Wednesday, June 03, 2009

राजकारणातील तरुणाई वाढतेय...


घराणेशाहीच होतेय प्रबळ...

पंडित जवाहरलाल नेहरु यांचे पणतू, इंदिरा गांधी यांचे नातू, राजीव गांधी यांनी पुत्र श्री राहुल गांधी यांनी सक्रिय राजकारणात उडी घेतलीय आणि कॉंग्रेसला केंद्रात पुन्हा सत्ता मिळाल्यानंतर राहुल यांचं पक्षातलं वजन चांगलंच वाढलंय. त्यामुळं पुन्हा एकदा राजकारणात तरुणाई येतेय, शिकलेले लोक राजकारणात येताहेत अशी आवई उठविली जातेय. राजकारणातील तरुणाई कोण आहे ते पहा आणि तुम्हीच ठरवा हे खरं आहे का ते...

लोकसभेतील तरुणाई...
राहुल गांधी (सोनिया गांधी यांचे पुत्र), सुप्रिया सुळे (शरद पवार यांच्या कन्या), जितीन प्रसाद (कॉंग्रेस नेते जितेंद्र प्रसाद यांचे पुत्र), सचिन पायलट (दिवंगत कॉंग्रेस नेते राजेश पायलट यांचे पुत्र), ज्योतिरादित्य शिंदे (दिवंगत माधवराव शिंदे यांचे पुत्र), अगाथा संगमा (पूर्णो संगमा यांच्या कन्या), एम के अळगिरी (करुणानिधी यांचे पुत्र), दयानिधी मारन (करुणानिधी यांचे भाचे), डी. पुरंदरेश्‍वरी (तेलुगू देसमचे संस्थापक एन टी रामाराव यांच्या कन्या), डी. नेपोलियन (करुणानिधी यांचे नातेवाईक), भारतसिंह सोळंकी (गुजरात कॉंग्रेस नेते माधवसिंह सोळंकी यांचे पुत्र), तुषार चौधरी (गुजरात कॉंग्रेस नेते अमरसिंह चौधरी यांचे पुत्र), प्रतीक पाटील (वसंतदादा पाटील यांचे नातू), मिलींद देवरा (मुरली देवरा यांचे पुत्र), नितेश राणे (नारायण राणे यांचे पुत्र), समीर भुजबळ (छगन भुजबळ यांचे पुतणे), प्रिया दत्त (सुनील दत्त यांच्या कन्या), एच डी कुमारस्वामी (एच डी देवेगौडा यांचे पुत्र), प्रेणित कौर (पंजाब कॉंग्रेसचे नेते कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या पत्नी), अखिलेश यादव (मुलायमसिंह यांचे पुत्र), यशोधराराजे शिंदे (भाजप नेत्या विजयाराजे शिंदे यांच्या कन्या तर वसुंधराराजे यांच्या बहिण).

लोकसभेतल्या तरुण खासदारांची नावं पाहिली की ते कोणत्या ना कोणत्या राजकीय पुढाऱ्याचे नातेवाईक आहेत हे आपल्याला पटकन समजू शकेल. राजू शेट्टी यांच्यासारखे एक-एक रुपया वर्गणी काढून लोकांच्या पाठिंब्यावर निवडून आलेले आणि कोणत्याही घराण्याशी संबंध नसलेले खासदार अगदी थोडे असतील.

राज्याराज्यतील तरुणाई...
एम के स्टॅलिन (तमिळनाडूचे उपमुख्यमंत्री आणि करुणानिधी यांचे पुत्र), सुखबिरसिंह बादल (प्रकाशसिंह बादल यांचे पुत्र), ओमर अब्दुल्ला (फारुख अब्दुल्ला यांचे पुत्र), नवीन पटनाईक (बिजू पटनाईक यांचे पुत्र), उद्धव ठाकरे (बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र), अजित पवार (शरद पवार यांचे पुतणे), मंत्री राणा जगजितसिंह (पद्मसिंह पाटील यांचे पुत्र), मंत्री राजेश टोपे (अंकुशराव टोपे यांचे पुत्र), भाजपचे माजी आमदार समीर मेघे (दत्ता मेघे यांचे पुत्र), देवेंद्र फडणवीस (भाजपच्या शोभाताई फडणवीस यांचे पुतणे), कॉंग्रेसचे युवराज मालोजीराजे (माजी मंत्री दिग्विजय खानविलकर यांचे जावई), जयंत पाटील (राजारामबापू पाटील यांचे पुत्र), आमदार मदन भोसले (कॉंग्रेस नेते प्रतापसिंह भोसले यांचे पुत्र), आमदार संभाजी निलंगेकर (भाजपच्या माजी खासदार रुपा निलंगेकर यांचे पुत्र आणि माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर यांचे नातू), आमदार अजित गोगटे (भाजपचे माजी आमदार गोगटे यांचे पुतणे), आमदार विनय नातू (भाजपचे माजी आमदार श्रीधर नातू यांचे पुत्र), आमदार वर्षा गायकवाड (खासदार एकनाथ गायकवाड यांच्या कन्या), आमदार रणजित कांबळे (प्रभा राव यांचे भाचे किंवा पुतणे), राधाकृष्ण विखे-पाटील (बाळासाहेब विखे-पाटील यांचे पुत्र), पूनम महाजन (प्रमोद महाजन यांच्या कन्या), धनंजय मुंडे (गोपीनाथ मुंडे यांचे  पुतणे).

पटकन डोळ्यासमोर येतील अशी ही काही नावे. पण राजकारणात घराणेशाही काही नवी नाही. स्वतः निवृत्ती घेताना आपला मुलगा, आपली मुलगी, भाचा-पुतण्या, बायको, सून, मेव्हणा किंवा आणखी जवळच्या नातेवाईकाचीच त्या जागी वर्णी लावण्याची पद्धत कॉंग्रेसच्या दरबारी राजकारणात फारशी नवी नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेस हे कॉंग्रेसचेच अपत्य असल्याने ही कीड राष्ट्रवादी कॉंग्रेसला पण लागलेली आहे. भारतीय जनता पक्षही त्याच मार्गाने जाऊ लागला आहे. शिवसेनेतही बाळासाहेबांनी कार्याध्यक्षपद देताना राज ठाकरे यांना बाजूला सारुन आपले पुत्र उद्धव यांचीच निवड केली आहे.

एकूण परिस्थिती पाहिली की कोणताच पक्ष याला अपवाद ठरलेला नाही आणि यापुढे तर ठरण्याची शक्‍यताही नाही.अशा परिस्थितीत सर्वसामान्य माणूस, मध्यमवर्गीय माणूस, कोणत्याही राजकारण्याशी सूतरामही संबंध नसलेला युवक-युवती राजकारणत कधी येणार आणि त्यांना कशी संधी मिळणार हाच खरा प्रश्‍न आहे.

3 comments:

Ein Fuhrer said...

डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतोच असे काही नाही, वकिलाचा मुलगा वकिलच होईल कशावरुन? इंजिनियरचा मुलगा कदाचित गवंडी देखिल बनेल. पण एका नेत्याचा मुलगा नेताच का बरे होतो? पूर्वी भारतात संस्थाने होती. आपली कारकिर्द संपत आल्यावर राजे महाराजे आपल्या पुत्राचा राज्याभिषेक करत असत. तीच पद्धत राजकारणी पुढे चालवत असावीत. लोकसभेत तरुणाईचा झालेला भरणा हा केवळ फार्स आहे. भारतीय लोकशाही हि घराणेशाहीची victim आहे.

लेख खूपच माहितीपूर्ण आहे. इतक्या लोकांची घरे आपल्याकडून पोसली जातात याचे खरोखरच आश्चर्य वाटते आणि किव करावीशी वाटते.

Khalil Girkar said...

lekh changla aahe fakt 1 correction aahe- dhananjay munde he gopinath mundenche putra navhe tar putane aahet.
baki uttam
Kalil s Girkar
Journalist

ashishchandorkar said...

खलिल धन्यवाद... अशी चूक होणं एकदम अमान्य आहे. पण नजर चुकीनं म्हणा किंवा गडबडीत ही चूक माझ्याकडून झाली. चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद...
(धनंजय मुंडे हे गोपीनाथ मुंडे यांचे पुत्र नव्हे तर पुतणे आहेत... )
आशिष चांदोरकर