Friday, July 06, 2007

भाषा व संस्कृती वेगळी असूनही पुणं भावलं!

बास्केटबॉलपटू वॉल्श यांच्या डायरीतील नोंद

आशिष चांदोरकर
पुणे, ता. 28 ः "शहर पुणे... मुंबईपासून फक्त तीन तासांच्या अंतरावर... इथं बऱ्याच महिला तुम्हाला साडी नेसलेल्या दिसतील. वाहनचालक मोटारगाड्यांना सहजपणे "ओव्हरटेक' करून "रॉंग साइड'नं जाताना तुम्ही पाहू शकाल. पण माझ्या कायम लक्षात राहील ते नागरिकांचं बास्केटबॉल प्रेम व पाहुण्यांचं आदरातिथ्य! महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत झालेला माझा सत्कार व विरोधी पक्षनेत्यांच्या शेजारील खुर्चीवर बसण्याची मिळालेली संधी, हा मी सर्वोच्च सन्मान समजतो. इथली संस्कृती वेगळी आहे. भाषाही निराळी आहे. तरीही मला शहर भावलं. पुणेकरांनो, माझ्यावर भरभरून प्रेम केल्याबद्दल विशेष धन्यवाद!'

ही आहे जॉन डेव्हिड वॉल्श यांची डायरी. महाराष्ट्रातील बास्केटबॉल खेळाडू व प्रशिक्षकांना पुण्यात मोफत प्रशिक्षण देणारे जे. डी. वॉल्श कदाचित विस्मरणात गेले असतील. पण वॉल्श यांनी पुण्यातील अनुभव त्यांच्या वेबसाइटवर लिहिला असून, त्याची एक "ई-मेल' प्रस्तुत प्रतिनिधीलाही पाठविली आहे. त्यातीलच हा काही भाग...
बास्केटबॉलविषयी भारतामध्ये इतकं प्रेम आणि उत्सुकता असेल, याची मी कधी कल्पनाच केली नव्हती. फर्ग्युसन महाविद्यालयात गेलो तेव्हा तिथं कोर्टची रंगरंगोटी व किरकोळ दुरुस्ती सुरू होती. उन्हाचा त्रास आणि पावसाची शक्‍यता लक्षात घेता मी सकाळी सात वाजताच सराव सुरू करण्यास सांगितलं. पहिल्या दिवशी कोर्टवर नारळ फोडण्यात आला. हे काय सुरू आहे, असा विचार माझ्या मनात आला. पण प्रशिक्षण शिबिरात विघ्न येऊ नये, म्हणून नारळ फोडण्यात आल्याचं मला सांगण्यात आलं.
मग सुरू झाले प्रशिक्षणाचे धडे. पहिल्या दिवशी 80 खेळाडू आणि प्रशिक्षक होते. पण म्हणता म्हणता संख्या वाढली आणि अखेरच्या दिवशी हा आकडा 150 पर्यंत पोचला. पुण्यात बास्केटबॉल "स्पिरीट' जिवंत असल्याचं मला जाणवत होतं. काही काही जण तर वीस-वीस तास अंतर कापून माझ्या शिबिरासाठी आले होते. तेही "एसी' नसलेल्या गाड्यांमधून! तेव्हाच माझ्यापाशी देण्यासारखे जेवढे काही आहे ते देण्याचा मी निश्‍चय पहिल्याच दिवशी केला. सोळा वर्षांचा सिद्धार्थ कोलकता येथून दोन दिवस प्रवास करून आल्याचं ऐकलं आणि माझ्या प्रशिक्षण शिबिराचं सार्थक झाल्याची भावना निर्माण झाली.

खेळाडू व प्रशिक्षकांचा खेळाविषयीचा उत्साह व माहिती जाणून घ्यायची जिज्ञासा पाहून मला हुरूप आला. "बॉल शूटिंग' आणि "ड्रिबलिंग'चे धडे दिले. सुरवातीला कोर्टवरचे प्रशिक्षण व वर्गातील धडे खेळाडूंपर्यंत पोचण्यात अपयश येत होते. पण माझा संदेश सर्वांपर्यंत पोचविण्यात अपूर्व सोनटक्के, ओंकार कदम, अमित आंबेडकर, अजिंक्‍य मेहता व गणेश बगाडे या डेक्कन क्‍लबच्या खेळाडूंची मला मदत झाली.

पुण्यातील बहुतांश वृत्तपत्रांमध्ये माझ्याविषयी छापून आलं होतं. भारतीय पत्रकाराची बास्केटबॉलविषयीची उत्कंठा किती आहे, हे मला पहिल्या पत्रकार परिषदेतचं जाणवलं. मला विचारलेला पहिलाच प्रश्‍न होता, "अमेरिकेशी सामना करण्यासाठी भारतीय बास्केटबॉलपटूंना आणखी किती वेळ लागेल?' भारतात बास्केटबॉलची सात-आठच "इनडोअर कोर्ट' आहेत आणि खेळाडूंची सरासरी उंची पाच फूट पाच इंच. तरीही बास्केटबॉलमध्ये अमेरिकेशी स्पर्धा करण्याची इच्छा ऐकून मी चक्रावलोच.

पुण्यामध्ये मला "व्हीआयपी' वागणूक दिल्याने मी खूपच भारावून गेलो. महापौर राजलक्ष्मी भोसले, उपमहापौर चंद्रकांत मोकाटे, विरोधी पक्षनेते प्रा. विकास मठकरी, बास्केटबॉल संघटनेचे विवेक मेहता आणि महापालिकेतील नगरसेवक यांनी माझा सत्कार केला. यापूर्वी मी असे कधीच अनुभवले नव्हते. शेवटी विरोधी पक्षनेत्याशेजारी बसण्याची विनंती मला केली गेली. मी तर उडालोच! असो. मला इतकं प्रेम दिल्याबद्दल पुणेकरांनो धन्यवाद.

3 comments:

Anonymous said...

Nice to read your blog.

Tulashidas Bhoite...Mumbai

Anonymous said...

Hi, Tuza blog vachala. Chchan vatala. Pan ek goshta khari aahe ka ? Hach jar kuni African black american kheladu asta tar apalya poranni ani lokanni tyala evadha response dila asta ka ? Kinva ekhada aaplach noth east cha mongoloid featres wala kheladu asta tar kay zale aste. Aapan gorya katadi chya evade chatkan premat ka padto ani tyana lagechach dokyavar ka basavto kahi kalat nahi.

Arun Sabnis.

Devidas Deshpande said...

कूल...बास्केट्बॉल झाले, आता फुट्बॉलच्या खेळाडूंना कधी बोलविणार?