चांदीच्या ताटात आणि पेशवाई थाटात... अशी जाहिरात करणारं श्रेयस आणि पुण्यातील हजारो-लाखो जणांना (विशेषतः विद्यार्थ्यांना) जगविणारं बादशाही. पुण्यातील या दोन खूप लोकप्रिय आणि तितक्याच जुन्या ठिकाणी जेवण्याचा योग आला. यापूर्वीही दोन्ही ठिकाणी अनेकदा जेवलेलो असल्यामुळे तिथल्या जेवणाची खासियत, चव आणि स्टाईल माहित होती. पण गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये दोन्हीकडे जेवणं झालं नव्हतं. त्यामुळं जेवण कसं असेल, याची प्रचंड उत्सुकता लागून राहिली होती. एका ठिकाणी ती पूर्ण झाली तर दुसरीकडे मात्र, भलतीच निराशा उदरी (पदरी नव्हे) पडली.

सर्वप्रथम श्रेयस. आपटे रस्त्यावर असलेलं हे हॉटेल अगदी सुरुवातीपासून मराठी पद्धतीचा डायनिंग हॉल म्हणून प्रसिद्ध आहे. अस्सल मराठमोळं (ब्राह्मणी म्हटल्यास अधिक योग्य) जेवण ही इथली खासियत. अगदी वीक डेला सुद्धा इथं वेटिंग लिस्ट असते. रविवारची तर गोष्टच विचारु नका. (आम्ही रविवारीच गेलो होतो. शिवाय दहा-बारा जण होतो. त्यामुळं भलतंच थांबावं लागलं.) तर असं हे प्रचंड लोकप्रिय श्रेयस. प्रचंड लोकप्रियता, आपटे रोडवर असलेलं लोकेशन आणि वर्षानुवर्षांची चव यामुळे साहजिकच इथला रेट प्रचंड प्रचंड प्रचंड आहे. एका थाळीसाठी (स्वीटसह) तब्बल दोनशे रुपये मोजावे लागतात इथे. तरीपण लोक दोनशे रुपये मोजतात आणि आत्मा तृप्त करतात. जेवणाची चवच इतकी अफलातून आहे की, हातावर पाणी घेताना साहजिकच शब्द बाहेर पडतात दोनशे रुपये वसूल.
आम्ही गेलो होतो तेव्हा सणासुदीला असतो तसा मेन्यू होता. किंवा पूर्वीच्या लग्नांमध्ये असायचा तसा मेन्यू. आळूची भाजी, बटाट्याची सुकी भाजी, बिरड्याची उसळ (सोललेल्या वालाची), पुऱ्या, गोल भजी, पापड, चटणी, कोशिंबीर, थालिपीठ आणि सरते शेवटी सोलकढी किंवा ताक. आणखी दोन-चार पदार्थ असतीलही. पण मला आत्ता आठवत नाही. पण हे जे काही होतं ते इतकं टेस्टी होतं की बस्स.

आळूची भाजी जशी हवी अगजी तशी. चवीला आंबट-गोड. जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही. शिवाय त्यात शेंगदाणे, खोबरं इइ. ऐवज अगदी मुबलक प्रमाणात घातलेला. बटाट्याची भाजीही थोडी झणझणीत. मिरचीच्या ठेच्याचा अगदी योग्य प्रमाणात वापर. सजावटीला खोबरं आणि कोथिंबीरही. बिरड्याची उसळही तोडीस तोड. खोबऱ्याच्या वाटणाचा उपयोग चव वाढविणारा. त्यांच्या सोबतीला गोल भजी, थालिपीठ आणि बटाटा वडा होताच. अधून मधून ताकाची फेरीही होत होती. जेवणाची सुरुवात वरण भाताने, नंतर मसाले भात, नंतर पुऱ्या आणि अगदी शेवटी हवा असेल तर दहीभात किंवा पुन्हा साधा भात. अशा पद्धतीनं जेवणावर लोक तुटून पडत होते. जेवण सुरु असतानाच मध्ये स्वीट काय हवं, अशी विचारणा झाली. मग कोणी गुलाबजाम, कोणी श्रीखंड, कोणी पुरणपोळी मागविली. अशा स्वर्गसुख देणाऱ्या जेवणामुळे सर्वांचे आत्मे तृप्त झाले.
खरं तर सोलकढी या जेवणामध्ये मिसफिट. पण मासे खाल्ल्यानंतरच सोलकढी प्यायली पाहिजे, असा काही नियम नाही. त्यामुळे श्रेयसमधील त्या जेवणानंतरही मी सोलकढी प्यायली. सोलकढीही एखाद्या मालवणी हॉटेलवाल्याच्या तोंडात मारेल अशी. त्यामुळे सोलकढीने कळस चढविला, असं म्हणायला हरकत नाही. तुडुंब जेवण झाल्यानंतर श्रेयसवाल्यांनी पानाची सोय पण ठेवली होती. पण पानपट्टीच्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी मिळणारं पान कसं असतं, याचा पुरेपूर अनुभव असल्याने मी पान मात्र खाल्लं नाही. थोडक्यात काय तर चांदीच्या ताटात अन् पेशवाई थाटात... अशी जाहिरात करणाऱ्या श्रेयसने त्यांची चव आणि परंपरा शब्दशः जपली आहे. चांदीचं ताट नसलं तरी थाट मात्र, पेशवाई होता, हे सांगायला नकोच. त्यामुळं अन्नदात्याचं भलं हो... असं म्हणत आम्ही श्रेयसमधून बाहेर पडलो.
थो़ड्याच दिवसांनी टिळक रोडवरील बादशाहीत जाण्याची वेळ आली. बादशाही म्हणजे परगावातून पुण्यात नोकरी किंवा शिकण्यासाठी पुण्यात आलेल्या लोकांचे अन्नदाता, जुन्या काळातील प्रचंड लोकप्रिय खाणावळ आणि अजूनही जुन्या पुणेकर मंडळींच्या जिव्हाळ्याचा विषय. चर्चेचा विषय. दोन-अडीच वर्षांपूर्वी एकदा मित्रांबरोबर बादशाहीत गेलो होतो. त्यानंतर मुंबईला असल्यामुळं तिथं जाणं व्हायचं नाही. पण एका रविवारी बाहेर जायची वेळ आली, म्हणून मोठ्या उत्साहानं बादशाहीत गेलो.

पण उदरी प्रचंड निराशा पडली. बादशाही हे नुसतं नावात बादशाही नव्हतं. तर चवीतही बादशाही होतं. तिथल्या वाट्या आणि वाढण्याची पद्धत कधीच बादशाही नसली तरी त्याचं दुःख कधीच नसायचं. कारण तिथं अगदी घरच्यासारखं चविष्ट जेवण मिळत होतं. त्यामुळं बाकी सगळं माफ होतं. पण आता परिस्थिती बदलल्यासारखी वाटली. बादशाहीपण फक्त नावातच उरलं असल्याचं जाणवलं. वाट्यांचा आकार व वाढण्याची पद्धत पूर्वीसारखीच होती. त्यात शाहीपणा असण्याचा प्रश्नच नव्हता. पण चवीत मात्र, कमालीची घसरण झाल्याचं अगदी पहिल्या घासाला जाणवलं आणि प्रत्येक घासागणिक ही घसरण वाढतच गेली.

मुळात पांढरा भात आणि वरणाला सुट्टी. फक्त मसाले भात. तिथंच डोकं सटकलं. पोळ्या होत्या पण त्या गव्हाच्या होत्या की, मैद्याच्या ते कळत नव्हतं. गरम होत्या मऊही होत्या. पण मैदा जाणवत होता. आज पांढरा भात नाही. रविवार असल्यामुळे फक्त मसाले भात असं उत्तर मिळाल्यावर गिळा, असं मनातल्या मनात म्हणण्याखेरीज काहीच नव्हतं. बटाट्याच्या भाजीत ना तिखट ना मीठ. स्वीट म्हणून असलेले गुलाबजाम हे खेळण्यातील गोट्यांच्या आकाराचे. (तेही पाकात न मुरलेले). चटणीचा पत्ताच नाही. चटणीच्या ऐवजी फरसाण पानात आलं होतं. आता बादशाहीच्या ताटात फरसाण हे क्रांतिकारक असलं तरी ते संपूर्ण जेवणात मिसफिट होतं आणि काहीतरी पाहिजे म्हणून असल्यासारखं होतं. संपूर्ण जेवणात आळूची भाजीच चांगली होती. म्हणजे चवीला उत्कृष्ट होती. त्यानंतर नंबर होता तो काकडीच्या कोशिंबीरीचा. अर्थात, कोशिंबीर करण्याला फार अक्कल लागत नाही. तसंच कोशिंबीर खायला कोणी हॉटेलात जात नाही. त्यामुळे कोशिंबीर चांगली होती, याचं कौतुक असण्याचं कारण नाही.
असो. अन्न हे पूर्णब्रह्म असं मानून कोणतीच तक्रार न करता जेवलो. पोट भरलं पण तृप्त मात्र, झालो नाही. जेवल्यानंतर माझी प्रतिक्रिया मालकांना सांगण्याचा प्रश्नच नव्हता. कारण त्यांच्याकडे जेवणासाठी लोक वेटिंगवर होते. त्यामुळे माझ्या मताला त्यांच्या लेखी फारशी किंमत नसावी, असा विचार करुन मी बाहेर पडलो. आणखी एक-दोन जणांशी बोलताना सहज बादशाहीचा विषय निघाला आणि त्यांनीही माझ्यासारखीच प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यामुळेच हा ब्लॉग लिहावासा वाटला आणि लिहिला. चवीतला बादशाहीपणा असा सहजासहजी सोडू नये, अशीच माझी अपेक्शा आहे आणि पुढच्या वेळी जेव्हा जाईन तेव्हा पुन्हा एकदा नव्याने ब्लॉग लिहावासा वाटेल, अशी जेवणाची चव असावी, अशीच इच्छाही आहे.
पुण्यातील खवय्यांनी या दोन्ही ठिकाणचा आस्वाद घेतलेलाच असेल. त्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया ब्लॉगवर जरुर नोंदवाव्यात. ही विनंती.