Wednesday, March 20, 2013

भोपाळ पार्ट टू...



लक्षात राहिलेली माणसं...
कुठल्याही ठिकाणी गेल्यानंतर मला तिथल्या लोकांना भेटायला मला खूप आवडतं. म्हणजे ऐतिहासिक वास्तू, संग्रहालयं, देवळं किंवा मशिदी-चर्च हे पहायला आवडतं नाही, असं नाही. पण तिथल्या लोकांशी बोलायला, त्यांच्याकडून त्या भागाची अधिक माहिती घ्यायला, परंपरा जाणून घ्यायला, गमतीशीर किस्से ऐकायला अधिक आवडतं. शिवाय भारताच्या कोणत्याही भागातला सर्वसामान्य माणूस हा खूप बोलका असतो. तो अगदी सहजपणे आपल्याशी बोलायला सुरूवात करतो. त्यामुळं संवादाला कधीच अडचण येत नाही.

हैदराबाद असो, गुवाहाटी असो, तमिळनाडू असो, गुजरात असो किंवा ‘मी महाराष्ट्र बोलतोय’च्या वेळी संपूर्ण महाराष्ट्र असो… कुठंही गेलो की अधिकाधिक लोकांशी बोलणं ही माझी सवय बनून गेली आहे. इंडियन मिडीया सेंटरच्या निमित्तानं भोपाळला गेलो तेव्हा देखील अनेक जणांच्या भेटी झाल्या. हिमाचलपासून ते आंध्र प्रदेशापर्यंत आणि भोपाळपासून ते पश्चिम बंगालपर्यंत अनेक राज्यांमधील मंडळी भेटली. खुद्द भोपाळमधील काही जणांचीही भेट झाली. अनिल सौमित्र त्यापैकीच एक...

हजरजबाबी, हरहुन्नरी आणि हुश्शार…
भोपाळ ट्रीपदरम्यान सर्वाधिक लक्षात राहिलेली व्यक्ती, ही अनिल सौमित्र यांची माझ्यासाठीची खरी ओळख. मध्य प्रदेश भाजपचे मुखपत्र असलेल्या ‘चरैवेति’ या मासिकाचा संपादक. कधी काळी संघ परिवारातील ‘विश्व संवाद’ या संघ परिवारातील संस्थेचा पूर्णवेळ प्रचारक राहिलेला कार्यकर्ता. चेहरा, पेहराव आणि सौमित्र या नावामुळे प्रथम बंगालीच वाटला. पण मी बंगाली नाही, बिहारी आहे, असे त्याने नम्रपणे सांगितलं. अनिल मूळचा बिहारच्या मुझफ्फरपूरचा. पुण्यातून निघण्यापासून ते झेलम एक्स्प्रेसचे रिझर्व्हेशन होईपर्यंत प्रत्येक वेळी अनिल सौमित्र या व्यक्तीच्याच संपर्कात होतो. त्यामुळे सुरूवातीपासूनच या नावाबद्दल खूप उत्सुकता होती.


भोपाळला गेल्यानंतर जेव्हा विज्ञान भवनमध्ये पोहोचलो, तेव्हा तिथं त्याचं सर्वप्रथम दर्शन झालं. नरेंद्र मोदी घालतात तसा हाफ स्लिव्हचा कुर्ता, वर खादीचं जॅकेट, जीन पँट आणि हातात डायरी, कागदपत्र, पुस्तकं आणि बरंच काही. स्वभावाने विनोदी, एकदम हजरजबाबी आणि अगदी सहज बोलता बोलता समोरच्या व्यक्तीला जिंकून घेणारा. स्पंदन नावाची माध्यमांशी संबंधित संस्था चालविणारा आणि ‘चरैवेति’चा संपादक असलेला हा पत्रकार. जवळपास अठरा एक वर्षांपासून माध्यमांमध्ये असलेला आणि रमलेला. कधीकाळी पांचजन्यचा भोपाळ प्रतिनिधी म्हणूनही त्यानं काम केलंय. शिवाय विश्व संवाद केंद्रामध्ये पाच वर्ष पूर्ण वेळ काम करून त्यानं प्रचारकाची भूमिकाही पार पाडलीय.

भोपाळमधील सेमिनारचं एकहाती मॅनेजमेंट सौमित्र यानेच केलं होतं, हे एव्हाना आमच्या लक्षात आलं होतं. म्हणजे सेमिनारचं ठिकाण निवडण्यापासून, मंडळींच्या राहण्याची व्यवस्था, उत्तम आचारी शोधणे, वाहतुकीची व्यवस्था करण्यापर्यंत सबकुछ सौमित्र, असाच प्रत्यय ठायीठायी येत होता. एरव्ही रुबाबात नेता म्हणून वावरणारा अनिल अनेक प्रसंगी कार्यकर्त्याची भूमिका अगदी समर्थपणे वठवित होता. म्हणजे ‘वीर मारूती’चे क्वचित प्रसंगी ‘दास मारूती’ हे रुपही समोर येते... अगदी तस्सेच.

हिंदी एकदम मधुर. बोलतानाही आणि लिहितानाही. ‘पूर्वाग्रह’ हे प्रकाशित झालेल्या लेखांचे पुस्तक त्यानं मला दिलं. ते वाचतानाही तो बोलतो तशीच हिंदी वाचायला मिळते. जागरण, आज, प्रभात खबर, दिव्य भास्कर, हिंदुस्थान, जनसत्ता अशा अनेक वर्तमानपत्रांमध्ये आणि स्वदेशीपासून ते छत्तीसगडच्या आदिवासी संस्कृतीपर्यंत अनेक विषयांना त्यानं हात घातलाय. बोलतानाचा ओघ लेखनातही कायम दिसतो. विचारांना वाहिलेला आणि त्यावर निष्ठा असलेला. बरं, विचारांवर निष्ठा असून तारतम्याने विचार करणारा आणि ‘आपल्या’ लोकांमधील दोषांवर अगदी यथायोग्य पद्धतीने बोट ठेवणारा... म्हणजे वाहवत जाणारा वाटत नाही. 

  (श्री. विद्याधर चिंदरकर हे अमिताभ बच्चन यांची मुलाखत घेताना...)

अनिलला पाहून मला ‘सामना’तील विद्याधर चिंदरकर यांची आठवण आली. दिसण्यामध्येही बरेच साम्य. वयही सारखेच. दोघेही हजरजबाबी, हुश्शार आणि हरहुन्नरी. राज्याच्या राजधानीत राजकीय पक्षाच्या मुखपत्रात वरिष्ठ पदांवर काम करणारे. बातमीवर योग्य ते संस्कार करून ती अधिक आकर्षक करण्यापासून ते  गरीब गरजूंना उपचारांसाठी आर्थिक मदत मिळवून देण्यापर्यंत अनेक गोष्टींमध्ये हातखंडा असलेले. सर्वदूर आणि सर्वक्षेत्रात उत्तम नेटवर्किंग असलेले. अशा अनेक गोष्टी दोघांमध्ये सारख्याच वाटल्या. 

सेमिनार संपल्यानंतर ‘चरैवेति’च्या ऑफिसमध्ये बराच वेळ त्यांच्यासमवेत घालविला. जर्नालिझम युनिव्हर्सिटीमध्ये दुपारी त्यांची भेट झाली. ‘यहा कुछ मजा नही है… आप हमारे साथ ‘चरैवेति’ चलो. हमारा काम देखो,’ असं म्हटल्यानंतर मग मीही जास्त आढेवेढे न घेता त्यांच्याबरोबर गेलो. मग तिथं चार-पाच तास कसे गेले कळलंच नाही. ‘चरैवेति’चे काही जुने अंक, ‘स्पंदन’ने काढलेले विशेषांक, अनिलच्या लेखांचे संकलन असलेले ‘पूर्वाग्रह’ हे पुस्तक असं बरंच काही तिथं मिळालं. छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या राजकारणापासून ते ‘दोपहर का सामना’चे प्रेम शुक्ला यांच्यापर्यंत अनेक गोष्टींवर मस्त गप्पा रंगल्या. संध्याकाळी ‘काय पो छे’चा सहाचा शो पहायला ते निघाले आणि मग त्यांना अलविदा केला.

पत्रकार असूनही विनम्र
‘साम मराठी’मध्ये असताना अनेक चांगल्या पत्रकारांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्यापैकी एक म्हणजे शरद व्दिवेदी. एखाद्या चित्रपटातील हिरोला शोभेल, अशी चेहरेपट्टी. मृदूभाषी आणि  स्वभावाने गोड. ‘साम’साठी ते मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या बातम्या पाठवायचे. फक्त राजकीय, सामाजिक आणि क्राइम नव्हे, तर मराठी मंडळींचे उपक्रम, सण-समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांच्याही बातम्यांचा त्यात अंतर्भाव असायचा. त्यामुळे त्यांच्याशी मस्त गट्टी जमली होती. कधीही फोन आल्यानंतर ‘आशिषजी, आप फ्री तो है ना… बात कर सकते है...’ याच वाक्याने त्यांच्या बोलण्याची सुरूवात होते. तेव्हाही आणि आताही. मी त्यांच्यापेक्षा वयाने आणि अनुभवानेही लहान आहे. हे त्यांना सांगतिल्यानंतरही अजूनही ते आशिषजी म्हणूनच हाक मारतात. अत्यंत शांत, सभ्य, आणि विनम्र. माध्यमांमध्ये असूनही अशी तीन विशेषणे लावता येतील, अशी व्यक्ती. संतोष कुलकर्णी हा त्याच पंथातील. दुसऱ्याला मान देण्याची ही प्रथा भोपाळमध्ये खूप पहायला मिळते.

‘साम’ने कॉस्ट कटिंग सुरू केल्यानंतर त्यांचे आणि आमचे सहचर्य संपले. पण दोस्ती अजूनही कायम आहे. यू्एनआय आणि डीडी स्पोर्ट्सवर ‘क्विझ शो’चे अँकरिंग असं बरंच काही केल्यानंतर शरदजी सध्या भोपाळमध्येच स्थिरावले आहेत. ‘बन्सल न्यूज’ या मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये दिसणाऱ्या चॅनेलचे हेड म्हणून कार्यरत आहेत. सुरूवातीला अनेक जणांनी आम्हाला किरकोळीत काढलं. पण आम्ही महत्प्रयत्नांनंतर हे चॅनेल आपण ‘टीआरपी’मध्ये दोन नंबरला आणलंय, असं आवर्जून सांगतात. रविवारी संध्याकाळी त्यांची भेट झाली. मग त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो. तिथं त्यांचे काही रेकॉर्डेड कार्यक्रम आणि इतर टेक्निकल गोष्टींची माहिती घेतली. कसं चाललंय वगैरे माहितीची देवाण घेवाण झाली. 

भोपाळमधले लोक शक्यतो बाहेर जायला पसंती देत नाही. एकदम सुशेगात शहर आहे. फार महागाई नाही. शिवाय राजधानी असली तरी निवांतपणा हरविलेला नाही. त्यामुळे अनेकदा चार पैसे कमी मिळाले तरी लोक भोपाळ सोडत नाहीत… शरदजी सांगत होते. हलका आहार म्हणून आम्ही रात्री कढी-चावलला पसंती दिली आणि मग भोपाळच्या सफरीवर निघालो. शरदजींच्या नव्या कोऱ्या वॅगन आरमधून. मध्य प्रदेश विधानसभा, मंत्रालय, सचिवालय, भारत भवन, बडा तालाब, उमा भारती आणि दिग्विजय सिंह यांचे बंगले वगैरेचं दर्शन आणि सोबत शरदजींची लाईव्ह कॉमेंट्री… व्वा. भोपाळ शहराबद्दल बरीच माहिती मला त्यांच्याकडूनच समजली.

शरदजी हे उत्तम नकलाकार आहेत, हे देखील लक्षात आले. मध्य प्रदेश म्हटल्यावर गोविंदाचार्य यांचा विषय निघालाच. त्यांचे आणि उमा भारती यांचे संबंध, भाजपशी त्यांचे असलेले संबंध, संघ परिवाराशी असलेले नाते वगैरे गोष्टींवर चर्चा झाली. तेव्हा गोविंदाचार्य जसे शुद्ध, सात्विक आणि गोड हिंदी बोलतात अगदी तशाच स्टाईलमध्ये शरदजींनी नक्कल केली. हुबेहुब नक्कल ऐकल्यानंतर मला तर धक्काच बसला. म्हटलं, तुम्ही नक्कल खूप चांगली करता. तेव्हा त्यांचे उत्तर असे, कभी कभी कर लेता हूँ… जेवणानंतर थोडावेळ भोपाळ भ्रमण झालं आणि मग त्यांनी मला सेमिनारच्या ठिकाणी परत सोडलं. त्यानंतर मग पुन्हा एकदा फोनवरून संपर्क सुरू झाला.

मध्य प्रदेशातील ‘आम आदमी’
अनिल सौमित्र यांच्या सौजन्याने मध्य प्रदेश भाजपच्या प्रदेश मुख्यालयात रात्री जेवणाची व्यवस्था झाली. म्हणजे इतरत्र कुठेही चार घास पोटात ढकलता आले असते. ‘यहा का खाना आपको पसंद आएगा…’ असं म्हणून त्यांनी तिथं माझी व्यवस्था करूनही टाकली. मग रात्री आठच्या सुमारास तिथं गेलो. मप्र भाजपने कार्यकर्त्यांसाठी ही उत्तम सोय केली आहे. राज्यभरातून अनेक कार्यकर्ते काही ना काही कामासाठी भोपाळला येत असतात. प्रत्येकालाच बाहेरचे महागडे जेवण परवडतेच असे नाही. हे लक्षात घेऊन पक्षाने कार्यकर्त्यांसाठी वीस रुपयांमध्ये भरपेट जेवणाची व्यवस्था केली आहे. मुख्य कार्यालयात जाऊन कार्यकर्त्याने कुपन खरेदी करायचे आणि भोजनगृहामध्ये द्यायचे. ओळखीशिवाय किंवा काही कामासाठी आल्याशिवाय हे कुपन मिळत नाही, हे ओघाने आलेच.

सौमित्र सौजन्यामुळे तिथं माझ्या जेवणाचा योग जुळून आला. फुलके, फ्लॉवर-बटाटा मिक्स भाजी, दाल-चावल, पापड, लोणचे आणि मिरच्या. मनसोक्त जेवण अगदी घरच्यासारखे. भाजपचे अनेक कार्यकर्ते आणि स्वतःला नेते समजणारे बरेच जण तिथं जेवायला आले होते. मध्य प्रदेशात सत्तेवर असूनही भाजपचे लोक प्रदेशाच्या भोजनगृहात जेवतात, हे पाहूनच मला धक्का बसला. महाराष्ट्रासह इतर प्रांतातही भाजपने ही सुविधा सुरू करावी, अशी मागणी मला आवर्जून करावीशी वाटते. अर्थात, राजकीय पक्षांच्या नेत्या-कार्यकर्त्यांची परिस्थिती वीस रुपयांमध्ये उत्तम जेवण घेण्याइतकी वाईट नाही. त्यामुळे असा उपक्रम सुरू होईल, याची सुतराम शक्यता नाही. असो.


तिथं मला इंद्रेशसिंह विश्वकर्मा हे शेतकरी भेटले. वय साधारण ५५ ते ६० असावे. कदाचित त्यापेक्षा थोडे अधिक असेलही. गुणा जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातील. गहू हे मध्य प्रदेशातील मुख्य पिक. विश्वकर्मा यांचे शेतही गव्हानेच डवरलेले आहे. ते तिथं मुख्यमंत्र्यांना भेटायला आले होते. म्हणजे मंगळवारी सकाळी ते दरबारात मुख्यमंत्र्यांना भेटणार होते. प्रत्येक आठवड्याच्या सोमवार, मंगळवार, बुधवार मुख्यमंत्री हे हमखास भाजपच्या प्रदेश कार्यालयात आम जनतेला भेटतात, हा ठाम विश्वास लोकांमध्ये आहे. त्यामुळेच ते ३००-३५० किलोमीटरवरून सीएमना भेटायला आले होते. (महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबद्दल काही न बोललेलेच बरे.) त्यामुळेच त्यांचे रात्रीचे जेवण तिथे होते.

भारतातील खेड्यातला सर्वसामान्य शेतकरी दिसतो तसेच इंद्रेशसिंह. उन्हात काम करून रापलेली काया, सुरकुत्या पडलेला चेहरा आणि पांढरे केस. त्यांच्या जावयासोबत ते तिथं आले होते. त्यांचा पुतण्या वीज पडल्यामुळे गंभीर जखमी झाला होता. डॉक्टरांनी उपचारासाठी एक-दीड लाख रुपये सांगितले होते. सरकारकडून काही मदत मिळते का, पहायला ते आले होते. (दुसऱ्या दिवशी त्यांची आणि सीएमची भेट झाली. सरकारने २५ ते ३० हजार रुपये देण्याची तयारी दर्शविली आहे, हे त्यांनी मला आवर्जून फोन करून सांगितले.)

आम्ही तिघांनीही एकत्रच जेवण घेतले. आम्ही आमचे ताट भरून घेतले. पण मी पाण्याचा ग्लास घ्यायला विसरलो. ते मात्र, न विसरता माझ्यासाठी पाण्याचा ग्लास घेऊन आले. तेव्हा मलाच लाजल्यासारखं झालं. तिघंही मस्त रेमटून जेवलो. ‘आप अगर बाहर खाना खाते, तो आपका ज्यादा पैसा जाता. ७०-८० रुपये तो जरूर लगते…’ प्रदेश भाजपने सुरू केलेला हा उपक्रम किती उपयुक्त आहे, याचा प्रत्यय लगेचच आला. जेवण झाल्यानंतर थोड्या गप्पा मारल्या आणि मग माझी निघायची वेळ झाली. जाता जाता आठवण म्हणून त्यांचा एक फोटो काढला. निघताना म्हणाले, ‘आशिषजी, अगली बार गुना जरूर आईएगा…’ मी म्हटलं, ‘जरूर आऊंगा. पर आप मुझे आशिषजी मत कहिए. आशिष ही ठीक है.’ त्यावर त्यांचं उत्तर खूप विचार करायला लावणारं होतं. ते म्हणाले, ‘आशिषजी, दुसरे को बडा कहनेसे कोई आदमी छोटा नही होता. हम उमर में आप से बडे है. मग आप हमसे ज्यादा पढे लिखे है. इसलिए आपका सम्मान करना उचितही है…’

व्वा… काय वाक्य बोलला तो माणूस. शेकडो पुस्तकं आणि हजारो ग्रंथांमध्ये सापडणार नाही, असं एकदम साधं वाक्य तो ‘आम आदमी’ बोलून गेला. ‘दुसरे को बडा कहनेसे कोई आदमी छोटा नही होता.’ इंद्रेशसिंह विश्वकर्मा यांनी माझी भोपाळ ट्रीप वस्स्सूल करून टाकली.

3 comments:

Anonymous said...

Vaah Ashish-jee vaachtaanaa mazaa aalaa ...

Ravi Godbole

Anonymous said...

Good one! सौमित्र बद्दल अजून थोडे वाचायला आवडले असते.. ! पण छान आहे लेख...

Chandrashekhar Kulkarni

Anonymous said...

Sundar...zabardast...

Sudeep Dange