Sunday, August 15, 2010

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...तांत्रिक अडचणींपासून मिळाले स्वातंत्र्य...

तांत्रिक अडचणी किती त्रासदायक असून शकतात आणि त्यामुळं किती पारतंत्र्य येऊ शकतं, हे मी गेले काही महिने अनुभवत होतो. गेल्या कित्येक दिवसांपासून काही तांत्रिक कारणांमुळे मला ब्लॉग लिहिणं शक्य झालं नव्हतं. पण आता ती तांत्रिक अडचण दूर झाली आहे आणि तांत्रिक अडचणींपासून मला स्वातंत्र्य मिळालं आहे. तेव्हा मी पुन्हा नव्या जोमानं ब्लॉग लिहीन असं म्हणतोय. मध्यंतरी अनेक ठिकाणी जाऊन आलो, अनेक वेगवेगळे पदार्थ खाल्ले, अनेक चित्र-विचित्र अनुभव आले, त्यावर लिहायची खूप इच्छा होती. पण मला ते शक्य झालं नाही. उल्लेखच करायचा झाला तर आमची कोकणची ट्रीप, आमचं कोकणातलं देवरुख जवळचं घर, ऐन पावसात भिजून घरी गेल्यानंतर ओरपलेलं गरमागरम कुळथाचं पिठलं-भात आणि मुंबईहून पुण्याला येताना कर्जतच्या घाटातली निसर्गाची नवलाई हे दोन प्रसंग लिहिण्याची अतीव इच्छा होती. पण ती उत्स्फूर्तता आता नाही. माझ्या लेखनाचा मेगाब्लॉक सुरु असताना अनेकांनी मी ब्लॉग बंद केला आहे का, असा थेट सवालही केला. पण माझा नाईलाज होता. इच्छा असूनही मी काहीच करु शकत नव्हतो. पण आता मार्ग सापडला आहे आणि मी पुन्हा लिहिता झालो आहे.

ठिकठिकाणच्या वडापावपासून ते रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर मिळणा-या रगडा पावापर्यंत आणि सचिवालय जिमखान्यापासून ते पुण्यातील अभिषेकपर्यंत अनेक ठिकाणचा आस्वाद घेतला आहे. परळमधल्या प्रकाश सारख्या गावाची आठवण आणणा-या हॉटेलवर लिहायचं आहे. अनेक विषय आहेत. तेव्हा आता वारंवार भेटतच राहू.

हिंदुस्थानच्या ६४ व्या स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
हिंदुस्थानचा स्वातंत्र्यदिन चिरायू होवो, अशी प्रार्थना...


जयहिंद आणि जय महाराष्ट्र...

1 comment:

विक्रम एक शांत वादळ said...

भारतीय स्वातंत्र्य दिनाबरोबरच तुम्हाला ब्लॉग पारतंत्र्यातून मुक्त झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा
तुम्ही लिहित राहा आम्ही वाचत राहूच
जय हिंद
जय महाराष्ट्र