Showing posts with label Dadar. Show all posts
Showing posts with label Dadar. Show all posts

Sunday, December 19, 2010

नशीब सामनात कॉस्ट कटिंग नव्हतं...

कॉस्ट कटिंग हा शब्द अनेक संस्थांमध्ये (फक्त वृत्तपत्र नव्हे...) सगळ्यांत जास्त लोकप्रिय शब्द आहे. जागतिक मंदीच्या काळात तर या शब्दाला खूप महत्व प्राप्त झालं होतं. अनेकांचे अनेक अनुभव असतात. तसेच माझेही काही अनुभव आहेत. त्यामुळेच मला म्हणावसं वाटतं की, नशीब सामनामध्ये कॉस्ट कटिंग नव्हतं.

१) कॉस्ट कटिंगच्या नावाखाली (किंवा परफॉर्मन्स नाही, असे कारण देऊन) सामनातून एकाही व्यक्तीला काढून टाकण्यात आलेले नाही. हा मुद्दा मला सर्वाधिक लक्षवेधी वाटतो. अर्थातच, हे संजय राऊत साहेबांचे वैशिष्ट्य म्हटले पाहिजे. काही वर्षांपूर्वी यांत्रिक पद्धतीने कामाची सुरवात झाल्यानंतरही कामगारांना काढून न टाकता, त्यांना नवे काम शिकण्याची संधी देण्यात आली. ती मंडळी अजूनही सामनामध्ये आहेत आणि यथायोग्य पद्धतीने काम करीत आहेत. जागतिक आर्थिक मंदी असतानाही सामनात माणुसकीचे कॉस्ट कटिंग कधीच झाले नाही.

२) जागतिक मंदी आली म्हणून कॉस्ट कटिंगच्या नावाखाली ऑफिसातले एसी बंद करण्यात आले नाहीत. एसीच्या ऐवजी मंगल कार्यालयात लावतात तसे घों घों करणारे मोठ्ठाले पंखे ऑफिसात लावण्यात आले नाहीत. शिवाय बंद ऑफिसमध्ये एसीची काहीच गरज नाही, हे सांगण्यासाठी लेक्चर्सही देण्यात आली नाहीत. कर्मचा-यांच्या सोयीसुविधांचे कॉस्ट कटिंग तर अजिबात नाही.

३) कॉस्ट कटिंगच्या नावाखाली ऑफिसातील निम्मे ट्यूब लाईट आणि निम्मे दिवे काढून टाकण्याचे (न लावण्याचे नव्हे) फर्मान साहेबांनी काढले नाही. विजेची बचत म्हणून दिवे न लावणे समजण्यासारखे आहे. पण बचत म्हणून दहापैकी फक्त चारच दिवे लावायचे आणि उरलेले सहा दिवे काढून टाकायचे, असले दळभद्री प्रकार सामनात अनुभवयास मिळाले नाहीत.

४) सामनात दररोज तीन-चार वेळा महाराज चहा घेऊन येतो. (राजेश शहा, विद्याधर चिंदरकरसाहेब आणि अनेक जण त्याला जहर म्हणून हिणवतात.) या चहाचे बिल कंपनी अदा करते. पण जागतिक मंदीचे कारण पुढे करत सामनाने चहा बंद केला नाही. दोन रुपयाचा चहा दिला म्हणून कोणी मोठा होत नाही आणि तेथे काम करणा-यांनाही दोन रुपयाच्या चहाने स्वर्गसुख मिळत नाही. पण द्यायची दानत लागते, हेच महत्वाचे. थोडक्यात काय तर प्रभादेवीत द्यायच्या वृत्तीचेही कॉस्ट कटिंग झाले नाही.

५) एखादी घटना एन्जॉय करण्याचा आनंद वेगळाच असतो. पण अशा एन्जॉयमेंटलाही कॉस्ट कटिंगचे कारण देऊन फाटा दिला जातो. मग एखाद्या गोष्टीच्या लॉन्चिंगची पार्टीही सामोसा आणि वेफर्सवर भागविली जाते. एखाद्या हॉटेलात जेवण देणंही कंपनीला परवडत नाही आणि कारण दिलं जातं, आपण असं करत नाही. पण सामनात असली फालतुचं कॉस्ट कटिंग नव्हतं. राऊत साहेबांना खासदारकीचं तिकिट मिळणं असो किंवा उद्धव साहेबांची मिटिंग असो, सगळं कसं एकदम जोरात. आनंद आणि मौजमजेचे कॉस्ट कटिंग मला प्रभादेवीत कधीच आढळले नाही. इतकंच काय तर क्वचित प्रसंगी रात्री मुक्काम करण्याची वेळ आली तर घरी जाण्यासाठी किंवा जेवणासाठी लागणारे पैसे देतानाही, कंपनीचा कधीच हात आखडता झाला नाही. शिवाय मांसाहारी जेवणाचं बिल मिळणार नाही, अशी भंपक कारणंही अकांऊट्स डिपार्टमेंट पुढं करायची नाहीत.

६) कंपनीत घेताना एक पगार सांगायचा, पत्र देताना वेगळीच फिगर दाखवायची आणि प्रत्यक्ष हातात येणारा पगार भलताच, अशी फसवाफसवी करुन बचत करण्याची वृत्ती मला सामनात अनुभवायला मिळाली नाही. राऊत साहेबांनी शब्द दिला म्हणजे दिला. त्याच्या अलिकडे नाही आणि पलिकडेही नाही. इथे वचननामा पाळला जातो, असंच म्हटलं पाहिजे. कामगारांच्या पगारातून कॉस्ट कटिंग करुन जागतिक मंदीला पळवून लावण्याचा बनाव करण्याचं धोरण सामनात नाही. त्यामुळंच इथं येणारा माणूस पगार मिळाल्यानंतरही खूष होऊन काम करतो. हातात पगार पडल्यानंतर डोळे फिरण्याची वेळ कामगारांवर येत नाही. समाधानाच्या बाबतीत तर कॉस्ट कटिंगमधला क पण इथं सापडत नाही.

७) सामना म्हणजे हास्यविनोदांची पंढरी. स्वतः राऊत साहेब विनोद करुन स्वतः हास्यकल्लोळात बुडून जायचे. समोरच्याची विकेट कधी काढायचे कळायचं देखील नाही. उगाचच चेह-यावर गांभीर्याचा मुखवटा चढवून जड मुद्रेनं वावरायचं, हे सामनाच्या स्वभावातच बसत नाही. शिवाय पाच डेसिबलपेक्षा कमी आवाजातच हसायचं वगैरे बंधनही नाही. त्यामुळे विनोदी वृत्ती आणि हसण्याखिदळण्याचं कॉस्ट कटिंग कधीच अनुभवलं नाही.

८) असं असतानाही सामनात मात्र, काही गोष्टींचं कॉस्ट कटिंग नक्कीच होतं. उगाचच आपण जागतिक स्तरावरचे अग्रगण्य आहोत, अशा थाटात वावरायचं आणि पगार तसेच सेवासुविधा गल्लीतल्या पेपरसारख्या पुरवायच्या, अशा कद्रू वृत्तीचं मात्र कॉस्ट कटिंग सामनात नक्कीच होतं. मिटिंगांचं कॉस्ट कटिंग होतं. रिपोर्टांचं कॉस्ट कटिंग होतं. इंटरनेटवरच्या वापरावर असलेल्या बंधनांचं कॉस्ट कटिंग होतं. पत्रकारांच्या कल्पना आणि स्वातंत्र्यावर असलेल्या परंपरेच्या बोज्याचं कॉस्ट कटिंग होतं.

गेल्या अनेक दिवसांपासून सामनातील कॉस्ट कटिंगवर लिहायचं होतं. पण आज वेळ मिळाला आणि ब्लॉग उतरला. आता या विषयाचं थोडंसं कॉस्ट कटिंग करुन पुन्हा एकदा खाद्यजत्रेला सुरुवात करावीशी वाटते आहे. गोव्याची ट्रीप, कोल्हापूरचा दावणगिरी लोणी डोसा, पेशवाई थाटाचं श्रेयस आणि `बाद`शाही इइ अनेक विषयांवर लिहायचं आहे. जसा वेळ मिळत जाईल तसं तसं लिहीत जाईन.

(शेवटी तुम्ही सगळीकडे नोकरीच करणार. कामगार तो कामगार तो कितीही बदलला तरी त्याची झेप वर्तुळाबाहेर जात नाही.आणि वर्तुळाला काही केंद्रबिंदू सापडत नाही, अशा निनावी कॉमेंट्सना मी फार महत्व देत नाही. त्यामुळे अशा लोकांनी नावाने कॉमेंट्स टाकण्याची हिंमत दाखवावी. अन्यथा वेळेचा आणि शब्दांचा अपव्यय टाळणेच इष्ट. धन्यवाद. )

Wednesday, October 27, 2010

खा खा खादाडी भाग २

दादर-परळमदली काही राहिलेली ठिकाणं आणि पूर्वी साम मराठीमध्ये काम करत असताना बेलापूरमध्ये काही ठिकाणी चाखलेली वेगवेगळ्या पदार्थांची तोंडओळख इथं करुन देत आहे. प्रत्येक ठिकाणची प्रत्येक गोष्ट चांगली चविष्ट असतेच असं नाही आणि प्रत्येक पदार्थ आपण खातोच असंही नाही. पण जेजे उत्तम चविष्ट सुंदर तेते देण्याचा हा प्रयत्न...



मराठमोळी मिसळ...

मराठमोळ्या वरळीमध्ये अस्सल मराठमोळी मिसळ खाण्याचा योग साम मराठीचा जुना सहकारी पराग खरात याच्यामुळे आला. बोलता बोलता विषय निघाला तेव्हा तो म्हणाला तुम्ही वैशालीची मिसळ खाल्ली की नाही. एक नंबर मिसळ आणि झणझणीत रस्सा. मग निवांत वेळ काढून वैशालीत पोचलो. नुसती मिसळच नाही तर दही मिसळ, वडा, भजी या मराठी पदार्थांप्रमाणेच विविध गुजराती आयटम्स (खाण्याचे), फरसाण आणि सरते शेवटी फक्कड चहा असं सर्व काही मिळणारं हे मस्त रेस्तराँ म्हणजे वैशाली.

मिसळ खाण्यासाठीच आलो होतो, त्यामुळे आम्ही मिसळच घेतली. फक्त फरसाण आणि त्यावर वाटाण्याची उसळ ही मुंबईतली मिसळची व्याख्या असल्यामुळे इथं फारसं वेगळं दृष्य नव्हतं. तरीही फरसाणच्या जाड-बारीक शेव, नायलॉनच्या पोह्यांचा चिवडा असं वैविध्य होतं. पण रस्सा मात्र, इतरांच्या तुलनेत जरा हटके होता. थोडासा मालवणी स्टाईलचा किंवा नाशिकच्या काळ्या तिखटाच्या मिसळीच्या जवळ जाईल असा. जाळ निघेल असा झणझणीत नसला तरी घाम आला. त्यामुळं येणं फुकट गेलं, असं वाटलं नाही. शिवाय जांबोरी मैदानावरुन जाताना मंचेकर वडापाव आणि त्याच्या डायगोनली ऑपोझिट असलेल्या (साई की तत्सम काहीतरी) वडापावच्या आठवणी ताज्या झाल्या.



म्हैसूर मसाला...

दादरला परळ एसटी डेपोकडून पोर्तुगीज चौकाकडे जायला लागलं की दुस-या चौकात संध्याकाळी डोशाची एक गाडी लागते. सैतान चौकीच्या इथला चौक हे मला माहिती असलेलं नाव. इथं डोसा-उत्तप्पाचे काही प्रकार मिळतात. त्यापैकी म्हैसूर मसाला डोसा अप्रतिम. साध्या डोशावर बटाट्याची भाजी, कापलेला कांदा-टोमॅटो, किसलेले बिट, थोडी खोब-याची चटणी असा स्मॅश केलेला रगडा. एकदम स्वादिष्ट म्हैसूर डोसा तयार. सोबत सांबार आणि चटणी. त्यातही सांबार नसले तरी चालू शकेल, असा पद्धतीचे. पण ती उणिव चटणी भरुन काढते. त्यामुळे दिलखुश्श. इतर ठिकाणी साधा किंवा मसाला डोसा बारा रुपयांना असला तरी इथं मात्र, म्हैसूर मसाला डोसा अवघ्या बारा रुपयांना मिळतो.

शिवाय फुकटचा टाईमपास म्हणजे शिवसेना की मनसे की नारायण राणे यावर चौकातल्या तज्ज्ञांची चर्चा कानावर पडतेच. सातनंतर गेलात तर नक्कीच.



टीटीचा शिववडा...
दादर टीटीच्या (पूर्व) जवळ अशोक नावाचं हॉटेल आहे. तिथून पुढे स्वामीनारायण मंदिराकडे जायला लागलं की, कॉर्नरलाच शिववड्याची एक गाडी दिसेल. थोडी आतल्या बाजूला आहे. आतापर्यंत मी जे काही पाच-सहा ठिकाणचे शिववडा पाव आवर्जून खाल्ले त्यापैकी द बेस्ट शिववडा इथलाच. बाकीच्या ठिकाणांबद्दल न लिहिलेलंच बरं. पण इथला वडा मस्त गरमागरम असतो. पावही मऊ आणि चटणीही झणझणीत. त्यामुळे वडापावची दुसरा घेतल्याशिवाय स्वस्थ बसविणारच नाही.



बेलापूर गावातली मिसळ...

बेलापूर गावात मी जिथं राहतो (किंवा रहायचो) तिथं तळ्याशेजारी (राम मंदिराजवळ) मिळणारी मिसळ नवी मुंबई आणि मुंबईतील मला सर्वाधिक आवडलेली मिसळ आहे. एकदम छोटं झोपडीवजा टपरी. तीन बाकडी. त्यावर जेमतेम सात-आठ लोकं बसतील इतकीच जागा. पण चवीला बाप. रस्सा आणि तर्री पाहूनच पोट भरतं. फक्त फरसाण असलं तरी रस्सा बाकीची जबाबदारी पार पाडतो. कधीकधी गरमागरम रस्सा-वडाही भाव खाऊन जातो. दुपारी शाकाहारी मांसाहारी जेवणही तिथं मिळतं. पण मी काही जेवलेलो नाही. पण मिसळ मात्र, एक नंबर.



स्टेशनजवळची पाणीपुरी...

साम मराठीमध्ये असताना या पाणीपुरीवाल्याची दोस्ती झाली होती. स्टेशनकडून आल्यानंतर बाहेर पडताना उजवीकडे हा पाणीपुरीवाला असतो. संध्याकाळी साधारण सहानंतर. पाणीपुरीचं पाणी म्हणाल तर पित रहावं असं वाटतं. (दुस-या दिवशीचा विचार करुन जास्त पिणं होत नाही, हा भाग अलहिदा) गरमागरम रगडा आणि फक्त तिखट पाणी असं कॉम्बिनेशन खूप मस्त. खजूराचं गोड पाणी नाही घेतलं तरी चालेलसं. साममध्ये असताना आठवड्यातून सहावेळा तरी जाणं व्हायचं. त्या परिसरता किमान पाच ते सहा ठिकाणी पाणीपुरी मिळते. महागड्या हॉटेलांमधूनही मिळते. पण इथली चव त्याला नाही.



स्टेशनवरचा सामोसा...

बेलापूर स्टेशनवर जर तुम्ही बेलापूरहून सुटणारी गाडी पकडली तर ए गरम सामोसे... असं ओरडत एक मनुष्य चढतो. क्वचित कधीतरी हा योग जुळून आला तर त्याच्या कडचे सामोसे नक्की खा. दहा रुपयांत दोन सामोसे मिळतात. चवीला एकदम उत्तम असतात. शिवाय एकदम गरम. चटणी नसली तरी ते कोरडे वाटत नाहीत, हे विशेष. पाहता पाहता सामोसे कधी संपतात ते कळतही नाही.

बसस्टँडचा वडा...
बेलापूर बस डेपोच्या आवारातच एक छोटं दुकान आहे. तिथं स्नॅक्स आणि ज्यूस वगैरे मिळतात. तिथं सक्काळी सक्काळी गरमागरम बटाटे वडा मिळतो. पुण्यात जसा रौनक जवळ वडे, सामोसे, पॅटिससाठी गर्दी असते. तशीच गर्दी सक्काळी सक्काळी इथं वडा खाण्यासाठी असते. मुख्य म्हणजे फक्त वडा (पाव नाही) खाणा-यांचं प्रमाण अधिक. चटणी आणि वडा हे समीकरण इतकं फिट्ट आहे की बस्स. पण वड्यानंतर चहा मात्र, पिऊ नका. नाहीतर सगळी गंमत निघून जाईल.



सरतेशेवटी पान...
बेलापूरला पाम बीच रोडला अश्विथ नावाचं एक मध्यमवर्गीयांना परवडेल, असं चांगलं हॉटेल आहे. त्याच्या बाहेर एक पानाची टपरी आहे. लकलकीत पितळी भांड्यांच्या साक्षीनं तो पानं लावत असतो. त्याच्याकडे मसाला पानापासून ते १२०-३०० पर्यंत कोणतेही पान खा दिलखूष झालंच म्हणून समजा. तुम्ही त्याच्याकडे वारंवार येताय म्हटल्यावर साधा फुलचंद, रिमझिमवाला फुलचंद, डबल किवाम, हरीपत्ती सल्ली सुपारी, कात-चुना-किवाम लवंग जला के... असं काहीही भन्नाट कॉम्बिनेशन असलं तरी ते त्याच्या लक्षात असायचं. आपण गेल्यानंतर आपण काहीही न सांगता आपल्याला हवं असलेलं पान आपल्यासमोर ठेवेल तो खरा पानवाला, या पुलंच्या व्याख्येत हा पानवाला १०० टक्के बसणारा. कधी जर गेलात तर नक्की रसास्वाद घ्या.