Sunday, January 06, 2008

पुण्यातील "दक्षिण भारत"

पुण्यातील "दक्षिण भारत"

सकाळीच काही कामानिमित्तानं कॅम्पमध्ये जायचं होतं. त्यामुळं येताना के.ई.एम. रुग्णालयासमोर (साऊथ इंडियन मेसजवळ) मिळणाऱ्या दाक्षिणात्य नाश्‍त्याचा आस्वाद घ्यावा, असा विचार आला. मग काय येतायेता एक चक्कर झालीच. तिथे गेल्यानंतर मला हैदराबाद, चेन्नई किंवा बंगळूरमध्ये गेल्यासारखंच वाटलं.

जवळपास सहा ते सात गाड्यांवर सांबार-चटणीच्या बरोबर इडली, मेदूवडा, डोसा आणि उत्तप्पा असे दक्षिणी पदार्थ खाण्यात पुणेकर मंडळी गुंग असल्याचे दिसेल. गाड्या जरी सहा-सात असल्या तरी प्रत्येक गाडीवर गर्दी जवळपास सारखीच! शिवाय प्रत्येक गाडीवरील ग्राहक रोजचे किंवा ठरलेले!! रास्ता पेठ, सोमवार पेठ आणि परिसरात दक्षिणी मंडळींचे प्रमाण तुलनेने अधिक. ज्यांना सर्वसाधारणपणे मद्रासी म्हणतात अशा मंडळींचे प्रमाण जाणवण्याइतपत असल्यामुळे या ठिकाणी अशा नाश्‍त्याच्या गाड्या लागणे नवीन नाही.

सांबार भात आणि रस्सम भात यांच्यासाठी प्रसिद्ध असलेली "मद्रासी मेस' याच ठिकाणी आहे. त्यामुळे दाक्षिणात्य पदार्थांच्या प्रेमींनी इथे जायलाच हवे. असो. सांगण्याचा उद्देश्‍य असा की, मी तेथे गेलो आणि पुन्हा एकदा हैदराबादची चव अनुभवता आली. पुण्यातील अनेक उडुपी किंवा इतर "रेस्तरॉं"मधून इडली-डोसा मिळतो पण या ठिकाणी गाड्यांवर मिळणाऱ्या पदार्थांची चव काही औरच.

नायर नावाच्या एका व्यक्तीच्या नावे असलेल्या गाडीवर इडली-वडा सांबार मागितला. इडली-मेदूवड्याच्या वरती सांबार आणि सांबारच्याच वरती चटणी अशी डिश समोर आली. मेदूवडा एक नंबर. पण इडली मात्र म्हणावी तितकी मऊ किंवा हलकी नाही. शिवाय सांबारची चवही मद्रासी नव्हती. पण मेदूवड्याची कमाल होती. मेदूवडा इतका हलका होता की विचारु नका. सांबारमध्ये तर त्याची काही वेगळीच चव लागत होती. या गाड्यांवर सांबार आणि चटणी पुन्हा मागितली तरी मिळते. शिवाय जादा चटणी-सांबार देताना मालकाचा चेहराही उपकार केल्यासारखा नव्हता हे विशेष!

हे पदार्थ खाणाऱ्या मंडळींमध्ये अर्थातच दक्षिणी मंडळी कमी होती. जादा संख्या होती ती मराठी आणि गुजराती मंडळींची! ठेपले, खाकरा, फाफडा आणि पापडी यांच्यासारख्या पदार्थांना रविवारची सुटी देऊन गुजराती मंडळींनी गाड्यांभोवती गर्दी केली होती.

या गाड्यांवर आढळणारे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या गाड्यांवर चटणी आणि सांबारच्या बादल्या किंवा पातेली नसतात. तर हे पदार्थ स्टीलच्या बरण्यांमध्ये ठेवलेले असतात. त्यामुळे तुम्हाला इडली किंवा मेदूवडा सांबार हवा असेल तर काही मिनिटे इडली किंवा मेदूवडा सांबारच्या बरण्यांमध्ये बुडवून ठेवला जातो. दोन-एक मिनिटे सांबारमध्ये राहिल्यानंतर मग तो वडा तुमच्या प्लेटमध्ये टाकून त्यावर सांबार आणि चटणी टाकली जाते. आहे की नाही गंमत!

नायर शेजारच्या गाडीवर डोसा, उत्तप्पा आणि हे पदार्थ मिळत होते. डोसा इतका पातळ की दोन मिनिटांमध्ये डोसा तव्यापासून अलग होऊन वर नाही आला तर शप्पथ. येथेही सांबारपेक्षा चटणीच अधिक चांगली. त्यामुळे चटणीला मागणी अधिक! या दोन गाड्यापासून थोडी दूर एका कडेला एक महिला गाडी लावते. तिच्याकडे आज गर्दी कमी होती. पण तिचे वैशिष्ट्य असे की, तिची गाडी संध्याकाळीही असते. इतर गाड्या फक्त सकाळी असतात. शिवाय त्या बाईकडील डोसाही अप्रतिम असतो. वैशाली-रुपालीच्या तोंडात मारेल असा कुरकुरीत डोसा तिच्याकडे मिळतो. कधी जर चुकून त्या भागात गेलात तर जरुर खा!

आणखी एक गाडी येथे आहे तिथे जायला विसरु नका. या गाडीचा परवाना चेट्टीयार नावाच्या माणसाकडे आहे. गाडीवर कदाचित तोच असावा. कपाळाला गंध लावून दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये हिरो नाही पण "व्हिलन' म्हणून शोभेल अशी एक व्यक्ती ही गाडी चालविते. चेट्टीयारच्या गाडीचे वैशिष्ट्य असे की, त्याच्याकडे मेदूवडा, इडली, सांबार आणि चटणी हे सर्वच पदार्थ एक नंबर! त्यामुळे तुम्ही जर कधी गेलात तर त्याच्याकडेच जा असा माझा सल्ला असेल. मी पण तेच करणार आहे.

मेदूवडा आणि इडली तितकेच मऊ आणि हलके. चटणी पण घट्ट, थोडी तिखट आणि अगदी थोडी आंबट. सांबारही मद्रासी चवीकडे झुकणारे. चेट्टीयारची आणखी एक खासियत म्हणजे त्याच्याकडे तांदूळ आणि उडदाच्या डाळीच्या पिठापासून तयार केलेले घावन मिळतात. डोश्‍यापेक्षा थोडे जाड आणि उत्तप्पापेक्षा थोडे पातळ, अशा मधल्याच आकारातील. त्याला घरी आपण घावन म्हणतो त्याला गाडीवर डोसा म्हणतात. तो डोसा एका डिशमध्ये चतकोर आकारात घडी घालून ठेवला जातो. त्यावर नेहमीप्रमाणे चटणी आणि सांबार टाकून "सर्व्ह' केला जातो. तुम्हाला एक डोसा सांबार-चटणी टाकून दे, अशी ऑर्डर ऐकू आली तर घाबरुन जाऊ नका. तुम्हीही असा रगडा एकदा खाऊन बघा. खूष व्हाल.

शिवाय या पदार्थांचे दर फार अधिक नाहीत. इडली-चटणी-सांबार दहा रुपये, इडली-मेदूवडा आणि सांबार-चटणी अकरा रुपये तर मेदूवडा-सांबार-चटणी बारा रुपये. डोसा बारा रुपये आणि उत्तप्पा तेरा रुपये. हॉटेलात जाऊन खाण्यापेक्षा हे अधिक स्वस्त आणि चविष्टही! तिथे गर्दी जमते ती काय उगाचच?

No comments: