Sunday, October 17, 2010

शब्द हेच शस्त्र

याच मंत्राने मृतांचे, राष्ट्र सारे जागले ।

शस्त्रधारी निष्ठुरांशी, शांतीवादी झुंजले ।

शस्त्रहीना एक लाभे, मंत्र वंदे मातरम्‌


ब्लॉग हे विजयासाठी नवे माध्यम

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर लंडनमध्ये असताना एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी गेले होते. त्यावेळी पोलिस येणा-या प्रत्येक नागरिकाची कसून तपासणी करत होते. कोणी आपल्याबरोबर एखादे शस्त्र आणले नाही ना. लपवून बॉम्ब बिम्ब तर आतमध्ये नेत नाही ना, हे तपासून पाहत होते. त्यावेळी स्वातंत्र्यवीरांना पोलिसांनी अडविले. त्यांची तपासणी केली. त्यांच्याकडे काहीच सापडले नाही. सापडले नाही म्हणजे त्यांच्याजवळ काही नव्हतेच. त्यामुळे पोलिसांनी त्यांना आत जाण्यास परवानगी दिली.

आपल्याला परवानगी मिळालेली पाहून सावरकर हसले आणि त्या पोलिसाला विचारले. बाबा, तुला माझ्याजवळ काहीच सापडले नाही ना, मग मी आत जाऊ का. सावरकरांचा असा प्रश्न ऐकून पोलिस बुचकळ्यात पडला. त्यानं सावरकरांना विचारलं की, तुमच्याकडे स्फोटक असं काही आहे का. त्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर त्यांच्याकडील पेन दाखवत त्याला म्हणाले, माझ्याकडे ही जी लेखणी आहे, ती सर्वाधिक धोकादायक अस्त्र आहे. इंग्रजांविरुद्ध सर्वात मोठे शस्त्र आहे. तुला जर वाटत असेल तर मी ते काढून ठेवतो. त्यावर तो पोलिस हसला आणि म्हटला, या पेनाचा उपयोग करुन तुम्ही इंग्रजांचे काय वाकडे करणार. ही लेखणी तुमच्यापाशीच ठेवा.

पुढे याच लेखणीच्या जोरावर स्वातंत्र्यावीरांनी १८५७ चे स्वातंत्र्यसमर हे पुस्तक लिहून इंग्रजांना पळता भुई थोडी केली. आपल्याविरुद्ध निर्माण होत असलेला असंतोष पाहून इंग्रजांनी त्या पुस्तकावर बंदी घातली, पुस्तके जप्त केली. पण त्या प्रभावी आणि धारदार शब्दांचा व्हायचा तो उपयोग झालाच आणि हजारो बॉम्बगोळ्यांनी जे काम शक्य नव्हते ते काम शब्दांनी साध्य करुन दाखविले.

लोकमान्य टिळकांनी सरकारचे डोके ठिकाणावर आहे का, हे आमचे गुरुच नव्हेत इइ. अग्रलेखांमधून जे जाज्ज्वल्य विचार मांडले ते इतके जहाल आणि प्रेरक होते की, इंग्रजांना काय करावे ते सुचेना. लोकमान्यांचे अग्रलेख इतके स्फूर्तीदायक होते की, लोकमान्यांना असेच मोकळे ठेवले तर आपल्याला राज्यकारभार करणे अवघड होऊन बसेल. ही शब्दांची धार कमी करण्यासाठी इंग्रजांनी लोकमान्यांवर राजद्रोहाचा खटला चालविला आणि त्यांची रवानगी मंडालेच्या तुरुंगात केली. ही होती शब्दांची ताकद.

पुढे आचार्य प्रल्हाद केशव अत्रेंनी मराठामधून आणि हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी कुंचल्याच्या फटका-यांच्या माध्यमातून विरोधकांची दाणादाण उडवून दिली. महाराष्ट्रद्वेष्ट्यांना नामोहरम करुन टाकले. त्यांना कोणत्याच शस्त्रांची गरज वाटली नाही. आपल्याकडे असलेल्या शब्दांच्या आणि कलेच्या सामर्थ्यावर त्यांनी इतकं प्रचंड काम केलं ज्याचा कोणी स्वप्नातही विचार केला नसेल.

आणीबाणीच्या काळातही आपल्याविरोधातील वातावरण अधिक भडकू नये, म्हणून स्व. पंतप्रधान इंदिरा गांधींना वृत्तपत्र स्वातंत्र्यावर गदा आणावी लागली. लोकशाहीच्या काळ्या पर्वातील या घटनेचा निषेध इंडियन एक्सप्रेस सारख्या वृत्तपत्रांनी अग्रलेख न लिहिता ती जागा कोरी सोडून केला. कुलदीप नय्यर यांच्यासारख्या संपादकांनी रुपक कथेच्या माध्यमातून आणीबाणीवर आसूड ओढले. त्यातून पोहोचायचा तो संदेश लोकांपर्यंत पोहोचायचा.

ही शब्दांची ताकद आहे. त्यामुळेच शब्द हेच शस्त्र आहे. हे शस्त्र जपून वापरा. एकदा बंदुकीतून सुटलेली गोळी आणि तोंडातून निघालेला शब्द पुन्हा परत घेता येत नाही, हे म्हणतात. अशा या शब्दांना आता ब्लॉग हे नवे माध्यम मिळाले आहे. व्यक्त होण्याचे, आपली भूमिका मांडण्याचे, आपल्यावर होणा-या अन्यायाला वाचा फोडण्याचे.

ब्लॉग हे माध्यम इतके प्रभावी आहे की, पार एनडीटीव्हीच्या बरखा दत्तपासून ते सकाळ वृत्तपत्र समूहाचे अभिजीत पवार यांनाही या ब्लॉग्जची दखल घ्यावी लागते. इतकेच नाही तर लेट्स भंकस नावाच ब्लॉग तर महाराष्ट्रातील एका अतिवरिष्ठ राजकारण्याने स्वतः हस्तक्षेप करुन बंद करायला लावला होता, अशी चर्चा आहे. अमेरिकेतील काही पत्रकार इराक आणि अफागाणिस्तान युद्ध कव्हर करण्यासाठी गेले होते. तेथे त्यांनी काही ठिकाणी अमेरिकेच्या सैन्याची होत असलेली पिछेहाट हे पत्रकार स्वतःच्या ब्लॉग्जवर देत होते. अशा पद्धतीने आपल्याच देशाची पिछेहाट आणि रणनिती कशी फसते आहे, याचे वार्तांकन ब्लॉ़गवर करणे योग्य की अयोग्य यावर चर्चा होऊ शकते. पण अमेरिकी पत्रकारांते ते ब्लॉग्ज सैन्याला इतके झोंबले की, अमेरिकेने पत्रकारांचे ते ब्लॉग्ज काही काळासाठी ब्लॉक केले. ही ब्लॉग्जची ताकद आहे. कारण ते सर्वसामान्यांना ऍव्हेलेबल आहेत. सोपे आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे फुकट आहे.

आजही विविध वृत्तपत्रे तसेच वृत्तवाहिन्यांमधील कर्मचारी त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाच्या बातम्या कळते-समजते किंवा सहयोगी बातमीदार या ब्लॉग्जकडे व्यक्त करतात. त्यावर अनेक पत्रकार आपली घुसमट प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होतात. त्यातून ज्यांच्यापर्यंत जो संदेश पोहोचला पाहिजे तो पोहोचतोच. अन् मुख्य म्हणजे कोणीही त्याकडे दुर्लक्ष करु शकत नाही.

त्यामुळे ब्लॉग या नव्या माध्यमामुळे शब्दांना नवी धार प्राप्त झाली असून असत्यावर, अन्यायावर आणि अधर्मावर मात करण्यासाठी या माध्यमाचा पुरेपूर उपयोग होउ लागला आहे. भविष्यात हा वापर अधिक वाढणार असून त्याची दखल संबंधितांना अधिक गांभीर्यानं घ्यावी लागेल, यात शंकाच नाही.

(विजयादशमीच्या दिवशी किंवा काही ठिकाणी खंडेनवमीलाही शस्त्रांची पूजा होते. शब्द हेच शस्त्र मानणा-या माझ्यासारख्या हजारो-लाखो जण माझ्याशी सहमत नसतील तरच नवल.)

7 comments:

psiddharam.blogspot.com said...

khup chaan... lekh aawadla.

Anonymous said...

Siddharam Patil, solapur Tarun bharat ka?

Anonymous said...

आम्ही तुमच्याशी सहमत आहोत. तुम्ही लिहा आणि लिहीतच रहा...आणि जनतेला घायाळ करत रहा... कारण शब्द हेच शस्त्र आहेत...

मिथुन शरद बोबडे

Anonymous said...

छान आहे लेख... भडास हा हिंदी ब्लॉग पण या अनुशषंगाने नोंद घेण्यासारखा आहे.

गणेश पुराणिक

Anonymous said...

गुड... सहमत

Anonymous said...

फुल्ली ऍग्रीड...

दीपक सुधाकर कुलकर्णी

Anonymous said...

हिंदूहृदयसम्राट असे लिहिलेत पण मग दुर्गा इंदिरा गांधी असेही लिहिले पाहिजेत.हेच सम्राट आणि दुर्गा यांचे आणीबाणीच्या वेळी सख्य होते. (त्याचमुळे जोशी भाऊ मुंबईचे महापौर झाले.)

रवी गोडबोले.