Sunday, May 06, 2012

धन्य धन्य हो प्रदक्षिणा पल्लिनाथाची...भर उन्हाळ्यात कोकणात जायच्या नुसत्या विचारानं घामाघूम व्हायला होतं. घामाच्या धारा वहायला लागतात. पण तरीही उन्हाळ्यामध्ये कोकणात आमची वारी ठरलेलीच असते. मला जरी जायला नाही मिळालं, तरी आमच्या घरची मंडळी हमखास कोकण गाठतातच. निमित्त असते, हनुमान जयंतीला होणाऱ्या आमच्या गावच्या उत्सवाचे. म्हणजेच पालीच्या लक्ष्मीपल्लीनाथाच्या उत्सवाचे.

लक्ष्मी पल्लीनाथ हे रत्नागिरी जिल्ह्यातल्या पाली या गावचे ग्रामदैवत. मुंबई-गोवा महामार्गावर कोल्हापूरकडे जाणारा फाटा जिथे फुटते, तिथेच पाली हे गाव आहे. पुण्यापासून साधारण दोनशे किलोमीटर अंतरावर. रत्नागिरीपासून 22 किलोमीटरवर. दरवर्षी चैत्र शुद्ध एकादशी ते चैत्र पौर्णिमा (हनुमान जयंती) या कालावधीत श्री लक्ष्मी पल्लीनाथाचा उत्सव मोठ्या उत्साहात पण अगदी साधेपणाने साजरा होतो. भपका कमी असल्यामुळेच तो तो अधिक भावतो.

काही कऱ्हाडे ब्राह्मण मंडळींचे श्री लक्ष्मी पल्लीनाथ हे कुलदैवत आहे. त्यामुळे कऱ्हाडे मंडळींपैकीच एखाद्या कुटुंबाने किंवा दोन-चार कुटुंबे एकत्र येऊन उत्सव साजरा करण्याची जबाबदारी घेतात. म्हणजे उत्सवादरम्यान घ्यावयाचे कार्यक्रम, भोजन आणि इतर व्यवस्था, मनुष्यबळ आणि आर्थिक गणितं, या सर्व गोष्टींची जबाबदारी संबंधित मंडळींना पार पाडावी लागते. मंदिर व्यवस्थापनानं भक्तांच्या सोयीसाठी राहण्याची व्यवस्था केलेली आहे. सात-आठ खोल्या बांधलेल्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या भक्तांची तिथं व्यवस्था होते. तिथं नाहीच झाली तर मग मंदिराच्या आजूबाजूलाच राहणाऱ्या गुरव मंडळींच्या घरी राहता येते. तीही व्यवस्था नाही झाली तर मग नेहमी येणारी मंडळी ओळखी पाळखीतूनच पाली गावातली घरं गाठतात. जसं आम्ही यंदाच्या वर्षी विलास चांदोरकर या आमच्या नात्यानं खूप खूप खूप खूप लांबच्या पण चांगल्या ओळखीच्या घरी राहिलो होतो.

उत्सवातील सकाळचा जरा जास्तच धार्मिक स्वरूपाचा असतो. अभिषेक, रुद्र, पूजा, आरती आणि मग महाप्रसाद असा कार्यक्रम असतो. त्यामुळे सकाळच्या आरतीला आणि भंडाऱ्याला येणाऱ्या मंडळींची संख्या अधिक. जेवणाला फार मोठा मेन्यू नसतो. साधा भात आणि आमटी, तोंडी लावायला मिक्स भाजी किंवा उसळ आणि ताक. मसाले भात असेल तर कढी आणि जिरा राईस असेल तर टोमॅटोचं सूप. मिक्स भाजी आणि उसळ कायम. सकाळ आणि संध्याकाळी बहुतेक वेळी यापैकीच काहीतरी मेन्यू असतो. शेवटच्या दिवशी मात्र, साग्रसंगीत पान असतं. पुऱ्या-कुर्मा भाजी, उसळ, भात, आमटी, ताक आणि शिरा, जिलेबी किंवा गुलाबजाम यापैकी एखादा गोडपदार्थ. अर्थात, एकदम साधं असलं तरी त्या जेवणाचा स्वाद काही औरच असतो. महाप्रसाद घेतल्यानंतर येणारी तृप्तता अवर्णनीयच म्हटली पाहिजे.


असो. पण या उत्सवाचे प्रमुख आकर्षण असते, ते संध्याकाळी होणारी आरती आणि रात्रीचा प्रदक्षिणा तसेच भोवत्यांचा कार्यक्रम. गणपती, शंकर, देवी, हनुमान, दत्त, पांडुरंग यांच्यासह आणखी तीन-चार देवांच्या आरत्या तुम्हाला येत असतील ती त्याचा फारसा उपयोग होत नाही. म्हणजे संध्याकाळी जेव्हा आरत्या सुरू होतात, त्यावेळी भलत्याच देवांच्या आणि भलत्याच वेगळ्या आरत्या म्हटल्या जातात. म्हटल्या म्हणण्यापेक्षा गायल्या जातात, असं म्हणणं जास्त योग्य. गणपती, देवी, शंकर, सूर्यनारायण, महालक्ष्मी, पल्लीनाथ, लक्ष्मी रमणा, त्रिभुवन सुंदर दशावतार, श्रीकृष्ण आणि अशा अनेक. तबला, पेटी आणि टाळ यांच्या संयोगातून निर्माण झालेला विलक्षण आवाज आणि सोबतीला पाच-पन्नास जणांच्या स्पष्ट पण उच्च रवातील आरती. मन अगदी प्रसन्न होऊन जातं. कानाची भूक कधी भागते कळतंही नाही.


बरं, कोकणाचं वैशिष्ट्य म्हणजे तबला, पेटी आणि टाळ वाजविण्यात जवळपास प्रत्येक जण अगदी माहीर. आपण पानावर जितक्या सहजतेनं बसतो, तितक्या सहजतेनं ही मंडळी पेटी किंवा तबला वाजवायला बसतात. बरं, नुसतं पेटी वाजवली असं नाही. काळी एक, काळी दोन वगैरेची चर्चाही तिथं रंगते. मग कुठला सूर कुठे कसा कमी पडला किंवा जास्त झाला, याच्या खाणाखुणाही होत असतात. टाळ कुटणे हा वाक्प्रचार कसा पडला असेल, याचे उत्तर आपल्याला या आरतीच्या वेळी मिळतं. ही मंडळी इतक्या खुबीनं आणि इतकं मन लावून टाळ वाजवितात, की धन्य व्हायला होतं. टाळ नावाचं छोटेखानी वाद्य हे ताल, लय आणि आवाज यासाठी इतकं आकर्षक असू शकतं, हे फक्त कोकणातल्या त्या आरत्यांच्या वेळीच कळतं.

आरत्या झाल्या, की मग रात्रीचं जेवण, त्यानंतर एखाद्या बुवांचं भजन किंवा कीर्तन आणि मग प्रदक्षिणा अन् भोवत्या. प्रदक्षिण म्हणजे छबिना. देवाचा मुखवटा सजविलेल्या पालखीत ठेवण्यात येतो आणि मग मंदिराच्या प्रवेशव्दाराच्या समोरून प्रदक्षिणा सुरू होते.

‘’धाव रे गणराया, पाव रे गणराया, मंगलमूर्ती तू मोरया, मूर्ती तू मोरया’’ या पारंपरिक गीतानं प्रदक्षिणेची सुरूवात होते. सोबतीला टाळ आणि टिमकी असतातच. भजन, भक्तिगीत, देवादिकांवरील गाणी वगैरे यावेळी म्हटली जातात. एक जण पहिल्यांदा सांगतो आणि मग बाकीचे लोक त्यामागून म्हणतात, अशी पद्धत. ही प्रदक्षिणा चार भागांमध्ये होते. मंदिरासमोरून ते डाव्या हाताच्या मध्यापर्यंत. तिथून मंदिराच्या मागेपर्यंत. मागपासून ते उजव्या भागाच्या मध्यापर्यंत आणि मग तिथून मंदिराच्या समोरपर्यंत. एका प्रदक्षिणेत चार भजनं किंवा देवाची गाणी होतात. जेव्हा पालखी चारवेळा थांबते तेव्हा आपण नेहमी म्हणतो त्या देवांच्या आरत्या म्हटल्या जातात. प्रत्येकवेळी थांबल्यावर एक कडवं म्हटलं जातं. म्हणजे देवळाच्या डावीकडे थांबल्यानंतर सुखकर्ता दुःखहर्ता, देवाच्या पाठिमागे थांबल्यानंतर रत्नखचितफरा तुज गौरीकुमरा आणि उजवीकडे थांबल्यानंतर लंबोदर पितांबर फणिवर वंदना... प्रत्येक आरतीच्या वेळी अशीच पद्धत.
एक प्रदक्षिण पूर्ण झाल्यानंतर मग भोवत्या होतात. एका रात्रीत पाच प्रदक्षिणा आणि पाच भोवत्या होतात. भोवत्या म्हणजे देवळासमोरच्या मोकळ्या जागेत भक्तगण गोल रिंगण करून तालबद्ध फेर धरतात. एखादं भजन किंवा एखादं गाणं किंवा एखाद्या मंत्रावर भोवत्यांसाठी ताल धरला जातो. म्हणजे ओम गं गणपतये नमो नमः श्री सिद्धीविनायक नमो नमः, या मंत्रावर सुद्धा भोवत्या पार पडतात. यावेळी वेगवेगळ्या पदन्यासांद्वारे नृत्याचा फेर धरला जातो. लोकांच्या उत्साहानुसार वीस-पंचवीस मिनिटं प्रत्येक भोवतीचा खेळ चालतो. नृत्याचा वेगही मग कमी जास्त केला जातो. सुरुवातीला हळूहळू नंतर वेगाने आणि नंतर पुन्हा हळूहळू अशा क्रमाने भोवत्यांचा फेर धरला जातो. पंधरा वीस मिनिटं मजबूत घाम निघाल्यानंतर मंडळी पुन्हा ताज्या दमानं नव्या प्रदक्षिणेसाठी तयार. हा प्रदक्षिणा आणि भोवत्यांचा हा खेळ पहाटे अडीच-तीनपर्यंत चालतो. ‘’धन्य हो प्रदक्षिणा पल्लीनाथाची...’’ हे प्रदक्षिणेत म्हटलं जाणारं शेवटचं भजन. त्यानंतर मग पल्लिनाथाची आरती आणि त्यानंतर मंडळी घरी जातात.

शेवटच्या दिवशी प्रदक्षिणा आणि भोवत्यानंतर मग लळिताचं किर्तन चालतं. ते पहाटे पाच साडेपाचपर्यंत चालतं. अगदी लहानथोरांपासून मंडळी या सर्व उपक्रमांमध्ये मोठ्या उत्साहानं सहभागी होतात. सर्व कार्यक्रमांमध्ये रवी भाट्ये यांची उपस्थिती उत्साहवर्धक असते. प्रचंड पाठांतर, तबला, पेटीची इतकी जाण, भजनाला लागणारा आवाज या सर्व गोष्टी त्यांच्याकडे आहेत. त्यामुळंच उत्सवाचं नियोजन कोणाकडेही असलं तरी सर्व उत्सवाचे कर्ते धर्ते तेच असतात. आरत्या, प्रदक्षिणा किंवा भोवत्या यापैकी कोणतीही गोष्ट त्यांच्याविना अगदी अपूर्ण वाटते.


उत्सवाचं हेच आकर्षण प्रत्येकाला दरवर्षी तिथं खेचून आणतं. अगदी अवघड असेल तरी एखाद्या दिवशी उत्सवाला हजेरी लावून जाण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. कोकणातल्या प्रत्येक गावातच असे उत्सव साजरे होत असतील, त्यामुळं त्या मंडळींना या उत्सवाचं फारसं अप्रूप नसणार. पण जन्मापासून आतापर्यंत घाटावरच किंवा मुंबईत राहिलेल्या माझ्यासारख्या अनेक जणांना हा उत्सव म्हणजे पर्वणीच वाटतो.

6 comments:

Anonymous said...

देवाचा उत्सव कायमच भावतो सगळ्यांना.. त्या निमित्ताने सगळे जमतात तरी... निदान २१व्या शतकात सुद्धा आपापले उद्योग सोडून जमतात हे काही कमी आहे?
खूप सुंदर लिहिलंय.. अगदीच छान.. तिथे जायला तर जमलं नाही कधी.. पण आपल्या ब्लॉग च्या निमित्ताने दर्शन झालं...
====

S.K.

Sukrut Karandikar said...

mast Ashish....pan Ma.Ta.mule marathi bighadli ki kay tuzi??? ....Kokanatalya Pali chya devacha mahaprasad aani...."tondi lavayla mix bhaji", "jira rice asel tar tomatoch soup,"...vachtana khatkale. Aso, pan nantar che varnan chitrmay zale ahe. Aavdale.

Anonymous said...

लहानपणी "या पल्ली नगरीत वास करुनी, तारीतसे सज्जना" असा श्लोक आईने शिकवला होता.

Dileep Athavale

Anonymous said...

Devlache praveshdwar sundar.

Sukrut Karandikar

प्रमोद कोनकर said...

पल्लीनाथाचं, उत्सवाचं वर्णन छान! मंदिर, परिसर आणि माहात्म्यही आहेच, पण ते काही समस्त कऱ्हाडे ब्राह्मणांचं कुलदैवत नाही. वेगवेगळ्या कऱ्हाड्यांची कुलदैवतं वेगवेगळी आहेत.
बाकी वर्णन उत्तम.

ashishchandorkar said...

कोनकर साहेब धन्यवाद. आपण सांगितलेला बदल केलेला आहे.

आशिष चांदोरकर