श आणि तमिळ अभिनेते विजयकांत यांनी आपल्याच कार्यकर्त्याच्या कानफटात लगाविल्याचे वृत्त सध्या इथल्या टीव्हीवर चर्चेने चघळते जाते आहे. विजयकांत यांची जयललिता यांच्याशी युती असल्याने जया टीव्हीवर त्या वृत्ताला थारा नाही. मात्र, कलैंग्नार आणि सन टीव्हीवर प्रत्येक बातमीपत्रात वारंवार ते दृष्य दाखवून चघळलं जातंय. सन टीव्ही हा दयानिधी कलानिधी मारन यांच्या मालकीचा चॅनल आहे. शिवाय दक्शिणेच्या चार राज्यांमधील ८५ टक्के केबल व्यवसाय करुणानिधी आणि कुटुंबीयांच्या हातात आहे.



इथं, जाणवलेला आणखी एक प्रकार म्हणजे लोक आपापल्या नेत्याबद्दल भरभरून बोलतात. मत देऊन आम्हाला काय फायदा, आम्ही मतदान केल्यामुळे थोडाच फरक पडणार आहे, आम्ही मतदानच करत नाही, असली वाक्य इथं ऐकायलाही मिळत नाही. अम्मा किंवा कलैंग्नार यापैकी त्याच्या आवडत्या व्यक्तीचे कौतुक तो सुरुच करतो. नुसतं कोण असं नाही तर ती व्यक्ती का पाहिजे, ते देखील दोन-चार वाक्यांमध्ये सांगतो. अर्थात, ते आपल्याला कळत नाही. पण भावना पोहोचतात.

चेन्नई म्हणजे दुसरी मुंबई. एक तर प्रशस्त रस्ते. दुसरं म्हणजे शहरातील बसव्यवस्था एकदम उत्तम आणि तिसरं म्हणजे समुद्र किनारा जवळच असल्यामुळं घाम आणि उकाडा यांचा अतूट संबंध. सकाळी आठ वाजताच अकरा साडेअकरा वाजल्यासारखं वाटतं. पण संध्याकाळ नंतर गार वारे वाहू लागल्यानंतर बरं वाटतं. इथले लोक तोडकं मोडकं हिंदी बोलतात. पण त्यापेक्शा उत्तम हिंदी बोलतात. तमिळा... असं म्हणून आपल्याला तमिळ येतं की नाही, याची खात्री करून घेतात आणि मग गाडी इंग्लिशकडे वळवितात. अर्थात, तरुण तरुणी मात्र, अधिक चांगल्या पद्धतीने हिंदीतून संवाद साधतात.

लिंबू सरवतवाल्याकडून शिकलेला आजचा तमिळ शब्दः नन्ड्री (धन्यवाद)