Tuesday, July 21, 2009

विधानसभेलाही "मनसे' मतं खाणार?

"मनसे'ला भवितव्य आहे का?"

दो ही मारा लेकिन कैसा मारा...' महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीनंतर जाहीरपणे केलेलं एक वक्तव्य! लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या उमेदवारांना मिळालेलं यश पाहिल्यानंतर "मनसे'चे समर्थक आणि कार्यकर्ते अक्षरशः हुरळून गेले होते. वास्तविक पाहता "मनसे'चा जन्मच शिवसेनेला संपविण्यासाठी किंवा त्यांची ताकद कमी करण्यासाठी झालाय. त्यामुळे "मनसे'चा एकही खासदार नवी दिल्लीत पोचला नसला तरीही त्यांच्यामुळं भारतीय जनता पक्ष-शिवसेनेच्या सहा ते आठ जागा पडल्या, हे वास्तव कोणीही नाकारणार नाही. राज यांचा सुप्त हेतू लोकसभा निवडणुकीत साध्य झाला आणि त्यामुळंच त्यांनी कुत्सितपणे हे वक्तव्य केलं. काही जणांना वाटलं की, आता सारं संपलं. शिवसेनेच्या पडझडीला पुन्हा सुरवात होणार. उद्धव यांना राजकीय संन्यास घ्यायला लागून फक्त फोटोग्राफीच करावी लागेल, इथपर्यंत मत व्यक्त केली जात होती.

पण पण आणि पण "मनसे' स्थापन झाली तेव्हापासून ते आतापर्यंत (लोकसभा निवडणुकीनंतरही) माझं ठाम मत आहे की, शिवसेना संपणार नाही. राज ठाकरे यांची तसंच त्यांच्या पक्षाची कार्यपद्धती पाहता "मनसे'ला लोकसभेत यश मिळालं. कदाचित पुढच्या दोन-तीन निवडणुकांमध्येही असंच घडेल. पण हीच अंतिम स्थिती नक्कीच असणार नाही. शिवसेनेला मरण नाही आणि "मनसे'ला भवितव्य नाही. "मनसे' हा झंझावात नाही. ती वावटळ आहे. त्यामुळं ती फार काळ टिकणार नाही. त्यामुळं फारशी पडझड होणार नाही आणि शिवसेनेवर फारसा परिणामही होणार नाही. लोकसभा निवडणुकीनंतर माझं हेच मत होतं. काहींनी मला वेड्यात काढलं. पण मी ठाम होतो आणि आहे.

उद्धव व राज यांच्या कार्यपद्धतीवर नजर टाकली तर आपल्याला काही गोष्टी स्पष्टपणे जाणवतील. शिवसेनेच्या पडत्या काळातही उद्धव हे खचून गेले नाहीत. उलट त्यावेळी त्यांची खंबीर वृत्ती दिसून आली. मग ते नारायण राणे किंवा राज ठाकरे यांचा पक्षाला "जय महाराष्ट्र' करणं असो किंवा लोकसभा निवडणुकीत आलेलं अपयश असो. लोकसभेनंतर उद्धव यांची चिडचिड झाली होती. वादच नाही. पण त्यानंतर खचून न जाता रिलायन्स एनर्जी विरोधातील आंदोलन असो किंवा "म्हाडा'ची घरं मराठी माणसांना मिळणं असो शिवसेना सतत आंदोलनं करीतच राहिली. उलट पक्षी रमेश किणी याचा नामोल्लेख झाल्यानंतर राज ठाकरे यांची बोलतीच बंद झाली. लोकसभा निवडणुकीमध्ये "मनसे'ला मिळालेलं यश हे उद्धव यांच्या "त्या' उत्तरानंतर फिकं पडलं. मराठीच्या तापल्या तव्यावर पोळी भाजून तर झाली. पण प्रत्येक निवडणुकीपूर्वी हा तवा तापवायचा आणि पोळी भाजून घ्यायची ही काही खायची गोष्ट नाही. लोकोपयोगाची कामं केल्याशिवाय मतांचे सातत्य रहात नाही, हे मी सांगण्याची गरज नाही. हाच मुद्दा "मनसे'च्या भवितव्याचा विचार करताना महत्वाचा ठरतो.

शिवसेनेनेही सुरवातीच्या काळात राडाबाजी केली. दक्षिण भारतीय, उत्तर भारतीय किंवा परप्रांतियांविरुद्ध आंदोलन उभारले. मराठी माणसांचा मुद्दा लावून धरला. मुस्लिम, बांग्लादेशी आणि पाकिस्तीनी घुसखोरांच्या निमित्तानं भगवा विचार मांडला. हिंदुत्व आणि मराठी हे दोन्ही मुद्दे त्यांनी अगदी प्रखरपणे मांडले. कशाचीच हयगय केली नाही. तोडफोड, राडा, पेटवापेटवी आणि बरंच काही. पण हे करताना शिवसेनेनं रचनात्मक कार्यही केलं. स्थानिक लोकाधिकार समितीच्या माध्यमातनं मुंबईतल्या बॅंका, हॉटेल्स, विमानतळ आणि केंद्र सरकारच्या आस्थापनांमध्ये स्थानिक मराठी माणसाला स्थान मिळवून दिलं. नोकऱ्या लावल्या. शिवसैनिकांच्या आधारावर लोकहिताची कामं केली. जिथं जिथं मराठी माणसावर अन्याय झाला तिथं तिथं सेनेनं आवाज उठविला. मुंबईनंतर ग्रामीण भागातही हळूहळू पाय पसरले. तिथं शिवसेनेनं अगदी चलाखपणे हिंदुत्वाच्या मुद्‌द्‌याचा वापर केला. मराठवाड्यात जिथं निजामाचं राज्य होतं तिंथं "खान हवा की बाण हवा' अशा वृत्तीतून प्रचार करुन सेनेनं घट्ट पाय रोवले. त्यामुळंच आज इतके हादरे बसूनही सेनेचा गड शाबूत आहे आणि उद्याही राहिल.

राहता राहिला मुद्दा "मनसे'चा तर "मनसे' हा कोणताही विचार किंवा कोणतेही ध्येय-धोरण नसलेला पक्ष आहे. मुळात पक्ष स्थापन झाला तोच उद्धव यांच्या विरोधाची भूमिका घेऊन. त्यामुळेच शिवसेनेला (आणि उद्धव यांनाही) संपविण्याचा विडा उचलून "मनसे'ची वाटचाल सुरु आहे. पण महापालिका निवडणुकांमध्ये "मनसे' सपशेल आपटला. पण त्यानंतर राज्य सरकारच्या मदतीमुळं राज ठाकरे यांचा चांगलाच बोलबाला झाला. स्पष्टच बोलायचं झालं तर "मनसे' वाढविण्यासाठीच राज ठाकरे यांची प्रतिमा आहे त्यापेक्षा मोठी करण्याचा प्रयत्न राज्य सरकारनं केला. त्याचा फायदा राज यांना लोकसभा निवडणुकीत झाला. पण विधानसभेला असं होईलच असं नाही. कारण कोणताही मुद्दा न देता, कोणताही कार्यक्रम हाती न घेता आणि कोणत्याही प्रकारची वैचारिक बांधिलकी नसलेला पक्ष टिकूच शकत नाही. भैय्या टॅक्‍सीवाल्यांना फोडून काढणं, पाणीपुरीवाल्यांना पळवून लावणं, भैय्या मंडळींना मारहाण करणं आणि अमराठी पाट्या फोडणं म्हणजेच मराठीचा कळवळा हा गैरसमज आहे आणि ते येत्या काही निवडणुकांमध्ये (कदाचित विधानसभेलाच) स्पष्ट होईलच.

आणखी एक आणि महत्वाची गोष्ट म्हणजे राज ठाकरे यांच्या कार्यपद्धतीबद्दल असलेले आक्षेप. ""राजकीय पक्षाचं आणि सामाजिक काम करण्यासाठी रोज सकाळी लवकर उठावं लागतं,'' हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आक्षेप पुरेसा बोलका आहे. तसंच प्रत्यक्ष मैदानात न उतरता फक्त सभेच्या व्यासपीठावरुन राणा भीमेदवी घोषणा करण्यातच राज ठाकरे यांना रस आहे. उद्धव ठाकरे, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी आणि इतर विरोधी पक्षाच्या नेत्यांप्रमाणे एखाद्या मोर्च्यात किंवा आंदोलनात राज प्रत्यक्ष सहभागी झालेले आठवत नाही. गेल्या काही दिवसांमध्ये तर नक्कीच नाही. आणखी एक गोष्ट म्हणजे "मनसे' हा पक्ष राज ठाकरे आणि त्यांच्याभोवतीची चौकडी यांच्यापुरताच मर्यादित राहिला आहे, असा आरोप श्‍वेता परुळकर आणि प्रकाश महाजन यांनी केलाय. त्याच मुद्‌द्‌यावरुन हे दोन्ही नेते (नेते या शब्दाला आक्षेप असेल तर राजकारणी हा शब्द योग्य आहे) पक्षातून बाहेर पडले आहेत. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे अशाच स्वरुपाचे आरोप करुन राज यांनी शिवसेनेला "जय महाराष्ट्र' केला होता. दुर्दैवाने तेच आरोप राज यांच्यावर होताहेत आणि तेही फक्त तीन वर्षांच्या कालावधीतच!

महत्वाची गोष्ट म्हणजे राज ठाकरे हे एकहाती पक्ष चालवित आहेत. प्रवीण दरेकर, शिरीष पारकर, शिशिर शिंदे, अतुल सरपोतदार, बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई. एखाद-दुसरा इकडे तिकडे. ही मंडळी सोडली तर राज यांच्याकडे नेत्यांची फौज नाही. कार्यकर्त्यांची फौज आहे, असं वाटतं. पण कोणताही ठोस कार्यक्रम नसताना फक्त बोलीबच्चन देऊन तरुणांना बांधून ठेवणं अवघड आहे. पोलिस आणि न्यायालयांचा फेरा मागे लागला की, हे तरुण पक्ष कामाकडे हळूहळू दुर्लक्ष करु लागतात. शिवाय "मनसे'तली धुसफूसही वाढू लागलीय. पुण्यातलं लोकसभेचं तिकिट रणजित शिरोळे यांना देण्यावरुन दीपक पायगुडे हे राज यांचे समर्थक खूप दुखावले गेले होते. ते राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चाही रंगली होती. पण पायगुडे यांनी "मनसे'तच राहणं पसंत केलंय. पण आता ते फारसे सक्रिय नाही. आपलं मतही विचारात न घेता शिरोळे यांनी तिकिट दिल्यामुळं पायगुडे दुखावले आहेत. दुसरीकडे राज यांची पुण्यात पहिली सभा लावणारे गणेश सातपुते यांनीही "मनसे'ला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश केला. हिंदुत्वाच्या मुद्‌द्‌याला राज यांनी हरताळ फासल्यामुळं सातपुते शिवसेनेत गेले. पण पायगुडे आणि सातपुते यांचं जमत नसल्यामुळंच हे पक्षांतर झाल्याचं खरं वृत्त आहे. थोडक्‍यात म्हणजे "मनसे'तही सारं आलबेल आहे, असं नाही.

एकीकडे मराठीचा मुद्दा सारखा तापवता ठेवता येत नाती. दुसरीकडे मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुणे वगळता इतर शहरांमध्ये "मनसे'चा फारसा प्रभाव नाही. ग्रामीण भागात तर "मनसे'ला कोणी ओळखतही नाही. मतं मिळणं तर दूरच. "मनसे'चे कार्यकर्ते सध्या जी आंदोलनं करत आहेत ती स्वतःच्या ताकदीवर किंवा स्वतःच्या निर्णयाने करीत आहेत. त्यात कोणतीही सुसूत्रता आणि भूमिका नाही. शिवाय महाराष्ट्राच्या विकासाची "ब्ल्यू प्रिंट' तयार असतानाही राज महाराष्ट्राच्या विकासावर काहीच का बोलत नाही, हा महत्वाचा मुद्दा आहे.

दुसरं म्हणजे शिवउद्योग सेनेच्या मार्फत राज ठाकरे यांनी किती तरुणांना रोजगार उपलब्ध करुन दिला आणि किती जणांना वाटाण्याच्या अक्षता मिळाल्या कोण जाणे... (ज्येष्ठ पत्रकार महेश विजापूरकर यांनी लिहिलेल्या एका लेखाच्या संदर्भानुसार राज यांच्यासाठीच उघडण्यात आलेल्या शिवउद्योग सेनेकडे जवळपास लाखभर तरुणांचे अर्ज आले होते. पण त्यापैकी फक्त अडीच हजार तरुणांनाच नोक-या दिल्या गेल्या.) सो राज ठाकरे यांनी आधी शिवउद्योग सेनेचा हिशेब द्यावा आणि मग महाराष्ट्राच्या ब्ल्यू प्रिंटकडे वळावं...

शिवाय राज हे त्यांच्या "छानछौकी'साठीच अधिक प्रसिद्ध आहेत. त्यांनी शेतकऱ्यांसाठी एखादा मोर्चा काढलाय, वीजेच्या मुद्‌द्‌यावर रस्त्यावर उतरले आहेत, रिलायन्सच्या वीज दरवाढीविरोधात आंदोलन उगारलंय, कापूस दिंडी काढलीय किंवा गोपीनाथ मुंडे यांच्यासारखी संघर्ष यात्रा काढलीय? काही आठवतंय. नाही शक्‍यच नाही. राज ठाकरे हे "पोस्टरबॉय' आहेत आणि उन्हातान्हात फिरण्याची त्यांची वृत्ती नाही, हे उघड सत्य आहे. कोणीही कितीही अमान्य केलं तरी. अशा परिस्थितीत फक्त सभांच्या आणि तोडफोडीच्या जोरावर तरुणांना आणि मध्यमवर्गीयांनी किती दिवस खिळवून ठेवता येईल, हाच खरा प्रश्न आहे.

"मनसे'च्या मतं खाण्यामुळं युतीच्या "सिटा' पडल्या हे मरी माणसावर बिंबवणयात शिवसेना काही प्रमाणात नाही तरी यशस्वी झाली आहे. शिवसेनेचे कार्यकर्तेही "मनसे'ला धडा शिकवण्याच्या तयारीत आहेत. तसंच राज ठाकरे हे सध्या शांत आहेत. ही मराठीच्या नावावर काही महिन्यांपूर्वी घडलेल्या "तोडफोडी'सारख्या वादळापूर्वीची शांतता म्हणायची की, राज यांचे काही वेगळेच मनसुबे आहेत, हे कळायला मार्ग नाही. पण काहीही आणि कितीही झालं तरी "मनसे'ला भवितव्य आहे, यावर विश्‍वास बसत नाही. राज ठाकरे यांच्या लोकप्रियतेबद्दल शंका घेण्याची इच्छा नाही. खरं तर तो मुद्दाच नाही. राज यांचा करिष्मा बाळासाहेबांइतकाच आहे. ते बाळासाहेबांसारखेच फर्डे वक्ते आहे. त्यांची शैलीही बाळासाहेबांसारखीच आहे. शेवटी ते ठाकरेच. त्यामुळे ते लोकप्रिय असणारच.

पण त्या जोरावर "मनसे' वाढेल आणि शिवसेना संपेल किंवा "मनसे'च्या मतं खाण्याचा शिवसेनेला कायमच फटका बसेल असं नाही. आणखी एक म्हणजे विधानसभेला "मनसे' लोकसभेइतकी मतं खाईल का, हा देखील कळीचा मुद्दा आहे. (घेईल का शब्द मुद्दामून वापरलेला नाही.) घोडा मैदान जवळच आहे. पाहू या काय होतं ते!!!!!

Thursday, July 02, 2009

लोभ असावा ही विनंती...


ओलांडला पंधरा हजारांचा टप्पा...

गेल्या तीन-चार वर्षांपासून मी हा ब्लॉग चालवितो आहे ब्लॉग जरी मी चालवित असलो तरी मला यामध्ये ओढण्याचं किंवा मला ब्लॉगचं व्यसन लावण्याचं काम केलंय ते देविदास देशपांडे यानं. दैनिक सकाळच्या पुणे आवृत्तीमध्ये उपसंपादक म्हणून काम करत असताना त्यानं सर्वप्रथम ब्लॉग सुरु केला. त्यावेळी तो इंग्रजी, मराठी, फ्रेंच आणि न जाणो किती भाषेत ब्लॉग लिहायचा. तीन ते चार ब्लॉग तर त्यानं नक्कीच सुरु केले होते. त्याच्यापासून प्रेरणा घेऊनच किंवा त्यानं मदत केल्यामुळेच मी देखील ब्लॉग सुरु केला. मीच काय पण नंदकुमार वाघमारे, विश्वनाथ गरुड, नितीन ब्रह्मे, मुकुंद पोतदार, अभिजीत पेंढारकर आणि अशाच अनेक उपसंपादकांनी ब्लॉग सुरु केले. काहींचे ब्लॉग अजून सुरु आहेत. मी देखील त्यापैकीच एक.

गेल्या तीन वर्षांपासून कधी अधिक सातत्याने तर कधी कमी सातत्याने मी ब्लॉग लिहितो आहे. कधी खाद्यपदार्थांवर, कधी हॉटेल्सवर, कधी राजकारणावर, कधी क्रीडा घडामोडींवर किंवा कधी प्रवासावर. अगदी अलिकडे माझी आई गेल्यानंतरही मला ब्लॉगवर लिहिल्यामुळं खूप बरं वाटलं होत. एखादी घटना घडल्यानंतर प्रत्येकवेळी आपल्याला त्याबद्दल पेपरमध्ये लिहिता येतंच असं नाही. शिवाय आपण प्रत्येक गोष्टीतले एक्स्पर्ट नसतो. त्यामुळं आपल्या मताला पेपरमध्ये काय स्थान मिळणार. पण तरीही आपण आपलं मत रेटून मांडतो. कधी चहा पिताना, कधी मित्रांच्या घोळक्यात, तर कधी ऑफिसमध्ये बातम्यांवर चर्चा करताना. आता या पर्यायांमध्ये आणखी एकाची भर पडली आणि ती म्हणजे ब्लॉगची. मला जे हवं आणि जसं हवं तसं लिहिण्याची मोकळीक इथं मिळते. शिवाय उपसंपादकाची कात्री लागण्याची भीतीही नसते.

ब्लॉग लिहिताना आपला ब्लॉग किती दिवस चालेल, याबद्दल खरं सांगायचं तर शंकाच होती. शिवाय नव्याचे नऊ दिवस... या म्हणीप्रमाणे आपला ब्लॉग दोन-चार महिन्यांनी बंद तर पडणार नाही ना, हा विचारही मनात होता. पण येत्या सप्टेंबर महिन्यात ब्लॉगला तीन वर्षे पूर्ण होणार आहेत. पंधरा हजार व्हिजिटर्सचा टप्पाही पार झालाय. तसंच स्टार माझा या वृत्तवाहिनीनं घेतलेल्या स्पर्धेत माझ्या ब्लॉगला उत्तेजनार्थ पारितोषिकही मिळालं होतं. माझ्याप्रमाणेच अभिजीत पेंढारकरही त्याचा मानकरी ठरला होता. पारितोषिक हा काही ब्लॉगच्या लोकप्रियतेचा मापदंड नाही. पण ते मिळाल्यामुळं कदाचित मी अधिक हुरुपानं लिहू लागलो असेलही.

यापुढंही अधिक उत्साहानं, हिरीरीनं आणि अभ्यासपूर्ण पद्धतीनं ब्लॉग लिहिण्याचा माझा प्रयत्न सुरुच राहिल. तुम्हाला जर माझे लेख आवडत असतील तर शेजारच्या फॉलोअर्स या लिंकवर क्लिक करुन माझ्या ब्लॉगचे फॉलोअर्स बना. तसंच लेख आवडला असेल किंवा नसेल अथवा काही सूचना असतील तर कॉमेंटस हा ऑप्शन आहेच. कारण मला जसं माझं मत आहे. तसंच इतरांनाही मत आहे. त्यानं ते आपल्या ब्लॉगवर मांडलं तर ते हटविण्याचा अधिकार मला आहे. पण मी तो आतापर्यंत वापरलेला नाही. यापुढेही येऊ नये, हीच अपेक्षा आहे. (कॉमेंटवरुन आठवलं माझ्या ब्लॉगवर आलेल्या लेखाविरोधातल्या किंवा लेख न आवडल्याच्या कॉमेंटस देखील मी आहे तशाच ठेवल्या आहेत. हटविलेल्या नाहीत. राज ठाकरे यांच्या लेखावरची एका बिहारी माणसाची जळजळीत प्रतिक्रियाही अगदी आहे तशीच छापली आहे.)

तेव्हा फ्रेंडस माझा ब्लॉग वाचाच पण तुम्हीही लवकर ब्लॉगर व्हा...
अगदी मनापासून धन्यवाद.

Wednesday, June 17, 2009

आई...

"ती' माझ्या रक्तातच आहे...

आठ मे 2009. "मदर्स डे'च्या बरोब्बर दोन दिवस आधी. माझ्या आईचं निधन झालं. गेल्या अनेक वर्षांपासून ती आजारी होती. पण तरीही तिची जगण्यासाठीची झुंज सुरु होती. पण आठ वर्षानंतर तिनं दम तोडला. गेल्या अनेक दिवसांपास्नं आईवर लिहायचं होतं. वास्तविक पाहता आईवर लिहायचं तर पुस्तकही लिहिता येईल. पण मी माझ्या आईवर लिहिलेलं वाचणार कोण? त्यामुळं माझ्या ब्लॉगवर लिहायला काय हरकत आहे. प्रयत्न करुनही कमी शब्दात लेख आटोपणं शक्‍य झालेलं नाही. काहीसा "स्वान्त सुखाय" लिहिलेला हा लेख इथं देत आहे...

मध्यंतरी कोटेशन्सचं एक पुस्तक वाचत होतो. त्यात आईबद्दल एक सुंदर विचार लिहिला होता. "गॉड कॅनॉट बी एव्हरीवेअर. सो ही क्रिएटेड मदर्स...' हे झालं इंग्रजीचं. आईचं वर्णन करण्यासाठी यापेक्षा अधिक सुंदर वाक्‍य कोणते असू शकेल? मराठीतही अशाच पद्धतीनं आईची महती गायली गेलीय. मराठीतही एक गाणं आहे, "आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही, म्हणून "श्री"च्या राजानंतर शिक रे अ आ ई...' कोणी म्हणतं आई म्हणजे जिच्या आत्म्यात ईश्‍वराचा वास असतो, ती व्यक्ती म्हणजे आई.

अर्थात, जोपर्यंत आई होती तोपर्यंत मला या गोष्टींचं फारसं अप्रूप वाटलं नव्हतं. पण आठ मे ला आई गेली आणि राहून राहून हे विचार माझ्यासमोर तरळत होते. माझी आई नेहमी म्हणायची की, "जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुला माझी किंमत कधीच कळणार नाही. पण मी गेल्यावर माझं महत्व तुला नक्की समजेल.' आज माझी आई माझ्याबरोबर नाही. आठवणींनी आणि तिच्या विचारांनी ती जरी कायम माझ्याबरोबर असली तरी आई आता पुन्हा मला कधीच भेटणार नाही. पण मला आईची किंमत पुरती कळून चुकलीय. ती अमूल्य आहे. आई असतानाही हे माहिती होतंच. पण आज ती जवळ नाही. त्यामुळं तिचीं उणीव अधिकच जाणवतेय.

आई नावाचं विद्यापीठ...

आई म्हणजे एक चालतं बोलतं विद्यापीठ होतं. तिनं आमच्यावर मारुन मुटकून कधीच संस्कार केले नाहीत. शिस्त लावली नाही. पण तिचं वागणं बोलणंच असं होतं की हळूहळू आम्हीही तिचं अनुकरण करु लागलो. तिचा माझ्यावर इतका प्रभाव होता की, आज माझ्यामध्ये असलेल्या बऱ्याच चांगल्या सवयी या फक्त तिच्यामुळेच आहेत, असं मी म्हणेनं. (अर्थात, मला नीट ओळखणाऱ्यांना माझ्यातले वाईट गुण चांगले माहिती आहेत. त्याचा आणि माझ्या आईचा काहीही संबंध नाही, हे सांगायला नकोच.) अगदी माझ्या लहानपणापासून ते तिच्या अखेरच्या दिवसांपर्यंत. देवावर अगाध श्रद्धा, शिक्षणाचं महत्त्व, साधी राहणी, अत्यंत कष्टाळू आणि जिद्दी, तीक्ष्ण स्मरणशक्ती आणि माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यातली सर्वोत्तम "कुक', अशा अनेक गोष्टी तिचं वर्णन करताना लिहिता येतील.

शिक्षणाची गोडी...

लहानपणापासनं तिनं मला अभ्यासाची गोडी लावली. ती फार शिकलेली होती असं नाही. इंटरनंतर एखाद दुसरं वर्ष तिनं केलं असेल. पण तरीही तिला शिक्षणाचं महत्व पटलेलं होतं. "आपल्याकडे खूप पैसे नाहीत. बापजाद्यांची इस्टेट नाही. त्यामुळं चांगलं शिकलं तरच आपलं आयुष्य सुखात जाईल. तुला शिकायचं असेल तर वेळप्रसंगी मी माझे दागिने मोडेन पण तू खूप शिक,' हा संवाद तिच्या तोंडी कायम असायचा. सुरवातीला मला शिकण्याचा खूप कंटाळा होता. त्यामुळं माझं कसं होणार याची चिंता तिला कायम सतावत असायची. पण नंतर मात्र मला हळूहळू शिक्षणाचं महत्व पटू लागलं. आजच्या घडीला माझ्याकडे ज्या तीन-चार पदव्या आहेत, त्याचं श्रेयं आई-बाबांनाच जातं. आईचं हस्ताक्षर खूप सुंदर होतं. माझं अक्षर चांगलं असावं, यासाठी तिचा खूप आग्रह होता. या गोष्टीसाठी मी तिचा अनेकदा मार खाल्ल्याचं मला अजूनही आठवतंय.

हरामाचा पैसा नको...

पैसा आयुष्यात महत्वाचा आहे. पण पैसा म्हणजेच सर्वस्व नाही, हे मला तिच्याकडूनंच समजलं. वडील "महिंद्र ऍण्ड महिंद्र'मध्ये होते. पण पगार बेताचाच होता. पण अत्यंत परिस्थितीतही आईनं संसार अगदी नेटानं सुरु ठेवला. वडिलांच्या कंपनीमध्ये दोनवेळा "लॉक आऊट' जाहीर करण्यात आला होता. त्यामुळं तीन-चार महिने कंपनीतनं पगार येणार नव्हता. पण अशा परिस्थिततही पहिल्या वेळी शिवणकाम करुन आणि दुसऱ्या वेळी पाळणाघर सुरु करुन तिनं बाबांना आर्थिक हातभार लावला.
कुरियरसाठी लागणाऱ्या कापडी पिशव्या किंवा कव्हर्स ती शिवायची. एका कव्हरचे आकारानुसार चार आणे ते बारा आणे मिळायचे. दिवसभरात असे वीस-पंचवीस रुपये ती मिळवायची. पाळणाघर चालवायची तेव्हा तीन-चार मुलांचे पंधराशे ते दोन हजार रुपये दरमहिना ती कमवत असे. पण पैशाच्या चणचणीची धग आमच्यापर्यंत कधीच पोचली नाही. वास्तविक पाहता आईचे वडिल म्हणजे माझे दादा आजोबा सयाजीराव गायकवाड यांच्याकडे वरिष्ठ पदावर कार्यरत होते. त्यामुळं तिच्या घरात लक्ष्मी पाणी भरत होती, असं म्हटलं तरी चालेल. पण सासरी तशी परिस्थिती नव्हती. हल्ली ज्याला "ऍडजस्टमेंट' म्हणतात, ती आईंनं खूप केली. अर्थातच, कोणतीही कुरबूर न करता.

तिचं आणखी एक म्हणणं असायचं. "हरामाचा पैसा अजिबात पचत नाही. त्यामुळं फुकटचा एक रुपयाही आपल्याला नको.' एखाद्या दुकानदारानं गडबडीत जर सुटे परत देताना पैसे जास्त दिले तर प्रामाणिकपणे ती पैसे परत करायची. पाचवी-सहावीत असताना आम्ही एकदा आमच्या इथल्या काका हलवाईकडे गेलो होतो. आम्ही पाचशे रुपये दिले आहेत असं समजून त्यानं सुटे पैसे परत केले. आईनं मात्र, शंभर रुपयेच दिले होते. त्यामुळं तिनं उरलेले पैसे परत केले. दुकानदारालाही आईचं आश्‍चर्य वाटलं. पण आईचं उत्तर ठरलेलं होतं. हरामाचा पैसा पचत नाही. अशा छोट्या मोठ्या प्रसंगांमधून माझ्यावर झालेले संस्कार आयुष्यभरासाठी पुरणारे आहेत. कोणाचा एक रुपया तिनं घेतला नाही की बुडवला नाही.

"आपल्याला राजाचा राजवाडा नको. आपण खाऊन पिऊन सुखी आहोत आणि तेच बरं आहे.' सगळ्यांना येतात तशा अनेक अडचणी आल्या, अनेक संकटं आली. त्यातली काही आर्थिकही होती. पण दोनवेळच्या जेवणाची ददात आम्हाला कधीच जाणवली नाही. तसंच आईचं आदरातिथ्य इतकं होतं की, आमच्याकडे आलेला कोणीच न खाता-पिता गेला नाही. इतकंच काय तर अनेक छोटे प्राणी-पक्षीही आमच्याकडे रोज मेजवानी झोडायचे. रोज भाताच्या कुकरचं प्रेशर पडल्यानंतर सर्वात पहिल्यांदा ती कावळे आणि चिमण्यांना तो भात वाढायची. कावळे-चिमण्या देखील स्वयंपाकघराच्या खिडकीवर बसून त्याची वाट पाहायचे. हल्ली हल्ली तर कबुतरं, साळुंकी आणि छोटीशी खारुताई देखील नित्यनियमाने येतात. आई धार्मिक होती. प्रथा, परंपरा आणि रुढी पाळण्याची तिला जबर हौस. पण स्वयंपाक झाल्यानंतर नेवैद्य दाखवण्यापूर्वी ती पक्ष्यांसाठी भात वाढायची. तिची एकूणच धार्मिक वृत्ती पाहता हे मात्र, थोडंसं अजब होतं.

धार्मिक आणि देवभोळी

आई खूप धार्मिक आणि परंपरावादी होती. पण त्याचा जाच आम्हाला कधीच झाला नाही. उलट तिच्यामुळं अनेक स्तोत्र, मंत्र आणि आरत्या यांचं आमचं पाठांतर झालं. जोपर्यंत आई धडधाकट होती तोपर्यंत ती श्रावणी आणि कार्तिकी सोमवारचा उपास धरायची. सक्काळी सक्काळी नवी पेठेतल्या विठ्ठल मंदिरातल्या शंकराच्या पूजेला जायची. अनवाणी जायची. हरितालिकेचं आणि वटपौर्णिमेचं व्रत करायची, चैत्रगौर बसवायची, संक्रांत आणि चैत्राचं हळदी-कुंकू साजरी करायची. हल्ली क्वचितच ऐकू येणारं अविधवा नवमी तसंच धुरित्री पाडवा हे व्रतही तिनं शेवटच्या वर्षापर्यंत केलं.

गणपतीत मानाचे गणपती आणि नवरात्रीमध्ये महत्वाच्या देवींचं दर्शन अगदी रांगेत उभं राहून घेणं नित्याचंच! नवरात्रीत अष्टमीच्या दिवशी एखाद्या देवीची साडी-चोळीनं ओटी भरणं आलंच. गणपती विसर्जन मिरवणुकीत मानाच्या पहिल्या पाच आणि रात्री दगडूशेठ-मंडईच्या गणपतींचं दर्शन कधीच चुकलं नाही. चालती फिरती असताना प्रत्यक्ष आणि अर्धांगवायू झाल्यानंतर तिनं अगदी गेल्या वर्षीपर्यंत टीव्हीवर बाप्पांचं दर्शन घेतलं. अष्टविनायक, बारा ज्योतिर्लिंग, महाराष्ट्रातली देवीची साडेतीन पिठं, पंढरपूर, वाडी, अक्कलकोट, गाणगापूर आणि इतर बऱ्याच ठिकाणी तिनं धार्मिक पर्यटन केलं. इतकं करुनही काही वेळा अपयश आलंच तरी त्याचं खापर तिनं कधीच देवावर फोडलं नाही. कितीही बिकट परिस्थिती आली तरी तिचा देवावरचा विश्‍वास तसूभरही ढळला नाही. तितक्‍याच मनोभावे ती देवाची पूजा करतच राहिली.

द बेस्ट "कुक'

आईचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिचं सुगरण असणं. गोडाचा शिरा, आळूची भाजी, पोहे, छोट्या आणि बरोब्बर गोल पोळ्या, पुरणाची दिंडं, सांबार, पावभाजी, रव्या बेसनाचे लाडू, ओल्या नारळ्याच्या वड्या आणि करंज्या, ताक घालून पालकाची भाजी, थालिपीठ आणि असे असंख्य पदार्थ खावे तर फक्त तिच्या हातचे. आईच्या हाताला अशी काही चव होती की, विचारता सोय नाही. लहानपणापासून मी तिच्या हातचं खात असल्यामुळं मला असं वाटत असेलही कदाचित. पण काही पदार्थ करावे तर तिनंच.

नागपंचमीला पुरणाची दिंडं, दिव्याच्या अमावास्येला गोड दिवे, कोजागिरीला मसाला दूध, दिवाळीत ओल्या नारळाच्या करंज्या, पहिला पाऊस पडला की कांदा भजी याची इतकी सवय झाली होती की बस्स! दणगेलं, गवार ढोकळी, डाळ ढोकळी, सुरळीच्या वड्या, ढोकळा आणि पराठे हे खास गुजराती पदार्थही ती उत्तम करायची. तिचा जन्म आणि जवळपास निम्मं आयुष्य बडोद्यात गेलं होतं. त्यामुळं ओघानं हे आलंच. अर्थात, अर्धांगवायू झालापास्नं हे सारंच संपलं. ती एक नंबरची सुगरण होती. त्यामुळंच कदाचित मला चविष्ट आणि निरनिराळे पदार्थ खाण्याचं व्यसन लागलं असावं. माझी आई पण माझ्यासारखीच चवीनं खाणारी होती. पण साधं अंडही तिनं कधी खाल्लं नाही. आम्ही जर घरी ऑम्लेट केलं तरी ती भांडी आम्हालाच घासावी लागायची. तिनं त्यालाही हात लावला नाही.

जीव भांड्यात...

आईला स्वतःला आवड होती ती वेगवेगळ्या प्रकारची भांडी जमवायची. एकवेळ ती नवी साडी घ्यायची नाही. एखादा दागिना कमी घेईल. पण बाजारातलं नवं भांडं ती जरुर घ्यायची. तांबं, पितळ, स्टील, ग्लास आणि अगदी ऍल्युमिनियमपासून बनवलेली भांडी तिनं जमवली. वेगवेगळ्या प्रकारची ताटं, डिशेस, वाट्या-भांडी, पराती, पातेली, ग्लासेस, डब्बे इथपासून ते अगदी छोटे-मोठे चमचे व लहान डब्यादेखील. आज जर आमच्या घरातली सगळी भांडी एकत्र केली तर कदाचित एखाद-दुसरी खोली सहज भरुन जाईल. आतापर्यंत आमच्या घरी जी काही कार्य झाली त्यावेळी आम्हाला कधीही बाहेरुन एक भांड भाड्यानं आणावं लागलं नाही.

तिचा जीव भांड्यांमध्ये रमत होता, असं म्हटलं तरी चालेल. पण नुसती भांडी जमवून ती थांबली नाही. दोन-तीन महिन्यांनी किंवा दिवाळीसारखं निमित्त साधून त्यातली बहुतांश भांडी ती स्वतः घासायची आणि पुसायची. हा नियम अगदी अपवादानंच मोडला गेला. एखादं भांडं पडलं किंवा नीट घासलं गेलं नाही तरी तिचा जीव वरखाली व्हायचा. भांडी ठेवायची तिची स्वतःची एक पद्धत होती. त्यामुळं लहानपणी चोरून काही खाल्लं तर ते तिला अगदी सहजपणे कळायचं. राहून राहून एक आश्‍चर्य वाटतं की, त्यावेळी बाबांचा पगार फारसा नसतानाही आईनं इतकी भांडी जमविलीच कशी?

आईनं काही वर्षे पाळणाघरही चालवलं. अर्थात, तेव्हा गरज म्हणून तिनं हा व्यवसाय सुरु केला. पण आवाक्‍यपेक्षा अधिक मुलं तिनं कधीच सांभाळली नाही. एकावेळी दोन किंवा तीन. त्यापैकी सौरभ कट्टी आणि मीरा देशपांडे हे दोघे तर आमच्याकडे तीन महिन्यांचे असल्यापासून होते. आईनं त्यांचा सांभाळ स्वतःच्या मुलांपेक्षा म्हणजेच आमच्यापेक्षा अधिक काळजीपूर्वक केला असावा. सकाळी आठ-नऊ वाजल्यापास्नं ते संध्याकाळी सात- आठ वाजेपर्यंत ते आमच्या घरीच असायचे. आईचा त्यांना इतका लळा लागला की, आमची आई हीच त्यांची खरी आई आहे, असं त्यांना वाटायचं. त्यामुळंच ते तिला मिनाक्षी आई म्हणायचे. मिनाक्षी आईनं त्या दोघा-तिघांचे केलेले लाड पाहिल्यानंतर खरं तर आम्हाला त्यांचा खूप हेवा वाटायचा. जस्ट जोकिंग. पण आईचा त्यांच्यावर खूप जीव होता. आम्हाला त्यांचा तीन-चार वर्षांपर्यंत हे दोघेही आमच्याकडे असायचे. नंतर दोघेही आमच्या घरापासून दूर गेले. पण आजपर्यंत त्यांचे आणि आमच्या घराचे बंध जुळलेले आहेत.

तल्लख बुद्धी...

तिची बुद्धी आणि स्मरणशक्ती अगदी तल्लख होती. आईचे भाऊ-बहिण, भाचे-पुतणे आणि इतर अनेकांचे वाढदिवस तिचे तोंडपाठ होते. प्रत्येकाच्या वाढदिवशी ती आवर्जून त्यांना फोन करायची. आणखी एक म्हणजे पेपरमध्ये वाचलेली प्रत्येक गोष्ट आणि बातमी तिच्या लक्षात असायची. पूर्वी कधीतरी महाराष्ट्र केसरी जिंकणारा सईद चाऊस असो किंवा आजचा सोन्याचा भाव काय आहे, या गोष्टी तिच्या अगदी तोंडपाठ असायच्या. अखेरच्या दिवसांमध्ये तिला टीव्ही पाहण्यासाठी बाहेरच्या खोलीत येणं जमत नसे. त्यावेळी टीव्हीवर ती तिच्या आवडीच्या मालिका फक्त ऐकायची. पण आवाजावरुन कोण कलाकार आता बोलतो आहे, हे तिला समजायचं. अखेरच्या दिवसांमध्ये शरीरानं तिला साथ दिली नसली तरी तिची बुद्धी मात्र कायमच तिच्या बाजूनं होती (शेवटचे सहा-सात दिवस सोडले तर) ही खूपच दिलासादायक गोष्ट होती.

आयुष्यभरात माझ्या आई-बाबांनी एकवेळ इस्टेट कमी कमाविली असेल. पण त्यांनी माणसं खूप जोडली. नातेवाईक असो, मित्र-मैत्रिणी असो किंवा शेजारीपाजारी. मदतीच्या प्रसंगी धावून जाणं हे दोघांच्याही रक्तात भिनलेलं. अर्धांगवायूचा झटका आल्यानंतरचं सात-आठ वर्षांचं आयुष्य तिनं अगदी हसत हसत काढलं. पथ्य पाळली. पण पथ्य पाळतानाच ती अगदी मनसोक्त जगली. ती आयुष्याला कंटाळलीय, असं कधीही वाटलं नाही. "तू देवाचं इतकं करतेस. तरी मग तुला इतका त्रास का होतोय. देव बिव काही नाही...' असं तिला चिडवण्यासाठी मी म्हणायचो. त्यावेळी ती सांगायची की, "देवाचं करते म्हणूनच इतका कमी त्रास होतोय. देवधर्म केला नसता तर आणखी झाला असता.' हे पॉझिटिव्ह थिंकिंग थक्क करणारं होतं, ते देखील सगळं शरीर थकलं असताना.

ग्रेट फादर!
दुसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अखेरच्या काही वर्षांत बाबांनी आईची केलेली सेवा. एखाद्या पुरुषानं आपल्या पत्नीची इतकी सेवा केल्याचं मी तरी पाहिलेलं नाही. असणार यात शंका नाही. मी तर असं म्हणेन की शेवटची काही वर्ष आई जगली ती बाबांमुळेच. सकाळी उठल्यावर तिचं तोंड धुणं, संडास आणि बाथरुमला नेणं, आंघोळ घालणं, औषधं-गोळ्या यांचे डोस सांभाळणं आणि बरच काही. ते देखील कोणतीही चिडचिड न करता. अखेरच्या दिवसांमध्ये तर एखाद्या नर्सला लाजवेल इतकी काळजी ते आईची घ्यायचे. "हॅट्‌स ऑफ टू माय फादर टू!'
"आई-वडिलांची सेवा कर. आयुष्यात तुला कोणतीच गोष्ट कमी पडणार नाही,' हे वाक्‍य देखील तिच्या तोंडी कायम असायचं. अर्थात, तिनं तिच्या आईची खूप सेवा केली होती, हे आम्हाला माहिती होतं. माझ्या आईची तिच्या आईवर खूप श्रद्धा होती. खूप जीव होता. त्यामुळंच कदाचित आमची आजी ज्या दिवशी गेली बरोब्बर त्याच दिवशी माझ्या आईचं देखील निधन झालं. आठ मे रोजी. इतरांसाठी हा निव्वळ योगायोग असेलही किमान मला तरी त्याकडे योगायोग म्हणून पाहता येणार नाही. कारण आठ मे पूर्वी चार-पाच दिवस आई बऱ्यापैकी सिरीयस होती. तिला शुद्ध नव्हती, असं म्हटलं तरी चालेल. सात मे रोजी पण ती जाते की राहते अशी परिस्थिती होती. पण अखेर तिनं सात तारीख मागे टाकली आणि आठ मे हाच तिच्या आयुष्यातला शेवटचा दिवस ठरला. "मदर्स डे'च्या बरोब्बर दोन दिवस आधी.

आज आईला जाऊन महिन्यापेक्षा अधिक कालावधी उलटून गेला. पण आई गेली यावर अजूनही विश्‍वास नाही. मला अजूनही असं वाटतं की, शुक्रवारी रात्री बेलापूरहून घरी गेल्यानंतर आई माझी वाटत पाहत असेल. आत गेल्यावर आई विचारेल, ""जेवलास का?, काय जेवलास?'' किंवा घरातून निघताना सांगेल, ""नीट जा आणि पोचल्यावर फोन कर. रोज वेळेवर जेवत जा आणि नीट काम कर.'' टीव्हीवर जर एखाद्या बातमीला माझा व्हॉईस ओव्हर असेल किंवा माझं नाव असेल तर फोन करुन मला सांगेल, ""आशिष, आम्ही ऐकली आज तुझी बातमी.'' किंवा विचारेल, ""अरे, आज तू ऑफिसला नाही गेलास का? तुझा आवाज नव्हता?'' पेपरमध्ये काम करत असेन तर विचारेल की, आज तुझी काही बातमी किंवा लेख आहे का?

आपल्या सर्वात जवळचं माणूस गेल्यानंतर त्याची उणीव आपल्याला किता भासू शकते, हे माझ्या कल्पनेच्याही पलिकडचे होते. पण गदिमांनी गीत रामायणामध्ये लिहिलेलं अगदी खरं आहे.

"दोन ओंडक्‍यांची होते सागरात भेट,
एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ'

आई गेली तेव्हा सध्या "एनडीटीव्ही'त काम करणाऱ्या प्रसाद काथे या एका जुन्या सहकाऱ्याचा एसएमएस आला, ""आई आपल्या रक्तातच असते.'' थोडक्‍यात म्हणजे आई कायम आपल्या बरोबर असते. कधीही परत न येण्यासाठी गेली असली तरी! ही गोष्टही तितकीच खरी आहे.

Sunday, June 14, 2009

माटुंग्याचे अयप्पन इडली सेंटर...

दक्षिणेतल्या पदार्थांची चविष्ट रेलचेल


माटुंगा... मुंबईच्या मध्यवर्ती भागात दादरला खेटून असलेला भाग. इथं दाक्षिण भारतीय नागरिकांचं प्राबल्य. गुजराती नागरिकही मोठ्या संख्येनं आहेत पण दाक्षिणात्य नागरिकांचं वर्चस्व अंमळ जास्तच. साहजिकंच दाक्षिणात्य नागरिकांच्या पसंतीचे पदार्थ इथं अधिक चांगले मिळतात. माटुंगा रेल्वे स्थानकातून दिसणारं रामा नायक यांचं उडुपी रेस्तरॉं प्रसिद्ध आहेच. अनेक इंग्रजी-मराठी वृत्तपत्रांमधून "रामा नायक'वर बक्कळ छापून आलंय. त्यामुळं त्यावर आणखी शब्द खर्च करण्याची माझी इच्छा नाही. मला लिहायचं आहे खवय्यांच्या एका वेगळ्याच अड्ड्यावर.

माटुंगा स्टेनशनच्या कल्याणच्या बाजूच्या सर्वाधिक शेवटच्या जिन्यावरुन बाहेर उतरायचं. आपण केरळ किंवा तमिळनाडूमध्ये आलो आहोत की काय, अशी शंका आपल्याला स्टेनशमधून बाहेर पडल्यानंतर लगेच येते. स्टेशन मागे टाकून आपण हायवेकडे जाऊ लागलो की आपल्याला दाक्षिणात्य वस्तूंच्या विक्रीचे स्टॉल्स लागतात. थोडं पुढे गेलं की, फुलांचे स्टॉल्स लागतात. ही मक्तेदारी आहे तमिळ आणि केरळी भाषकांकडे! पहिल्या गल्लीत डावीकडे वळलो की थोडसं पुढं जायचं. तिथं शंकराचार्यांचं किंवा तमिळ नागरिकांचं एक मंदिर आहे. देवळाच्या समोर जितकी गर्दी नसते तितकी गर्दी आपल्याला समोरच्या खाण्याच्या स्टॉलवर दिसेल. हेच ते अयप्पन इडली सेंटर, ज्याच्यावर मला भरभरुन लिहायचंय.

साधा डोश्‍यापासून सुरु होणारी डोश्‍यांची यादी साठ ते सत्तर वेगवेगळ्या कॉम्बिनेशन्सनंतर संपते. मग त्यात मसाला डोसा, कट डोसा, म्हैसूर मसाला, म्हैसूर कट अशी नेहमीची कॉम्बिनेशन्स आलीच. कांदा उत्तप्पाच्या जोडीला मसाला उत्तप्पा आहे. उडीद वडा, डाल वडा आणि इडलीच्या जोडीला कच्च्या केळ्यांपासून बनवलेली भजी आहेत. कांचीपुरम इडलीही आहे बहुतेक. पण तुम्ही म्हणाल मुंबईत अशी उपहारगृह पायलीला पन्नास मिळतील. रेल्वे स्टेशन्सच्या बाहेरही अनेक छोटे-मोठे विक्रेते झाडाच्या पानांवर इडली, साधा डोसा आणि मेदू वडा विकत असतात. त्यांची चवही चांगली असतेच. वाद नाही. ते स्वस्तही असतात. पण अयप्पनच्या पदार्थांची चवच न्यारी.

विशेषतः सांबार, खोबऱ्याची चटणी आणि टोमॅटो-लाल मिरची यांच्यापासून बनविलेली चटणी या गोष्टी पदार्थांच्या स्वादात शेकडो पट भर घालते. केळी भजी ही इथली खासियत म्हणावी लागेल. तंसच थोडासा सरसरीत म्हणजेच मऊसर उप्पीट दक्षिणेची आठवण नक्की करुन देते. तुम्ही अस्सल खवय्ये आणि थोडेसे निर्लज्ज असाल तर अगदी पुन्हा पुन्हा मागून या पदार्थांवर ताव माराल. फक्त एखादी प्लेट खाऊन तुमचं भागणार नाही. दुसऱ्या प्लेटची ऑर्डर तुम्हाला द्यावी लागेलच.

अयप्पन इडली सेंटरला भेट देणाऱ्यांमध्ये तमिळ किंवा केरळी मंडळी कमी आणि उर्वरित भारतातले खवय्येच जास्त, अशी परिस्थिती असते. गुजराती, मराठी आणि अगदी पंजाबी मंडळी सुद्धा इथं येऊन भरपेट ताव मारुन जातात. दक्षिण भारतातल्या काही तरुण मंडळींनी किंवा होतकरु लोकांनी एकत्र येऊन हे सेंटर चालविल्यासारखे वाटते. मराठी गृहिणी जसं एकत्र येऊन मराठी खाद्यपदार्थांचे स्टॉल्स चालवतात तसं. पण मराठी स्टॉल्सवर न आढळणाऱ्या दोन गोष्टी इथं अगदी सहजपणे जाणवतात. एक म्हणजे आपलेपणा आणि दुसरी गोष्ट म्हणजे ग्राहकावरचा विश्‍वास. "आधी पैसे द्या, मग पदार्थ घ्या' या अस्सल मराठमोळ्या धोरणाला बळी पडून मी ऑर्डर दिल्यानंतर लगेच शंभरची नोट काढली. तेव्हा कॅशियरनं नम्रपणे सांगितलं की, ""तुम्हाला पार्सल न्यायचं नाही ना? मग आधी खा आणि नंतर पैसे द्या...' तसंच तुमची ऑर्डर तुम्हाला मिळाली का किंवा आणखी काही पाहिजे का, या गोष्टींची विचारणा तिथली मंडळी अगदी आपुलकीनं करतात. (आपुलकी म्हटली की कपाळावरच्या आठ्या येत नाहीत, हे सांगायला नकोच) त्यामुळंच गर्भश्रीमंतापासून ते ओझी वाहणाऱ्या हमालापर्यंत आणि सत्तर वर्षांच्या आजीपासून ते बारा-चौदा वर्षांच्या शाळकरी मुलापर्यंत सर्व जण तुम्हाला इथं दिसतील.

बरं गर्दी वाढतेय म्हणून पदार्थांचे भाव मात्र फारसे वाढलेले दिसत नाहीत. दहा-बारा रुपयांना उप्पीट, केळी भजी तर अठरा-वीस रुपयांना मसाला आणि म्हैसूर डोसा. इतर पदार्थांचे दरही थोडेफार इकडे तिकडे. थोडक्‍यात म्हणजे काय तर स्वस्तात मस्त आणि चविष्ट पदार्थ खायचे असतील तर किमान एकदा का होईना माटुंगा (मध्य रेल्वेवरचं) परिसरातलं अयप्पन इडली सेंटर गाठलं पाहिजेच.

Wednesday, June 03, 2009

राजकारणातील तरुणाई वाढतेय...


घराणेशाहीच होतेय प्रबळ...

पंडित जवाहरलाल नेहरु यांचे पणतू, इंदिरा गांधी यांचे नातू, राजीव गांधी यांनी पुत्र श्री राहुल गांधी यांनी सक्रिय राजकारणात उडी घेतलीय आणि कॉंग्रेसला केंद्रात पुन्हा सत्ता मिळाल्यानंतर राहुल यांचं पक्षातलं वजन चांगलंच वाढलंय. त्यामुळं पुन्हा एकदा राजकारणात तरुणाई येतेय, शिकलेले लोक राजकारणात येताहेत अशी आवई उठविली जातेय. राजकारणातील तरुणाई कोण आहे ते पहा आणि तुम्हीच ठरवा हे खरं आहे का ते...

लोकसभेतील तरुणाई...
राहुल गांधी (सोनिया गांधी यांचे पुत्र), सुप्रिया सुळे (शरद पवार यांच्या कन्या), जितीन प्रसाद (कॉंग्रेस नेते जितेंद्र प्रसाद यांचे पुत्र), सचिन पायलट (दिवंगत कॉंग्रेस नेते राजेश पायलट यांचे पुत्र), ज्योतिरादित्य शिंदे (दिवंगत माधवराव शिंदे यांचे पुत्र), अगाथा संगमा (पूर्णो संगमा यांच्या कन्या), एम के अळगिरी (करुणानिधी यांचे पुत्र), दयानिधी मारन (करुणानिधी यांचे भाचे), डी. पुरंदरेश्‍वरी (तेलुगू देसमचे संस्थापक एन टी रामाराव यांच्या कन्या), डी. नेपोलियन (करुणानिधी यांचे नातेवाईक), भारतसिंह सोळंकी (गुजरात कॉंग्रेस नेते माधवसिंह सोळंकी यांचे पुत्र), तुषार चौधरी (गुजरात कॉंग्रेस नेते अमरसिंह चौधरी यांचे पुत्र), प्रतीक पाटील (वसंतदादा पाटील यांचे नातू), मिलींद देवरा (मुरली देवरा यांचे पुत्र), नितेश राणे (नारायण राणे यांचे पुत्र), समीर भुजबळ (छगन भुजबळ यांचे पुतणे), प्रिया दत्त (सुनील दत्त यांच्या कन्या), एच डी कुमारस्वामी (एच डी देवेगौडा यांचे पुत्र), प्रेणित कौर (पंजाब कॉंग्रेसचे नेते कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या पत्नी), अखिलेश यादव (मुलायमसिंह यांचे पुत्र), यशोधराराजे शिंदे (भाजप नेत्या विजयाराजे शिंदे यांच्या कन्या तर वसुंधराराजे यांच्या बहिण).

लोकसभेतल्या तरुण खासदारांची नावं पाहिली की ते कोणत्या ना कोणत्या राजकीय पुढाऱ्याचे नातेवाईक आहेत हे आपल्याला पटकन समजू शकेल. राजू शेट्टी यांच्यासारखे एक-एक रुपया वर्गणी काढून लोकांच्या पाठिंब्यावर निवडून आलेले आणि कोणत्याही घराण्याशी संबंध नसलेले खासदार अगदी थोडे असतील.

राज्याराज्यतील तरुणाई...
एम के स्टॅलिन (तमिळनाडूचे उपमुख्यमंत्री आणि करुणानिधी यांचे पुत्र), सुखबिरसिंह बादल (प्रकाशसिंह बादल यांचे पुत्र), ओमर अब्दुल्ला (फारुख अब्दुल्ला यांचे पुत्र), नवीन पटनाईक (बिजू पटनाईक यांचे पुत्र), उद्धव ठाकरे (बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र), अजित पवार (शरद पवार यांचे पुतणे), मंत्री राणा जगजितसिंह (पद्मसिंह पाटील यांचे पुत्र), मंत्री राजेश टोपे (अंकुशराव टोपे यांचे पुत्र), भाजपचे माजी आमदार समीर मेघे (दत्ता मेघे यांचे पुत्र), देवेंद्र फडणवीस (भाजपच्या शोभाताई फडणवीस यांचे पुतणे), कॉंग्रेसचे युवराज मालोजीराजे (माजी मंत्री दिग्विजय खानविलकर यांचे जावई), जयंत पाटील (राजारामबापू पाटील यांचे पुत्र), आमदार मदन भोसले (कॉंग्रेस नेते प्रतापसिंह भोसले यांचे पुत्र), आमदार संभाजी निलंगेकर (भाजपच्या माजी खासदार रुपा निलंगेकर यांचे पुत्र आणि माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर यांचे नातू), आमदार अजित गोगटे (भाजपचे माजी आमदार गोगटे यांचे पुतणे), आमदार विनय नातू (भाजपचे माजी आमदार श्रीधर नातू यांचे पुत्र), आमदार वर्षा गायकवाड (खासदार एकनाथ गायकवाड यांच्या कन्या), आमदार रणजित कांबळे (प्रभा राव यांचे भाचे किंवा पुतणे), राधाकृष्ण विखे-पाटील (बाळासाहेब विखे-पाटील यांचे पुत्र), पूनम महाजन (प्रमोद महाजन यांच्या कन्या), धनंजय मुंडे (गोपीनाथ मुंडे यांचे  पुतणे).

पटकन डोळ्यासमोर येतील अशी ही काही नावे. पण राजकारणात घराणेशाही काही नवी नाही. स्वतः निवृत्ती घेताना आपला मुलगा, आपली मुलगी, भाचा-पुतण्या, बायको, सून, मेव्हणा किंवा आणखी जवळच्या नातेवाईकाचीच त्या जागी वर्णी लावण्याची पद्धत कॉंग्रेसच्या दरबारी राजकारणात फारशी नवी नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेस हे कॉंग्रेसचेच अपत्य असल्याने ही कीड राष्ट्रवादी कॉंग्रेसला पण लागलेली आहे. भारतीय जनता पक्षही त्याच मार्गाने जाऊ लागला आहे. शिवसेनेतही बाळासाहेबांनी कार्याध्यक्षपद देताना राज ठाकरे यांना बाजूला सारुन आपले पुत्र उद्धव यांचीच निवड केली आहे.

एकूण परिस्थिती पाहिली की कोणताच पक्ष याला अपवाद ठरलेला नाही आणि यापुढे तर ठरण्याची शक्‍यताही नाही.अशा परिस्थितीत सर्वसामान्य माणूस, मध्यमवर्गीय माणूस, कोणत्याही राजकारण्याशी सूतरामही संबंध नसलेला युवक-युवती राजकारणत कधी येणार आणि त्यांना कशी संधी मिळणार हाच खरा प्रश्‍न आहे.

Friday, May 29, 2009

व्वा! व्वा!! अगाथा...


अप्रूप राष्ट्रभाषेतून शपथ घेतल्याचे...

पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या मंत्रीमंडळाचा पहिला विस्तार काही दिवसांपूर्वी पार पडला. तमिळनाडू, महाराष्ट्र आणि पश्‍चिम बंगाल या राज्यांना मिळालेलं महत्व आणि उत्तर प्रदेशातनं 21 खासदार निवडून येऊनही तिथला एकही कॅबिनेट मंत्री न करणं या गोष्टी चटकन डोळ्यात भरणाऱ्या होत्या. राहुल गांधी यांच्या जवळचे समजले जाणारे जितीन प्रसाद, सचिन पायलट, ज्योतिरादित्य शिंदे आणि प्रतीक पाटील यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालं याचंही काही जणांना अप्रूप वाटतंय. या सर्व गदारोळात मला मात्र, अधिक भावल्या त्या पूर्णो संगमा यांच्या कन्या अगाथा संगमा. वय वर्षे फक्त 28. मेघालयातल्या तुरा मतदारसंघातून त्या सलग दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. आपले वडील आणि दोन भाऊ यांच्याप्रमाणेच अगाथाही आता राजकारणात रमल्या आहेत, असं म्हणायला हरकत नाही.

मनमोहनसिंग मंत्रिमंडळातल्या किंवा आतापर्यंतच्या सर्वाधिक तरुण मंत्री ही अगाथा संगमा यांची आणखी एक ओळख. यापूर्वी कुमारी सैलजा या आतापर्यंतच्या सर्वाधिक तरुण मंत्री होत्या. नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात 1991-92 मध्ये त्यांचा पहिल्यांदा समावेश झाला होता. पण आता त्यांनी वयाची चाळिशी ओलांडली आहेत. आता हा विक्रम अगाथा संगमा यांच्या नावावर नोंदला गेलाय. पण पी. ए. संगमा यांची कन्या किंवा सर्वाधिक तरुण मंत्री यापेक्षा मला भावलेली गोष्ट म्हणजे हिंदी ही त्यांची मातृभाषा नसतानाही त्यांनी हिंदीतून घेतलेली शपथ. महाराष्ट्रातले प्रतिक पाटलांसारखे मंत्री कदाचित "इम्प्रेशन' मारण्यासाठी घाबरत घाबरत का होईना पण इंग्रजीतून शपथ घेतात. आणि दुसरीकडे मेघालयासारख्या ईशान्य भारतातल्या राज्यातून आलेली अगाथा संगमा हिंदीतून शपथ घेते, ही गोष्ट नक्कीच कौतुकास्पद आहे.

ईशान्येकडील राज्यांमध्ये (आसामवगळता) हिंदी भाषेला फारसे महत्व मिळत नाही. उलट हिंदी ही राष्ट्रभाषा असली तरी तिथल्या स्थानिक भाषांमधूनच सर्व व्यवहार चालतात. मेघालयमध्ये गारो, खासी आणि जयंतिया तीन जमाती प्रामुख्यानं अस्तित्वात आहेत. त्याशिवाय कोच, हाजॉंग, दिमासा, ह्मार, कुकी, लाखर, मिकीर, राभा आणि नेपाळी या छोट्या छोट्या जमातीही अस्तित्वात आहेत. त्यांची संस्कृती, राहणीमान आणि भाषा या विभिन्न आहेत. खासी आणि गारो याच इथल्या प्रमुख भाषा. इथं ख्रिश्‍चन धर्मियांची संख्या जवळपास 70 टक्के आहे. त्यामुळंच हिंदी ही भाषा मेघालयातल्या कोणालाही जवळची नाही. अशा परिस्थितीत अगाथा यांनी हिंदीतून शपथ घेणं हे नक्कीच अनुकरणीय आहे.

दोन वर्षांपूर्वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं गुवाहाटी इथं गेलो होतो. स्पर्धा संपल्यानंतर आम्ही मेघालयाची राजधानी शिलॉंग इथं गेलो होतो. त्यावेळी मेघालयाच्या संस्कृतीची पुसटशी का होईना पण जवळून ओळख झाली होती. आपण मुंबईतल्या फोर्ट भागात, किंवा पुण्यातल्या कॅम्प भागात किंवा पणजीतल्या एखाद्या भागात आलो आहोत की काय असं वाटावं, अशी परिस्थिती. जीन्स, टी-शर्ट, स्कर्ट-टॉप्स घातलेल्या तरुणी, शॉपिंगसाठी मोठी बाजारपेठ आणि थंडगार हवामान... कोणालाही आवडेल, असं हिल स्टेशन.

अशा या मेघालयाला त्यांची कोणतीही एक अशी राज्यभाषा नव्हती. खासी ही तिथली प्रमुख भाषा असली तरी ती बोली भाषा होती. तिची लिपी नव्हती. पण मेघालयची स्थापना झाल्यानंतर राज्यभाषा कोणती हा प्रश्‍न पडला आणि मग खासी भाषेची लिपी निश्‍चित करण्यात आली. हिंदी ही राष्ट्रभाषा असली तरी देवनागरी लिपी खासी भाषेसाठी निवडण्यात आली नाही. तर रोमन लिपीचा वापर खासी भाषा लिहिण्यासाठी करण्याचे निश्‍चित झाले. म्हणजेच सोनिया गांधी हिंदीतून भाषण करताना जसे इंग्रजीत भाषण लिहून हिंदीत वाचतात तसे. हिंदीची अशी शोचनीय परिस्थिती असताना संगमा यांनी अडखळत का होईना हिंदीतूनच शपथ घेतली, ही गोष्ट मनाला खूपच स्पर्शून गेलीय.

तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश किंवा कर्नाटकातले मंत्री इंग्रजीतूनच शपथ घेतात. दाक्षिणात्य मंत्र्यांचे (आणि नागरिकांचेही) हिंदी प्रेम आपल्या सर्वांना माहिती आहेच. त्यांना हिंदीची ऍलर्जीच नाही तर हिंदीची लाज वाटते की काय अशी शंका येण्यासारखी परिस्थिती आहे. बी. के. हॅंडिक किंवा पाला यांच्यासारखे ईशान्य भारतातले मंत्रीही त्यांचाच कित्ता गिरवतात. त्यामुळंच आपले वडिल पूर्णो संगमा यांच्याप्रमाणेच हिंदीलाच प्राधान्य देणाऱ्या अगाथा यांना सोनिया गांधी यांनीही जोरात टाळ्या वाजवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अंतःकरण किंवा विषय असे आपल्याला सोपे वाटणारे शब्द उच्चारताना त्या बराच वेळ अडखळल्या. पण तरीही न डगमगता त्यांनी हिंदी सुरुच ठेवले. त्यामुळेच सदनामध्ये उपस्थित असलेल्या प्रत्येकामध्ये अगाथा यांच्या हिंदीतून शपथ घेण्याचीच चर्चा होती.

काश्‍मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या भारतात भाषा वैविध्य आहे. प्रत्येक राज्याची संस्कृती, पेहराव, खाद्यसंस्कृती, हवामान, उत्सव आणि भाषा या गोष्टी निरनिराळ्या आहेत. पण तरीही भारताला जोडणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्यामध्ये हिंदी या भाषेचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. राज ठाकरे यांच्या पुराव्यानुसार हिंदी ही फक्त एका मताने राष्ट्रभाषा झाली असली तरी "जो जिता वोही सिकंदर' या न्यायाने तिला राष्ट्रभाषा मानावीच लागेल. हिंदी ही खऱ्या अर्थाने राष्ट्रभाषा होईल की नाही, हे कोणीच सांगू शकत नाही. पण अगाथा संगमा यांच्यासारख्या अनुभवांमुळे ही थोडासा दिलासा मिळतो इतकंच!

Sunday, May 24, 2009

मनसेने मुंबईतला अंदाज चुकविला...

महाराष्ट्रातही वातावरण फिरले...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मुंबईत प्रभाव पडेल पण तो शिवसेना-भाजपच्या उमेदवारांना पाडण्याइतका असेल याचा अंदाज नव्हता. त्यामुळेच मुंबईतला आणि पर्यायाने महाराष्ट्राचा अंदाज चुकला. मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक इथं मनसेनं युतीला दणका दिला नसता तर कदाचित मी वर्तवलेलं भाकित खरं ठरु शकलं असतं. पण राजकारणात जर-तर याला स्थान नाही. जे झालं ते मान्य केलंच पाहिजे. त्यामुळंच आपले अंदाज चुकले हे मान्य करायला मला अजिबात संकोच वाटत नाही.
धन्यवाद...

Thursday, April 30, 2009

राज्यात युतीचेच पारडे जड...


महाराष्ट्रात तरी नाकर्ते हटणार...

"मी महाराष्ट्र बोलतोय...'च्या निमित्तानं राज्याच्या विविध भागांत फिरण्याची संधी मिळाली. राज्यातल्या जवळपास 80 टक्के मतदारसंघांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये "मी महाराष्ट्र बोलतोय...'ची टीम फिरली. नागरिकांची मतं, त्यांच्या अपेक्षा आणि त्यांचा कौल जाणून घेतला. अनेक ठिकाणी मतदारांनी राजकीय नेत्यांवर कडक शब्दांमध्ये टीका केली. तर काही ठिकाणी नागरिकांनी राजकारण्यांवर बोलणं देखील टाळलं. नागरिकांशी बोलल्यानंतर आणि मतदारसंघांमध्ये फिरल्यानंतर साधारणपणे तिथला निकाल काय असेल किंवा राज्यातलं एकूण चित्र कसं असेल, याचा अंदाज येतो. तेच चित्र इथं रेखाटण्याचा प्रयत्न मी करत आहे...

अटलबिहारी वाजपेयी सरकारला घरी बसायला लावणाऱ्या 2004 च्या निवडणुकीत महाराष्ट्रानं शिवसेना-भाजप युतीला निसटती आघाडी दिली होती. त्यावेळी अनेक ठिकाणी अनपेक्षित निकाल लागले होते. बहुजन समाज पक्षाच्या उमेदवारांमुळे विदर्भात काही ठिकाणी युतीला फायदा झाला होता. वर्धा, चिमूर आणि भंडारासारख्या जागा युतीच्या पारड्यात पडल्या होत्या. तर लातूर आणि नांदेडमध्येही भगवा फडकला होता. मुंबईतल्या मतदारांनी अनपेक्षितपणे युतीला झिडकारलं होतं. मनोहर जोशी सरांसारखा नेता दादरचा समावेश असलेल्या मतदारसंघात पराभव झाला होता. त्यावेळी राज्यात कॉंग्रेस आणि भारतीय जनता पक्षाला प्रत्येकी 13 जागा मिळाल्या होत्या. तर शिवसेनेला 12 आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला नऊ जागांवर समाधान मानावं लागलं होतं. तर पंढरपूरमधल्या जागेवर रामदास आठवले हे रिपब्लिकन पक्षाच्या तिकिटावर निवडून आले होते. म्हणजेच शिवसेना-भाजप युतीला 25 तर कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला 23 जागा मिळाल्या होत्या.

यंदाची परिस्थिती मात्र वेगळी होती. कारण मतदारसंघांचं चित्र बदललं आहे. त्यामुळं नव्यानं अस्तित्वात आलेल्या मतदारसंघांमध्ये कोणाचं भाग्य फळफळणार आणि कोणाला गाशा गुंडाळावा लागणार, याचा काहीच अंदाज येत नव्हता. काही मतदारसंघ गायब झाले होते. काहींचा भूगोल बदलला होता. त्यामुळं नागरिकांमध्ये, राजकारणात रुची बाळगणाऱ्यांमध्ये उत्सुकता होती. अजूनही आहे. त्याचप्रमाणे गेल्या चार साडेचार वर्षांमध्ये राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचं सरकार आहे. तर केंद्रात संयुक्त पुरोगामी आघाडीचं सरकार आहे. दोन्ही ठिकाणी एकाच आघाडीचं सरकार असल्यामुळं राज्य आणि केंद्रातल्या सरकारांनी राबविलेल्या योजना, त्यांची कार्य या गोष्टींचा विचार मतदानावर निश्‍चितपणे होणार आहे. दोन्ही सरकारांची कामगिरी मतदारांवर निश्‍चित प्रभाव टाकणारी आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतकऱ्यांना मिळालेली कर्जमाफी, शेतकऱ्यांचे सातबारे कोरे करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेनं उभारलेलं आंदोलन, मनसेचा मराठीसाठीचा लढा, मुंबईवर झालेला अतिरेकी हल्ला, वाढती महागाई आणि राज्यात सर्वत्र असलेली वीज-पाणी-सिंचन तसंच बेरोजगारीची समस्या अशा अनेक गोष्टी मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या ठरतील, असं प्रथम दर्शनी दिसतंय. तसंच अनेक ठिकाणी स्थानिक मुद्देही प्रभावी ठरत आहेत.

विदर्भात युतीचा बोलबाला...
विदर्भाचा विचार करता गेल्या निवडणुकीच्या आकड्यांमध्ये फारसा फरक पडेल, असं वाटत नाही. काही जागांची अदलाबदल होईल पण आकडा मात्र, कायम राहण्याची चिन्हे आहेत. नागपूरमध्ये विलास मुत्तेमवार यांना पराभूत करुन बनवारीलाल पुरोहित निवडून येतील, असं स्पष्टपणे जाणवतंय. तिथं अनिस अहमद, सतीश चतुर्वेदी आणि नितीन राऊत यांनी मुत्तेमवार यांना पूर्णपणे असहकार्य केलंय. त्याचा फटका कॉंग्रेसला बसण्याची शक्‍यता आहे. रामटेक हा शिवसेनेचा बालेकिल्ला. गेल्या तीन निवडणुकांपासून इथून शिवसेनेचा उमेदवार विजयी होतोय. त्यामुळं यंदा कृपाल तुमाने यांच्यासारखा कार्यकर्ता विजयी झाल्यास आश्चर्य वाटू नये. काँग्रेसनं इथून मुकुल वासनिक यांना उमेदवारी दिलीय. पण सुलेखा कुंभारे यांच्या उमेदवारीमुळं वासनिक यांची मतं फुटतील. त्याचा फायदा तुमाने यांना होईल.
वर्ध्यातनं दत्ता मेघे यांना चांगली संधी आहे. सुरेश वाघमारे यांना भाजपच्या मतविभागणीचा फटका बसण्याची शक्‍यता आहे. अर्थात, वर्ध्यात प्रभा राव यांच्या समर्थकांनी दत्ता मेघेंना सहकार्य केलं तरच हा बदल घडू शकतो. भंडाऱ्यात नाना पटोले यांच्या बंडखोरीचा फायदा भाजपच्या शिशुपाल पटले यांना होणार असं दिसतंय. तर गडचिरोली-चिमूरमध्ये बसपच्या महाराजांची उमेदवारी भाजपच्या अशोक नेते यांच्यासाठी फायदेशीर ठरु शकते.

शिवसेनेचे आनंदराव अडसूळ अमरावतीची जागा राखतील, हे नक्की आहे. तर अडसूळ यांच्या पूर्वीच्या बुलडाणा मतदारसंघात राष्ट्रवादीचे डॉ. राजेंद्र शिंगणे आणि शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांच्यातली टक्कर काट्याची असेल. पण शिंगणे यांचं पारडं इथं जड वाटतंय. बाकी चंद्रपूरमध्ये हंसराज अहिर, यवतमाळ-वाशिममध्ये शिवसेनेच्या धडाडीच्या खासदार भावना गवळी, अकोल्यात विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचे विजय जवळपास निश्‍चित आहेत. नरेश पुगलिया यांच्याविरुद्धची नाराजी आणि जोरदार लोकसंपर्क अहिर यांच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. तर हरिभाऊ राठोड यांची बंडखोरी आणि कॉंग्रेसच्या उत्तमराव राठोड यांची नाराजी गवळी यांच्यासाठी पूरक आहे. तिकडे बाळासाहेब आंबेडकर आणि बाबासाहेब धाबेकर यांच्यातल्या मतविभागणीचा फायदा धोत्रे यांनी होईल. एकूणातच विदर्भातल्या तेरापैकी 11 ते 12 जागा युतीच्या नावावर निश्‍चितपणे नोंदल्या जातील.

मराठवाड्यातही युतीच!
मराठवाड्यातल्या आठ मतदारसंघांमध्येही युतीचेच पारडे जड दिसते आहे. हिंगोलीमध्ये धक्कादायक निकाल लागू शकतो. तिथं शिवसेनेच्या सुभाष वानखेडे यांच्या उमेदवारीमुळं राष्ट्रवादीच्या केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांना पराभवाची चव चाखावी लागण्याची शक्‍यता आहे. वानखेडे यांची स्वच्छ प्रतिमा, अफाट जनसंपर्क आणि त्यांनी आमदार म्हणून केलेली कामं वानखेडे यांच्या जमेच्या बाजू आहेत. तर राज्य आणि केंद्र सरकारच्या अपयशी कामगिरीचा फटका सूर्यकांता पाटील यांना बसण्याची शक्‍यता आहे. उद्धव ठाकरे यांच्या सभेला सव्वा ते दीड लाख नागरिकांनी लावलेली हजेरी हिंगोली मतदारसंघाच्या निकालाबाबत पुरेशी बोलकी आहे.

हिंगोलीला खेटून असलेल्या परभणीत पुन्हा एकदा भगवा फडकणार हे निश्‍चित आहे. इथं शिवसेनेनं गणेश दुधगांवकर यांना उमेदवारी दिलीय. खासदार तुकाराम रेंगे-पाटील यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिल्यामुळं हा मतदारसंघ चर्चेत आला. निवडून आलेल्या खासदारानं शिवसेनेला "जय महाराष्ट्र' करणं इथल्या मतरादांना नवीन नाही. अशोक देशमुख, सुरेश जाधव आणि आता रेंगे-पाटील. पण या सर्वांना पक्ष सोडल्यानंतरही पुन्हा शिवसेनेचाच उमेदवार इथं निवडून आला. हा मतदारसंघ शिवसेनेचा अभेद्य बालेकिल्ला आहे. त्यामुळं शिवसेनेनं इथं दगड जरी उभा केला तरी तो निवडून येईल, असं म्हणतात. यंदाची निवडणूकही त्याला अपवाद असणार नाही.

मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात नांदेड जिल्हा बॅंकेचे बुडीत प्रकरण, गुरु-ता-गद्दीसाठी पैसा येऊनही त्याचे नियोजन न झाल्यामुळं लोकांचा रोष व भास्करराव खतगांवकर यांच्याबद्दलची नाराजी कॉंग्रेसचे उमेदवार खतगांवकर यांच्यासाठी डोकेदुखी ठरणार आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मेव्हण्याच्या विजयासाठी विशेष मेहनत घेतलीय. पण तरीही खतगांवकर यांच्या वाट्याला पुन्हा पराभव येतो की काय, अशी शंका उपस्थिती केली जातेय. तिकडे भाजपनं संभाजी पवार यांना उमेदवारी दिलीय. त्यांचा विजय झाला तर तो कॉंग्रेस आणि कॉंग्रेस उमेदवाराबद्दलच्या नाराजीमुळं असेल हे निश्‍चित.
लातूरमध्ये भाजपच्या गायकवाड यांचा विजय निश्‍चित आहे. तिथं जयवंतराव आवळे हे बाहेरचे उमेदवार आहे. त्यात ते धर्मानं ख्रिश्‍चन आहेत. दुसरीकडे भाजपचे गायकवाड हे स्थानिक उमेदवार आहेत. या मतदारसंघात लिंगायत नागरिक बहुसंख्येनं आहेत. हा समाज कट्टर हिंदू म्हणून ओळखला जातो. या गोष्टी निकालासाठी निर्णायक ठरण्याची शक्‍यता आहे. तिकडे उस्मानाबादमध्ये शिवसेनेचे प्रा. रवी गायकवाड आणि राष्ट्रवादीचे पद्मसिंह पाटील यांच्यात सरळ लढत आहे. इथली लढत काट्याची असून दोघांनाही विजयाची समान संधी आहे, असं बोललं जातंय. त्यामुळं "प्रेडिक्‍शन' करणं चुकीचं ठरेल.

युतीचा बोलबाला...
बीड, औरंगाबाद आणि जालना इथंही युतीचेच पारडे वरचढ आहे. बीडमध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे उभे आहेत. त्यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीनं नवोदित रमेश आडस्कर यांना रिंगणात उतरवलंय. मराठा-वंजारी अशी लढत करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीनं केला असला तरी मुंडे यांची आजवरची कारकिर्द आणि जयसिंग गायकवाड यांनी केलेला शिवसेनाप्रमुख या गोष्टी मुंडे यांच्यासाठी पूरक आहेत. मुंडे यांच्यासाठी हा खूप मोठा विजय असेल.

तिकडे औरंगाबादमध्ये शांतीगिरी महाराज उभे असले तरी औरंगाबाद हा सेनेचा आणखी एक गड आहे. तिथं खैरे यांचं बऱ्यापैकी काम आणि जनसंपर्क आहे. तसंच शांतीगिरी महाराज हे फक्त खैरे यांची मतं खातील, असं मानणं चूक आहे. शिवाय महाराज आणि बाबांना लोकप्रतिनिधीत्व करण्याची संधी देण्याची महाराष्ट्राची परंपरा नाही. त्यामुळं शांतीगिरी महाराज फारसे यशस्वी होतील, असं मला वाटत नाही. तेव्हा उत्तमसिंह पवार यांना विजयासाठी खूप झगडावं लागेल. जालन्यात विद्यमान खासदार भाजपचे रावसाहेब दानवे यांच्यापुढं औरंगाबादच्या कल्याण काळे यांचं आव्हान आहे. हा मतदारसंघ युतीचा अनेक वर्षांपासून बालेकिल्ला आहे. इथं बदल होण्याची शक्‍यता आहे आणि काळे यांचं कल्याण होणं अवघड दिसतंय.

उत्तर महाराष्ट्रात समसमान...
उत्तर महाराष्ट्रातलं प्रमुख शहर असलेल्या नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना घाम फुटलाय. त्यांनी नाशिकबाहेर पडून प्रचार केल्याचंही ऐकिवात नाही. इथं समीर भुजबळ यांच्याविरोधात मराठा समाज एकवटला असल्याचं दिसतंय. तसंच मराठा आरक्षणाला भुजबळ यांचा विरोध असल्यामुळं हा मुद्दा शिवसेनेच्या दत्ता गायकवाड यांच्यासाठी दिलासादायक ठरतोय. भुजबळ यांना मोठं होऊ न देण्यासाठी राष्ट्रवादीतलेच काही नेते कार्यरत असल्याची चर्चा ऐकायला मिळते आहे. पण तरीही भुजबळ यांनी त्यांच्या भुजातलं बळ एकवटल्यामुळं गायकवाड यांच्यासाठी ही लढत सोपी नाही.

तिकडे दिंडोरीत भाजपचे हरिश्‍चंद्र चव्हाण आणि राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळू यांच्यात "कॉंटे की टक्कर' आहे. पण राष्ट्रवादीचेच अर्जुन तुकाराम पवार हे पक्षनेतृत्वावर नाराज आहेत. त्यामुळं ते आतून चव्हाण यांना मदत करत असल्याची चर्चा कानावर येतेय. तसंच इथून माकपनं जिवा पांडू गावित यांना उभं केल्यानं धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी होणारेय. त्याचा फायदा चव्हाण यांना होईल. त्यामुळंच चव्हाण यांचं पारडं काकणभर का होईना पण सरस आहे.

जळगावात भाजपची बाजी...
जळगावातल्या दोन्ही जागा भाजपकडे जाणार हे निश्‍चित आहे. जळगाव शहरातून भाजपचे ए. टी. पाटील आणि राष्ट्रवादीचे वसंतराव मोरे यांच्यात लढत आहे. ए.टी. पाटील हे काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आले होते. त्यामुळं त्यांच्याविरुद्ध कार्यकर्त्यांमध्ये काहीशी नाराजी आहे. त्यांच्याऐवजी बी. एस. पाटील यांनी तिकिट मिळालं असतं तर ते सहज निवडून आले असते. पण नाथाभाऊ खडसे आणि सुरेशदादा जैन यांच्या ताकदीच्या जोरावर जळगावची जागा भाजप जिंकेल, असं दिसतंय. जळगाव जिल्ह्यातली रावेरची जागा भाजपसाठी सर्वाधिक सुरक्षित आहे. हा मतदारसंघ भाजपसाठी "बारामती' आहे. त्यामुळं इथून हरिभाऊ जावळे अगदी दोनशे टक्के निवडून येणार यात शंका नाही.

नंदूरबार आणि धुळे हे एकेकाळचे कॉंग्रेसचे बालेकिल्ले. पण या बालेकिल्ल्याचे बुरुज आता हळूहळू ढासळू लागले आहेत. धुळ्यात तर प्रतापदादा सोनावणे यांच्या विजयाची शक्‍यताही आहे. मालेगावचे दोन मतदारसंघ आणि सटाणा यांचा धुळे मतदारसंघात समावेश आहे. धुळ्यातले तीन आणि नाशिकमधले तीन मतदारसंघ यामध्ये येतात. निहाल अहमद यांच्या उमेदवारीमुळं कॉंग्रेसच्या अमरिश पटेल यांना फटका बसेल. या मतदारसंघात पटेल हे विकासाचा मुद्दा घेऊन उतरलेत. त्याचा त्यांना फायदा होईल. पण पटेल अमराठी आहेत, हा मुद्दाही इथं प्रभावी ठरतोय. त्यामुळं त्याचा फायदा अप्रत्यक्षपणे सोनावणे यांना होणरेय. त्यामुळं धुळ्यात यंदा परिवर्तन होण्याची शक्‍यता आहे.

नंदूरबारमध्येही माणिकराव गावित यांच्याविरोधात वातावरण आहे. तसंच राष्ट्रवादीचे नेते विजयकुमार गावित यांचे भाऊ शरद गावित यांनी उमेदवारी दाखल केल्यामुळं मतविभागणी होणारेय. त्याचा फायदा भाजपच्या डॉ. सुहास नटावदकर यांना होईल. पण आदिवासी मतांच्या जोरावर माणिकराव गावित बाजी मारतील, असं वाटतं. इथं परिवर्तन होण्याची शक्‍यता कमी आहे. पण झालंच तर आश्‍चर्य वाटायला नको.

पश्चिम मराहाष्ट्रात पवारांना धक्का?
शिर्डीमध्ये कॉंग्रेसच्या कोट्यातून जागा मिळवलेल्या रामदास आठवले यांना विजयासाठी झुंजावं लागतं की काय, अशी परिस्थिती आहे. बाळासाहेब विखे-पाटील यांनी वरुन आठवले यांचे काम करण्याचे आदेश दिले असले तरी आतून ते नक्की काय करणार हे कोणीच सांगू शकत नाही. दुसरीकडे प्रेमानंद रुपवते हे काही प्रमाणात कॉंग्रेसची मते खाणार हे देखील पक्कं आहे. दुसरीकडे भाऊसाहेब वाकचौरे हे स्थानिक आहेत आणि अनेक महिन्यांपासून त्यांनी तयारी सुरु केली आहे. त्यामुळं इथली लढत रंगतदार होईल. "ऍट्रॉसिटी'चा मुद्दा आणि दलित-सवर्ण अशा संघर्षाची पार्श्‍वभूमी लक्षात घेता आठवले यांना लढत अवघड आहे. पण आठवले यांची सीट पडली दलित समाजात वेगळा संदेश जाईल, म्हणून कॉंग्रेस-राष्ट्रवादीला जिवाचं रान करुन ही जागा जिंकून दाखवावीच लागेल. तिकडे नगरमध्ये दिलीप गांधी हे निवडून आल्यातच जमा आहेत. राजीव राजळे, तुकाराम गडाख आणि राष्ट्रवादीचे शिवाजी कर्डिले यांच्यात धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी होणार आणि गांधी सहज विजयी होणार, असं इथलं गणित आहे.

सुशीलकुमारांचे अवघड...
सोलापुरात भाजपचे शरद बनसोडे आणि कॉंग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांच्यात घमासान आहे. बनसोडे यांची खूप पूर्वीच जाहीर झालेली उमेदवारी, सुभाष देशमुख यांच्या कामाचा होणारा फायदा, मंगळवेढा मतदारसंघातल्या 22 गावांनी मतदानावर टाकलेला बहिष्कार आणि माकपच्या आडम मास्तरांनी "बसप'च्या उमेदवाराला जाहीर केलेला पाठिंबा या सर्व गोष्टी सुशीलकुमारांच्या छातीत धडकी भरवणाऱ्या आहेत. त्यामुळंच शरद बनसोडे यांनाही विजयाची संधी नक्की आहे. तिकडे माढ्यातनं शरद पवार येणार यात शंका नाही. पण त्यांचं मताधिक्‍य किती असेल हे औत्सुक्‍याचं असेल. प्रत्येक मतदारसंघातून एक लाख असे मिळून सहा लाखांनी पवारांना निवडून आणण्याचा चंग राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बांधला आहे. पण सुभाषबापूंच्या शिस्तबद्ध प्रचारामुळं तसंच सरकारविरोधातल्या नाराजीमुळं हे मताधिक्‍य दोन लाखांपर्यंत खाली आलं तर आश्‍चर्य वाटायला नको.

पुण्यातही बदल शक्य...
पुण्यात कॉंग्रेसच्या सुरेश कलमाडी यांना यंदा धक्का बसू शकतो. कॉंग्रेसचे पक्षांतर्गत विरोधक, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली असहकाराची भूमिका, भारतीय जनता पक्षाचे अनिल शिरोळे हे 96 कुळी मराठा उमेदवारी आणि कसबा पेठ, कोथरुड आणि शिवाजीनगर परिसरात मोठ्या प्रमाणावर झालेलं मतदान या गोष्टी कलमाडी यांच्यासाठी धोकादायक आहेत. अनेक ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपला मतदान केलेलं आहे. ज्यांना कमळावर मत टाकणं जमणार नाही, त्यांनी हत्ती चालवावा, अशी पक्षांतर्गत सूचना असल्याचं ऐकू येतंय. त्यामुळं कलमाडी यांना दिल्ली दूरच दिसतेय. इथं डीएसके, रणजित शिरोळे आणि अरुण भाटिया हे सर्व मिळून पन्नास-साठ हजारांच्या वर जात नाहीत, हे ही नक्की.

बारामतीत सुप्रियाताई सुळे येणार हे सांगायला राजकीय विश्‍लेषकाची गरज नाही. तर शिरुरमधून शिवाजीराव आढळराव-पाटील यांची सीट बसणार यातही दुमत असण्याचं कारण नाही. आढळराव यांचा जिवंत संपर्क त्यांच्यासाठी फायद्याचा आहे. तिकडे मावळमधून गजानन बाबर यांची खासदारकी निश्‍चित मानली जातेय. घाटाखाली शिवसेना आणि शेकाप यांची छुपी युती बाबर यांच्या विजयात महत्वाचा वाटा उचलेल. शिवाय राष्ट्रवादीच्या आझमभाई पानसरे यांच्या उमेदवारीमुळं मतदारसंघात हिंदू-मुस्लीम या आधारे मतविभागणी होण्याची शक्‍यताही नाकारता येत नाही. त्यामुळं बाबर यांच्या नावामागं खासदार हे पद लागणार अशी चिन्ह आहेत.

राजू शेट्टी यांना संधी...
सातारा आणि दक्षिण महाराष्ट्रातल्या तीन मतदारसंघातही गमतीदार लढती आहेत. साताऱ्यात उदयनराजे निवडून येणार असले तरी सातारा आणि कऱ्हाडमधल्या राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते आणि नागरिक यांनी महाराजांच्या विरोधात कौल दिलाय. त्यामुळं शिवसेनेच्या पुरुषोत्तम जाधव यांच्या मतांची संख्या वाढून महाराजांच्या मताधिक्‍या कदाचित कमी होईल. तिकडे सांगलीत कॉंग्रेसचे प्रतीक पाटील आणि कॉंग्रेस बंडखोर अजित घोरपडे यांच्यात सरळ लढत आहे. युतीनं इथं घोरपडेंना पाठिंबा जाहीर केलाय. राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही आतून घोरपडेंचं काम करत असल्याची चर्चा आहे. त्यामुळं कॉंग्रेसचा आणि वसंतदादा घराण्याचा हा बालेकिल्ला यंदा ढासळण्याची शक्‍यता निर्माण झालीय.

कोल्हापुरात संभाजीराजे निवडून येतील, असं वातावरण जरी असलं तरी सदाशिव मंडलिक यांनी शरद पवारांना घाम फोडला यात वाद नाही. शिवाय धनंजय महाडिक आतून मंडलिक यांचं काम करत असल्याचं बोललं जातंय. त्यामुळं संभाजीराजे आणि मंडलिक यांच्यात फार अंतर असणार नाही. हातकणंगलेमधून मात्र, राजू शेट्टी यांच्या विजयाची शक्‍यता आहे. नागरिकांनी एक-एक रुपया गोळा करुन शेट्टी यांना चाळीस लाख रुपये जमा करुन दिले आहेत. तसंच शेट्टी यांची शेतकऱ्यांसाठी लढण्याची भूमिका पाहता शेट्टी यांना भरघोस मतं मिळतील आणि कदाचित ते निवेदिता माने यांना मागे टाकून दिल्लीत पोचतीलही.

कोकणात भगवाच फडकणार...
सिंधुदुर्ग-रत्नागिरी आणि रत्नागिरी-रायगड या विचित्र मतदारसंघांमध्ये दोन्ही ठिकाणी शिवसेनेचा भगवा फडकेल, असं दिसतंय. खाणी आणि प्रकल्पांच्या मुद्‌द्‌यावर नागरिक, कॉंग्रेस नेते-कार्यकर्ते नारायण राणे यांच्यावर नाराज आहेत. अनेकांनी उघड तर काहींनी छुपी भूमिका घेतलीय. सावंतवाडी, देवगड, रत्नागिरी, संगमेश्‍वर, राजापूर आणि चिपळूण भागात युतीचं पारडं जड आहे. त्यामुळं फक्त मालवण, कणकवली आणि वेंगुर्ला यांच्या जोरावर निलेश राणे खासदार होणं अवघड आहे. शिवाय डॉ. सुरेश प्रभू यांची शांत-संयमी-अभ्यासू प्रतिमा आणि त्या तुलनेत निलेश राणे यांचं उथळ नेतृत्व हे मुद्दे निवडणुकीत निर्णायक ठरतील.

वरती अनंत गीते हे बॅरिस्टर अब्दुल रेहमान अंतुले यांना धूळ चारल्यावाचून राहणार नाहीत. दापोली, मंडणगड, गुहागर आणि श्रीवर्धन हे युतीचे बालेकिल्ले . तिकडे अलिबाग आणि पेणमध्ये शिवसेनेला शेकापची साथ आहे. शिवाय 26-11 नंतर अंतुले यांनी केलेली बडबड त्यांच्या अंगाशी आली नाही तरच नवल. इथं कॉंग्रेसच्या प्रवीण ठाकूर यांनी केलेली बंडखोरीही गीते यांच्याच पथ्यावर पडेल. एकूण काय तर अनंत गीते पुन्हा दिल्लीत पोचतील, असं दिसतंय.

शिवसेनेचे ठाणे राहणार का?
ठाणे मतदारसंघ आता पूर्णपणे बदलला आहे. नवी मुंबईत गणेश नाईक यांचं असलेलं वर्चस्व, कल्याण-डोंबिवली यांचं ठाण्यातून वगळणं आणि विजय चौगुले यांची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी या सर्व गोष्टी शिवसेनेसाठी धोकादायक आहेत. पण ठाणे हा हिंदुत्ववाद्यांचा बालेकिल्ला आहे. तिथं उमेदवार कोणीही असला तरी कमळ किंवा धनुष्यबाण यांच्यापलिकडे मतदार जात नाहीत. शिवाय ऐरोली हा विजय चौगुले यांचे "होमपिच'. शिवाय मंदा म्हात्रे, मीरा-भाईंदरचे गिल्बर्ट मेंडोसा, मुझफ्फर हुसेन, नवी मुंबईचे कॉंग्रेसचे नामदेव भगत ही मंडळी गणेश नाईक यांचे पारंपरिक विरोधक. या गोष्टी शिवसेनेला दिलासादायक आहेत. पण मनसेचे राजन राजे यांच्या उमेदवारीमुळं शिवसेनेला धोका निर्माण झालाय. ते जर अधिक चालले तर चौगुले यांचा विजय दुरापास्त वाटतो. पण आजवरचा इतिहास पाहिला आणि एकनाथ शिंदे यांचे राजकीय कसब पाहिले तर चौगुले निवडून येतील, असं आता तरी वाटतंय.

कल्याणमध्ये आनंद परांजपे निवडून येतील. कल्याण, डोंबिवली आणि अंबरनाथच्या जोरावर ते बाजी मारणार हे नक्की. पालघरमध्ये भाजपच्या चिंतामण वनगा यांचा मार्ग सोपा आहे. भाई ठाकूर यांनी उभा केलेल्या उमेदवारामुळं कॉंग्रेसच्या दामू शिंगडा यांची मते फुटणार आणि त्याचा फायदा वनगा यांना होईल, असं दिसतंय. त्यामुळं पालघरमध्ये बदल निश्‍चित दिसतोय.

तिकडे नव्यानं अस्तित्वात आलेल्या भिवंडीमध्ये सध्या तरी काहीच सांगता येत नाही. गेल्यावेळी कल्याणमधून (विधानसभेला) उमेदवारी नाकारण्यात आलेल्या जगन्नाथ पाटील यांना भाजपनं उमेदवारी दिलीय. तर कुणबी सेनेच्या विश्‍वनाथ पाटील यांनीही इथं उमेदवारी दाखल केलीय. शिवसेनेचे आमदार योगेश पाटील यांनी भाजपला मतदारसंघ सोडण्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. या सर्व गोष्टींचा फटका भाजपलाच बसणार आहे. पण भाजपसाठी दिलासादायक म्हणजे कॉंग्रेसच्या सुरेश टावरे यांच्याविरोधात त्यांच्याच पक्षाच्या आर आर पाटील यांनी केलेली बंडखोरी. पाटील हे समाजवादी पक्षाच्या तिकिटावर रिंगणात उतरले आहेत. त्यामुळं इथली लढत रंगतदार होईल. अगदी शेवटपर्यंत काय होईल, काहीच सांगता येणार नाही.

मुंबईत यंदा परिवर्तन...
गेल्या वेळी युतीला फक्त एक खासदार देणाऱ्या मुंबईतून यंदा युतीचे किमान चार खासदार निवडून येतील असं दिसतंय. राम नाईक, किरीट सोमय्या, गजानन किर्तीकर आणि मोहन रावले हे युतीचे उमेदवार निवडून येण्याची दाट शक्‍यता आहे. अर्थात, ईशान्य मुंबईत संजय पाटील तसेच मनसेचे शिशिर शिंदे आणि दक्षिण मुंबईत मनसेच्या बाळा नांदगांवकर यांनी जोरदार आव्हान उभं केलंय. बाकी ठिकाणी मनसेचे उमेदवार नावाला आहेत.

शिरीष पारकर हे उत्तर मुंबईत राम नाईक यांची मतं घेणार हे नक्की असलं तरी त्यांचा फारसा फटका नाईकांना बसणार नाही. शिवाय संजय निरुपम यांच्या रुपानं कॉंग्रेसचा दुबळा उमेदवार नाईक यांच्यासमोर आहे. त्यामुळं नाईक यंदा दिल्ली गाठणार असं दिसतंय. तिकडे आबू आझमी यांच्या उमेदवारीमुळं गजाभाऊंचा मार्ग सुकर झालाय. तसंच स्थानिक लोकाधिकार समितीच्या माध्यमातून केलेली काम गजाभाऊंना उपयोगी पडणारेत. गुरुदास कामत यांच्यासाठी हा मतदारसंघ नवीन आहे. ते बाहेरचे आहेत, असाही प्रचार होतोय. त्यामळं कामत यांच्यावर घरी बसण्याची वेळ येणारेय.

प्रिया दत्त ही कॉंग्रेसची एकमेव सीट निश्‍चित आहे. दलित, मुस्लिम आणि उत्तर भारतीय मतदारांच्या प्राबल्यामुळं महेश जेठमलानी यांची डाळ इथं शिजणार नाही आणि ते "केस' हरतील, असं दिसतंय. दक्षिण मध्य मुंबईतून माहिमचे आमदार सुरेश गंभीर आणि खासदार एकनाथ गायकवाड यांच्यात "टसल' आहे. दादर, माहिम, वडाळा, सायन हे शिवसेनेचे बालेकिल्ले, शिवाय धारावीतही त्यांना काही प्रमाणात मते मिळतील. या जोरावर त्यांनी गायकवाड यांच्यासमोर जोरदार आव्हान उभं केलंय. पण उर्वरित ठिकाणी चेंबूर, धारावी आणि अणुशक्तीनगर इथं एकनाथ गायकवाड यांना मिळणारं मताधिक्‍य गंभीर यांना मोठ्या प्रमाणावर तोडावं लागेल. तरच ते जिंकतील.
दुसरीकडे ईशान्य मुंबईतही कॉंटे की टक्कर आहे. मुलुंड, घाटकोपर आणि विक्रोळी इथं युतीला भरभरुन मतदान होणार. तर भांडुपमध्ये संजय पाटील जरा जास्त चालतील. मराठी मतांच्या जोरावर आणि होमपिच मुलुंडमुळं शिशिर शिंदे यांनाही थोडाफार फायदा होईल. त्यामुळं तेही इथं आव्हान निर्माण करतील. पण गुजराती मतांच्या जोरावर सोमय्या यांचेच पारडे इथं जड वाटतंय.

मनसेनं जोरदार हवा निर्माण केली असली तरी मराठी मतदार सूज्ञ आहे, हे ठाणे, पुणे, मुंबई आणि नाशिकमधल्या महापालिका निवडणुकीत सिद्ध झालंय. याठिकाणी मराठी मतांची विभागणी फार मोठ्या प्रमाणावर झाली नव्हती. त्यामुळं मनसेची जितकी हवा होती तितके त्यांचे उमेदवार निवडून आले नाहीत. अर्थात, त्यानंतर मनसेनं अनेक आंदोलनं करुन त्यांचा "बेस' वाढविला. पण ठोस कार्यक्रम नसल्यानं मतदार त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर वळतील, असं वाटत नाही. किमान लोकसभेसाठी तरी. विधानसभेला गणित वेगळी असू शकतात.

एकूण काय तर राज्यात शिवसेना-भाजप युतीची हवा असून जवळपास ३० ते ३२ जागा युतीला मिळू शकतात. तर उर्वरित १६ ते १८ ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी विजयी ठरेल. शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यंदाच्या निवडणुकीत बराच मोठा पल्ला मारेल, असं वाटत होतं. पण पवार यांच्या खात्याबद्दल असलेली नाराजी आणि सरकारविरोधी वातावरण यामुळं गेल्या निवडणुकीतला नऊचा आकडा गाठण्यासाठीही त्यांना झगडावं लागेल असं दिसतंय.
राज्यातील संभाव्य विजेते
1) दक्षिण मुंबई - मोहन रावले (सेना)
2) दक्षिण मध्य मुंबई - एकनाथ गायकवाड (कॉं) किंवा सुरेश गंभीर (सेना)
3) उत्तर मध्य मुंबई - प्रिया दत्त (कॉं)
4) वायव्य मुंबई - गजानन किर्तीकर (सेना)
5) ईशान्य मुंबई - किरीट सोमय्या (भाजप)
6) उत्तर मुंबई - राम नाईक (भाजप)
7) ठाणे - विजय चौगुले (सेना)
8) कल्याण - आनंद परांजपे (सेना)
9) भिवंडी - सुरेश टावरे (कॉं) किंवा जगन्नाथ पाटील (भाजप)
10) पालघर - चिंतामण वनगा (भाजप)
11) रायगड-रत्नागिरी - अनंत गीते (सेना)
12) रत्नागिरी-सिंधुदुर्ग - सुरेश प्रभू (सेना) किंवा निलेश राणे (कॉं)
13) कोल्हापूर - छत्रपती संभाजीराजे (राष्ट्रवादी)
14) हातकणंगले - राजू शेट्टी (अपक्ष) किंवा निवेदिता माने (राष्ट्रवादी)
15) सांगली - अजित घोरपडे (अपक्ष)
16) सातारा - उदयनराजे भोसले (राष्ट्रवादी)
17) पुणे - अनिल शिरोळे (भाजप)
18) बारामती - सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी)
19) मावळ - गजानन बाबर (सेना)
20) शिरुर - शिवाजीराव आढळराव-पाटील (सेना)
21) माढा - शरद पवार (राष्ट्रवादी)
22) सोलापूर - शरद बनसोडे (भाजप) किंवा सुशीलकुमार शिंदे (कॉं)
23) अहमदनगर - दिलीप गांधी (भाजप)
24) शिर्डी - रामदास आठवले (रिपब्लिकन) किंवा भाऊसाहेब वाकचौरे (सेना)
25) नाशिक - रत्नाकर गायकवाड (सेना) किंवा समीर भुजबळ (राष्ट्रवादी)
26) दिंडोरी - हरिश्‍चंद्र चव्हाण (भाजप)
27) धुळे - प्रतापदादा सोनावणे (भाजप)
28) नंदूरबार - माणिकराव गावित (कॉं)
29) जळगाव - ए. टी. पाटील (भाजप)
30) रावेर - हरिभाऊ जावळे (भाजप)
31) बुलडाणा - राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी) किंवा प्रताप जाधव (सेना)
32) अकोला - संजय धोत्रे (भाजप)
33) यवतमाळ-वाशिम - भावना गवळी (सेना)
34) अमरावती - आनंदराव अडसूळ (सेना)
35) वर्धा - दत्ता मेघे (कॉं) किंवा सुरेश वाघमारे (भाजप)
36) नागपूर - बनवारीलाल पुरोहित (भाजप)
37) रामटेक - कृपाल तुमाने (सेना)
38) भंडारा-गोंदिया - शिशुपाल पटले (भाजप)
39) गडचिरोली-चिमूर - अशोक नेते (भाजप) किंवा मारोतराव कोवासे (कॉं)
40) चंद्रपूर - हंसराज अहिर (भाजप)
41) नांदेड - संभाजी पवार (भाजप) किंवा भास्करराव पाटील (कॉं)
42) हिंगोली - सुभाष वानखेडे (सेना) किंवा सूर्यकांता पाटील (राष्ट्रवादी)
43) परभणी - गणेश दुधगांवकर (सेना)
44) बीड - गोपीनाथ मुंडे (भाजप)
45) लातूर - सुनील गायकवाड (भाजप)
46) उस्मानाबाद - पद्मसिंह पाटील (राष्ट्रवादी) किंवा प्रा. रवी गायकवाड (सेना)
47) औरंगाबाद - चंद्रकांत खैरे (सेना)
48) जालना - रावसाहेब दानवे (भाजप)
भाजप (निश्‍चित) - 16
शिवसेना (निश्‍चित) - 12
कॉंग्रेस (निश्‍चित) - 2
राष्ट्रवादी (निश्‍चित) - 4
अपक्ष - 1
संदिग्ध - 13

Tuesday, April 21, 2009

मी महाराष्ट्र बोलतोय...

लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं साम मराठी वाहिनीनं "मी महाराष्ट्र बोलतोय...' या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. राज्यातल्या विविध मतदारसंघात जायचं, गावागावात फिरायचं, तिथल्या लोकांचं मत जाणून घ्यायचं, त्यांच्यांशी बोलायचं, समस्या जाणून घ्यायच्या असं या कार्यक्रमाचं स्वरुप होतं. त्या निमित्तानं राज्याच्या विविध भागात हिंडलो. दौऱ्यादरम्यान आलेले काही अनुभव येथे देत आहोत...

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा... महाराष्ट्राचं हे वर्णन कधीतरी लहानपणी कवितांच्या पानांमध्ये वाचलं होतं. प्रत्यक्षात मात्र, आता अनुभवलं. निवडणुकीच्या निमित्तानं. महाराष्ट्राचं मत जाणून घेण्यासाठी आम्ही 25 मार्च रोजी निघालो आणि पंचवीस दिवस महाराष्ट्रभर गावागावात हिंडलो. जवळपास साडेसहा हजार किलोमीटर, तीस जिल्हे आणि लोकसभेच्या अठ्ठावीस-तीस मतदारसंघातून फिरून साम मराठीच्या टीमनं जनमताचा कौल घेतला. लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. राजकारण्यांच्या सभा आणि मेळावे हे आमच्यासाठी दुय्यम होतं. आम्हाला जाणून घ्यायचं होतं सामान्यातल्या सामान्य माणसाचं मत. सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवूनच आम्हाला महाराष्ट्र बोलता करायचा होता.

राज्यातल्या जवळपास प्रत्येक विभागात व प्रत्येक जिल्ह्यात पाण्याची टंचाई, बंद पडत चाललेले उद्योगधंदे आणि वाढती बेरोजगारी या समस्यांनी अक्षरशः उग्र रुप धारण केलंय. पाण्याचं सुख वगळता पश्‍चिम आणि काही प्रमाणात उत्तर महाराष्ट्र देखील त्याला अपवाद नाही. मात्र, अशा वादग्रस्त मुद्‌द्‌यांना हात घालण्याची राजकीय पक्षांची इच्छा नाही. हिंमत नाही, असं म्हटलं तरी चालेल. ही गोष्ट सामान्यातल्या सामान्य माणसाला कळलेली आहे. त्यामुळं सामान्य माणूस कधी राजकारण्यांवर टीका करतो तर कधी आपल्याच कर्माला दोष देतो. पुढारी दरवेळी मतं मागायला तेवढे येतात पण नंतर आमच्याकडे कधी ढुंकूनही पाहत नाहीत, ही खंत कानाकोपऱ्यात ऐकायला मिळते.

वीजटंचाई आणि पाणीटंचाई यापेक्षाही महाराष्ट्राला आज भेडसावणारी सर्वात मोठी समस्या म्हणजे बेरोजगारीची. या बेरोजगारीमुळंच धुळ्यातला एमए, बीएड झालेला तरुण फक्त पन्नास रुपायांसाठी दिवसभराचे दहा तास मान मोडून काम करतो. फक्त अकोला व वाशिम जिल्ह्यातले जवळपास दहा ते बारा हजार तरुण लष्कर भरतीसाठी अमरावतीत येतात. कुणी बारावी पास तर कुणी ग्रॅज्युएट. सैन्याच्या नोकरीची कोणतीही हमी नसताना दोनदोन-तीनतीन रात्री रस्त्यावर झोपूून काढतात. गावात उद्योग नाहीत, त्यामुळं नोकऱ्या नाहीत, राजकारणी आमच्यासाठी काहीच करत नाहीत, इतकं शिकून फायदा काय... बंदुकीतनं गोळी सुटावी, तसे प्रश्‍न बेरोजगार तरुणांच्या तोंडातनं सुटतात. उत्तर कोणाकडेच नसतं. आम्ही पण हे धगधगत वास्तव पचवण्याचा प्रयत्न करतो. पण ते पचत नाही.

विदर्भ, मराठवाड्यात जिथं शेतीची कामं नाहीत तिथं वीटभट्टीवर मोलमजुरी करुन पोट भरणारी मंडळी आम्हाला भेटली. दिवसाकाठी हजार विटा तयार केल्या की, त्यांचे 120 रुपये सुटतात. बीडमध्ये दिवसभर उन्हातान्हात राबून कापूस वेचणाऱ्या महिला भेटल्या. नंदूरबारमध्ये ऊसाच्या मळ्यात मोलमजुरी करणारे आदिवासी भेटले. पाण्याची समस्या असताना शेत हिरवीगार करण्याचा प्रयत्न करणारे शेतकरी यवतमाळमध्ये भेटले. तर अवघ्या पाच-सात रुपयांसाठी साठ साठ किलो माणसांना वाहून नेणारे सायकल रिक्षावाले नागपूरमध्ये दिसले. सूर्य डोक्‍यावर आग ओकत असताना दिवसभर या महिला, हे शेतकरी काम करुच कसं शकतात, हा प्रश्‍न अजूनही आम्हाला सुटलेला नाही. पण सारं काही पोटासाठी हे जीवनाचं सूत्र लक्षात ठेवून आम्ही आमचा प्रवास सुरु ठेवला. या मंडळींना वेळेवर रेशनचं धान्य मिळत नाही, केरोसिन पण मिळत नाही. दाद मागितली तर ती देखील मिळत नाही.

स्वातंत्र्याला साठ वर्ष उलटली तरी दुःखाची गोष्ट अशी की, अजूनही अनेक ठिकाणी महिलांना पुरुषांइतकी मजुरी मिळत नाही. ""आम्ही पण पुरुषांइतकंच काम करतो. कदाचित थोडं जास्तच. मग आम्हाला पुरुषांच्या निम्मी मजुरी का...'' हा नंदूरबारमधल्या एका आदिवासी महिलेनं विचारलेला प्रश्‍न आम्हाला अनुत्तरित करणारा होता. कदाचित राज्याचं नेतृत्व करणाऱ्या मंत्र्या संत्र्यांकडेही त्याचं उत्तर नसावं.

सिंचनाची समस्या असल्यामुळं विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न आहे. सिंचन हीच इथली सर्वात महत्वाची समस्या आहे. शेतीच्या पाण्याची समस्या आहे. पाणीच नसल्यामुळं उद्योगधंद्यांनीही पाठ फिरवलीय. अर्थात, गेल्या साठ वर्षात सत्ताधाऱ्यांनी केलं काय, हा प्रश्‍न आपल्याला पडतोच पडतो. पाऊस नसल्यामुळं सिंचनाचा प्रश्‍न निर्माण झाला, हे सरळसोट उत्तर पटूच शकत नाही. गुजरातच्या नरेंद्र मोदींनी साबरमतीचं पाणी कच्छच्या वाळवंटात नेऊन शेतं हिरवीगार केली. मोदींच्या नावानं खडे फोडणाऱ्यांनी अशा पद्धतीनं विदर्भ-मराठवाड्याचा सिंचनाचा प्रश्‍न का सोडवला नाही? तशी इच्छाशक्ती महाराष्ट्रातल्या नेत्यांना का दाखवता आली नाही, या प्रश्‍नाला खरं तर उत्तर मिळालं पाहिजे. पण ते मिळत नाही आणि मिळणार नाही.

धुळ्यात तर अनेक ठिकाणी तापी बॅरेजमुळं पाणी आहे, काळी कसदार जमीनही आहे. पण विजेच्या अनियमिततेमुळ बॅरेजमधलं पाणी उचलून शेतीला देणं शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यामुळंच ज्यांच्याकडे पैसे आहेत तेच शेतकरी शेती करतात. अशीच काहीशी परिस्थिती नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पाची आहे. बॅरेजचं पाणी उचलून शेतीसाठी वापरायचं तर ते बिसलेरी पाण्याच्या दरानं पडतं. मग असला उपद्‌व्याप कोण करणार? जमीन आहे, पाणी आहे. पण तरीही आपण काहीच करु शकत नाही, यापेक्षा अधिक दुर्भागी शेतकरी कोणता असेल. असा शेतकरी दाद मागणार तरी कोणाकडे?

सिंचनाच्या समस्येमुळं शेतीसाठी पावसावर अवलंबून रहावं लागतं. पावसाचा लहरीपणा लक्षात घेता पेरलेलं बियाणं, खतं आणि इतर खर्च वाया जाण्याची शक्‍यताच अधिक. अशा परिस्थितीत शेतकरी कर्जबाजारी झाला नाही तरच नवल. मग तुम्ही कितीकी कर्जमाफी द्या किंवा कर्जमुक्ती करा, सातबारे कोरे करा नाही तर त्याला आर्थिक सहाय्य द्या, काहीही फायदा नाही. शेतीसाठी नियमित पाणी द्या आणि शेतीमालाला हमी भाव द्या इतकीच मागणी शेतकऱ्यांची आहे. कधी बियाणांमध्ये फसवणूक तर कधी खतांची टंचाई अशा परिस्थिती शेतकरी नाडला जातो आणि कर्जाच्या दुष्टचक्रात अडकतो. मग कोणतीच कर्जमाफी त्याला सावरु शकत नाही आणि आत्महत्यांचा आकडा फुगत जातो.

आत्महत्यांच्या प्रदेशात...
अकोल्याजवळच्या एका खेड्यात शेतकरी आत्महत्या केलेल्या कुटुंबाच्या घरी आम्ही पोचलो. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीसह घरात पाच जणी. स्वतः पत्नी आणि चार मुली. आधी पाच मुली होत्या. पण आजारपणात औषधांअभावी एक मुलगी दगावली. आता या चार मुलींच्या आईला आठवड्यातनं तीन-चार दिवस मजुरीची काम मिळतात. रोजची मजुरी पंचवीस रुपये. आता या पंचवीस रुपयांमध्ये पाच जणींचा संसार चालणार कसा, हे कोडं कोणताच अर्थमंत्री सोडवू शकत नाही. मग कधी कधी फक्त पाणी पिऊन झोपणं, हा एकमेव उपाय त्यांच्या हातात असतो. मुळात मुलगा व्हावा, या हव्यासापायी अजूनही अडाणी-अशिक्षित नागरिक चार-पाच मुलींना जन्म देतात, ही गोष्ट क्‍लेशदायक नाही का? याबाबत जागृती करण्यासाठी कोणताच पक्ष का पुढे येत नाही???

अकोल्यासारख्या शहरात दहा दहा दिवसांनी पाणी येतं. त्यामुळं इथल्या नागरिकांना आपल्या घरी पाहुणेच येऊ नये, असं वाटतं. थोडंसं आश्‍चर्य वाटेल, पण हे खरंय. दुसरीकडे गावातल्या नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. म्हातोडी... अकोल्यापास्नं अवघ्या पंधरा किलोमीटरवर असलेलं छोटं खेडेगाव. आटलेल्या नदीमध्ये चार-पाच फूट खड्डे खणून मग वाटी किंवा भांड्याच्या सहाय्यानं पाणी गोळा केलं जातं. रात्री दोन-चार वाजताही पाण्यासाठी नदी गाठावी लागते. मग सहावीत शिकणाऱ्या ममतालाही आपल्या वजनाइतका पाण्याचा हंडा उचलावाच लागतो किंवा परीक्षा सुरु असतानाही बाळूला चार-पाच तास पाणी भरण्यासाठी वेचावे लागतात. या मंडळींच्या आयुष्यात "जय हो...' कधी होणार आणि कोण करणार?

म्हातोडीपास्नं पाच मिनिटांच्या अंतरावर असलेल्या आणखी एका गावातली परिस्थिती गमतीशीर आहे. गावात पाणी नाही, वीज नाही पण मोबाईल टॉवर मात्र दिमाखात उभा आहे. मोबाईलला रेंज आहे. पण मोबाईल चार्ज करण्यासाठी वीज मात्र नाही. विकासाची ही थट्टा पाहून आम्हाला सरकारची किंवा यंत्रणेची कीव करावीशी वाटली.

विकासाची बोंबाबोंब
धुळे आणि नगर जिल्ह्यासाठी बांधण्यात येणाऱ्या काही धरणांची कामं तर गेल्या पंचवीस-पंचवीस वर्षांपास्नं रखडली आहेत. आता या धरणांच्या बांधकामाचा खर्च हजारो कोटींनी वाढलाय. त्याला जबाबदार कोण? आणि कोणाच्या खिशातनं त्याची वसुली करायची, असा सवाल करायला लोक मागेपुढे पाहत नाही. शहरातनं बाहेर पडलं की टोलनाका आलाच. मुंबई-नागपूर रिटर्न या मार्गावर जवळपास पंचवीसशे रुपयांचा टोल द्यावा लागतो. सर्व रस्ते बीओटी तत्वावर बांधायचे असतील आणि खासगी कंपन्यांच्या घशात पैसे कोंबायचे असतील तर सरकारचं सार्वजनिक बांधकाम खातं करायचं काय, असा खणखणीत सवाल ट्रकचालक विचारतात.

कोणी "जय हो...'चा नारा देऊन निवडणूक लढतोय, तर कोणी देशाला कणखर नेतृत्व देण्याची घोषणा करतोय. पण सर्वसामान्य नागरिकांच्या वीज, पाणी आणि नोकरी अशा अगदी माफक मागण्यांकडे लक्ष द्यायला कुणालाच वेळ नाही. कारण जाहीरनामे, भाषणबाजी आणि मतदारांना आश्‍वासनांचे बोल बच्चन देणाऱ्या राजकीय पक्षांसाठी अशा गोष्टी अडचणीच्या ठरतात. त्यामुळंच समर्थ भारत, सक्षम भारत अशा गुळगुळीत संज्ञांचा प्रचारात वापर होतो आणि मूळ मुद्दे दुर्लक्षितच राहतात.

अशामुळेच नंदूरबारमधनं सलग आठ वेळा निवडून आलेले कॉंग्रेसचे माणिकराव गावित अजूनही विकासाच्या मुद्‌द्‌यावर नव्हे तर कॉंग्रेसच्या पुण्याईवर दिल्ली गाठतात. सलग तीनवेळा खासदार होऊनही भावनाताई गवळी वाशिमचा कायापालट करु शकत नाही. कॉंग्रेसला एकहाती पाठिंबा देऊनही धुळ्याच्या अक्कलपाडा धरणाचा प्रश्‍न पंचवीस वर्षांपास्नं प्रलंबित राहतो. शिवसेनेच्या पाठिशी उभं राहूनही परभणीत उद्योगधंदे येत नाहीत, रोजगारनिर्मिती होत नाही. अमरावतीत अनंत गुढे यांच्याबद्दलही तीच ओरड ऐकू येते.

गुरु ता गद्दी सोहळ्यासाठी आलेला निधी कसा वापरायचा याचं नियोजन न झाल्याचा सूर मुख्यमंत्र्यांच्या नांदेडमध्ये ऐकू येतो. दहा-दहा वर्षे आमदारकी भूषवूनही माढ्याचा एसटी स्टॅंड अत्यंत थर्ड क्‍लास स्वरुपाचा वाटतो. मग शरद पवारांसारखा नेता येईल आणि तो स्टॅंडची सुधारणा करेल, अशी भाबडी आशा इथल्या गावकऱ्यांना वाटते. स्टॅंड सुधारणं हे खासदाराचं काम नाही, हे त्यांना सांगूनही पटत नाही. अकलूजचा विकास होतो. पण अकलूजपास्नं पंधरा किलोमीटरवर असलेलं माळशिरस हे तालुक्‍याचं ठिकाण अजूनही अविकसितच राहतं, हे कशाचं उदाहरण म्हटलं पाहिजे.

गावागावात फिरताना अशा अनेक गोष्टी आम्ही ऐकल्या. काळवंडलेले चेहरे आणि पिचलेली माणसं अधिक पोटतिकडीनं बोलतात. पोटावर हात असलेल्या लोकांपेक्षा हातावर पोट असलेले लोक अधिक तडफडीनं समस्या मांडतात. आपलं म्हणणं ऐकून घ्यायला कोणीच नाही. सरकार नाही, मंत्री नाही, आमदार-खासदार नाही, पोलिस नाही, न्याययंत्रणा नाही, अगदी कोणीकोणीच नाही. मग हे च्यानलवाले तरी आपलं म्हणणं ऐकून घेताहेत याचंच त्यांना बरं वाटतं. आपल्या मागण्यांना दाद मिळेल किंवा नाही, याची फिकीर तो करत नाही. पण आपलं म्हणणं ऐकून घेतल्याचं समाधान त्याच्या चेहऱ्यावर दिसतं. हेच समाधान आम्हाला हवं होतं. कारण आम्हाला जो महाराष्ट्र बोलता करायचा होता तो हाच होता...

Tuesday, February 24, 2009

"शिववडा'च्या निमित्तानं...


चला वडापावच्या गाड्यांवर...

महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी बटाटा वडा खाल्लाय. पण मुंबईतल्या एक-दोन ठिकाणचा (सोकॉल्ड कॉर्पोरेट वडापाव) अपवाद वगळला तर दुसरीकडे कुठेही बटाटा वड्याची चव खराब लागली नाही. त्यामुळं "शिववडा' तरी काय वेगळा असणार,'' असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विचारलाय. हे वाचल्यानंतर मी खरोखरच विचार करु लागलो. रस्त्यावर ठिकठिकाणी लागणाऱ्या वडापावच्या गाड्यांवर अनेकवेळा वडा खाल्लाय. पण कुठेच मला वडा आवडला नाही, असं झालं नाही. आवडण्याचं प्रमाण कमी-अधिक असेल पण गाडीवरचा वडा आवडतोच. (मुळात वडापाव ही डिश माझी "वन ऑफ फेव्हरेट' आहे, हे सांगायला नकोच) त्यामुळं राज ठाकरेंच्या म्हणण्यात नक्कीच तथ्य आहे, हे मला पटलं आणि शिवसेना "शिववडा'च्या रुपानं नेमकं नवं काय देणार आहे, हा विचार उगाच मनात डोकावून गेला.
मुंबईतला वडापाव उर्वरित महाराष्ट्रात गेला आणि बटाटा वडा ही महाराष्ट्राची ओळख बनली. शिववडा मुंबईपुरताच मर्यादित असला तरी मला उगाचच पुण्यातल्या चवदार वड्यांचे स्पॉट्‌स डोळ्यासमोर उभे ठाकले. पुण्यात खरा वडा मिळतो तो हातगाड्यांवर. जोशी वडेवाले किंवा रोहित वडेवाले यांनी वडापावला गाडीवरुन दुकानात नेलं. पण गाडीवर मिळणारा वडापाव अजूनही लोकांच्या चवीस उतरतो. पूर्वी "प्रभा'च्या वड्याची चर्चा सगळीकडे होती. अजूनही जुन्या पिढीतले लोक "प्रभा'चं गुणगान गात असतात. पण हा झाला इतिहास. "प्रभा'च्या तोंडात मारतील असे "हॉटस्पॉट्‌स' आज पुण्यात आहेत. उलट प्रत्येकानं वड्याची स्वतःची वेगळी चव तयार केलीय. तसंच चव टिकवलीही आहे. त्यामुळं "प्रभा'ची प्रभावळ आता हळूहळू ओसरु लागलीय, यात शंका नाही.
टिळक स्मारक किंवा बालगंधर्वमध्ये कार्यक्रमाच्या मध्यंतराला मिळणारा बटाटा वडा हे देखील त्यात आहेतच. शनिपार चौकात भोज्या देवडी यांची गाडी, सहकारनगरमधला कृष्णा वडापाव, कॅम्पात लोकसत्ता कार्यालयाजवळ मिळणारा वडा, पत्र्या मारुतीच्या पाराजवळ लागणारी मामांची गाडी, दांडेकर पुलाजवळचे खराडे वडेवाले, नवी पेठेतल्या विठ्ठल मंदिराजवळची गाडी, पुणे विद्यार्थी गृहाजवळचा वडापाव, शास्त्री रस्त्यावरच्या अजंठामधला वडा, वसंत चित्रपटगृहाजवळचा अन्नपूर्णाचा वडा, झेड ब्रिजच्या जंगली महाराज रस्त्याच्या बाजूची गाडी, रतन चित्रपटगृहाजवळची मधली गाडी, तुळशीबागेत सकाळी रौनकच्या दाराशी मिळणारा खर्डा-वडा किंवा अगदी खडकवासल्याच्या बॅकवॉटरजवळ असणाऱ्या वडापावच्या गाड्या... ही यादी अशीच वाढत जाईल. वडा किंवा भज्यांचा घाणा निघत असेल आणि आपण या परिसरातनं जात असू तर आपण वड्यांच्या गाडीकडे खेचलो जातोच. अगदी इच्छा नसतानाही. हीच तर त्यांच्या चवीची खासियत आहे. दगडूशेठ गणपती मंदिराच्या समोर नव्यानंच उघडण्यात आलेल्या "गोली वडापाव'चा अपवाद सोडला तर बहुतांश ठिकाणी वडापाव खाल्ल्याचा पश्‍चात्ताप कधीच झालेला नाही.
वडा गरमागरम असेल तर मग विचारुच नका. खोबरं-कोथिंबिरीची हिरवी तिखट चटणी, चिंचगुळाची किंवा खजुराची गोड-आंबट चटणी, कांदा लसूण मसाला, बारीक चिरलेला कांदा आणि तळून खारावलेल्या मिरच्या या गोष्टी वड्याची चव वृद्धिंगत करतात. पण मूळच्या वड्याची चव खतरा असेल तर या पूरक गोष्टींची गरजच पडत नाही. प्रत्येक ठिकाणच्या वड्याची चव निराळी आणि पूरक पदार्थांचा मामलाही निराळा. त्यामुळं प्रत्येक वेळी नाविन्याचा अनुभव येतो. "प्रभा'च्या वड्यामध्ये लिंबाचा रस जाणीवपूर्वक वापरल्यासारखा वाटतो. दांडेकर पुलावरचा खराडेंचा वडा काहीच्या काही झणझणीत असतो की विचारता सोय नाही. पत्र्या मारुतीजवळ मामांच्या गाडीवर तिखट चटणी घेतल्याशिवाय वड्याची चव लागतच नाही. लोकसत्ताच्या जवळ मिळणाऱ्या वड्याचा आकार पाहूनच थक्क व्हायला होतं. तिथल्या मिरच्यांना मिठाप्रमाणेच हळदही लागलेली असते. म्हणजे भन्नाटच!
कृष्णा, खराडे आणि पत्र्या मारुती...
पूर्वी कृष्णाचा वडापाव एकदम मस्त होता. पण आता तिथल्या वड्याचा आकार कमी आणि पावाचा आकार भलता मोठा अशी परिस्थिती आहे. त्यामुळे गोंधळून जायला होतं. पण कृष्णाच्या वड्याची चव अजूनही तशीच आहे. शिवाय इथं घाणा काढल्या काढल्या वडे संपतात. त्यामुळं प्रत्येक वेळी गरमागरम वडा. त्यामुळं इथं फक्त वडा घेणं हेच सोईस्कर आहे. पत्र्या मारुतीजवळ मिळणारा वडा चवीला परिपूर्ण नसतोच. वड्याच्या आतल्या सारणामध्ये मीठ आणि तिखंट थोडंसं कमीच असतं. त्यामुळं पावाला झणझणीत चटणी लावल्यानंतर ही कसर भरुन निघते. म्हणूनच इथं वड्यासोबत चटणी घेतली तरच मजा आहे. नही तो बात जमेगी नही... खराडेंच्या वड्याचा पहिला घास घेतल्यानंतर पाणी मागितलं नाही तरच नवल. पण एक वडा खाल्ल्यानंतर दुसरा वडा खाण्यासाठी जीभ खवळली नाही असं कधीच होत नाही.
रामनाथचाही वडाच...
आणखीन एक राहिलं. पुण्यातल्या मिसळचा विषय निघाल्यानंतर टिळक रस्त्यावरच्या रामनाथचं नाव निघाल्यावाचून रहात नाही. पण रामनाथच्या मिसळइतकाच तिथला बटाटा वडा प्रसिद्ध आहे. कदाचित तिथल्या मिसळपेक्षा वडाच अधिच चवदार आहे. कारण रामनाथची मिसळ म्हणजे फक्त जाळ. अक्षरशः घाम निघतो आणि दुसऱ्या दिवशी त्रास होतोच होतो. पण बटाटा वड्याचं तसं नाही. इतर वड्यांपेक्षा आकाराला दुप्पट आणि चवीला काहीपट चांगला असणारा रामनाथचा वडा म्हणजे सुख. रामनाथ वड्यांसाठी प्रसिद्ध न होता मिसळसाठी कसा प्रसिद्ध झाला, हे मला न उलगडलेलं कोडं आहे.
कर्जतच्या स्टेशनवर मिळणारा दिवाडकरचा वडा आता पुण्यातही मिळू लागलाय. तांबडी जोगेश्‍वरीच्या मंदिरासमोरच्या बोळात "दिवाडकर्स' हे नवं दुकान सुरु झालंय. पण तिथं खरोखरच कर्जतचा वडा मिळतो का हे मी तरी अजून "टेस्ट' केलेलं नाही. लवकरच तिथं जावं लागणार आहे, हे नक्की. तुमच्या मनातही वडापावच्या हॉटस्पॉट्‌सनी घर केलं असेल तर प्रतिक्रियांमध्ये त्याबद्दल लिहा. म्हणजे माझ्याप्रमाणेच इतरानांही त्याचा आस्वाद घेता येईल. सो लेट्‌स एन्जॉय. बटाटा वडा.

"मांदेली फ्राय' जरुर ट्राय करा...


गिरगावातला "सत्कार'!!!

बऱ्याच दिवसांपास्नं लिहायचं होतं. पण आज मुहूर्त मिळाला असंच म्हटलं पाहिजे. शेवटी हा सत्कार समारंभ पार पाडलाच पाहिजे, असं ठरवून आज ब्लॉग लिहितोय. एकदा का एखाद्या ठिकाणची चव जिभेवर रुळली की पुन्हा पुन्हा तिथं जायचं आणि वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घ्यायचा ही जुनी खोड. त्यामुळंच मुंबईत आलं आणि गिरगावातल्या सत्कार हॉटेलात गेलो नाही, असं कधीच झालं नाही. अगदी अप्रतिम चवीचे मासे याठिकाणी तुम्हाला मिळतील. पापलेटपासून ते बांगड्यापर्यंत बरीच "व्हरायटी' इथे मिळते. सत्कार हे थोडंसं खानावळीच्या अंगानं जाणारं असलं तरी अगदी घरगुती पद्धतीनं बनवलेलं (बहुधा मालवणी पद्धतीनं) जेवण ही इथली खासियत. त्यामुळे दुपारी दोनपूर्वी आणि संध्याकाळी आठनंतर अगदी बिनदिक्कतपणे तुम्हाला इथं आडवा हात मारु शकाल.

अगदी सुरवातीला म्हणजे "ई टीव्ही'मध्ये काम करत असताना (जवळपास तीन वर्षांपूर्वी) विश्‍वनाथ गरुड, अजय खापे आणि स्वप्नसौरभ कुलश्रेष्ठ या "रानडे'तल्या मित्रांबरोबर पहिल्यांदा सत्कारमध्ये गेलो होतो. तेव्हापास्नं अजूनही गिरगावाकडे पावलं वळतात. मग जेव्हा जेव्हा मुंबईला आलो तेव्हा तेव्हा इथं जाणं व्हायचं. सध्या मुंबईतच आहे. पण फक्त एकदाच सत्कारची पायरी चढलीय. आता कधी एकदा तिथं जाऊन "फिश करी' ओरपतोय, असं झालंय.
वेस्टर्न लाईनच्या मरीन लाईन्स स्टेशनला उतरायचं. चर्चगेटच्या दिशेनं जाऊ लागलो की, अखेरच्या ब्रिजवरनं उतरायचं आणि डावीकडे वळून थेट चालायला लागायचं. पहिला चौक ओलांडला डाव्या हातालाच सत्कार आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनसवरनंही इथं यायला बसेस आहे. अगदी टॅक्सीनं यायचं म्हटलं तरी वीस-पंचवीस रुपयांपेक्षा जास्त मीटर पडणार नाही.

पापलेट किंवा सुरमई थाळी हा इथला "द बेस्ट' ऑप्शन. अगदी "मेन्यू कार्ड' देखील पहायची काहीही आवश्‍यकता नाही. "सत्कार'मध्ये शिरल्यानंतर तुम्ही थेट एखाद्या थाळीची "ऑर्डर' देऊन टाका. "फिश करी'चा स्वाद हे इथलं वैशिष्ट्य. थाळीमध्ये एक सुका फिश, एक करी फिश आणि चपात्या येतात. "फिश करी' खूपच चविष्ट असल्यानं ती ओरपलीच जाते. त्यामुळे दोन-तीन वेळा तरी इथं करी मागवावी लागते. त्याचे स्वतंत्र पैसे पडत नाही. पण जादा पैसे पडत असले तरी हरकत नाही. पुन्हा पुन्हा "करी' हवीच. मासा कोणताही असला तरी तो इतका ताजा असतो (त्यामुळेच सॉफ्टही असतो) की जणू काही तो नुकताच समुद्रातनं पकडून आपल्याला "सर्व्ह' केलाय की काय, अशी शंका येते. अगदी लुसलुशीत मासा आणि अप्रतिम चवीची "फिश करी' यामुळे पाहता पाहता किती चपात्या संपतात ते कळतही नाही.

कोणतीही फिश थाळी मागविली तरी त्याच्या जोडीला "मांदेली फ्राय' ही डिश हवीच. "बोंबिल फ्राय' असेल तर तो "ऑप्शन'ही "ट्राय' करायला हरकत नाही. पण मला विचाराल तर "मांदेली फ्राय' हाच उत्तम पर्याय आहे. एका "प्लेट'मध्ये किमान बारा ते पंधरा मांदेली नक्की असतात. दोन जणांमध्ये एक "प्लेट' अगदी सहज संपते. इथली मांदेली इतकी मस्त आहे की, रत्नागिरीतल्या "शुभम' शिवाय इतकी सुंदर मांदेली दुसरीकडे कुठेच मिळालेली नाही. किमान मला तरी! (कोणाला माहिती असेल तर नक्की सांगा) जास्त लोक असतील तर त्या प्रमाणात तुम्ही "ऑर्डर' द्या. चपात्या आणि "फिश'वर भरपेट ताव मारल्यानंतर एक प्लेट भात तुमची वाट पाहत असेल. तो खाण्याची क्षमता तुमच्यात असेल तर भात खा; अन्यथा त्याबदल्यात एक-दोन चपात्या आणखी घ्या. माशांची चव जिभेवर रेंगाळत ठेवायची असेल तर मग तुम्ही थेट बिल मागवा. नाहीतर इथली "सोलकढी' पण चांगली असते. किमान मी तरी "सोलकढी' घेतल्याशिवाय इथनं बाहेर पडत नाही. तुम्हीपण शक्‍यतो "सोलकढी' घ्याच.
दोन फिश थाळी, भरपूर चपात्या, "मांदेली फ्राय' किंवा "बोंबिल फ्राय'ची प्लेट आणि नंतर एक-दोन ग्लास "सोलकढी' हे झालं दोन जणांचं भरपेट जेवण आणि बिलाची रक्कम अवघी पावणेदोनशे दोनशे रुपये. बिल देऊन बाहेर पडल्यानंतर फक्त एक रस्ता क्रॉस केला की, समोरच पानाचा एक ठेला आहे. मसाला (मिठा) पानापासून ते फुलचंदपर्यंत सर्वप्रकारची पानं तिकडं मिळतात. फुलचंदही चांगलं कडक असतं. त्यामुळं तुम्ही पानाचे "शोकिन' असाल तर "सत्कार'समोरच्या पानवाल्यालाही "व्हिझिट' कराच.