तांबे उपहारगृह
गिरगांव म्हणजे मराठी माणसाची जान. मराठी माणसाची शान. गिरगावातल्या सत्कार नावाच्या हॉटेलवर मी यापूर्वीच लिहिलं आहे. सत्कारप्रमाणेच किंवा सत्कारपेक्षाही अधिक लोकप्रिय आणि नावाजलेलं आणखी एक उपहारगृह म्हणजे तांबे उपहारगृह. मरीन लाईन्स रेल्वेस्थानकापासून पाच मिनिटांच्या अंतरावर व सीएसटीपास्नं टॅक्सीनं फक्त तेरा ते पंधरा रुपये अंतरावर. त्यामुळं इच्छित स्थळी पोहोचणं फारसं अवघड नाही. (आणि जरी अवघड असलं तरी खरा खवय्या कसंही करुन इथं आल्याशिवाय राहणार नाही, हे सांगायला नकोच.)
अफलातून चव...
तांबे उपहारगृहाची खरी ओळख म्हणजे इथल्या मराठमोळ्या खाद्यपदार्थांची अफलातून चव. कोथिंबीर वडी, आळू वडी, भाजणीच्या पिठाचं थालिपीठ आणि लोणी, डाळिंब्यांची (सोललेल्या कडव्या वालाची) उसळ, आळूची पातळ भाजी (आळूचं फदफदं), उकडलेल्या बटाट्याची डोसा भाजी (घरगुती पद्धतीनं केलेली उडप्यासारखी नव्हे...) मूग आणि मटकीची उसळ, कढी-भात, कढी- मूगडाळ खिचडी, चवळी-पालक आणि इतर अनेक चविष्ट पदार्थ. ओल्या काजूची (काजूगराची) उसळ हे इथलं आणखी एक वैशिष्ट्य!
औरंगाबाद सकाळचे मुख्य वार्ताहर अभय निकाळजे, मुंबई सकाळमधील सहकारी अभय न. जोशी तसंच मंगेश मधुकर कुलकर्णी आणि मी असे आम्ही चौघे तांबे उपहारगृहामध्ये गेलो होतो. सकाळचे चौघे तांबे उपहारगृहामध्ये जाऊन अक्षरशः खूष झालो. तिथल्या जेवणावर दिलखूष झालं. कुठं जायचं कुठं जायचं असं ठरत असतानाच तांबे उपहारगृहाचं नाव पुढे आलं आणि सर्वांनीच त्याला पसंती दिली. मग सकाळच्या फोर्ट कार्यालयातनं ठाकूरद्वार गाठलं.
ब्राह्मणी जेवण...
ब्राह्मणी पद्धतीचं मराठी जेवण इथं फर्स्ट क्लास मिळतं. ब्राह्मणी कुटुंबामध्ये ज्या पद्धतीनं तिखट बेताचंच आणि गुळाचा वापर सढळ हाताने असतो, त्याच पद्धतीची चव इथं चाखायला मिळते. कमी तिखट असलं तरी हे मराठी पदार्थ कमी तिखट असले तरच किंवा थोडेसे गूळचट असले तरच चांगले लागतात, हे सांगायला नको. आळूची भाजी त्याच पठडीतली. पण आळूच्या भाजीला लाल मिरच्यांची फोडणी दिलेली असते. हे इथलं वेगळेपण. त्यामुळंच चवही थोडीशी वेगळी.
डाळिंब्याची उसळ...
इथं गेल्यानंतर आवर्जून खायची गोष्ट म्हणजे डाळिंब्याची उसळ. एकदम घट्ट (रस्सा एकदम कमी) अशी ही उसळ पुण्यातल्या कोहिनूर मंगल कार्यालय किंवा ज्ञानल मंगल कार्यालयातल्या उसळीची आठवण करुन देते. डाळिंब्याची उसळही थोडीशी गोड असेल तर अधिक चांगली लागते. तांबेंनीही हे जाणलंय. पालक पनीरपेक्षा पालक-चवळी असं वेगळंच कॉम्बिनेशन इथं चाखायला मिळतं. शिवाय झुणका-भाकर आहेच. अर्थात, झुणका हा तिखट नाही, हे वेगळं सांगायला नकोच. पण झुणका झणझणीत असेल तरच चांगला लागतो. त्यामुळं इथं झुणका-भाकरी न खाणंच उत्तम. इतर पदार्थ ट्राय केले तर उत्तम.
अनेक पर्याय...
द बेस्ट गोष्ट म्हणजे इथं लिमिटेड किंवा अनलिमिटेड स्वरुपात थाळी मिळतेच. पण तुम्हाला थाळी नको असेल तर भाज्या आणि उसळी यांच्यासाठी प्लेट सिस्टीमही आहे. त्यामुळं आवडीच्या दोन-चार भाज्या, भाकरी किंवा पोळ्या, सोबतीला आळूवडी किंवा कोथिंबीर वडी, एखादं थालिपीठ अशी ऑर्डर दिली तर मग विचारायलाच नको. शिवाय भाजी किंवा उसळीची क्वांटीटी दोघांना पुरेल इतकी असते. त्या अंदाजानं आपण ऑर्डर देऊ शकतो. शेवटी मूगडाळ खिचडी आणि कढी किंवा पांढरा भात आणि कढी हा मेन्यू बेस्ट. एक प्लेट भात किंवा खिचडी दोघांना पुरते. त्यामुळं इथंही अंदाज घेऊनच ऑर्डर देऊ शकतो. इतकं सगळं खाल्ल्यानंतर तुमच्या पोटात थोडी जागा असेल तर एक ग्लास सोलकढी प्या. (आम्ही प्यायली होती, हे आलंच)
स्वच्छता आणि टापटीप....
इथली आणखी एक ओळख म्हणजे इथली स्वच्छता आणि टापटीप. स्वच्छतेकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं. पण इथले वेटरही एकदम स्वच्छ आहेत. शिवाय टिपिकल मराठी उपहारगृहांमध्ये ग्राहकाकडे ज्या तुच्छतेनं पाहिलं जातं तो अनुभव इथं येत नाही. फक्त काहीवेळा पदार्थ लवकर संपलेले असतात. त्याला पर्याय नाही, असं म्हणायचं आणि दुर्लक्ष करायचं. इथले दरही खूप जास्त आहेत, असं नाही. माफक दर आणि उत्तम चव असं वर्णन करायला हरकत नाही. चार जणांनी यथेच्छ हादडल्यानंतर साधारणपणे तीनशे रुपयांपर्यंत बिल येतं, असा अनुभव आहे. साधारण तीन-चार वेळचा. त्यामुळं जास्त चिंता करु नका आणि ओरपा...
तांबे उपहारगृह
२७७, मापला महल,
जे. एस. मार्ग, ठाकूरद्वार,
गिरगांव, मुंबई – ४००००४
०२२-२३८९९००९
०२२-२३८६४२२३