Thursday, December 14, 2017

गुजरातमध्ये भाजपा @ १०५

काँग्रेस ६५ ते ७५

गुजरात निवडणुकीच्या दुसरा आणि अखेरचा टप्पा पार पडला आणि मतदान संपताच ‘एक्झिट पोल’चे आकडे यायला सुरुवात झाली. गुजरातमधून परतल्यानंतर ज्यांनी ज्यांनी फोन केला आणि विचारले, की किती जागा येणार त्या प्रत्येकाला मी जो आकडा सांगितला साधारण त्याच आसपासचे आकडे ‘एक्झिट पोल’मधून समोर येत आहेत. भाजप यंदाच्या निवडणुकीत १०५ ते ११०च्या आसपास राहील आणि काँग्रेस ६५ ते ७५च्या दरम्यान असेल, याचा अंदाज गुजरातमधून निघतानाच आला होता. पण तरीही शेवटच्या टप्प्यातील प्रचाराचे मुद्दे आणि दोन्ही फेऱ्यांमधील मतदानाची टक्केवारी यांच्यासाठी थांबावं, असा विचार करून ब्लॉग लिहायचे थांबलो होतो. तरीही ज्यानं ज्यानं मला विचारलं त्याला मी हीच आकडेवारी सांगत होतो. 


गुजरातेत भाजपाची सत्ता जाणार आणि राहुल गांधी यांच्या दमदार कामगिरीमुळे तसेच करिष्म्यामुळे काँग्रेसची सत्ता येणार, अशी वातावरण निर्मिती माध्यमांनी तयार केली होती. अनेक तज्ज्ञ आणि निवडणूक विश्लेषकांनीही हीच री ओढळी होती. पटेल समाजाची एकजूट, हार्दिक-जिग्नेश तसेच अल्पेश यांची काँग्रेसशी हातमिळवणी, जीएसटी तसेच नोटाबंदीमुळे व्यापारी-व्यावसायिकांमध्ये असलेली नाराजी आणि २२ वर्षांच्या राजवटीमुळे नागरिकांमध्ये असलेली नाराजी असे अनेक मुद्दे भाजपा सरकारच्या विरोधात होता. राहुल गांधी यांचे सॉफ्ट हिंदुत्व, काँग्रेसने पहिल्यापासून गांभीर्याने लढविलेली निवडणूक आणि बेरजेचे राजकारण अशा अनेक गोष्टी देखील भाजपाच्या विरोधात जाण्याची शक्यता होती. 

मात्र, नरेंद्र मोदी निवडणुकीच्या प्रचारात जसजसे सक्रिय होत गेले, तसतसे काँग्रेस बॅकफूटवर गेली. स्वतःहून चुका करीत गेली. सेल्फगोल करीत गेली, असे म्हणावेसे वाटते. राहुल यांचे मंदिरांमध्ये जाणे, सोमनाथच्या मंदिरात जाऊन दर्शन घेणे, कपाळावर गंध लावून सभांमधून भाषण ठोकणे, भाषणाच्या सुरुवातीला राहुल गांधी यांच्याकडून ‘जय सरदार’ नि ‘जय माताजी’ असा जयघोष होणे, आरक्षण मागणाऱ्या पटेल समाजाने आदर्श मानलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कटआउटला काँग्रेसच्या कार्यालयांबाहेर विशेष मानाचे स्थान देणे अशा अनेक गोष्टी काँग्रेसच्या प्रचारात प्रथमच दिसल्या. 

पण कपिल सिब्बल आणि मणिशंकर अय्यर यांनी घोडचुका केल्या. एकतर सोमनाथ मंदिराच्या ‘एन्ट्री बुक’मध्ये राहुल यांच्या धर्माचा उल्लेख ‘नॉन हिंदू’ असा केल्याचा मुद्दा चर्चेत आला. तो उल्लेख राहुल यांनी स्वतःहून केला, की आणखी कोणी मुद्दामून लिहिले होते, ते सोमनाथासच ठाऊक. पण तो मुद्दा भाजपाने खूप उत्तम पद्धतीने वापरला. त्यानंतर राममंदिराच्या संदर्भातील निर्णय २०१९नंतर देण्यात यावा, अशी अजब मागणी करून कपिल सिब्बल यांनी काँग्रेसच्या पायावर आणखी एक धोंडा पडेल, अशी व्यवस्था केली. मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘नीच’ म्हणून आणि नंतर कोणालाही पटणार नाही हास्यास्पद सारवासारव करून भाजपाला हाती आयते कोलितच दिले. 

मिळालेल्या संधीचे सोन्यात रुपांतर करण्यात पटाईत असलेल्या भाजपाने (अर्थातच, नरेंद्र मोदी यांनी) हे सर्व मुद्दे व्यवस्थितपणे वापरले. अगदी २००७मध्ये ‘मौत का सौदागर’चा मुद्दा वापरला होता तशाच धर्तीवर. नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात पाकिस्तानचा मुद्दा काढला. तो रडीचा डाव आहे, असा आरोप अनेकांनी केला. पण हे काही नवीन नाही. गेल्या म्हणजेच २०१२च्या निवडणुकीतही मोदी यांनी अखेरच्या सभांमध्ये पाकिस्तानचाच मुद्दा काढला होता. त्यावेळी ‘सर क्रीक’ हा मुद्दा चर्चेत होता. त्यावेळी सावली येथे झालेल्या सभेत त्यांनी हा मुद्दा काढला होता. त्यावेळी मी लिहिलेल्या ब्लॉगमधील उल्लेख पुढीलप्रमाणे…
‘सर क्रीकचा मुद्दा काढून काँग्रेस आणि पंतप्रधानांना लक्ष्य करतात. सर क्रीक पाकिस्तानच्या घशात घालण्याचा काँग्रेसचा डाव आहे. तसे झाले तर पाकिस्तान थेट गुजरातच्या घरात येईल, असे सांगून लोकांच्या मनात भीतीचे पिल्लू सोडून देतात…’

थोडक्यात म्हणजे पाकिस्तान हा मुद्दा प्रथमच गुजरातच्या निवडणुकीत आलेला नाही. २००७च्या निवडणुकीतही हाफीज सईद आणि नरेंद्र मोदी हरले तर पाकिस्तानात फटाके फुटतील वगैरे मुद्दे होतेच की. यंदा पाकिस्तान गुजरातच्या निवडणुकीवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करीत आहे, असा उल्लेख पंतप्रधान मोदी यांनी प्रचाराच्या भाषणात केला. पण त्यात नाविन्य असे काहीच नाही. मणिशंकर अय्यर यांच्या घरी झालेल्या या बैठकीला पाकिस्तानचे माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री खुर्शीद महमूद कसुरी उपस्थित होते. भारताचे माजी लष्करप्रमुख दीपक कपूर आणि माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री नटवरसिंह देखील उपस्थित होते. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग आणि माजी उपराष्ट्रपती (भारतात अस्वस्थ वाटणारे) डॉ. हमीद अन्सारी देखील मेजवानीस उपस्थित होते. 

अहमद पटेल हे गुजरातचे मुख्यमंत्री व्हावेत, असे आवाहन पाकिस्तानी सैन्याचे माजी महासंचालक यांनी केल्याचा दावा मोदी यांनी पालनपूर येथील सभेत संबंधित बैठकीचा हवाला देऊन केला. आता हा आरोप होता की तथ्य, याचा काथ्याकूट लोक करीत बसतील. पण गुजरातमध्ये काँग्रेस सत्तेवर आली, तर अहमद पटेल गुजरातचे मुख्यमंत्री होतील, ही पुडी मोदी यांनी व्यवस्थित सोडून दिली. गुजरातेत काँग्रेस सत्तेवर आली, तर मुसलमान सोकावतील आणि हिंदूंच्या घरामध्ये घुसून नमाज पढायला मागेपुढे पाहणार नाहीत, असे व्हॉट्सअप मेसेज यापूर्वी फिरतच होते. अहमद पटेल हे गुजरातचे मुख्यमंत्री होणार हा त्याच प्रचाराचा पुढचा टप्पा. 


मागे एका लेखामध्ये वाचलेली गोष्ट अशी. अहमद पटेल हे गुजरातमध्ये नरेंद्र मोदी यांच्या इतकेच लोकप्रिय होते म्हणे. तरुण असताना त्यांचा संपूर्ण गुजरातमध्ये दबदबा होता. त्यांच्या शब्दाला वजन होते. सरकारमध्ये ते सांगतील तो अंतिम शब्द असायचा. नरेंद्र मोदी जेव्हा भाजपाचे संघटनमंत्री झाले तेव्हा त्यांनी ही गोष्ट हेरली. तोपर्यंत अहमद पटेल यांचा उल्लेख बाबूभाई पटेल असा व्हायचा. म्हणजे सगळ्याच पक्षांतील लोक त्यांना बाबूभाई पटेल म्हणायचे. नरेंद्र मोदींनी त्यांचा उल्लेख अहमद मियाँ पटेल असा करायला सुरूवात केली. विशेषतः जाहीर सभांमधून. तेव्हापासून गुजरातमध्ये लोकप्रिय असलेले अहमद पटेल फक्त भरूच जिल्ह्यापुरते मर्यादित झाले. पुढे तर त्यांना भरूचमधून निवडून येण्याची खात्री न राहिल्याने ते राज्यसभेवरच गेलो. यंदाच्या राज्यसभा निवडणुकीतही त्यांना जिंकण्यासाठी बरीच मेहनत करावी लागली. थोडक्यात सांगायचं, तर हिंदू-मुस्लिम वगैरे मुद्दे गुजरातमध्ये किती महत्त्वाचा आहे, हे यावरून सूज्ञ मंडळींना समजून येईल.

गुजरात निवडणुकीच्या आकडेवारीनुसार जर बोलायचं तर गुजरातमध्ये भाजपाचा विजय निश्चितच होता. त्यावर फक्त शिक्कामोर्तब व्हायचं आणि नेमका आकडा किती हे स्पष्ट व्हायचं बाकी आहे. मुळात हितेशभाई पंड्या यांना आम्ही भेटलो तेव्हा त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १९९५पासून भाजपाने एकदाही न हरलेल्या जागांची संख्या आहे ५६ ते ६०च्या आसपास. जास्तच पण कमी नाही. म्हणजे भाजपाच्या हक्काच्या अशा ५६ जागा आहेत. भाजपाला त्यापासून पुढे सुरुवात करायची आहे. साध्या बहुमतासाठी फक्त ३६ जागांची आवश्यकता आहे. तर काँग्रेसला ९२ जागांची. ही गोष्ट मानसिकदृष्ट्या भाजपाला दिलासा देणारी होती. 

दुसरी आणि सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुजरातच्या शहरी आणि निमशहरी तसेच ग्रामीण जागा हा मुद्दा देखील भाजपासाठी खूपच दिलासादायक होता. एकूण १८२ जागांपैकी भाजपाने ११६ जागा जिंकल्या होत्या. त्यापैकी गुजरातच्या ग्रामीण भागात एकूण ९८ जागा आहेत. तर शहरी आणि निमशहरी भागांमधील जागांचा आकडा आहे ८४. गेल्या निवडणुकीत भाजपाला ग्रामीण भागात ९८ पैकी ५० जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसला ४३ तर अन्य पक्षांना पाच जागा अशी विभागणी होती. शहरी भागात मात्र, ८४ पैकी ६६ जागा भाजपाने पटकाविल्या होत्या. याचाच अर्थ असा, की शहरी आणि निमशहरी भागांत भाजपाने काँग्रेसला चारीमुंड्या चीत केले होते. सुरत, अहमदाबाद, वडोदरा, आणंद, नडियाद, भावनगर, जामनगर, राजकोट आणि प्रमुख शहरांमध्ये तसेच मोठ्या गावांत भाजपाचाच दबदबा होता. त्यातील बहुतांश जागा या प्रचंड मताधिक्याने जिंकलेल्या होत्या. 


यंदा हार्दिक पटेल आणि जीएसटी-नोटाबंदीमुळे जर फटका बसलाच तर तो ग्रामीण भागात बसणार. शहरी भागात भाजपाला फटका बसण्याची शक्यता अत्यंत कमी, अशीच माझी अटकळ होती आणि आहे. कारण शहरी भागाचा झालेला विकास लोकांना दिसतोच आहे. त्यामुळे तिथे भाजपाच्या अवघ्या काहीच जागा कमी होणार किंवा होणारही नाही. मागच्या वेळी जिथे भाजपा प्रचंड मताधिक्याने विजयी झाले, तिथे मताधिक्य जरुर घटेल. पण पराभव होणार नाही. 

पटेलांचे वर्चस्व असलेल्या सौराष्ट्र आणि सुरत वगैरे भागात भाजपाला थोडा फटका बसण्याची शक्यता गृहितच धरण्यात आली होती. भाजपालाही त्याची धास्ती होतीच. पण निवडणूक आयोगाने घेतलेल्या एका निर्णयामुळे भाजपाला थोडा फायदा झाला. आतापर्यंत दक्षिण गुजरात आणि उत्तर गुजरात या ठिकाणच्या निवडणुका एकाच टप्प्यात व्हायच्या. म्हणजेच दक्षिण गुजरात आणि सौराष्ट्र या ठिकाणी वेगवेगळ्या टप्प्यांत मतदान व्हायचे. म्हणजे आधीच्या टप्प्यात दक्षिण गुजरातमध्ये मतदान करून पटेल मंडळी सौराष्ट्रात भाजपाच्या विजयासाठी प्रयत्न करायला रवाना व्हायचे. यंदा दक्षिण गुजरात आणि सौराष्ट्र या दोन्ही ठिकाणी एकाच दिवशी मतदान असल्यामुळे पटेल समुदायाला दोन्ही ठिकाणी नेहमीसारखे काम करता आले नाही. पटेल समाजाच्या नाराजीची तीव्रता कमी करण्यासाठी निवडणूक आयोगाचा हा निर्णय भाजपाला उपयुक्त ठरला. 

बाकी हार्दिक पटेलच्या सभांना होणाऱ्या गर्दीची तुलना गुजरातमधील राजकीय विश्लेषक आणि पत्रकार महाराष्ट्रात राज ठाकरे यांच्या सभांना होणाऱ्या गर्दीशीच करतात. सभेला गर्दी. भाषण ऐकायला गर्दी. पण प्रत्यक्ष मतदानात रुपांतर होण्याची शक्यता कमी. त्यामुळे हार्दिक पटेलच्या सभांच्या गर्दीवर आडाखे बांधणारी मंडळी भाजपाच्या दारुण पराभावाची गोष्ट करीत होते. पण तसे होण्याची शक्यता खूपच कमी आहे. 

भारतीय जनता पार्टी गुजरातमध्ये सत्तेवर येणार हे प्रचाराच्या आधीच मी लेख आणि ब्लॉग लिहून स्पष्टपणे सांगितले होते. गुजरातमध्ये फिरताना हेच जाणवत होते. नाराजी असली तरी ती सत्ता उलथवून टाकण्याइतकी नव्हती आणि काँग्रेसबद्दल सहानुभूतीही नव्हती. उलट लोक स्पष्ट सांगत होते, की भाजपवर नाराजी असली, तरीही काँग्रेसला आम्ही मतदान करू, असा अर्थ काढू नका. अगदी सुरत आणि अहमदाबादमधील व्यापारीही हेच सांगत होते. त्यातून नरेंद्र मोदी यांनी राज्यभरात ३०-३५ सभा घेऊन फुल्ल हवा केली. त्यांनी गुजराती अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आणला. पंधरा वर्षांत केलेल्या विकासाची उजळणी या निमित्ताने केली. कोणी कितीही विकास झालेला नाही, असे सांगितले तरी झालेले रस्ते आणि शेतात खेळणारे पाणी पाहिल्यानंतर नागरिक विरोधकांवर विश्वास ठेवत नाहीत. 


आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी. ते जैन समाजाचे आहेत. शिवाय त्यांची प्रतिमा स्वच्छ आहे. सरकारची प्रतिमा स्वच्छ ठेवण्यात आणि कार्यक्षमपणे कारभार करण्यात ते यशस्वी ठरले आहेत. आनंदीबेन पटेल यांच्या कार्यकाळात तळाला गेलेल्या भाजपाची प्रतिमा निर्मिती करण्याचे काम रुपाणी यांनी चांगल्या पद्धतीने केले आहे. त्याचा फायदा भाजपाला नक्की होण्याची चिन्हे आहेत. आनंदीबेन पटेल यांना राजीनामा द्यायला लावला नसता (पायउतार होताना दिलेले कारण ७५ वर्षे पू्र्ण केल्याचे… पण खरे कारण सरकारची प्रतिमा खालावल्याचे) तर भाजपाच्या हातून सत्ता गेली असती हे निश्चित. भविष्यातही नरेंद्र मोदींचा वारसदार निर्माण न झाल्यास भाजपाला गुजरातेत झगडावे यंदासारखेच लागणार हे स्पष्ट आहे. गुजरातचा विजय वाटतो तितका सोपा राहिलेला नाही. मोदी तिथे नाहीत हे खरे. पण त्यांची पुण्याई अजून शाबूत आहे, हेही तितकेच खरे. त्याच पुण्याईवर भाजपा परत येतोय. 

गेल्या पंधरा वर्षांत नरेंद्र मोदी यांनी गुजरातसाठी आणि गुजराती अस्मितेसाठी जे काही केले, त्याचे फळ त्यांना या निवडणुकीमध्ये मिळत आहे. काँग्रेसकडे जर समर्थ पर्याय ठरू शकणारा नेता असता तर भाजपाला ही निवडणूक आणखी जड गेली असती. पण त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरू शकेल, असा नेता नाही. शंकरसिंह वाघेला यांना राहुल यांनी नाराज केल्यामुळे त्यांनी चांगली संधी दवडली, असे म्हणता येऊ शकते. संधी मिळताच त्यांना गळाला लावून मोदी-शहा जोडगोळीने काँग्रेसची मते फोडण्यासाठी त्यांचा योग्य वापर करून घेतला. 

जीएसटी आणि नोटबंदीमुळे असलेली नाराजी, हार्दिक पटेल आणि इतर तरुण नेत्यांनी तापविलेले वातावरण यांचा फटका भाजपाला नक्की बसेल. पण तो दहा ते पंधरा जागांचा असेल. भाजपाला १०५ जागांवर समाधान मानावे लागेल. रेंज म्हणाल, तर ती १०० ते ११०ची असेल. काँग्रेसच्या जागांमध्ये चांगली वाढ होईल. आता काँग्रेसचे संख्याबळ ६० असले, तरीही राज्यसभा निवडणुकीमध्ये ते ४४पर्यंत खाली आले होते. ते जर ७० पर्यंत पोहोचले तर वाढ २५ जागांची असेल. ती तुलनेने खूप मोठी आहे. हे यश राहुल यांच्या आक्रमक प्रचाराचे आणि बदललेल्या शैलीच आहे. काँग्रेसच्या जागांची रेंज ही ६५ ते ७५ इतकी असेल. 

बाकी सोमवार दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होईलच. कोणाचे अंदाज बरोबर येतात आणि चुकतात हे समजेलच.

5 comments:

sagar said...

excellent analysis..now lets wait for Monday

prasad koratkar said...

Nice sir

Unknown said...

Excellent!

Unknown said...

Great Dada

Unknown said...

Ashish,
Tumcha andaz barobar nighala. Manla tumhala.