
`मी मराठी...` असा एक मेल नुकताच आलाय. त्यामध्ये पु. ल. देशपांडे यांनी केलेली मराठी माणसाची व्याख्या पाहिली. `छत्रपती शिवाजी महाराज की...` असं म्हटल्यानंतर `जय` असा प्रतिसाद ज्या माणसाकडून येत नाही, तो माणूस मराठी असूच शकत नाही, असं पुलं म्हणतात. त्यालाच जोडून मला आणखी म्हणावंसं वाटतं की, `गणपती बाप्पा...` अशी आरोळी ठोकल्यानंतर `मोरया...` असा प्रतिसाद जो माणूस देत नाही. त्याला मराठी म्हणणं अजिबात पटत नाही. अर्थात, हीच गोष्ट लोकमान्य टिळकांसारख्या द्रष्ट्या माणसानं केव्हाच हेरली आणि शिवजयंती तसंच गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. हे दोनच उत्सव निवडण्यामागचं त्यांचं द्रष्टेपण आणि मराठी माणसाच्या माणसाच्या मनाची पारख नक्कीच वाखाणण्यासारखी आहे.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं गुवाहाटीला गेलो होतो. तिकडं अनेक खेळांचे सामने कव्हर करत होतो. तिथं महाराष्ट्राचे खेळाडू गणरायाचा जल्लोष करुनच मैदानात उतरायची. कबड्डी, खो-खो आणि रग्बी या सांघिक खेळांच्या सामन्यांना तर गणपती बाप्पाच्या जयघोषाची सवयच होऊन गेली होती. सामन्याच्या सुरवातीला आणि सामना जिंकल्यानंतर गणपती बाप्पा मोरया... हा आवाज चौफेर दुमदुमायचाच. (कबड्डी आणि रग्बीचं सुवर्णपदक महाराष्ट्रानं पटकावलं होतं. त्यामुळं हा आवाज महाराष्ट्राच्या प्रत्येक सामन्यावेळी घुमायचा.)
आणखी एक आठवणीत राहणारं उदाहरण म्हणजे सारेगम लिटल चॅम्प्सचं. महाराष्ट्रात लोकप्रियतेची परिसीमा गाठलेल्या लिटल चॅम्प्सचा तो भाग आठवा. महाअंतिम फेरीत कोणते तीन स्पर्धक जाणार ते निश्चित करणारा. त्यावेळी तीनऐवजी पाचही स्पर्धकांना सहभागी करुन घेण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला होता. त्यावेळीही या निर्णयानंतर लिटल चॅम्प्सच्या स्टेजवर एकच नारा घुमला होता गणपती बाप्पा मोरया... सांगायचा उद्देश्य म्हणजे गणपती बाप्पा हा आपल्या नसानसांत भिनला आहे. अहो साधं ट्रीपसाठी निघतानाही नारळ फोडल्यानंतर आपण गणपती बाप्पा मोरया म्हणायला विसरत नाही. आणखी काय हवं.
पुण्यातच लहानाच मोठा झालो. अगदी लहानपणी छोटंसं मंडळ चालवणं असो, दर दिवशी गणपती पहायला जाणं असो किंवा मानाच्या पहिल्या गणपतीपासून ते दगडूशेठ लक्ष्मी रस्त्यावर येईपर्यंत मिरवणुकीत सहभागी होणं असो गणपती हा कायमच माझा मोस्ट फेव्हरिट राहिलाय. बाकी इतर कोणत्या देवाबद्दल मला इतकी आपुलकी नाही. पण गणपती इज समथिंग डिफरंट. आणि असा हा अगदी जवळचा वाटावा, असा देव जर आपल्या घरी येणार असेल (पाहुणा हा शब्द मुद्दाम वापरत नाही.) मग विचारण्याची सोय नाही.
गणपती घरात येणार ही कल्पनाच अवर्णनीय असते. मग त्याच्या स्वागतासाठी घराची साफसफाई होते. सजावट करण्यात येते. गणरायाच्या स्वागतासाठी उकडीच्या मोदकासारखा भन्नाट पदार्थ करण्यात येतो. घरामधलं वातावरण मंगलमय असतं. गणपती हा जरी निर्जीव असला तरी त्याच्या अस्तित्त्वामुळं घरात खरंच कोणीतरी रहायला आलंय, असं वाटतं. त्यामुळंच `गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला...` हे वाक्य समाजमनामध्ये घट्ट रुजलंय. गणपती विसर्जन झाल्यानंतर खरंच काही दिवस आपल्याला चैन पडत नाही. आपल्याच घरातही चुकल्या चुकल्यासारखं वाटतं.
शिवाय गणपती म्हटलं की, लालबागचा राजा, मुंबईतला सिद्धीविनायक किंवा श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्यापुढं रांगा लावून उभं राहण्याची गरज आहेच असं नाही. घरातला पूजेमधला गणपतीही तितकाच लोभसवाणा किंवा श्रद्धेला पावणारा असतो, यावर माझा विश्वास आहे. त्याला दागदागिन्यांची आणि जडजवाहिरांची गरज आहेच, असंही नाही. परवाच गणेश चतुर्थीला दगडूशेठ हलवाई गणपतीची मूर्ती पाहिली. अंगावर एकही दागिना नव्हता. पण मूर्तीचे डोळे आणि तिचा लुक पाहिल्यानंतर नेहमीपेक्षा अधिक समाधान मिळालं. असंच समाधान पेणच्या कोणत्याही सर्वांग सुंदर मूर्तीकडे पाहिल्यानंतर मिळतं. भाऊ रंगारी, मंडई, जिलब्या मारुती, राजाराम मित्र मंडळ, हत्ती गणपती, गुरुजी तालिम मंडळ, ओंकारेश्वर मित्र मंडळ, लोखंडे तालीम मंडळ आणि इतर अनेक मंडळाच्या नुसत्या मूर्ती एकाग्र चित्तानं पाहिल्या तर मन वेडं होतं.
असा हा गणेशोत्सव मग तो घरातला असो किंवा सार्वजनिक असो सगळीकडे कसं चैतन्यमय वातावरण असतं. माझ्याप्रमाणेच आपणही कधी ना कधी त्या वातावरणाचा भाग असतो गणपती पहायला जायच्या निमित्तानं असो, घरामध्ये गणेशोत्सव साजरा करण्याच्या निमित्तानं असो किंवा सार्वजनिक मंडळाचा कार्यकर्ता म्हणून राबण्यात असो. थोडक्यात काय तर गणपती किंवा गणेशोत्सव हे नेहमीच आपल्या म्हणजेच मराठी माणसाच्या जीवनाचे अविभाज्य भाग आहेत, हे मात्र नक्की...!