Sunday, February 21, 2016

मुंडू, वेष्टीच्या गोष्टी


लुंगी नव्हे धोती...

साधारण पाच वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. विधानसभा निवडणुकीसाठी तमिळनाडूत गेलो होतो. मदुराईत गेल्यानंतर सुप्रसिद्ध मिनाक्षी मंदिरात दर्शनासाठी गेलो होतो. तंजावूर ते मदुराई बस प्रवासात दोस्त झालेला एन. बी. दीपक हा देखील माझ्याबरोबर होता. मंदिरात जात असताना एक बोर्ड वाचला आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला. तो बोर्ड होता, ‘LUNGIES NOT ALLOWED’. तमिळनाडूतील मंदिरांमध्ये लुंगी नेसणाऱ्या मंडळींना परवानगी नाही, तर मग कोणाला? लोक नेमकं नेसून तरी काय जातात मग मंदिरात? आपल्या प्रवेश मिळणार काय? अशी प्रश्नांची सरबत्तीच मी दीपकवर केली. माझा नेमका काय गोंधळ झालाय हे त्याच्या लक्षात आलं आणि त्यानं सविस्तर खुलासा केला.



दाक्षिणात्य मंडळींबद्दल आपले जे काही समज-गैरसमज असतात, त्यापैकीच तो एक होता, असं नंतर माझ्या लक्षात आलं. दक्षिणेकडील चारही राज्यांमध्ये पुरुष मंडळी कमरेला जे वस्त्र गुंडाळतात, ते म्हणजे लुंगी, असं आपल्याला वाटतं. मात्र, तसं अजिबात नाही. लुंगी म्हणजे चित्रविचित्र रंगांमध्ये असलेले, ठिपक्या ठिपक्यांपासून ते प्राण्या-पक्ष्यांपर्यंत कशाचेही डिझाइन छापलेले, चेक्समध्ये उपलब्ध असलेले वस्त्र म्हणजे लुंगी. दोन्हीत काही ठिकाणी आढळणारा आणखी एक फरक म्हणजे लुंगी गोलाकार असते. त्याला मोकळी बाजू नसते. तर धोतीच्या दोन्ही बाजू मोकळ्या असतात. तशा पद्धतीची लुंगी नेसून मंदिरात जायला मनाई आहे, असं दीपकनं मला समजावून सांगितलं.

लुंगी नव्हे धोती
मग माझा पुढचा प्रश्न होता, की पांढरी लुंगी असते त्याला काय म्हणतात? तमिळनाडूत त्याला धोती किंवा ‘वेष्टी’ म्हणतात, असं त्यानं सांगितलं. धोती मी समजू शकत होतो. पण वेष्टी म्हणजे काय? या प्रश्नावर त्यानं दिलेलं उत्तर भारी होतं. ‘मला माहिती नाही. बहुधा ‘वेस्ट’ला (कमरेला) गुंडाळतात, म्हणून ‘वेष्टी’ असेल,’ असं एकदम भारी उत्तर त्यानं मला दिलं. अर्थातच, ते चुकीचं होतं. तमिळमध्ये ‘वेट्टी’ म्हणजे कापलेले कापड. त्याचा अपभ्रंश होत होत ‘वेष्टी’ हा शब्द आला, असे काही जण सांगतात. तर काहींच्या मते संस्कृत शब्द ‘वेष्टन’ (कव्हर) या शब्दावरून आला असावा. हे झालं तमिळनाडूचं. केरळमध्ये त्याला मुंडू म्हणतात. काही जण केरला धोती म्हणूनही त्याचा उल्लेख करतात. आंध्रप्रदेश आणि तेलंगणमध्ये पंचा म्हणतात. तर कर्नाटकात लुंगीच म्हणतात. कन्नड भाषेतही लुंगीसाठी वेगळा शब्द नाही.


लुंगी म्हणजे घरात नेसायची किंवा बाजारहाटाला जाताना नेसायचे वस्त्र. धोतीच्या तुलनेत लुंगीला प्रतिष्ठा कमी. देवाच्या दरबारी तर लुंगी हद्दपारच. पांढरी शुभ्र, क्रीम कलरची किंवा क्वचित प्रसंगी भगव्या रंगाची (कावी मुंडू) स्वच्छ धुतलेली धोतीच मंदिरामध्ये जाताना हवी. त्यातही काही अपवाद आहेतच. केरळमधील मंदिरांमध्ये अय्यप्पा भक्तांना फक्त काळे मुंडूच नेसावे लागते. इतर रंगांचे मुंडू चालत नाही. पण त्याच काळ्या धोतीला तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातील अनेक मंदिरांमध्ये स्थान नाही. तिथं शुभ्र पांढऱ्या किंवा फिकट क्रीम रंगाची धोतीच हवी. कर्नाटकातील काही मंदिरांमध्ये जर गाभाऱ्यामध्ये जाऊन पूजा करायची असेल तर जरीच्या काठांचे रेशमी धोतीच आवश्यक असते. काही मंदिरांत फक्त धोतीच नाही, तर खांद्यावर उपरणे घेऊनच प्रवेश करावा लागतो.

कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात काही ठिकाणी मजूर किंवा कष्टकरी वर्ग हे रंगीबेरंगी प्रकारातील लुंगी परिधान करतात. अनेकदा त्याचे रंग भडकच असतात. त्याचे कारणही अगदी योग्य आहे. कष्टाची कामे करताना लुंगीचा रंग जितका मळखाऊ असेल किंवा भडक असेल, तितके ते उत्तम असते. त्यामुळेच कष्टकरी मंडळी भडक रंगाची लुंगी परिधान करून कष्टाची कामे करताना दिसतात. आंध्र प्रदेशात रायलसीमा किंवा किनारपट्टीच्या काही भागांमध्ये पांढऱ्या शुभ्र रंगाचे पंचे (धोती) परिधान करणारी मंडळी ही प्रामुख्याने देशमुख किंवा पाटील समाजाची किंवा गावातील प्रतिष्ठीत मंडळी असतात.

नेसण्याच्या पद्धतींमध्ये वैविध्य 
अनेक जण प्युअर कॉटनची धोती नेसणे पसंत करतात. मुख्य म्हणजे कॉटनची धोती असेल तर बहुतेक मंडळी पट्टा बांधत नाहीत. मात्र, धोती टेरिकॉटची असेल तर मात्र, आवर्जून पट्टा बांधावा लागतो. मुंडू बांधण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. निऱ्या करून ते अशा विशिष्ट पद्धतीने खोचतात, की काहीही झालं तरी ते सुटत नाही. ते कमरेवर एकदम फिट्ट बसते. तमिळनाडूमध्येही काहीशा अशाच पद्धतीने वेष्टी नेसतात.


मुंडू किंवा वेष्टी नेसण्याची प्रत्येक ठिकाणाची पद्धती वेगवेगळी आहे. केरळमध्ये हिंदू आणि ख्रिश्चन मंडळी मुंडू नेसताना त्याची मोकळी बाजू (ज्याला मल्याळममध्ये कडा म्हणतात) उजवीकडे येईल अशा पद्धतीने नेसतात. केरळमधील मलबार प्रांतातील मुस्लिम मंडळी बरोबर उलट्या पद्धतीने म्हणजे मोकळी बाजू डावीकडे येईल, अशा पद्धतीने मुंडू परिधान करतात. तमिळनाडूतील अय्यंगार ब्राह्मण मंडळी अशाच पद्धतीने उजवीकडून डावीकडे (मोकळी बाजू डावीकडे) वेष्टी परिधान करतात. तर तमिळनाडूत उर्वरित बहुतांश मंडळींच्या धोतीची कडा उजवीकडेच येते. आंध्र प्रदेशात किंवा कर्नाटकात मात्र, विशिष्ट जाती किंवा धर्मासाठी विशिष्ट पद्धतीनेच पंचे वा लुंगी परिधान केली पाहिजे, असे संकेत नाहीत. ही मंडळी सर्वसाधारणपणे मोकळी बाजू उजवीकडे येईल, अशाच पद्धतीने वस्त्र नेसतात.

मुंडू नेसण्याच्या या पद्धतीची मला ओळख झाली ती केरळमध्ये. एका लग्नाच्या निमित्ताने मी केरळमध्ये गेलो होतो. लग्नाच्या वेळी खास केरळी पद्धतीने पेहराव करावा, या हेतूने मी ‘कासाव मुंडू’ही सोबत नेले होते. ते मी माझ्या पद्धतीने नेसून तयार झालो होतो. त्यावेळी नव्यानेच मित्र झालेला अश्रफ थैवलप्पू हा मदतीला धावून आला. मी नेसलोले मुंडू हे एकदम चुकीचे आहे, असे सांगून त्याने मला योग्य पद्धतीने मुंडू नेसण्यास शिकविले. त्यावेळी त्याचा पहिला प्रश्न मला होता, की तू हिंदू ना? ‘मी म्हटलं हो. पण त्याचा इथे काय संबंध?’. त्यावेळी त्यानं मला हिंदू आणि मुस्लिम मंडळींच्या मुंडू नेसण्यातील पद्धतीमधील फरक समजावून सांगितला.

सिंगल की डबल… 
धोतीमध्ये सिंगल आणि डबल अशा दोन प्रकार उपलब्ध आहेत. साधारणपणे सिंगल म्हणजे दोन ते अडीच मीटर तर डबल म्हणजे चार मीटर किंवा त्यापेक्षा अधिक रुंद अशा पद्धतीने मोजणी होते. सिंगल धोतीचे धागे अधिक घट्ट पद्धतीने विणलेले असतात. शिवाय ते धागे अधिक जड असतात. अशा पद्धतीने ही रचना करण्याचे कारण म्हणजे सिंगल असली तरीही ती धोती पारदर्शक असत नाही. हे शक्य होते धाग्यांच्या दाटपणामुळे. तुलनेने दुहेरी धोतीचे धागे हे पातळ आणि सुटसुटीतपणे विणलेले असतात. दोन्ही धोतींच्या धाग्यांमध्ये इतका फरक असतो, की सिंगल धोती ही डबलच्या तुलनेच अधिक जड असते. बहुतांश मंडळीही कॉटनचीच धोती परिधान करतात कारण त्यामध्ये लोकांना अधिक कम्फर्टेबल वाटते.

काठांच्या दुनियेत…
दक्षिणेतील चारही राज्यांच्या तुलनेत केरळमधील मुंडूचे काठ हे खूप कमी रुंद असतात आणि त्या काठांचा रंगही अगदी फिकट असतो. त्यात भडकपणा अजिबात नसतो. सण, समारंभ किंवा देवळातील विशिष्ट पूजेच्या प्रसंगी सोनेरी रंगाच्या काठाचे मुंडू नेसण्याची पद्धती आहे. केरळमध्ये त्याला ‘कासाव मुंडू’ म्हणतात. हे मुंडू पांढऱ्या रंगाचे किंवा क्रिम कलरचेच असते. केरळच्या तुलनेत तमिळनाडूमध्ये काठ थोडेसे अधिक रुंद असतात. तर कर्नाटक आणि आंध्र प्रदेश (आता तेलंगणही) येथील धोतीचे काठ खूपच रुंद असल्याचे आढळते. तसेच केरळच्या तुलनेत उर्वरित राज्यांमधील काठांचे रंग हे खूपच भडक असतात, असे निरीक्षण तज्ज्ञ मंडळी नोंदवितात. लाल, केशरी, निळे, तपकिरी किंवा चॉकलेटी रंगाच्या काठांमध्ये जरीची नक्षी अशा पद्धतीच्या धोती सर्रास नेसल्या जातात. 


तमिळनाडूमध्ये ‘पॉलिटिकल पार्टी धोती’ असा वेगळाच प्रकार आढळतो. पांढऱ्या शुभ्र रंगाच्या धोतीचे काढ हे राजकीय पक्षांच्या झेंड्यातील रंगांप्रमाणे असतात. म्हणजे द्रमुकचे नेते किंवा कार्यकर्ते काळ्या आणि लाल अशा दोन रंगांचे काठ असलेली धोती परिधान करतात. तर अण्णा द्रमुकच्या कार्यकर्त्यांसाठी तयार केलेल्या धोतीमध्ये काळ्या आणि लाल रंगाप्रमाणेच पांढऱ्या रंगाच्या पट्ट्याचाही समावेश असतो. अशाच पद्धतीने इतर राजकीय पक्षांच्या झेंड्यातील रंग धोतीच्या काठांवर उतरलेले असतात.

फॅशनच्या दुनियेत…
बदलत्या काळानुसार धोतीमध्ये आवश्यक अशा अॅडिशन्स होऊ लागल्या आहेत. म्हणजे वस्त्र परिधान केल्यानंतर बरोबर उजव्या किंवा डाव्या हाताला एक खिसा येईल अशा पद्धतीने मुंडूची रचना केलेली असते. अर्थात, इतकी वर्षे लोकांना खिसा नसतानाही पैसे आणि इतर आवश्यक गोष्टी कशा ठेवायच्या याची सवय झालेली आहे. त्यामुळे अशा प्रकारचे खिसा असलेले मुंडू विशेष लोकप्रिय ठरत नसल्याचीही स्पष्ट झाले आहे. दुसरी गोष्ट म्हणजे धोती अचानक सुटू नये, यासाठी लोक खबरदारी घेतातच. प्रसंगी बेल्टही बांधतात. यावर उपाय म्हणून आता खास ‘वेलक्रो धोती’ बाजारात उपलब्ध आहेत.


काय आहेत एटिकेट्स…
धोती परिधान केल्यानंतर ऑफिसमधील वरिष्ठ अधिकारी, वयाने ज्येष्ठ व्यक्ती किंवा एखादी महिला समोर असेल तर धोती गुडघ्यापर्यंत वर घेऊ नये, असा संकेत आहे. आणि अर्थातच, तो पाळला जातो. मग ते गुडघ्यापर्यंत वर कधी घ्यायचं? तर भराभर चालायचं असेल, पाऊस पडत असेल आणि रस्त्यात पाणी साचलं असेल, तर ते वर घेतलं जातं. शिवाय एखाद्याला दम द्यायचा असेल किंवा तावातावानं भांडायचं असेल, तर आपोआपच गुडघ्यापर्यंत वर घेतलं जातं. शिवाय मंदिरामध्ये दर्शनाला जाताना किंवा सण-समारंभ असेल, लग्नासारखा प्रसंग असेल, तर ते गुडघ्यापर्यंत वर घेणे टाळणेच इष्ट.

धोतीचे महत्त्व…
मध्यंतरी चेन्नईमध्ये एका खासगी क्लबने धोती परिधान केलेल्या मंडळींना क्लबमध्ये प्रवेश दिला जाणार नाही, असा फतवा काढल्यानंतर दुसऱ्या दिवशी तातडीने तमिळनाडू सरकारने अशा पद्धतीने बंदी घालण्यास मनाई करणारा कायदाच करून टाकला. वेष्टी ही तमिळनाडूच्या संस्कृती आणि परंपरेचा भाग आहे. त्यावर घाला घालाल, तर तुमचे सर्व सवलती बंद करू आणि विशेषाधिकार काढून टाकू, अशी तंबीही कायद्याद्वारे देण्यात आली होती. तमिळनाडूत तर काही दूरचित्रवाहिन्यांवर चर्चेसाठी येणारे पाहुणे आणि बातम्या देणारे पुरुष न्यूज अँकर्स यांना ‘वेष्टी’ हा ड्रेसकोड आवश्यक आहे. ‘पट्टली मक्कल कच्ची’च्या ‘पुथिया तमिळगम’ या वाहिनीचे पुरुष अँकर्स हे आधी सुटाबुटात बातम्या देत असत. ‘पीएमके’चे पक्षाध्यक्ष डॉ. एस. रामदॉस यांनी पाश्चिमात्य ड्रेसकोड बदलून त्यांना वेष्टी नेसूनच बातम्या देणे बंधनकारक केले.


(प्रसिद्धीः महाराष्ट्र टाइम्स, संवाद पुरवणी २१ फेब्रुवारी २०१६)