Monday, August 10, 2009

मेरिकोम, सुशीलकुमार आणि विजेंदर


भारताची खरी खेलरत्न...

खेळाडूंसाठी प्रतिष्ठेचा असलेला राजीव गांधी खेलरत्न पुररस्कार आणि अर्जुन पुरस्कारांची घोषणा नुकतीच झाली. सर्वात महत्वाची आणि नेहमीपेक्षा वेगळी गोष्ट म्हणजे राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार तीन जणांना विभागून (त्रिभागून) दिला गेला. ऑलिंपिकमध्ये भारतासाठी कांस्यपदक मिळवून देणारा मल्ल सुशीलकुमार व मुष्टीयोद्धा विजेंदर सिंग तसंच सलग चारवेळा महिलांच्या मुष्टीयुद्ध स्पर्धेचं विश्वविजेतेपद पटकाविणारी मेरिकोम अशा तिघांना हा पुरस्कार विभागून देण्यात आला. मुख्य म्हणजे क्रिकेटपटूंची मक्तेदारी यावेळी देशी तसंच इतर खेळांनी मोडून काढली. ट्वेंटी-२० विश्वकरंडक स्पर्धेत नामुष्की पत्करावी लागलेल्या भारतीय संघातल्या फक्त गौतम गंभीरचीच अर्जुन पुरस्कारासाठी निवड झाली.

क्रिकेटचा दुस्वास करण्याचे काहीच कारण नाही. पण नेहमी इतर खेळांवर आणि खेळाडूंवर होणारा अन्याय यावेळी दूर झाला. भारतात क्रिकेट हा खेळ म्हणजे धर्म मानणारे लोक आहेत. क्रिकेटवेड्यांची संख्या काही कमी नाही. पण त्यामुळे इतर खेळांवर आणि खेळाडूंवर होणारा अन्याय प्रचंड आहे. प्रायोजक, जाहिराती मिळण्यापासून ते प्रसिद्धीमाध्यमांमध्ये बातम्या येण्यापर्यंत. सर्वच स्तरावर अन्याय, अन्याय आणि अन्याय. पण यावेळी परिस्थिती बदलली. मुख्य म्हणजे तीनही खेळाडूंची कामगिरी नजरेत भरणारीच होती. त्यामुळं त्यांना डावलून इतर खेळाडूंना (किंवा क्रिकेटपटूंना) पुरस्कार देण्याची हिंमत क्रीडा खात्याची झाली नसणार.

इराण किंवा रशियाचे मल्ल तसंच क्युबाच्या मुष्टीयोद्ध्यांचं आव्हान परतवून लावत कांस्यपदकापर्यंत मजल मारणं ही काही खाण्याची गोष्ट नाही. ऑलिंपिक स्पर्धेत तर नाहीच नाही. त्यातून भारतात या खेळांसाठी मिळणाऱ्या सुविधा, प्रशिक्षण, प्रायोजक आणि प्रसिद्धी या सर्वांपासून ही मंडळी दूर असतात. दिवसाचा रोजचा खुराक मिळाला तरी पुरे, असं म्हणण्याची परिस्थिती असते. त्यामुळे या सर्व गोष्टींवर मात करुन ऑलिंपिकच्या कांस्यपदकापर्यंत मजल मारणं हे आव्हान महाकठीण. त्यामुळेच आपले खेळाडू चमकले ही आनंदाची गोष्ट आहे. मुख्य म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना या खेळाडूंची नावेही माहिती नव्हती. किंवा आता कोणी कांस्यपदक जिंकले असं विचारलं तर त्यांची नावे आठवणारही नाहीत. पण क्रीडाप्रेमींसाठी हे खेळाडू दैवतांच्या रांगेत विराजमान झाले आहेत.


प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा, अशी आणखी एक मुष्टीयोद्धा म्हणजे मेरिकोम. एम. सी. मेरिकोम. महिलांच्या मुष्टीयुद्ध प्रकारात गेल्या अनेक वर्षांपास्नं ही वर्चस्व गाजवते आहे. सलग चारवेळा तिनं विश्वविजेतेपद पटकाविलं आहे. विश्वविजेतेपद म्हणजे क्रिकेटपटूंनी सलग चार वेळा विश्वकरंडक जिंकण्यासारखेच आहे. पण तिच्या कामगिरीचं कौतुक कोणाला आहे. मेरिकोमचं वैशिष्ट्य असं की, तिनं मिळविलेलं चौथं विजेतेपद हे तिच्या डिलिव्हरीनंतर मिळविलेलं आहे. तिला जुळ्या मुली झाल्या आणि त्यानंतर दोन आठवड्यांमध्येच तिनं पुन्हा सरावाला सुरवात केली. बॉक्सिंगला वाहून घेणं म्हणजे काय हे मेरिकोमकडून शिकलं पाहिजे. त्यामुळं तिचा सन्मान व्हायलाच हवा होता. थोडा उशीरच झाला, असं म्हटलं तरी चालेल. पण 'देर आये दुरुस्त आये...' हे 'आये ही नही...' या गोष्टीपेक्षा कधीही चांगलं.

भारतीय क्रीडा जगतामध्ये आणखी एक नाव चांगलंच गाजतंय. ते नाव म्हणजे साईना नेहवाल. गेल्या वर्षी मलेशियन ओपन आणि या वर्षी इंडोनेशियन ओपन बॅडमिंटन स्पर्धा जिंकून साईनानं सगळ्यांनाच वेड लावलंय. गेल्या वर्षी झालेल्या राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेचं सुवर्णपदक जिंकून तिनं सगळ्यांच्याच आशा उंचावल्या आहेत. पुढील वर्षी होणारी राष्ट्रकुल स्पर्धा, यंदाची विश्वकरंडक बॅडमिंटन स्पर्धा आणि आशियाई तसंच ऑलिंपिक स्पर्धा या सर्वांमध्येच तिच्याकडून दर्जेदार कामगिरीची अपेक्षा आहे. जागतिक क्रमवारीत तिनं सहाव्या स्थानावर झेप घेतलीय. साईनाच्या वडिलांनी भविष्य निर्वाह निधीवर (प्रॉव्हिडंट फंड) कर्ज काढून साईनाचं प्रशिक्षण केलंय. तिला प्रोत्साहन दिलंय. त्यामुळंच यंदाच्या वर्षी मिळालेला अर्जुन पुरस्कार तिच्यासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. साईनाची एकूण वाटचाल पाहता भविष्यात ती बॅडमिंटनच्या क्षितीजावर चमकणार, अशी सध्या तरी आशा आहे.

महाराष्ट्रासाठी आनंदाची गोष्ट म्हणजे पंकज शिरसाट या मराठमोळ्या कबड्डीपटूला यंदा अर्जुन पुरस्कारानं गौरविण्यात आलंय. जवळपास पंधरा-वीस वर्षांनंतर मराठमोळ्या खेळाडूला हा पुरस्कार मिळालाय, कबड्डी या खेळासाठी. यापूर्वी सांगलीच्या राजू भावसार या कबड्डीपटूला पुरस्कारानं गौरविण्यात आलं होतं. त्यानंतर कोणत्याही मराठी कबड्डीपटूला हा पुरस्कार मिळाला नाही. आता पंकजनं तो पटकावलाय.
क्रिकेटच्या झंझावातामध्ये इतर खेळ पार कोलमडून जातात. खो-खो आणि कबड्डीसारखे देशी खेळ तर पार मरणासन्न अवस्थेत आहेत. आट्यापाट्या सारखा खेळ तर कधीच इतिहासजमा झालाय. भविष्यात कबड्डी आणि खो-खो यांचीही तीच परिस्थिती झाली तर नवल वाटू नये, अशीच परिस्थिती आहे. टेनिसमध्ये पेस-भूपती आणि सानिया मिर्झा, बिलियर्डस-स्नूकरमध्ये गीत सेठी आणि पंकज अडवाणी, बुद्धिबळात 'द ग्रेट' विश्वनाथन आनंद, दोन वेळा कॅरमचा विश्वविजेता आणि नऊ वेळा राष्ट्रीय विजेतेपद पटकाविणारा ए. मारिया ईरुदयम, टेबल टेनिसमध्ये भारताचं नाव रोशन करणारा आणि आठ वेळा राष्ट्रीय विजेतेपद मिळविणारा कमलेश मेहता, ऑल इंग्लड बॅडमिंटन जिंकून देणारा गोपीचंद आणि आधुनिक युगातला ध्यानचंद अशी पदवी मिळविणारा धनराज पिल्ले... अशी एक ना अनेक नावं इथं घेता येतील. ज्यांची कामगिरी खरं तर दखलपात्र होती पण माध्यमांनी त्यांच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. किंवा माध्यमांनी जरी लक्ष दिलं तरी भारतीयांनी त्यांना तितकसं प्रेम दिलं नाही.

पण उशिरा का होईना या साऱ्यांना सरकार दरबारी स्थान मिळतंय. कदाचित उशिरा का होईना पण भविष्यात सामान्य नागरिकही या खेळाडूंना आपलंसं करतील. फक्त स्पर्धा जिंकल्यानंतरच नाही तर नेहमीच. खेळाडूंच्या पडत्या काळातही आणि उभरत्या काळातही. तरच भारतात खऱ्या अर्थानं क्रीडा संस्कृती रुजली, असं म्हणता येईल.

4 comments:

अमोल परांजपे said...

सगळी मतं १०० च्या १०० टक्के मान्य.. पण तुझ्याकडूनही एका नावाचा उल्लेख राहिलाय लेखात... अभिनव बिंद्रा... त्याला २००० साली अर्जून आणि २००१ साली राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यानं ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवलं... भारतीय क्रिडाप्रेमीचं स्वप्न पूर्ण केलं.... यंदा मिळालेल्या पुरस्कारांमळे मेरिकोम, सुशीलकुमार, विजयेंद्र, साईना यांचं मोरलही इतकं बूस्ट व्हावं, की त्यांनीही अभिनवच्या पावलावर पाऊल टाकून पुढल्या ऑलिम्पिकमध्ये भारताला किमान ही चार सुवर्णपदकं मिळतील, याची व्यवस्था करावी... या चौघांना आणि गंभीरसह पुरस्कार मिळालेल्या सगळ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!!

Unknown said...

Namaskar Ashish,

Ekdam yogya lekh.
Pan Suresh Kalmadi, Landge ashi third class mansa adhikari astil tar kai apeksha thevaichi ?
Tyanni kadhi kahi kam kela ahe ka kheladunsathi ? Phakta paise khane hach yancha khel..
Aani kheladunchi nagna dhinda kadhnare padadhikari, aani tyanna waiter chi kama karaila lavnare astil tar kase kai jagatik darjache kheladu tayar honar ?

Pattai ka mi kai mhantoi te ?

Regards
Mandar

अमोल said...

मंदार...
अगदी खरं आहे तुम्ही लिहिलेलं. मुळात कुठल्याही खेळाच्या संघटनांमघ्ये राजकारणी का असावेत, हे न सुटलेलं कोडं आहे. कलमाडी काय, शरद पवार काय, अरूण जेटली काय, लालूप्रसाद यादव काय, यांचा खेळाशी कधी संबंध होता? पण हे सगळे खेळांच्या संघटनांचे अध्यक्ष आहेत (किंवा होते.) त्यामुळे ते या संघटना चालवताना पण सरकार चालवल्यासारख्या चालवतात... कामं करायची नाहीत. नुसती भाषणं... या राजकारणी लोकांमुळे खेळांकडे मोठं दुर्लक्ष होतं. या सगळ्यांना हाकलून त्यांच्या जागी जुन्या खेळाडूंना बसवलं पाहिजे. म्हणजे आपल्याकडे खेळाला काहीतरी भवितव्य असेल.

mahesh bankar,kalyan said...

बिनपैशांचे खेळ संपले
इंटरनेट कॅफे, व्हिडिओ पार्लर, कॉंम्प्युटर गेम्स यामुळे मैदानी खेळ कमी होत चालले आहेत, अशी खंत 93 वर्षे वयाचे बोरलीकर व्यक्त करतात. ते म्हणतात, "आमच्या काळात हुतुतू, आट्यापाट्या, निघोरचा, खो-खो, कुस्ती, फुटबॉल, पळण्याच्या शर्यती असे खेळ खेळले जायचे. त्यासाठी एक पैसाही खर्च करावा लागत नव्हता. शरीरयष्टी उत्तम रहात असे. आताची मुले टीव्ही, कॉम्प्युटर किंवा कॅफेत जाऊन बसतात. पैसा तर खर्च होतोच, शिवाय शारीरिक व्यंगेही उत्पन्न होतात'. अर्थात, आजची पिढी हुशार असल्याचे ते मान्य करतात. माहितीचा प्रचंड स्रोत मुलांना अलिबाबाच्या गुहेप्रमाणे खुला झाला आहे. एकविसाव्या शतकातील तंत्रज्ञान युगात नवनवीन माहिती शिकायलाच हवी, पण त्याचबरोबर मैदानी खेळसुद्धा भरपूर खेळलेच गेले पाहिजेत.

क्रिकेटच्या या धुळवडीत या सालचे अर्धे वर्ष निघून गेले आणि पुढच्या अर्धवर्षात खेळले जाणारे सामनेही कमी नाहीत. पूर्वीच्या काळात कुठेही मोकळी जागा, मैदाने, बागा, आडगल्ल्या असल्या की तिथे मुले आट्यापाट्या, कबड्डी, हुतूतू, खो-खो, चेंडू लिंगोर्या, विटी-दांडू, लंगडी, फुगडी, सूरपारंब्या, झिम्मा, आबाधाबी, धाबा ऐसपैस, लपंडाव, भोवरा, पकडापकडी, रस्सीखेच, पंजा लढत, चमचा गोटी, चमचा लिंबू, तीन पायांची शर्यत वा दोन्ही पाय गोणपाटात घालून धावण्याची शर्यत असे किती तरी हिंदुस्थानी खेळ खेळताना दिसत. परंतु क्रिकेटच्या वेडापायी शहरापासून ते ग्रामीण जनतेपर्यंत त्या खेळांचा दुर्दैवाने विसर पडत आहे.
मला सागताने अभिमान वाटत आहे. कि आमी आट्यापाट्या इतिहासजमा नाही होऊ दिला.आट्यापाट्या या एका शिवकालीन खेळ आहे आणि मी यात राष्टीय खेळाडू आहे. अर्जुन ने आट्यापाट्या कडे वळावे…म्हणजे… एक तर आट्यापाट्या ला ग्लॅमर प्राप्त होइल…किंवा अर्जुनची मिडिया-माकडांपासून सुटका होइल…हा…हा…..जय आट्यापाट्या….जय मराठी…