Sunday, July 10, 2011

उतू नका, मातू नका...

हवा डोक्यात जाऊ देऊ नका...

टीपटॉप नगर होतं. तिथं एक क्लब होता. टॉपफन क्लब असं त्याचं नाव. लोक संध्याकाळी यायचे, कुणी टेनिस खेळायचे, कुणी जिममध्ये जायचे, कुणी स्विमिंगचा आनंद लुटायचे, तर काही जण रिफ्रेशमेंटमध्ये जाऊन पोटपूजा करायचे. महिलांच्या किटी पार्टीजना तर मर्यादाच नव्हती. रोज दे धम्माल सुरु असायची. मस्त चाललंय आमचं, असं म्हणत क्लबची जोरात घोडदौड सुरु होती. आपण पण या क्लबचे मेंबर व्हावं, अशी इच्छा त्या नगरीतल्या प्रत्येक माणसाला असायची. कधी एकदा मी त्या क्लबचा मेंबर होतोय आणि एन्जॉय करतोय, असं त्याला व्हायचं. त्यासाठीच त्यांची सारी धडपड सुरु असायची. इतकी प्रतिष्ठा त्या क्लबला प्राप्त झाली होती.

नगरीतील बडीबडी मंडळी त्या क्लबचे मेंबर होते. कोणाला क्लबचं मेंबर करुन घ्यायचं आणि कोणाला मेंबरशिप द्यायची नाही, हे सगळं त्या क्लबच्या पदाधिकाऱ्यांवर अवलंबून होतं. अनेकदा पदाधिकारी लोकांना इतक्या वाईट पद्धतीनं झिडकारायचे की विचारता सोय नाही. इतकी त्या क्लबची चलती होती. चलती कसली दबदबा किंवा दराराच होता, असं म्हणा ना. अर्थात, फक्त पैसा पाहूनच त्या क्लबची मेंबरशिप मिळायची नाही. मेंबरशिप फी लाखो रुपये असायची पण फक्त पैसा असला की मेंबरशिप मिळाली असं नव्हतं. अभ्यासू, हुशार आणि विविध क्षेत्रात चमकलेल्या मंडळींना या क्लबचं मानद सदस्य करुन घेतलं जायचं. पण ती संख्या खूपच लिमिटेड होती. क्लबचे काही नियम तर भन्नाट होते. तुम्हाला क्लबची मेंबरशिप सोडायची असेल तर कारण सांगावं लागायचं. ते कारण संचालक मंडळाला पटलं तरच तुम्हाला क्लब सोडता यायचा. जर कारण पटलं नाही तर पन्नास हजार रुपयांचा दंड भरावा लागायचा. अन्यथा क्लबची मेंबरशिप सोडता यायची नाही.

क्लबची वाढती लोकप्रियता आणि लक्ष्मीची प्रसन्नता असल्यामुळे पदाधिकाऱ्यांना क्लबचा इतर शहरांमध्ये ब्रांचेस काढायच्या होत्या. इतकंच नाही तर हिल स्टेशन आणि टुरिस्ट स्पॉट्सवर रिसॉर्ट्स काढण्याचाही बेत होता. त्यादृष्टीनं त्यांची तयारी सुरु होती. तज्ज्ञ मंडळींचं मार्गदर्शन घेणं सुरु होतं. कशा पद्धतीनं वाटचाल करायची याबाबत मिटिंग्ज सुरु होत्या. अशा पद्धतीनं रिसॉर्ट्स आणि हॉलिडे होम चालविणाऱ्या मंडळींनी हे कसं सुरु केलं, त्याचं अवलोकन करणंही जोरात सुरु होतं. असंच काहीसं वेगळं करण्याची क्लबची इच्छा होती. सगळं जग पाहतच राहिल, असं जगातलं एक नंबरचं काहीतरी करण्याचा त्यांचा इरादा होता. शिवाय सगळी परिस्थिती त्यांच्या बाजून होती.

सगळं काही छान सुरु असताना नेमकं क्लबच्या मागं वेगळंच बालंट आलं. क्लबच्या स्विमिंग पुलामध्ये बुडून एकाचा मृत्यू झाला. वास्तविक पाहता जीवरक्षक वगैरे मंडळी होतीच. पण घडायचं ते घडून गेलं. काही दिवस क्लबमध्ये वातावरण सुन्न होतं. लोक पूर्वीसारखे यायचे नाही आणि आले तरी ते पूर्वीसारखे एन्जॉय करायचे नाहीत. स्विमिंग पुलावर तर कोणी फिरकेनासंच झालं. त्याची तर रयाच निघून गेली. क्लबच्या पदाधिकाऱ्यांना वाटलं, की थोड्या दिवसांनी लोक ही घटना विसरुन जातील आणि सगळं स्थिरस्थावर होईल. पण कसलं काय आणि कसलं काय. ज्यांना क्लबची मेंबरशिप मिळाली नव्हती, त्या चिडलेल्या लोकांनी अफवा पसरविण्यास सुरुवात केली, की स्विमिंग पुलामध्ये मरण पावलेल्या तरुणाचा आत्मा क्लबमध्ये अधूनमधून हिंडत असतो. त्याला बऱ्याच लोकांनी पाहिलंय, तो कधीकधी समोर असतो आणि पटकन गायब होतो इइ.

आता नगरी टिपटॉप असली तरीही काही लोक अंधश्रद्ध असतातंच ना. मग इतर लोकांनी त्याला तेल तिखट मीठ लावून अफवा पसरवायला सुरुवात केली. क्लबची मेंबरशिप घेतली तर घरात आक्रीत घडतं. काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीनं मेंबरशिप घेतली आणि दहा दिवसांमध्ये त्याची आई गेली. एकाने मेंबरशिप घेतली आणि त्याची नोकरी गेली. अशा अफवांना ऊत आला. त्याचा परिणाम असा, की लोकांनी त्या क्लबची मेंबरशिप सोडायला सुरुवात केली. लोकं वार्षिक मेंबरशिप रिन्यू करेनासे झाले. जे लाईफ मेंबर होते ते क्लबकडे फिरकेनासे झाले. त्यांनी आपल्या एन्जॉयमेंटसाठी नगरीतील इतर क्लबचा आसरा घेतला. अर्थात, सुरुवातीला नगरीतील इतर क्लब फारसे चांगले नव्हते. पण मेंबरशिप वाढल्यानंतर त्या क्लबचं स्टेटसही वाढलं.

एकीकडे नगरीतल्या इतर क्लबचं स्टेटस वाढत असताना टॉपफन क्लबचं मात्र दिवाळं निघण्याची वेळ आली होती. आर्थिक क्षेत्रात तर दाणादाणच उडाली होती. दुसरीकडे ग्राहक आणि मेंबर्सची संख्या कमालीनं कमी होत होती. तिसरीकडे दोन-दोन महिने पगार मिळत नसल्यामुळं कर्मचारीही राजीनामा देऊन दुसरा जॉब जॉईन करु लागले होते. त्यामुळे टॉपफन क्लबची अवस्था केविलवाणी झाली होती. संचालक मंडळाला तर काय करावं, हेच सुचेनासं झालं होतं. अशा परिस्थितीत एका संचालकाच्या डोक्यातून एक अफलातून कल्पना आली. त्यानं दुसऱ्याच दिवशी पेपरमध्ये अॅड दिली. पाच जणांना मेंबर करा आणि मेंबरशिप फुकट मिळवा. पूर्वी नाही का, पत्रक वाटली जायची. ही शंभर पत्रक छापून वाटा म्हणजे तुम्हाला चांगली नोकरी मिळेल, लग्न ठरेल, पगार वाढेल, घर घ्याल. नाही वाटली तर कोण तरी जाईल, नोकरीवर गदा येईल आणि दुःखद घटनांचा भडिमार होईल. पूर्वी अशी पत्रकं वाटली जायची. आता असे ईमेल आणि एसएमएस येतात. काही मल्टिनॅशनल कंपन्याही अशाच पद्धतीनं मार्केटिंग करुन बकरे मिळवतात.

आता टॉपफन क्लबवरही मेंबर, कर्मचारी आणि व्यवसाय मिळविण्यासाठी ही वेळ आली होती. पाच मेंबर करा आणि मेंबरशिप मोफत मिळवा, वीस मेंबर करा आणि लाईफटाईम मेंबरशिप फ्री घ्या अशा योजना सुरु करण्याची वेळ क्लबवर आली होती. कुठे मेंबरशिप सोडताना पन्नास हजार रुपयांचा दंड द्यायचा आणि चेनमार्केटिंगसारखी योजना जाहीर करायची. क्लबची सगळीच वाट लागली होती. अशी योजना सुरु केल्यामुळे क्लबमध्ये क्लास येण्याऐवजी सगळी तळागाळातील मंडळी येऊ लागली. क्लबचा दर्जा हरवला. हुशार, श्रीमंत, प्रतिष्ठीत, अभ्यासू, नामवंत मंडळी इतर क्लबकडे जाऊ लागली आणि ज्यांना दुसरीकडे कुठेच मेंबरशिप मिळत नाही, ती मंडळी टॉपफन क्लबचे मेंबर होऊ लागली. कारण पाच बकरे मिळविणं हे लाखो रुपये भरण्यापेक्षा खूप सोप्प होतं.

क्लबच्या कामगारांनाही अशाच पद्धतीनं जुंपलं गेलं होतं. वर्षभरात पाच मेंबर करणं त्यांना कम्पल्सरी केलं होतं. पाच मेंबर केले नाहीत तर त्यांना पगारवाढ मिळायची नाही. पगारवाढच नाही तर त्यांचं प्रमोशनही त्यावरच अवलंबून असायचं. मेंबर करा आणि प्रमोशन घ्या, पगारवाढ घ्या. कामगाराची कुवत काय आहे, त्याचं शिक्षण काय आहे, त्याचा अनुभव काय आहे, याचा काहीही संबंध उरला नव्हता. त्यामुळं हुशार आणि सचोटीनं काम करणारी मंडळी मागं पडली आणि बाजारबुणगे कर्मचारी पुढं जाऊ लागले. वर्षानुवर्षे काम करणाऱ्या सज्जन आणि प्रामाणिकपणे काम करणारे कामगार असल्या कमअस्सल मंडळींच्या हाताखाली झटू लागले.

क्लबचे मेंबर आणि कामगार हे सुसंस्कृत नसल्यामुळे महिला आणि कुटुंबांचं क्लबमध्ये येणं थांबलंच होतं. देशी दारुचे अड्डे असतात तसं स्वरुप क्लबला आलं होतं. जिम, स्विमिंगपूल, टेनिस कोर्ट ओस पडलं होतं आणि क्लबमध्य़े नव्यानंच सुरु करण्यात आलेला बार जोरात सुरु होता. सकाळी आठ वाजल्यापासून रात्री दोन वाजेपर्यंत हाऊसफुल्ल. बरं, परदेशी मद्यापासून ते वाईनपर्यंत उंची मद्य घेणारी मंडळी कमी आणि संत्रीमोसंबी घेणारी मंडळी जास्त असा प्रकार सुरु झाला होता. क्लबची सगळीच वाट लागली होती आणि टॉपफन क्लब दारुड्या बेवड्यांचा अड्डा बनला होता. क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी ही परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला. पण काहीच होत नाही म्हटल्यानंतर त्यांनीही क्लबचे राजीनामे देऊन दुसरीकडे जाणे पसंत केले. काही जण दुसऱ्या क्लबमध्ये जॉईन झाले तर काहींनी स्वतःचा बिझनेस सुरु केला. ज्यांना दुसरीकडे काहीच मिळालं नाही ती मंडळी नाईलाजानं टॉपफन क्लबमध्येच राहिले. अर्थात, टॉपफनमधील फन कधीच संपली होती आणि सगळा बाजारबुणग्यांचा खेळ उरला होता.

टिपटॉप नगरीतील मंडळींनीही टॉपफन क्लबकडे पाठ फिरविली होती आणि हा क्लब नगरीतल्या भणंग, दारुबाज आणि भुरट्या मंडळींचा अड्डा बनला होता. उतू नये, मातू नये, कोणावरही अशी वेळ ओढवू नये, असं म्हणत गावकरी नाराजी व्यक्त करत होते.

साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

3 comments:

Anonymous said...

club karta..."arre re re re"... pann lekh maatr ek number

- prasad

विनायक पंडित said...

लेख आवडला.आशय आणि शैली दोन्ही छान!बाकी, जे झालंय या नगरीत ते वाईटच...

Kiran said...

भावना पोचल्या.....