Saturday, December 15, 2007

रामकृष्ण रेस्तरॉं


"रामकृष्ण'मध्ये जेवा निवांत;
पण शेवटी "गडबड' हवीच !

कॅम्प व शुद्ध शाकाहारी "रेस्तरॉं'...? "ये बात कुछ हजम नही हुई...' असे जर वाटत असेल तर एकदा तरी वेस्टएंड चित्रपटगृहासमोरील "रामकृष्ण रेस्तरॉं'मध्ये जायलाच हवे.या रेस्तरॉंचे व्यवस्थापक आहेत देवेंद्र शेट्टी आणि या ग्रुप ऑफ हॉटेल्सचे प्रमुख आहेत सोमनाथ शेट्टी. सुरवातीला विलेपार्ले, त्यानंतर लोणावळा व सात वर्षांपूर्वी कॅम्पमध्ये हे "रेस्तरॉं' सुरू झाले. दक्षिण भारतीय, पंजाबी, चायनीज व चाट यातील "स्टार्टर'पासून ते "डेझर्ट'पर्यंत एकूण 362 पदार्थांचा भरगच्च "मेनू' सज्ज आहे.

"रामकृष्ण'च्या आवारात शिरताच सर्वप्रथम लक्ष वेधून घेते ती "रेस्तरॉं'ची ब्रिटिशकालीन भव्य दगडी वास्तू. वास्तूचे बहिर्रंग जुनेच असले तरी "रेस्तरॉं'चे "इंटेरियर' मात्र एकदम झकास. भव्य हॉल, त्यामध्ये भिंतीवर लाकडी नक्षीकाम, बसण्यासाठी लाकडी खुर्च्या आणि कोच, छताला टांगती झुंबरे. ही अंतर्गत सजावट पाहिल्यावर एखाद्या राजवाड्यामध्येच जेवायला आलो आहोत, असे वाटते. एकूण काय तर "रेस्तरॉं'चा "माहोल' एकदम मस्त आहे. "रामकृष्ण'चे आवार भव्य असल्याने "पिक अवर'मध्येही "पार्किंग'ची विशेष अडचण जाणवत नाही. "रेस्तरॉं'ची क्षमता 320 जणांची असली तरी कदाचित गर्दीमुळे थोडे थांबावे लागू शकते; पण घाबरू नका तुम्ही पाच असा वा पंचवीस, "ऑर्डर' दिल्यानंतर दहा मिनिटांमध्ये पदार्थ "सर्व्ह' झाले नाही तर मग बोला.

दक्षिण भारतीय पदार्थांमध्ये अर्थातच इडली, डोसा, उत्तप्पा आणि टोमॅटो ऑम्लेट यांचेच वर्चस्व. डोसाचे 27 विविध प्रकार "रामकृष्ण'मध्ये मिळतात. साधा, मसाला, कट, स्प्रिंग व म्हैसूर मसाला याप्रमाणेच मूँग डोसा हा मुगाच्या डाळीपासूनचा डोसा वेगळा म्हटला पाहिजे. कांदा रवा डोसा हीदेखील हटके "डिश'. उत्तप्प्याचेही अकरा प्रकार उपलब्ध असल्याने तुम्हाला निवडीची प्रचंड संधी आहे.

"चाट'मध्ये "क्रिस्पी फ्राय इडली चाट' आवर्जून खाण्यासारखा आहे. तळलेल्या इडलीवर गोड दही, तीन-चार प्रकारचे सॉस, चाट मसाला आणि शेव टाकून तयारी केलेल्या "इडली चाट'च्या भन्नाट "कॉंबिनेशन'ला मागणी असते. दिल्लीचा प्रसिद्ध "दही भल्ले पापडी चाट', कॉर्न भेळ तसेच "टोकरी चाट' हे पर्यायही आहेतच.

सूपमध्ये चायनीज व इतरत्र मिळणारी सर्व सूप आहेतच. पण "पालक सूप' हे "रामकृष्ण'चे वेगळेपण. उकडलेल्या पालकाची पाने "मॅश' करून घट्टपणासाठी त्यात "कॉर्न फ्लॉवर' किंवा आरारोट मिसळले जाते. मग थोडेसे क्रीम' आणि "गार्निशिंग'साठी किसलेले पनीर. नेहमीच चायनीज किंवा टोमॅटो सूप घेण्यापेक्षा हा पर्याय अधिक चांगला वाटतो.

"पंजाबी'मध्ये इतरत्र मिळणारे सर्वच पदार्थ येथे आहेत; पण त्यातही आलू मेथी, पनीर बटर मसाला, व्हेज चिली मिली, मकई सिमला, बेबीकॉर्न जालफ्रेझी हे पदार्थ खास! पनीर बटर मसाला हा पदार्थ इतर "रेस्तरॉं'मध्ये गोडसर असतो; पण "रामकृष्ण'मधील पनीर बटर मसाला गोड नाही. त्यामुळे चवीमध्ये फरक जाणवण्यासारखा आहे. "व्हेज चिली मिली' एकदम "स्पायसी'! सर्व भाज्या एकत्र परतून नंतर ग्रेव्ही व बटरमध्ये टाकून लसणाचा तडका दिला जातो. त्यामुळे "व्हेज कोल्हापुरी'पेक्षा "व्हेज चिली मिली'च अधिक चांगला पर्याय आहे. "पनीर भुर्जी' देखील "ट्राय' करायला हरकत नाही.

व्हेजमध्ये "चायनीज'ही आहे. त्यातही "इडली चिली' हे वैशिष्ट्य! इडलीचे तुकडे करून त्याला कॉर्नफ्लॉवरचे आवरण चढविले जाते. हे तुकडे "डीप फ्राय' करतात. मग तळलेल्या मिरच्या व चायनीज सॉसमध्ये इडलीचे तळलेले तुकडे घोळले जातात. सुरवातीला मन्च्युरीयन खातो आहोत की काय असेच वाटते; पण नंतर इडलीची चव कळते. लसूनी पनीर, पनीर जिंजर, पनीर, चिली, पनीर शेजवान व मशरूम बांबू शूट्‌स अशी "व्हरायटी' चायनीज "सब्जी'मध्ये आहे.

रोटी व नानमध्ये साधी आणि बटर यांच्याप्रमाणेच मेथी, पुदिना तसेच गार्लिक असे प्रकारही आहेत, तर राईसमध्ये व्हेज बिर्याणीप्रमाणेच काश्‍मिरी, पीज, शाहजानी, चीज, पनीर पुलाव अशी रेलचेल आहे; पण पालक खिचडी, दाल खिचडी किंवा दही खिचडी यांची मजा काही औरच!

आइस्क्रीम, फालुदा, ज्यूस आणि मस्तानी यांनी "मेनू कार्ड'चे रकानेच्या रकाने भरले आहेत; पण त्यातही लक्ष वेधून घेणारे नाव म्हणजे "गडबड'. उडुपीचा हा प्रसिद्ध पदार्थ. व्हॅनिला, स्ट्रॉबेरी, बटरस्कॉच, चॉकलेट व एखादे "सिझनल' आइस्क्रीम एकत्र केले जाते. त्यात फ्रूट सॅलड व जेली टाकले जाते. नंतर चेरी व "ड्राय फ्रूट' टाकून सजवितात. आइस्क्रीमवर तुटून पडणाऱ्यांनी शेवट "गडबड'नेच केला पाहिजे...!

हॉटेल रामकृष्ण
6 मोलेदिना रस्ता,
वेस्टएंड चित्रपटगृहासमोर,
कॅम्प, पुणे - 41101.
020-26363938

3 comments:

Anonymous said...

रामकृष्णा वरील लेख रुचकर आहे.

Anon.

HAREKRISHNAJI said...

जावुन आलो बर का. मस्त जागा आहे, पण पदार्थ मात्र तेवढे रुचकर नाहीत.

S.K. said...

रामकृष्ण हे कायमच आवडीचं ठरलेलं ठिकाण आहे. पदार्थांच्या रेलचेलीबरोबर माणसांचीही तोबा गर्दी इथे वर्षानुवर्षे पाहायला मिळते.

मला तेथील " मश्रूम मटार मसाला" फारच आवडतो....पार्टी द्यावी तर तिथेच हे ठरलेलंच आहे.