Wednesday, May 09, 2012

हृदयस्पर्शी काकस्पर्श
सुंदर कथा, हृदयस्पर्शी संवाद, उत्तम अभिनय, कथेला साजेशी आणि तेव्हाच्या परिस्थितीला अनुरूप वातावरण निर्मिती, कोकणातील पारंपरिक वाटेल इतके चपखल संगीत आणि निसरड्या वाटेवरील गंभीर विषय असूनही कुठेही न ओलांडलेली सीमारेषा... अशा सर्वच जमेच्या बाजू असल्यामुळे महेश वामन मांजरेकर यांचा ‘काकस्पर्श’ हा चित्रपट प्रत्येकानं आवर्जून पहावा, असाच आहे. अगदी सुरूवातीपासूनच शेवटपर्यंत चित्रपट मनाचा ठाव घेतो.

कोकणातील एका ब्राह्मण कुटुंबातील साधारण 1930 ते 1950 च्या सुमारास घडणारी ही कथा आहे. अत्यंत बोल्ड विषय उत्तम पद्धतीने हाताळल्यामुळे कथेचे गांभीर्य अधिकच वाढल्यासारखे वाटते. आपल्या धाकट्या भावाच्या निधनानंतर तिच्या पत्नीवर जडलेल्या अव्यक्त प्रेमाची ही कथा आहे. पण त्याला कुठेही वासनेचा किंवा शारिरीक संबंध किंवा स्पर्शाचा लवलेशही नाही.

हरी (सचिन खेडेकर) नावाची एक व्यक्ती आणि तिच्या कुटुंबाभोवती चित्रपटाची कथा फिरते. हरीच्या लहान भावाचे म्हणजेच महादेवाचे (अभिजीत केळकर) लग्न उमा म्हणजेच केतकी माटेगांवकरशी निश्चित होते. उमाला पहायला गेल्यानंतर सारा कार्यक्रम आटोपतो. त्यात महादेव गप्पच असतो. हरीच उमाला दोन-चार प्रश्न विचारतो. त्यामुळे रूबाबदार हरी हाच आपला भावी नवरा आहे, असाच उमाचा गैरसमज होतो. चित्रपटातील पुढील कथानकाची हीच नांदी ठरते.

लग्नानंतर काही महिन्यांतच महादेवचे निधन होते. उमा वयात आलेली नसल्यामुळे म्हणजेच फणस पिकलेला नसल्यामुळे महादेव आणि उमा यांचे लग्नानंतर मीलन न होताच तो मुंबईला जातो. त्यानंतर एकदिवस उमाचे नहाणं येते. त्यामुळं तिचा फलशोधनाचा कार्यक्रम निश्चित होतो. त्या कार्यक्रमानंतर दोघांमधील अंतर संपुष्टात येणार, अशी पद्धत. पण फलशोधन कार्यक्रमाच्या दिवशीच महादेवाची प्रकृती प्रचंड खालावते आणि त्या रात्रीच म्हणजे पहिल्या रात्रीच तो जातो. त्यामुळे फलशोधनाचा अर्थ म्हणजे नक्की काय, त्या रात्री काय होते, याबाबत काहीच कल्पना उमाला येत नाही. कुठेही उथळपणा किंवा सवंगपणा न दाखविता सर्व प्रसंगांचे दाखविलेले आहेत.

त्यानंतर मग उमाचे केशवपन (सोवळी करणे) इइ सर्व प्रथा परंपरा मागे लागतात. पण प्रत्येकवेळी हरी उमाला त्यापासून वाचवितो. हरीची पत्नी तारा आजारी पडली असताना घराची जबाबदारी उमाच हाताळत असते. हरीच्या दोन्ही मुलांचे संगोपन आणि घराची जबाबदारी ती लिलया हाताळते. हरी आणि उमा हे परस्परांना खूप आवडतात, हे ताराला समजलेले असते. त्यांच्यातील संबंध कोणत्या स्तरापर्यंत पोहोचलेले आहेत, याची शहानिशा करण्यासाठी अवघडलेली तारा बिछान्यावरून बाहेर येते आणि चक्कर येऊन पडते. त्यातून ती बरी होतच नाही आणि मृत्युला कवटाळते. तेव्हा ती हरी आणि उमा यांनी लग्न करावे, असा प्रस्ताव हरीसमोर ठेवते. मात्र, हरी तसे काहीच नसल्याचे सांगून त्याला स्पष्ट शब्दात नकार देतो. त्यानंतर त्या दोघांमधील अव्यक्त, अस्पर्शित आणि विलक्षण अशी प्रेम कहाणी पुढे सरकते. ती कशी ते वाचण्यापेक्षा पडद्यावर थेट पाहण्यातच खरी गंमत आहे.

देवाच्या उत्सवाला खऱ्या रेड्याऐवजी पिठापासून तयार केलेल्या रेड्याचा बळी देण्याचा विचार हरी समर्थपणे मांडतो. तो सुधारक विचारांचा असतो. पण तोच हरी आपला लहान भाऊ आणि पत्नी गंभीर झाल्यानंतर देव पाण्यात ठेवून त्यावर अभिषेक करायला सुरूवात करतो. माणूस कितीही सुधारक असला तरी अनेकदा त्याला देवाचाच आधार असतो, ही परिस्थिती चित्रपटातून अत्यंत उत्तमप्रकारे उलगडली आहे.

फलशोधनाचा कार्यक्रम काय असतो, मला त्याची गंमत कधी कळलीच नाही गं, ऐन तारूण्यामध्ये किती वर्ष दिवसातून दोन दोन – तीन तीन वेळा गार पाण्याने आंघोळ करायची. मीच काय केलंय, माझा काय दोष हा उमाच्या (प्रिया बापट) तोंडचा संवाद तेव्हाच्या बालविधवांच्या किंवा तारूण्यात वैधव्य आलेल्या तरुणींची परिस्थिती स्पष्ट करण्यासाठी पुरेसा बोलका आणि प्रभावी आहे. अक्षरशः तो संवाद आणि प्रसंग पाहून अंगावर काटा आल्यावाचून रहात नाही.चित्रपटातील अनेक संवाद खूपच बोल्ड स्वरुपाचे आहेत. पण तरीही मर्यादा न ओलांडल्यामुळेच तो पाहणेबल झाला आहे. अन्यथा गल्लाभरू आणि छछोर चित्रपटांच्या यादीतच त्याचे नाव समाविष्ट झाले असते. पण सर्व सीमा सांभाळण्यात मांजरेकर आणि त्यांची टीम यशस्वी झाली आहे. खऱ्या अर्थाने बोल्ड आणि वेगळ्या विषयावरील उत्तम चित्रपट निर्माण केल्याबद्दल महेश वामन मांजरेकर आणि त्यांच्या सर्व टीमचे अभिनंदन.

ता. क. – चित्रपटातील जन्म बाईचा गं बाईचा खूप घाईचा हे गीत फारच छान लिहिलेले आहे. आणि चित्रिकरणही छान झाले आहे.

दुसरे म्हणजे महादेवाचे आजारपण, ताराचे तारापण आणि अखेरीस उमाचे आजारपण या साधारण पंधरा वीस वर्षांच्या किंवा त्यापेक्षाही अधिक कालावधीत अनेक कलाकार लहानाचे मोठे होतात. मोठ्येच वृद्ध होतात. पण गावातील वैद्यबुवा मात्र, आहे तसेच दाखविलेले आहेत. वैद्यबुवा इतकी वर्षे स्वतःची प्रकृती कशी काय बुवा तशीच ठेवतात, हे आम्हाला न उलगडलेले कोडे आहे. कदाचित वैद्य असल्यामुळेच त्यांनी स्वतःचे आरोग्य जपले असावे. पण न थकलेले वैद्यबुवा आम्हाला खटकले. बाकी सर्व उत्तम.

जन्म बाईचा बाईचा, खूप घाईचा... गाण्याची लिंक
http://www.youtube.com/watch?v=818YYByaDtA&noredirect=1

5 comments:

theartandcraftgallery said...

you are good at writing review. It was really good sumup of the movie. mi nakki baghin

अनिकेत वैद्य said...

Please check the movie "The japanise wife". it is also having same kind of story.

Anonymous said...

Nicely elaborated as usual.

Keep it up.

Will watch definitely.

Thanks for sharing such a wonderful blog.

अमोल केळकर said...

जन्म बाईचा गं बाईचा खूप घाईचा हे गीत फारच छान लिहिलेले आहे. - १०० % सहमत. दोन दिवसापुर्वी सारेगमच्य महा अंतीम सोहळ्यात हे हाणे ऐकले. खूप आवडले

K P said...

आशिषराव,

काहींचे केस तसेच काळे राहणे हे मराठीवाल्यांनी बहुतेक हिंदीतकडून घेतले आहे. हीरो मोठा झाला तरी त्याच्या वडिलांना मारणारा खलनायक फक्त कानाच्या पुढचे कल्ले पांढरे करून असतो. इज्जतदार चित्रपटात (१९८९) गोविंदा मोठेपणी आईला भेटायला भेटायला येतो. लहानपणी घर सोडलेले असते. डायरेक्टरने आधीचा लहानपणचा शॉट ओके करून लगेच पुढचा मोठेपणचा शॉट घेतला असावा, अशी शंका नव्हे तर खात्रीच पटते. सगळे पांढरे सोडाच केसांची एक बटही पांढरी दाखवलेली नाही त्यात आईची. दृष्य बघताना अख्खे विजय टॉकीज फिदीफिदी हसल्याचं आठवतंय.