Wednesday, June 27, 2007

अंजूच्या उपस्थितीवरच प्रेक्षक खूष...


जागतिक ऍथलेटिक्‍स स्पर्धेला पात्र ठरण्याची आणखी एक संधी अंजू बॉबी जॉर्जच्या हातून निसटली असली, तरी लोकांना तिच्या उपस्थितीचेच अप्रूप होते. गेल्या वेळेस आजारी असल्यामुळे पुण्यातील ग्रांप्री स्पर्धेत सहभागी होऊ न शकलेली अंजू सणस क्रीडांगणावर आली आणि स्पर्धेचा नूरच पालटला. हरवलेले चैतन्य परत आले. टाळ्यांचा गजर सुरू झाला आणि प्रत्येक जण तिच्या यशासाठी प्रार्थना करू लागला.

लांब उडीच्या स्पर्धेत फक्त चारच स्पर्धक होते. त्यात अंजू जॉर्ज, मनीषा डे आणि सुश्‍मिता सिंग रॉय या भारताच्या खेळाडू, तर सायरा फझल ही पाकिस्तानची ऍथलिट होती. त्यामुळे अंजूचे पुण्यातील विजेतेपद निश्‍चित होते. पण सर्वांनाच उत्सुकता होती ती अंजू 6.60 मीटर लांब उडी मारून जागतिक ऍथलेटिक्‍स स्पर्धेला पात्र ठरते का याचीच!

प्रत्येक खेळाडूला सहा वेळा उडी मारण्याची संधी होती. पात्र ठरण्यासाठी आवश्‍यक 6.6 चा आकडा पार करणे आपल्या आवाक्‍यात नाही, याचा अंदाज अंजूला पहिल्या दोन प्रयत्नांनंतरच आला असावा. कारण पुढच्या प्रत्येक उडीच्या वेळी ती प्रेक्षकांकडे पाहून मला "चिअर अप' करा, असे आवाहन करीत होती. चौथ्या उडीपर्यंत अंजूने सर्वप्रथम संधी घेतली आणि इतर तीन खेळाडूंनी नंतर उड्या मारल्या. पण अखेरच्या दोन उड्या मारण्यापूर्वी अंजूने थोडी अधिक विश्रांती घेतली व सर्वांत शेवटी उड्या मारल्या. तरीही अंजूची मजल 6.21 मीटरपर्यंतच गेली. अखेरच्या प्रयत्नातही अपयश आल्यानंतर मातीवर जोरात हात आपटणाऱ्या अंजूच्या चेहऱ्यावरचे नैराश्‍य अगदी सहजपणे दिसत होते.

अंजूने पात्रता निकष पूर्ण केला नसला, तरी तिने अपेक्षेप्रमाणे सुवर्णपदक मात्र पटकाविले. उपस्थितांच्या चेहऱ्यावर मात्र, अंजूला प्रत्यक्ष पाहिल्याचेच समाधान होते. स्पर्धा संपल्यानंतर अंजूचे फोटो काढण्यासाठी फटाफट कॅमेरा "क्‍लिक' होऊ लागले. स्वाक्षरी घेण्यासाठी चाहत्यांचा गराडा पडला. प्रत्येकाची इच्छा होती अंजूबरोबर हस्तांदोलन करण्याची, शुभेच्छा देण्याची आणि आयुष्यभरासाठी अंजूबरोबरच्या सुखद आठवणी जपून ठेवण्याची!

जागतिक ऍथलेटिक्‍स स्पर्धेत भारताला ब्रॉंझपदक मिळवून देणाऱ्या अंजू जॉर्जची लोकप्रियता अबाधित असून, ती कामगिरीवर अवलंबून नाही, याचाच प्रत्यय सणस क्रीडांगणावर येत होता.

No comments: