
"जब वुई मेट' चित्रपटातलं "ते" दृष्य आठवतंय...? शाहिद कपूर करिनाला सोडून आल्यानंतर प्रथमच "शेअर होल्डर्स'ना सामोरा जातो. तेव्हा त्याच्या तोंडचे संवाद आठवतात...? ""आदित्य कश्यप अपने फादर की जगह नही ले सकता. कंपनी स्पिल्ट होनेवाली है. हमारे शेअर प्रायझेस ऑल टाईम लो है. सारे नये ब्रॅंड्स फ्लॉप हो चुके है. उपर से 572 क्लेम्स. इन आदर वर्डस अपनी हालत बहुत खराब हो गई है बॉस. अपनी तो बॅंण्ड बज गई है बॉस...'' इइ.
परिस्थिती अगदी तशीच्या तशी नसली तरी शिवसेनेचे कार्यप्रमुख उद्धव यांची अवस्था काहीशी अशीच आहे. उद्धव हे अगदी चोहोबाजूंनी समस्या आणि अडीअडचणींनी घेरले गेले आहेत. राज-राणे यांच्या बंडखोरीतून शिवसेनेला बाहेर काढून सैनिकांमध्ये मनोधैर्य निर्माण करण्यात ते यशस्वी ठरले. पण लोकसभा निवडणुकीत मुंबईत बसायचा तो फटका बसलाच. त्यावेळी किमान मराठवाड्यानं तरी साथ दिली होती. पण विधानसभा निवडणुकीत मुंबईप्रमाणेच मराठवाड्यानंही पाठ फिरविली. त्यामुळं उद्धव यांच्या नेतृत्वाच्या क्षमतेबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातंय. मराठी मतदार आणि शिवसैनिकांमध्येही काही प्रमाणात कुजबूज सुरु झालीय.
च्या दिवशी उद्धव ठाकरे पत्रकारांना सामोरेही गेले नाहीत. त्यामुळं उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया काय, ते पराभवाचं विश्लेषण कसं करतात हे जाणून घेण्याची उत्सुकता होती. त्यामुळंच भेटण्याची इच्छा व्यक्त करणारा डचड उद्धव यांना टाकला. अनपेक्षितपणे उद्धव यांचा तातडीनं "रिप्लाय' आला, "उद्या दुपारी साडेबारा वाजता मातोश्री..." निमंत्रण स्वीकारलं आणि रविवारी मध्यान्हीला (पत्रकार परिषदेच्या आदल्या दिवशीच...) मी आणि माझा सहकारी हृषिकेश देशपांडे मातोश्रीवर पोचलो. उद्धव यांच्याशी सविस्तर चर्चा तर झालीच पण ठाकरे कुटुंबियांचा जिव्हाळा अनुभवण्याची संधीही मिळाली.
एखाद्या घरात गेल्यानंतर यजमानाकडनं होणारं स्वागत, नुकतीच दिवाळी झाल्यामुळं फराळासाठी होणारा आग्रह अथवा खास "सीकेपी' पद्धतीनं तयार केलेल्या "कानुल्या' किंवा पोहे खाण्यासाठी रश्मी वहिनींकडून होणारा आग्रह... हे सगळं अनपेक्षित तर होतंच पण त्यापेक्षाही आश्चर्यकारक होतं. मातोश्रीवर पोचलो तेव्हा उद्धव हे मनोहर जोशी यांच्याशी बोलत होते. त्यामुळं रश्मी वहिनींनी सुरवातीला आमचं आदरातिथ्य केलं. अगदी कोण कुठनं उभं होतं किंवा माध्यमं कशी एकांगी बातम्या देतात इथपासून ते "सीकेपी' खाद्यपदार्थ किंवा मराठीचा मुद्दा किती महत्वाचा आहे, इथपर्यंत सर्वच विषयांवर त्या मोकळेपणानं बोलत होत्या. माध्यमांवर त्यांची किती "नजर' आहे, हे त्या देत असलेल्या संदर्भांवरनं अगदी क्षणोक्षणी जाणवत होतं.
सरांशी "गुफ्तगू' झाल्यानंतर उद्धव आमच्याशी "शिवसंवाद' साधायला आले. तत्पूर्वी त्यांनी निखील वागळे यांच्या "आजचा सवाल'चं उत्तर दिलेलं होतं. गेल्या पाच वर्षांत उद्धव यांनी जितकी आंदोलनं केली तितकी राज्यातल्या एकाही नेत्यानं केली नाहीत. कापूस दिंडी, कर्जमुक्ती देता का जाता, ऊस दरासाठी आंदोलन किंवा "शिवसंवाद' दौरा... इतक्यांदा जनतेमध्ये गेलेला हा नेता निकालानंतर पुरता हताश झाला असेल किंवा खचून गेला असेल, असं आम्हाला वाटलं होतं. राजचा दबदबा वाढत जातोय. दुसरीकडे मुंबई आणि मराठवाड्यासारखे बालेकिल्ले पडताहेत. याची चिंता त्यांच्या चेहऱ्यावर जाणवत होतीच. पण मी इतक्यानं खचून जाणाऱ्यातला नाही, हे देखील त्यांच्या बोलण्यातनं जाणवत होतं.
"मी महाराष्ट्र बोलतोय...'च्या निमित्तानं आम्ही राज्यात काय काय पाहिलं, याची माहिती ते आवर्जून घेत होते. शिवसेनेचे लोकप्रतिनिधी असलेला भागही कसा अविकसित आहे, हे आम्ही त्यांना सांगितलं. तसंच एकाच उमेदवाराला अनेकदा संधी दिल्यामुळंही काही ठिकाणी फटका बसला असावा, असं सांगितलं. त्यावर बरीच चर्चा झाली. त्यांनी मांडलेली बाजू कार्यप्रमुखातली माणुसकी दाखवणारी होती.
""नारायण राणे सेनेतून बाहेर पडले तेव्हा त्यांनी मराठवाड्यातल्या प्रत्येक आमदाराला चुचकारलं होतं. पण त्यांनी सेनेवरची निष्ठा ढळू दिली नाही. त्यात अनेक ज्येष्ठांचाही समावेश होता. सांदिपान भुमरें अथवा अण्णासाहेब माने यांना पुन्हा तिकिट मिळालं ते त्यांच्या निष्ठेमुळंच. त्यांचा पराभव झाला. पण सेनेत निष्ठावंतांनाच तिकिटं मिळतात, हे दाखवून देण्यासाठी त्यांना पुन्हा उमेदवारी दिली होती. सेनेत तिकिटं विकली जात नाहीत, हे दाखवून द्यायचं होतं,'' असं उद्धव यांचं स्पष्टीकरण वेगळा आयाम मांडणारं होतं.
दुसरीकडे अनुसूया खेडकर (कै. आमदार प्रकाश खेडकर यांच्या पत्नी) यांनी इच्छा नसताना पण सेनेला गरज असताना नांदेडमधून निवडणूक लढविली. मग आता दुसरा उमेदवार मिळाला म्हणून त्यांना उमेदवारी डावलणं मला माणूस म्हणून पटलं नाही, हे स्पष्टीकरणही शांत आणि संयमी नेत्याची आणखी एक बाजू दाखवणारं होतं. माध्यमांकडून दोन्ही बाजूनी होणाऱ्या टीकेला सामोरं जाताना उद्धव भूमिकेवर ठाम होते. ज्येष्ठांना तिकिटं द्या किंवा त्यांची तिकिटं कापा, टीका होतेच. शिवसेना राडेबाज, शिवराळ भाषा वापरणारी किंवा गुंडप्रवृत्तीची म्हणूनही टीका होत होती आणि आता संस्कृती बदलतोय तरीही टीका होतेच. त्यामुळं माध्यमं दोन्ही बाजूनं बोलतात आणि शिवसेनेवरच टीका करतात, हे त्यांनी सोदाहरण दाखवून दिलं. तसंच आम्ही आमचा मार्ग सोडणार नाही, हेही निक्षून सांगितलं.
""मराठवाड्यातल्या आणि विदर्भातल्या जनतेमध्ये गेलो. इतर कोणीही गेलं नाही इतके वेळा गेलो. तरीही मला आणि शिवसेनेला अपयश का आलं,'' याचं उत्तर त्यांना जास्त सतावत होतं. कदाचित उद्धव जितके कार्यरत आहेत तितके त्यांचे आमदार-खासदार नाहीत, हेच त्याचं उत्तर आहे. आपल्या भागाचा विकास करण्यात शिवसेनेचे लोकप्रतिनिधी पुढे नाहीत आणि हे आम्ही प्रत्यक्ष पाहिल्यामुळं आम्हाला माहिती होतं. ते त्यांनाही सांगितलं. शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करत असताना सभागृहात मात्र, पक्ष तितका सक्षम वाटत नव्हता. अशा काही विधानांच्या वेळी त्यांचा चेहरा पुरेसा बोलका होता.
आता मुंबईतली पक्ष संघटना वॉर्ड स्तरापासून पुन्हा बांधून काढायची, मराठवाडा-विदर्भात फक्त आंदोलन न करता विधायक तसंच विकासकामंही सुरु करायची, पुन्हा एकदा त्याच तडफेनं स्वकीय तसंच परकीयांशी दोन हात करायचे आणि मुख्य म्हणजे या सर्वांच्या जोडीला पुन्हा एकदा ज्वलंत हिंदुत्व हातात घ्यायचं, अशा अनेक गोष्टींचे संकेत कळत नकळत मिळत होते. जवळपास तास दीडतासांच्या भेटीमध्ये उद्धव यांच्याशी अगदी मोकळेपणानं चर्चा झाली.
राज आणि राणे यांच्या तडाख्यामुळं शिवसेनेची पडझड होणार, हे माहिती होतंच. पण उद्धव पराभूत झाले असले तरी "फिनिक्स' पक्षाप्रमाणे उभं राहण्याची जिद्द त्यांच्यात आहे. शांत, संयमी आणि सुसंस्कृत आहेत. ते चिवट आहेत. लोकांमध्ये मिसळण्यात आणि आंदोलनांचं नेतृत्व करण्यात त्यांना शरम वाटत नाही. तरीही शिवसेनेचे 44 आमदार आहेत. त्यातला 26 तरुण आहेत. लोकांसाठी जनतेमध्ये जाऊन आंदोलनं करणारा आणि त्यांच्या व्यथा समजून घेणारा उद्धव यांच्या व्यतिरिक्त एकही नेता नाही. अशा त्यामुळंच त्यांच्या या प्रयत्नांना लोकांची आज ना उद्या साथ लाभणार का, याचीच उत्सुकता आहे.
लेखाच्या सुरवातीला "जब वुई मेट' या चित्रपटात वापरलेल्या संवादाचा उत्तरार्ध खालील बाजूस आहे. फक्त चित्रपटात शोभेल असाच तो आहे.
""... इससे बुरा और कुछ हो नही सकता. अब सिर्फ अच्छा हो सकता है और होगा. इन्सान जो कुछ रियली चाहता है ना, ऍक्च्युली... उसे हमेशा वोही मिलता है. और इस बार मे रियल मे चाहता हूँ. ऍक्च्युअल मे. हर प्रॉब्लेम को में सामने से फेस करु. हर इनकमप्लिट प्लॅन को कम्प्लिट करु. इस कंपनी को वहा तक ले जाऊ जहा खुद डॅड भी नही सोच सकते...''
चित्रपटाच्या उत्तरार्धात शाहिद कपूर त्याच्या वडिलांची कंपनी खूप मोठी करतो. त्याला खूप फायदा होतो वगैरे वगैरे... तुलना करण्याची इच्छा नाही. पण तरीही उद्धव यांच्या आयुष्यातही हा संवाद खरा ठरेल का... असा विचार करतच "मातोश्री'तून बाहेर पडलो... समाधानी मनानं!