Friday, September 07, 2012

पाच वर्षांनंतर…


पुन्हा एकदा हैदराबाद

बऱ्य़ाच वर्षांनंतर म्हणजे बरोब्बर पाच वर्षांनी हैदराबादला जाणं झालं आणि पुन्हा एकदा जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. अगदी सुरुवातीला केसरी सोडून ई टीव्ही जॉईन केलं होतं. तेव्हा इलेक्ट्रॉनिक मिडीयाचा सुळसुळाट झाला नव्हता. मराठीमध्ये तर एकमेव ई टीव्ही वरील बातम्याच सर्वाधिक विश्वासार्ह आणि गावागावापर्यंत पोहोचलेल्या होत्या. त्यामुळे तेव्हा ई टीव्हीची प्रचंड क्रेझ होती. अर्थातच, बातम्यांसाठी. कारण कार्यक्रमांसाठी ही वाहिनी कधीच ओळखली गेली नाही आणि आताही जात नाही. असो. 

तेव्हापासूनचे ऋणानुबंध ई टीव्ही आणि पर्यायाने हैदराबादशी जोडले गेलेले आहेत. जून २००३ पासून. त्यामुळे हैदराबादला जाणं, ही गोष्ट खूपच आनंददायी आणि गतस्मृती जागविणारी असते. मध्यंतरी दोन-तीन दिवस लागून सुटी आल्यामुळे मग ‘चलो हैदराबाद’चा नारा दिला. हुसेनसागर एक्स्प्रेसनं निघालो. सोलापूर सोडल्यानंतर मग गुलबर्गा, वाडी, तांडूर, निझामाबाद वगैरे ओळखीची स्टेशन्स मागं टाकत अखेरीस हैदराबाद आलं. संपूर्ण प्रवासात (कदाचित फक्त) वाडी येथे उत्तम नाश्ता मिळत असल्यानं तिथंच रेमटून नाश्ता केला. इथं मिळणारा नाश्ता म्हणजे इडली, मेदूवडा आणि भरपूर चटणी. क्वचित कधीतरी डाळवडा किंवा घावन. एका केळीच्या पानावर चार इडल्या आणि त्यावर ओतलेली चटणी. अशा अगदी भरपेट नाश्त्यानं हैदराबादपर्यंत साथ दिली. 

हैदराबाद अगदी होतं तस्संच आहे. म्हणजे जो परिसर माझ्या परिचयाचा आहे, तो अगदी आहे तस्सा आहे. हैदराबादची बससेवा अगदी पूर्वीसारखीच विश्वासार्ह आणि स्वस्त आहे. रस्त्यावरील गाड्यांवर मिळणारा इडली-डोसा तितकाच स्वादिष्ट असून वाढत्या महागाईच्या झळा त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीत. बाकी ट्रॅफिकची बेशिस्त, ‘ऐसा क्या कर रहेला तू’ असं उर्दूमिश्रीत हिंदी, रस्त्याच्या कडेला असलेल्या गाड्यांवरील पुंगू, मिरची भजी, इडली, मेदूवडा नि पुरी तसेच बटाट्याची पातळ डोसाभाजी, गल्लोगल्ली उगविलेल्या शिक्षण संस्था आणि छोटी-मोठी हॉस्पिटल्स आणि पाचशे मीटरच्या अंतरावर असलेली थिएटर्स. सर्व काही जसेच्या तसेच. फक्त मी रहायचो त्या दिलसुखनगरमध्ये अनेक बदल झाले आहेत. इतकाच काय तो फरक.
 

हैदराबादमध्ये गेल्यानंतर पहिलं काम केलं म्हणजे, दिलसुखनगर भागत अगदी मनसोक्त फिरलो. आम्ही जिथं दीड वर्ष राहिलो, त्या श्रीनगर कॉलनीतल्या घरी जाऊन आलो. नुसतं त्या मार्गावरून फिरत असतानाही जुन्या आठवणी अगदी चित्रपटाप्रमाणे डोळ्यासमोरून तरळत होत्या. आम्ही रहायचो ती गल्ली म्हणजे ई टीव्ही लेनच झाली होती. ई टीव्हीतले जवळपास दहा-बारा लोक आजूबाजूला रहायचे. त्यामुळे गुढीपाडव्याला अगदी गुढ्या-तोरणं उभारण्याचा कार्यक्रम आम्ही केला होता. ते सगळं डोळ्यासमोर दिसत होतं. पण आता ई टीव्ही मराठीचीच अवस्था अगदी वाईट असल्यामुळं आमच्या ई टीव्ही लेनमध्येही कोणीही उरलेलं नाही. योगायोग इतकाच, की आम्ही रहायचो त्या घरी मराठी कुटुंबच सध्या रहात आहे. इतकंच.

दिलसुखनगरमधील सर्वाधिक दुःखदायक घटना म्हणजे आमच्या एका मुस्लिम चाचाचं बंद झालेलं दुकान. ज्या चाचाच्या पुरीभाजी, पान आणि चहावर आम्ही हैदराबादमधील दिवस काढले तो चाचा तिथून गायब झालाय. म्हणजे त्याच्या हॉटेलाच्या जागी आता मस्त एअरसेलची शोरूम थाटण्यात आलेली आहे. ई टीव्हीत असताना नाईट शिफ्ट (रात्री १०.२० ते सकाळी ९) करून आल्यानंतर सक्काळी मस्त गर्रमागर्रम भाजी आणि फुगलेल्या पुऱ्य़ा अशी एक दीड प्लेट जिरविल्यानंतर ते स्वर्गसुखच वाटायचं. पुरीभाजीनंतर इराण्याकडे मिळतो तशा स्वादाचा कडक चहा. हे सगळं पोटात गेल्यानंतर मग रात्रभर जागून सकाळचं बुलेटिन काढल्याचा ताण डोळ्यावर येऊ लागायचा. घरी गेल्यानंतर मस्त ताणून द्यायची, की मग थेट तीन-चार वाजताच उठायचं. 

चाचाची दुसरी गोष्ट म्हणजे दुपारची शिफ्ट (२.२०) असो किंवा रात्रीची (१०.२०). चाचाकडून मिनाक्षी पान घेतल्याशिवाय बसमध्ये चढायचो नाही. मग आज कोणाला तरी मुंडक्यावर टाक, उद्या दुसऱ्य़ाला मुंडक्यावर टाक, कधी स्वतः पैसे दे, असं करीत आमचा पानाचा शौक पूर्ण व्हायचा. पान अगदी स्वस्त होतं. म्हणजे केवळ दोन रुपयाला. त्यामुळं हा शौक अगदी परवडण्यासारखा होता. क्वचित कधीतरी पाहुण्या कलाकारालाही मुंडक्यावर टाकण्यास आम्ही मागेपुढे पहायचो नाही. त्यामुळे नवा चेहरा दिसला, की त्यालाही कळलेलं असायचं, की आजचा बकरा हा आहे. मग चाचा स्वतःहून आम्हाला विचारायचा, ‘आज ये बडा साहब लगते है…’ असं. मग सगदळीकडे हशा… त्यामुळं चाचाचं हॉटेल बंद झाल्याचं पाहिलं आणि मन उदास झालं.

दिलसुखनगरच्या बसस्टॉपसमोरच्या आमच्या मराठी काकूंची गाडी अजूनही सुरू आहे आणि त्यावर तितकीच गर्दी असल्यानं बरं झालं. बिदरच्या असल्यामुळं त्यांना मराठी येतं. त्यांना मराठी येतं, हा आम्हाला आमच्या हैदराबादमधील सुरूवातीच्या काळात खूप दिलासा होता. ऑफिसमधले सहकारी सोडून इतर कोणीतरी आमच्याशी मराठीतून बोलतोय, हा आमच्यासाठी धक्काच असायचा. मग हळूहळू आम्ही कोनार्क थिएटरजवळचा जिलेबीवाला, राजधानी थिएटरच्या गल्लीतील भेळवाला वगैरे असे मराठी लोकं शोधून काढले. पण बिदरच्या या काकू सर्वात पहिल्या. मूग डोसा आणि पेस्सेरातू ही त्यांची खासियत. काकूंकडे दोन दिवस मस्त सकाळचा नाश्ता करून क्षुधाशांती केली आणि मगच पुढे गेलो. 
 

ई टीव्हीमधील अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकी माणसं आता माझ्या ओळखीची आहेत. त्यापैकी माधुरी गुंटी, स्वाती कुलकर्णी आणि धनंजय तथा काका कोष्टी यांची मनाप्रमाणे अगदी मस्त भेट झाली. महत्प्रयासानं माधुरीचा फोन नंबर आणि मग तिथं घर शोधून काढलं. तिच्या हातच्या भाकरी, शेवग्याच्या शेंगेची भाजी आणि सांबार-भात खाऊन हैदराबादला गेल्याचं सार्थक झालं, असंच मनात झालं. हैदराबाद मुक्कामी असताना पोळी-भाजी, चिकन किंवा संपूर्ण जेवण करावसं वाटलं तर आमची हक्काची सुगरण असायची माधुरी उर्फ अम्मा. हैदराबादमध्ये तीच आमची बहिण होती आणि तीच अम्मा. त्यामुळं सात वर्षांनंतर अम्माच्या हातचं जेवण जेवून अगदी तृप्त झालो.
 
स्वाती पण अगदी तशीच हक्काची बहिण. एखाद्या सुटी दिवशी किंवा संध्याकाळी निवांत असलो तर मग आमीरपेटमधील स्वातीच्या घरी जाऊन तुडुंब जेवण हे अगदी ठरलेलंच असायचं. मी हैदराबाद सोडलं, तेव्हा जवळपास एक महिन्यांनंतर सर्व सहकाऱ्य़ांनी मला मुंबईला एक पत्र पाठविलं होतं. त्यामध्ये स्वातीनं लिहिलं होतं, ‘जाड्या तू मुंबईला गेल्यानंतर मी घरामध्ये रेशनच भरलेलं नाही.’ ते अगदी खरं होतं. त्या स्वातीच्या घरी जाऊन थोडंसं रेशन संपवून आलो. सोबतीला आमची नेहमीची लाडकी दिल्लीवाल्याची जिलेबी होतीच. ‘खाण तशी माती आणि आई तशी स्वाती’ ही म्हण तिच्या मुलीच्या बाबतही तंतोतंत खरी आहे. तिची मुलगी तिच्यापेक्षा बडबडी आहे इतकंच. अर्थातच, तिच्या इतकीच किंवा तिच्यापेक्षा हुश्शार.
शेवटच्या दिवशी भेटलो आमच्या काकांना. ई टीव्हीमध्ये असताना सुरुवातीला ज्या दोन-तीन जणांकडून बुलेटिन काढायला शिकलो त्यापैकी एक म्हणजे काका. उर्वरित दोघे म्हणजे आमचे मेघराज पाटील आणि नरेंद बंडवे उर्फ बंडू. हैदराबादमध्ये काकांबरोबर आमची भट्टी अगदी मस्त जमायची. बाहेर जेवायला वगैरे जायचं असो किंवा एखादा चित्रपट पहायचा असो. मी हैदराबाद सोडल्यानंतर काका आमच्या घरीच रहायचे. त्यांच्या वनस्थळीपुरममधील घरी जाऊन फक्कड चहा घेतला आणि आमची स्वारी निघाली सिकंदराबादला. हैदराबादला येऊन बिर्याणी खाल्ली नाही, तर पाप लागलं, असं कुठल्या तरी पुस्तकात लिहून ठेवलंय. पूर्वी आम्ही पिस्ता बिर्याणी किंवा शादाबमध्ये जाऊन आस्वाद घ्यायचो. पण काकांच्या आग्रहास्तव थेट पॅराडाईज गाठलं. नाव सार्थ ठरविणारी बिर्याणी. 

इतकं सॉफ्ट चिकन की विचारू नका. नुसत्या दोन चमच्यांच्या सहाय्यानं सहज तुटेल, अशी तंगडी किंवा पिसेस आणि दम भरलेली बिर्याणी हे पॅराडाईजचं वैशिष्ट्यं. गेल्यावेळी शादाबला गेलो होतो तेव्हा तिथंही बिर्याणीमधील एकदम लुसलुशीत चिकनचा आस्वाद घेतला होता. त्यापेक्षाही वरच्या दर्जाची बिर्याणी पॅराडाईजमध्ये खायला मिळाली. आजूबाजूच्या किंवा अलिकडच्या पलिकडच्या टेबलवर बिर्याणी सर्व्ह करायला लागले, की त्याचा स्वाद नाकात घुसलाच. इतका दम त्या बिर्याणीमध्ये ठासून भरलेला. मग आपल्या टेबलवर बिर्याणी सर्व्ह केल्यानंतर काय हालत होत असेल विचार करा. कधी एकदा तुटून पडतोय, असं होतं. सोबतीला रायता आणि शोरबा. खूप भूक असेल तर दोघांत एक बिर्याणी अगदी सहजपणे पुरते. (श्रावण ठरवून पाळत नसल्यामुळे चिकन बिर्याणी खाताना फारशा याताना झाल्या नाहीत.)

मनसोक्त बिर्याणी हाणल्यानंतर मग ‘खुब्बानी का मिठा’ खायलाचचचचच हवा. हैदराबाद असल्यामुळं असेल कदाचित, पण या पदार्थाचे नाव ‘कु्र्बानी का मिठा’ असे मला वाटायचे. कौमुदी काशीकरने योग्य नाव सांगितले होतेच. पण पॅराडाईजमध्ये त्यावर शिक्कामोर्तब झाले. मस्त भिजविलेले जर्दाळू मध वगैरे गोष्टींमध्ये घालून तयार झालेला गोड पदार्थ म्हणजे ‘खुब्बानी का मिठा’. (मागे एका हॉटेलमध्ये भिजविलेले खजूर घालून आम्हाला चक्क फसविण्यात आल्याचे आमच्या उशीरा निदर्शनास आले होते.) हवे असल्यास ‘खुब्बानी का मिठा’वर आइस्क्रिम घालूनही सर्व्ह केले जाते. असा हा खास पदार्थ खाल्ल्याशिवाय हैदराबादची सफर संपूर्ण होत नाही, इतकेच ध्यानात ठेवणे इष्ट.

सिकंदराबादहून हैदराबादला येताना टँकबंड म्हणजेच हुसेनसागर तलाव पाहिला. शहराच्या मध्यवर्ती भागात इतका भव्यदिव्य तलाव हेच शहराचे वैशिष्ट्य आहे. तलावाच्या एका बाजूला हैदराबाद तर दुसरीकडे सिकंदराबाद. हुसेनसागरच्या एका बाजूला हैदराबादमधील कर्तृत्ववान मंडळींचे पुतळे उभारून परिसर सुशोभित करण्यात आला आहे. मात्र, तेलंगणाच्या आंदोलनात यातील काही पुतळे शहीद पडले असून तेलंगणाव्यतिरिक्तच्या उर्वरित आंध्रातील (रायलसीमा आणि किनारपट्टी) व्यक्तींचे पुतळे अक्षरशः उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. काहींची विटंबना करण्यात आली आहे. त्यामुळे विकृत लोकांची मानसिकता संपूर्ण देशभर एकच असल्याचे पुन्हा एकदा दिसून येते.

हैदराबादमध्ये गेल्यानंतर चारमिनार, मक्का मशीद आणि मोतीबाजार इथं चक्कर टाकली नाही, तर शहरातील वातावरणाचा फिलच येत नाही. शिवाय मी गेलो तेव्हा रमझान सुरु असल्यामुळं इथं जाण क्रमप्राप्तच होतं. शादाब हॉटेलपासून चारमिनारपर्यंत जाताना ईदचा मस्त माहोल अनुभवला आणि अखेरीस मक्का मशिदीपर्यंत पोहोचलो. आता जाऊन थोडीशी चक्कर मारल्यानंतर मोतीबाजारात फेरफटका मारला आणि थोडीफार खरेदी करून मग तिथून निघालो. कारण पुन्हा एकदा पुण्याकडे प्रयाण करायचे होते.

तीन दिवस असूनही कराची बेकरी, बिर्ला मंदिर, ज्वार रोटी (दाक्षिणात्य आणि मराठी भोजनाचा मिलाफ असलेले रेस्तराँ), अॅबिड्स, रामोजी फिल्म सिटीतील ई टीव्हीचे ऑफिस, लुम्बिनी गार्डन, गोकुळ चाट, गोवळकोंडा किल्ला आणि अशा अनेक ठिकाणी जाणे शक्यच झाले नाही. तरीही हैदराबादची ट्रीप संस्मरणीय ठरली आणि आठवणी जागविणारी ठरली.

(सौजन्यः आमचे बंधू योगेश चांदोरकर यांनी दिलसुखनगर भागातील गड्डीअन्नरम भागात प्राणिक हिलिंगच्या उपचारांसाठी भाड्याने घेतलेल्या फ्लॅटमुळे ट्रीप अधिक दिलासादायक ठरली.)

16 comments:

Anonymous said...

मराठी लिहिण्यात चांदोरकर यांचा हात कोणी धरेल काय? अप्रतिम लिखाण आणि अचूक निरीक्षणाच्या जोरावर तर ते इतके शिखरावर जावून पोहोचले आहेत..

सुंदर लिहिलंय..धन्यवाद..

=======
S.K.

advait said...

chan aavdle

Anonymous said...

अप्रतिम झकास
वाचनीय आणि अनुभव देणारे

मकरंद मुळे, ठाणे

Anonymous said...

Hyd cha lekh vachala chan aahe..mala Hyd la gelya sarkhach vatala..

Rahul Jadhav, Mumbai

Yamaji Malkar said...

आशिष, हैदराबादची सफर वाचून हैद्राबादला जावून अशीच भटकंती करण्याची तीव्र इच्छा झाली. बघू कधी जमते ते.. झकास....

सुभाष इनामदार...culturalpune.blogspot.com said...

आशीश, मस्त..अगदी हैद्राबादला मनसोक्त चक्कर मारून आल्याचे जाणवलं..मी दोनदा गेलो आहे..पण तु म्हणतोस ही ठिकाणं मला कधीच ठाऊक नव्हती..माधुरी गुंटी, स्वाती, आणि काका यांची नावे त्यामुळे मिळाली..त्यांनाही नमस्कार...आमची कौमुदीही त्यात दिसली..थोडी ई-सकाळची आठवण आली...ईटीव्हीने आम्हालाही काही दिलय..त्यात बरेच मित्र..त्यातच विनायक पात्रुडकर आणि कौमुदी काशीकर...
आपण नक्की एकदा जाऊ..नव्हे तू गेलास तर सांग..ठरवून जाऊ..पुन्हा ते सारं पोटभरून तुझ्या शब्दात म्हणजे रेमटून खाऊ..
झक्कास...तु लिहित रहा..आम्ही वाचित रहातोय..

Amit Joshi says said...

मित्रा , कोंगाड्यांच्या सिनेमाबद्दल लिहिले नाहीस. एखादा किस्सा लिहायला हवा होतास. मित्रा आठवणी जाग्या केल्यास रे.....

Nima said...

ईटीव्हीतली माणसं हैदराबादच्या नावानंही खुश होतात. आताही तसेच झाले. घराचा फोटो टाकून तर तू मजाच आणलीस. त्या परिसरात खूप छान दिवस गेलेत. सहीच.

Anonymous said...

Surekh ahe Ashish sir...

Anonymous said...

Priya Ashish,

Hyderabad var Diwali ankat lekh lihavas asa vatata.... mast jamlay.

u have a simple and honest style... grt. keep it up

Anni ek mitartvachi suchana. tula Hyderabadmadhe bhetlelya mansanbaddal jara jasta vachnyachi iccha aahe. udaharnartha Bidarchya marathi kaku, Chacha, Bhelvala, Jilebivala etc... Swati kinva Madhuribaddal chaan lihilays. Khanyabaddal vachana masta vatata. Mansanbaddal lihilyavar vachayla aankhi maja yete.

Hindit mashi shinknyachi vaat baghtoy...

Sanjeev Latkar

जीवन... said...

हैदराबादच्या आठवणी जागविल्याबद्दल धन्यवाद.

Onkar Danke said...

हैदराबादमधील सर्व दिवसांचा चित्रपट डोळ्यासमोरुन झळकला.हैदराबादमध्ये मी पहिली नोकरी केली. त्यामुळे मला त्याबद्दल विशेष जिव्हाळा आहे. मलाही एकदा पुन्हा एकदा हैदराबाद मनसोक्त हिंडायचे आहेय बघू या कधी जमते ते ?

Unknown said...

Mouthwatering here,
Gujaratonnet.com

Anonymous said...

Barech Disanni "bhatti" mast jamleey! Keep it up.. Ravi G

roses said...

This is really interesting…
Rosesandgifts.com

Anonymous said...

jadya... ek rahila. Ramzan chalu asatana ratri old city madhe jaun Halim...
- Amol Paranjpe