Thursday, May 22, 2014

धर्मापलिकडची ‘चाह’

उत्तर प्रदेशातील महान चहावाला


उत्तर प्रदेशात निवडणुकीचा माहौल अनुभवण्यासाठी जाण्यापूर्वीच काही गोष्टी ठरविल्या होत्या. त्यापैकी एक म्हणजे ऐकूलाल या लखनऊमधील चहाविक्रेत्याची आवर्जून भेट घ्यायची. ‘सोनी टीव्ही’वरील ‘क्राइम पॅट्रोल–दस्तक’ या कार्यक्रमात ऐकूलाल या चहाविक्रेत्याचा एपिसोड पाहिला होता. ज्यांनी ज्यांनी हा एपिसोड पाहिला असेल त्यांना त्या माणसाच्या मोठेपणाची महती यापूर्वीच कळली असेल. खूप मोठं काम करणाऱ्या सामान्य माणसाला भेटण्याची इच्छा तीव्र होती. त्यामुळे लखनऊला गेल्यानंतर दोन दिवसांपैकी एक दिवस इतर गोष्टींप्रमाणेच ऐकूलाल यांच्यासाठी राखून ठेवला.


लखनऊमधील कैसरबाग या मुस्लिमबहुल भागात ऐकूलाल यांचा चहाचा स्टॉल आणि त्यांच्या मागेच झोपडीवजा घर आहे. ‘आगे दुकान पिछे मकान स्टाइल’. टीव्हीवर झळकलेला असून देखील ऐकूलाल या चहावाल्याला कैसरबाग परिसरात कोणीही ओळखत नव्हतं, याचं खरं तर आश्चर्य वाटलं. चहावाले, पानवाले, रिक्षावाले, सायकल रिक्षावाले, इतकंच काय कैसरबाग पोलिस चौकीत जाऊनही चौकशी केली. पण ऐकूलाल यांचा चहाचा स्टॉल नेमका कुठं आहे, त्याबद्दल कोणालाच काहीही सांगता येईना. अनेकांना ऐकूलाल कोण हे देखील माहिती नव्हतं.

थोड्याशा निराश मनानंच तिथून निघण्याचं ठरवलं. पण म्हटलं अजून एकदा नेटवर सर्च करून पाहूयात, कुठं नेमका पत्ता मिळतो का ते. नेटवर सर्च केल्यानंतर काही बातम्या वाचल्या, पण कोणीही कैसरबाग या पलिकडे जाऊन पत्ता दिलेला नव्हता. अखेर ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या बातमीनं माझं काम फत्ते केलं. त्या बातमीमध्ये कैसरबागमधील बारादरी परिसरातील लखनऊ पार्क येथे ऐकूलाल यांचा चहाचा स्टॉल आहे, असा स्पष्ट उल्लेख होता. खरा बातमीदार अखेर ‘इंडियन एक्स्प्रेस’चाच निघाला. बाकीच्यांच्या बातम्या फक्त पोकळच. 
 
एकदा सविस्तर पत्ता कळल्यानंतर मग ऐकूलाल यांचा स्टॉल शोधून काढणं फार काही अवघड नव्हतं. पाचच मिनिटांमध्ये त्यांच्या चहाच्या स्टॉलवर गेलो. टीव्हीवर आपले नाव ऐकून थेट महाराष्ट्रातून एक जण आपल्याला भेटायला आला आहे, यामुळं त्यांनाच भरून आलं. खरं तर त्या माणसाच्या मोठेपणामुळं मलाच भरून आल्यासारखं झालं होतं. फक्कड चहा पाजून त्यांनी माझं स्वागत केलं. मग गप्पा सुरू झाल्या. 

लखनऊमधील हजारो चहावाल्यांपैकी एक चहावाला ही ऐकूलाल यांची ओळख नाहीच. आपल्या चहाच्या गाडीजवळच्या पार्कमध्ये सापडलेल्या अडीच वर्षाच्या मुस्लिम मुलाचा सांभाळ करणारा हिंदू पिता, ही त्यांची खरी ओळख. धर्मांचा उल्लेख करण्याची काही आवश्यकता नाही, असं अनेकांना वाटू शकतं. मात्र, उत्तर प्रदेशसारख्या राज्यात ही घटना घडल्यामुळं धर्मांचा उल्लेख मला आवश्यक वाटतो आहे. तसंही दोन्ही धर्मांमधील एकूणच संबंध पाहता, भारतात कुठंही ही घटना घडली असती तरी धर्मांचा उल्लेख करावाच लागला असता. ऐकूलाल यांनी खूप मोठे काम अगदी सहजपणे केले आहे. 


… तर ही घटना आहे २००२ मधली. फेब्रुवारी महिन्यात ऐकूलाल यांना सकाळच्या सुमारास लखनऊ पार्कमध्ये एक मुलगा सापडला. तो तेव्हा साधारण अडीच वर्षांचा असावा. तो स्वतःचं नाव अकबर सांगत होता. त्याला फक्त अम्मी, अब्बू आणि अकबर हे तीनच शब्द माहिती होते. त्यावेळी ऐकूलाल यांनी त्याला घरी आणलं. त्याला खाऊपिऊ घातलं. मग पोलिसांकडे जाऊन अकबर सापडला असल्याची माहिती दिली. काही आठवडे, काही महिने उलटल्यानंतरही पोलिस अकबरच्या खऱ्या आई-वडिलांचा शोध घेऊ शकले नाही. दरम्यानच्या काळात अकबर ऐकूलालकडेच आनंदानं रहात होता. 

अकबरला अनाथालयात देऊन टाक, असा सल्ला शेजारच्या पाजारच्यांनी, मित्रांनी दिला. मात्र, ऐकूलाल यांच्या मनाला ती गोष्ट पटत नव्हती. त्यामुळे अकबरचे खरे आई-वडील मिळेपर्यंत स्वतःच त्याचा सांभाळ करण्याचा निर्णय घेतला. अकबर मिळाला तेव्हा तो खूपच अशक्त होता. त्याच्या हात-पाय तिरके होते. त्याला लिव्हरचा त्रास होता. त्यामुळं त्याचं पोट काही खाल्लं-प्यायलं की फुगायचं. त्याला मलेरियाही झाला होता. होतं नव्हतं ते सगळं विकून पैसा उभा केला आणि ऐकूलाल यांनी त्याच्यावर प्रचंड उपचार केले. त्याला सुदृढ बनविलं. 


पाहता पाहता काही वर्ष उलटली तरीही पोलिसांना त्याचे खरे आई-वडील कोण, याचा पत्ता लागत नव्हता. पोलिसांनी लखनऊसह उत्तर प्रदेशात अकबरचा फोटो आणि सर्व माहिती पाठविली. कुठे मिसिंगची कम्प्लेंट नोंदविलण्यात आली आहे का, हे पाहिलं. पण तशी नोंद कुठंच नव्हती. मुळात अकबरच्या वडिल अलाहाबाद इथं राहणारे. गुत्त्यावर जाऊन दारू पिल्यानंतर ते अकबरला तिथं विसरून आले. आधीही दोनदा ते आपल्या पोटच्या पोराला दारुच्या गुत्त्यावर विसरले होते. मात्र, सुदैवानं त्यांना अकबर सापडला. तिसऱ्यांदा मात्र, अकबर पुन्हा त्यांच्याकडे परतलाच नाही. इकडे ऐकूलालनंही आसपासच्या मशिदींमध्ये अकबरच्या आई-वडिलांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. येणाऱ्यांपैकी कोणाचा मुलगा हरवला आहे का, हे विचारून पाहिलं. पोलिसांप्रमाणेच त्यालाही यश आलं नाही. 

अकबर ऐकूलालकडे राहूनच मोठा होत होता. ऐकूलालनं घेतलेला सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे त्यांनी अकबरचा धर्म आणि नाव बदललं नाही. त्याचा धर्म मुस्लिमच ठेवला. अकबरला मुस्लिम पद्धतीनं शिक्षण मिळेल, याची व्यवस्था केली. त्याला कुराण शिकविलं जाईल, मुस्लिम धर्मानुसार चांगली तालीम मिळेल, मुस्लिम धर्मानुसार जे काही संस्कार असतील ते त्याच्यावर होतील, याची खबरदारी घेतली. तो नियमितपणे नमाज पढेल, याची काळजी घेतली. मात्र, अकबरला शाळेत घालण्याच्या वेळी अडचण आली. त्याचं नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव यामध्ये विसंगती असल्यानं शाळेनं त्याला सुरुवातीला प्रवेश नाकारला. अशा मुलाला शाळेत इतर कोणीही स्वीकारणार नाही वगैरे वगैरे. पण अखेरीस सत्य परिस्थिती सांगितल्यानंतर शाळेनंही अकबरला प्रवेश दिला. 

ऐकूलाल आणि अकबर यांच्यावर एका चॅनेलनं स्टोरी केली. ती स्टोरी अकबरच्या खऱ्या आई-वडिलांनी पाहिली आणि त्यांनी मग ऐकूलालकडे त्याचा ताबा मागण्यासाठी धाव घेतली. नंतर अकबरच्या ताब्यासाठी ते सेशन कोर्टात गेले. अकबरने ऐकूलाल हेच त्याचे वडिल आहेत आणि मला त्यांच्याकडेच रहायचे आहे, असं स्पष्टपणे सांगितल्यामुळं खऱ्या पालकांच्या अडचणी वाढल्या होत्या. पण देव आणि दैव ऐकूलालच्या बाजूनं होतं. प्रथम सेशन कोर्टानं आणि नंतर हायकोर्टानंही ऐकूलालच्या बाजूनंच निकाल दिला. ऐकूलालची आर्थिक परिस्थिती आणि इतर गोष्टी लक्षात घेतल्या तर ही केस लढणं देखील त्यांना मुश्किल होतं. पण संकटाच्या समयी अनेक हात मदतीला धावून येतात, तसे अनेक मदतीचे हात ऐकूलालच्या दिशेनं पुढे आले. वकिलांनी रुपयाही न घेता ही केस लढली. अनेकांनी अकबरच्या पालन पोषणासाठी आर्थिक मदत केली इइ.


ऐकूलालकडेच अकबरचा ताबा राहील, असा निकाल देताना कोर्टानं खूप छान मत व्यक्त केलंय. आपल्या देशाच्या कायद्यात किंवा घटनेमध्ये हिंदू पिता मुस्लिम पाल्याचा (म्हणजेच एका धर्माचा पालक आणि दुसऱ्या धर्माचा पाल्य) सांभाळ करू शकत नाही, असे लिहिलेले नाही. शिवाय भारतासारख्या धर्मनिरपेक्षतेची शिकवण देणाऱ्या देशामध्ये अशा घटनांचा गौरवपूर्ण उल्लेख केला पाहिजे. आंतरधर्मीय विवाह आपण सहजपणे स्वीकारतो, तशाच पद्धतीनं अशा घटनांकडे पाहिलं पाहिजे नि स्वीकारलं पाहिजे, असं सांगत हायकोर्टानं निकाल ऐकूलालच्या बाजूनं दिला. सध्या सुप्रीम कोर्टात ही केस सुरू आहे. 

अकबर सध्या दहावीत शिकत असून त्याचं वय चौदा वर्षे आहे. आजही त्याला ऐकूलालकडेच राहण्याची इच्छा आहे. त्याचे आई-वडील पोराच्या ओढीनं काही महिन्यांनी भेटायला येतात. ऐकूलालच्याच घरी राहतात. ऐकूलालची गरिबी आणि खऱ्या आई-वडिलांची श्रीमंती अशी परिस्थिती असूनही अकबरला ऐकूलाल यांच्याकडेच रहायचे आहे. त्यांच्याकडेच तो वडिल म्हणून पाहतो आहे. त्याला मूळ आई-वडिलांकडे जाण्याची अजिबात इच्छा नाही.  
या संपूर्ण खटल्यामध्ये एक साक्ष महत्त्वाची ठरली, ती म्हणजे ऐकूलालच्या भावाची. ऐकूलाल या माणसाचं आयुष्य चमत्कृतीपूर्ण घटनांनी भरलेलं. चौधरी मूर्तझा हुसेन यांना अडीच-तीन वर्षांचा एक मुलगा घराजवळ सापडला. एक तारखेला सापडला म्हणून नाव ठेवलं ऐकूलाल. मूर्तझा हुसेन यांनी स्वतःच्या मुलाप्रमाणे त्याचा सांभाळ केला. त्यांनी त्याला हिंदूच ठेवले. इतकंच नाही, तर स्वतःच्या घरीही त्याच्यासाठी वेगळा स्वयंपाक होईल, अशी व्यवस्था केली. मूर्तझा हुसेन आणि त्यांच्या पत्नीचे यावरून अनेकदा खटके उडायचे. मात्र, हुसेन त्यांच्या निर्णयावर ठाम होते. मूर्तझा यांनी त्याचा सांभाळ केल्यामुळं ऐकूलालचं आयुष्यच बदलून गेलं. 


अखेरच्या दिवसांमध्ये हुसेन यांनी दोन्ही मुलांमध्ये संपत्तीची समान वाटणी करण्याचे ठरविले. हुसेन यांनी ऐकूलालचा सांभाळ कर्तव्य म्हणूनच केला होता. मात्र, आपल्यावर केलेल्या उपकारांची जाण ऐकूलाल यांना होती. त्यामुळं ऐकूलालनं त्यांची चहाची गाडी चालविण्याची परवानगी द्या, इतकीच मागणी केली आणि बाकीच्या संपत्तीवर दावा केला नाही. नंतर वडील गेले, आईही गेली नि ऐकूलालचा भाऊ परदेशात नोकरी करण्यासाठी निघून गेला. तो लखनऊत आला होता. त्यानं सांगितलेल्या या घटनेमुळं खटल्याला वेगळीच दिशा मिळाली आणि अकबरचा ताबा ऐकूलाल यांच्याकडेच राहिला.

अशा ऐकूलाल आणि अकबरची भेट घेण्याची खूप इच्छा होती. त्यामुळंच इतका सव्यापसव्य करून शोधून काढलं. अगदी छोटंसं घर. त्यामध्ये एका बाजूला चहाचा स्टोव्ह पेटलेला. तिथंच दोन खुर्च्या टाकून एकावर ऐकूलाल बसलेले. खोलीच्या दुसऱ्या बाजूला पलंग, बाजूला पाण्याचं पिंप आणि आतल्या बाजूला थोडीशी मोकळी जागा. हाच ऐकूलाल यांचा संसार. ‘मागेल त्या प्रत्येकाला मी चहा पाजतो. त्यापैकी काही जणांकडे पैसे नसतात. तरीही त्यांना चहा देतो. त्यापैकी अनेक जण सायकल रिक्षावाले किंवा कष्टकरी असतात. अनेक जण मग नंतर जमतील तसे पैसे आणून देतात,’ असं ते सांगत होते. थोडक्यात काय तर देत जायचं हा त्यांचा स्वभाव आहे. अकबरचं पालनपोषण ते कसं करीत असतील, हा प्रश्नच आपल्याला पडतो. मात्र, आजपर्यंत मला कधीही पैसा कमी पडला नाही. जेव्हा गरज पडली, तेव्हा पैसे आणि माणसं कायमच माझ्या बाजूनं उभी राहिली, असं ऐकूलाल सांगतात.
सहज गप्पांमध्ये नरेंद्र मोदी यांचा विषय निघाला. मोदींनी कधी काळी चहा विकलेला आणि ऐकूलाल आयुष्यभर चहा विकत आहेत. हिंदू आणि मुस्लिम या दोन शब्दांमुळेच दोघेही चर्चेत आलेले. एक लोकप्रियतेच्या झोतात, तर दुसरा वादाच्या भोवऱ्यात. त्यामुळं ऐकूलाल यांना मोदी यांच्याबद्दल काय वाटतं, ते जाणून घेण्याची मला खूप उत्सुकता होती. 


देशात परिवर्तनाची हवा तर जाणवतेच आहे. एक चहावाला जर देशाचा पंतप्रधान झाला, तर मलाही अभिमान वाटेल. कोणाचे नशीब कधीही पालटू शकते, असे म्हणतात. मोदी यांच्याबद्दल अनेत वाद-प्रवाद आहेत. मला त्यात जायचे नाही. मात्र, मी माझ्या अकबरच्या बाबतीत जे धोरण स्वीकारले, तसे उदार धोरण त्यांनी सरकार चालविताना स्वीकारले तर मग देशभरअमन आणि शांतीचा माहौल निर्माण होईल,’ अशी सूचक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. खूपच मोजकं पण महत्त्वाचं बोलले ऐकूलाल.

सुरुवातीला खूप त्रास झाला. अनेकांनी मला अकबरचा सांभाळ करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. अनाथालयात दाखल करा वगैरे सांगितलं. पण मी ते मानलं नाही. मला जे मिळाले ते परत देण्याची संधी ईश्वरानं मला दिली होती. ती संधी मला गमवायची नव्हती. मानवतेच्या दृष्टिकोनातून मी अकबरला सांभाळतो आहे. माझ्या वडिलांनी जसे मला वाढविले, तोच आदर्श माझ्यासमोर आहे. एक प्रकारे मला माझ्यावरील उपकारांची परतफेड करण्याची संधी ईश्वराने दिली. त्याबद्दल मी ईश्वराचा खूप ऋणी आहे,’ असं ऐकूलाल म्हणतात.


पत्रकारांनी आणि टीव्हीवाल्यांनी मला खूप प्रसिद्धी दिली, असं म्हणून जुन्या बातम्यांची कात्रण वगैरे उत्साहानं दाखवत होते. कोर्टाच्या निकालाची प्रतही दाखविली. गप्पांच्या ओघात आणखी दोन कप चहा झाला. मग मात्र, मला पुढच्या कार्यक्रमासाठी निघणं भाग होतं. त्यांना शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्रात आलात, तर आवर्जून पुण्याला या, असं निमंत्रण दिलं. माझी लखनऊभेट सार्थकी लागल्याचा आनंद घेऊन मी तिथून बाहेर पडलो.

5 comments:

S.K. said...

Very well written and narrative.. Watched the episode before and it was very touchy. Very few people can live with these ethics and kind nature.

Thanks for sharing such a wonderful experience.

अपर्णा said...

_______/\___________

Vinod Bidwaik said...

Ashish, Interesting story. I like the story, but your passion and efforts to meet the person. Thanks for brining such story to us. Very touchy. Keep writing and sharing such beautiful stories with us.

Unknown said...

Mast!

अमेय दीपक शेवडे said...

Apratim share karu ka

Amey