Friday, May 02, 2014

मुक्काम पोस्ट अमेठी...

नाव मोठ्ठं... लक्षण खोट्टं... 

रायबरेली परवडलं, इतकं अमेठी भकास आणि बकवास आहे. साठ-साठ वर्ष मतदारसंघावर राज्य करणाऱ्या गांधी घराण्याने नरेंद्र मोदींच्या विकासाच्या गुजरात मॉडेलची चर्चा करण्याआधी अमेठी नि रायबरेली विकास मॉडेलची चर्चा केली पाहिजे. अमेठीमध्ये रस्ते नाहीत. अरुंद बोळ म्हणजेच रस्ते. उघड्या गटारांमधून वाहणारे सांडपाणी, सांडपाण्यामुळे प्रचंड संख्येने निर्माण झालेले डास, अरुंद रस्त्यांमुळे सदैव होणारे ट्रॅफिक जाम. अमेठी मतदारसंघातील शेकडो गावांमध्ये आजही वीज नाही. मुख्य रस्त्यापासून गावाकडे जाणारे सर्व रस्ते आजही मातीचेच.अमेठीमध्ये राहण्यालायक एक लॉज नाही की एक चांगल्या दर्जाचे हॉटेल नाही. चांगलंचुंगलं खायला साधं रेस्तराँही नाही. खायचं तर हातगाडीवरचं किंवा एखाद्या टपरीवरचं. गावात छोटं-मोठं हॉस्पिटलही नाही. त्यामुळं साध्या-सुध्या उपचारांसाठीही दूरदूर जावं लागतं. इथं एकही महाविद्यालय नाही. म्हणजे मॅनेजमेंट, इंजीनिअरिंग, मेडिकल आणि उच्च शिक्षण देणारी एकही संस्था नाही. गावाच्या इतर तालुक्यांपासून अमेठीसाठी बससेवा नाही. सकाळी आणि संध्याकाळी एकच बस अशी दुर्दशा. छोट्या-मोठ्या खासगी गाड्या आणि टमटम वगैरे सुविधांसह प्रवास करवा लागतो. मुळात अमेठी म्हणजे मोठ्ठं खेडं आहे. नाव मोठ्ठं आणि लक्षण खोट्टं. साठ वर्षे राज्य करणाऱ्यांनी मग केले काय, हा प्रश्न उपस्थित होतो.पूर्वीच्या गौरीगंज जिल्ह्याचे नाव बदलून मायावतींनी त्याचे नाव राजर्षि शाहूमहाराज नगर असं केलं. फक्त नावं बदलून काहीही होत नाही, हे या राजकारण्यांना कोण समजावणार. मुलायमसिंह यांनी शाहूमहाराज नगरऐवजी जिल्ह्याचं नामकरण अमेठी असं केलं. मात्र, जिल्ह्याचं मुख्यालय आजही गौरीगंजलाच आहे. अमेठीपासून साधारण तेरा किलोमीटर अंतरावर. जिल्ह्याला अमेठीचे नाव फक्त नावाला. सर्व व्यवहार गौरीगंज येथेच होतात. 

विकासाच्या गप्पा मारणाऱ्या गांधी घराण्यानं स्वतःच्या मतदारसंघात काय विकास केलाय, खरं तर काय दिवे लावलेत तेच पाहण्यासाठी मला अमेठीमध्ये जायचं होतं. लखनऊहून सकाळी निघालो. कानपूर रोडवर थोडं अंतर कापल्यानंतर मग डावीकडे सुल्तानपूर रोडला वळलो. साधारण 85 किलोमीटर अंतरावर जगदीशपूर नावाचा तालुका आहे. त्याचा समावेश अमेठी मतदारसंघात होतो. अमेठीतील पाच मतदारसंघापैकी तीन ठिकाणी समाजवादी पक्षाचे आमदार असून दोन ठिकाणी काँग्रेस आहे.जगदीशपूर तालुक्यात भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार स्मृती इराणींचा दौरा होता. त्यांनी मतदारसंघात  जोर लावला आहे. रोज 35 ते 40 गावांमध्ये जाऊन त्या मतदारांशी संवाद साधतात. जगदीशपूरपासून पाचच किलोमीटर अंतरावर इराणी यांच्या गाड्यांचा ताफा होता. मात्र, हे पाच किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी मला अर्धा तास टमटमची वाट पहावी लागली. शेवटी एका बाईकवाल्याला विनंती करून त्याच्या मागे बसलो आणि संबंधित गावांमध्ये पोहोचलो. 

मुख्य रस्त्यापासून आत गेल्यानंतर लगेचच मातीचा रस्ता. त्यामुळे काही मिनिटांतच काळ्या जीन्सचा रंग मातकट झाला आणि आणखी काही तासांनी तर मला बदामी रंगाची जीन्स घातली आहे, की काय असा भास होऊ लागला. गावांमध्ये ना धड रस्ते, ना विद्यार्थ्यांसाठी शाळा ना वीज. काहीच नसलेल्या गावांमध्ये स्मृती इराणी यांच्या प्रचाराचा ताफा पोहोचतो. शंभर सव्वाशे गावकरी त्यांची वाट पाहत थांबलेले असतात. गावातील बूथप्रमुखांना स्मृती इराणी स्वतः गंध लावतात. त्यांना भाजपचे उपरणे देऊन सात तारखेसाठी शुभेच्छा देतात. गावकरीही त्यांचे हार घालून स्वागत करतात. त्यांच्यावर पुष्पवर्षाव करतात. हे सोपस्कार पार पडल्यानंतर स्मृती इराणी गावकऱ्यांच्या शैलीतच त्यांच्याशी संवाद साधतात. भाईसाहब, एक बार गौरीगंज के एक गाव में गई थी... बहनजी अभी अभी आते हुए... वगैरे वगैरे अशी अगदी सहजपणे भाषणाची सुरवात करतात. तुमचा खासदार तुम्हाला दहा वर्षांत एकदा भेटायला येत नाही, मी गेल्या महिनाभरात दुसऱ्यांदा आले. यापुढेही कायम येत राहणार. गौरीगंजमध्येच आता मी घर घेतले आहे. अमेठीची रहिवासी झाले आहे. त्यामुळे मी कायम येत राहीन वगैरे सांगून आश्वस्त करीत राहतात. राहुल संसदेत गॅस सिलिंडरवर बोलतात, मात्र, इथे अमेठीत लोकांना चार-चार महिने रॉकेलवर भागवावं लागतं. महिलांना गावाची नजर चुकवून रात्री-अपरात्रीच विधींसाठी जावं लागतं, गावात माध्यमिक शिक्षणाची सोय नाही, अशा विषयांना हात घालतात.सिल्कचा कारखाना लागणार म्हणून लोकांनी स्वतःच्या जमिनी कवडीमोल भावाने सरकारला दिल्या. मात्र, ना कारखाना लागला ना जमिनी परत मिळाल्या. जमिनीचा मालक असलेला शेतकरी कंगाल झाला आणि दिल्ली-मुंबईत मोलमजुरी करण्यासाठी त्याला जावे लागले. पुन्हा जर तुम्हाला मालक बनायचे असेल आणि सुखाचे जीवन जगायचे असेल तर गांधी घराण्याला हद्दपार करा. इतकी वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसने काही केले नाही. आता काँग्रेस विरोधात बसणार आहे. विरोधात बसणारे गावाचा काय विकास करणार. सत्तेत येणाऱ्या भाजपला मतदान करा, असे आवाहन केल्यानंतर टाळ्यांचा कडकडाट.अमेठीतील रस्त्यांची लांबी नाही, तर खड्ड्यांची खोली मोजली जाते, असं वाक्य येताच गावकरी टाळ्यांचा कडकडाट करतात. जणू त्यांना हे वाक्य मनाला भिडलेलंच असतं. गावात वीज नाही. भविष्यात जर वीज हवी असेल तर सात मे रोजी घराबाहेर पडून कमळाचे बटण दाबा आणि काँग्रेसच्या उमेदवाराला जोरदार करंट द्या, असे आवाहन करून पुढच्या गावाकडे रवाना होतात. साध्या-सोप्या पण प्रभावी शैलीत नागरिकांशी संवाद साधतात. तितक्याच हजरजबाबीपणे माध्यमांशी बोलतात. राज्यसभा टीव्हीच्या प्रतिनिधीने त्यांना सवाल केला, अमेठी ही क्यो... स्मृती इराणींचा प्रतिसवाल... क्यो नही. अमेठीमध्ये इतक्या वर्षांत काहीच झाले नाही, म्हणून मी येथे आले आहे इत्यादी इत्यादी. 

 जगदीशपूरमध्ये रामलखन पासी हे भाजपचे माजी आमदार भेटले. ते कल्याणसिंह यांच्या काळात राज्यमंत्री होते. त्यांनी मतदारसंघामध्ये 85 रस्ते बांधले. मात्र, नंतरच्या काळात एकही नवा रस्ता बांधण्यात आला नाही किंवा जुन्या रस्त्यांची डागडुजी करण्यता आली नाही, ही त्यांची खंत ते बोलून दाखवितात. पासी यांचा पुतण्या असलेल्या राजन पासी यांच्या बोलेरो गाडीतून मग पुन्हा जगदीशपूरमध्ये आलो. प्रमोद महाजन यांना मी माझ्या याच गाडीतून एकदा सभास्थळी सोडलं होतं.... वगैरे आठवणी तो जाताजाता सांगतो. मखदूमपूर, देवकली, पुरेगोसाई, लखनीपूर वगैरे गावातून प्रवास झाल्यानंतर स्मृती इराणी यांच्या प्रचार दौऱ्यातून बाहेर पडून पुन्हा गौरीगंजच्या दिशेने निघालो. अर्थातच, राजन पासीच्या गाडीतून. त्यानं जगदीशपूरला सोडलं. मात्र, तिथून अमेठीसाठी थेट गाडी नव्हती. चार-पाच टमटम बदलून जावं लागणार होतं. भर दुपारच्या उन्हात चार-पाच टमटम बदलून अमेठीला जाणं अगदी जिवावर आलं होतं. पण देव धावून येतो, असं म्हणतात तसा एक स्कॉर्पिओवाला माझ्या मदतीला धावून आला. हात दाखविल्यानंतर थांबला आणि त्यानं मला गौरीगंज येथे सोडण्याचं कबूल केलं. 

काय योग असतो बघा, तो स्कॉर्पिओवाला निघाला शिवसैनिक. उत्तर प्रदेश शिवसेनेचा माजी अध्यक्ष. रविदत्त शर्मा. नोएडा येथे राहणारा. पंडित म्हणजे ब्राह्मण असलेल्या शर्माजींनी सध्या शिवसेनेपासून दूर होऊन परशुराम सेना स्थापन केली आहे. अर्थात, त्यांच्या व्हिजिटिंग कार्डवर जय  हिंदुराष्ट्रचा नारा आहे. शिवाय शिवसेनेची जबाबदारी नसली तरी अजूनही ते स्वतःला सैनिकच मानतात. मनोहर जोशी, मधुकर सरपोतदार यांच्यापासून ते मोहन रावले - अनंत गीतेंपर्यंत अनेक जण माझ्या घरी येऊन गेले आहेत, असं ते सांगत असतात. मातोश्रीवर वर्षातून एकदा तरी जातोच, असंही आवर्जून सांगतात.इथं मात्र, ते आले होते ते प्राध्यापक कुमार विश्वास यांच्या प्रचारासाठी. विश्वास हे त्यांचे साडू लागतात. जिंकण्याची आशा नसली तरी कुमार विश्वास यांनी चांगली हवा तयार केली आहे, असं ते सांगत असतात. गेल्या चार महिन्यांपासून त्यांनी ठिय्या मांडला आहे. गावागावात जात आहेत. राहुल यांच्या कामाचा पर्दाफाश करीत आहेत. तिकडे स्मृती इराणी आणि इकडे कुमार विश्वास. विश्वास यांच्या प्रचारासाठी तीन दिवस अरविंद केजरीवालही अमेठीतच आहेत. मात्र, 49 दिवसांत राजीनामा दिल्याचा निर्णय अमेठीतील अनेकांना मान्य नसल्याचे लोकांशी बोलताना जाणवले. त्याचा फटका विश्वास यांना बसणार हे नक्की. बोलता बोलता गौरीगंज येतं आणि मी उतरतो.

खचाखच भरलेल्या प्रायव्हेट बसमधून घामाघून होत मग अमेठीच्या दिशेनं निघतो. रस्ता दुपदरी आणि एकदम गुळगुळीत. गौरीगंजपासून तेरा किलोमीटर जाण्यासाठी अर्धा तास लागतो. जागोजागी लोक चढत-उतरत असतात. अखेरीस अमेठीत पोहोचतो. प्रचंड ट्रॅफिक जाममुळं गावाच्या आधीच थोडं उतरून चालत जाणं परवडतं. आधीच वर्णन केल्याप्रमाणं एकदम नियोजन नसलेलं आणि अस्वच्छ गाव. गावातून फिरताना लोकांशी बोलणं होत असतं. राहुल गांधी जिंकणार, असाच प्रत्येकाचा सूर असतो. अमेठीत काही रिक्षाचालक, पथारीवाले, हातगाड्यांवर कुमार विश्वास यांचे स्टीकर्स लावलेले दिसतात. उत्सुकतेने त्यांना विचारल्यानंतर ते देखील आम आदमी पार्टी अच्छी है... असं मोजकंच सांगतात. चहाच्या टपरीवर काही तरुण भेटतात. अमेठी कसंय, विचारल्यानंतर भलतेच भडकतात. म्हणतात, काय आहे इथं. काहीही नाहीये. सांडपाण्यामुळे फक्त मोठ्ठे मच्छर आहेत. रात्री उघड्यावर राहून पहा दुसऱ्या दिवशी काय हालत होते. राहुल गांधींनी काहीही केलेलं नाही. आमच्यासाठी शिक्षणाची व्यवस्था नाही. नोकऱ्या नाही. बेरोजगार आहोत. लष्करात सहभागी होण्यासाठी प्रयत्नशील आहोत. तिथं नाही झालं तर काय कराचयं प्रश्नचिन्हच आहे इइ. जनता भावनिक आवाहनांना भुलते, गांधी घराण्याला भुलते नि मतदान करते, असं त्यांचं म्हणणं. परिवर्तन व्हायला पाहिजे, पण ते होण्याची शक्यता कमीच आहे. कारण गांधी घराण्याची जादू अजूनही आहे. भले त्यांनी काहीही केलेलं नसलं तरीही. या वाक्यावर मी त्यांचा निरोप घेतो. काँग्रेसचे नेते अशोक श्रीवास्तव भेटतात. ते सोनिया गांधी आणि दहा जनपथच्या बरेच जवळचे आहेत, अशी माहिती मिळते. ते काँग्रेसचे राजकारण आणि विकास यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न करतात. हे पहा, राहुल यांनी बराच पैसा आणला. त्यांनी मतदारसंघावर लक्ष  ठेवण्यासाठी नेमलेल्या लोकांना त्यांच्या कल्पना सांगितल्या. त्या कशा राबविता येतील, तेही सांगितले. मात्र, स्थानिक पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्ते राहुल यांच्या विश्वासाला पात्र ठरले नाहीत. त्यांनी गावात, मतदारसंघात काहीही विकास केला नाही. राहुल त्यांच्यावर विसंबून राहिले आणि लोकांच्या रोषाला आता सामोरे जावे लागत आहे. अर्थात, लोकांचा रोष स्थानिक नेत्यांवर आहे. राहुल गांधी यांच्यावर नाही... असं सांगून ते राहुल यांचे समर्थन करण्याचा प्रयत्न करीत असतात. आता राहुल यांना त्यांची चूक समजली आहे. ते पुढील काळात चांगल्या पद्धतीने मतदारसंघाकडे लक्ष देतील आणि काही चुका सुधारतील, असं श्रीवास्तव सांगत असतात.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे काँग्रेसच्या काही नेत्यांनुसार, राहुल यांनी विकासाच्या अनेक योजना आणल्या. मात्र, स्थानिक सरकार समाजवादी पक्षाचे असल्यामुळे त्यांनी विकासाला खोडा घातला. म्हणजे काँग्रेसने विजेचे खांब रोवले. मात्र, वीज देणं हे राज्य सरकारचं काम आहे. ते त्यांनी केलं नाही, असले हास्यास्पद दावे अमेठीच्या अशिक्षित मतदारांना सांगण्यासाठी योग्य असू शकतात. मात्र, देशभरात तुम्ही असे दावे केले तर तोंडावरच आपटणार ना... कन्नोज आणि मैनपुरीतून काँग्रेस लढत नाही. अमेठी नि रायबरेलीतून समाजवादी पक्ष उमेदवार देत नाही, अशी सेटिंग करण्यासाठी तुम्ही एकत्र येता आणि गावकऱ्यांना वीज पुरविण्यात मात्र, परस्परांना खोडा घालता, हे कोणाला तरी पटू शकेल काय... अमेठीचा आढावा घेतल्यानंतर मग तिथून निघतो. अमेठीचं रेल्वे स्टेशन मात्र, खूपच छान आणि चकचकीत आहे. अमेठीही जर स्टेशनसारखं झालं तर खूपच बरं होईल. शेवटी जाता जाता एकच गोष्ट सांगायची राहून गेली. स्मृती इराणी यांचा निरोप घेताना त्यांनी माझ्याशी मराठीतून संवाद साधला. म्हणाल्या, पाहिलंत ना काय हालत आहे ती. थोडं लिहा याबद्दल. लोक कोणत्या परिस्थितीत राहताहेत हे देशभरात कळलं पाहिजे. मनोहर पर्रीकर आले होते. ते  मला, म्हणजे स्मृती इराणी यांना म्हणाले, की आमच्याकडे जर लोेकप्रतिनिधींनी असा कारभार केला असता, तर गोवेकर जनतेने त्यांना जोड्यानं मारलं असतं. 

व्वा... क्या कहा है... अमेठीमध्येही लवकरात लवकर विकास होवो... किंवा गोवेकर जनतेप्रमाणे त्यांच्यातही अकार्यक्षम लोकप्रतिनिधींना जोड्यानं मारण्याची हिंमत निर्माण होवो, अशी इच्छा व्यक्त करून अमेठी सोडलं...

असो... खूपच लिहिलंय असं वाटतंय... तेव्हा थांबतो. लवकरच बाराबंकीचा फेरफटका...

10 comments:

Unknown said...

आशिष मित्रा...
तंतोतंत दर्शन घडवलेस भकास अमेठी च...
धन्यवाद ...
कॉंग्रेस दुसर काय करणार यार ?

Unknown said...

खुप सुंदर लेख ....

Digambar Darade said...

Sirji very very nice

Moreshwar Apte said...

Chhan safar ghadawatoyes mitra....keep it up..

drshingote said...

मस्तच, अमेठीत गेल्यासारखं वाटलं.

arun b. khore said...

Ashish,really yu put in detail the sorry state of AMETHI..only god can save the people of amethi..arun khore.

Gopal Hage said...

भाऊ छान विश्लेषण ।।।।

kiransays said...

खूपच सुंदर. शरद पवार हे नेहमी गांधींपेक्षा उजवे का वाटतात, हे तू केलेले वर्णन वाचून पटू लागते. कॉंग्रेस का हाथ कभी नही आम आदमी के साथ. जय हो... !

Asmya said...

An eye-opener to the pathetic state of affairs.Sucks to know that Rahul will still be elected as MP. He's not even fit to be a corporator.

DATTA JADHAV said...

शिवसैनिक भेटल्याचे समाधान नक्कीच मोठ आहे...अमेठीची अशी अवस्था असेल तर नक्कीच दणका बसायला हवा