Tuesday, March 22, 2011

कावळे, चिमण्या, कबुतरं, खारूताई


आमचे रोजचे पाहुणे
तमाम पर्यावरणवादी मंडळींना हेवा वाटावा, असं चित्र गेल्या अनेक वर्षांपासून आमच्या घरी रोज सकाळी दिसतंय. कावळा, चिमण्या, कबुतरं आणि अहो, आश्चर्यम म्हणजे चक्क खारूताईचं देखील आमच्या घराच्या खिडकीत रोज सकाळी आगमन होतं. अगदी न चुकता. ही मंडळी येतात आणि कोणतीही कुरबूर न करता खिडकीमध्ये ठेवलेल्या पदार्थांवर जोरात ताव मारतात. खरं, तर कावळ्यावर लिहिलेल्या एका ब्लॉगमध्ये याबद्दलचा ओझरता उल्लेख केला होता. पण आता न रहावल्यामुळं त्यावरच स्वतंत्र ब्लॉग लिहित आहे.

आई असल्यापासून आमच्याकडे एक पद्धत होती आणि अजूनही ती सुरु आहे. ती म्हणजे सक्काळी सक्काळी कुकर झाल्यानंतर गरमा गरम वाफाळलेला भात खिडकीतील कावळे आणि चिमण्यांना वाढायची. साधारणपणे १९७७ किंवा ७८ पासून असेल. मग भात वाढल्यानंतर कावळे, चिमण्यादेखील अगदी निर्धास्तपणे आमच्या खिडकीत येऊन मेजवानी झोडतात. कधी भात वाढायला उशीर झाला, की त्यांची कावकाव सुरु होते. कावळ्यांच्या पोटातही कावळे कोकलतात, याचा प्रत्यय आम्ही खूप पूर्वीपासून घेतो आहोत. जेव्हा केव्हा बाहेरगावी जातो, तेव्हा त्या बिचाऱ्यांचं काय होत असेल, असा विचारही मनात येऊन जातो.

अनेक वर्षांनंतर आजही आम्ही ती पद्धत जपली आहे. बदल फक्त इतका झाला आहे, की आता भातबरोबरच तुकडे केलेल्या पोळ्या, भिजविलेले पोहे, पोहे, भिजविलेला साबुदाणा, खिचडी, मुरमुरे अशी पदार्थांची रेलचेल झाल्यामुळे तमाम पक्शी एकदम खूष आहेत. घरात जे शिजतं ते आम्ही पहिल्यांदा त्यांना वाढतो. त्यामुळं जे शिजतं ते खाण्याची संधी त्यांना मिळते. पदार्थ जसे वाढले तसे पक्शीही वाढले आहेत. पूर्वी फक्त कावळे, चिमण्या आणि कबुतरं यायची. आता साळुंकी आणि अनोळखी पक्शी येऊनही आडवा हात मारताना दिसतात. फक्त पक्शीच नाही तर इटुकली पिटुकली खारूताई देखील येऊन पदार्थ फस्त करताना दिसते. रोज सकाळी पदार्थ वाढले की खारूताई आलीच म्हणून समजा.

मुक्या जीवांना खाल्ल्यानंतर पाणी पण प्यावंसं वाटत असेल, अशी आमची भाबडी समजूत असल्यामुळे आम्ही आता खलबत्त्यातील खलामध्ये त्यांच्यासाठी पाणी भरून ठेवतो. या मंडळींचा इतका राबता इतका असतो, की साधारणपणे तास दीड तासात ते पाणी संपत. मग पुन्हा एकदा तो खल भरून ठेवावा लागतो. आपल्यालाच जर उन्हाळ्यात इतकी तहान लागत असेल तर उन्हातान्हात फिरणाऱ्या त्या मुक्या बिचाऱ्यांना किती तहान लागत असणार याचा विचारच केलेला बरा.


आमच्याकडे येणाऱ्या या पक्शांचं पण अनेकदा कौतुक वाटतं. गरमागरम पदार्थ वाढल्यानंतर जेव्हा एखादा पक्शी खिडकीत येतो, तेव्हा तो आणखी चार जणांना आरडाओरडा करून बोलावतो. कावळा असो किंवा चिमणी. मग आणखी एक दोन सहकारी येऊन खाऊ गट्टम करतात. पक्शांमध्येही शेअरिंग असतं, हे पाहून खूप गंमत वाटते. कधी कधी ते त्यांच्या इवल्याश्या चोचीमध्ये भाताचं ढेकूळ किंवा पोळ्यांचे तुकडे घेऊन जातात. घरट्यातील त्यांच्या पिल्लांना किंवा उडताही न येणाऱ्या म्हाताऱ्या कोताऱ्यांना नेतात माहिती नाही. पण चोचीत पदार्थ घेऊन भु्र्रकन उडून जातात. कदाचित एकांतात खाण्याची सवय असल्यामुळंही घेऊन जात असतील, देव जाणे.

कावळा तसं पहायला गेलं तर मांसाहारी. पण आमच्याकडे येणारे कावळे इतके शिस्तबद्ध आहेत, की इतक्या वर्षांच्या इतिहासात त्यांनी एकदाही बाहेरून मांसाहारी पदार्थाचा एक तुकडाही आणलेला नाही. पण कावळे जितके शिस्तबद्ध तितकीच कबुतरं बेशिस्त. कबुतर हे शांततेचं प्रतीक वगैरे असेल पण ते अस्वच्छतेचंही प्रतीक आहे. खाण्यासाठी रोज येतात आणि खाण्यापेक्शा इकडेतिकडे उडवाउडवीच जास्त करतात. खाणं कमी आणि चिवडणं जास्त. बरं, फक्त तितकंच नाही तर फक्त खिडकीतच थांबत नाहीत तर घरात येऊनही फडफड करतात. कावळे, चिमण्या किंवा खारूताई यांनी कधीच खिडकीची सीमारेषा ओलांडली नाही. पण कबुतरांनी हद्दच केलीय. बरं, नुसते घरात येत नाहीत तर येताना कधी पालापाचोळा, बारीक बारीक काड्या आणतात आणि घरभर करतात. कधीकधी पंखांची फडफड करून उच्छाद मांडतात. वैताग येतो त्या कबुतरांचा.

काल तर त्या दोन कबुतरांचा इतका राग आला होता, की समोर असते तर चांगली अद्दल घडविली असती. सक्काळी सक्काळी कबुतरं घरात घुसली. साधारणपणे आठची वेळ असेल. आता इतक्या सकाळी कशाला कडमडली काय माहिती. बरं, पंखांचा फडफडाट करून जाताना घरातील ट्यूबलाईट फोडून गेले हरामखोर... खाया पिया बहोत कुछ ट्यूब फोडा पाच पन्नास रुपये. संपूर्ण स्वयंपाकघर ट्यूबलाईटच्या काचांनी भरून गेलं. जळलं मेलं लक्शण त्या कबुतरांचं.... असो काय करणार. काहीही केलं तरी कबुतरं येणं थांबणार नाही आणि त्यांनी येणं थांबवावं, असंही आमचं म्हणणं नाही. पण त्यांनी चिमण्या-कावळ्यांसारखं शिस्तबद्ध तरी असावं, इतकीच आशा आहे. पण त्यांना समजावणार कोण?

बाकी काहीही असो, जे सुरु आहे ते खूप आनंददायी आहे. इथून पुढेही असंच सुरु रहावं आणि अधिकाधिक पक्शी तसंच खारूताया, याव्यात असंच आम्हाला (म्हणजे मला आणि बाबांना) वाटतं. फक्त एक आवाहन असं करावसं वाटतं, की तुम्हालाही जर शक्य असेल तर तुम्हीही या मुक्या पक्श्यांना खायला वाढत जा. खायला देणं शक्य नसेल तर खिडकीत किंवा गच्चीत त्यांच्यासाठी पाण्याची सोय तरी तुम्ही नक्कीच करू शकता. लोक पाणपोया सुरु करुन नागरिकांची सेवा करतात. तुम्ही पक्श्यांसाठी पाण्याची व्यवस्था करून मुक्य जीवांची सेवा करा. पहा जमतंय का?