Showing posts with label Gulachi Poli. Show all posts
Showing posts with label Gulachi Poli. Show all posts

Friday, February 11, 2011

सकाळी नऊ वाजताच

धुंधुरमासाचं भरपेट जेवण

सकाळी नऊ वाजता तुम्ही कधी जेवला आहात का? मी जेवलोय. गेल्या रविवारीच सक्काळी सक्काळी भरपेट जेवण्याचा आनंद लुटलाय. निमित्त होतं धुंधुर मासाच्या कार्यक्रमाचं. थंडीच्या मोसमात (बहुधा संक्रांत ते रथसप्तमी या कालावधीत) एकेदिवशी सक्काळी सक्काळी एकत्र यायचं आणि थंडीमध्ये पोषक ठरतील, अशा पदार्थांवर ताव मारायचा. लोकमान्य नगरमधील जुने संघमित्र प्रदीप कोल्हटकर यांनी दिलेल्या निरोपाचं बरहुकुम पालन करीत मी धुंधुर मासाचा कार्यक्रम होणार होतो तिथं दाखल झालो. सिंहगड रस्त्यावरील अनुबंध इमारतीच्या टेरेसवर हा कार्यक्रम अगदी दणक्यात पार पडला. (सगळ्यात पहिल्यांदा प्रसाद जोशी या आमच्या लोकमान्य नगरमधील मित्राकडे धुंधुर मासानिमित्ताने जेवलो होतो. काही लोक त्याला धर्नुमास असंही म्हणतात.)

महेश चांडक, अनिल भांबुरकर, सचिन कुलकर्णी, प्रसाद बापट या जुन्या संघमित्रांची आणि नूमविच्या ज्युनिअर कॉलेजमधील प्राध्यापक माधव परांजपे यांची भेट ही धुंधुर मासाच्या कार्यक्रमाइतकीच संस्मरणीय ठरली. सुरुवातीला सचिन कुलकर्णी यांचे छोटेखानी भाषण झाल्यानंतर आम्ही भोजनस्थानी दाखल झालो. पुण्यात नुकत्याच पार पडलेल्या विश्व संघ शिबिराची माहिती सचिननं दिली. पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या सहाय्यानं. संघ बदलत असल्याचं पुन्हा एकदा अनुभवलं. भोजनावर ताव मारण्यासाठी साधारणतः तीस ते पस्तीस जण उत्साहानं आले होते. टेरेसवर मस्त पंगत मांडली होती. बसण्यासाठी सतरंज्या अंथरल्या होत्या. त्यासमोर पानं मांडली होती. दूर कुठेतरी उदबत्ती लावली होती. त्याचा सुवास दरवळत होता. मग सगळे जण पानावर आले. ज्येष्ठ नागरिकांची पंगत खुर्चीवरच बसली.


एकेक पदार्थ पानात पडू लागले आणि पाहूनच मन तृप्त होत गेलं. सुरुवातीला वाढण्यात आला मुळ्याचा चटका. म्हणजे मुळा किसून त्याची फोडणी देऊन केलेली कोशिंबीर. नंतर आली लेकुरवाळी भाजी. भोगीच्या दिवशी घरोघरी ही भाजी केली जाते. गाजर, वांगी, बटाटा, टोमॅटो, पावटा, श्रावण घेवडा आणि इतर अनेक भाज्या एकत्र करून ही भाजी तयार करतात. लेकुरवाळ्या भाजीनंतर वाटीमध्ये गरमागरम वाफाळती कढी वाढण्यात आली. भोजनमंत्र सुरु होण्याआधीच कढीचा एक घोट घेण्यापासून मी स्वतःला रोखू शकलो नाही.


वाफाळत्या कढीच्या सोबतीला मुगाच्या डाळीची खिचडी आली. ती पण मस्त गरम होती. मला वाटलं सगळं संपलं. पण छे. आता वेळ होती बाजरीच्या तीळ पेरलेल्या भाकरीची. चतकोराचे दोन तुकडे पानात आले. भाकरीवर मस्त लोण्याचा गोळा आला. जवळपास सगळे पदार्थ पानात आल्यानंतर माधवरावांनी खड्या आवाजात भोजनमंत्र म्हटला आणि पुढच्या मिनिटाभरात सगळे जण आक्रमण म्हणत तुटून पडले. आधी गरमागरम कढी-खिचडी खावी का गरम लोणी पाघळलेली भाकरी खावी, या विचारात असतानाच खिचडीला हात घातला आणि सकापाहता पाहता कढी-खिचडीचा फडशा पडला. कढी-खिचडी संपता संपता ताटात गुळाच्या पोळीनं प्रवेश केला. बरं, येताना नुसती आली नाही, सोबतीला चमचाभर तूपही घेऊन आली.

वेळ सकाळी नऊची आणि सहा पदार्थ. इतकं संगळं संपेल की नाही, याची खात्रीच नव्हती. कारण इतक्या सकाळी इतकं भरपेट जेवण करण्याची ही पहिलीच वेळ. (गेल्या दोन-तीन वर्षांतील तरी) पण एकेक पदार्थ इतके चविष्ट होते की विचारता सोय नाही. त्यातही मुळ्याचा चटका सर्वाधिक उजवा (डावीकडे वाढला असूनही) ठरला. कढीपासून सुरु झालेली चवीची चढती भाजणी मुळ्याच्या चटक्यापाशी येऊन थांबली. बाजरीची भाकरी आणि भाजी, कढी आणि खिचडी सोबतील मुळ्याचा चटका आणि गुळाच्या पोळीचा गोडवा. आणखी काय पाहिजे. मस्त दिलखुष आणि पेटही खूष. सगळ्या पदार्थांवर यथेच्छ ताव मारल्यानंतर सर्वजण पानांवरून उठले.



मग माझा शोध सुरु झाला की, बाबा हे जेवण कोणी केलंय. प्रदीपला विचारल्यानंतर तो म्हटला, की माधवराव यांच्या मिसेसने हा सारा स्वयंपाक केला आहे. मग नूमवित मी तुमच्या वर्गात होतो, असं माधवरावांना सांगितलं. त्यांना आठवणं शक्यच नव्हतं. कारण त्यालाही आता बारा पंधरा वर्षे उलटली होती आणि मी काही ब्राईट स्टुडंट नव्हतो. जेवण एकदम फर्स्ट क्लास असल्याचं माधवरावांना सांगितलं. त्यांनीही त्या मायमाऊलीचं (त्यांच्या भाषेत आमच्या राष्ट्रपती) कौतुक केलं. पदार्थ सगळेच करतात. पण चव एखादीच्याच हाताला असते. आम्ही आमच्या पंढरपुरी स्टाईलनं जमले तितकं केलंय, असं सांगून माधवरावांनी कौतुकाचा त्यांच्याइतक्याच सभ्य, सुसंस्कृत आणि नम्रपणे स्वीकार केला.

इतके सगळे पदार्थ पहाटे पहाटे उठून तयार करायचे आणि शिवाय इतक्या चांगल्या चवीचे. त्या मायमाऊलीचं कौतुकच करावं तितकं थोडं आहे. एक से बढकर एक पदार्थांवर ताव मारून आणि जुन्या मित्रांचा स्नेहपूर्ण निरोप घेऊन आम्ही सगळे निघालो. (अर्थातच, शंभर रुपये शुल्क जमा करून. फुकट काहीही न देता, प्रत्येक कार्यक्रमाला शुल्क घेण्याची पद्धत आहे म्हणूच संघ आजपर्यंत टिकला, असं मला उगाचच वाटतं) निघताना पोट भरगच्च होतं आणि मन एकदम तृप्त होतं. थँक्स टू प्रदीप कोल्हटकर, माधवराव परांजपे आणि त्यांच्या राष्ट्रपती.