Sunday, June 14, 2009

माटुंग्याचे अयप्पन इडली सेंटर...

दक्षिणेतल्या पदार्थांची चविष्ट रेलचेल


माटुंगा... मुंबईच्या मध्यवर्ती भागात दादरला खेटून असलेला भाग. इथं दाक्षिण भारतीय नागरिकांचं प्राबल्य. गुजराती नागरिकही मोठ्या संख्येनं आहेत पण दाक्षिणात्य नागरिकांचं वर्चस्व अंमळ जास्तच. साहजिकंच दाक्षिणात्य नागरिकांच्या पसंतीचे पदार्थ इथं अधिक चांगले मिळतात. माटुंगा रेल्वे स्थानकातून दिसणारं रामा नायक यांचं उडुपी रेस्तरॉं प्रसिद्ध आहेच. अनेक इंग्रजी-मराठी वृत्तपत्रांमधून "रामा नायक'वर बक्कळ छापून आलंय. त्यामुळं त्यावर आणखी शब्द खर्च करण्याची माझी इच्छा नाही. मला लिहायचं आहे खवय्यांच्या एका वेगळ्याच अड्ड्यावर.

माटुंगा स्टेनशनच्या कल्याणच्या बाजूच्या सर्वाधिक शेवटच्या जिन्यावरुन बाहेर उतरायचं. आपण केरळ किंवा तमिळनाडूमध्ये आलो आहोत की काय, अशी शंका आपल्याला स्टेनशमधून बाहेर पडल्यानंतर लगेच येते. स्टेशन मागे टाकून आपण हायवेकडे जाऊ लागलो की आपल्याला दाक्षिणात्य वस्तूंच्या विक्रीचे स्टॉल्स लागतात. थोडं पुढे गेलं की, फुलांचे स्टॉल्स लागतात. ही मक्तेदारी आहे तमिळ आणि केरळी भाषकांकडे! पहिल्या गल्लीत डावीकडे वळलो की थोडसं पुढं जायचं. तिथं शंकराचार्यांचं किंवा तमिळ नागरिकांचं एक मंदिर आहे. देवळाच्या समोर जितकी गर्दी नसते तितकी गर्दी आपल्याला समोरच्या खाण्याच्या स्टॉलवर दिसेल. हेच ते अयप्पन इडली सेंटर, ज्याच्यावर मला भरभरुन लिहायचंय.

साधा डोश्‍यापासून सुरु होणारी डोश्‍यांची यादी साठ ते सत्तर वेगवेगळ्या कॉम्बिनेशन्सनंतर संपते. मग त्यात मसाला डोसा, कट डोसा, म्हैसूर मसाला, म्हैसूर कट अशी नेहमीची कॉम्बिनेशन्स आलीच. कांदा उत्तप्पाच्या जोडीला मसाला उत्तप्पा आहे. उडीद वडा, डाल वडा आणि इडलीच्या जोडीला कच्च्या केळ्यांपासून बनवलेली भजी आहेत. कांचीपुरम इडलीही आहे बहुतेक. पण तुम्ही म्हणाल मुंबईत अशी उपहारगृह पायलीला पन्नास मिळतील. रेल्वे स्टेशन्सच्या बाहेरही अनेक छोटे-मोठे विक्रेते झाडाच्या पानांवर इडली, साधा डोसा आणि मेदू वडा विकत असतात. त्यांची चवही चांगली असतेच. वाद नाही. ते स्वस्तही असतात. पण अयप्पनच्या पदार्थांची चवच न्यारी.

विशेषतः सांबार, खोबऱ्याची चटणी आणि टोमॅटो-लाल मिरची यांच्यापासून बनविलेली चटणी या गोष्टी पदार्थांच्या स्वादात शेकडो पट भर घालते. केळी भजी ही इथली खासियत म्हणावी लागेल. तंसच थोडासा सरसरीत म्हणजेच मऊसर उप्पीट दक्षिणेची आठवण नक्की करुन देते. तुम्ही अस्सल खवय्ये आणि थोडेसे निर्लज्ज असाल तर अगदी पुन्हा पुन्हा मागून या पदार्थांवर ताव माराल. फक्त एखादी प्लेट खाऊन तुमचं भागणार नाही. दुसऱ्या प्लेटची ऑर्डर तुम्हाला द्यावी लागेलच.

अयप्पन इडली सेंटरला भेट देणाऱ्यांमध्ये तमिळ किंवा केरळी मंडळी कमी आणि उर्वरित भारतातले खवय्येच जास्त, अशी परिस्थिती असते. गुजराती, मराठी आणि अगदी पंजाबी मंडळी सुद्धा इथं येऊन भरपेट ताव मारुन जातात. दक्षिण भारतातल्या काही तरुण मंडळींनी किंवा होतकरु लोकांनी एकत्र येऊन हे सेंटर चालविल्यासारखे वाटते. मराठी गृहिणी जसं एकत्र येऊन मराठी खाद्यपदार्थांचे स्टॉल्स चालवतात तसं. पण मराठी स्टॉल्सवर न आढळणाऱ्या दोन गोष्टी इथं अगदी सहजपणे जाणवतात. एक म्हणजे आपलेपणा आणि दुसरी गोष्ट म्हणजे ग्राहकावरचा विश्‍वास. "आधी पैसे द्या, मग पदार्थ घ्या' या अस्सल मराठमोळ्या धोरणाला बळी पडून मी ऑर्डर दिल्यानंतर लगेच शंभरची नोट काढली. तेव्हा कॅशियरनं नम्रपणे सांगितलं की, ""तुम्हाला पार्सल न्यायचं नाही ना? मग आधी खा आणि नंतर पैसे द्या...' तसंच तुमची ऑर्डर तुम्हाला मिळाली का किंवा आणखी काही पाहिजे का, या गोष्टींची विचारणा तिथली मंडळी अगदी आपुलकीनं करतात. (आपुलकी म्हटली की कपाळावरच्या आठ्या येत नाहीत, हे सांगायला नकोच) त्यामुळंच गर्भश्रीमंतापासून ते ओझी वाहणाऱ्या हमालापर्यंत आणि सत्तर वर्षांच्या आजीपासून ते बारा-चौदा वर्षांच्या शाळकरी मुलापर्यंत सर्व जण तुम्हाला इथं दिसतील.

बरं गर्दी वाढतेय म्हणून पदार्थांचे भाव मात्र फारसे वाढलेले दिसत नाहीत. दहा-बारा रुपयांना उप्पीट, केळी भजी तर अठरा-वीस रुपयांना मसाला आणि म्हैसूर डोसा. इतर पदार्थांचे दरही थोडेफार इकडे तिकडे. थोडक्‍यात म्हणजे काय तर स्वस्तात मस्त आणि चविष्ट पदार्थ खायचे असतील तर किमान एकदा का होईना माटुंगा (मध्य रेल्वेवरचं) परिसरातलं अयप्पन इडली सेंटर गाठलं पाहिजेच.

1 comment:

Harshal said...

Waaa !!! farach chhan !!!
jaun yetoch ekda... i love southindian vishesh karun tamil/ kelrala jevan

majya lahanpanapasun maladla (e.) amhi eka tamil mansakade dosa khatoy (masala nave, ha vegla aahe)apratim chav.. khas karun sambar je aste te typical udupi sarkhe naste ... veglech aste....addictive jaloy amhi geli 20 varshe... ekda ya khayla...mi pan yavar ek post lihi mhanto.... thnx again