Sunday, February 17, 2008

पत्र्या मारुतीजवळ मिळेल...

पॅटिस आणि वाटाण्याचा अस्सल रगडा

"रगडा पॅटिस'. हा पदार्थ मला पाणीपुरी इतकाच आणि भेळपेक्षा जास्त आवडतो. अगदी लहानपणी सारसबागेत असलेल्या विविध भेळेच्या स्टॉलवर गेल्यानंतर भेळ की रगडा पॅटिस असा प्रश्‍न विचारल्यानंतर माझं हमखास उत्तर असायचं रगडा पॅटिस!
थोडक्‍यात काय मला रगडा पॅटिस अगदी मनापासून आवडते. त्यामुळे पुण्यात विविध ठिकाणी कोठे काय चांगले मिळते, याचा शोध घेत असताना मला रगडा पॅटिस मिळण्याचे एक अप्रतिम ठिकाण सापडले. पत्र्या मारुतीजवळ उभ्या असलेल्या एका भेळेच्या गाडीवर भेळेपेक्षाही रगडा पॅटिसच अधिक चविष्ट असते.
गेल्या अनेक वर्षांपासून अगदी नेमकेपणानं सांगायचं झालं तर दहा वर्षांपासून आम्ही पत्र्या मारुतीजवळ असलेल्या त्या भेळेच्या गाडीवर नित्यनियमाने भेट देत आहोत. रमणबागेच्या चौकातून लक्ष्मी रस्त्याकडे जायला लागलो की, पहिल्याच चौकात (पत्र्या मारुतीच्या) तीन-चार गाड्या उभ्या असतात. त्यात सुरवातील भेळेच्या दोन गाड्या, नंतर कच्छी दाबेलीची एक गाडी आणि सर्वात शेवटी नीरा व सरबतांचा एक स्टॉल आहे.
भेळेची पहिली गाडी सोडून द्या. सोडून द्या म्हणजे तिकडे फक्त भेळच चांगली मिळते. पण दुसरी गाडी मात्र, एकदम अष्टपैलू आहे. भेळ, रगडा पॅटिस, रगडा पुरी, एसबीडीपी आणि अगदी पाणीपुरीही लय भारी!साधारण साठीच्या आसपास असलेले वडील आणि त्यांची दोन अफलातून मुलं गाडीवर असतात. पण वैशिष्ट्य असं की, गाडीवर कोणीही असलं तरी चवीमध्ये फारसा फरक पडत नाही. इतर गाड्यांवर मिळतात ते सर्व पदार्थ मिळत असले तरी तुम्ही आवर्जून रगडा पॅटिस टेस्ट करा. आम्ही इतके वर्ष "टेस्ट' करतो आहोत म्हणूनच सांगतोय.
अनेक ठिकाणी रगडा पॅटिसमध्ये जो बटाटा किंवा वाटाणे असतात ते पूर्णपणे शिजलेले नसतात. त्यामुळे ते चावताना त्रास होतो. तसेच गोड नाही पण तिखट पाण्याची चवही रगडा पॅटिसमध्ये महत्वाची असते. रगड्याची ही भट्टी या गाडीवर अगदी जबरदस्तपणे जमलेली आहे. रगडा आणि पॅटिस हे पूर्णतः शिजलेले असल्यामुळे दोन्ही वाटाणे आणि पॅटिस एकमेकांमध्ये मिसळून जातात आणि रगडा एकदम "झकास' होतो. त्यात गोड आणि तिखट पाणी, तिखट, मीठ, मसाला व चाट मसाला यांचे मिश्रण अगदी योग्य प्रमाणात टाकले जाते. त्यामुळे पदार्थाला येणारी चव अगदी अप्रतिम असते.
एकदा का रगड्याने भरलेली ही डिश तुमच्या पुढे आली की, ती व्यवस्थितपणे कालवून घ्या आणि एक-दोन चमचे "टेस्ट' करा. मग तुम्हाला कळेल खरे रगडा पॅटिस कशाला म्हणतात. दोन-तीन चमचे खाल्ल्यानंतर पुन्हा थांबा. थोडे तिखट आणि गोड पाणी त्यात मिसळा. पुन्हा रगडा व्यवस्थित कालवा. चव आणखी सुधारली आहे, असे तुम्हाला जाणवले. एका प्लेटमध्ये इतके रगडा पॅटिस येते की, तुम्ही कितीही खादाड असाल तरी तुमची भूक नक्कीच भागते. इतर ठिकाणी हे समाधान क्वचितच मिळते.
रगडा पॅटिसननंतर पाणीपुरीची एक प्लेट जरुर घ्या. एकट्याला एक जाणार असेल तर उत्तमच. पण नसेल तर दोघा-तिघांमध्ये एक तरी अवश्‍य घ्या. पाणीपुरी झाल्यानंतर गाडीवर असलेला माणूस तुम्हाला तिखट-गोड पाणी हवे का, असे विचारेल. नेहमी घेत नसाल तरी येथे जरुर पाणी प्या. सरते शेवटी इतर ठिकाणांप्रमाणेच येथेही मसाला पुरी मागायला विसरु नका. हे सर्व झाल्यानंतर तुमचा आत्मा तृप्त नाही झाला तरच नवल.

3 comments:

Abhi said...

आता जायलाच पाहिजे इथेपण :P वाचूनच तोंडाला पाणी सुटलंय!!

स्नेहा said...

thank u.. punyat rahun sudha hi thikan mahit navhati aata jarur bhet dein..

Dnyandeep said...

आपले ब्लॉग वाचले व एक सिद्धहस्त पत्रकार भेटल्याचा आनंद झाला. आमच्या मायमराठी संकेतस्थळावर (www.mymarathi.com) आपल्या ब्लॉगचा दुवा देत आहे. आपण हे संकेतस्थळ पहावे ही विनंती. माझ्या dnyandeep.blogspot.com या ब्लॉगमधील भाषांतर विषयक लेखाबद्दल आपले मत कळवावे. आपल्या कार्यास शुभेच्छा - डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप