Showing posts with label Rajasthan. Show all posts
Showing posts with label Rajasthan. Show all posts

Saturday, May 15, 2010

मनःपूवॆक आदरांजली...

निष्ठावंत आणि राजकारण्यांचे गुरु...



साधारणपणे 1950 चे दशक! राजस्थानमध्ये त्यावेळी जनसंघाची फारशी ताकद नसली तरी 1958 साली विधानसभेत जनसंघाचे आठ आमदार होते. त्यावेळी राजस्थानमधील कॉंग्रेस सरकारने जहागिरदारी (वतनदारी) संपुष्टात आणण्यासाठी विधेयक आणले. जनसंघही जहागिरदारी संपुष्टात आणण्याच्या बाजूने होता. त्यामुळे सरकारने आणलेल्या विधेयकाला विरोध करण्याचा प्रश्‍नच नव्हता. तेव्हा जनसंघाने त्यांच्या आमदारांना सरकारने आणलेल्या विधेयकाला पाठिंबा देण्याची सूचना केली.

अर्थात, जनसंघाचे आठही आमदार वतनदार होते. त्यांची प्रत्येकाची मोठ्या प्रमाणावर जमीन होती. त्यामुळे जनसंघाच्या आठपैकी सात आमदारांनी पक्षादेश डावलून विधेयकाच्या विरोधात मतदान केले. एका आमदाराने मात्र, स्वतः जहागिरदार असून केवळ पक्षादेश शिरोधार्य मानून जहागिरदारी संपुष्टात आणण्यासाठी मतदान केले. तो आमदार म्हणजे माजी उपराष्टपती भैरौसिंह शेखावत!

जनसंघाच्या सात आमदारांनी विरोधात मतदान करुनही ते विधेयक संमत झाले. विधेयकाच्या विरोधात मतदान करणारे सात आमदार पुन्हा जिंकले, हरले किंवा त्यांचे पुढे काय झाले, कोणाच्याही स्मरणात नाही. पण भैरोसिंह शेखावत हे नाव मात्र, त्यानंतर प्रादेशिक आणि राष्ट्रीय राजकारणात संस्मरणीय ठरले. तीनवेळा राजस्थानचे मुख्यमंत्रीपद भूषविणारे शेखावत पाच वर्षे भारताचे उपराष्ट्रपती होते.



बाबरी मशीद उद्ध्वस्त झाल्यानंतर भारतीय जनता पक्शाची उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थान अशी तीनही सरकारं बरखास्त केली. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत फक्त राजस्थानमध्ये पुन्हा भाजपची सत्ता आली. भैरोसिंह शेखावत यांच्या अप्रतिम मॅनेजमेंटच्या जोरावरच तिथे भाजप पुन्हा सत्तेवर आला. शेखावत तिस-यांदा राजस्थानचे मुख्यमंत्री झाले.

काही महिन्यानंतर शेखावत यांच्यावर अमेरिकेत बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली. कदाचित दुसरी असावी. ते अमेरिकेत असताना त्यांच्या मंत्रीमंडळातील एका कनिष्ठ सहका-याने शेखावत यांच्याविरुद्ध बंड केले. शेखावत यांचे नेतृत्व आम्हाला अमान्य असून आता मीच मुख्यमंत्री अशा थाटात त्याने जुळवाजुळव सुरु केली होती. आमदारांचा एक गटही त्याच्या गळाला लागला होता. शस्त्रक्रिया झाल्यानंतर महिनाभराच्या कालावधीने शेखावत पुन्हा भारतात परतणार होते. शस्त्रक्रियेनंतर विश्रांती घेता-घेता शेखावत यांनी अशी काही जादूची कांडी फिरविली की विचारता सोय नाही. ज्या दिवशी शेखावत पुन्हा राजस्थानात परतले त्याच दिवशी तो बंडखोर आमदारानं शेखावत यांच्या पायावर लोटांगणच घातलं. जो हो गया सो हो गया. अब आप ही तो हमारे नेता है भेरोसिंहजी... असं म्हणत त्या आमदारानं आपली तलवार म्यान केली.

सत्ता टिकविण्यासाठी जे राजकीय चातुयॆ, धूतॆपणा आणि इतरांना मॅनेज करण्याचं कौशल्य लागतं ते शेखावत यांच्याकडे होतं आणि त्या जोरावरच त्यांनी राजस्थानात सत्ता गाजविली. अनेक चढ-उतार आले तरी त्यांनी निष्ठा बदलल्या नाहीत. त्यामुळंच त्यांना तीनवेळा मुख्यमंत्री आणि एकदा उपराष्टपती होता आलं.

अशा या महान नेत्यांना मनोभावे आदरांजली...