Saturday, December 24, 2011

एकच अटलजी...

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...


भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा आज वाढदिवस. २५ डिसेंबर. राजकारणी असूनही ते सर्वांपेक्षा वेगळे आहेत. कवी, रसिक आहेत. त्यामुळेच राजकारणी असूनही ते गेंड्याच्या कातडीचे नेते नाही. विरोधी पक्षातील लोकही त्यांच्याबद्दल अपशब्द बोलण्याची हिंमत करीत नाही. अटलजी आप अच्छे हैं लेकिन आपकी पार्टी गलत है... एक अटलजी बाकी सब शटलजी, फक्त इतकीच माफक टीका विरोधक करायचे. त्यामुळेच अटलजी हे अटलजी आहेत. त्यांची सर कोणत्याही नेत्याला येणार नाही. म्हणूनच आज ते सक्रिय राजकारणात नसले आणि चर्चेत नसले तरी वाजपेयी यांचे कोट्यवधी चाहते आहेत. त्यांच्यावर प्रेम करणारे लाखो लोक आहेत. लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात. मावळत्या सूर्याला कोणीही नमन करीत नाही. पण वाजपेयींचा करिष्मा इतका आहे, की आजही त्यांचा प्रभाव चाहत्यांवर टिकून आहे. मीही त्यापैकीच एक.

काल के कपाल पर लिखता मिटाता हूँ
गीत नया गाता हूँ, गीत नया गाता हूँ...

या कवितेप्रमाणेच अटलबिहारी वाजपेयी यांचे आयुष्य होते. अटलजींचा जन्म एका सर्वसामान्य शिक्षकाच्या घरी झाला. २५ डिसेंबर १९२४. अटलजींचे वडील कृष्णबिहारी हे शिक्षक होते. आपल्या पोरानं तेव्हा प्रतिष्ठेची असलेली सरकारी नोकरी करावी, अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. मुलाला एक वर्षे जास्त नोकरी करता यावी, यासाठी त्यांच्या वडिलांनी अटलजींची जन्मतारीख १९२४ ऐवजी १९२५ अशी लिहिली. पण काळाच्या पोटात काय दडले आहे, ते कोणालाच ठाऊक नसते. मग ते कृष्णबिहारी यांना तरी कसे ठाऊक असणार. आपला पोरगा सरकारी नोकरी करणार नाही तर चक्क सरकार चालविणार आहे, हे कोणाला ठाऊक असणार. पण अटलजींनी स्वतःच्या नेतृत्व, कर्तृत्व आणि वक्तृत्त्वाच्या जोरावर जे काही साध्य केले, ते सर्वांनाच अचंबित करणारे आहे.

अटलजी म्हणजे वक्तृत्तवाचा अमोघ झरा आणि निर्मळ मनाचा मनुष्य. विषय कोणताही असो त्यावर अभ्यासपूर्ण आणि लोकांची मने जिंकेल, असे भाषण हे अटलजींचे वैशिष्ट्य. मग विषय गीतरामायणाचा असो, भारत-चीन संबंध असो, पंडित जवाहरलाल नेहरू असो किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक श्री गुरुजी असो... अटलजींच्या मुखातून अक्षरशः सरस्वती बोलते आहे, असाच प्रत्यय यायचा. त्यामुळेच अटलजींचे जिथे कुठे भाषण असेल तिथे जाऊन ते ऐकायचे किंवा टीव्हीवर असेल तेव्हा कान तृप्त होईपर्यंत ऐकायचे, हे अगदी लहानपणापासून सुरु होतं. भाषणाला अगदी थोडा जरी उशीर झाला तरी ‘मैं देर से आया हूँ लेकिन बहोत दूर से आया हूँ’ हा अटलजींचा डायलॉग अगदी ठरलेला. तो त्यांनी प्रत्येकवेळी जरी म्हटला तरी त्यांच्या हिंदीमध्ये जी मिठास होती, ती कानावर पडली की टाळ्याच वाजायच्या. वक्तृत्त्वाच्या जोरावरच अटलजींनी हजारो सभा जिंकल्या.

माझ्यासारखे कोट्यवधी नागरिक त्यांच्या भाषणाचे चाहते आहेतच. पण भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे देखील वाजपेयींच्या भाषणांचे चाहते होते. वाजपेयी त्यावेळी अगदी युवा खासदार होते. त्यामुळे त्यांना भाषणाची संधी शेवटी शेवटी मिळे. पण परराष्ट्र धोरण आणि इतर कोणत्याही महत्त्वाच्या मुद्द्यांवर अटलजींचे भाषण ऐकण्यासाठी पंडितजी आवर्जून उपस्थित रहायचे. इंग्रजीत हिरेन मुखर्जी आणि हिंदीत अटलबिहारी वाजपेयी हे माझे आवडते वक्ते आहेत, असे खुद्द नेहरू यांनी म्हटल्याचे उल्लेख सापडतात. अशी वाजपेयींच्या वाणीची मोहिनी होती.


सुषमा स्वराज यांच्या पुढाकारातून जेव्हा लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज थेट दूरदर्शनवर पाहण्याची सुविधा उपलब्ध करून दिली तेव्हापासून तर वाजपेयींच्या भाषणाची पर्वणी अधूनमधून मिळतच गेली. १९९६ साली भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्त्वाखाली पहिल्यांदा केंद्रात सरकार आले. पण ते अवघे १३ दिवसच टिकले होते. त्यावेळी अटलजींनी राष्ट्रपतींकडे राजीनामा देण्यापूर्वी लोकसभेत केलेले भाषण अजूनही कानात आहे.

‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड करण्याचा प्रश्नच येत नाही. १९७७ मध्येही जनता पक्षाचे सरकार असताना हाच मुद्दा उपस्थित झाला होता. तेव्हाही आमची भूमिका तीच होती आणि आजही तीच आहे. संघाशी आमचे असलेले संबंध जगजाहीर आहेत आणि ते नाकारण्याचा संबंधच नाही. आमच्याकडे बहुमत नाही आणि बहुमतासाठी घोडेबाजार करण्याचा किंवा आपल्या विचारांशी प्रतारणा करण्याची आमची तयारी नाही. त्यामुळेच मी राष्ट्रपतींकडे राजीनामा देण्यासाठी निघालो आहे... ’ असे अगदी ठामपणे सांगणारे वाजपेयी आजही अगदी जशेच्या तसे डोळ्यासमोर आहेत. त्यानंतर त्यांना दोनदा भारताचे पंतप्रधान होण्याची संधी भारतीयांनी दिली. कदाचित १९५२ पासून एकाच विचारांशी निष्ठा बाळगल्याबद्दल तमाम भारतीयांनी त्यांना दिलेले हे बक्षिसच होते.

सी. के. जाफर शरीफ हे नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात रेल्वेमंत्री होते. त्यावेळी कोणत्या तरी विषयावरून संघाचा मुद्दा उपस्थित झाला. त्यावेळी जाफर शरीफ त्यांच्या भाषणात म्हणाले होते, की लहानपणी मी संघात जायचो. पण आता माझा संघाशी काहीही संबंध नाही. तेव्हा माझ्यावरही संघाचे संस्कार झालेले आहेत, असे तुम्ही म्हणाल का? त्यावर वाजपेयी यांनी क्षणाचाही विलंब न करत उत्तर दिले होते, वन्स अ स्वयंसेवक इज ऑलवेज अ स्वयंसेवक... त्यामुळे तुम्ही आजही संघाचे स्वयंसेवक आहात, असेच संघ मानत असेल. वाजपेयींच्या या उत्तरानंतर जाफर शरीफ यांची अवस्था काय झाली असेल, त्याचा अंदाज आला असेलच.

कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या गीता मुखर्जी यांचे निधन झाल्यानंतर त्यांना श्रद्धांजलनी वाहणारी भाषणे लोकसभेत सुरु होती. त्यावेळी वाजपेयी यांनी कम्युनिस्ट नेत्याचे भरभरून केलेले कौतुक अविस्मरणीय असेच आहे. वाजपेयी म्हणाले होते, की गीता मुखर्जी यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर कम्युनिस्ट पक्षाचाच कोणतरी उमेदवार निवडून येईल. तो त्यांची जागा घेईल. पण एक चांगल्या संसदपटू आणि अभ्यासू वक्त्या म्हणून आमच्या हृदयामध्ये त्यांची जी जागा आहे, ती कोण घेणार. असे एक ना दोन असंख्य प्रसंग आणि त्यांच्या वक्तृत्वाचे शेकडो किस्से इथे सांगता येतील. अशी त्यांची शैली होती.

अटलजी त्यांच्या भाषणांमधून तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर कडाडून टीका करीत असत. प्रसंगी त्यांच्यावरही जोरदार आसूड ओढत. पण बांग्लादेशच्या युद्धात पाकिस्तानला नामोहरम केल्यानंतर अटलजींनी इंदिरा गांधींचा उल्लेख दुर्गा असा केला होता. आपल्या विरोधकांचेही प्रसंगी कौतुक करण्याचा दिलदारपणा त्यांच्यात होता. त्यामुळेच विरोधी पक्षांमध्येही त्यांचे मित्र होते. चंद्रशेखर तर त्यांना माझे राजकीय गुरु असेच म्हणायचे. अशी अटलजींची महती होती, आहे आणि राहणार.अटलजी कविमनाचे असले तरी देशाचे नेतृत्व करताना त्यांचे हे कविमन आड आले नाही. पोखरणमध्ये ११ आणि १३ मे रोजी केलेले अणुस्फोट असोत किंवा कारगिलमध्ये पाकिस्तानला चारलेली धूळ असो, अटलजींचा कणखरपणाच वेळोवेळी दिसून आला. त्यांनी कधीच कोणाचीही भीडभाड बाळगली नाही. मग ते नरेंद्र मोदी का असेना. हिंदू तन मन हिंदू जीवन रग रग हिंदू मेरा परिचय... ही संघ परिवारातील कट्टर हिंदुत्ववाद्यांची आवडती कविता करणारे अटलजी हळव्या मनाचे असले तरी ते प्रसंगी कठोरही होत. भिवंडीत उसळलेल्या दंगलीनंतर त्यांनी संसदेत भाषण करताना ‘अब हिंदू मार नही खाएगा,’ असे ठणकावून सांगितले होते. पण वाजपेयी हे आंधळे किंवा झापडबंद हिंदुत्वावादी नाहीत. मुळात ते अडवाणी किंवा उमा भारती यांच्यासारखे कडवे तर नाहीतच. एकदम खुल्या दिलाचे आणि विचारांचे आहेत. त्यामुळेच गोध्रा दंगलीनंतर ‘राजधर्माचे पालन करा’ असे मोदींना निक्षून सांगण्याची हिंमत त्यांनी दाखविली. ती कदाचित आजही भाजपच्या कोणत्याही नेत्याकडे किंवा संघाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याकडे नाही.

दुसरीकडे प्रमोद महाजन यांनाही त्यांनी एका फटक्यात जमिनीवर आणले होते. त्यावेळी महाजन हे अटलजींचे डावे-उजवे दोन्ही हात होते. त्यामुळेच त्यांच्याकडे विज्ञान-तंत्रज्ञान आणि दूरसंचार अशी अगदी महत्त्वाची खाती होती. प्रमोद महाजन म्हणजे पीएम. भाजपचे पुढील प्राईम मिनिस्टर असे त्यांचे वर्णन केले जायचे. त्यावेळी महाजनांनी एका जाहीर सभेत सोनिया गांधी यांची तुलना बिल क्लिंटन यांचे संबंध असलेल्या मोनिका ल्युवेन्स्की हिच्याशी केली होती. त्यावेळी वाजपेयी यांना ही हीन दर्जाची टीका अजिबात रुचली नव्हती. योग्य ती वेळ साधून वाजपेयी यांनी महाजनांची दोन्ही खाती काढून घेतली होती, तसेच त्यांना पक्षाचे सरचिटणीस म्हणून काम करण्याची सूचना केली होती. मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या निवडणुकीची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. आपल्या जवळचा वगैरे असा विचार करून त्यांनी दोषी व्यक्तीला पाठिशी घातले नाही.

तीनवेळा भारताचे पंतप्रधान होणारे वाजपेयी हे एकमेव गैरकाँग्रेसी नेते. पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी या काँग्रेसच्या नेत्यांना ही संधी मिळाली होती. पण गैरकाँग्रेसी नेत्यांच्या स्वप्नातही येणार नाही, अशी कामगिरी वाजपेयी यांनी करून दाखविली. अर्थात, वैचारिकदृष्ट्या भाजपशी किंवा संघ परिवाराशी आयुष्यात कधी जमले नाही, अशा चंद्राबाबू नायडू, जॉर्ज फर्नांडिस, जयललिता, ममता बॅनर्जी, मायावती आणि फारूख अब्दुल्ला यांच्यासारख्यांची मोट वाजपेयी यांनी बांधली आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्त्वाखालील सरकार केंद्रात आणले. वाजपेयी राजकारणातून निवृत्त झाले आणि भाजपच्या नेतृत्त्वाची काय वाताहत झाली आहे आणि कोणकोणत्या राजकीय पक्षांनी त्यांची साथ सोडली आहे, हे सर्वज्ञातच आहे. त्यामुळे भाजपची सत्ता येण्यात वाजपेयी यांचे किती महत्त्वाचे योगदान होते, हेच यावरून स्पष्ट होते.

पुण्यातही १९९८ च्या लोकसभा निवडणुकीत पुणे विकास आघाडीच्या सुरेश कलमाडी यांना भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने पाठिंबा दिला होता। त्यावेळी त्यांच्या विरोधात अविनाश धर्माधिकारी यांनी निवडणूक लढविली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन कार्यवाह आणि धर्माधिकारी यांचे सासरे अनंतराव गोगटे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लेटरहेडवर एक पत्र प्रसिद्ध करण्याचा मुद्दा त्यावेळी खूप चर्चेत आला होता.

संघाच्या स्वयंसेवकांवर कोणत्याही विशिष्ट उमेदवाराचे काम करण्याचे बंधन नसते, असा त्या पत्राचा आशय होता। म्हणजे संघाच्या लोकांनी धर्माधिकारी यांचे काम करावे, हा त्यातील छुपा अर्थ. पण फक्त अटलजींच्या एका शब्दावर भाजपच्या निष्ठांवत मतदारांनी धर्माधिकारी नव्हे तर कलमाडींना मत टाकले होते आणि धर्माधिकारी यांना अवघ्या ३५ हजार मतांवर समाधान मानावे लागले होते.

असे वाजपेयी २५ डिसेंबर २०११ मध्ये ८८ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. प्रकृती अस्वाथ्यामुळे आज अटलजी जरी समोरच्या व्यक्तीला ओळखण्याच्या किंवा त्याच्याशी बोलण्याच्या परिस्थितीत नसले ते आहेत, हाच त्यांच्या चाहत्यांना दिलासा आहे. वाजपेयींवर ईश्वराची कृपादृष्टी कायम रहावी, अशीच त्याच्याकडे प्रार्थना.

7 comments:

Anonymous said...

Few known names born on 25 December: Jesus Isaac Newton
Humphrey Bogart
Muhammad Ali Jinnah
Atal Bihari Vajpayee
Ismail Merchant (producer)
Mani Kaul(Director)
Ravish Malhotra
(India cosmonaut, Soyuz)

Prasad Satkalmi

Anonymous said...

खूपच छान लेख लिहिला आहे. याच्‍याच जोडीला एखादी ऑडिओ अथवा व्‍हीडिओ टाकता आली तर ऐकायला छान वाटेल. धन्‍यवाद.

Moreshwar Gadre

Anonymous said...

Lekh avadala!! Dhanyawaad!!

Sameer Chitale

Anonymous said...

Vajpyeincha blog changala aahe. chnaglya mansanchi kiti chanchan aahe he vajpeyinche jeevan pahilyavar lakshat yete...

Abhay Shantaram Kulkarni

Anonymous said...

Ashish tumcha blog mi nehami vachatech asa nahi pan sahaj najar kali ani aplyala ekhada khajava milala ase vatale. tumchya lekhan shailichya mi ekdam prematach padle(manje ubhi rahile). nakkich tumhi ata eka motya paperche sampadk honar aha. hi gayatridevenchi bavishya vani ahe. tevha amhala visaru naka Rav...

Gayatri Kirit Kokje-Pathak

gwl said...

East r West Atalji is Best.

giftwithlove.com

roses said...

Atalji is great...
rosesandgifts.com