Tuesday, November 29, 2011

श्री गुरुदेव दत्त संतप्त...


दत्त दत्त दत्ताची गाय, गायीचं दूध... या गाण्यामुळे आधीच चर्चेत आलेला देऊळ नावाचा चित्रपट काही दिवसांपूर्वी पाहिला। एका चांगल्या आणि जळजळीत विषयाला तोंड फोडल्याबद्दल कुलकर्णी बंधूंचे सर्वप्रथम अभिनंदन.

मध्यंतरी शिर्डीला गेलो होतो. शिर्डीचा जो बाजार झालाय तो पाहून भाव, भक्ती किंवा श्रद्धा या गोष्टी शे-पाचशे रुपयांना अगदी सहज मिळू शकतात, हे जाणवलं. शिर्डीचे साईबाबा काय, तिरुपतीचा बालाजी काय, प्रभादेवीचा सिद्धीविनायक काय, आणि कुठले कुठले देव काय. सगळेच भक्तीचे भुकेले. पण त्या मंदिरांच्या ट्रस्टचे काम पाहणारी मंडळी मात्र, वेगळ्याच भावाचे भुकेले असतात. त्यामुळेच काही हजार रुपये मोजले, की तातडीचे दर्शन. थोडे कमी पैसे दिले, की आणखी जास्त वेळ. अशा गुणोत्तराने दर्शनाची वेळ वाढत जाते. अगदी सर्वसामान्य म्हणून जो भक्त असतो, तो तासन्तास दर्शनाच्या रांगेत उभा आणि पैसेवाली मंडळी दोन मिनिटांच दर्शन घेऊन मोकळे. चहापासून ते राहण्यापर्यंत सर्वच गोष्टी दामदुपटीने विकून भक्तगणांना चक्क लुटणारी मंडळी आणि भक्तीचा मांडलेला बाजार. डोकं उठतं. त्यावर कोणी ना कोणी तरी आसूड ओढणे गरजेचेच होते. ते काम कुलकर्णी द्वयांनी केले. त्याबद्दल मनापासून अभिनंदन.

चित्रपटाचे संवाद एक नंबर आहेत. त्याबद्दल गिरीश कुलकर्णी यांना शंभरपैकी दोनशे मार्क दिले पाहिजेत. चित्रपटातील संवादामुळेच तो पाहणेबल झाला आहे. अन्यथा प्रेक्षकांवर किती अत्याचार झाले असते त्याचा विचारच करता येत नाही. काही ठिकाणी पातळी सोडल्याचे जाणवते. उदा. ठासली जाणे, गोट्या कपाळात जाणे इइ. पण इतके चालणारच.

पण चित्रपटाबद्दल सर्वाधिक महत्त्वाचा आक्षेप म्हणजे निवडण्यात आलेला देव। देवाची निवड चुकलीच म्हणायची. कारण गुरुदेव दत्त हा देव अजूनही बाजारापासून दूर आहे. नरसोबाची वाडी, गाणगापूर, गोंदवलेकर महाराज, स्वामी समर्थ, नवनाथ किंवा शेगांवचे गजानन महाराज या सर्वांचा बाजार मांडलेला नाही. खरीखुरी भक्ती तिथं अजूनही टिकून आहे. शिर्डीला जा आणि एकदा शेगांवला जा. दोन्हीमधला फरक वर्णन न करता येण्याजोगा आहे. शिवाय दत्त या देवाची ख्याती वेगळी असल्यानं त्याच्या वाटेला शक्य तो कोणी जात नाही. गुरुचरित्र वाचायलाही काही नियमावली असते. ती पूर्ण केली नाही तर गुरुचरित्राचे फायदे मिळत नाहीत. असा हा कडक देव. त्यामुळं दत्ताचा बाजार मांडण्याचे धाडस अजूनही कोणी केलेले नाही. खरा बाजार झालाय तो फकीर म्हणून आयुष्य काढलेल्या साईबाबांचा. महागड्या बालाजीचा आणि सिद्धीविनायकाचा.

वरीलपैकी कोणत्या तरी एकाही देवाविरुद्ध चित्रपट काढला असता तर तो थिएटर आणि मल्टिप्लेक्समध्ये चढण्यापूर्वीच त्याचा बाजार उठला असता. म्हणूनच, की काय कुलकर्णी द्वयांनी दत्त या साध्या भोळ्या आणि शांत देवाचा बाजार मांडून चूकच केली. किंवा त्यांच्यात खराखुरा बाजार झालेल्या देवांची कथा खरं तर व्यथा मांडण्याची हिंमत नसावी, इतकाच निष्कर्ष आपण काढू शकतो. शेवटी संस्कृतमध्ये म्हटलेच आहे,
वाघाचा सिंहाचा बळी दिला जात नाही। बोकडाचाच बळी दिला जातो. कारण तो शांत असतो, प्रतिकार करू शकत नाही. तसाच दत्ताचा बळी या चित्रपटात देण्यात आला आहे.

दुसरी खटकणारी गोष्ट म्हणजे, चित्रपटात झालेली कलाकारांची बजबजपुरी। दिलीप प्रभावळकर, नाना पाटेकर, सोनाली कुलकर्णी यांच्यापासून ते विभावरी देशपांडे, उषा नाडकर्णी, मोहन आगाशे, किशोर कदम आणि स्वतः गिरीश कुलकर्णी यांच्यापर्यंत बऱ्याच नटनच्यांचा गोतावळा चित्रपटांत जमविण्यात आला आहे. पण त्यामुळेच कोणत्याच नटाची छाप त्यामध्ये पडत नाही. दिलीप प्रभावळकर सुद्धा तीन-चार प्रसंगांमधूनच दिसतात. त्यांचे अगदी थोडेच संवाद प्रभावी आहेत. प्रभावळकर आणि नाना यांचा म्हणावा तसा उपयोग चित्रपटात झालेलाच दिसत नाही. कदाचित गिरीश कुलकर्णी यांची भूमिका त्यांच्या भूमिकेपुढे दुबळी वाटू नये, म्हणूनच दोघांनाही तोंडी लावण्यासाठी घेतले, की काय असे वाटते. तसे जर असेल तर तो त्यांचा अपमानच म्हटला पाहिजे.हे दोन झाले प्रमुख आक्षेप। बाकी दिग्दर्शनाचे म्हणाल, तर अनेक पुरावे देता येतील. मुख्य म्हणजे गावांतल्या झेंडावंदनाच्या कार्यक्रमानंतर लागलेले जयोस्तुते हे गाणे. भारतातील तमाम शाळांमध्ये तिरंगा फडकल्यानंतर राष्ट्रगीत म्हणजे जन गण मनच लागते. वंदेमातरम लाही अजून तो मान मिळालेला नाही. त्यामुळे जयोस्तुते लावणे चूकच आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हे माझे लाडके राष्ट्रपुरुष आहेत. जयोस्तुते हे उत्तम गीतही आहे. पण राष्ट्रगीताची जागा ते घेऊ शकत नाही. त्यामुळे इतकी गंभीर चूक होऊनही एकाही चित्रपट परीक्षकाने त्यावर बोट ठेवलेले नाही, याचे आश्चर्यच वाटते. आता गाणे घाईगडबडीत चुकून लागले आहे, असे दिग्दर्शकाला दाखवायचे असेल तर तो संदेश अजिबात पोहोचत नाही.

नंतर खटकणारी गोष्ट म्हणजे सकाळी गिरीश कुलकर्णीला मंदिरात प्रवेश मिळत नाही। सुरक्षारक्षक त्याला हाकलवून लावतात. मग रात्रीच्या वेळी गिरीश कुलकर्णीला मंदिरात प्रवेश कसा मिळतो आणि तो मंदिरातील दत्ताची मूर्ती चोरून पळून कसा जातो, या चमत्काराची कथा प्रेक्षकांना अजिबात कळत नाही. गिरीश कुलकर्णी हे दत्ताची मूर्ती कसा चोरतो, हे जर अधिक स्पष्टपणे दाखविले असते, तर मायबाप प्रेक्षकांवर उपकार झाले असते, असे ऍज अ प्रेक्षक म्हणून वाटते हं.

नंतर गिरीष कुलकर्णी जेव्हा दत्ताची मूर्ती पाण्यात बुडवितो तेव्हा ती पाण्यावर तरंगताना दाखविली आहे. मंदिरात मूर्तीची प्रतिष्ठापना करतात, तेव्हा एक तर ती मूर्ती दगडाची असते, संमगरवरी असते, प्लॅस्टर ऑफ पॅरिसची असते किंवा शाडूची असते. चित्रपटात दाखविलेली दत्ताची मूर्ती पाण्यावर तरंगताना दाखविली आहे. म्हणजे ती फायबरची असावी असे दिसते. दत्ताचे देवस्थान जर जागृत असेल तर तिथे फायबरची मूर्ती असूच शकत नाही. शिवाय मूर्तीचे विसर्जन करताना पाणी खळखळत असते पण नंतर ते अचानक शांत होते, असे दृष्यातून दिसते. खूप मोठ्या चुका आहेत, असे नाही. पण उघड्या डोळ्यांनी पाहिले तर जाणवते. तेव्हा कुलकर्णी मंडळींनी पुढील वेळी या बारीकसारीक गोष्टींचा जरूर विचार करावा.

ज्या गावामध्ये पोस्टमनही येत नाही, त्या गावात दिलीप प्रभावळकरच्या घरी इंटरनेट पोहोचलेले असते, दत्ताची प्रतिष्ठापना झाल्यानंतर पत्रकार किशोर कदम महासंग्राममधून आयबीएन लोकमतमध्ये पोहोचतो, हा विरोधाभास न पटण्यासारखा आहे. शिवाय काही दृष्यांमध्ये फिल्टर वापरून रात्र करण्याची चोरी जाणकार मंडळींच्या लगेच लक्षात येते.

चित्रपटात काही गोष्टी उगाच घुसडल्यासारख्या वाटतात। पहिली म्हणजे वेलकम राया ही लावणी कम आयटम साँग. आता त्यात निवडलेली आयटम इतकी बकवास आहे, की झक मारली आणि लावणी पाहिली, असे वाटते. गायिकेचा आवाज आणि लावणीचे शब्द सोडले तर लावणीत मादकता अजिबात नाही. प्लॅस्टिकचा बॉल आणि प्लॅस्टिकची बॅट काय, नाईट क्रिकेट काय, उचलून मारा, हळूवार मारा, अलगद मारा... ही म्हणजे अकलेची दिवाळखोरी वाटते. प्रेक्षक खिळवूनच ठेवायचे असेल तर एखादे सेक्स साँग किंवा कॅब्रे डान्सच टाकायचा ना. साईड साईडने कशाला खेळता. थेटच भिडा.

तीच गोष्ट नाना पाटेकर आणि सोनाली कुलकर्णी यांच्या सागरगोट्यांच्या दृष्याची. अजिबात आवश्यकता नसलेले आणि सोनाली कुलकर्णीला गुरुदेव गच्च दाखविणारे ते उठवळ दृष्य असेच प्रेक्षकांना चळवायला चित्रपटात घेतले आहे, की काय अशी शंका येते.

जाता जाता आणखी एक। नसिरुद्दीन शाह यांचा विनाकारण घुसडलेला प्रसंग। मुळात त्या प्रसंगाची आवश्यकता काय, की मोठा कलावंत मराठीत आणण्याचा अट्टहास, याचे उत्तर मिळत नाही. करडीच्या पायाला झालेली दुखापत तसेच नसिरुद्दीनच्या पायाला झालेली दुखापत, यातून दिग्दर्शकाला काय दाखवायचे आहे, हे समजत नाही. करडीच नसिरुद्दीन शहाच्या रुपाने तिथे आलेली असते, असे तर सुचवायचे नाही ना. तसे जर असेल तर हा अंधश्रद्धा पसरविण्याचाच प्रकार आहे. म्हणजे एका वाईट बाजूवर कोरडे ओढायचे आणि आपणच दुसरी वाईट बाजू उचलून धरायची, असे झाले. दिग्दर्शकाला त्या प्रसंगातून काय दाखवायचे हे समजत नाही. पण मी म्हणतो, तसे दाखवायचे असेल तर एक हजार वेळा निषेध.

तेव्हा अशा काही सुधारणा झाल्या असत्या तर देवळात अधिक प्रसन्न वाटले असते. बाकी देवा तुला शोधू कुठे आणि दत्त दत्त दत्ताची गाय ही गाणी एकदम झक्कास. एका चांगल्या विषयाला भिडल्याबद्दल अभिनंदन.

5 comments:

Vihang Ghate said...

चांदोरकर भक्तांनो फोडा प्रतिक्रिया (Comments) नाम टाहो...

Anonymous said...

या लोकाना वस्तुस्थितीशी देणेघेणे नाही. त्याना फक्त लाथा झाडावयाच्या आहेत.

Vihang Ghate said...

चांदोरकर, तुमची साक्षेपी समीक्षा आवडली...पण बरीचशी खटकली पण...भलतेच कडक दत्तभक्त दिसताय..अहो कुलकर्ण्यांनी सुरुवात केली ती काय कमी आहे...मराठीत असे नवनवीन प्रयोग होतायत...त्याचे किमान कौतुक तरी करा..नाहीतर हिंदीत तोच तोचपणा आहेच कि..

Anonymous said...

Ek number. Vishay vastu nakkich bhannaat, but Umesh Kulkarni is truly an overestimated filmmaker.

Prasad Trikolikar. said...

Marathit 1khada changala prayatn kelela suddha Marathi manasala avadat nahi. Varun chukat kadhat aahat tumhi.......Chandorkar tumacha nishedh.........