Sunday, January 04, 2015

पैशांची भाषा...

कोणत्याही भाषेपेक्षा प्रभावी भाषा...


दक्षिण भारतातील लोकांमध्ये भाषेविषयीचा स्वाभिमान अगदी ठासून भरलाय. म्हणजे प्रत्येक राज्याला आपल्या भाषेबद्दल जाज्वल्य अभिमान आहे. अतिजाज्वल्य अभिमान आहे. प्रत्येक नागरिक आपल्याच मातृभाषेमधून अधिकाधिक बोलण्याचा प्रयत्न करीत असतो. इंग्रजी आणि हिंदीला अजिबात धूप घालत नाही. एकवेळ इंग्रजी चालेल, पण हिंदी अजिबात नको, अशीच त्यांची मनोभूमिका असते. जेव्हा केव्हा  आपण दक्षिण भारतात जातो, तेव्हा तेव्हा अनेकदा आपल्याला याचा अनुभव कधी ना कधी आलेला असतो.

दक्षिण भारतातील भाषाभिमानाचा असाच काहीसा अनुभव मलाही आहे. थोडासा वाईट पण बराचसा चांगला. म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या कव्हरेजसाठी तमिळनाडूमध्ये गेलो होतो. तेव्हा तंजावूरला जाणं झालं होतं. तिथं एका इडली हाऊसमध्ये बसलो असताना समोर एक व्यक्ती येऊन बसली. पांढरी लुंगी, पिवळसर शर्ट आणि कपाळावर भस्म ओढलेली. अस्सल तमिळ. मला थोडी माहिती हवी होती, की एका ठिकाणचा पत्ता वगैरे हवा होता. त्याला मी आधी हिंदीत विचारलं. तो काहीच बोलला नाही. नंतर मग इंग्रजीतून विचारलं. त्यावेळीही तो काही बोलला नाही नि चक्क त्याचं केळीचं पान घेऊन दुसऱ्या टेबलवर जाऊन बसला. ही एकमेव अपवादात्मक घटना सोडली, तर दक्षिण भारतात कोणताही वाईट अनुभव मला नाही. लोक त्यांच्या परीनं हिंदीतून, इंग्रजीतून अथवा हातवारे करून खाणाखुणा करून आपल्याला मदत करण्याचा प्रयत्न करतात, असाच माझा अनुभव आहे. मध्यंतरी पुदुच्चेरीला (पाँडिचेरी) गेलो होतो. त्यावेळीही नेहमीपेक्षा थोडा वेगळा अनुभव आला. 

पहिला अनुभव एका रिक्षावाल्याचा. त्याचं नाव इब्राहिम. नुसतं इब्राहिम आडनाव वगैरे काही नाही. पहिला दिवशी भेटला, तो पुढचे दोन दिवस आमच्याबरोबरच राहिला. सातवी की आठवीच शिकलेला. आधी ट्रक ड्रायव्हर होता. त्यामुळं पश्चिम आशियातील एक-दोन देश आणि केरळ, मुंबई, हैदराबादसह बऱ्याच शहरांमध्ये फिरलेला. अर्थात, हिंदीचा पत्ता नव्हताच. पण इंग्रजी मात्र, तोडकं मोडकं येत होतं. त्यानं स्वतःहूनच आमच्याशी तोडक्या मोडक्या इंग्रजीतून संवाद साधला. कुठं जाणार? काय पाहणार? कसे जाणार? पुढचे दोन-तीन दिवस तुम्हाला रिक्षा लागेल का? इ.इ. आमचा सौदा पक्का झाला आणि मग काय पुढचे दोन दिवस तोच आमचा ड्रायव्हर कम गाइड बनला.


नाश्त्याला, जेवणाला कुठं काय चांगलं मिळतं? फिश कुठे चांगले मिळतात? आणखी काही पहायचं राहिलं आहे का? वगैरे गोष्टींचं मार्गदर्शन तो त्याच्या तोडक्या मोडक्या इंग्रजीतून करीत होता. वेट सर, नो प्रॉब्लेम, ‘यू गो आय स्टे’ यासह अनेक छोट्या छोट्या इंग्रजी शब्दांची जुळवणी त्यानं करून ठेवली होती. ऑटोचं भाडं किती झालं, ते पॅसेंजरला इंग्रजीमधून सांगण्याची कलाही त्यानं आत्मसात केली होती. म्हणजे सेव्हन्टी, एटी किंवा वन हर्ड्रेंड वगैरे आकडे त्याला तोंडपाठ होते. इंग्रजीतून संवाद साधल्यानंतरच त्याला कदाचित अधिक ग्राहक किंवा पॅसेंजर मिळत असावेत. 

दुसरा अनुभव चेन्नईतल्या तिरुवनमियूर एसटी स्टॅंडजवळच्या टी स्टॉलवरचा. इथली चहा करण्याची पद्धत मोठी गमतीशीर. कुठं पाणी तापविण्याच्या बंबामधून चहा दिला जातो. तर काही ठिकाणी चहा पावडर टाकलेली कापडी गाळणी एका भांड्यातल्या उकळत्या पाण्यात बुडवून ठेवलेली असते. त्यातला चहा आणि गरम दूध एकत्र करून चहा दिला जातो. दोन्ही चहाची चव एकदम मस्त. स्ट्राँग आणि तलफ भागविणारा. तर असा मस्त फक्कड चहा घेतल्यानंतर आम्हाला त्यानं पैसे सांगितले. आठ रुपयांना चहा मिळतो, हे आम्हाला माहिती होतं. म्हणजे सोळा रुपये झाले असणार, हे उघड होतं. तरीही आम्ही किती झाले, हे त्याला विचारत होतो. म्हणजे इंग्रजीतून किंवा हिंदीतून सांगतो का, पाहण्यासाठी. गल्ल्यावर बसलेल्या माणसाला हिंदी आणि इंग्रजीचा गंधही नव्हता. त्यामुळं तो तमिळमधूनच आकडा सांगत होता. मात्र, त्याच्या दुकानात वेटरचं काम करणाऱ्या एका तमिळच मुलानं ‘सोला रुपये बोल रहा है वो…’ असं दाक्षिणात्य टोनमध्ये सांगून आम्हाला मोकळं केलं.

तिसरा अनुभव यापेक्षाही भन्नाट. नटराजाचं मंदिर असलेल्या चिदंबरममध्ये गेलो होतो. खूप मोठ्या परिसरात अतिशय भव्य मंदिर. इतर देवदेवतांची छोटी-मोठी मंदिर. बारीक नक्षीकाम केलेले खांब आणि प्राचीन स्थापत्य शैलीचं दर्शन घडविणारं नटराज मंदिर. दुपारी एक ते चार मंदिर बंद असतं. तशी दक्षिणेतली बरीचशी मंदिरं दुपारी बंदच असतात. किमान तमिळनाडू आणि केरळमधली तरी. (लोक उगाच चितळेंना नावं ठेवतात.) तर नटराजाचं दर्शन घेण्यासाठी चिदंबरमला गेलो, तेव्हा एसटी स्टँडवर चहा घेतला. अर्थातच तिथेही चहाचे सोळा रुपयेच झाले. चहावाल्याला फक्त तमिळच येत होतं. ना इंग्रजी आणि हिंदीचा गंधही नाही. आम्हाला त्याच्याकडून आकडा माहिती करून घ्यायचा होता. पण त्याला सांगता येत नव्हता. अखेर त्यानं त्याच्या हातावर बोटानंच इंग्रजी सोळा आकडा काढून दाखविला आणि आम्ही त्याला पैसे देऊन निघालो.  

पुदुच्चेरी सरकारनं राज्यात २५ ते ३० ठिकाणी मिल्क पार्लर्स उघडली आहेत. (आणि मुख्य म्हणजे सुरू आहेत आणि प्रतिसादही उत्तम आहे.) फ्लेवर्ड मिल्क, गरम दूध, कॉफी, दही, ताक, लस्सी, मलई पेढा, आइस्क्रिम आणि बरेचसे दुग्धजन्य पदार्थ या ठिकाणी असतात. तिथं काम करणारा कृष्णमूर्तीही चांगल्या पद्धतीनं इंग्रजीतून संवाद साधणारा. मध्येच एखाद दुसरा हिंदी शब्दही हिंदीतून बोलणारा. दूध कुठनं येतं, सरकार दोन महिन्यांनी एका महिन्याचा पगार देतं, कोणत्या प्रॉडक्टला किती रिस्पॉन्स आहे, वगैरे अगदी उत्तम रितीनं सांगत होता. 

चेन्नई किंवा पुदुच्चेरीतील बसमध्येही तिकिटाचे किती रुपये द्यायचे हे कंडक्टर मंडळी गरज पडल्यास इंग्रजीमध्ये जरूर सांगायचे. पुढची बस कुठं मिळेल, स्टॉप कधी येईल किंवा स्टॉप आल्यानंतर उतरा वगैरे या गोष्टी ते इंग्रजीतून किंवा खुणेनं सांगायचे. चहा आणि मिरची नि केळ्याची भज्जी विकणारे ठेलेवाले, दुकानदार, इडली-वडे मिळणारे फूड जॉइंट्स आणि अनेक व्यावसायिक तुमच्याशी तुम्हाला समजेल अशा पद्धतीनं इंग्रजी आणि क्वचित प्रसंगी हिंदीतून संवाद साधू शकतात. गंमत सांगतो. मागे निवडणुकीच्या निमित्ताने गेलो असताना, एका रिक्षावाल्यानं ए. राजा आणि करुणानिधी हे कसे भ्रष्टाचारी आहेत, हे सांगताना हिंदीतून कचकचीत शिवी हासडून त्यांचा उद्धार केला होता. 

हे सोडा. ही झाली अगदी साध्या साध्या लोकांची आणि हातावर पोट असलेल्या लोकांची उदाहरणं. ‘नल्ली’ किंवा ‘पोथीज’ या हायफाय वस्त्रदालनांमध्ये गेल्यानंतर तिथले सेल्समन आणि सेल्सवूमन तमिळनाडूबाहेरील ग्राहकांशी हिंदीतूनही संवाद साधतात. म्हणजे तुम्ही जर एखादा प्रश्न हिंदीतून विचारला, तर ते त्यांच्या तोडक्या मोडक्या हिंदीतून का होईना पण तुमच्या प्रश्नाला योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करतात. 

मागं केरळमध्ये गेलो होतो, तेव्हाही डी बुक करताना रहीम नावाचा बहुभाषिक ड्रायव्हर आम्हाला मिळाला होता. तिथल्या प्रत्येक टूरिस्ट कंपनीमध्ये किमान तीन ते चार ड्रायव्हर्स हे इंग्रजीप्रमाणेच थोडंबहुत हिंदी बोलू शकणारे असतात. म्हणजे जर तुम्हाला इंग्रजीची अडचण असेल आणि त्याला फक्त मल्याळमच येत असेल, तर गडबड होऊ शकते. हा गोंधळ टाळण्यासाठी अनेक टूरिस्ट एजन्सीज जुजबी हिंदी येणारे ड्रायव्हर्सही आवर्जून नेमतात आणि तुम्हाला हवा असल्यास तसा पर्यायही उपलब्ध असतो. 

सर्व अनुभवांचा निष्कर्ष आपण काय काढू शकतो? दक्षिणेत विशेषतः केरळ किंवा तमिळनाडूमध्ये त्यांच्या मातृभाषेबद्दलचं प्रेम कमी होऊ लागलंय का? किंवा इंग्रजी-हिंदीमध्ये बोलण्याचं प्रमाण वाढलं आहे का? तर अजिबात नाही. असं अजिबात नाही. त्या लोकांचं मातृभाषेवरचं प्रेम तितकंच असून अभिमानही तितकाच जाज्वल्य आहे. निष्कर्ष इतकाच, की कोणत्याही भाषेपेक्षा पैशाची भाषा अधिक प्रभावी असते. पैसा मिळणार असेल, तर लोक चार नव्या् गोष्टी किंवा एखादी भाषा जुजबी प्रमाणात का होईना, पण जरूर आत्मसात करतात. चेन्नई आणि पुदुच्चेरीत फिरल्यानंतर अधिक व्यापक प्रमाणात आम्हाला त्याची अनुभूती आली. 

(पूर्वप्रसिद्धी, महाराष्ट्र टाइम्स ‘संवाद’ पुरवणी ४ जानेवारी २०१५.)

2 comments:

Unknown said...

IT sector chennai la aalyapasun thoda badal aata hovu lagla aahe tamilnadu madhe. pahilyasarkhe nahi aata. mazya officemadhe kahi tamili lok aahet, mi tyana clear mhanto, tumche nete lok tyanchi khurchi safe thevnyasathi bhasha abhiamanacha issue banvun bhadkavatat. te barobar nahi. tumhala tumchi matrubhashecha abhiman asne ani hindi bolne donho vegveglya babi aahet.

Unknown said...

IT sector chennai la aalyapasun thoda badal aata hovu lagla aahe tamilnadu madhe. pahilyasarkhe nahi aata. mazya officemadhe kahi tamili lok aahet, mi tyana clear mhanto, tumche nete lok tyanchi khurchi safe thevnyasathi bhasha abhiamanacha issue banvun bhadkavatat. te barobar nahi. tumhala tumchi matrubhashecha abhiman asne ani hindi bolne donho vegveglya babi aahet.