Tuesday, May 06, 2014

रामलला 'हम आएंगे'

मंदिर भव्य बनाऐंगे...

उत्तर प्रदेशात यायचं. लखनऊ, रायबरेली, अमेठी, वाराणसी आणि इतर ठिकाणी जायचं. पण अयोध्येला जायचं नाही, हे माझ्या मनाला कधीच पटणार नव्हतं. त्यामुळं व्हाया सुलतानपूर अयोध्येला निघालो. रात्री अयोध्येला पोहोचायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आवरायचं. रामललाचं दर्शन घ्यायचं आणि मग पुढच्या प्रवासाला निघायचं असं डोक्यात होतं. सुलतानपूरहून बसमध्ये बसलो आणि माझ्या डोळ्यासमोर रामजन्मभूमी आंदोलनाचा सगळा पटच डोळ्यासमोरून जात होता. 



१९९० आणि १९९२ या दोन्ही वर्षी जेव्हा कारसेवा झाली, तेव्हा मी अनुक्रमे सहावी आणि आठवीमध्ये होतो. तेव्लहा हान असलो आणि आता बावीस-चोवीस वर्ष उलटली असली तरीही सगळं काही, अगदी कालपरवा घडल्यासारखं डोळ्यासमोर आहे. पहिल्या वेळेस चुलत भाऊ शैलेश आणि नंतर चुलत बहिण अर्चना कारसेवेत सहभागी झाले होते. शिवाय आमच्या परिसरातील अनिल बर्वे, विक्रम सुर्वे, प्रकाश जोशी, धनंजय वाघ, विनायक राहुरकर, धनंजय घाटेसह इतरही अनेक मित्र कारसेवेला गेले होते. त्यामुळे त्यांच्याकडूनही वेगवेगळ्या कहाण्या, किस्से आणि आठवणी ऐकल्या होत्या. 

अयोध्या, श्रीराम जन्मभूमी आंदोलन आणि तेव्हाचा सगळा काळ डोळ्यासमोरून तरळत होता. पुणे स्टेशनवर अयोध्येकडे जाणाऱ्या कारसेवकांची गर्दी आणि खचाखच भरलेल्या रेल्वे दिसत होत्या. आताइतका माध्यमांचा धुमाकूळ नसल्यामुळे कुठून तरी उडत बातम्या येत असत. खरं तर बातम्या नाहीच. अफवाच त्या. मनोहर जोशी शिवसैनिकासह विमानाने कारसेवेला जाणार, कारसेवक पॅराशूटनं अयोध्येतील विवादित जागेजवळ उतरले वगैरे वगैरे बातम्या कूठून कुठून कानावर यायच्या. कुणीकुणी त्या बातम्या ऐकून फटाकेही फोडायचं आणि पेढेही वाटायचं. पण बऱ्याचशा बातम्यांमध्ये तथ्य नसायचे हे नंतर समजायचं. 



चौकाचौकांतील संदेश फलकांवर चिटकविलेल्या सामना आणि नवाकाळच्या बातम्या नि अग्रलेख वाचायला प्रचंड गर्दी होत असे. लोक उत्सुकतेने ते वाचत आणि त्यावर चर्चा व्हायची. नातूबागेच्या मैदानावर प्रमोद महाजन यांनी मोठी सभा घेऊन संघ स्वयंसेवकांच्या तिसऱ्या प्रकाराची व्याख्या केली होती. म्हणजे पहिला नियमित स्वयंसेवक, दुसरा नैमित्तिक कार्यक्रमांना येणारा स्वयंसेवक आणि तिसरा म्हणजे काय राडा करायचा आहे का,  तर येतो, असं विचारणारा स्वयंसेवक. रामजन्मभूमी आंदोलनात तिसऱ्या गटातील स्वयंसेवकांचा पुढाकार आहे, असं सांगून मिळविलेल्या टाळ्या... ते सगळं डोळ्यासमोर तरळत होतं. 

सौगंध राम की खाते है, मंदिर वही बनाएेँगे..., तलवार निकली है म्यान से, मंदिर बनेगा शान से..., रामलला हम आएंगे, मंदिर वही बनाऐंगे, मंदिर भव्य बनाऐंगे... जो न हमारे राम का, वो न हमारे काम का... सगळ्या घोेषणा पुन्हा एकदा कानात घुमत होत्या. सहा डिसेंबर १९९२ रोजी बाबराच्या नावानं तयार झालेली वादग्रस्त वास्तू पाडल्यानंतर देशभरात झालेला जल्लोष, रस्त्यारस्त्यावर वाटण्यात आलेली साखर आणि पेढे, रामजन्मभूमी आंदोलनाचा बदल घेण्यासाठी धर्मांध मुस्लिमांनी मुंबईत पेटविलेली दंगल आणि बाळासाहेब ठाकरे नि शिवसेनेनं त्याला दिलेलं चोख प्रत्युत्तर, नंतर कायमचा धडा शिकेलेले धर्मांध मुसलमान, अयोध्या तो एक झाँकी है, काशी मथुरा अभी बाकी है... ही वादग्रस्त वास्तू पाडल्यानंतर घुमलेली घोषणा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर विनाकारण घातलेली बंदी आणि नंतर तोंडावर आपटलेलं सरकार, हिंदुत्ववाद्यांचे तेव्हा हिरो बनलेले कल्याणसिंह हे सारं काही सुलतानपूरहून अयोध्येला जाताना मला आठवत होतं. 



फैझाबादहून अयोध्येत पोहोचलो. दुसऱ्या दिवशी सकाळीच लवकर उठून शुचिर्भूत होऊन दर्शनासाठी निघालो. सगळीकडे मंगलमय वातावरण होतं. कुठं घरासमोर, दुकानांसमोर सडे घातले जात होते. रामचरितमानस, हनुमान चालिसा आणि राम-हनुमानाच्या भजनांचे स्वर कानावर येत होते. कुठे कचोरी (खस्ता), जिलेबी आणि सामोशाचे घाणे पडत होते. त्याचा गंध दरवळत होता. मंदिर मार्गावर जाताना दुकानदार मंडळी पेढे, प्रसाद, हार, फुलं घेण्यासाठी मागे लागत होती. तसे ते सगळीकडेच लागतात. त्या सर्वांना टाळून हनुमान गढीपर्यंत पोहोचलो.



चाळीस-पन्नास पायऱ्या चढून हनुमान गढीवर पोहोचलो. हनुमानाचे वंशज असलेल्या माकडांची वर्दळ मंदिरात सर्वत्र आहे. तुमच्या हातात प्रसाद असेल तर मग ते तुमच्या हातातून प्रसाद हिसकावतातच. तुम्ही दिला नाही, तर प्रसंगी चावतातही. हनुमान गढी इथं जाऊन 'राम लक्ष्मण जानकी, जय बोलो हनुमान की...' केलं. रामाचं दर्शन घेण्याआधी रामभक्त हनुमानाचं दर्शन घ्यावच लागणार. हनुमानाची दोन रुपं आहेत, एक वीर मारूती. जो पराक्रमी आहे, आक्रमक आहे. दुसरा आहे दास मारूती. महापराक्रमी परमप्रतापी वीर मारूती प्रभू श्रीरामचंद्रांच्या चरणाचा दास म्हणून दास मारूतीचं रुप आपल्याला फक्त रामाच्या मंदिरातच दिसतं. इतर ठिकाणी असलेला गदाधारी हनुमान रामांच्या चरणी हात जोडून असतो. 

हनुमान गढीनंतर, जनक भवन, कनक भवन, दशरथ गद्दी वगैरे पाहिलं. दशरथ गद्दी इथं सहा फुटी हनुमानाची मूर्ती ठेवण्यात आली आहे. दशरथ गद्दी इथं जाताना गाइडनं एक गल्ली दाखविलं. १९९० मध्ये झालेल्या कारसेवेच्या वेळी दोन कारसेवक इथंच हुतात्मा झाले होते, असं त्यानं एका गल्लीत शिरताना मला सांगितलं आणि अंगावर अक्षरशः काटा आला. कोलकात्याचे रामकुमार कोठारी आणि शरदकुमार कोठारी या बंधूंचं राममंदिरासाठीचं बलिदन कोण विसरू शकेल. परिंदा भी पर मा नही सकेगा... या मुसलमानांचे मसीहा मुलायमसिंह यादव यांचं म्हणणं खोटं करून दाखविणाऱ्या कोठारी बंधूंनी लाठी-गोली खाऐंगे, मंदिर वही बनाऐंगे... असं म्हणत राममंदिरासाठी प्राणांची बाजी लावली. ऐहिक सुखासाठी कशाचीच तमा न बाळगणाऱ्यांच्या या जगात कोठारी बंधूंनी एका ध्येयासाठी, विचारासाठी प्राणांचे बलिदान केले. गाइडनं अयोध्येची माहिती देताना बोलता बोलता सांगितलं, की अयोध्येमध्ये एकूण साडेसात हजार छोटी-मोठी मंदिरं आहेत. इतकी मंदिरं आहेत. राम, सीता, हनुमान, शंकर भगवान, माँ दुर्गा आणि अशा अनेक देवदेवतांची मंदिरं आहेत. माझ्यामते त्या साडेसात हजार मंदिरांमध्ये आणखी दोन मंदिर कम स्मारकं हवीत. एक म्हणजे रामकुमार कोठारी यांचं आणि दुसरं शरदकुमार कोेठारी यांचं.



रामललाचं दर्शन घेण्यापूर्वी रामाचा दास हनुमान याचं दर्शन घेतलं. तसंच रामासाठी प्राणापर्ण करणाऱ्या त्यांच्या दोन सर्वश्रेष्ठ भक्तांचंही दर्शन घडलं. तिथून मग राममंदिराच्या दिशेनं निघालो. संपूर्ण अयोध्येत आणि विशेषतः मंदिराच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गावर विशेष सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मुख्य प्रवेशद्वारापासून आत मंदिरासमोर जाईपर्यंत चारवेळा आपली काटोकोर तपासणी केली जाते. घड्याळ, मोबाईल, पेन ड्राईव्ह, सीम कार्ड, चिप वैगेर काहीही बरोबर नेऊ दिलं जात नाही. इतंकच सोडा कंगवा आणि टूथपिक सुद्धा त्यांनी काढून ठेवायला सांगितल्या. 



मंदिर मार्गावर प्रवेश केल्यानंतर सगळा मार्ग बंदिस्त आहे. तीनही बाजूंनी लोखंडी जाळीनं मार्ग बंदिस्त आहे. आपण फक्त चालत रहायचं. त्याचा सर्वाधिक फायदा म्हणजे परिसरातील माकडांपासून आपला बचाव होतो. अनेक वळणं वळणं पार करून एका चढावर पोहोचल्यानंतर मंदिर दिसू लागतं. मंदिरावर डौलानं फडकणारा भगवा झेंडा दिसू लागतो. चढ चढल्यानंतर साधारण वीस-पंचवीस पावलं चालल्यानंतर बरोब्बर मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर उभे राहतो. मंदिर आणि आपल्यामध्ये पन्नास पावलांचं अंतर असतं. इथूनच आपल्याला रामललाचं दर्शन घ्यावं लागतं. पण प्रकाशव्यवस्था उत्तम असल्यामुळं दर्शन खूप मस्त होतं. तंबूसारख्या आकारच्या मंदिरात रामलला विराजमान झाले आहेत. मोठ्या थाटात आणि दिमाखात विराजमान बसले आहेत. त्यांच्यासमोर नतमस्त झाल्यानंतर मग साधारण एक-दीड किलोमीटरची पायपीट करून पुन्हा लॉकर रूमपाशी पोहोचलो. 

मुळात कोणत्याही गावामध्ये गेल्यानंतर मंदिरात जाऊन दर्शन घेण्याची फारशी उत्सुकता मला नसते. मात्र, अयोध्येचं राममंदिर त्याला अपवाद आहे. दलित समाजाच्या पुनरुत्थानात नाशिकच्या काळाराम मंदिराच्या आंदोलनाचं जे महत्त्व आहे, तेच हिंदू समाज संघटनाच्या इतिहासात राममंदिराच्या आंदोलनाचं महत्त्व आहे. त्यामुळं हे मंदिर इतर सर्व मंदिरापेक्षा वेगळं आहे. शिवाय काशी-मथुरेत मंदिराच्या बाजूला मशीद आहे. मंदिर पाडून मशीद बांधलेली नाही. इथं राममंदिर पाडून त्यावर मशीद बांधण्यात आली होती. मशीद कसली वादग्रस्त वास्तूच होती ती. ना तिथं मुस्लिम कधी नमाज पढले ना तिथं कधी धार्मिक प्रथापरंपरा जपल्या गेल्या. त्यामुळं अयोध्येचं आंदोलन हा एक धडा होता. शांतपणे शेजारी रहाल तर कदाचित आपण सुखाने नांदू शकू. पण जर आक्रमण करून आमच्या छाताडावर तुमची संस्कृती नि तुमच्या परंपरा लादण्याचा प्रयत्न केलात, तर बाबरी मशिदीसारखे उद्ध्वस्त व्हाल. रामजन्मभूमी आंदोलनाचा खरं तर हाच धडा सगळ्यांनी लक्षात ठेवला पाहिजे. 



रामललाचं छान दर्शन झाल्यानंतर मग नाश्त्याकडे वळलो. आधी पोटोबा आणि मग विठोबा ही म्हण अयोध्येसाठी लागू नव्हती. पुरीभाजी, कचौरी (खस्ता) आणि चहा घेतल्यानंतर मग अयोध्येतील लोकांशी थोडं बोललो. त्यांना काय वाटतं, काय नाही, हे जाणून घेतलं. अयोध्येतून 'लल्लूसिंह को इस बार नाही जिताया, तो भगवान राम भी हमें माफ नही करेंगे...' अयोध्येतील एका चहावाल्याची बोलकी प्रतिक्रिया. 'भैय्या मोदीजी का पीएम बनना तो तय है. इसबार नही तो कभी नही...' आणखी एक बोलकी प्रतिक्रिया. चहावाले, पानवाले, पुरीभाजीचे ठेले लावणारे, रस्त्यारस्त्यावरून भगवी वस्त्र घालून हिंडणारे साधू-साध्वी सगळ्यांच्याच तोंडी मोदीनामाचा जप. मंदिर बनेगा क्या... मंदिर बनना चाहिए क्या... या प्रश्नांना थेट उत्तर. 'मंदिर तो बनेगा. मंदिर बनने से कौन रोक सकता है. सब तय्यारी हो चुकी है. पत्थर काम भी पुरा हो  रहा है. अब सिर्फ मंजुरी मिलना बाकी है. एक दिन में मंदिर का काम शुरू हो जाएगा...' 



अयोध्यावासियांची प्रभू रामचंद्रांवर जेवढी श्रद्धा आहे, तेवढीच मंदिर बनणार आणि मोदीच ते बनविणार यावरही आहे. शौचालय व्हायलाच पाहिजे. पण देवालयही पाहिजे. विकास पाहिजे पण हेदेखील व्हायलाच पाहिजे, पण मूळ मुद्दे आणि विचार यांना तिलांजली देऊन नाही, यावरही आक्षेप असण्याचे कारण नाही. शिवाय आता बाबरी मशीद नामक वादग्रस्त वास्तू त्या ठिकाणी नाही. तिथं पुन्हा बाबरी मशीद बांधण्याची ताकद कोणत्याही पक्षाच्या सरकारमध्ये नाही आणि मुख्य म्हणजे आता तिथं असलेलं रामललाचं मंदिर हटविण्याची हिंमत असलेला 'माई का लाल' जन्माला आलेला नाही आणि भविष्यात कधीही जन्माला यायची शक्यताही नाही.

भरपूर लोकांशी बोलल्यानंतर मग श्री अयोध्येतून निघालो. अयोध्यावासियांच्या शब्दात सांगायचे तर अयोध्याजी मधून निघालो. मनातल्या मनात जोरात घोषणा दिली, 'रामलला हम आएंगे, मंदिर भव्य बनाऐंगे.' यामधील 'हम आएंगे' या शब्दाचा अर्थ काय आहे, हे सूज्ञ वाचकांना सांगण्याची काहीच गरज नाही. 

तेव्हा अयोध्येतून लखनऊसाठी निघालो. लखनऊला जाऊन मग पुढं वाराणसीसाठी निघायचं होतं. नरेंद्र मोदींप्रमाणेच 'मुझे भी माँ गंगा बुला रही है...'

बोलो सियावर रामचंद्र की जय... पवनसूत हनुमान की जय.

Monday, May 05, 2014

जातीपातीची गुंतागुंत

उत्तर प्रदेशच्या राजकारणाची गंमत

उत्तर प्रदेशातील मतदारसंघातील लेखाजोख्याप्रमाणेच तेथील सामाजिक परिस्थितीबद्दलही वाचायला आवडेल किंवा लोकांचं राहणीमान तसंच आर्थिक परिस्थिती याबद्दलही थोडं लिही, असं काही जणांनी सुचविलं. वास्तविक पाहता, ते माझ्याशी डोक्यात होतंच. पण इथली जातीय गणितं इतकी गुंतागुंतीची आहेत की विचारता सोय नाही. त्यामुळं आधी खूप लोकांशी बोलावं आणि नंतरच लिहावं, असं ठरविल्यामुळंच लिहायला थोडा उशीर होतोय. 



उत्तर प्रदेशात इतक्या जाती आणि त्यांच्या उपजाती की बस्स... शिवाय कोणत्याच एका जातीची मक्तेदारी नाही. म्हणजे आपल्याकडे महाराष्ट्रात कसं, मराठा अधिक कुणबी अशी बेरीज केली की इतर सर्व जाती खिजगणतीतही राहत नाहीत. उत्तर प्रदेशात मात्र, ओबीसी, एससी-एसटी, ब्राह्मण, यादव आणि कुर्मी वगैरे सर्वच जातींची टक्केवारी ताकद दाखविण्याइतपत असल्याने इथली राजकीय गणितं किचकट नि गुंतागुंतीची आहेत. शिक्षण नाही, हेच याचं मुख्य कारण. 

शिक्षण नसल्यामुळे लोक छोट्या छोट्या गोष्टींवर अवलंबून राहतात. राजकारणी देखील दर पाच वर्षांनी नागरिकांना काही तरी आश्वासनांचा तुकडा टाकतात. मतदारही त्यावर समाधान मानतात आणि अशातच पाच वर्षे निघून जातात, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे शिकण्याचं प्रमाण वाढल्याशिवाव गत्यंतर नाही. तोपर्यंत राजकारणी जातीपातींचा आणि धाक दडपशाहीचा असाच उपयोग करीत राहणार.

ढोबळपणे विचार करावयाचा झाल्यास उत्तर प्रदेशात एससी मतदारांची टक्केवारी जवळपास २२ टक्के आहे. एसटी व्होट दोन ते अडीच टक्के. सर्वसाधारणपणे चौदा ते सोळा टक्के ब्राह्मण, १५ टक्के यादव, १५ टक्के कुर्मी, तीन टक्के लोध, दहा टक्के ठाकूर, तीन टक्के बनिया आणि २५ ते २८ टक्के मुस्लिम आहे. जवळपास १५ ते २० मतदारसंघांमध्ये मुस्लिमांची टक्केवारी पन्नासहून अधिक आहे. 

दलित समाजाला उत्तर प्रदेशात गौतम म्हणून संबोधिले जाते. अनुसूचित जाती आणिजमाती देखील किरकोळ किरकोळ जातींमध्ये विभागल्या गेलेल्या आहेत. चर्मकार, पासी (कैकाडी), राजभर (नदी काठावर राहणारे), केवट, मल्लाह (नावाडी), निषाद (अतिपिछडे) वगैरे जाती एससी कॅटॅगरीत येतात. आजही हा समाज बहुतांश ठिकाणी मायावती म्हणजेच बहुजन समाज पार्टीच्या पाठिशी आहे. दलित समाज आतापर्यंत बसपाशी एकनिष्ठ असला तरीही त्या बालेकिल्ल्याला तडे जाऊ लागले आहेत.  



भर, बिन्द, कहार, कश्यप, धीवर, केवट, धीमर, बाथम, माँझी, प्रजापती, कुम्हार, तुरहा, गौड आणि गौड समाजाला समाजवादी पार्टीने अनुसूचित जातींमध्ये समाविष्ट करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे या जातींमधील काही जाती मुलायमसिंह यांच्या पाठिशी उभ्या राहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मोदी लाटेचा परिणाम दलित समाजावरही काही प्रमाणात झाला असून काही टक्क्यांपर्यंत हिदू दलित भाजपकडे वळत असल्याचे चित्र आहे. अर्थात, ही टक्केवारी नेमकी किती आहे, ते निकालांनंतरच कळणार आहे. शिवाय गेल्या निवडणुकीत मायावती यांना साथ देणा-या ब्राह्मण समाजाने बसपाला कधीच सोडचिठ्ठी दिली असून त्यांनी पुन्हा एकदा  भाजपाशी घरोबा केला आहे. 


दुसरीकडे मुझफ्फरनगरच्या दंगलीनंतर मुस्लिम समाज दुखावला गेला असून त्यांनी काँग्रेसच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याचे मनोमन ठरविले आहे. समाजवादी पार्टीचे प्रवक्ते राजेंद्र चौधरी यांना ही गोष्ट मान्य नाही. ते म्हणतात, जरुर काही ठिकाणी मुस्लिम आमच्यावर नाराज होऊन काँग्रेसच्या पाठिशी गेला आहे. मात्र, सगळीकडेच हे चित्र नाही. मुलायमसिंह यादव यांनी बाबरी मशिदीच्या मुद्द्यापासून मुस्लिमांची साथ समर्थपणे दिली आहे. शिवाय उत्तर प्रदेशात सत्तेवर आल्यानंतर आमच्या सरकारने अल्पसंख्याक समाजासाठी अनेक योजना राबविल्या आहेत. त्यामुळे मुस्लिम आमच्यापासून दूर गेला, असे म्हणणे चुकीचे आहे. 

मुलायम यांच्यासाठी आणखी एक धोकादायक गोष्ट म्हणजे त्यांची हक्काची व्होटबँक असलेल्या यादव समाजापैकी काहीजण त्यांच्यावर नाराज आहेत. मी देखील  विचारांनी कट्टर मुस्लिम असून आयुष्यभर राहीन, अशा आशयाचे काही विधान मुलायम यांनी काही महिन्यांपूर्वी केले होते. त्यामुळे अगदी अल्प असला तरीही यादव समाज त्यांच्यावर नाराज आहे. त्यामुळे मुलायम यांच्या अडणचींमध्ये भरच पडली आहे. 



बहुतांश ठिकाणी मुस्लिम आणि काही ठिकाणी दलित तर काही ठिकाणी किरकोळ प्रमाणात ब्राह्मण मतदार काँग्रेसकडे एकवटला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात काँग्रेसची हालत वाटते तितकी खराब होण्याची शक्यता नाही. उलट यंदा मोदी लाटेचा सर्वाधिक फटका नेताजी आणि बहनजी यांना बसणार आहे. काँग्रेसला फटका बसला तरीही  इतर राज्यांची तुलना करता तो किरकोळ स्वरुपाचा असेल. 


भाजपची यंदा चांदी आहे. हक्काचा ब्राह्मण मतदार त्यांच्याकडे वळला आहे. ठाकूर समाज त्यांच्या पाठिशी कायमच असतो. राजनाथसिंह मुख्यमंत्री असताना काही अतिपिछड्या जातींना आरक्शण देण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. त्यापैकी काही समाज आजही भाजपच्या पाठिशी आहे. हिंदू-मुस्लिम धुव्रीकरणामुळे जसा मुस्लिम काँग्रेसकडे एकवटला तसा हिदू भाजपकडे एकवटतो आहे. त्यात एससी आणि एसटी समाजाच्या काही जातींचाही समावेश आहे. त्यामुळे इतर तीनही पार्टीना या ना त्या स्वरुपात फटका बसत असताना भाजप मात्र, एकटा फायद्यात आहे. तूर्त तरी. निकालांनंतर ही गणिते कितपत खरी आहेत, त्यावर शिक्कामोर्तब होईल.

प्रत्येक जातीला महत्त्व असल्यामुळे की काय अनेकदा तुम्हाला तुमची जात अगदी सहजपणे विचारली जाते. किंवा समोरचा माणूस सहजच बोलता बोलता स्वतःची जात सांगून जातो. भैय्या हम पासी है... चर्मकार, क्या आप पंडित हो..., यह यादव है मुलायमसिंह की जातवाले..., वो कुर्मी है... अशी वाक्य अगदी सहजपणे कानावर पडत असतात. आपण एक दिवस भेटणार, दोन तास गप्पा मारणार आणि मग कशाला हवीय जात न बित हा विचार इथं फोल ठरतो. प्रत्येकाला जातीचा अभिमान आहेच, पण समोरच्याची जात जाणून घेण्याची उत्सुकता पण आहे. 



जातीप्रमाणेच आपल्या राजकीय निष्ठेचं प्रदर्शन करणं इथल्या लौकांना प्रौढीचं वाटतं. म्हणजे लोक उगाचच मोदी किंवा आम आदमीच्या टोप्या घालून हिंडतील. प्रचारादरम्यान ठीक आहे. पण घरातून भाजी आणायला येताना, चहा प्यायला येतानाही टोप्या घालून येतील. स्वतःच्या घरांवर राजकीय पार्टींचे झेंडेच लावतील, हातगाडीवर किंवा सायकलरिक्शेवर किंवा ऑटोवर पार्टीचे झेंडे लावून हिडतील, दुकांनांवर मोठे स्टीकर्स किंवा बॅनर्स लावतील... असं बरच काही. स्टीकर्स, झेंडे, बिल्ले, बॅनर्स, काही ठिकाणी रंगविलेल्या भिंती, टोप्या, प्रचार करीत हिंडणा-या ऑटो असा आपल्या इथं काहीसा हरविलेला प्रचाराचा माहोल इथं अजूनही अनुभवायला मिळतो. 

अशा सर्व गोष्टींबरोबरच जाहीर सभा, मेळावे, पदयात्रा, कोपरा सभा यांच्यावर राजकीय पार्ट्यांचा आणि नेत्यांचा भर आहे. आपल्याला अनुकूल असलेल्या भागांमध्ये गावागावांत जाऊन मतदारांशी संवाद साधायचा, विशेष अनुकूल नसलेल्या गावांमध्ये धावती भेट द्यायची, मोठ्या शहरांमध्ये किंवा तालुक्याच्या गावांमध्ये रोडशो करून अधिकाधिक भाग कव्हर करायचा, एखाद्या आपल्या गावात विरोधकांकडून पैसा वाटला जातोय किंवा आमिष दाखवलं जातंय,  असं कानावर आल्यानंतर तातडीनं तिथं मिटींग लावणं वैगेरे गोष्टी आपल्याकडेही थोड्या बहुत प्रमाणात अशाच पद्धतीनं होतात. 

भाजपा, काँग्रेस आणि समाजवादी पार्टीचा प्रचार अशाच पद्धतीनं सुरू असला तरीही बसपाचा प्रचार इतर पार्टींसारखा जाणवत नाही. म्हणजे त्यांचे खूप बॅनर्स, खूप होर्डिंग्ज किंवा स्टीकर्स-पोस्टर्स दिसणार नाहीत. चौकाचौकात कोपरा सभा होताहेत, रॅली निघालीय, असं दृष्यही अभावानंच पहायला मिळेल. सभा फक्त बहनजी मायावती यांचीच. बसपाची प्रचार पद्धत एकदम निराळी. 




बसपाचा प्रचार सायलेंट स्वरुपात असतो. घरोघरी जाऊन प्रचार करणं ही बसपाची पद्धत. बसपाची बूथ स्तरावरील यंत्रणा भक्कम आहे. त्यांचे संघटन मजबूत आहे. बसपाने एससी सेल, एसटी सेल, ब्राह्मण सेल, ओबीसी सेल असे विविध जातींचे सेल बनविले आहेत. हे लोक विविध गावांमध्ये जाऊन संबंधित सेलमार्फत तेथील मतदारांचे मेळावे भरवितात. त्यांच्याशी संवाद साधतात. जास्त गाजावाज न करता मतदारांपर्यंत, त्यातही आपल्या हक्काच्या मतदारांपर्यंत पोहोचून व्होट बँक अबाधित ठेवण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे मतदारसंघात फिरल्यानंतर बसपाचा प्रचार पटकन जाणवत नाही. पण यंत्रणा कार्यरत असते. 

तूर्त तरी उत्तर प्रदेशातील जातीची गणितं अशी आहेत. ही समीकरणं अखेरच्या टप्प्यापर्यंत अशीच राहतात, की त्यामध्ये अचानक काही बदल होतात, ते आपल्याला निवडणूक निकालांनंतरच कळेल. तोपर्यंत तरी आहे हे असं आहे.

Saturday, May 03, 2014

मोदी लाटेची लिटमस टेस्ट

काँग्रेस भक्कम असूनही लाट कमळाची

काँग्रेसचे नेते बेनीप्रसाद वर्मा यांचे गाव असलेला बाराबंकी मतदारसंघ हा उत्तर प्रदेशात नरेंद्र मोदी यांची लाट आहे किंवा नाही, हे सिद्ध  करू शकतो. लखनऊपासून साधारण पन्नास किलोमीटर अंतरावर असलेल्या बाराबंकी गावात बेनीप्रसाद वर्मा राहतात. मात्र, सध्या ते लढत आहेत गोंडा येथून. फैझाबाद मार्गावर बाराबंकी गाव आहे. हा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहे. रायबरेली आणि अमेठीपेक्शा बाराबंकी अधिक व्यवस्थित आणि नीटनेटके आहे. चकाचक रस्ते, पार्टी प्लॉट्स, हॉस्पिटल्स, मोठ्या इमारती, दुकाने आणि ब-यापैकी मोठा बस स्टॉप. तालुका कसा छान व्यवस्थित.



बाराबंकी मतदारसंघात काँग्रेसने विद्यमान खासदार आणि एससी-एसटी कमिशनचे अध्यक्ष पी. एल. पुनिया यांना पुन्हा निवडणूक रिंगणात उतरविले आहे. तर भारतीय जनता पार्टीने प्रियांकासिंह रावत यांना उमेदवारी दिली आहे. मोदी लाटेची लिटमस टेस्ट मी अशासाठी म्हटलं, की या मतदारसंघात पुनिया यांचे काम आणि नाव चांगले आहे. त्यांची वैयक्तिक प्रतिमा छान आहे. तसेच जनसंपर्क, लोकांच्या कामांचा निपटारा करण्याचा धडाका आणि सर्वांना उपलब्ध असलेला खासदार अशी प्रतिमा यामुळे पुनिया यांचा विजय निश्चित मानला जात होता. पुनिया हे बहन मायावती आणि नेताजी उर्फ मुलायमसिंह यांच्या सरकारमध्ये मुख्य सचिव राहिलेले आयएएस अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल लोकांमध्ये फार काही वाईट ऐकायला मिळत नाही. 



गंमत मात्र, अशी आहे की मोदी यांच्या लाटेमुळे त्यांच्या नाकीनऊ आले आहेत. प्रियांकासिंह रावत यांचा आणि मतदारसंघाचा थेट संबंध नाही. त्या मतदारसंघातील नाही की त्यांचे त्याठिकाणी काही काम आहे. प्रियांकासिंह यांचे पती रघुनाथसिंह रावत हे नागपूर येथे इन्कम टॅक्स ऑफिसर आहेत. त्यांचे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिका-यांशी चांगले संबंध आहेत. संघविचारांचे असल्यामुळे आणि रावत समाज उत्तर प्रदेशात एससी कॅटेगरीत मोडत असल्याने बाराबंकीमधून प्रियांकासिंह यांना रावत यांना तिकिट देण्यात आले आहे. मुळात प्रियांकासिंह या अगदीच नवख्या आहेत. संपूर्ण मतदारसंघात त्यांना कोणी फारसे ओळखतही नाही. तरीही संपूर्ण मतदारसंघात भाजपाची हवा पहायला मिळते. अनेक ठिकाणी कमल खिलेगा..., इस बार फूल... असे संवाद ऐकायला मिळतात. 



काँग्रेस नेते बेनीप्रसाद वर्मा आणि पी. एल. पुनिया यांच्यात विस्तवही जात नाही. इथले सहाच्या सहा आमदार समाजवादी पार्टीचे आहेत. पुनिया आणि वर्मा यांच्यातील भांडणामुळेच समाजवादी पार्टीला येथून मोठे यश मिळाले, असे म्हटले जाते. पुनिया यांना पाडण्यासाठी बेनीप्रसाद यांनी त्यांची ताकद प्रियांकासिंह यांच्यामागे लावली असल्याची चर्चा आहे. अर्थातच, लपून छपून. मतदारसंघात भारतीय जनता पार्टीची यंत्रणा आणि संघटना काँग्रेसइतकीच मजबूत आहे. गावागावांत भाजपाप्रमाणेच अभाविप, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, हिंदू युवावाहिनी आणि मुख्य म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम जाणवण्याइतपत आहे. त्यामुळे उमेदवार नवखा असला तरीही पार्टीची यंत्रणा मजबूत आहे. त्याला मोदी लाटेची साथ मिळाल्याने प्रियांकासिंह रावत यांचे नशीब उजळून निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मोदी लाट नसती तर पुनिया यांनी भाजपच्या उमेदवाराला सहज पराभूत केले असते, अशी परिस्थिती. त्यामुळेच म्हटलं, की मोदी लाटेची लिटमस टेस्ट आपल्याला बाराबंकीमध्ये पहायला मिळणार आहे. 

बाराबंकी हे गाव साधारण दोन-अडीच लाखांचे. इथं वीज आणि रोजगाराची समस्या उग्र आहे. समाजवादी पार्टीने विधानसभा निवडणुकीदरम्यान दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. त्यामुळे लोक त्यांच्यावर नाराज आहेत. परिसरातील काही साखर कारखान्यांचे पुनरूज्जीवन करण्याचे आश्वासनही पार्टीने पाळेलेले नाही. त्यामुळेच यंदा समाजवादी पार्टीला लोक धडा शिकवतील, असं इथल्या काँग्रेस नि भाजपच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीच्या उमेदवारांची परिस्थिती इथं बिकट आहे. लढत आहे काँग्रेस आणि भाजपामध्येच.



बाराबंकी गावानंतर मग देवा आणि फतेहपूर या दोन गावांकडे निघालो. बाराबंकीहून फतेहपूर सुमारे ४१ किलोमीटर आणि देवा दोन्ही गावांच्या मध्ये. वाटेत जागोजागी पुदिन्याची शेती केली जाते. त्यामुळे बसमध्ये वा-याची झुळूक आली, की पुदिन्याचा गंध नाकामध्ये हळूवार शिरतो. असा अनुभव अधूनमधून येत असतो. पुदिन्याचा गंध घेत घेत आपण गावात येऊन पोहोचतो. देवा आणि फतेहपूर ही दोन्ही गावे मुस्लिमबहुल. फतेहपूरमधील एकूण २९ हजार मतदारांपैकी जवळपास १८ हजार मतदार मुस्लिम. मतदारसंघातच थोड्या बहुत प्रमाणात अशी परिस्थिती आहे. एकूण मतदारसंघातील मुस्लिमांची टक्केवारी सुमारे पंचवीस टक्क्यांपर्यंत आहे. त्यामुळंही भाजपची आणि पर्यायानं मोदी लाटेची कसोटी या मतदारसंघात आहे. हिंदू-मुस्लिम धुव्रीकरणाचा फायदा भाजपला होतो की काँग्रेसला, हे समजण्यासाठी देखील बाराबंकी एकदम योग्य मतदारसंघ आहे. 

फतेहपूरमध्ये काँग्रेसच्या बूथवर वीस-पंचवीस मुस्लिम कार्यकर्ते भेटले. त्यांचे नेतृत्त्व करीत होते, स्टार कॅम्पेनर अहमद सरकार. मुझफ्फरनगरच्या दंग्यानंतर मुस्लिम मोठ्या प्रमाणावर काँग्रेसकडे एकवटल्याचं त्यांच्याशी बोलण्यातन जाणवलं. लखनऊमध्ये चौक, आलमबाग, कैसरबाग आणि इतर काही मुस्लिम बहुल भागांमध्ये फिरताना जाणवलं होतं. लखनऊमध्ये मुस्लिम आता वेगळ्या पद्धतीनंही एकवटला असल्याची चर्चा सुरू आहे. म्हणजे शिया आणि सुन्नी यांच्यात बरेचदा मतदान कोणाला करायचे यावर एकमत नसते. म्हणजे सुन्नी बरेचदा काँग्रेसला मतदान करतात. तर अनेक शिया मुस्लिमांना भाजपबद्दल सॉफ्ट कॉर्नर असतो, असा आजवरचा अनुभव. पण मोदी फॅक्टरमुळे शिया-सुन्नी यांनी एकत्रितपणे काँग्रेसला एकगठ्ठा मतदान केले आहे, असे लखनऊमध्ये अनेकांशी बोलल्यानंतर ऐकायला मिळाले. अर्थात, त्यामुळे काँग्रेसला विजय मिळणार नाही, हे नक्की. कारण भाजपचा बालेकिल्ला असलेल्या उत्तर आणि पूर्व लखनऊमधून मतदानाची टक्केवारी पंधरा टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे भाजप आश्वस्त आहे. 



सांगायचा हेतू असा, की मुस्लिम काँग्रेसकडे एकवटला आहे. मुझफ्फरनगरची दंगल हाताळण्यात समाजवादी पार्टीला अपयश आले. मुळात दंगल रोखली नाही. दंगलीवर लवकर नियंत्रण आणण्यात ते अपयशी ठरले आणि नंतर पुनर्वसनाचे कामही रेंगाळले. त्यामुळे मुस्लिम समाज मुलायमसिंह यांच्यावर जाम भडकला आला आहे. मोदी यांची पंतप्रधानपदासाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतरपासूनच मुस्लिम हळूहळू काँग्रेसकडे जाऊ लागला. त्यात आणखी एक कारण मिळाले मुझफ्फरनगर दंगल प्रकरणाचे. मुस्लिम दूर जाऊ लागल्यामुळेच आबू आसिम आझमी मुस्लिमांची डीएनए टेस्ट वगैरे करण्याची भाषा बोलत आहे. 

अहमद सरकार आणि फतेहपूर येथील अनेक मुस्लिम नागरिकांशी चर्चा केल्यानंतर खूप मुद्दे पुढे आले. एकतर सगळा मीडिया भाजपा आणि रास्वसंघाने विकत घेतला आहे, यावर मुस्लिम समाजाचा ठाम विश्वास आहे. दुसरे म्हणजे, नरेंद्र मोदी यांनी मुस्लिम समाजाच्या विकासासाठी विशेष कोणते आश्वासन दिले, आमच्यासाठी वेगळे काय करणार हे कुठे सांगितले, मग आम्ही त्यांना का पाठिंबा द्यावा, असे मुद्दे काही जणांनी व्यक्त केले. दुसरे म्हणजे अटलबिहारी वाजपेयी यांच्याबद्दल मुस्लिमांना विशेष आदर आहे. सौदी अरेबियाशी केलेल्या कुठल्याशा करारामुळे मुस्लिम नागरिकांना तिथं नोकरीसाठी जाण्यात सुलभता आली, असं त्यांचं म्हणणं होतं. शिवाय राजनाथ सिंह हे देखील मवाळ छबीचे आहेत. आम्हाला त्यांच्याबद्दलही आक्शेप नाही, असं काही तरुणांनी मत व्यक्त केलं. अहमद सरकार तर म्हणाले, की लालकृष्ण अडवाणी देखील आम्हाला चालतील पण मोदी नको. मी म्हटलं, अहो त्यांनी बाबरी मशिदीचे आंदोलन केले, ते तुम्हाला चालतील. सरकार म्हणाले, वो बहुत पुरानी बात हुई है... लेेकिन मोदी नही चाहिए. अगर वो हमारे पास आते, माफी माँगते, हात बढाते तो हम उन्हे भी सर्मथन देते. स्वीकार करते. मगर अब नाही....

मुस्लिमांना बाजूला ठेवून देशाचा विकास होणार नाही ध्यानात ठेवा. एकेक जण त्वेषाने आणि आवेषाने बोलत होता. गांधींना तुम्ही (म्हणजे हिंदूंनी) मारले, इंदिरा गांधींना मुस्लिमांनी नाही मारले, राजीव गांधी यांची हत्या मुस्लिमांनी नाही केली... तरी मुस्लिम दहशतवादी. प्रत्येक मुस्लिमाकडे दहशतवादी नजरेनं पाहणे सोडून द्या. आम्ही पण देशभक्त आहोत. भारताला आमचा देश मानतो. आमच्या देशभक्तीवर शंका घेणारे तुम्ही कोण... बापरे एका पाठोपाठ एक वाक्यांची सरबत्ती होत होती. अर्थात, त्यांचे काही मुद्दे बरोबर आणि पटण्यासारखेच होते. असंच आणखी इकडचं तिकडचंही बरंच काही बोलणं झालं. 



मुस्लिम समाज हा स्ट्रॅटेजिक व्होटिंग करतो हा इतिहास आहे. म्हणजे जो उमेदवार भाजपला पराभूत करण्याइतपत मजबूत असेल, त्यांना मुस्लिम मतदान करतात. बाराबंकीमध्ये त्यांनी काँग्रेसला मतदान केले, तर शेजारच्या सीतापूर मतदारसंघात बहुजन समाज पार्टीच्या उमेदवाराला त्यांनी मतदान केले. काँग्रेसकडून तेथे वैशाली अली उमेदवार आहेत. मात्र, त्या हाफ मुस्लिम आहेत. त्यांच्या विजयाची शक्यता कमी आहे. त्यामुळे तिथं बसपाच्या उमेदवारामागे मुस्लिम एकवटला आहे, अशीही माहिती मिळाली. 

थंडगार लिंबू सरबत पिऊन निघालो. लखनऊच्या दिशेनं निघालो असलो तरीही मनात विचार होता, त्या मुस्लिम मंडळींबरोबर केलेल्या चर्चेचा. त्यांच्या डोळ्यातील राग आणि शब्दाशब्दांमधून व्यक्त होणारी चीड अंगावर शहारे आणत होती. एखाद्याच्या देशभक्तिबद्दल आणि देशावरील निष्ठेबद्दल जर कुणी शंका घेत असेल, तर त्याला किती वाईट वाटू शकतं, याची कल्पनाही न केलेली बरी. अर्थात, मग बॉम्बस्फोट कोण घडवून आणतं, सुक्याबरोबर ओलंही जळतंच असं म्हणून सोडून द्यायचं का, सर्वांनाच एका तराजूत तोलून समाज किती गंभीर चूक करीत आहे, अशा अनेक गोष्टी मनात उमटत होत्या.  त्याच विचारत लखनऊपर्यंत येऊन पोहोचलो.

उत्तर प्रदेशमधील जातीय राजकारण, इथली आर्थिक नि सामाजिक परिस्थिती या विषयांवरही बरंच लिहायचं आहे. पुढील ब्लॉगमध्ये त्यावर लिहिण्याचा प्रयत्न करीन.

Friday, May 02, 2014

मुक्काम पोस्ट अमेठी...

नाव मोठ्ठं... लक्षण खोट्टं... 

रायबरेली परवडलं, इतकं अमेठी भकास आणि बकवास आहे. साठ-साठ वर्ष मतदारसंघावर राज्य करणाऱ्या गांधी घराण्याने नरेंद्र मोदींच्या विकासाच्या गुजरात मॉडेलची चर्चा करण्याआधी अमेठी नि रायबरेली विकास मॉडेलची चर्चा केली पाहिजे. अमेठीमध्ये रस्ते नाहीत. अरुंद बोळ म्हणजेच रस्ते. उघड्या गटारांमधून वाहणारे सांडपाणी, सांडपाण्यामुळे प्रचंड संख्येने निर्माण झालेले डास, अरुंद रस्त्यांमुळे सदैव होणारे ट्रॅफिक जाम. अमेठी मतदारसंघातील शेकडो गावांमध्ये आजही वीज नाही. मुख्य रस्त्यापासून गावाकडे जाणारे सर्व रस्ते आजही मातीचेच.



अमेठीमध्ये राहण्यालायक एक लॉज नाही की एक चांगल्या दर्जाचे हॉटेल नाही. चांगलंचुंगलं खायला साधं रेस्तराँही नाही. खायचं तर हातगाडीवरचं किंवा एखाद्या टपरीवरचं. गावात छोटं-मोठं हॉस्पिटलही नाही. त्यामुळं साध्या-सुध्या उपचारांसाठीही दूरदूर जावं लागतं. इथं एकही महाविद्यालय नाही. म्हणजे मॅनेजमेंट, इंजीनिअरिंग, मेडिकल आणि उच्च शिक्षण देणारी एकही संस्था नाही. गावाच्या इतर तालुक्यांपासून अमेठीसाठी बससेवा नाही. सकाळी आणि संध्याकाळी एकच बस अशी दुर्दशा. छोट्या-मोठ्या खासगी गाड्या आणि टमटम वगैरे सुविधांसह प्रवास करवा लागतो. मुळात अमेठी म्हणजे मोठ्ठं खेडं आहे. नाव मोठ्ठं आणि लक्षण खोट्टं. साठ वर्षे राज्य करणाऱ्यांनी मग केले काय, हा प्रश्न उपस्थित होतो.



पूर्वीच्या गौरीगंज जिल्ह्याचे नाव बदलून मायावतींनी त्याचे नाव राजर्षि शाहूमहाराज नगर असं केलं. फक्त नावं बदलून काहीही होत नाही, हे या राजकारण्यांना कोण समजावणार. मुलायमसिंह यांनी शाहूमहाराज नगरऐवजी जिल्ह्याचं नामकरण अमेठी असं केलं. मात्र, जिल्ह्याचं मुख्यालय आजही गौरीगंजलाच आहे. अमेठीपासून साधारण तेरा किलोमीटर अंतरावर. जिल्ह्याला अमेठीचे नाव फक्त नावाला. सर्व व्यवहार गौरीगंज येथेच होतात. 

विकासाच्या गप्पा मारणाऱ्या गांधी घराण्यानं स्वतःच्या मतदारसंघात काय विकास केलाय, खरं तर काय दिवे लावलेत तेच पाहण्यासाठी मला अमेठीमध्ये जायचं होतं. लखनऊहून सकाळी निघालो. कानपूर रोडवर थोडं अंतर कापल्यानंतर मग डावीकडे सुल्तानपूर रोडला वळलो. साधारण 85 किलोमीटर अंतरावर जगदीशपूर नावाचा तालुका आहे. त्याचा समावेश अमेठी मतदारसंघात होतो. अमेठीतील पाच मतदारसंघापैकी तीन ठिकाणी समाजवादी पक्षाचे आमदार असून दोन ठिकाणी काँग्रेस आहे.



जगदीशपूर तालुक्यात भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार स्मृती इराणींचा दौरा होता. त्यांनी मतदारसंघात  जोर लावला आहे. रोज 35 ते 40 गावांमध्ये जाऊन त्या मतदारांशी संवाद साधतात. जगदीशपूरपासून पाचच किलोमीटर अंतरावर इराणी यांच्या गाड्यांचा ताफा होता. मात्र, हे पाच किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी मला अर्धा तास टमटमची वाट पहावी लागली. शेवटी एका बाईकवाल्याला विनंती करून त्याच्या मागे बसलो आणि संबंधित गावांमध्ये पोहोचलो. 

मुख्य रस्त्यापासून आत गेल्यानंतर लगेचच मातीचा रस्ता. त्यामुळे काही मिनिटांतच काळ्या जीन्सचा रंग मातकट झाला आणि आणखी काही तासांनी तर मला बदामी रंगाची जीन्स घातली आहे, की काय असा भास होऊ लागला. गावांमध्ये ना धड रस्ते, ना विद्यार्थ्यांसाठी शाळा ना वीज. काहीच नसलेल्या गावांमध्ये स्मृती इराणी यांच्या प्रचाराचा ताफा पोहोचतो. शंभर सव्वाशे गावकरी त्यांची वाट पाहत थांबलेले असतात. गावातील बूथप्रमुखांना स्मृती इराणी स्वतः गंध लावतात. त्यांना भाजपचे उपरणे देऊन सात तारखेसाठी शुभेच्छा देतात. गावकरीही त्यांचे हार घालून स्वागत करतात. त्यांच्यावर पुष्पवर्षाव करतात. 



हे सोपस्कार पार पडल्यानंतर स्मृती इराणी गावकऱ्यांच्या शैलीतच त्यांच्याशी संवाद साधतात. भाईसाहब, एक बार गौरीगंज के एक गाव में गई थी... बहनजी अभी अभी आते हुए... वगैरे वगैरे अशी अगदी सहजपणे भाषणाची सुरवात करतात. तुमचा खासदार तुम्हाला दहा वर्षांत एकदा भेटायला येत नाही, मी गेल्या महिनाभरात दुसऱ्यांदा आले. यापुढेही कायम येत राहणार. गौरीगंजमध्येच आता मी घर घेतले आहे. अमेठीची रहिवासी झाले आहे. त्यामुळे मी कायम येत राहीन वगैरे सांगून आश्वस्त करीत राहतात. राहुल संसदेत गॅस सिलिंडरवर बोलतात, मात्र, इथे अमेठीत लोकांना चार-चार महिने रॉकेलवर भागवावं लागतं. महिलांना गावाची नजर चुकवून रात्री-अपरात्रीच विधींसाठी जावं लागतं, गावात माध्यमिक शिक्षणाची सोय नाही, अशा विषयांना हात घालतात.



सिल्कचा कारखाना लागणार म्हणून लोकांनी स्वतःच्या जमिनी कवडीमोल भावाने सरकारला दिल्या. मात्र, ना कारखाना लागला ना जमिनी परत मिळाल्या. जमिनीचा मालक असलेला शेतकरी कंगाल झाला आणि दिल्ली-मुंबईत मोलमजुरी करण्यासाठी त्याला जावे लागले. पुन्हा जर तुम्हाला मालक बनायचे असेल आणि सुखाचे जीवन जगायचे असेल तर गांधी घराण्याला हद्दपार करा. इतकी वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसने काही केले नाही. आता काँग्रेस विरोधात बसणार आहे. विरोधात बसणारे गावाचा काय विकास करणार. सत्तेत येणाऱ्या भाजपला मतदान करा, असे आवाहन केल्यानंतर टाळ्यांचा कडकडाट.



अमेठीतील रस्त्यांची लांबी नाही, तर खड्ड्यांची खोली मोजली जाते, असं वाक्य येताच गावकरी टाळ्यांचा कडकडाट करतात. जणू त्यांना हे वाक्य मनाला भिडलेलंच असतं. गावात वीज नाही. भविष्यात जर वीज हवी असेल तर सात मे रोजी घराबाहेर पडून कमळाचे बटण दाबा आणि काँग्रेसच्या उमेदवाराला जोरदार करंट द्या, असे आवाहन करून पुढच्या गावाकडे रवाना होतात. साध्या-सोप्या पण प्रभावी शैलीत नागरिकांशी संवाद साधतात. तितक्याच हजरजबाबीपणे माध्यमांशी बोलतात. राज्यसभा टीव्हीच्या प्रतिनिधीने त्यांना सवाल केला, अमेठी ही क्यो... स्मृती इराणींचा प्रतिसवाल... क्यो नही. अमेठीमध्ये इतक्या वर्षांत काहीच झाले नाही, म्हणून मी येथे आले आहे इत्यादी इत्यादी. 

 जगदीशपूरमध्ये रामलखन पासी हे भाजपचे माजी आमदार भेटले. ते कल्याणसिंह यांच्या काळात राज्यमंत्री होते. त्यांनी मतदारसंघामध्ये 85 रस्ते बांधले. मात्र, नंतरच्या काळात एकही नवा रस्ता बांधण्यात आला नाही किंवा जुन्या रस्त्यांची डागडुजी करण्यता आली नाही, ही त्यांची खंत ते बोलून दाखवितात. पासी यांचा पुतण्या असलेल्या राजन पासी यांच्या बोलेरो गाडीतून मग पुन्हा जगदीशपूरमध्ये आलो. प्रमोद महाजन यांना मी माझ्या याच गाडीतून एकदा सभास्थळी सोडलं होतं.... वगैरे आठवणी तो जाताजाता सांगतो. 



मखदूमपूर, देवकली, पुरेगोसाई, लखनीपूर वगैरे गावातून प्रवास झाल्यानंतर स्मृती इराणी यांच्या प्रचार दौऱ्यातून बाहेर पडून पुन्हा गौरीगंजच्या दिशेने निघालो. अर्थातच, राजन पासीच्या गाडीतून. त्यानं जगदीशपूरला सोडलं. मात्र, तिथून अमेठीसाठी थेट गाडी नव्हती. चार-पाच टमटम बदलून जावं लागणार होतं. भर दुपारच्या उन्हात चार-पाच टमटम बदलून अमेठीला जाणं अगदी जिवावर आलं होतं. पण देव धावून येतो, असं म्हणतात तसा एक स्कॉर्पिओवाला माझ्या मदतीला धावून आला. हात दाखविल्यानंतर थांबला आणि त्यानं मला गौरीगंज येथे सोडण्याचं कबूल केलं. 

काय योग असतो बघा, तो स्कॉर्पिओवाला निघाला शिवसैनिक. उत्तर प्रदेश शिवसेनेचा माजी अध्यक्ष. रविदत्त शर्मा. नोएडा येथे राहणारा. पंडित म्हणजे ब्राह्मण असलेल्या शर्माजींनी सध्या शिवसेनेपासून दूर होऊन परशुराम सेना स्थापन केली आहे. अर्थात, त्यांच्या व्हिजिटिंग कार्डवर जय  हिंदुराष्ट्रचा नारा आहे. शिवाय शिवसेनेची जबाबदारी नसली तरी अजूनही ते स्वतःला सैनिकच मानतात. मनोहर जोशी, मधुकर सरपोतदार यांच्यापासून ते मोहन रावले - अनंत गीतेंपर्यंत अनेक जण माझ्या घरी येऊन गेले आहेत, असं ते सांगत असतात. मातोश्रीवर वर्षातून एकदा तरी जातोच, असंही आवर्जून सांगतात.



इथं मात्र, ते आले होते ते प्राध्यापक कुमार विश्वास यांच्या प्रचारासाठी. विश्वास हे त्यांचे साडू लागतात. जिंकण्याची आशा नसली तरी कुमार विश्वास यांनी चांगली हवा तयार केली आहे, असं ते सांगत असतात. गेल्या चार महिन्यांपासून त्यांनी ठिय्या मांडला आहे. गावागावात जात आहेत. राहुल यांच्या कामाचा पर्दाफाश करीत आहेत. तिकडे स्मृती इराणी आणि इकडे कुमार विश्वास. विश्वास यांच्या प्रचारासाठी तीन दिवस अरविंद केजरीवालही अमेठीतच आहेत. मात्र, 49 दिवसांत राजीनामा दिल्याचा निर्णय अमेठीतील अनेकांना मान्य नसल्याचे लोकांशी बोलताना जाणवले. त्याचा फटका विश्वास यांना बसणार हे नक्की. बोलता बोलता गौरीगंज येतं आणि मी उतरतो.

खचाखच भरलेल्या प्रायव्हेट बसमधून घामाघून होत मग अमेठीच्या दिशेनं निघतो. रस्ता दुपदरी आणि एकदम गुळगुळीत. गौरीगंजपासून तेरा किलोमीटर जाण्यासाठी अर्धा तास लागतो. जागोजागी लोक चढत-उतरत असतात. अखेरीस अमेठीत पोहोचतो. प्रचंड ट्रॅफिक जाममुळं गावाच्या आधीच थोडं उतरून चालत जाणं परवडतं. आधीच वर्णन केल्याप्रमाणं एकदम नियोजन नसलेलं आणि अस्वच्छ गाव. गावातून फिरताना लोकांशी बोलणं होत असतं. राहुल गांधी जिंकणार, असाच प्रत्येकाचा सूर असतो. अमेठीत काही रिक्षाचालक, पथारीवाले, हातगाड्यांवर कुमार विश्वास यांचे स्टीकर्स लावलेले दिसतात. उत्सुकतेने त्यांना विचारल्यानंतर ते देखील आम आदमी पार्टी अच्छी है... असं मोजकंच सांगतात. 



चहाच्या टपरीवर काही तरुण भेटतात. अमेठी कसंय, विचारल्यानंतर भलतेच भडकतात. म्हणतात, काय आहे इथं. काहीही नाहीये. सांडपाण्यामुळे फक्त मोठ्ठे मच्छर आहेत. रात्री उघड्यावर राहून पहा दुसऱ्या दिवशी काय हालत होते. राहुल गांधींनी काहीही केलेलं नाही. आमच्यासाठी शिक्षणाची व्यवस्था नाही. नोकऱ्या नाही. बेरोजगार आहोत. लष्करात सहभागी होण्यासाठी प्रयत्नशील आहोत. तिथं नाही झालं तर काय कराचयं प्रश्नचिन्हच आहे इइ. जनता भावनिक आवाहनांना भुलते, गांधी घराण्याला भुलते नि मतदान करते, असं त्यांचं म्हणणं. परिवर्तन व्हायला पाहिजे, पण ते होण्याची शक्यता कमीच आहे. कारण गांधी घराण्याची जादू अजूनही आहे. भले त्यांनी काहीही केलेलं नसलं तरीही. या वाक्यावर मी त्यांचा निरोप घेतो. 



काँग्रेसचे नेते अशोक श्रीवास्तव भेटतात. ते सोनिया गांधी आणि दहा जनपथच्या बरेच जवळचे आहेत, अशी माहिती मिळते. ते काँग्रेसचे राजकारण आणि विकास यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न करतात. हे पहा, राहुल यांनी बराच पैसा आणला. त्यांनी मतदारसंघावर लक्ष  ठेवण्यासाठी नेमलेल्या लोकांना त्यांच्या कल्पना सांगितल्या. त्या कशा राबविता येतील, तेही सांगितले. मात्र, स्थानिक पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्ते राहुल यांच्या विश्वासाला पात्र ठरले नाहीत. त्यांनी गावात, मतदारसंघात काहीही विकास केला नाही. राहुल त्यांच्यावर विसंबून राहिले आणि लोकांच्या रोषाला आता सामोरे जावे लागत आहे. अर्थात, लोकांचा रोष स्थानिक नेत्यांवर आहे. राहुल गांधी यांच्यावर नाही... असं सांगून ते राहुल यांचे समर्थन करण्याचा प्रयत्न करीत असतात. आता राहुल यांना त्यांची चूक समजली आहे. ते पुढील काळात चांगल्या पद्धतीने मतदारसंघाकडे लक्ष देतील आणि काही चुका सुधारतील, असं श्रीवास्तव सांगत असतात.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे काँग्रेसच्या काही नेत्यांनुसार, राहुल यांनी विकासाच्या अनेक योजना आणल्या. मात्र, स्थानिक सरकार समाजवादी पक्षाचे असल्यामुळे त्यांनी विकासाला खोडा घातला. म्हणजे काँग्रेसने विजेचे खांब रोवले. मात्र, वीज देणं हे राज्य सरकारचं काम आहे. ते त्यांनी केलं नाही, असले हास्यास्पद दावे अमेठीच्या अशिक्षित मतदारांना सांगण्यासाठी योग्य असू शकतात. मात्र, देशभरात तुम्ही असे दावे केले तर तोंडावरच आपटणार ना... कन्नोज आणि मैनपुरीतून काँग्रेस लढत नाही. अमेठी नि रायबरेलीतून समाजवादी पक्ष उमेदवार देत नाही, अशी सेटिंग करण्यासाठी तुम्ही एकत्र येता आणि गावकऱ्यांना वीज पुरविण्यात मात्र, परस्परांना खोडा घालता, हे कोणाला तरी पटू शकेल काय...



 अमेठीचा आढावा घेतल्यानंतर मग तिथून निघतो. अमेठीचं रेल्वे स्टेशन मात्र, खूपच छान आणि चकचकीत आहे. अमेठीही जर स्टेशनसारखं झालं तर खूपच बरं होईल. शेवटी जाता जाता एकच गोष्ट सांगायची राहून गेली. स्मृती इराणी यांचा निरोप घेताना त्यांनी माझ्याशी मराठीतून संवाद साधला. म्हणाल्या, पाहिलंत ना काय हालत आहे ती. थोडं लिहा याबद्दल. लोक कोणत्या परिस्थितीत राहताहेत हे देशभरात कळलं पाहिजे. मनोहर पर्रीकर आले होते. ते  मला, म्हणजे स्मृती इराणी यांना म्हणाले, की आमच्याकडे जर लोेकप्रतिनिधींनी असा कारभार केला असता, तर गोवेकर जनतेने त्यांना जोड्यानं मारलं असतं. 

व्वा... क्या कहा है... अमेठीमध्येही लवकरात लवकर विकास होवो... किंवा गोवेकर जनतेप्रमाणे त्यांच्यातही अकार्यक्षम लोकप्रतिनिधींना जोड्यानं मारण्याची हिंमत निर्माण होवो, अशी इच्छा व्यक्त करून अमेठी सोडलं...

असो... खूपच लिहिलंय असं वाटतंय... तेव्हा थांबतो. लवकरच बाराबंकीचा फेरफटका...

मोदी आनेवाला है...

लाखभर गावांत प्रचार रथांचा माहोल

भारतीय जनता पार्टीला सत्तेवर आणण्यासाठी उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये घवघवीत यश मिळविणे आवश्यक आहे, हे नरेंद्र मोदी यांनी ओळखले आणि अमित शहा यांच्यावर महत्त्वपूर्ण अशा उत्तर प्रदेशाची जबाबदारी सोपविली. मोदी यांचे अत्यंत जवळचे असलेल्या अमित शहा यांनी प्रदेश भाजप पदाधिकाऱ्यांची अदलाबदली केली. त्यांना 'कट टू साइज' केले. मात्र, एवढेच करून भागणार नव्हते. फक्त एवढेच करून यश मिळणार नाही, हे त्यांना माहिती होते. गावागावांपर्यंत जाऊन आणि नरेंद्र मोदींचे नाव पोहोचविण्याचे आव्हान त्यांना स्वीकारावे लागणार होते. भाजपची यंत्रणा आणि नेटवर्क होतेच. मात्र, त्याच्यावर अवलंबून राहण्यास अमित शहा तयार नव्हते. त्यांना त्रयस्थ यंत्रणेमार्फत गावागावांपर्यंत पोहोचायचे होते. त्यासाठी त्यांच्या मदतीला धावून आली सीएजी... अर्थात, सिटीझन्स फॉर अकाउंटेबल गव्हर्नन्स... अमित शहा आणि सुनील बन्सल यांच्या डोक्यातून ही आयडिया आली आहे. उत्तर प्रदेशात जर खरोखरच पन्नास किंवा त्यापेक्षा अधिक जागा मिळाल्यास त्याचे निम्मे श्रेय सीएजीला देण्याइतपत जबरदस्त काम त्यांनी केले आहे. 



सीएजीने असं काय काम केलंय बुवा... काही माध्यमांमध्ये याबद्दल थोडेफार छापून आले आहे. काही प्रमाणात प्रसिद्धीही मिळाली आहे. थोडे अधिक सविस्तर सांगणे उचित आहे, असे मला वाटते म्हणून हा ब्लॉग. शंभर ते दीडशे उच्चशिक्षित व्यावसायिकांनी एकत्रित येऊन सीएजी ही संस्था सुरू केली आहे. यात सॉफ्टवेअर इंजीनिअर, आयआयटीयन्स, आयआयएम झालेले, माध्यमांचे प्रतिनिधी, सुप्रीम कोर्टात प्रॅक्टिस करणारे वकिल, जाहिरात क्षेत्रातील मान्यवर, प्राध्यापक, सेफॉजॉलिस्ट असे विविध क्षेत्रातील मान्यवर यामध्ये आहेत. एक वर्ष मोदींसाठी, एक वर्ष उत्तम सरकारच्या निर्मितीसाठी हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून मंडळींनी व्यावसायिक कारकिर्दीचं एक वर्ष संस्थेसाठी देण्याचं निश्चित केलं. देशभरात संस्थेचे दहा ते पंधरा हजार स्वयंसेवक आहेत. चाय पे चर्चा, मोदींच्या थ्री डी सभा, स्टॅच्यु ऑफ युनिटी, युनिटी दौड वगैरे कार्यक्रमही याच संस्थेच्या मार्फत राबविण्यात आले होते. 

उत्तर प्रदेशातील 80 हजार गावांपर्यंत पोहोचण्याचं प्लॅनिंग या संस्थेनं केलं. या गावांमध्ये पोहोचण्यासाठी सुमारे चारशे ते साडेचारशे  'मोदी आनेवाला है...'  रथांची निर्मिती करण्यात आली. मोदी आनेवाला है... म्हणजे तुमच्या गावात मोदी येणार आहे आणि दुसरा अर्थ म्हणजे देशभरातही मोदीच येणार आहे असाही अर्थ. बिहारमध्येही अशाच पद्धतीने रथ तयार करण्यात आले असून त्याचे नाव मात्र, वेगळे देण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील 80 हजार गावांची निवड करण्यात आली. टप्प्या टप्प्यानुसार हे रथ कोणत्या गावांमध्ये जाणार याचे प्लॅनिंग करण्यात आले. कोणत्या दिवशी कोणता रथ कोणत्या गावात असेल, तो कोणत्या मार्गाने जाईल, संबंधित गावामध्ये प्रचार केल्यानंतर तो कोणत्या मार्गाने कुठे जाईल, रात्री कुठे थांबेल याचे सविस्तर नियोजन करून त्याची माहिती 15 मार्च 2014 रोजीच निवडणूक आयोगाला सादर करण्यात आली होती. रथामध्ये कोणकोण असेल, ते कुठले आहेत, वगैरेची माहिती देण्यात आली होती. पूर्वी असे रथ तयार व्हायचे. मात्र, निवडणूक आयोगाची मान्यता वेळेत न मिळाल्याने ते तसेच पडून रहायचे, असा अनुभव होता. त्यामुळे आम्ही आधीच सर्व प्लॅनिंग करून मान्यता मिळविली, असे या टीमचा प्रमुख सदस्य असलेल्या ऋषिराज सिंह याने सांगितले.  


 प्रत्येक रथामध्ये एक एलईडी किंवा एलसीडी, जनरेटर, स्पीकर, माईक आणि भाजपचे प्रचार साहित्य जसे उपरणी, टोप्या, पत्रके, स्टीकर्स, पॉकेट कॅलेंडर, झेंडे वगैरे वगैरे आहे. हा प्रचार रथ गावात गेल्यानंतर गावात फिरून तो नागरिकांना गावातील एका ठिकाणी येण्याचे आवाहन करतो. मोदी आणि भाजपच्या प्रचाराची गाणी लावण्यात आलेली असतात. विशिष्ट ठिकाणी मंडळी एकत्र आल्यानंतर मग त्यांच्यासमोर मोदींच्या भाषणाची सोळा मिनिटांची क्लिप दाखविली जाते. त्यामध्ये मोदी मी इथे का आलो, मी गुजरातमध्ये काय केले आहे, देशात काय करायचे आहे, मला मत द्या वगैरे वगैरे मुद्दे मांडतात. नंतर आलेल्या लोकांना प्रचार पत्रके आणि इतर साहित्याचे वाटप होते. एका गावात असा प्रचार केल्यानंतर हा रथ दुसऱ्या गावात मार्गस्थ होतो. 

दुसऱ्या गावातही अशाच पद्धतीने प्रचार. अर्थात, प्रचार रथ व्यवस्थितपणे काम करतो आहे किंवा नाही, याचा आढावा घेण्यासाठी त्रिस्तरीय किंवा चार स्तरीय यंत्रणा उभारण्यात आली आहे. प्रचार रथामध्ये तीन जण असतात. एक ड्रायव्हर, एक भाजपचा कार्यकर्ता आणि एक सीएजीचा स्वयंसेवक. गावात गेल्यानंतर प्रचार रथाने काय काय केले, त्याचा गावकऱ्यांवर काय परिणाम झाला, त्यांना मोदींचे भाषण ऐकून काय वाटले, याचा फॉलोअप घेण्यासाठी कॉलसेंटरची व्यवस्था आहे. मोदींच्या त्या भाषणासाठी उपस्थित असलेल्यांचे संपर्क क्रमांक घेऊन ते मुख्य ऑफिसकडे पाठविले जातात. गावातील काही जणांचे क्रमांक आधीच जमा केलेले आहेत. अशा दोघांशीही संपर्क साधून भाषण आणि एकूणच आयडिया कशी वाटली, याचा फॉलोअप घेतला जातो. प्रचार रथ येऊन गेल्यानंतर गावातील वातावरण कसे होते, याची माहिती घेतली जाते.


दुसरे म्हणजे ड्रायव्हर आणि सीएजीच्या स्वयंसेवकांशी सातत्याने संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतली जाते. लोकांचा प्रतिसाद कसा आहे, हे त्यांच्याकडूनही जाणून घेण्यात येते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व गाड्यांना जीपीएस यंत्रणा आहे. त्यामुळे सध्या वाहन ठरलेल्या नियोजनाप्रमाणे काम करते आहे किंवा नाही, मोदी प्रचार रथ कुठे आहे, प्रचार रथ चालविताना ड्रायव्हर ओव्हरस्पिडिंग करतो का... अशी इत्थंभूत माहिती एका क्लिकवर मुख्य कार्यालयात बसलेल्या मंडळींना मिळत असते. गाडीला चावी लागली आहे किंवा नाही, इतकी बारीक माहिती मिळेल, अशा पद्धतीने नियोजन करण्यात आलेले आहे. आता बोला. 

इतकेच नाही, तर लोकसभा मतदारसंघातील विधानसभा क्षेत्रात भाजप कुठे मजबूत आहे आणि कुठे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. कोणत्या बूथवर आपले मतदार अधिक आहेत आणि तिथून सर्वाधिक मतदान व्हायला पाहिजे इतकी बारीकसारीक माहिती सीएजीने गोळा केली आहे आणि वेळोवेळी त्याचा उपयोग केला जातो आहे. भाजप कार्यकर्त्यांना ती पुरविली जाते आणि त्यातून पुढील नियोजन केले जाते, असे ऋषिराज सिंहने सांगितले. 


आताच जवळपास 80 हजार गावांपर्यंत संपर्क झाला असून आणखी वीस हजार म्हणजे एकूण एक लाख गावांपर्यंत आम्ही पोहोचू, असे ऋषिराज सांगतो. गावात पोहोचल्यानंतर शक्यतो कोणीही विरोध करीत नाही. लोक ऐकून घेतात, आवडीने पाहतात. एकूण 80 हजार गावांपैकी फक्त पंधरा ते वीस गावांमध्येच आम्हाला विरोध झाला आणि मोदींच्या भाषणाची टेप लावू दिली नाही. काही ठिकाणी रथावर दगडफेक झाली. टीव्ही फोडण्यात आले इत्यादी इत्यादी. मात्र, दोन तासांमध्ये सर्व साहित्य रिप्लेस करण्याची व्यवस्था आम्ही तयार ठेवली आहे. त्यामुळे प्रचार रथ पुढे जातच राहतो, खोळंबून राहत नाही.

उत्तर प्रदेशातील फक्त दोन टप्पे बाकी असून राज्यातील सर्व मोदी वाहन आता त्या दोन टप्प्यांमध्ये मतदान होणाऱ्या गावांमध्ये प्रचारासाठी जाणार आहेत. गाडीपासून ते एलईडी-एलसीडी आणि इतर साहित्य भाड्याने घेण्यात आलेले असून निवडणुकीनंतर ते परत करण्यात येणार आहे. त्यामुळे ते पुढे सांभाळण्याची जबाबदारी पक्षावर किंवा संस्थेवर असणार नाही. वर्षाखेरीस महाराष्ट्रातही विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. उत्तर प्रदेशात मोदी आनेवाला है.. रथाला घवघवीत यश मिळाले तर कदाचित महाराष्ट्रातही अशा पद्धतीने गावागावांमध्ये भाजपचे रथ पोहोचताना नक्की दिसू शकतील. 


एक मात्र नक्की की उत्तर प्रदेशात मिशन फिफ्टी प्लस... चे ध्येय गाठण्यासाठी मोदी आनेवाला है... रथाचा पुरेपूर उपयोग झालेला आहे. 

Tuesday, April 29, 2014

क्यो पडते हो चक्कर मे...

प्रियांकाजी है टक्कर में

भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह यांच्या प्रचार फेरीत सहभागी झाल्यानंतर दुस-या दिवशी रायबरेलीला जाण्याचं प्लॅनिंग होतं. सातव्या टप्प्याचा प्रचार सोमवारी संपणार होता. तिथं बुधवारी म्हणजेत ३० एप्रिल रोजी मतदान आहे. त्यामुळं रायबरेलीला जाण्याचं निश्चित केलं. रायबरेलीतून सोनिया गांधी येणार ही काळ्या दगडावरची रेघ. पण तरीही तिथं जाऊन नेमकं रायबरेली कसं आहे. भारतावर ज्या महिलेनं दहा वर्षे निर्विवाद सत्ता गाजविली, हुकुमत केली, त्या सोनियांचा मतदारसंघ नेमका कसा आहे, हे पाहण्याची आणि परिस्थिती जाणून घेण्याची उत्सुकता होती. केवळ आणि केवळ त्यामुळंच तिथं जायचं होतं. बाकी निकाल तर ठरलेलाच आहे. 



लखनऊतल्या आलमबाग बस डेपोतून रायबरेलील जाणा-या बसेस सुटतात. लखनऊपासून सुमारे नव्वद किलोमीटरवर असलेलं गाव. लखनऊमध्ये सध्या ३९ ते ४० अंश सेल्सियस तापमान आहे. पण उन्हाचा तीव्रता इतकी आहे की विचारता सोेय नाही. अकोला, वाशिम, नांदेड, जळगांव किंवा हैदराबादची आठवण यावी, इतकं कडक ऊन आहे. दुपारी साधारण पावणेबाराच्या सुमारास लखनऊ सोडलं. दुपारी दोन वाजता रायबरेलीत प्रियांका गांधी यांचा रोड शो होता. त्यामुळं अगदी वेळेवर तिथं पोहोचेन अशा बेतानं निघालो. लखनऊ-अलाहाबाद हायवेवर आत उजवीकडे वळल्यानंतर रायबरेली गाव लागतं. दोन पदरी महामार्ग आत्ता कुठं चौपदरी करण्याचं काम सुरू झालंय. वाटेत एक-दोन ठिकाणी नदीवर मोठे पूल बांधणं आणि गावात ट्रॅफिक जाम होऊ नये, म्हणून फ्लाय ओव्हर उभारण्याचं कामही सुरू आहे. 



रायबरेली आणि परिसरातील गावात प्रचंड पाऊस होतो. त्यामुळं इथं धानाची म्हणजेच तांदळाची शेती मोठ्या प्रमाणावर होते. काही गावांमध्ये गहू देखील घेतला जातो. इथले जवळपास ८० टक्के लोक हे शेती आणि शेतीपूरक व्यवसायांवर अवलंबून आहेत, असं बसमध्ये भेटलेले सहप्रवासी आणि माजी शिक्षक जयद्रथ चौधरी यांनी सांगितलं. सोनिया यांच्या कृपेमुळ इथं रेल्वे कोचची फॅक्टरी, सिमेंटची फॅक्टरी, सिमेंटचे पत्रे बनविणारी फॅक्टरी वगैरे आली, असंही त्यांनी आवर्जून सांगितलं. मात्र, शेती हाच इथला मुख्य व्यवसाय. सोनियाजींनी खूप निधी केंद्रातून आणला. मात्र, राज्य सरकारने पैसाच सोडला नाही. आमच्याकडे दुर्लक्श केलं, त्यामुळं रायबरेली अजूनही विकसित झालेलं नाही, असं चाचा चौधरी यांचं म्हणणं होतं. मोदीजी की लहर होगी, लेकिन यहा तो सोनियाजी को ही जीतना है, असं चाचा चौधरी यांच्यासह एसटीमध्ये भेटलेले आणखी दोन-तीन सहप्रवासी देखील म्हणत होते.



बछरावा, हरचंदपूर आणि गंगागंज वगैरे गावं मागं टाकून आम्ही रायबरेलीमध्ये प्रवेश केला. गावाचा लुक खेड्यासारखा. महाराष्ट्रातील एखाद-दुसरा तालुका सोडला तर इतर कोणत्याही विकसित तालुक्याच्या तुलनेत अत्यंत मागास, अस्वच्छ आणि विस्कळित असं गाव. म्हणजे गेल्या साठ वर्षांमध्ये गांधी घराण्यानं इथं राज्य केलं, असं सांगूनही कोणाचा विश्वास बसणार नाही, इतकी वाईट अवस्था रायबरेलीमध्ये दिसते. उघडी गटारं, मुंबईत खाडीच्या आसपास असताना नाकात घुसणारी नको असलेली दुर्गंधी इथं त्या उघड्या गटारांजवळ आपल्याला हैराण करणारी. प्रचंड तापलेले वातावरण, सगळीकडे प्रचंड तापमान आणि मधूनच येणारी ती दुर्गंधी अस्वस्थ करून टाकणारी. अरुंद रस्ते, एकावेळी दोन गाड्या कशाबशा जाऊ शकतील इतक्यात रुंदीचे हे रस्ते कम बोळ. 

एकमेकांना खेटून उभारलेली घरं. त्याला ना आकार ना उकार.फक्त चार भिंती रचून वर छप्पर आणि समोर दरवाजा काढला की झालं घर, अशा पद्धतीचं बांधकाम. एसटी स्टँड तर अत्यंत घाणेरडा, छोटा आणि बेशिस्त स्वरुपाचा. चौकाचौकात फेरीवाले, हातगाड्यांवर सरबत, खाण्यापिण्याचे पदार्थ आणि इतर वस्तू विकणारे हातगाडीवाले. थोडक्यात म्हणणे सोनियांचा मतदारसंघ म्हणून मिरविणा-या रायबरेली जिल्ह्यातील मुख्य गावाची ही परिस्थिती तर इतर खेडोपाड्यांत आणि गावांमध्ये काय परिस्थिती असेल विचारायला नको. 



नेत्रचिकित्सालया शेजारच्या कार्यालयातून प्रियांका वड्रा यांची रॅली निघणार असते. प्रियांकांच्या स्वागतासाठी काँग्रेस कार्यकर्ते आणि नेते मोठ्या संख्येनं जमलेले असतात. काँग्रेसचे रायबरेली जिल्हाध्यक्ष सईदुल हसन हे प्रियांकांचं स्वागत चौकाचौकात आणि व्यवस्थितपणे होईल, याचं नियोजन पाहत असतात. फुलं, हार, काँग्रेसच्या टोप्या, उपरणाी वगैरे सर्वांपर्यंत पोहोचली की नाही, याचा अंदाज घेऊन ते देखील प्रियांकांच्या स्वागतासाठी सज्ज होतात. 

एवढ्यात जोरजोरात घोषणाबाजी सुरू होते आणि बरोब्बर अडीचच्या सुमारास प्रियांका वड्रा त्यांच्या टोयोटातून येतात. येतात ते थेट कार्यालयाच्या समोरच्या मैदानात त्यांची टोयोटा थांबते. आतमध्ये जाऊन प्रमुख कार्यकर्त्यांशी दोन-तीन मिनिटांत संवाद साधून पुन्हा बाहेर येतात. कारमध्ये बसून प्रियांका यांनी रोड शो करावा, असा सिक्युरिटीचा आग्रह असतो. तशी विनंती देखील त्यांना केली जाते. प्रियांका गाडीत बसतात देखील. मात्र, मिनिटाभराच्या आतच गाडीतून बाहेर उतरतात आणि वेगानं चालतच तिथून मार्गस्थ होतात. 



चार साडेचार किलोमीटरचा हा टप्पा चालतच पार करण्याचा निश्चय प्रियांका यांनी मनोमन केलेला असतो. त्या थेट रस्त्यावर उतरून स्वागतासाठी थांबलेल्या नागरिकांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये शिरतात. हा रोड शो आता ना सिक्युरिटीच्या आवाक्यात राहिलेला असतो ना काँग्रेस कार्यकर्त्यांचा. सिक्युरिटी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचं कडं मोडून नागरिक आणि इतर लोक थेट आत घुसून प्रियांका यांच्याशी हस्तांदोलन करतात. त्यांना हार घालतात. त्याच्यावर फुलांची आख्खी टोकरी पालथी करतात. प्रियांका गांधी देखील चालताना थेट दुकानांमध्ये जाऊन उभ्या असलेल्या पुरुष मंडळींना  नमस्कार कर, महिलांची गळाभेट घे, उभ्या असलेल्या लहान मुलाला कडेवर उचलून घे, कार्यकर्त्यांशी एक-दोन शब्द बोल... असं करून फुल्ल हवा निर्माण करतात. लोकांचा जत्थाच्या जत्था प्रियांका यांच्या सोबत पुढे चाललेला असतो. गांधी घराण्याची क्रेझ म्हणजे काय हे रायबरेलीतल्या रोड शो मध्ये अगदी व्यवस्थित पहायला मिळालं. 



तीस तारीख दुसरा खाना, पंजेपर ठोक देना... किंवा क्यो पडते हो चक्कर में, प्रियांकाजी है टक्कर में... अशा घोषणा देत कार्यकर्ते फुल्ल टू वातावरण निर्मिती करीत असतात. रायबरेली की जनता का हाथ, सोनियाजी के साथ अशा घोषणाही अधून मधून कानावर पडत असतात. प्रियांकाजी आयी है, नयी रोशनी लायी है वगैरेही ऐकू येत असतं. 

 

मुस्लिम मोहल्ला आल्यानंतर तर रोड शो तील जल्लोष, उत्साह आणि आनंद टिपेला पोहोचतो. प्रियांका यांचं सर्वाधिक जोरदार स्वागत सफा मंजिल की तत्सम कुठल्याशा बिल्डिंगपाशी होतं. मुस्लिम महिला त्यांना हात दाखवून हसत हसत अभिवादन करतात. प्रियांका देखील त्यांच्याकडे वर पाहतच पुढं जात राहतात. अत्यंत वेगानं चालणा-या प्रियांका थोड्या दमल्या तर कारच्या फूटरेस्टवर उभ्या राहून लोकांना हात हलवून अभिवादन करीत असतात. पण त्यांची ही छोटेखानी विश्रांती अवघी पाच मिनिटंच टिकते. नंतर त्या पुन्हा रस्त्यावर उतरून वेगानं मार्गस्थ होतात. काश्मिरी सौंदर्याचं जन्मजात वरदान लाभलेल्या प्रियांका यांचा चेहरा कडक उन्हामध्ये फिरताना सफरचंदासारखा लालबुंद होतो. मात्र, त्यांच्या उत्साहावर त्याचा अजिबात परिणाम होत नाही. त्या चालतच असतात.



संपूर्ण रायबरेली गावामध्ये फिरून झाल्यानंतर त्यांचं काँग्रेसचं रायबरेली मुख्यालय असलेल्या टिळक भवन इथं आगमन होतं. तिथंही त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केलेली असते. अभय त्रिवेदी, रमाकांत पाण्डेय वगैरे कार्यकर्त्यांनी मोठाच्या मोठा गुलाबाचा हार प्रियांका यांच्यासठी आणलेला असतो. रोड शो संपवून प्रियांका यांचं काँग्रेस भवनात जोरदार स्वागत होतं. त्यांना हार वगैरे घातल्यानंतर प्रियांका फक्त पाच मिनिटांसाठी कार्यालयात जातात. ज्येष्ठ आणि प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर मग त्या राज्य सरकारच्या गेस्ट हाउसवर निघून जातात. 



प्रियांका वड्रा आणि गांधी घराण्याची जादू काय असते हे रायबरेलीमध्ये अनुभवायला मिळालं. अर्थात, रायबरेलीमध्ये हे चित्र असणार हे माहिती होतंच. मात्र, तरीही प्रियांका या नावाची जादू काय आहे, त्याची चुणूक जाणविली. राहुल यांच्या तुलनेत कितीतरी पटीनं अधिक लोकप्रिय आणि गर्दी खेचणारा चेहरा म्हणून प्रियांका यांच्याकडे काँग्रेसनं गांभीर्यानं पहायला हरकत नाही. अर्थात, यंदाची निवडणूक राहुल यांच्या नेतृत्वाखाली लढल्यानंतर प्रियांका यांचा हुकुमाचा एक्का काँग्रेसकडे अजूनही शाबूत आहे, याची जाणीव भाजपाच्या नेत्यांनी ठेवायला हरकत नाही. सोनिय गांधी परदेशाी आहेत, गांधी घराण्याने घराणेशाही लादली वगैरे कितीही आरोप झाले, तरी भारतात गांधी घराण्याची जादू आहे आणि ती यापुढेही शाबूत का राहू शकते, याचा अंदाज बांधण्यासाठी कोणा राजकीय विश्लेषकाची गरज नाही. 

प्रियांका यांचे पती रॉबर्ट यांच्यावर भाजपने जोरदार हल्ला सुरू केल्यानंतर प्रियांका यांनीही अत्यंत संयतपणे मात्र, रोखठोकपणे नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. भारतात राज्य करायचं असेल तर ५६ इंचाची छाती असून उपयोग नाही, तर मन मोठं पाहिजे किंवा कसे घाबरलेल्या उंदरासारखे इकडे तिकडे पळत आहेत भाजपवाले... वगैरे वगैरे वक्तव्यांनी इथं माहोल निर्माण केला आहे. प्रियांका गांधी यांना काँग्रेसनं थोडं आधी आणि रायबरेली-अमेठी सोडून इतर मतदारसंघांमध्ये प्रचारासाठी उतरविलं असतं तर भाजपच्या मिशन ५० प्लसला नक्कीच लगाम घातला गेला असता. पण कदाचित रिस्क नको आणि पुढील निवडणुकीपर्यंत पत्ते बंदच ठेवलेले बरे, अशा विचारात काँग्रेस नेते असावेत. म्हणूनच त्यांनी प्रियांकांवर दोनच मतदारसंघाची जबाबदारी दिली. 



उत्तर प्रदेशात मोदींची हवा आहेच. जागा किती मिळतीत, हे आता ठोकपणे मी सांगू शकणार नाही. मात्र, रोज फिरताना ऑटोवाले, पाणीपुरीवाले, सरबतवाले, बसमधील सहप्रवासी अशा कोणालाही विचारलं तरी यंदा मोदीच आहे, असं उत्तर येतं. त्यामुळं कोणी काहीही म्हणो इथं फिरताना मोदीचा बोलबालाच ऐकायला मिळतो आहे. मात्र, भविष्यात प्रियांका गांधी यांच्या रुपानं भाजपसमोर तुलनेनं कठीण आव्हान उभं ठाकणार आहे, याची कल्पना रायबरेलीमध्ये आली. १९८९ ते २००४ या काळात गांधी घराणे सत्तेपासून दुूर होते. काँग्रेस संपली. गांधी घराणे इतिहासजमा झाले वगैरे गप्पा मारल्या जात होत्या. मात्र, त्याच काँग्रेसने आणि गांधी घराण्याने पुढची दहा वर्षे सत्ता उपभोगली. काँग्रेसने बाउन्स बॅक केले. त्यामुळे काँग्रेसला संपविणे वाटते तितके सोपे नाही. किमान प्रियांका गांधी हे चलनी नाणं उपयुक्त नाही, असे सिद्ध होईपर्यंत तर अजिबातच नाही. 

भारतीय जनता पार्टीचे अजय अगरवाल रायबरेलीतून उभे आहेत. सुप्रीम कोर्टातील वकील आहेत. मात्र, सोनिया यांना टक्कर देणारा उमेदवार म्हणून प्रतिमा निर्माण करण्यात ते अपयशी ठरले आहेत. रायबरेली गावात तर भाजपचे झेंडे देखील कुठं दिसत नाहीत. संपूर्ण गावात हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच झेंडे दिसले. रायबरेलीमध्ये भाजपचं ऑफिस कुठं आहे, हे दुकानदार, फेरीवाले, हातगाडीवाले, ऑटोवाले आणि बाजारात आलेले नागरिक यापेैकी कोणालाही माहिती नाही. सुपर मार्केट नावाच्या भागात एका इमारतीमध्ये भाजपचे कार्यालय आहे, याचा शोध साधारण तासभर शोध घेतल्यानंतर लागतो. गमतीची गोष्ट म्हणजे निवडणूक ऐन मोसमात आलेली असताना आणि मतदानाला फक्त दोन दिवस बाकी असताना भाजपच्या कार्यालयाला चक्के कुलूप लावलेले दिसते. असाच अनुभव गुजरातच्या निवडणुकीत सुरत आणि वडोदरा येथील काँग्रेस कार्यालयांमध्ये आला होता. एक बंद होतं तर दुसरीकडं शुकशुकाट. 






भाजपच्या उमेदवारानं दुसरीकडे कुठेतरी कार्यालय थाटल्याचं समजतं. मात्र, तरीही रायबरेली जिल्हा कार्यालय बंद असल्याचं समर्थन कोणीच करू शकणार नाही, अशी परिस्थिती. हिरालाल बैन्सवाल नावाचे एक साठीकडे झुकलेले भाजपाचे कार्यकर्ते भेटतात. ते दोन वर्षांपूर्वी भाजपामध्ये आले होते. त्यांनाही नव्या कार्यालयाची माहिती नसते. ते त्यांच्या परीने शोधाशोध करून मुख्यालय उघडता येईल का, याचा प्रयत्न करतात. मात्र, मुख्यालय बंदच असते. अजय अगरवाल यांच्याशी फोनवरून बोलणं होतं. ते दुस-या गावांमध्ये प्रचार संपवून रायबरेलीच्या दिशेनं यायला निघालेले असतात. मात्र, मला लखनऊ गाठायचं असल्यानं मी फोनवरच त्यांचा निरोप घेतो आणि शुभेच्छा देऊन निघतो...

Monday, April 28, 2014

चप्पा चप्पा... भाजप्पा...


जन जन का संकल्प अटल... 

लखनऊ... संपूर्ण भारतामध्ये नवाबांचं लखनऊ हीच लखनऊची ओळख असली तरीही माझ्यासाठी लखनऊ म्हणजे भारताचे लाडके पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं लखनऊ... वाजपेयी  आणि लखनऊ यांचं अतूट नातं आहे. त्यामुळंच उत्तर प्रदेशच्या निवडणूक दौ-याची सुरुवात लखनऊपासूनच करण्याचं निश्चित केलं होतं. त्यानुसार सुरुवात झाली.

यंदा लखनऊमधून भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह हे निवडणूक लढवित आहेत. अमित शहा यांच्यावर उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपविण्यात आल्यानंतर त्यांनी अनेक सुभेदारांची हलवाहलव करून पार्टीच्या समोर कोणीही मोठा नाही, हा संदेश देण्याचा प्रयत्न केला. त्या हलवाहलवीमध्ये लखनऊमधून हलविण्यात आलेले एक नेते लालजी टंडन. त्यांच्याऐवजी राजनाथ यांना लखनऊमधून उतरविण्याचा निर्णय पार्टीने घेतला. लखनऊ हा भाजपाचा उत्तर प्रदेशातील सर्वाधिक मजबूत बालेकिल्ला आहे. १९९१ पासून वाजपेयी इथले खासदार होते. त्यानंतर एक टर्म टंडन हे लखनऊचे किल्लेदार होते. आता राजनाथ हे लखनऊतून उभे आहेत.



काँग्रेसच्या रिटा बहुगुणा-जोशी, समाजवादी पार्टीचे आलोक मिश्रा, बहुजन समाज पार्टीचे नकुल दुबे आणि आम आदमी पार्टीचे जावेद जाफरी हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. लखनऊमध्ये जवळपास साडेतीन लाख मते ही मुस्लिमांची आहेत. त्यापैकी जवळपास दोन लाख मते ही शिया मुस्लिमांची आहेत. त्यामुळे भाजपाचा बालेकिल्ला हस्तगत करायचा असेल तर एकगठ्ठा मुस्लिम मते आपल्या पारड्यात पाडायची हा सर्वाधिक सोप्पा उपाय. मात्र, यावेळी परिस्थिती रंजक आहे. जावेद जाफरी हे शिया पंथाचे असल्यामुळे शिया समाजाची बरीच मते त्यांच्या पारड्यात पडतील, असा जाणकारांचा कयास आहे. शिवाय मुस्लिमांचे मसिहा म्हणून ओळखले जाणारे मुलायमसिंह यादव आणि जामा मशिदींच्या इमामांकडे मतांचा जोगवा मागणा-या सोनिया गांधी यांची काँग्रेस देखील मुस्लिम मतांवर डोळा ठेवून आहेत. त्यामुळे मुस्लिम मतांची विभागणी होईल आणि भाजपचा विजय आणखी सुकर होेईल, अशी चर्चा लखनऊमध्ये आहे. 



रविवारचा मुहूर्त असल्यामुळे प्रचाराचा जोरदार धुरळा उडणार होता. भारतभर प्रचार करणा-या राजनाथ यांनी शेवटचे चार दिवस फक्त लखनऊसाठी राखून ठेवले होते. त्यापैकी रविवार हा अगदीच खास. रिटा बहुगुणा जोशी आणि जावेद जाफरी यांचेही रोड शो होते. मात्र, मुलायमसिंह यांच्या मोठ्या भावाचे निधन झाल्यामुळे समाजवादी पार्टीचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. बसपाचाही रविवारनिमित्ताने विशेष कार्यक्रम नव्हता. 

त्यामुळे सक्काळी सक्काळी आम्ही पोहोचलो भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात. तिथं राजनाथ सिंह यांच्या रोड शो ची जोरदार तयारी सुरू होती. लखनऊ आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातून सकाळपासूनच कार्यकर्ते येत होते. गेल्या दहा-बारा वर्षांपासून मरगळलेल्या भाजपाला पुन्हा एकदा संजीवनी मिळाल्याचं भाजपा कार्यालयात पोहोचल्यानंतर लगेचच जाणवलं. आपलं सरकार येणार म्हटल्यानंतर जी एक बॉडी लँग्वेज असते, ती भाजपच्या नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये दिसत होती. सर्वत्र जोश आणि उत्साह संचारला होता. मळक्या  शर्टवर किंवा टी-शर्टवर मोदी यांचे चित्र असलेले पांढरे शुभ्र टी-शर्ट चढविणा-या गोरगरीब कार्यकर्त्यांपासून हातामध्ये दोन दोन आयफोन असलेल्या आणि कडक इस्त्रीच्या कपड्यांमध्ये वावरणा-या हायफंडू कार्यकर्त्यांपर्यंत सर्व स्तरातील कार्यकर्ते इथं पहायला मिळत होते. मुस्लिम समाजाचं प्रतिनिधीत्त्वही पहायला मिळत होतं. 



भाजपाच्या प्रथेप्रमाणे कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांसाठी चहा-नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. पुरी-भाजी आणि शिरा खाऊन मग एक ग्लास चहा प्यायल्यानंतर कार्यकर्ते अब की बार मोदी सरकार घोषणा देण्यासाठी तयार होत होते.  कुणी भाजपच्या भगव्या टोप्या कुठं मिळतात, याची शोधाशोध करीत होतं. तर कुणी भाजपचे झेंडे खांद्यावर घेऊन मिरवत होतं. मुख्यालयासमोरच थाटलेल्या प्रचार साहित्याच्या स्टॉलवरही खरेदीसाठी कार्यकर्त्यांची झुंबड उडाली होती. एवढ्यात लालजी टंडन यांचं आगमन होतं. मग त्यांच्या पाया पडण्यासााठी कार्यकर्त्यांचा गराडा पडतो. त्यातूनच वाट काढत, कोणाला जवळ घेत, कोणाकडे किरकोळ कटाक्श टाकून लालजी टंडन कार्यालयात मार्गस्थ होतात. राजनाथसिंह दहा मिनिटांत येत आहेत, अशी घोषणा होते आणि मग कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण येतं. हर हर मोदी, घर घर मोदी.., चप्पा चप्पा, भाजप्पा..., लाल किलेपर कमल निशान, माँग रहा है हिंदुस्थान..., नरेंद्र मोदी कमल निशान, माँग रहा है हिंदुस्थान... अशा घोेषणा जोरजोरात दिल्या जात असतात. मधूनच एक उत्साही कार्यकर्ता देश का नेता कैसा हो राजनाथसिंह जैसा हो... अशी घोषणा देतो. त्याला तातडीनं बाजूला घेतलं जातं.




भाजपच्या कार्यालयात मोठ्या संख्येनं आलेल्या मुस्लिम कार्यकर्त्यांचे फोटो टिपण्यासाठी मग माध्यमांचे प्रतिनिधी आणि इतर कार्यकर्त्यांची झुंबड उडते. मोदींचा जयजयकार त्यांच्याकडूनही सुरू असतो. मुस्लिम कार्यकर्ते इतक्या संख्येनं आलेले पाहून मग माध्यमांचे प्रतिनिधीही त्यांच्या मुलाखती वगैरे घ्यायला सुरूवात करतात. एवढ्यात राजनाथसिंह आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचं आगमन होतं. भाजपा का एक नाथ, राजनाथ राजनाथ... अशा घोषणा जोरजोरात दिल्या जातात. कार्यकर्त्यांच्या गराड्यातून मार्ग काढत राजनाथ मुख्यालयात प्रवेश करतात. भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये तेव्हापासून संचारलेला उत्साह सायंकाळी साडेसातपर्यंत तसाच असतो. 

बरोब्बर अकरा वाजता राजनाथ यांच्या रोड शो ला सुरुवात होते. लखनऊच्या एकूण सहा मतदारसंघांपैकी तीन मतदारसंघांमधून हा रोड शो जाणार असतो. मध्य, पूर्व आणि उत्तर लखनऊ मतदारसंघांमधून. साधारण चाळीस किलोमीटरचा रोड शो. मनोहर पर्रीकर, छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंह, विजय गोयल, नितीन गडकरी वगैरे मंडळी या रोड शो मध्ये विविध टप्प्यांमध्ये सहभागी होत असतात. प्रचाराच्या तापलेल्या वातावरणाशी उन्हाशी स्पर्धा होत असते. अर्थात, उन्हाची सरशी होते आणि साधारण अर्धा-एक तास उघड्या टेम्पोमधून रोड शो करणारे राजनाथ तासाभरानंतर इनोव्हामध्ये बसून रोड शो सुरू करतात. मुख्य चौकांमध्ये सभा आणि इतर ठिकाणी कार्यकर्त्यांशी हस्तांदोलन, अभिवादन असे रोड शो चे स्वरूप असते. 



शंभर-सव्वाशेच्या संख्येने थांबलेले भाजपाचे कार्यकर्ते, राजनाथ यांच्यावर उधळण्यासाठी पोतं भरून फुलांची असलेली व्यवस्था, जोरदार होत असलेली घोषणाबाजी हे चित्र चौकाचौकांत पहायला मिळत असतं. चारशे-पाचशे कार्यकर्ते बाईक्स वरून, मग साऊथच्या चित्रपटांमध्ये शोभून दिसेल असा चारचाकी गाड्यांचा ताफा, त्यामध्ये एकात राजनाथ बसलेले असतात. मध्येच कुठं टेम्पोमध्ये महिला, स्थानिक नेते, काही उत्साही मुस्लिम कार्यकर्ते असतात. जागोजागी त्यांच्या उधळण्यात आलेल्या फुलांमुळं राजनाथ यांच्या गाडीवर फुलांचा आणि हारांचा ढीगच्या ढीग जमा झालेला असतो. कार्यकर्त्यांच्या स्वागतामुळं रोड शो ला साधारण दीड-दोन तासांचा उशीर होत असतो. तरीही उत्साही कार्यकर्त्यांच्या संख्येत अजिबात घट होत नाही. कुठं छोटे ढोल वाजवून राजनाथ यांचं स्वागत होत असतं. सुरुवातीच्या टप्प्यात सगळा भाग हा मध्यमवर्गीय आणि उच्चमध्यमवर्गीय स्वरुपाचा. बहुतांश मतदार हा भाजपचा पारंपरिक मतदार असलेला. 




नंतरच्या टप्प्यात रोड शो अमीनबाग, चौक, इमामबाडा, सीतापूर रोड, त्रिवेणीनगर वगैरे भागातून जातो. हा भाग मुस्लिम बहुल. झोपड्यांची संख्या प्रचंड. तुलनेनं इथं भाजपाचं स्वागत कमी होतं. तरीही काही झोपड्यांवर भाजपाचे झेंडे लागलेले असतात. पण समाजवादी पार्टीचे झेंडे आणि बसपाचे छोटे छोटे रथ इथं मोठ्या प्रमाणात दिसतात. खदरा भागात राजनाथ यांच्या रोड शो ची समाप्ती असते. तिथं त्यांची जाहीर कोपरा सभा असते. रमणसिंह आणि राजनाथ दोघेही काँग्रेसच्या भ्रष्टाचारावर जोेरदार आसूड ओढतात. उत्तर प्रदेशमध्ये गुंडागर्दी आणि बेरोजागारी असल्याबद्दल अखिलेश सरकारला जाब विचारतात. 

राजनाथ यांचा जोर असतो हिंदू-मुस्लिम ऐक्यावर. रमणसिह, शिवराजसिंह यांना विचारा त्यांनी हिंदूृ-मुस्लिमांमध्ये कधी भेद केला का. जातीय तेढ निर्माण केली का. आम्हाला घाबरू नका, आम्हाला एकदा संधी द्या... अशा राजनाथ यांच्या भाषणाचा आशय असतो. काँग्रेस आणि समाजवादी पार्टीने मुस्लिमांचा वापर केला. आम्ही मुस्लिमांचा विकास करू, असे आश्वासन देतात. शिवाय शेवटच्या टप्प्यात प्रचाराला आल्याबद्दल मतदारांची माफी मागतात. भाजपच्या कार्यकर्त्यांना घराघरापर्यंत पोहोचण्याचा आदेश देतात. आपले मत नसले तरी त्यांच्याशी संपर्क साधा आणि मतदानासाठी बाहेर काढा, असे सांगतात. राजनाथ यांच्या खदरा येथील सभेला स्थानिक मुस्लिम मंडळी शंभर सव्वाशेच्या संख्येनं उपस्थित असतात. वीस-पंचवीस मिनिटं बोलल्यानंतर राजनाथ निघून जातात आणि मग आम्ही पुन्हा भाजपच्या कार्यालयाच्या दिशेनं निघतो.



भाजपा कार्यालयात गाडी सोडून दिल्यानंतर मग रूमवर जाण्यासाठी ऑटो पकडतो. ऑटोवाल्याच्या काचेवर काँग्रेसच्या रिटा बहुगुणा-जोशी यांचा स्टीकर असतो. इथं काय काँग्रेसची हवा का, म्हटल्यानंतर तो ऑटोवाला म्हणतो. नही भैय्या यहा भी मोदी की हवा ही है. हम काँग्रेसवाले है इसलिए ये स्टीकर लगाया है. कोण जिंकणार, असं विचारल्यानंतर त्याचं स्पष्ट उत्तर असतं. भैय्या हम तो काँग्रेस जितेगी ऐसाही बोलेंगे. आखिर हम उम्मीदवार नही देखते. सिर्फ पंजा देखके ठोक देते है. हवा मोदी की है, लेकिन हम पंजे को ही व्होट देंगे, असं त्याचं ठाम मत असतं. 

दिवसभरात ऑटोवाले, ड्रायव्हर, चहावाले, एटीएम सिक्युरिटी गार्ड, रस्त्यावरचे पादचारी, भाजी-फळविक्रेते अशा अनेकांशी बोलल्यानंतर सर्वांच्या मुखी एकच नाव होतं मोदी मोदी आणि मोदी. इस बार तो मोदी की ही हवा है... असं त्यांचं म्हणणं होतं. काँग्रेस जितेगा असं म्हणणारा पहिलीच व्यक्ती मला दिवसभरात भेटली आणि ती म्हणजे तो ऑटोवाला. अर्थाात, तो एकटा. बाकी सर्व मोदींचे समर्थक.