Friday, December 28, 2007

गुजरातचा "आँखो देखा हाल'!


कार्यशैलीमुळेच मोदींचा विजय

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून गुजरातमध्ये कारकीर्द सुरू करणाऱ्या "त्या' तरुणाला संघ कार्यालयातील खोली विशेष पसंत नव्हती. त्याला खोली एका "इंटिरियर डिझाईनर'कडून सजवून घ्यायची होती. मात्र, वरिष्ठांनी "त्या' प्रचारकाला खोलीच्या सुशोभीकरणाची परवानगी नाकारली. ""कार्यालयात रहायचे असेल, तर प्रचारकाप्रमाणे व्यवहार असला पाहिजे,'' असे चार खडे बोलही सुनावल्याचे संघाचे जुने कार्यकर्ते सांगतात. वरिष्ठांचा मान राखत "त्या' प्रचारकाने आपल्या इच्छेला मुरड घातली व संघप्रचारकाला अपेक्षित साधी जीवनपद्धती स्वीकारली. अर्थात, पुढे प्रत्येक वेळी असे घडलेच असे नाही.

प्रचारक असतानाही संघाच्या करड्या शिस्तीची बंधने सैल करू पाहणारा तो प्रचारक म्हणजे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र दामोदरदास मोदी! वडनगरसारख्या छोट्या गावामध्ये जन्मलेल्या नरेंद्रचे वडील रेल्वे स्थानकावर चहाची टपरी चालवित असत. नरेंद्रही त्यांना मदत करीत असे. टपरीवाल्याचा मुलगा ते गुजरातचे मुख्यमंत्री असा प्रवास करणाऱ्या नरेंद्र मोदींची कामगिरी थक्क करून टाकणारी आहे.

सर्वसामन्यांची मने जिंकणारी कार्यपद्धती, प्रशासन तसेच अधिकाऱ्यांवर असलेली पकड, विरोधकांकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती, राजकीय डावपेच आखण्यातील हातोटी व उपजत असलेले संघटन कौशल्य असे अनेक गुण गुजरातमधील निवडणुकीदरम्यान जवळून अनुभवता आले.

मोदी हे अहमदाबादमध्ये प्रचारक असताना ते संघ कार्यकर्त्यांच्या घरी आठवड्यातून एकदा "वार लावून' जेवायला जात असत. परशुराम सहस्रभोजनी यांच्याकडेही ते आठवड्यातून एकदा-दोनदा जेवायला जायचे. नंतर संघाला चांगले दिवस आले आणि संघ कार्यालयांमध्येच जेवणाची व्यवस्था होऊ लागली; पण आपण ज्यांचे मीठ खाल्ले त्यांना मुख्यमंत्री झाल्यानंतरही मोदी विसरले नाहीत. ज्यांच्या घरी आपण "वार लावून' जेवलो त्या सर्व कुटुंबांची मोदी यांनी त्या कुटुंबीयांच्या घरी जाऊन भेट घेतली. इतकेच नाही तर त्यांनी आमच्यासारख्या मोजक्‍या आठ-दहा कुटुंबीयांना मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी भोजनाचे निमंत्रणही दिले, अशी आठवण सहस्रभोजनी कुटुंबीय आवर्जून सांगतात.

शिक्षकांनाही मोदींचा तोच न्याय! आपल्या आयुष्यात ज्यांनी आपल्याला शिक्षणाचे धडे देणाऱ्या 144 शिक्षकांचा सत्कार मोदींनी मुख्यमंत्री झाल्यानंतर केला. अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून त्यांनी स्वतःची "कॉमन मॅन' अशी प्रतिमा निर्माण करण्यास प्रारंभ केला आणि त्यामध्ये ते भलतेच यशस्वी झाले.

मोदी विवाहित असले तरी ते अविवाहिताप्रमाणेच आयुष्य जगले. इतर राजकीय नेत्यांच्या आजूबाजूला असणारे नातेवाईकांचे कोंडाळे त्यांच्याभोवती नाही. हा मुद्दाही मोदींच्या फायद्याचा ठरला. स्वच्छ प्रतिमेमुळेच "खातो नथी, खावा देतो नथी' ही मोदींची घोषणा बऱ्यापैकी यशस्वी ठरली. मोदींच्या कार्यकाळात गुजरातमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांची अवस्था खूपच "टाईट' आहे, अशी चर्चा अनेक ठिकाणी कानावर येत होती. या चर्चेला थोडे पाठबळ मिळाले ते मोदीविरोधी "अजेंडा' राबविणाऱ्या एका वृत्तवाहिनीच्या वरिष्ठ पत्रकाराकडून!

संबंधित पत्रकाराने आयसीआयसीआय बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक के. व्ही. कामत यांची एकदा मुलाखत घेतली. मुलाखतीनंतर कामत यांनी त्या पत्रकाराला मोदींबद्दल सांगितले. कामत म्हणाले, ""मध्यंतरी मोदी आणि माझी भेट झाली. तेव्हा मोदी यांनी मला व बॅंकेला सर्वतोपरी साह्य करण्याचे आश्‍वासन दिले. तसेच त्यांनी स्वतःच्या मोबाईलचा क्रमांक मला दिला. गुजरातमध्ये कोठेही तुम्हाला आडमार्गाने पैसे मागितले किंवा काही अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर थेट मला फोन करा. तो अधिकारी निलंबित झालेला असेल, असे मोदींनी सांगितले.'' कामत यांना गुजरातमध्ये तसा अनुभव आला नाही. अर्थात, राज्यात सर्वच खात्यांमध्ये अशी परिस्थिती असेल, असा दावा कोणीच करणार नाही. पण म्हणून कामत यांना आलेला अनुभव अगदीच दुर्लक्ष करण्यासारखाही नाही.

कॉंग्रेस, विविध स्वयंसेवी संस्था, अल्पसंख्याक व देशभरातील धर्मनिरपेक्ष संघटनांनी मोदींच्या विरोधात आघाडी उघडली होती. तथाकथित तटस्थ प्रसिद्धीमाध्यमेही मोदींवर खार खाऊन होती. हे कमी म्हणून की काय भारतीय जनता पक्षासह संघ परिवारातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, किसान संघ, विश्‍व हिंदू परिषद व बजरंग दल आदी संघटनांच्या काही कार्यकर्त्यांनीही मोदींविरुद्ध दंड थोपटले होते. "हिंदू सारा एक'चा नारा देऊन भाषणे ठोकण्यात "प्रवीण' असलेल्या विश्‍व हिंदू परिषदेच्या एका नेत्यानेही मोदींविरुद्ध आघाडी उघडली. केशुभाईंच्याच पटेल जातीच्या असलेल्या या नेत्याने शेकडो साधूंना मोदींविरुद्ध रस्त्यावर उतरविले. मोदींच्या कारकिर्दीत एक लाख गाई व अनेक साधूंची हत्या झाली, असे आरोप केले. "ये तो सारे संत है, मोदी तेरा अंत है'' अशा घोषणा असलेल्या जाहिराती प्रकाशित केल्या. पण तरीही मोदींची लोकप्रियता कमी झाली नाही.

इतके आरोप-प्रत्यारोप होऊनही मोदींची प्रतिमा मलिन झाली नाही किंवा त्याचा फटका मोदींना बसला नाही, असे का याबाबत स्पष्टीकरण देताना भाजपचे राज्यसभेतील खासदार जयंतीलाल बारोट यांनी मजेदार किस्सा ऐकविला. गाबाजी ठाकूर नावाचे जनसंघाचे एक जुने आमदार होते. ठाकूर यांच्या ताब्यात असलेली जमीन राज्य सरकारला हवी होती. मात्र, ठाकूर हे जमीन सरकारच्या ताब्यात देण्यास तयार नव्हते. ठाकूर हे आमदार असल्यामुळे सरकार जोर जबरदस्ती करून कारवाई करू शकत नव्हते. अखेर सरकारने वृत्तपत्रांमधून ठाकूर यांच्याविरुद्ध अपप्रचार सुरू केला. त्यांची निंदानालस्ती सुरु केली. चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला. एकवेळ असे वातावरण निर्माण झाले की, ठाकूर यांची अनामत रक्कम जप्त होणारच; पण आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे गाबाजी ठाकूर हे थोड्या थोडक्‍या नव्हे तर तब्बल 28 हजार मतांनी निवडून आले. त्यामुळे मोदींवर कोणीही कितीही चिखलफेक केली तरी त्याचा फटका न बसता मोदींना फायदाच होतो, अशी भाजप कार्यकर्त्यांची समजूत आहे.

सुरेश मेहता, काशीराम राणा आणि केशुभाई पटेल यांनी बंड करूनही मोदी तरले. कारण त्यांनी गेली विधानसभा तसेच महापालिका, जिल्हा परिषद व ग्रामपंचायत निवडणुकीतही पक्षविरोधी काम केले होते. ही मंडळी उघडपणे समोर आली. याची कुणकुण मोदींना पूर्वीपासून होती. त्यामुळेच त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीची तयारी गेल्या दीड वर्षापासून केली होती. मोदींनी एकूण 55 पटेल उमेदवार उभे केले. मोदी स्वतः इतर मागासवर्गीय आहेत. या समाजाची 55 टक्के मते गुजरातेत आहेत. पटेल समाजाला जवळ आणण्याचे प्रयत्न करताना मोदींनी इतर मागासवर्गीयांच्या 55 टक्‍क्‍यांवर विशेष लक्ष केंद्रित केले.

शिवाय भाजप किंवा पूर्वीच्या जनसंघामध्ये बंडखोरीला मतदार व कार्यकर्त्यांकडून विशेष प्रतिसाद मिळत नाही, हा इतिहास आहे. अगदी बलराज मधोकांपासून ते उमा भारतींपर्यंतचा इतिहास सर्वज्ञात आहे. त्यामुळे गुजरात त्याला अपवाद ठरणार नाही, हे निश्‍चितच होते. उत्सुकता होती ती या बंडखोर मंडळींची ताकद किती आहे, हे जाणून घेण्याची! आणखी एक गोष्ट म्हणजे चिमणभाई पटेल असो किंवा शंकरसिंह वाघेला गुजरातने कधीही बंडखोरांना पुन्हा संधी दिलेली नाही. त्याचीच पुनरावृत्ती केशुभाई आणि मंडळींबाबत झाली आणि बंडखोरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून निवडणूक जिंकण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न सपशेल फसला.

मोदींची आक्रमक कार्यशैली, प्रभावी वक्तृत्व आणि गुजराती अस्मितेला साद घालण्याची प्रवृत्ती यामुळे महिला आणि युवा वर्ग त्यांचा विशेष चाहता आहे. जेव्हा हा वर्ग मोठ्या संख्येने बाहेर पडला तेव्हाच मोदींचा विजय निश्‍चित झाला होता. शिक्कामोर्तब 23 डिसेंबरला झाले इतकेच!

4 comments:

HAREKRISHNAJI said...

perfect analysis

आपल्याला सगळ्यांना हे नविन वर्ष सुखासमाधानचे जाओ

Anonymous said...

Gostei muito desse post e seu blog é muito interessante, vou passar por aqui sempre =) Depois dá uma passada lá no meu site, que é sobre o CresceNet, espero que goste. O endereço dele é http://www.provedorcrescenet.com . Um abraço.

Anonymous said...

Gostei muito desse post e seu blog é muito interessante, vou passar por aqui sempre =) Depois dá uma passada lá no meu site, que é sobre o CresceNet, espero que goste. O endereço dele é http://www.provedorcrescenet.com . Um abraço.

Anonymous said...

Hi Dada hw r u???
Nice written on modi,
I really admire u....

Mandar Shiledar Baxi.