Sunday, August 12, 2018

ओजस्वी वाणी आणि ओघवती लेखणी


 

कलेचा मर्मज्ञ... कलैग्नार

मुथ्थुवेल करुणानिधी… धार्मिक कार्यक्रमांमध्ये तसेच सणसमारंभाच्या निमित्ताने वाद्य वाजविण्यासाठी जाणाऱ्या समाजात जन्माला आलेला गरीब मुलगा. वाणी आणि लेखणीच्या जोरावर तब्बल सहा दशके तमिळनाडूच्या राजकारणावर स्वतःची अमीट छाप निर्माण केली. ही गोष्ट मला करुणानिधी यांची सर्वाधिक भावते. चित्रपटांच्या कथा आणि पटकथा लिहिताना, संवाद लेखन करताना साहित्याच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये या कलाकाराने मनसोक्त मुशाफिरी केली. आपला विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी साहित्यातील विविध प्रकारांचा खुबीने उपयोग केला. साहित्याच्या क्षेत्रात यशस्वी झालेला हा कलावंत राजकारणातही भलताच यशस्वी ठरला. तेरा वेळा विधानसभा निवडणूक जिंकणारे करुणानिधी पाचवेळा तमिळनाडूचे मुख्यमंत्री बनले. साहित्य, चित्रपट आणि राजकारण अशा तीनही क्षेत्रांमध्ये स्वतःचे वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करणाऱ्या कलैग्नार तथा करुणानिधी यांच्या कारकिर्दीतील वेगळे पैलू, आठवणी आणि किस्से…
….गॉगल आणि शाल ही ओळख…
करुणानिधी म्हटले सर्वसामान्य लोकांना पिवळी शाल आणि काळा गॉगल या दोन गोष्टीच प्रामुख्याने डोळ्यासमोर येतात. करुणानिधी यांनी देखील आपली ही ओळख अगदी शेवट शेवटपर्यंत जपली. अगदी प्रारंभीच्या काळात करुणानिधी यांना १९५३मध्ये एका अपघाताला सामोरे जावे लागले. त्या अपघातात कलैग्नार यांच्या डाव्या डोळाला जबर मार लागला. जखमी झालेल्या डोळ्यावर परिणाम झाला. अनेक उपचार झाले. शस्त्रक्रिया पार पडल्या. मात्र, त्याचा फायदा झाला नाही. पुढे त्याच डोळ्याला १९६७मध्ये पुन्हा मार लागला. अधूनमधून त्यांचा डोळा दुखायचा आणि त्रास देखील व्हायचा. चार वर्षांनी म्हणजे १९७१मध्ये अमेरिकेत त्यावर शस्त्रक्रिया झाली नि त्यानंतर ते काळा चष्मा वापरायला लागले. अगदी २००० सालापर्यंत ते काळा चष्मा वापरायचे. नंतर २००० नंतर त्यांनी पारदर्शक काचांचा काळा चष्मा वापरायला सुरुवात केली. 

करुणानिधी यांची शाल ही काळ्या चष्म्यापेक्षाही अधिक चर्चेत राहिली. पिवळ्या शालीबद्दल अनेक तर्कवितर्क लढविले जातात. करुणानिधी पूर्वी पांढरी किंवा हिरवी किंवा वेगळ्या रंगाची शाल खांद्यावर घ्यायचे. काही वर्षांपूर्वी घशाच्या आजारामुळे त्यांच्या गालांना सूज आली. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना खांद्यावर उबदार शाल ठेवण्याचा सल्ला दिला. जेणेकरून सूज येणार नाही. तेव्हापासून करुणानिधी पिवळी शाल खांद्यावर घेऊ लागले, असे उल्लेख सापडतात. 

अर्थात, पिवळी शाल घेण्याचा सल्ला ज्योतिषाने दिला होता, असाही दावा काही जण करतात. पिवळी शाल घेतल्यानंतर तुमच्या राजकीय कारकि‍र्दीला कधीच आहोटी लागणार नाही, असे त्यांचे म्हणणे होते. त्यावरून अनेकांनी करुणानिधींवर टीका केली. तुम्ही पिवळीच शाल का घेता? पिवळी शाल न घेता तुम्ही का बाहेर पडत नाही? भाषणांमध्ये निरीश्वरवाद मांडणारे आणि नास्तिक असल्याचा दावा करणारे तुम्ही ज्योतिष कधीपासून पाळायला लागले, अशी उघडउघड टीका गोपालस्वामी उर्फ वैको यांनी त्यांच्यावर केली होती.मंदिरावर करुणा… 

करुणानिधी यांचे घर चेन्नईतील गोपालपुरम भागात आहे. काही वर्षांपूर्वी एका स्नेह्यांकडे जाणे झाले. ते देखील गोपालपुरम भागातील करुणानिधी यांच्या सोसायटीमध्येच रहायला होते. व्यवस्थापन तसेच आर्थिक क्षेत्राशी ते संबंधित आहेत. अनेक कंपन्यांमध्ये संचालक आणि सल्लागार म्हणून ते काम करतात. त्यांनी सहज गप्पांमध्ये विषय निघाला तेव्हा सांगितले होते, की करुणानिधी भाषणांमध्ये नास्तिक असल्याचे दाखले जरूर देतात. मात्र, आमच्या गोपालपुरममध्ये श्रीकृष्णाचे एक मंदिर आहे. तिथे श्रीकृष्णाप्रमाणेच शिवा, कामाक्षी, गणपती, हनुमान यांच्याही मूर्ती आहेत. या मंदिरातील पूजा, प्रसाद आणि इतर सर्व खर्च करुणानिधी कुटुंबीयांमार्फतच केला जातो. 

इतकेच काय तर करुणानिधी यांच्या घरातून बाहेर रस्त्यावर आल्यानंतर डाव्या हाताला हे मंदिर आहे. करुणानिधी यांनी त्यांच्या ड्रायव्हरला सूचना देऊन ठेवलेल्या होत्या, की कोठेही जायचे असले, तरीही घरातून बाहेर पडल्यानंतर मंदिराकडे पाठ होईल अशा पद्धतीने गाडी बाहेर काढायची नाही. घरातून बाहेर पडल्यानंतर मंदिराकडे तोंड असेल, अशाच पद्धतीने गाडी बाहेर निघाली पाहिजे. करुणानिधी यांनी अखेरपर्यंत नियमाचे पालन केले, असेही आमच्या स्नेह्यांनी आवर्जून सांगितले. आता मंदिराकडे तोंड झाल्यानंतर किमान मनातल्या मनात तरी देवाला नमस्कार करायचे का, हे मात्र न उलगडलेले कोडेच आहे.


एमजीआर यांच्याशी दोस्तीचा प्रस्ताव

सुरुवातीच्या काळात एम. करुणानिधी आणि एम. जी. रामचंद्रन यांच्या खास दोस्ती होती. करुणानिधी यांनीच एमजीआर यांना राजकारणात आणले. कलैग्नार यांचे संवाद, कथा नि पटकथांमुळे एमजीआर प्रसिद्धी आणि लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले. मात्र, अण्णादुरै यांच्या निधनानंतर दोन्ही नेत्यांचे फारसे जमले नाही. करुणानिधी यांच्यावर एमजीआर यांनी आर्थिक गैरव्यवहारांचा ठपका ठेवला. तेव्हा द्रमुकमधून एमजीआर यांची हकालपट्टी झाली. पुढे एमजीआर यांनी अण्णा द्रमुकची स्थापना केली आणि पाच वर्षांमध्ये तमिळनाडूची सत्ता हस्तगत केली. त्यांची लोकप्रियता इतकी होती, की ते जिवंत असेपर्यंत करुणानिधी पुन्हा सत्तेवर येऊ शकले नाहीत. सलग दहा वर्षे ते मुख्यमंत्री राहिले.

ज्येष्ठ समाजवादी नेते बिजू पटनाईक यांनी या दोन्ही नेत्यांमध्ये समेट घडवून आणण्याचे प्रयत्न केले. करुणानिधी आणि बिजू पटनाईक यांचे संबंध खूप घनिष्ट होते. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीला करुणानिधी यांनी जोरदार विरोध केला होता. आणीबाणीच्या विरोधातील अनेक नेत्यांनी त्या काळात तमिळनाडूत आश्रय घेतल्याचे अनेक उल्लेख सापडतात. करुणानिधी हेच त्यामागे होते, हे उघड आहे. कदाचित तेव्हापासून बिजूबाबू आणि कलैग्नार यांच्यात ऋणानुबंध निर्माण झाले असावेत. पुढे याच दोस्तीतून बिजूबाबूंनी १९७९ साली करुणानिधी आणि एम. जी. रामचंद्रन यांच्यामध्ये समेट घडवून आणण्यासाठी पुढाकार घेतला होता. हे दोन्ही नेते एकत्र यावेत, यासाठी बिजूबाबूंनी १९७९मध्ये प्रयत्न केले. १२ सप्टेंबर १९७९ रोजी कलैग्नार आणि बिजूबाबू यांच्यात मद्रास येथे बैठक झाली. हा प्रस्ताव कोणाचा आहे, असा सवाल करुणानिधी यांनी बिजूबाबूंना विचारला. तेव्हा त्यांनी एमजीआर यांची असे उत्तर दिले. असाच प्रश्न एमजीआर यांनी बिजूबाबूंना विचारला त्यावेळी त्यांनी करुणानिधी असे उत्तर दिले. हा गेमप्लॅन खूप वर्षांनंतर करुणानिधी यांच्या लक्षात आला, हा भाग वेगळा. 

तेव्हा करुणानिधी आणि बिजूबाबू यांच्यात सविस्तर चर्चा झाली. एमजीआर हे मुख्यमंत्री म्हणून कायम राहतील, तर पक्षाध्यक्ष म्हणून करुणानिधी हेच असतील. पक्षाचे नाव द्रमुक असेच असेल. तर पक्षाचा अधिकृत झेंडा म्हणून अण्णा द्रमुकचा झेंडा कायम राहील, असा हा प्रस्ताव होता. एमजीआर आणि करुणानिधी या दोघांनाही हा प्रस्ताव तत्वतः मान्य झाला होता. करुणानिधी यांनी बिजूबाबूंना आनंदाने मिठी मारल्याचा उल्लेखही आढळतो. नंतर चेपॉक येथील विश्रामगृहातील एका बंद खोलीत दोन्ही नेत्यांमध्ये एक बैठक पार पडली. द्रमुकचे अन्बळगन नि अण्णा द्रमुकचे नेदुन्चेळीयन यांची स्वतंत्र बैठक झाली. दोन्ही पक्षांनी तातडीने कार्यकारी समितीची बैठक बोलविण्याचे मान्य केले. 

अण्णा द्रमुकचा विलिनीकरणाचा प्रस्ताव असेल तर तो स्वीकारण्यात चूक काय?’ असा सवाल करुणानिधी यांनी चेन्नई येथील बैठकीनंतर पत्रकारांना केला. तर वेल्लोर येथे अण्णा द्रमुकच्या बैठकीमध्ये एमजीआर यांनी या विलिनीकरणाबाबत अवाक्षरही काढले नाही. उलट त्यांच्या नेत्यांनी द्रमुकवर टीकेची झोड उठविली. नंतर द्रमुक नेत्यांनीही अण्णा द्रमुक आणि एमजीआर यांच्यावर टीका करण्यास प्रारंभ केला. बिजूबाबू यांनी दोन्ही नेत्यांचे मन वळवून विलिनीकरणाचा केलेला हा प्रयत्न अगदी थोडक्यात फसला. अण्णा द्रमुकच्या काही मंत्र्यांनी एमजीआर यांना हा प्रस्ताव फेटाळून लावा, असा सल्ला दिला होता. त्यामुळेच ते बैठकीत काहीच बोलले नाही, असे आरोप नंतर द्रमुककडून झाले. अर्थात, तेव्हा पुलाखालून पाणी वाहून गेले होते. 

भविष्यात दोन्ही नेते आणि पक्ष एकत्र येऊ शकतात, हा धोका लक्षात घेऊन इंदिरा गांधी यांनी त्यांचा खास दूत सी. एम. स्टीफन यांना तमिलनाडूत पाठविला. द्रमुक नेते मुरासोली मारन यांच्याशी त्याने चर्चा केली आणि काँग्रेससोबत येण्याबाबत विनंती केली. द्रमुकने इंदिरा गांधी यांना समर्थन देऊन काँग्रेससोबत युती करण्याचे निश्चित केले. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-द्रमुक युतीला ३९पैकी ३७ जागा मिळाल्या. त्यापैकी द्रमुकने १६ जागा जिंकल्या. अण्णा द्रमुकला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले. त्यानंतर दोन्ही द्रमुक आणि अण्णा द्रमुकमध्ये विलिनीकरणाबाबत कधी चर्चा देखील झाली नाही.
… जयललिता यांच्याशीही वैर कायम…

एमजीआर यांच्या निधनानंतर जयललिता यांनी तमिळनाडू विधानसभेत प्रवेश केला. १९८९मध्ये तमिळनाडूच्या विधानसभेत रणकंदन झाले. तमिळनाडूचे तत्कालीन मुख्यमंत्री करुणानिधी यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला म्हणून द्रमुक आमदार चिडले होते. त्यावेळी जयललिता यांना धक्काबुक्की झाली. एका आमदाराने जयललिता यांच्या साडीला हात घातला आणि साडी फेडण्याचा प्रयत्न केला. करुणानिधी यांनी देखील त्यावेळी त्या आमदारावर काहीच कारवाई केली नाही. किंवा त्याचा निषेधही केला नाही. यामुळे संतापलेल्या जयललिता यांनी योग्यवेळी बदला घेण्याची शपथ घेतली. त्यानंतर करुणानिधी सभागृहात असताना त्यांनी कधीच विधानसभेत पाऊल ठेवले नाही. मला त्यांचा चेहराही बघायचा नाही, असे त्या म्हणायच्या. 

जयललिता २००१मध्ये सत्तेवर आल्या. तेव्हा करुणानिधी यांना मध्यरात्री एका अट्टल गुन्हेगारासारखे फरपटत नेऊन अटक करण्याची कारवाई जयललिता सरकारने केली होती. एका वयोवृद्ध नेत्याविरुद्ध अशा पद्धतीने कारवाई केल्याचा सर्व स्तरातून निषेध झाला होता. मात्र, १९८९मध्ये आपल्या साडीला हात घालण्यात आल्याच्या कृत्याचा जयललिता यांनी संधी मिळताच अशा पद्धतीन बदला घेतला, अशी प्रतिक्रिया तमिळनाडूतील राजकीय विश्लेषक आणि अभ्यासक व्यक्त करतात.

जयललिता आणि करुणानिधी यांच्यातील वैर इतके टोकाचे होते, की मरिना बीचवर दफनविधी करण्यासाठी देखील जयललितांच्या राजकीय वारसदारांनी करुणानिधींना परवानगी नाकारली. अखेर परवानगीसाठी कोर्टामध्ये जाऊन झगडावे लागले. करुणानिधी आणि जयललिता हे हाडाचे वैरी आता या जगात नाही. या निमित्ताने द्रमुक आणि अण्णा द्रमुकमधील राजकीय वैमनस्याला मूठमाती मिळावी, अशी अपेक्षा करायला हरकत नाही…

(पूर्व प्रसिद्धीः महाराष्ट्र टाइम्स १२ ऑगस्ट २०१८)

No comments: