Friday, August 03, 2018

दिवस ‘सांज समाचार’चे


सुरेश जोशी... संधी आणि प्रोत्साहन देणारे संपादकसुरेश जोशी गेले… महाराष्ट्र टाइम्समध्ये निधन वृत्ताच्या पट्ट्यात छापून आलेली छोटी बातमी… सकाळी सकाळी बातमी पाहिली आणि माझं मन एकोणीस वर्षे मागं गेलं. प्रभात टॉकीजसमोर सांज समाचार नावाच्या एका वृत्तपत्राचं ऑफिस आहे. त्या सांज समाचार या वृत्तपत्राचे संपादक. कदाचित संस्थापक संपादकच. त्यांनीच ते सुरू केलं आणि चालवलं. माझ्या उमेदवारीच्या वर्षांत सर्वात पहिल्यांदा त्यांनी मला काम करण्याची संधी दिली…
 
जून १९९९. बी. एस्सी.च्या तिसऱ्या वर्षाला असतानाच आपल्याला या विषयात फार गती नाही, हे मला लक्षात आलं होतं. शेवटच्या वर्षाला असताना दैनिक प्रभात, दैनिक केसरी नि एकता मासिकामध्ये प्रासंगिक विषयांवर लिहिण्याची संधी मिळत होती. पेपरात आणि मासिकात नाव छापून आल्यानंतर जरा बरं वाटायला लागलं होतं. आत्मविश्वास वाढू लागला. त्यावेळी माझा मित्र आणि दिवंगत ज्येष्ठ पत्रकार दि. वि. गोखले यांचा पुतण्या राहुल गोखले यानं जर्नालिझमचा कोर्स कर, असं सुचविलं. आपण तिथं कदाचित रमू असं वाटलं आणि मी पुणे विद्यापीठाच्या कोर्ससाठी रानडे इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश परीक्षा दिली. एन्ट्रन्स क्लिअर केली. इंटरव्ह्यूमध्येही पास झालो आणि माझं नाव निवडलेल्या विद्यार्थ्यांच्या यादीत झळकलं. आयुष्य इतकं सरळसोट असतं तर किती छान. पण ते इतकं सोपं नसतं.

माझा बी. एस्सी. चा एक विषय राहिला. बहुधा Analytical Chemistry. पदवी ही किमान अर्हता असल्यानं रानडे इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला प्रवेश मिळेल, पण ऑक्टोबरच्या परीक्षेत तो विषय क्लिअर करावा लागेल. अन्यथा तुमचा प्रवेश रद्द होईल, अशी अट तेव्हाचे विभागप्रमुख अरुण साधू सर यांनी घातली. ऑक्टोबरमध्ये विषय क्लिअर होईलच, याची खात्री मला तेव्हा नव्हती. त्यामुळं उगाच फी भरून पैसे वाया घालविण्यापेक्षा आधी विषय क्लिअर करू. ऑक्टोबरमध्ये नाहीच झाला तर मार्चची संधी देखील घेऊ आणि पुढील वर्षी पुन्हा एन्ट्रन्स आणि इंटरव्ह्यूचं दिव्य पार पाडू, असं ठरविलं. आणि रानडे इन्स्टिट्यूटची एडमिशन सोडून दिली. त्या जागी मग संतोष देशपांडेची एडमिशन झाली. 

मग वर्षभर घरी बसून काय करायचं, अशा विचारात होतो. दैनिक सकाळ आणि दैनिक केसरीमध्ये प्रयत्न केले. पण तिथं कोणाशीच ओळख नव्हती. त्यामुळं तिथं काम झालं नाही. मी देखील फार जोर दिला नाही. मग माझा आणखी एक मित्र आणि पुण्यातील जीवशास्त्र विषयाचा ख्यातनाम प्राध्यापक रवी पत्की यानं सांज समाचारचा पर्याय सुचविला. सुरेश जोशी सर आणि रवीची चांगली ओळख होती. एक दिवस आम्ही सकाळी त्यांच्याकडे गेलो. तिथं रवीनं माझ्याबद्दल त्यांना सांगितलं आणि मी काम करण्याची इच्छा व्यक्त केली. फार चौकशी न करता आणि आढेवेढे न घेता ये उद्यापासून कामाला, असं त्यांनी मला सांगितलं. माझी पगाराची फार अपेक्षा नव्हती. अनुभव हवा होता. त्यामुळं मी तो विषय काढला नाही. ते स्वतःहूनच म्हणाले. तुझं आधी काम पाहतो आणि मग पगाराचं ठरवू. मला काही प्रॉब्लेम नव्हता. त्यामुळं दुसऱ्या दिवशी सकाळी सांज समाचारच्या कार्यालयात रुजू झालो. 

सकाळी पत्रकार संघात जाऊन तिथल्या प्रेस कॉन्फरन्स कव्हर कर आणि बातम्या दे, असं सरांनी सांगितलं. आयुष्यातील पहिली प्रेस कॉन्फरन्स बिंदुमाधव जोशी यांची कव्हर केली. तेव्हा त्यांना कॅबिनेट मंत्री म्हणून दर्जा होता. नंतर कोणत्या तरी आणखी दोन प्रेस कॉन्फरन्स होत्या. पत्रकार परिषद संपल्यानंतर सायकल मारत ऑफिसमध्ये परतलो. माझ्या कुवतीनुसार आणि मला जे योग्य वाटलं त्यानुसार बातमी केली आणि सरांसमोर ठेवली. त्यांनी त्यामध्ये किरकोळ कारकोळ बदल केले. काय पाहिजे, कसं पाहिजे वगैरे सांगितलं. तसं करायला सांगितलं आणि बातम्या ऑपरेटिंगला सोड, असं सांगितलं. पत्रकारितेची सुरुवात अशी झाली. 


माझं काम पाहिल्यानंतर त्यांनी माझा पगार महिना पाचशे रुपये ठरविला. तिथं फार कोणी काम करायला नव्हतं. मी आणखी एक जण फक्त रिपोर्टर आणि दोन वरिष्ठ पत्रकार पार्ट टाइम कामाला होते. त्यामुळं तिथं मला कोणत्याच कामाला नकार मिळाला नाही. अगदी साध्या प्रेस कॉन्फरन्सपासून ते पंचतारांकित हॉटेलांमधील प्रेस कॉन्फरन्स कव्हर करण्यापर्यंत सर्व ठिकाणी जाण्याची संधी मिळाली. ते ध्येय नसलं तरीही तो अनुभव कसं वागावं आणि कसं वागू नये, हे नक्कीच शिकवून गेला. वार्ताहर म्हणून बातम्या कव्हर करणं, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, राजकीय सभा आणि संमेलनं कव्हर करणं यांचा अनुभव मिळाला.

प्रेसनोट आणि विविध ठिकाणच्या बातमीदारांकडून आलेल्या बातम्या एडिट करण्याचं काम असो. वाचकांची पत्र सोडणं असो किंवा आली नसतील तर ती लिहिणं असो. (यातील नंतरचा प्रकारच अधिक असायचा.) विविध विषयांवर लेख लिहिणं असो किंवा प्रसंगी अग्रलेख लिहिणं असो… सर्व करण्याची संधी मला तिथं मिळाली. पान एकही बरेचदा लावलं. रेडिओवरून बातम्या ऐकायच्या आणि त्यापैकी निवडक अंकामध्ये घ्यायच्या, हा देखील अनुभव मिळाला. टायपिंगपासून ते पान लागतात कशी, प्लेट्स कशा तयार होतात, छपाई कशी होते, हे देखील अगदी जवळून पहायला मिळालं. कोणती बातमी पान एकला ठळक लावली, की अंक जरा जास्त उचलला जाईल, हे बघायला मिळालं. आपण अमुक गोष्ट करूयात असं सुचविलं आणि सर त्याला नाही म्हटले असं फारसं कधी झालं नाही. ते देखील माझ्यासाठी लक्षणीय होतं.

अनेक स्मरणात राहतील, अशा घटना त्या ठिकाणी असताना अनुभवायला मिळाल्या. २००० साली पुण्यामध्ये सायन्स काँग्रेस पार पडली. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते सायन्स काँग्रेसचं उद्घाटन झालं होतं. (पंतप्रधानांच्याच हस्ते होतं शक्यतो.) त्यावेळी ती संपूर्ण सायन्स काँग्रेस कव्हर करण्याची संधी मला मिळाली. त्या निमित्तानं घडणाऱ्या वेगवेगळ्या घटना, किस्से बातम्यांमधून तसेच कॉलममधून लिहायची संधी मिळाली. सायन्स काँग्रेसच्या निमित्तानं विशेष पान आम्ही तयार करायचो. अर्थातच त्याची जबाबदारी माझ्यावर होती. त्या निमित्तानं विविध परिसंवादांना उपस्थित राहता आलं. त्याच्या बातम्या करता आल्या.

पुण्यामध्ये अटलजींची राजभवनवर प्रेस कॉन्फरन्स होती. पंतप्रधान असल्यामुळं आधीच ओळखपत्र वगैरे तयार करण्यासाठी फोटो द्यायचे होते. सरांचं मोठेपण असं, की अटलजी सायन्स काँग्रेससाठी पुण्यात आलेले होते आणि मी सायन्स काँग्रेस कव्हर करत होतो. त्यामुळं त्यांनी मला त्या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्सला जायला सांगितलं. वास्तविक पाहता, अशा मोठ्या कार्यक्रमांना आणि मान्यवरांच्या कार्यक्रमांना वार्ताहराऐवजी संपादक स्वतः जातात, असा अलिखित नियम आहे. पण सरांनी अगदीच नवखा असूनही मला तिथं जाण्याची संधी होती. तिथं गेल्यानंतर झालंही तसंच. बाकीच्या बहुतांश वर्तमानपत्रांचे संपादक आणि वरिष्ठ होते. मी एकटाच तिथं नवोदित होतो. पण सुरुवातीच्या काळातच सरांनी अशी संधी दिल्याचं खूप अप्रूप होतं. आणि आजही आहे. त्यानंतर गुजरातमध्ये असताना २००७मध्ये तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांची पत्रकार परिषद कव्हर करण्याची संधी मिळाली होती. अशा संधी खूपच कमी मिळतात. पण त्या खूप काही शिकवून जातात.

१९९९मध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होत्या. त्या निमित्तानं पुण्यासह जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी जाता आलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, फायरब्रँड नेते छगन भुजबळ, महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे, गोपीनाथ मुंडे आणि अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या सभा तसंच प्रेस कॉन्फरन्स करण्याचा अनुभव मिळाला. पुण्यातील सहा मतदारसंघांमध्ये नेमकी लढत कशी होईल आणि नेमकं काय चित्र असेल, याचा अंदाज लिहिण्याची संधी सरांनी मला दिली. अर्थातच, त्यांचं त्यावर लक्ष असायचं. पण तशा प्रकारचं राजकीय लेखन करण्याची संधी मला पहिल्यांदा सांज समाचार इथंच मिळाली. खेड, चाकण, नारायणगाव, अकलूज, बारामती आणि आसपासच्या भागांमध्ये अभ्यास दौऱ्यासाठी देखील सरांनी कायमच माझं नाव सुचविलं.

अर्थातच, पत्रकार म्हणून काम करीत असताना काही वेळा विविध ठिकाणी अंक पोहोचवायचं कामही करावं लागायचं. पण माझी त्याला ना नसायची. कारण सरांनी देखील मला कधीच नाही म्हटलं नव्हतं. खेड-आळंदीचे तेव्हाचे आमदार नारायण पवार यांची विशेष मुलाखत सरांनी घेतली होती. मुलाखतीचे काही शे की हजार अंक नारायण पवार यांच्याकडे नेऊन द्यायचे होते. सरांनी जबाबदारी माझ्यावर सोपविली. मी देखील तक्रार न करता एसटीनं गपगुमान जाऊन त्यांच्याकडे अंक सुपूर्त करून आलो होतो. कदाचित अशा कामांनीही ना म्हटलं नाही म्हणून सरांनी मला प्रत्येक संधी दिली.

कधी क्राइम, कधी महापालिका, कधी राजकारण, कधी पत्रकार संघातील प्रेस कॉन्फरन्स, सांस्कृतिक, कॉर्पोरेट आणि शैक्षणिक अशा सर्व बीट्सवर काम करण्याचा प्राथमिक अनुभव तिथंच मिळाला. अजून एक सांगायचा मुद्दा म्हणजे पत्रकारांना प्रेस कॉन्फरन्समध्ये मिळणारी गिफ्ट्स हा लपून राहिलेला विषय नाही. त्यावेळीही अनेकदा कॉर्पोरेट प्रेस कॉन्फरन्सला मला पाठवलं जायचं. माझ्या कानावर यायचं त्यानुसार इतर छोट्या वृत्तपत्रांमध्ये काय गिफ्ट मिळालं, याची साहेब लोक चौकशी करायचे. काही ठिकाणी तर ती गिफ्ट्स ऑफिसमध्येच द्यावी लागायची. (अर्थातच, साहेब लोकांना.) मात्र, सरांनी आमच्यावर तशी सक्ती कधीच केली नाही. काय मिळालं, काय गिफ्ट होतं वगैरे याची साधी चौकशीही ते करायचे नाहीत. गिफ्ट घेऊ नको, आपण गिफ्ट घेणं योग्य नाही, असे शाहजोगपणाचे सल्ले देखील दिले नाहीत. मात्र, त्याचा परिणाम बातमीवर होणार नाही, याची दखल घेण्यास नक्की सांगितलं.

सांज समाचार वृत्तपत्रामध्ये काम करीत असताना तिथं बायलाइन फार क्वचित मिळायची. शक्यतो नाहीच. त्या काळात माझं इतर वृत्तपत्रांमधील लेखन सुरूच होतं. अर्थातच, सरांना त्याची माहिती होती. त्यांनी बाहेर लिहिण्यास मला कधीच मज्जाव केला नाही. जून १९९९ ते जून २००० असं बरोब्बर एक वर्ष मी तिथं काम केलं. नंतर पुढील वर्षी पुन्हा रानडे इन्स्टिट्यूटच्या प्रवेश परीक्षेत आणि इंटरव्ह्यूत मी उत्तीर्ण झालो. माझा प्रवेश निश्चित झाला. तेव्हा तिथं पूर्ण लक्ष देऊन शिकणं मला महत्त्वाचं वाटत होतं. त्यामुळं मी सांज समाचारमध्ये येणं शक्य नाही, असं सरांना सांगितलं. तेव्हा ते म्हणाले, तुला जमेल तसं येत जा. तिकडं लक्ष देच. पण इकडं येणं थांबवू नको. पण मला ते करणं शक्य नव्हतं. कारण तिथल्या असाइनमेंट आणि इतर गोष्टींमुळं वेळ मिळणं कठीण होतं. पण मी क्वचित कधीतरी सरांना जाऊन भेटायचो. एखादा लेखही लिहून द्यायचो. सांज समाचार जेव्हा सोडलं तेव्हा माझा पगार एकाच वर्षात १७०० रुपये झाला होता. एका वर्षाच्या आत तिपटीहून अधिक पगारवाढ झाली होती. कदाचित त्यांना माझं काम आवडलं असावं म्हणूनच.

नंतर प्रभात आणि केसरीमध्ये नोकरी केल्यानंतर मी ई टीव्हीसाठी हैदराबादला जाण्याचा निर्णय घेतला. हैदराबादला जॉइन होण्यापूर्वी त्यांना भेटायला गेलो होतो. तेव्हा ते म्हणाले होते, की तू जॉइन झालास त्यानंतर काही दिवसांतच मला जाणवलं होतं, की तू फार दिवस माझ्याकडे राहणार नाहीस. दुसरीकडे कुठेतरी नक्की जॉइन होशील. आणि झालंही तसंच…

आज अचानक सकाळी पेपरमध्ये सरांचा फोटो आणि निधनाची बातमी पाहिल्यानंतर आठवणींचा हा पट पुन्हा डोळ्यासमोर आला… लंगोटी वृत्तपत्र म्हणून हिणवल्या जाणाऱ्या सांज समाचार सारख्या वृत्तपत्रामध्ये काम करताना अनेकांना चांगले-वाईट असे अनेक प्रकारचे अनुभव आले असतील. पण मला मात्र, त्या वर्षभरात बरंच शिकायला मिळालं. पुढे संधी अनेक ठिकाणी मिळाल्या. नाही असं नाही. पण सरांनी माझ्यावर टाकलेला विश्वास मला उमेदवारीच्या पहिल्याच वर्षात खूप काही शिकवून गेला.

विनम्र आदरांजली…

1 comment:

Ashish said...

आशिष चांदोरकर, नमस्कार
सुरेश जोशी गेल्याचे म. टा. वरून कळले. तुझ्या ब्लॉग मधील लेखा मुळे तुझी पत्रकारितेचे सुरुवात जोशी यांच्या ‘सांज समाचार’ पासून झाली हे कळले. त्यांच्या सायंदैनिकाच्या उभारणीला माझा किंचित हातभार लागला होता. त्याची आठवण झाली. सांज समाचार ते नंतर जेथे छापायचे त्या प्रेस मध्ये बिले, पावत्या, आदी छापणे हा त्यांचा मूळ व्यवसाय. प्रभात चित्रपटगृहा समोर एका ट्रेडलवर ते छापत.
त्या आधी शिंदे आळीत श्री. पद्माकर  डोणजेकर यांनी ‘पुणे समाचार’ नावाचे सांज दैनिक काढायचा घाट घातला होता. त्यांना वर्तमानपत्राचा काहीही अनुभव नव्हता. माझी त्यांची ओळख झाली तेव्हा मी श्री अब्दुल हमीद खान या पत्रकार मित्राची गाठ घालून दिली. आचार्य अत्रे यांच्या दैनिक मराठात श्री खान उपसंपादक होते. अत्रे यांच्या पश्चात मराठा बंद पडल्यामुळे खान मुंबई सोडून पुण्याला नोकरीच्या शोधात आले होते.
श्री.  डोणजेकर यांच्या घरी मजकूर लिहून जोशी यांच्या प्रेस वर छापायला घेऊन जावे असा दिनक्रम ठरला. मी त्यावेळी UNI मध्ये बातमीदार होतो. वेळ असेल तेव्हा खान यांना मदत करत असे. श्री जोशी यांना प्रेसच्या धंद्याचा अनुभव होताच. अंक विक्री आणि पैशाची वसूली यात ही त्यांनी हळूहळू जम बसविला.
दैनिक संध्या, सांज केसरी आणि दैनिक सकाळ चे दुपार चे दैनिक असे प्रयोग या व्यवसायात चालू होते. मातब्बर संस्थांचे व्यवसाय  बंद पडत होते. पण जोशी यांनी नेटाने काम चालू ठेवले. पत्रकारिता देखील शिकून घेतली.  श्री. डोणजेकर थकले. पुणे समाचार बंद पडला. खान पुन: बेकार झाले.
पण तोपर्यंत जोशी यांनी आपले सांज समाचार जोमाने सुरु करण्याची तयारी करून ठेवली होती. जोशी यांची क्वचित चेष्टा व्हायची. बातमीदारांमधील हेवेदावे, चेष्टा मस्करी चालायची. पण ते त्यापासून अलिप्त असलेले मी पाहिले आहे. आशिष तू म्हणतो तसं प्रोत्साहन त्यांनी इतरांनाही दिलं असणारच.
पुढे मोठे झालेल्या आशिष सारख्या ख्यातकीर्त बातमीदारांनी त्यांची कृतज्ञतापुर्वक आठवण ठेवली हे महत्त्वाचं!

किरण ठाकूर

०४०८२०१८