Monday, April 04, 2011

हटविलेला पुतळा कण्णगी यांचा

चेन्नईतही पुतळ्याचे राजकारण

पुतळ्यावरून झालेले रणकंदन आणि त्यानंतर मध्यरात्रीच्या काळोखात अचानकपणे हलविला गेलेला पुतळा... पुण्यात घडलेल्या या घटनेसारखीच घटना चेन्नईमध्येही घडली होती, जवळपास दहा वर्षांपूर्वी. रातोरात हटविल्या
गेलेल्या पुतळ्यामुळे संपूर्ण तमिळनाडूत त्याचे तीव्र पडसाद उमटले होते आणि साहित्यिक, कलावंत सामान्य नागरिकांनही त्याचा तीव्र शब्दात निषेध केला होता. हटविण्यात आलेला पुतळा होता महिलांच्या न्यायासाठी झगडणा-या आणि तमिळ महिलांचा आदर्श असलेल्या कण्णगी यांचा.

आठव्या शतकातील एका तमिळ महाकाव्यामध्ये कण्णगी या नायिका असून त्यांनी न्यायाच्या रक्शणासाठी आणि महिलांच्या हक्कांसाठी लढा दिला, असे त्या महाकाव्याचा आशय आहे. त्यामुळे गेल्या अनेक शतकांपासून कण्णगी या तमिळ अस्मितेच्या मानबिंदू बनलेल्या आहेत. कण्णगी हे पात्र काल्पनिक असले तरी
तमिळनाडूच्या काही भागात त्यांची आजही पूजा केली जाते. १९६८ साली झालेल्या वर्ल्ड तमिळ क़ॉन्फरन्समध्ये ठराव केल्यानंतर कण्णगी यांचा पुतळा मरीना बीच येथे बसविण्यात आला होता. पण २००१ मध्ये अण्णा द्रमुकचे
सरकार सत्तेवर असताना तो पुतळा एकाएकी रात्री अचानक हलविण्यात आला. त्यावेळी अण्णा द्रमुकचे . पनीरसेल्वम हे मुख्यमंत्री होते. जयललिता यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे राजीनामा दिला होता. त्यांच्या जागी
पनीरसेल्वम आले होते.पुतळा हटविण्याची तीन वेगवेगळी कारणे सांगितली जातात. पहिले कारण म्हणजे जयललिता यांच्यावर ओढविलेले संकट हे कण्णगी यांच्या पुतळ्यामुळे आलेले आहे. तो पुतळा त्याठिकाणी असल्यामुळेच जयललिता यांचा कठीण काळ सुरु झाला आहे, असे कोणीतरी जयललिता यांच्या मनात भरविल्यामुळेच तो पुतळा हटविण्यात आला, अशी एक थिअरी आहे. दुसरे म्हणजे कण्णगी यांच्या पुतळ्याची पाठ समुद्राकडे आहे, त्यामुळे पावसाने तमिळनाडूकडे पाठ फिरविली आहे, अशा कंड्या कोणीतरी पिकविल्या आणि त्यामुळे पुतळा हटविण्यात आला, असे काही जण सांगतात. अर्थात, सरकारने दिलेले कारण म्हणजे वाहतुकीला होत असलेला अडथळा. एका वाहनाने कण्णगी यांच्या पुतळ्याला धडक दिली होती, त्यामुळे तो दुरुस्तीसाठी हटविण्यात आला, अशी माहिती मुथ्थू रामचंद्रन यांनी दिली.

पुतळा हटविण्यात आल्यानंतर राज्यभरात सर्वत्र हलकल्लोळ माजला होता. लोकांनी निषेध मोर्चे काढले. विरोधकांनी एकत्र येऊन सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. पण जयललिता या कोणालाही बधल्या नाहीत. पुतळ्याला हानी पोहोचू नये, म्हणून तो वस्तूसंग्रहालयात ठेवण्यात आलेला आहे. पुतळा सुस्थितीत आहे, इतकेच जयललिता आणि पनीरसेल्वम माध्यमांना सांगत होते.

पुतळा हटविण्याचा विषय २००६ साली झालेल्या निवडणुकीचा मुद्दा झाला होता. पुन्हा सत्तेवर आलो तर पूर्वीच्याच ठिकाणी पुतळा पुन्हा सन्मानाने बसवू, असे आश्वासन करुणानिधी यांनी दिले होते. ते त्यांनी पाळले देखील. आज
कण्णगी यांचा पुतळा मरीना बीचवर मोठ्या दिमाखात उभा आहे. त्या पुतळा हटविण्याचा आणि पुन्हा बसविल्याचा उल्लेख करण्यास करुणानिधी अजिबात विसरलेले नाहीत.

बसमधून प्रवास करताना एका सहप्रवाशाला विचारले, की यंदा जयललिता सत्तेवर आल्यातर पुन्हा पुतळा हटवतील का? त्यावर त्याने उत्तर दिले, सरकार कोणाचे येणार याचा अंदाज अजून राजकीय पक्शांनाही आलेला नाही. त्यामुळे आपण येणार की नाही, याच चिंतेत ते आहेत. त्यामुळे त्यांना पुतळ्या बितळ्याची चिंता
सध्या नाही. तो नंतरचा प्रश्न आहे.

एसएसएम क़ॉलेजमध्ये इंजिनिअरिंगचे शिक्शण घेणा-या महेशकुमारला पुतळ्याबद्दल विचारले तर तो म्हणाला, नो आयडिया सरजी. आता बोला.

एमजीआर यांच्या घड्याळाची टिकटिक...
मरीना बीचवरच तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि तमिळनाडूतील सर्वाधिक लोकप्रिय सुपरस्टार एम जी रामचंद्रन यांची समाधी आहे. २४ डिसेंबर १९८७ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाचे दुःख सहन झाल्यामुळे तमिळनाडूत त्यावेळी ३० जणांनी आत्महत्या करून आपल्या लाडक्या अभिनेत्याच्या बरोबरच जीवन संपविले होते. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी मरीना बीच येथे एमजीआर यांची समाधी बांधण्यात आली आहे. द्रविडीयन चळवळीचे प्रमुख नेते अण्णादुराई आणि एमजीआर यांची समाधी शेजारीशेजारीच आहेत.

एमजीआर यांना महागडी घड्याळे जमविण्याचा आणि घालण्याचा मोठा शौक होता. त्यामुळे एमजीआर यांच्या काही अस्थि आणि त्यांच्या आवडीचे घड्याळ समाधीखाली ठेवण्यात आलेले आहे संपूर्ण काळ्या कुळकुळीत कडप्प्याने ही समाधी साकारलेली आहे. मध्यंतरीच्या काळात कोणीतरी अशी आवई उठविली की, समाधीच्या पृष्ठभागाला कान लावले, की अजूनही एमजीआर यांच्या घड्याळाची टिकटिक ऐकू येते. (पुण्यातही शनिवारवाड्यावर अजूनही काका, मला वाचवा, असे आवाज येत असल्याची अफवा गमतीनं का होईना कानावर येतेच) समाधीचे दर्शन घेण्यासाठी आलेले लोक दर्शन घेण्यापूर्वीच समाधीला कान लावून खरंच टीकटीक
ऐकू येते का? ते पाहतात.वास्तविक पाहता २४ वर्षांनंतर घड्याळाची टीकटीक कशी ऐकू येईल? पण आजही अनेक जण नित्यनियमाने कान लावून आवाज येतो का? ते ऐकतात. अगदी जीन्सची पँट आणि टी-शर्ट घातलेले तरुण-तरुणी यांनाही मोह आवरता येत नाही. मग काय, मी देखील उत्सुकतेपोटी समाधीला कान लावून काही ऐकू येतंय का, ते पाहिलं.
पण अपेक्शेप्रमाणे काहीच ऐकू येत नव्हतं. माझ्यानंतर एका क़ॉलेजमधल्या तरुणानं कान लावला. त्यालाही काही ऐकू आलं नाहीच. त्याला विचारलं, काही ऐकून आलं का? हे सगळे मूर्ख आहेत, हे वाक्य उच्चारण्यापूर्वी त्यानं जो
एक शब्द (खरं तर अपशब्द) उच्चारला तो ऐकून पुण्यातच असल्याचा भास झाला आणि धन्य झालो.

आजचे वाक्यः बसमधून प्रवास करताना शेजारी बसलेल्या एका मुलाला विचारलं,
मला तमिळ शिकायचंय, हे तमिळमध्ये कसं बोलणार?
तो म्हणाला, नानकू तमिळ कोत्तुकोनम्...

No comments: